Skip to main content
लेखक मनोजकुमार यांनी गुरुवार, 22/10/2026 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणी आपण ज्यांना “रेड इंडियन” म्हणून वाचायचो, ते अमेरिकेचे मूळ रहिवासी. त्यांच्यातली एक जमात म्हणजे ओसेज. अमेरिकन सरकारनं त्यांना ओक्लाहोमा राज्यातली जमीन दिली, आणि १९०० च्या सुमारास त्या जमिनीखाली तेल सापडलं. तेलाच्या कमाईत प्रत्येक ओसेज माणसाचा हक्काचा वाटा होता. त्याला headright म्हणतात, आपल्याकडच्या वतनातल्या वाट्यासारखा. अमेरिकेतली न्यूजपेपर्स त्यांना जगातली सर्वात श्रीमंत जमात म्हणायला लागली. त्याच काळात ओक्लाहोमातल्या ओसेज काउंटीमध्ये, म्हणजे फेअरफॅक्स, ग्रेहॉर्स आणि पावहुस्का या गावांत, ओसेज लोकांच्या घरांमध्ये एकामागून एक मृत्यू होऊ लागले. ही कथा त्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. मॉली बर्कहार्ट आणि तिचं कुटुंब खरं होतं. त्यांचे विचार आणि घरातले संवाद मात्र माझे कल्पित आहेत.

* * *

माझ्या घरातली माणसं एकामागून एक गेली.

तेव्हा आम्हाला ते योगायोग वाटले.

आता तसं वाटत नाही.

मी मॉली. आमच्या घरात आम्ही चार बहिणी आणि आई. आई, लिझी. मी सगळ्यात मोठी. माझ्यानंतर मिनी, शांत, सत्तावीस वर्षांची असताना गेली. मग अॅना, पंचवीस. आणि सगळ्यात धाकटी रिटा.

१९१८ पासून पाच वर्षांत माझ्या तिन्ही बहिणी आणि आई गेल्या. मिनी आजारात गेली. अॅनाला कुणीतरी गोळी घातली. आई अंथरुणाला खिळली, आणि मग उठलीच नाही. रिटाचं घर एका रात्रीत उडालं. आणि प्रत्येक वेळी मी जवळच होते.

पण आधी तुम्हाला आमचं घर सांगते. म्हणजे आम्ही कोण होतो ते कळेल.

आईच्या पावलांचा आवाज मला अजून ऐकू येतो. पहाटे अंधार असायचा, थंडी हाडात शिरायची, आणि ती पावलं हळूच स्वयंपाकघराकडे जायची. मग स्टोव्ह पेटायचा, कॉफीचा वास यायचा, आणि आम्ही बहिणी रजईत आणखी घुसायचो.

आईची कॉफी रोज थोडी जळायची. भांडं म्हणजे ते जुनं, निळ्या कडेचं, ज्याचं झाकण आम्ही कधीच शोधलं नाही. ते स्टोव्हवर विसरून ती दुसऱ्या कामाला लागायची. कधी कोंबड्यांना दाणे टाकायला, कधी शेजारच्या बाईला काहीतरी सांगायला.

“आई, पुन्हा जळली,” अॅना म्हणायची.

“जळली तर जळली. गरम आहे ना? पी.”

बास. त्या घरात एवढंच बोलणं. तेच आता आठवत राहतं.

गोरे आम्हाला “इंडियन” म्हणतात. त्यांच्यातला कुणी भारताचा रस्ता शोधायला निघाला आणि चुकून इकडे येऊन थांबला, म्हणून आम्ही इंडियन. चूक त्याची, नाव आमच्या डोक्यावर. आम्ही स्वतःला म्हणतो वाझाझे. सिस्टर्सनी शाळेत सांगितलं, याचा इंग्रजीत अर्थ Middle Waters. आमच्या आजीला इंग्रजीचा एक शब्द येत नव्हता. पण आमच्या माणसांना सरकारनं कसं उठवलं, ते तिला पाठ होतं. आधी मिसुरीतून, मग कन्सासमधून, आणि शेवटी इकडे, ओक्लाहोमात, अमेरिकेच्या मधल्या टेकड्यांवर आणून सोडलं.

“इथं तरी राहू द्या रे बाबा,” ती म्हणायची. “ही जागा आम्ही विकत घेतलीय. पैसे देऊन.”

खरंच होतं. १८७२ मध्ये. तरी कागदावर तिला “रिझर्व्हेशन” म्हणतात, म्हणजे आमच्यासाठी आखलेली जागा. जणू आम्ही कुणाच्या घरी पाहुणे आहोत.

मग एक दिवस जमिनीखाली तेल निघालं.

मला नेमकं कधी ते आठवत नाही, मी लहान होते. पण लोकांचे चेहरे बदलले, ते आठवतं. दुकानदार कधी मान वर करून बघायचा नाही. आता मी दिसले की काउंटरमागून बाहेर यायचा आणि “या, या” म्हणायचा. कारवाला आधीच दार उघडून उभा राहायचा. मी ब्रेडसाठी पीठ आणायला निघालेली असायचे, पण तो असा वागायचा जणू राणी आलीय. नाक मुरडणारे गोरे लोक एकदम “मॅडम, मॅडम” करायला लागले. आम्हाला नाही. आमच्या नावावरच्या कागदाला.

