देव पावला!
एकतर महागड्या वस्तू वापरायची आपली लायकी नाही. दुसरं म्हणजे, लहानपणापासून कधी तशी सवय नाही. स्वस्तातल्या वस्तू घ्यायच्या, म्हणजे त्या संख्येनं जास्त घेता येतात, असेच बाळकडू. त्यामुळं आयुष्यात पहिल्यांदा, वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्याच पैशांनी सहाशे रुपयांची कॉटन पॅंट घेतली, तेव्हा केवढं अप्रूप वाटलं होतं मला स्वतःलाच! घड्याळं, पेनं, कुठलीच वरच्या श्रेणीतली गोष्ट घ्यायची सवय नव्हती. नाही म्हणायला, अलीकडे, विशेषतः लग्नानंतर बायकोच्या आग्रहाला, हट्टाला बळी पडून कधीमधी अशा खरेद्या करू लागलो होतो.
नवीन घड्याळ घ्यायचं बरेच दिवस मनात होतं. पण पुढे ढकलत होतो. आधीचं घड्याळ आजीनं घेऊन दिलेलं, साधारणपणे आठ-नऊ वर्षे जुनं असावं. चारशे-साडेचारशे रुपयांचं. आता "लय भारी' घड्याळ घ्यायचं ठरवलं. हे मात्र स्वतःच्याच हौसेपायी. (हो...दरवेळी बायकोच्या नावानं कशाला बिल फाडायचं?) "टायमेक्स'च्या शो-रूम मध्ये गेलो, तर ती रेंज काही आपल्याला बापजन्मात परवडण्याजोगी नव्हती. मग शेजारीच "टायटन'च्या दुकानात भीत-भीत शिरलो. हजार-बाराशेपर्यंतच्या खरेदीची मानसिक (आणि आर्थिकही) तयारी केली होती. (असल्या भल्यामोठ्या, आलिशान शोरूम किंवा मॉलमध्ये वगैरे (अर्थातच, नुसतं विंडो-शॉपिंग करायला!) गेलं, की मला उगाचच आपल्यावर कुणी वॉच-बिच ठेवून आहे की काय, अशी शंका येते. आपण जणू कुणी चोर-दरोडेखोर असल्यासारखेच ते सेल्समन-वूमन-गर्ल्स आपल्याकडे बघत असतात. मला तर "पुष्पक'मधल्या कमल हासनच्या त्या प्रसंगाचीच आठवण येते. असो.) "सोनाटा'ची घड्याळं काही आकर्षक नव्हती. मग मनाचा हिय्या करून "टायटन'च्या रेंजकडे नजर वळवली. 1400 रुपयांचं एक घड्याळ आवडलं. घ्यायला बायकोनंही भरीला घातलं. म्हटलं हाय काय नि नाय काय! घेऊन टाकलं!
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचा उद्देश हा, की गेले काही दिवस या घड्याळाचा पट्टा सैल झाला होता. आणि एकदा शंका आली होती, तोच अनर्थ रविवारी रात्री घडला. सोमवारी सकाळी घराबाहेर पडताना शोधू लागलो, तर घड्याळ जागेवर नव्हतं. जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जिथे असू शकतं, तिथेही नव्हतं. मग मी रात्री साडेदहाला औषधं आणायला बाहेर पडलो होतो, ते आठवलं. रात्री कुठे वाटेत पडलं असेल, तरी सकाळनंतर ते मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. बरं, मी संध्याकाळी एकदा आणि रात्री एकदा असं दोनदा बाहेर पडलो होतो. नेमकं कोणत्या वेळी घड्याळ हातात होतं आणि कोणत्या वेळी नव्हतं, काहीच आठवेना.
