लेखनप्रकार
कुमार गंधर्व यांनी गायलेली संत कबीर यांची रचना.
उड जायेगा हंस अकेला
जग दर्शन का मेला
ह्या ओळी एकल्या आणि अनेक विचार मनात उमटले.. सगळ्यात आधी डोळ्यासमोर चित्रं आलं ते आकाशात झेपावलेल्या हंसाचं... पण उड जायेगा असं म्हटलयं.. म्हणजे अजून उडालेला नाही. ठाऊक आहे उडणार आहे ते. परत ऐकली ओळ. जायेगा शब्दात गंधर्वांनी जी आर्तता ओतलीय त्यावरून वाटतं आत कुठेतरी खोलवर असं वाटतयं त्याने जाऊ नये. मग घोटून घोटून सांगतो आहोत की बाबा रे तो उडून जाणारच आहे. पण मग हंस अकेला ... एकटा का? मग त्याने जावं तरी का? पण तो उडून जाणार आहे, त्याच्या जाण्यातही डौल आहे. हंस आहे तो. जाणारच आहे तो, त्याने जायलाही हवं. 'जग दर्शन का मेला' - हे जग पहायला हवं त्याने. त्याने एकट्याने जायला हवं. आणि तो जाईल - इतका विश्वास त्याच्यवर टाकायलाच हवा. त्याच्या निर्धाराला मोडता घालणं योग्य नाही.
डोळ्यासमोरचं चित्रं गेलं आणि वाटलं - कोण हंस? दूर जाणारं पोटचं पोर? की सासरी जाणारी लेक? की जग पहायला निघालेला अवलिया? की प्रीयकर/प्रेयसी? की स्वतःचा जीव? हंस अकेला... एकटं/एकटी जातो/जाती आहे त्याची काळजीही वाटतेय अनं कौतुकही... की आपण एकटं पडणार आहोत याचं दु:ख आहे हे? डोळे मिटून घेतले आणि नकळत काळ बदलल्यासारखं झालं..
गाण्यासोबत तबल्याचा नाद घुमू लागला. लहान असताना ठाण्याला घंटाळीला बाबांसोबत भजनांना जायचो. बालपण ते. एखाद-दुसरं भजन ऐकायचो. हातात टाळ धरायचो. काही वेळाने पेंग यायची. मग बाबांच्या मांडीवर डोकं ठेऊन डोळे मिटून ऐकत रहायचो.. तीच ही तबल्यावरची थाप. अगदी तोच अनुभव. कळत नकळत मनाला बालपणी सापडलेली लय आज परत गवसल्याचा आनंद झाला. आणि मग वाटलं - हंस म्हणजे वेळ तर नाही? प्रत्येक क्षण तसा एकटाच. वेळ निघून गेली, निघून जाणार हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. कोणासाठी न थांबणारा काळ! अगदी आताही मातकट झालेल्या नाडीत ओवलेल्या पितळी झांजा डोळ्यासमोर आल्या. काही क्षणांपुरते ते क्षण जगलो. पण मग एक रुखरुख लागून राहिली - तेव्हा का नाही जगलो ते क्षण. तेव्हा आपण त्या भजनांच्या शब्दांशी , लयीशी, स्वरांशी एकरूप होत होत चक्क झोपायचो. आज ठरवून लयही सापडत नाही आणि झोपही नाही. बालपणी हंस सोबत होता पण त्याला वेगळं शोधावं लागलं नाही. आता शोध घ्यावा तर कळतयं - उड जायेगा हंस अकेला.
प्रेयसी? - काय नक्की म्हणावं - तिचं करीअर, आपलं प्रेम, समाजव्यवस्थेने आणलेले अडसर.. तिला मनःशांती मिळावी हीच प्रार्थना अजूनही करतो तर मग तिने आणि मी असं एकेकटं जावं हे इतक्या कौतुकाने कसं सांगता येईल. Love or liberty ? महत्त्वांच काय? दोन्ही का मिळू नये. तिने सुखात नांदावं, जग पहावं तिल मनःशांती लाभावी. प्रेमात अजून दुसरं काय मागणं असणार..तिच्या नसण्याने डोळ्यात पाणी आणि तिच्या विरहाने - तिला होणार्या त्रासानेही डोळ्यात पाणी आणि काही काळाने मग ती सुखात असल्याचं पुढेमागे कळलं की मनाला येणार्या कोरेपणावर हसताना डोळ्यात येणारं पाणी.. दोघांची अवस्था तीच...हंस पुन्हा अकेलाच. उड जायेगा... जग दर्शन का मेला...
