एक टरकावणारा अनुभव
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते.
वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्यापैकी मास्-बेस बाळगुन. त्यामुळे पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला गवळी त्या दिवशी रात्री वडगांव पाचपीरला पोहोचला तेव्हा गावाचा जावई रहायला आल्यासारखे तिथे त्याचे स्वागत झाले. अर्थातच पुण्याच्या परसदारातच डॅडी आल्यामुळे माझे क्राईम रिपोर्टर म्हणुन तिकडे बारीक लक्ष होतेच.
गवळी तिथे येवुन दोन दिवस झाले अन मला माझ्या संपादकांनी मी तिथे जावुन, परिस्थिती पाहुन अन जमले तर गवळीला स्वतः भेटुन सविस्तर बातमी करण्याबाबत सुचवले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लगेचच सर्व व्यवस्था केली अन २५ जानेवारीला भल्या पहाटे वडगांव पाचपीरला रवाना झालो. बरोबर होते माझा फोटोग्राफर सहकारी, माझ्या वृत्तपत्राच्या सिस्टर कन्सर्न वृत्तपत्रातले एक ज्येष्ठ पत्रकार आणि गवळीला पहाण्यास उत्सुक असलेला आमचा आणखी एक पत्रकार मित्र.
भल्या पहाटे साडेसहा सात वाजता (पत्रकारांचा दिवस सहसा दुपारी सुरु होतो आणि रात्री एक्-दोन नंतर केव्हातरी संपतो. त्यामुळे नऊ-दहा वाजण्यापुर्वीची कोणतीही वेळ आमच्या दृष्टीने भली पहाटच असते.) निघाल्यामुळे साडेनऊ दहा वाजेपर्यंत आम्ही वडगांव पाचपीरला पोहोचलो अन लगेचच कामाला लागलो. काही गावकर्यांशी बोलल्यावर आम्ही साधारणता अकराच्या सुमारास शिक्रापुर खेड मार्गावरच्या गवळीच्या सासुरवाडीला पोहोचलो.
गवळीची सासुरवाडी म्हणजे मुख्य रस्ता आणि पाच पीरांचा दर्गा यांच्यामधली एक दोन मजली टुमदार इमारत होती. गावाच्या जरा बाहेरच, रस्त्याला अगदी लागुन असलेल्या आणि निळ्या किंवा हिरव्या (आत्त्ता नक्की आठवत नाही) रंगाने रंगवलेल्या त्या इमारतीभोवती साधारण पाच्-सहा फुट उंचीची कंपौंड वॉल बांधलेली होती. ऐसपैस अंगणात एक पत्राचा मांडव टाकला होता. तिथे चुल्हाणावर स्वयंपाक सुरु होता. काही माणसे कंपौंड वॉलवर चढुन वेल्डिंग मशीन वगैरे वापरुन तिच्यावर चार एक फुट उंचीच्या बारीक जाळ्या बसवत होती. मम्मी-डॅडी अन मुलांच्या सुरक्षिततेसाठीच बहुधा. पलीकडे मैदानात मुंबई नंबरप्लेटच्या काही गाड्या उभ्या होत्या.
आम्ही आमची गाडी सुद्धा पलिकडच्या मैदानात लावली अन ड्रायव्हरला तिथेच सोडुन चालत घराकडे निघालो. आम्ही घराजवळे पोहोचण्याआधीच काही लोक बाहेर आले अन त्यांनी विचारपुस सुरु केली. जरी ते निरुपद्रवी दिसत असले तरी आवाजात बरीच जरब होती. आम्ही कोण ते कळल्यावर त्यांनी आम्हाला तिथेच थांबायला सांगितले अन माझे व्हिजीटींग कार्ड घेऊन एक्-दोन जण आत डॅडींना वर्दी द्यायला गेले. ते एक्-दोन मिनिटातच परतले अन आम्हाला आत येण्याची खुण केली.
त्यांच्यामागे आत गेलो. घरात शिरल्याशिरल्या डाव्या हाताला एक अरुंद जिना होता, सुमारे तीन्-चार फुट रुंदीचा अन पाच सहा पायर्यांनंतर वळणारा. जिन्याच्या वळणार्या स्टेपवर चार पाच जण उभे होते. ते डॅडीचे बॉडीगार्ड असावेत हे त्यांच्या एकुण दिसण्यावरुन अन देहबोलीवरुनच लक्षात येत होते. एकुण माहौल दगडी चाळीसारखाच पण मेटल डिटेक्टर मात्र नव्हते. यावेळी आमची झडती घेण्याचा प्रयत्न झाला नाही पण जिन्यात उभे असलेले तरुण मात्र आम्ही आत गेल्यावर सावध झालेले जाणवले.
जिना चढुन गेल्यावर एक सुमारे बारा फुट लांबी-रूंदीची खोली होती तिथेच दारासमोर गवळी एका सोफ्यावर बसला होता, समोर एक टीपॉय त्याच्यावर काही पेपर अन पलीकडे काही खुर्च्या. गवळीच्या डाव्या बाजुला एक मोठ्ठी स्लायडिंग विंडो, ती उघडीच होती अन समोरचा मुख्य रस्ता दिसत होता. आजुबाजुला बांधकामे नसल्याने छान वार्याच्या झुळुका येत होत्या. चिमण्या मधुनच आत उडत येत होत्या अन खोलीभर फिरुन, एका कडेच्या कपाटावर बसुन परत बाहेर जात होत्या.
