Skip to main content

आठवण

लेखक चक्कर_बंडा यांनी रविवार, 28/06/2026 20:35 या दिवशी प्रकाशित केले.

 

"आठवणींनाही ऋतू असतात, काही उन्हाळ्यासारख्या कोरड्या, काही 'शीतल' गोड-गुलाबी तर काही पावसासारख्या अनाहूत". 


त्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी अचानक मुसळधार पाऊस आला आणि आठवणींमध्ये चिंब भिजवून गेला. का कुणास ठाऊक, त्या दिवशी मी आधीपासूनच अस्वस्थ होतो. अवकाळी ढगांनी ती अस्वस्थता आणखीचं गडद केली. इतक्या वर्षांत असा एकही दिवस नव्हता की तिची आठवण आली नाही पण मागच्या काही वर्षांत त्या आठवणींबरोबर एक अनामिक अपराधीपणाची काटेरी बोचही सोबत करीत होती.

 

शेवटी न राहवून मोबाईल हातात घेतला. काही वर्षापूर्वी पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट अजूनही 'Pending' होती. नाही म्हटलं तरी ते अपेक्षितच होतं. इतक्या वर्षांनंतर तिला माझं नाव लक्षात असण्याची शक्यता नव्हती, वा प्रोफाइलवरच्या फोटोवरून मला ओळखावं अशी शक्यताही नव्हती. खरं तर सोशल मिडीयाच्या आभासी जगात तिचा शोध लागणं हाचं एक विलक्षण योगायोग होता. 


ऑफिसमध्ये, सहजचं जुन्या तारखांची ऑनलाइन वर्तमानपत्रं चाळताना, नवरात्रातील वेगवेगळ्या दिवशी, विविध रंगांच्या पेहरावातल्या स्त्रियांच्या समुह छायाचित्रं स्पर्धेमधील छायाचित्रे समोर आली. त्यातील एका छायाचित्रावर माझी नजर नकळत थबकली.


इतक्या वर्षांनंतरही तिला ओळखायला मला त्या फोटोतील एक बेसावध कटाक्ष पुरेसा ठरला. 'Submitted By' नाव पाहिलं आणि इतकी वर्षं तिचा शोध घेताना आड येणारा मोठा अडसर एका क्षणात दूर झाला. कसलाही पुढचा विचार न करता मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर जवळजवळ रोज तिच्या प्रोफाइलवर जाऊन येणं हा नित्यक्रम झाला. रिक्वेस्ट स्वीकारली जाईल की नाही यापेक्षा, आभासी जगात का होईना, ती सापडली, इतकंच त्यावेळी मला पुरेसं वाटत होतं.


काही वर्षे गेली, एक दिवस प्रोफाइलवर काहीतरी वेगळंचं जाणवलं, म्हणजे रिक्वेस्ट पेंडिंग असुनही पुर्वी न दिसणाऱ्या अनेक पोस्ट्स आता दिसत होत्या. मी त्या शांतपणे पाहत खाली स्क्रोल करत गेलो आणि...एका फोटोवर नजर पडली....क्षणभर माझ्या हातातला मोबाईल जड झाला. बोटांतलं त्राण निघून गेल्यासारखं वाटलं. हृदयाचे ठोके अचानक वाढले.


समोरचं चित्र धूसर झालं.

"नाही..."

मनाने पहिला नकार दिला.

"खरंच ?..."

डोळे हटत नव्हते.

पुन्हा—

"नाही..."


पण सत्य बदलत नव्हतं. 

एका हार चढवलेल्या फोटोमधून...

हो...ती..... तीच होती...

त्या फोटोत तीच होती.....


फोटोखाली तारीख होती, स्पष्ट समजत नव्हती. पण आकडे मात्र बहुदा 


८ डिसेंबर २०१६.....


असे होते....


मी बराच वेळ नुसता बसून राहिलो.

लाल साडी...तिला छोटासा सोनेरी काठपदर...


तोच शांत, प्रसन्न चेहरा...

फरक एवढाच— यावेळी त्या चेहऱ्याभोवती हार होता.

आणि मला मनात पहिल्यांदाच उमगलं...गेल्या काही वर्षांपासून मनाला टोचणाऱ्या त्या अनामिक अपराधीपणाचं कारण कदाचित हेच असावं. 