एकतर मी माझं दोन रुपयांचं पेनसुद्धा हरवलं, तरी अस्वस्थ होतो. अर्थात, त्यापायी मला अन्नपाणी गोड न लागणं बापजन्मात शक्य नाही! परीक्षेत एका ओळीचाही अभ्यास झालेला नसताना, बारावी-एसवायला नापास झालो तेव्हा, घरातून "पळून' गेल्यावर, शेअर मार्केटमध्ये शेण खाल्ल्यावर...सगळ्या प्रसंगांत मला अन्न-पाणी व्यवस्थित गोडबिड लागत होतं. पण माझी झोप मात्र उडते काही हरवल्यानंतर. हल्ली जरा कोडगेपणा वाढला आहे, तरी अस्वस्थता आलीच. वाटेनं उलटं जाऊन शोधण्यातही काही अर्थ नव्हता. शक्यता दोनच होत्या- सोसायटीत पडलं असल्यास वॉचमनला मिळालं असलं तर आणि दुसरी, पण अगदीच धूसर शक्यता म्हणजे त्या मेडिकल दुकानातच ते पडलं असलं आणि दुकानदारालाच मिळालं असलं, तर! वॉचमनला अपेक्षेप्रमाणे पत्ताच नव्हता. मग मेडिकलकडे मोर्चा वळविला. शेवटची आशा म्हणून! अपेक्षा नव्हतीच, त्यामुळे जाताना वाटेत स्वतःवर विनोदही केले. लहानपणी (माझ्या!) आजी गजानन महाराजांची पोथी वाचायची आणि मलाही वाचायला लावायची. त्यासोबत, गजानन महाराज कुण्या भक्ताची बॅगबिग वेगळ्या रूपात जाऊन परत करतात वगैरे (भाकड)कथाही सांगायची. पण मी नास्तिक असल्यामुळं, गजानन महाराजांचा कुणी अवतार माझं घड्याळ घेऊन "याचा मालक कोण आहे,'वगैरे शोधत बसला असेल, अशी सुतराम शक्यता नव्हती!
दुकानात पोचलो आणि चौकशी केल्यावर काय आश्चर्य! त्या सद्गुणाच्या पुतळ्यानं दोन मिनिटांत टेबलावरच ठेवलेलं माझं घड्याळ मला परत केलं. त्यात माझ्या भावना बिवना नव्हे, तर माझे पैसे गुंतलेले होते. त्यामुळे जिव्हाळा जास्त होता. मला तर त्या दुकानमालकाच्या जागी भगवान विष्णूच विश्वरूपदर्शन देताहेत आणि मी नतमस्तक झालो आहे, असं चित्र दिसू लागलं होतं! `चौदाशे रुपयांच्या घड्याळासाठी एक हजार रुपये काढा!' या त्याच्या प्रेमळ टिप्पणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून, केवळ औपचारिक धन्यवादाचा पुणेरी+कोकणी बाणा दाखवून मी काढता पाय घेतला. पण या मेल्याकडे आता पुढची दोन-तीन आजारपणं (`बाळंतपणं'च्याच चालीवर!) काढण्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागणार.
असो. `आठवं आश्चर्य' एवढाच एसएमएस ऑफिसमध्ये पोचल्यावर बायकोला केला. आणि तिला तो चक्क कळला!
वाचने
4006
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
परीक्षेत एका ओळीचाही अभ्यास झालेला नसताना, बारावी-एसवायला नापास झालो तेव्हा, घरातून "पळून' गेल्यावर, शेअर मार्केटमध्ये शेण खाल्ल्यावर...सगळ्या प्रसंगांत मला अन्न-पाणी व्यवस्थित गोडबिड लागत होतं.
हाहाहा.... हे मस्तच. खरंच इतके उद्योग केलेस का रे?? सहजच एक उत्सुकता म्हणून विचारते.
पण या मेल्याकडे आता पुढची दोन-तीन आजारपणं (`बाळंतपणं'च्याच चालीवर!) काढण्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागणार.
आजारपणं कशाला?? बाळंतपणंही चालतील की अरे! (ह. घे..) :)
छोटीशी घटना पण मस्त फुलवली आहेस.
आवांतर : विप्र काकांच्या मौजा ही मौजा चा परिणाम का? म्हणजे कशाल उगाच विचारचे असा विचार न करता.. तडक मेडीकल स्टोअर मध्ये गेलास. फार फार तर काय नाही म्हणतील.. हा विचार केल्यामुळे घड्याळ मिळालं आणि १४०० रू. च अन्नपाणी फारच गोड लागायला लागलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
विप्र काकांचा लेख वाचुन गेला होता का हो त्या दुकानात विचारायला?
बाकी लेख छानच!
अनामिक.
अत्ताच वाचला!
छान आहे तोही!!
छान लिहीलये...
आवडले ....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
घड्याळाचा (किंवा ते हरवण्याचा) काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असं म्हणावं लागेल ;). सहज लिहिलेला हा लेख आवडला.