तो कागद म्हणजे headright. जमिनीचा तुकडा सगळ्यांना मिळाला होता, पण खाली जे निघायचं ते आमच्या सगळ्यांचं. त्यातला हिस्सा प्रत्येकाच्या नावावर लिहिलेला. माझ्या नावावर होता. आईच्या, अॅनाच्या, मिनीच्या, रिटाच्या. एका घरात एवढे हिस्से. मग लोकांची नजर कुठं जाणार?

तेव्हा मला वाटायचं, ते कौतुकानं बघताहेत.

अॅना एकदा रागानं म्हणाली, “आपलेच पैसे. आणि मागायला जायचं त्या चष्मेवाल्याकडे. आपण काय लहान पोरं आहोत?”

तो चष्मेवाला म्हणजे आमचा गार्डियन. आमच्यापैकी पुष्कळांच्या पैशावर सरकारनं असा एक गोरा माणूस नेमला होता, लहान मुलाचे पैसे जसा कुणी काका सांभाळतो. मी गेले की तो चष्म्याच्या वरून बघायचा आणि म्हणायचा, “मिसेस बर्कहार्ट, थोडं थांबा.”

किती थांबायचं, ते कधी सांगितलं नाही. मी थांबले. बाकीचं पुढे येईल. आधी मिनी.

(डेविड ग्रॅन यांच्या "Killers of the Flower Moon" मधील ऐतिहासिक घटनांवर आधारित)

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 252
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अमेरिकन इतिहासाबद्दल मला  बरेच कुतूहल असल्याने पूर्वीच्या 'प्लांटेशन' जागा, गुलामागिरीबद्दल असलेली संग्रहालये, 'हडसन रीव्हर स्कूल' मधील चित्रकार - Thomas Cole, FD CHURCH, George Inness, NC Wyth यांची घरे, स्टूडियो, आणि जागा, FORD याने उभारलेले जुने खेडेगाव, 'राईट  बंधुंचे मूळ सायकलचे दुकान, घर  आणि पहिले विमान बनवले ती जागा,  Cherokee National History Museum, असे काहीबाही बघितलेले आहे.

तसेच जीएंची कादंबरी 'रान' आई अन्य काही अनुवादित कादंबऱ्या वगैरे वाचलेले असल्याने सदर कथेबद्दल खूप औत्सुक्य जागृत झालेले आहे. 

https://youtu.be/akT8eq2lRk0?si=fI1wliRdi4U6qyKf

हा  एक  माहितीपट तूनळीवर दिसला, आणि २०२३ चा एक सिनेमाही आहेसे कळले. 

आगामी लेखनासाठी शुभेच्छा.

 


कथेत जुने फोटो, चित्रे वगैरे द्यावीत, म्हणजे त्या काळचे लोक, वेषभूषा, वातावरण वगैरे डोळ्यासमोर उभे राहून कथेची खुमारी वाढेल.

Mollie Burkhart (second from right) lost all three of her sisters under suspicious circumstances. Rita Smith (left) died in an explosion, Anna Brown (second from left) was shot in the head and Minnie Smith (right) died of what doctors referred to as a “peculiar wasting illness.”

The Osage National Museum / Courtesy of Doubleday

In reply to by चित्रगुप्त

कल्पना छान आहे, जुन्या फोटोंमुळे तो काळ डोळ्यांसमोर येतो हे खरं. पण ही माणसं खरी होती आणि त्यांचे फोटो वापरायला कुणाची परवानगी घ्यावी, हेही मला माहीत नाही, म्हणून यावेळी घातले नाहीत. 

 


एक गोष्ट सांगायची आहे. माझी होणारी सून ओसेज आहे. तिच्यामुळे मला या लोकांबद्दल जाणून घ्यावंसं वाटलं, आणि वाचता वाचता ही कथा सुचली. खऱ्या घटना मी पुस्तकांतून आणि जुन्या नोंदींतून घेतल्या आहेत. त्या घरात काय घडलं असेल, ते मात्र मी माझ्या कल्पनेनं भरलं आहे.

तिनं अजून ही कथा वाचलेली नाही. ती वाचल्यावर तिला काय वाटतं, याची मला थोडी धाकधूक आहे. तिला काही चुकीचं किंवा खटकणारं वाटलं, तर ती माझी चूक असेल, तिची नाही. आणि तुम्हालाही काही खटकलं तर मोकळेपणाने सांगा. मला ते हवंच आहे.


असे जुने फोटो बहुतांशी copyright free असतात. खुशाल वापरा. 

तुमची होणारी सून ओसेज आहे ही गोष्ट विशेष, दुर्मिळ आहे. तिला मराठी वाचता येईल का? तुम्ही अमेरिकेत रहाता का ?

त्या काळचे वातावरण, निसर्ग, गावे, घरे वगैरे बद्दलच्या प्रतिमा AI द्वारे निर्मित करता येतील.