माझ्यासमोर माझा गेल्या दोन तपांमागचा जीवनपट उलगडू लागला...


दहावीत फारसे गुण मिळाले नव्हते. त्यामुळे फार नाव नसलेल्या एका छोट्याशा कॉलेजमध्ये प्रवेश घेणं भाग पडलं. वर्गातील ओळखपरेड दरम्यान माझ्यासह बहुतेकांचं लक्ष वेधून घेतलं ते तिच्या दहावीतील गुणांनी. त्या वयात हुशार मुलामुलींबद्दल वाटतो तसा असूयामिश्रित आदर तिच्याबद्दलही आपोआप निर्माण झाला. नंतर उडत-उडत तिच्या घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कळलं. त्या परिस्थितीत तिनं मिळवलेलं यश, तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढवून गेलं.


ती फार बोलकी नसावी बहुतेक.....नेहमी नाकासमोर पाहत चालणारी.... उगीच कोणाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न नाही, की कोणता दिखाऊपणा नाही.....


—बदामी रंगाचा सलवार-कुर्ता....

—विटकरी ओढणी... 

—एका घट्ट वेणीत बांधलेले केस...

—उंच, सडपातळ बांधा....

—शांत चेहरा....

—मिचमिचे डोळे....

—किंचित बसकंसं नाक आणि गोरा वर्ण...


"रूढार्थाने ती सुंदर होती का, हे आजही मला सांगता येणार नाही. पण तिच्याकडे पाहिलं की मनात एक शांतता उतरायची. काही माणसं रूपामुळे नाही तर; त्यांच्यामुळे मनात निर्माण होणाऱ्या भावनेमुळे लक्षात राहतात"


तिला पाहिलं की, का कुणास ठाऊक, एखाद्या फार जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटल्यासारखा एक गूढ आपलेपणा जाणवायचा. त्या भावनेचं कारण तेव्हाही समजलं नव्हतं. आजही उमगलेलं नाही. काळ पुढे सरकत होता आणि नकळत माझ्या मनात काहीतरी बदलत होतं. काय ते आजही निश्चित सांगता येणार नाही.


पण एक गोष्ट मात्र निर्विवाद होती.


—ती वर्गात असली की सबंध वर्ग मोरपंखी वाटायचा.

—ती नसली की तोच वर्ग अंगावर यायचा.

—दोन दिवस दिसली नाही की मन बेचैन व्हायचं.

—दूरवरून तिची एक झलक दिसली तरी हृदयाची धडधड वाढायची.

हळूहळू तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट महत्त्वाची वाटू लागली.


—तिचं बाक.

—तिच्या मैत्रिणी.

—तिची बॅग

—केसात माळलेल्या फुलाचा रंग.


आणि सर्वांत जास्त—


तिला आयुष्यात कधीच कोणताही त्रास होऊ नये, ही विचित्र पण निस्सीम इच्छा....त्या इच्छेत माझा काही स्वार्थ नव्हता. तिने माझ्याकडे पाहावं, बोलावं, अशा अपेक्षाही नव्हत्या. फक्त...ती सुखात असावी..... इतकंच !!!


आज मागे वळून पाहताना वाटतं—


कदाचित त्याच क्षणांपासून माझ्या आयुष्यात एक एकतर्फी नातं जन्माला आलं होतं.


—ज्याला नाव नव्हतं...

—त्याची काही व्याख्या नव्हती...

—आणि भविष्य तर अजिबातच नव्हतं.


मनाचे खेळ विलक्षण असतात. आपल्याला जे मनापासून हवं असतं, त्याचे संकेत ते वास्तवातही शोधू लागतं.


—एखादी क्षणभराची नजरानजर...

—एखादं सहज हसू....

—एखादी अनपेक्षित हालचाल....


मन त्यांना आपल्याला हवे तसे अर्थ देत राहतं. माझ्याही बाबतीत तेच घडत होतं. तिने चुकुन माझ्या दिशेला ओझरतं जरी पाहिलं की त्या एका कृतीत मी कितीतरी नसलेले अर्थ शोधायचो. तिच्या सहज हालचालीत काही इशारे दडलेत असं वाटायचं...ती हसताना दिसली तर त्या हास्यामागचं कारण मीचं...असं वाटायचं. आज विचार केला तर त्या वयातल्या संप्रेरकांचा, कल्पनाशक्तीचा आणि मनाच्या निरागसतेचा त्यात मोठा वाटा असावा. पण एक गोष्ट मात्र आजही तितकीच खरी— त्या भावनांमध्ये शारीरिक आकर्षणाचा वाटा अत्यल्प होता.


