विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण
लेखनप्रकार
विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण
विंदा करंदीकरांनी आधुनिक मराठी कवितेवर छाप पाडली आहे. विसाव्या शतकातले बदल समाजाला भरडत होते, तसे समाजाला नवी संधी सुद्धा देत होते. यातील काही विषण्ण, काही स्फूर्तीदायक, काही वैचारिक अशी काव्ये आपण वाचलेलीच आहेत. आता आपण त्यांच्या बालकवितांबद्दल थोडी चर्चा करूया.
या काळातल्या कवींनी मराठीतील प्रौढासाठीच्या कवितांनाही एक वेगळा आकारही दिला. मराठीची नैसर्गिक आघातांची जी लय आहे, प्राचीन वृत्तांऐवजी त्या लयीत विंदा करंदीकरांनी रचना केली. त्यांची मुक्तसुनीते ही पूर्वीच्या शार्दूलविक्रीडिताच्या बंधनातून मुक्त आहेत, तरी तालशुद्ध आहे. कित्येकदा विंदा करंदीकरांनी यमकाचेही बंधन मानले नाही. पारंपरिक वृत्त-यमकबद्ध कवितांच्या मानाने या रचना मुक्त असल्या तरी मराठी भाषेच्या नैसर्गिक ठेक्याला काटेकोरपणे धरून आहेत.
विंदा करंदीकरांच्या प्रौढ कवितांमधली प्रयोगशीलता, आणि मराठी भाषेच्या लयीशी इमान लक्षात ठेवले, तर त्यांच्या साध्या सोप्या बालकवितांमधली कारागिरी जाणवल्यावाचून राहात नाही. बालकवितेसाठी करंदीकरांनी आघातानुसारी छंद आणि यमके वापरायचा निर्णय घेतला आहे. यात खरे आश्चर्यकारक काही नाही. मराठीतील बालगीते (विंदांची नव्हे ती बालगीतेसुद्धा) आघातानुसारी आणि यमकबद्धच असतात -
चांदोबा चांदोबा भागलास का? \ निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
या ओळी पुढील प्रकारेच वाचता येतात :
चांदोबा चांदोबा भाग्लास का? \ निंबोणीच्या झाडामागे लप्लास का?
ठळक आघाताक्षरांवर ठेका धरला तर काटेकोर आहे. शिवाय "भाग-लास", "लप-लास" असा उच्चार कुठलेही मराठी मूल करणार नाही, "भाग्लास", "लप्लास" असाच उच्चार मूल करेल. खरे तर बालकांना फार आधीपासून कळणारी मराठी लय विंदा करंदीकरांनी प्रौढ कवितेतही मोठ्यांना शिकवली, असे म्हणायचा मोह होतो.
पूर्वापारपासून बालगीतात यमके महत्त्वाची :
अड्गुलं मड्गुलं \ सोन्याचं कड्गुलं
- यमके हवीत म्हणजे हवीतच
करंदीकरांनी मुलांच्या भावविश्वात प्रवेश केला तेव्हा नेहमीच्या आवडीच्या बालगीतांचेच रूप घेतले. ते बदलले नाही. प्रायोगिकता आणली ती वेगळ्याच प्रकारे. पु. ल. देशपांडे म्हणतात की गाण्यामध्ये गेयता असते, तर कवितेत काव्यगुण असतो. करंदीकरांच्या बालकवितेत काव्यगुण आढळतो खास, पण बाल-गेयता कधीच सांडत नाही.
बालकासाठी ललित वाङ्मय लिहिणारा प्रौढ एका विचित्र कैचीत सापडलेला असतो. एखादा मोठा माणूस पाच फूट उंचावरून बोलतो आहे, असे वाटता कामा नये. लहानपणी मी मनाचे श्लोक पाठ केले, तेव्हा मनोरंजनापेक्षा मला शिकवण अधिक मिळाली. मनाच्या श्लोकांतले लालित्य प्रौढ होईपर्यंत खरे तर जाणवलेच नाही. दुसर्या टोकाला जाऊन, अतिसुलभ भाषा वापरली तरी चालत नाही. "तुला लहान वयात काय समजणार" असा जर कवी-लेखकाने चुकून विचारही केला, तर मुलांना तो अपमान लगेच समजतो.
विंदा करंदीकरांची बालकविता "अजबखाना" संग्रहात मी दहा-एक वर्षांचा असताना वाचली. ती कविता मला अतिसुलभही वाटली नाही आणि प्रौढांनी सांगितलेले पाठांतरही वाटले नाही. ती कविता माझ्याशी बाळपणीसुद्धा संवाद साधत होती. आज प्रौढपणी ती वाचतो, तेव्हाही ती माझ्याशी बोलते.
येथे मी तीन कविता देणार आहे. वाचकाने लहान मूल होऊन त्या वाचाव्यात, आणि प्रौढ होऊन पुन्हा वाचाव्यात. (गंमत म्हणून तीन्ही निवडलेल्या कविता पर्यांबद्दल आहेत.)
पहिली कविता आहे "शाप". गमतीदार शब्दयोजना, विक्षिप्त कल्पनाविलास - निखळ मौज होते आहे. या ठिकाणी प्रौढ किंवा बालवयातले अर्थ माझ्यासाठी तरी बदललेले नाही. प्रौढ वाचनात कुशल कारागिरी जाणवते, इतकाच काय फरक.