In reply to काळ, वेळ by नंदन
एक्झॅक्टली हेच वाटलं...
बिपिन कार्यकर्ते
घड्याळाचा (किंवा ते हरवण्याचा) काळ आला होता, पण वेळ आली नव्हती
झकास!
पण या मेल्याकडे आता पुढची दोन-तीन आजारपणं (`बाळंतपणं'च्याच चालीवर!) काढण्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागणार.
मेल्या कशाला म्हणालात. एकतर त्याने तुमचे घड्याळ परत केले आणि वर तुम्ही त्याला मेल्या म्हणालात? पटलं नाही.
खादाडमाऊ
In reply to असे का? by योगी९००
अतिलाडक्या आजीलाही मी `तू गेल्यावर तुला ओढत नेणार आहे' असं (गमतीने) म्हणायचो. अजून काही??
In reply to माझ्या by आपला अभिजित
अतिलाडक्या आजीलाही मी `तू गेल्यावर तुला ओढत नेणार आहे' असं (गमतीने) म्हणायचो. अजून काही??
ते आजीला तिच्यासमोर म्हणायचा ना...म्हणूनच गंमत..तिच्या पाठीमागे दुसर्या कोणाला असे तिच्या बद्दल बोलून बघा ना...
खादाडमाऊ
In reply to माझ्या by आपला अभिजित
बाप तशी बेटी हे आता तुम्ही सिद्ध केलेलं आहेतच. लेकीला लवकरच आणा मिपावर. :-)
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
आपले घड्याळ अखंड चालू राहो....!
घड्याळाच्या तीनही काट्यांना आणि पट्ट्याला शुभेच्छा. :)
-झेल्या
काय वाट्टेल ते...!
विसंगतींचे संदर्भ...!
घड्याळ घावला ह्या एक बरा झाला. पण पट्टो सैल झालो तरी बिनधास रवलास, कसला रे हलगर्जीपणा.
:)
-दिपक
In reply to ले़ख मस्त by दिपक
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना!
घड्याळाची 'टिकटिक' आवडली. छान लिहिले आहे राजे !
वडलांचे जुने घड्याळ हौसेने वापरणारा
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
घड्याळाचा खरेदीविषयक अनुभव अगदी सारखाच आहे माझादेखील. पट्टा सैल होणे ही तर सार्वत्रिक डोकेदुखी. एकाच अनुभवातून शिकलो शहाणपणा आणि घड्याळ वापरणंच बंद केलं.
छान लिहिले आहेस.
म्हणुनच मी हरवणा-या वस्तु बरोबर बाळगत नाही.
In reply to वस्तु by विनायक प्रभू
असे कसे शक्य आहे. सर्वात लगेच हरवणारी वस्तु म्हणजे 'दिल' ;)
शाळा/कॉलेजात असतांन्ना आमचा सतत हरवायचा आणि कोणी उचलुन न नेल्यामुळे लगेच सापडायचे पण :( असो.
मस्त झाला आहे लेख. बाकी वस्तु हरवल्या तर ती मला नवीन वस्तु घ्यायची संधी वाटते!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
In reply to वस्तु by विनायक प्रभू
म्हणुनच मी हरवणा-या वस्तु बरोबर बाळगत नाही.
सजीव की निर्जीव??
खुलासा कराल?? ;)
भारी लिहिलय :)
मस्त आहे अनुभव. मजा आली. घड्याळ मिळाले ते बरे झाले.
एकदा रात्री घरी येताना, पेट्रोल कमी झाल्याने गाडी (हो मी पुण्याचाच. टुव्हिलर म्हणजे गाडी !) तिरपी करण्यासाठी थांबलो. (ही वेळ अनेकदा यायची :) ) थोडे पुढे गेल्यावर मोबाईल खिशात नाही ते समजले. जोरात हादरलो होतो. पण मागे जाऊन पाहिले तर तो तिथेच पडलेला होता. भर रस्त्याच्या कडेला पडलेला मोबाईल कुणालाच दिसला नाही हे माझे नशीब :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
बाकी, माझं पाकीट कधी हरवलेलं, चोरीला गेलेलं नाही.
एकतर मी त्याबाबत प्रचंड सावध असतो. पुण्याहून मुंबईत जाताना तर पाकीट चक्क पुढच्या खिशात ठेवतो आणि गर्दी टाळतो.
असो.
परीक्षेत