जैसे पात गिरे तरुवर के
मिलना बहुत दुहेला
न जानु किधर गिरेगा
लगया पवन का रेला
हंसाच्या उडण्याची तुलना झाडाच्या गळणार्या पानाशी का तुलना करावी? एक स्वबळावर जातोय. एक बळ नाही म्हणून विलग होतोय. की ही तुलना नाहीच? दोन्ही जाणार आहेत. पण त्यांनी जावं असं मात्र वाटत नाहीए. पण फरक कीती स्पष्ट आहे. हंस उडून जाईल. तो परतही येण्याची आशा लाऊन जाईल. कारण पंखात बळ आहे. काळजी, आशा, आनंद अश्या भावनांच विचित्र मिश्रण आहे हे. मात्र झाडावरून पडणार्या पानाचं तसं नाही. एक तर ठाऊक आहे की ते परतणार नाही. बरं त्याने परतावं तर आता ते त्याला स्वतःहून शक्य नाही. त्यात त्याने कुठे जावं हेही त्याच्या हाती नाही. वारा नेईल तिथे जाईल. कसं परत मिळावं? इथे आशा कसली ठेवायची? दु:ख किती गोंजारायचं?
जब होवे उमर पूरी
जब छुटेगा हुकम हजूरी
यम के दूत बडे मजबूत
यम से पडा झमेला
आतापावेतो आवडीची व्यक्ती अथवा गोष्ट दूर जाताना होणारं दु:ख, प्रतीची आशा, प्रगतीचं कौतुक अश्या भावनांच्या कल्लोळात अडकलेलो असताना वय झाल्यानंतर मरण यावं म्हणून प्रार्थना करणार्या एखाद्या आजारी माईचं किंवा अतिशय समाधानी बापाचं चित्र डोळ्यासमोर आलं. काय विचित्र परिस्थीती आहे. स्वतःचा जीव जाणार हे ठाऊक आहे. तो जावा अशीही इच्छा आहे. ही पानगळ. पण इथे समाधान आहे. किंवा उमेद , बळ संपल्याने पत्करलेली शरणागती आहे. ह्या स्थित्यंतराला तर्काची कसोटी लावायलाच हवी का असंही वाटतं.
दास कबीर हर के गुण गावे
वा हर को परन पावे
गुरु की करनी गुरु जायेगा
चेले की करनी चेला
हे सरळसोट मान्य होतं. शाळेच्या अभ्यासक्रमात 'महापुरूषांचा पराभव' असा धडा होता. युगपुरूष, महामानव यांच्या तत्त्वांचा पराभव त्यांचे अनुयायी करतात असा आशय असलेला. गुरू की करनी गुरू जायेगा... चेले की करनी चेला. मग प्रश्न पडतो की हे सगळं मान्य असताना ही आळवणी का? कोणासाठी? कशाचीच शाश्वती नाही हे सांगताना देवाचं नाव कशाला? आणि अचानक प्रश्न पडला - आपला कधी काळी सोडून गेलेला सूर, आवाज हा कुमार गंधर्वांचा हंसच होता. पण तो परत यायचा होता.
बर्याच गोष्टी, बरीच माणसे पूर्वीसारखी नसतील. ज्याची आशा सोडून द्यावी यी पानगळ. आणि आशा जीवंत ठेऊन जाणारी आणि परतल्यावर मन:शांती लाभणारी अशी एखादी गोष्ट किंवा व्यक्ती म्हणजे हंस!
उड जायेगा हंस अकेला
जग दर्शन का मेला
मिसळपाव
सुरेख!!
क्या बात
हंस
In reply to हंस by मिसळभोक्ता
असेच वाटते
In reply to असेच वाटते by विकास
असेच
In reply to असेच by घाटावरचे भट
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to +१ by नंदन
सुरेख..
In reply to हंस by मिसळभोक्ता
आत्मा
सुंदर
In reply to सुंदर by विसोबा खेचर
अरे बाप रे
In reply to अरे बाप रे by भडकमकर मास्तर
जवळच
आवडले
आवडले
सुंदर लेख
वा !!
छान लेख.
सुंदर लेख.
खरेच सुंदर
झकास लिहलय.
वा वा सुरेख स्फुट!
In reply to वा वा सुरेख स्फुट! by चतुरंग
>>नीर-क्षीर
सुरेख लेख.