शाप
पर्या होतात
शेवटी लठ्ठ,
असे म्हणाला
एक मठ्ठ.
पऱ्यांनी दिला
त्याला शाप :
पुढच्या जन्मी
झाला साप.
ही पुढची "फूलवेडी" कविता मात्र तशी नाही. आता प्रौढ वयात मी ती वेगळ्या तर्हेने वाचतो.
फूलवेडी
एक परी
फूलवेडी
फुलासारखी
नेसते साडी.
फुलामधून
येते जाते;
फुलासारखीच
छत्री घेते.
बिचारीला
नाही मूल;
पाळण्यामध्ये
ठेवते फूल.
यात लहानपणी वेडगळ किंवा फुलांच्या सौंदर्याबद्दल वेडी झालेली परीच दिसली होती. आता ते शेवटचे कडवे अतिशय करुण वाटते. कवितेचा अर्थच बदलतो. पुन्हा कविता वाचावी लागते. आणि अगदी साध्यासुध्या "बिचार्या" शब्दाने काळजात धस्स होते. करंदीकरांना कुठल्या भरभरलेल्या शब्दागाराचे पाठबळ लागत नाही. अगदी रोजवापरातल्या शब्दाला ते विलक्षण धार देऊन चालवत आहे. माझ्या कल्पनेत असा घरगुती प्रसंग उभा राहातो आहे. एखादे दु:खी निपुत्रिक जोडपे आपल्या ओळखीतल्या निरागस छोट्या मुलीकडून ही कविता ऐकत आहेत. त्यातून छोटीला जाणवणारी मजा, आणि त्याच वेळी मोठ्यांच्या काळजाला लागणारे चटके - कल्पनेतही काटा येतो.
पुढची "परी आणि घर" कविता मला आता वाचताना वैचारिक वाटते.
परी आणि घर
एका मुलाला
दिसली परी;
घातलीन् खिशांत,
आणलीन् घरी.
आणि मग
अगदी खुशींत
तिला घेतलीन्
आपल्या कुशींत.
पडले स्वप्न
भयंकर :
परी चालली
घेऊन घर.
खरेच - आपल्या आवडत्या व्यक्तीला कधी प्रेमाने कुशीत, कधी बेजबाबदारपणे खिशात घातले, तर ते नाते भयंकर आहे. पण असा बेजबाबदारपणा किती सरेआम आपण करतो. या तरुणाला ही सुंदरी कुठे बरे भेटली असेल? कसे असतील त्यांच्यातील संवाद? त्यांच्या नात्यामधील दु:स्वप्ने? या कवितेत मला एक मनोवैज्ञानिक कादंबरी दडलेली दिसत आहे.
अशी ही विंदा करंदीकरांची बालकविता. बालसुलभ आहे पण बाळबोध नाही. कधी खिदळून बहिर्मुख करते, तर कधी अलगद अंतर्मुख करते.
- - - -
संदर्भ :
संहिता - विंदा करंदीकरांची निवडक कविता (४थी आवृत्ती - १९९७). यातील मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली प्रस्तावना
अजबखाना - विंदा करंदीकर (सहावी आवृत्ती - २००६). यातील कविता आणि रामदास भटकळांनी लिहिलेली प्रस्तावना
- - -
टीप : वरील लेखात दिलेल्या कवितांचा कॉपीराइट हक्क पॉप्युलर प्रकाशनाकडे आहे. रसग्रहण किंवा भाष्य करताना काही अल्प प्रमाणात मूळ पाठ्याचे उद्धरण करणे हे कायदेशीर आहे. या रसग्रहणाची कुठल्याही रसिकाला मुळीच गरज नाही, याचे शल्य मला जाणवते. पण या तीन उद्धृत कविता वाचून, रसग्रहणातले माझे दारिद्र्य जाणवून, वाचकांनी ८४ कवितांचा "अजबखाना" वाचावा. मग वरील उद्धरण म्हणजे केवळ कॉपीराईटमधून कायदेशीर पळवाट होणार नाही. काव्याच्या एका अजब दालनाचा, मी उघडून दिलेला, दरवाजा होईल.
वाचने
33762
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
रसग्रहण
वा!!!
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
रसग्रहण
मलापण
मस्त
In reply to मस्त by बेसनलाडू
+१
In reply to +१ by टारझन
हेच म्हणते.
रसग्रहण आवडले
In reply to रसग्रहण आवडले by सहज
मग असे का बरे लिहले असावे???
विंदांच्या कवितांचे --
सुंदर
व्वा !
रसग्र्हण .
आवडले.
रसग्रहण
विंदांचे दोन काव्यसंग्रह
वा..
छान
सुंदर
रसग्रहण
आवडले
रसग्रहण
मस्त!
एकूण धागा
धन्याशेठ, सतत काहीतरी नवीन
In reply to धन्याशेठ, सतत काहीतरी नवीन by चतुरंग
चतुरंग
रसग्रहण
रसग्रहण आवडले
वा ! फार
छान झालंय
रसग्रहण
धन्याशेठ,
रसग्रहण आवडले