मग ते नक्की होतं तरी काय?


—प्रेम ???

       असेल वा बहुधा नसेलही.


कारण आमच्यात कधी एका शब्दाचाही संवाद तोपर्यंत झाला नव्हता व तो पुढेही कधीचं झाला नाही... 


—आकर्षण?

        शक्य आहे पण तेही पुर्ण खरं नसावं.


मला तिच्याकडून काहीही मिळवायचं नव्हतं. तिने मला स्वीकारावं, माझ्यावर प्रेम करावं, आयुष्य एकत्र घालवावं...असंही स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं. त्यावेळी अशा गोष्टींत पडायचं हे वय वा ही वेळही नाही हे न समाजण्याएवढं वास्तवाचं माझं भानही सुटलेलं नव्हतं. 


मला कुठेतरी हे ही जाणवत होतं की—


हे सगळं एकतर्फी आहे. तिला मी आसपास आहे हे कदाचित माहीत ही नाही, तिच्यादृष्टीने बहुदा मी त्या वर्गातच काय पण तिच्या आयुष्याच्या परिघात, तिच्या आपल्या माणसात, किंबहुना अगदी तिच्या वैयक्तिक जाणिवांतही दुरदूरपर्यंत कुठेचं नाही... 


तरीही...


तिने आयुष्यभर फक्त आणि फक्त सुखातचं असावं, ही इच्छा मात्र मनात टिकून होती. त्या इच्छेच्या सावलीत एक लहानसं, अव्यक्त स्वप्नही होतं. कधी चमत्कार घडला...आणि तिलाही मी आवडलो तर ? तिच्या जाणिवांतल्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात माझ्यासाठी गुंजभर का होईना पण जागा असली तर ? तिच्या जवळच्या माणसांत एक नाव माझंही असलं तर ? 


बस्स !!!  एवढंच....


पण केवळ त्या शक्यतेवर काही माझं आयुष्य उभं नव्हतं,  मन कधीकधी काही काळासाठी वास्तवाकडे दुर्लक्ष करून शक्यतांवर जगु पाहतं इतकंच.... .


ती मला ओळखतही नसेल. माझं नाव कधी तिच्या कानांनी ऐकलंही नसेल. तिच्या आयुष्याच्या एका कडेला काही काळ उभा असलेला मी, तिच्या दृष्टीने कदाचित पूर्णपणे अनोळखी असेल, किंवा सर्वच यापेक्षा उलट असेल,  मनाच्या अवकाशात, सतत या वास्तव आणि शक्यतांच्या दरम्यान हेलकावणाऱ्या लंबकाच्या कक्षेत उभा राहुनही तिच्या आयुष्याप्रती मनापासून फक्त शुभेच्छा आणि शुभेच्छाचं बाळगणारा मी होतो.


जग अशा माणसाला मुर्ख म्हणेल.....कदाचित म्हणायलाही हवं. पण त्या वयात मी तसाच होतो. स्वतःच्या भावनांचाच अर्थ न समजलेला. एका नाव नसलेल्या एकतर्फी नात्याचा कदाचित एकमेव साक्षीदार.


कॉलेज संपलं..... 


जशी ती अचानक आयुष्यात आली होती, तशीच अचानक निघूनही गेली. त्यानंतरच्या आयुष्यात पुढचं शिक्षण आलं. नोकरी आली. संघर्ष आले. यश-अपयश आलं.


पण ती...


ती फक्त एक आठवण म्हणुन उरली. मनाच्या एका कोपऱ्यात कायम तेवत राहीली, ते ही अगदी तिच्या अंगभूत शांत समंजसपणे.....मी तिला तेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण तिला शोधताना माझ गुपित जगासमोर येईल, ही भीती होती. बहुतांशवेळा अशा निरागस, निरुपद्रवी एकतर्फी भावनांच्या नशिबी चेष्टेचा विषय होण्याचं प्राक्तन लिहिलेलं असतं, काही भावना जपण्यासाठी त्यांना गुप्त ठेवावं लागतं आणि मी तेच केलं.