नमस्कार चमत्कात झाले अन डॅडीनं आमच्यासाठी चहा आणायला सांगीतले. चहा येईपर्यंत आम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केली अन मुलाखत सुरु झाली. मुलाखत रंगली अन तेव्ह्ढ्यात......
एक मोट्ठा आवाज ऐकु आला अन खोलीत असलेल्या सर्वांचाच थरकाप उडाला. एक मिनिट वाटले गोळीबार होतोय. मी गवळीकडेच पहात होतो. तो दचकला. त्याच्या चेहर्यावर तेव्हा जे भाव दिसले ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. तेव्हढ्यात जिन्यातुन कुणीतरी धावत येत असल्याचा आवाज आला अन क्षणार्धात त्या खोलीत पंधरा वीस तरुण जमले. सगळ्यांनी लूजर अन जीन्स घातलेल्या अन त्यांचे हात लूजरखाली, बेल्टजवळ होते. त्यांचे दिसणे, त्यांचे हावभाव अजुनही डोळ्यासमोर आहे पण त्याचे वर्णन करण्याला माझ्याकडे शब्द नाहीत.
क्षण दोन क्षण वातावरणात जबरदस्त तणाव. कुणीच बोलत नव्हते. आम्ही सोफ्यावरच्या डॅडींकडे पहात होतो. डॅडी दाराकडे अन दारातुन आत आलेले लोक आमच्याकडे. अन तेव्हड्यात पंख फडफडण्याचा आवाज आला. वर पाहिले तर आमव्या डोक्यावरुन उडत एक चिमणी खिडकीतुन बाहेर चालली होती. तिलाही बहुधा त्या तणावपुर्ण वातावरणात थांबावेसे वाटले नसावे.
अन त्यानंतर सर्वप्रथम भानावर आला तो आमचा फोटोग्राफर मित्र. त्याने नजर वळवुन खोलीभर फिरवली अन तो हसला. "काही नाही. बल्ब फुटला. चिमणीचा धक्का लागला बहुतेक," तो हसुन म्हणाला अन त्याने खिडकीच्या विरुद्ध बाजुला असलेल्या भिंतीच्या तळाशी फरशीकडे बोट दाखवले. सर्वाच्या नजरा क्षणार्धात तिकडे वळल्या तर तिथे काचेचे तुकडे पडलेले होते.
मग डॅडीची भानावर यायची वेळ होती. तोही हसला अन म्हणाला, "काही नाही. बल्ब फुटला. काळजीचं कारण नाही. आँ!" मग आमच्याही ओठांवर हसु फुटले. विचित्रच अवस्था होती ती - ओठांवर हसु अन अंगातुन घामाच्या धारा, अंगावर शहारे अन कापणारे हात-पाय. मग खोलीत आलेल्या इतर लोक पण सैलावलेले जाणवले. काहीनी तर स्मित पण केले.
मग डॅडीने ताठ बसत हुकुम सोडायला सुरुवात केली. "अरे इथे बघत काय बसलाय. आँ? बाहेर जा, चहाचे काय झाले ते बघा आँ! का साहेब तुम्ही जेवुनच जाणार. तयार आहे जेवण आँ?" अन मग वातावरण सैलावले. आम्ही जेवायला, चहाला नको म्हणालो तर चहा तरी घ्याच म्हणुन आग्रह झाला. शेवटी कसातरी चहा घेतला अन घराबाहेर पडलो.
घराबाहेर येवुनपण छातीत धडधडत होते, हातपाय लटपटत होते. फोटोग्राफरने ते काचांचे तु़कडे बघितले नसते अन काय झाले त्याचा अंदाज बांधला नसता तर काय झाले असते याचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. मग गाडीत बसण्याआधी शांत व्हावे म्हणुन आम्ही घरामागच्या दर्ग्यात गेलो तर तिथे पन्नास साठ तरुण आडोश्याला पडुन आराम करत गेलो, काही जण पत्ते खेळत होते. ते कोण होते ते त्यांच्याकडे पहाताच लक्षात येत होते. आम्ही आत गेलो तर पत्ते खेळणार्या तरुण एकदम सावध झाले अन आमच्याकडे टक लावुन पहायला लागले. शेवटी कसेतरी दर्ग्याचे दर्शन घेतले अन ठोकली धुम तिथुनपण. सरळ गाडी काढली ती ऑफिसमधे परतेपर्यंत कोठेच थांवबली नाही, अगदी लघुशंकेलासुद्धा!
वाचने
8705
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
मस्त वर्णन
In reply to मस्त वर्णन by ३_१४ विक्षिप्त अदिती
मांजर्-वाघ
आँ!!!
पुनेरीभाउ..
In reply to पुनेरीभाउ.. by निखिल देशपांडे
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पुनेरीभाउ..
हा ही
In reply to हा ही by परिकथेतील राजकुमार
आता मात्र
भ ह न्ना हा ट!!!
In reply to भ ह न्ना हा ट!!! by ऋषिकेश
असेच..
In reply to भ ह न्ना हा ट!!! by ऋषिकेश
अगदी सहमत!!!
In reply to भ ह न्ना हा ट!!! by ऋषिकेश
असेच म्हणतो
जबराट
In reply to जबराट by सुनील
हेच म्हणतो..
पुनेरीभाउ..
शंका
In reply to शंका by प्रकाश घाटपांडे
आमचे झाले नाही
जबरी
In reply to जबरी by अनामिक
हेच
विलक्षण
झबरदस्त
छान. असेच
डॅडीचा फोटो