 

—दिवस सरत गेले.

—महिने उलटले.

—वर्षंही निघून गेली.

 

पण मनाच्या एका शांत कोपऱ्यात मी तिला तसंच जपून ठेवलं. माझ्या आयुष्यात त्या काळात कितीतरी गोष्टी घडल्या.

 

—यश, अपयश पाहिली.

—नोकरी, संघर्ष, प्रेमही आलं.

—लग्न झालं.

—मुलगा झाला.

—परदेशवाऱ्या झाल्या.

—पदोन्नत्या मिळाल्या.


जीवन पुढे चालत राहिलं. पण या सगळ्या प्रवासात, माझ्या मनात एक विचित्र समजूत कायम होती—


या सगळ्याची ती एक निःशब्द साक्षीदार आहे. खरं तर तिला यापैकी काहीच माहीत नव्हतं. माझ्या आयुष्याशी तिचा काहीही संबंध नव्हता. तरीही, माझ्या मनाच्या आभासी जगात माझ्या प्रत्येक आनंदाची, प्रत्येक पराभवाची, प्रत्येक बऱ्या-वाईट वळणाची ती साक्षीदार होती. ही कल्पना किती अवास्तव आहे, याची मला पूर्ण जाणीव होती. तरीही त्या आभासाला मी मुरड घालू शकलो नाही. कदाचित काही भ्रम हे खोटे असूनही माणसाला जगायला मदत करत असतात.


माझा ना तिच्यावर कधी हक्क होता ना तिच्या आयुष्यावर, पण तिच्या अस्तित्वावर माझा एक अदृश्य विश्वास होता. ती जगात कुठेतरी आहे...तिच्या माणसांमध्ये सुखात आहे... आणि तशीच राहील...ही भावना माझ्या आयुष्याचा एक आधार बनून गेली होती.


म्हणूनच...


त्या दिवशी हार चढवलेला तिचा फोटो पाहिला, तेव्हा मला तिच्या जाण्याचा धक्का कमी बसला...आणि माझ्या त्या विश्वासाच्या झालेल्या मृत्यूचा जास्त.....


त्या एका क्षणात मला जाणवलं—


मी ज्या व्यक्तीला इतकी वर्षं मनात जिवंत ठेवून जगत होतो, ती तर काही वर्षांपूर्वीच या जगातून निघून गेलेली आहे.


—मी मागे पडलो होतो.

—वास्तव पुढे निघून गेलं होतं.

त्यानंतर मात्र काही प्रश्न मला आजपर्यंत प्रकर्षाने त्रास देत राहीले आहेत... 


—ती मला ओळखत होती का?

—जर ओळखत असेल...तर नावाने की चेहऱ्याने ?? 

— तिच्या आयुष्यात माझं कधीतरी काही स्थान होतं का?


खरं सांगायचं तर या प्रश्नांची उत्तरं मिळणं माझ्यासाठी कधीच महत्त्वाचं नव्हतं, माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते तिचं कुठेतरी, कोणत्यातरी शहरात, आनंदी घरात, तिच्या जिवाभावाच्या, प्रेमाच्या माणसांबरोबर सुखाने जगत असणं....या एका धाग्यावर मी माझ्या कल्पनांचं संपूर्ण विश्व विणलं होतं....आणि त्या धाग्याचं अस्तित्वच एका क्षणात तुटून गेलं.


लोक म्हणतात— "अज्ञानात सुख असतं"


मी त्या वाक्यावर कधी विश्वास ठेवला नव्हता. त्या दिवशी ठेवला. जर मी तिला शोधलंच नसतं तर कदाचित माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ती माझ्यासाठी जिवंत राहिली असती. आज मागे वळून पाहताना, तिचं मला सोशल मीडियावर सापडणं हा एक विलक्षण योगायोग वाटतो.

अन्यथा...


"सहसा कधी न वाचली जाणारी जुनी ऑनलाईन वर्तमानपत्रं त्या दिवशी मी का चाळावी" ?


"त्या छायाचित्र स्पर्धेतील शेकडो अनोळखी चेहऱ्यांमध्ये माझी नजर नेमकी तिच्यावरच का जाऊन थांबावी"?


"तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतकी वर्षं बंद असलेला रस्ता त्या एका क्षणातच का खुला व्हावा" ?


आणि मग...


रिक्वेस्ट पाठवल्यानंतरची अस्वस्थता. जवळजवळ रोज तिच्या प्रोफाइलवर जाऊन येणं. मनातल्या मनात केलेल्या हजारो विनवण्या....शेवटी तर स्वतःबद्दलच अशी समजूत झाली होती की—बहुधा, तिच्यासाठी मी आभासी जगातील एक यकश्चित रिक्वेस्ट स्विकारण्याच्या लायकीचाही नाही. कितीही नाकारलं तरी या गोष्टीचं वैफल्य येत होतंच....

 

आज वाटतं...

 

हे सगळं माझ्यासाठी नव्हतंच. नियती मला एका सत्यापर्यंत घेऊन जात होती. संयम संपण्याआधी....राग येण्याआधी.....तिच्याबद्दल मनात नकळत एखादा कटू विचार येण्याआधी त्या सत्यापर्यंत मी न पोहोचणं जणू नियतीलाचं मान्य नव्हतं.

एवढं असून आजही कुणी विचारलं—


"ती तुझी कोण होती?"

 

तर माझ्याकडे उत्तर नाही.


—मैत्रीण नव्हती....

—प्रेयसी नव्हती...

—नात्यातली नव्हती....

—ओळखीची तरी होती का ?? 


मग कोण ?

माझ्या आयुष्याच्या एका लपवून ठेवलेल्या, शांत, गुप्त कोपऱ्यातील एक महत्त्वाची व्यक्ती....जिला याची साधी कल्पनाही नव्हती व शेवटपर्यंत देता ही आली नाही. काही नाती वास्तवात आकाराला न येता फक्त मनात जन्म घेतात. तिथेच वाढतात, आणि आयुष्यभर आभासात जगतात.


—त्यांना नाव नसतं.

—हक्क नसतो.

—अपेक्षा नसतात.

—फक्त अस्तित्व असतं.

तिच्या जाण्याने माझ्या त्या आभासी जगाला मोठा तडा नक्कीचं गेला. पण ते जग कोसळलं नाही.

काच फुटली...पण तुकड्यांमध्येही तिचंच प्रतिबिंब दिसत राहिलं. आता ते प्रतिबिंब पुर्वीसारखं स्वच्छ नाही. पण ते आहे.... आणि जे आहे ते पुरेसं आहे.


—बदामी सलवार.

—विटकरी ओढणी.

—घट्ट वेणी.

—नाकासमोर चालणारी ती......


आणि तिच्याही नकळत, तिच्यासाठी देवाकडे मनापासून सुख मागणारा एक मुलगा....

 

काळाने आम्हा दोघांना खूप दूर नेलं. जीवनाने दोन पूर्णपणे वेगवेगळे रस्ते दिले. पण माझ्या स्मृतीच्या त्या एका वळणावर, ती आजही तिथेच उभी आहे.....

—शांत.

—प्रसन्न.

—हसरी.


...आणि मी जिवंत असेपर्यंत, ती तशीच राहणार आहे....


 ©चक्कर_बंडा

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 414
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

प्रत्येकाच्या मनात.  प्रकाशा पासून दूर.  अंधारमय दालनात.  अचानक कधी तरी तो कोपरा प्रकाश झोतात  येतो आणी ... सौमित्र च्या गाण्यातले ते जीवघेणे शब्द आठवतात.

 

माझीया मना जरा थांब ना

पाऊली तुझ्या माझिया खुणा

तुझे धावणे अन मला वेदना.....

 

तुमची ही तरल आठवण वाचून माझी सुद्धा फार पूर्वीची एक आठवण जागी झाली. मला खालील  शब्द स्फुरले...

 

माझीया मना जरा थांब ना

पाऊली तुझ्या माझिया खुणा

तुझे धावणे अन मला गुदगूल्या....

 

 


ललित लेखन आवडले, एखादी व्यक्ती आपली क्रश(मराठी प्रतिशब्द शोधावा लागेल) नसतानादेखील तिला इतकं आयुष्यभर जपलं जाऊ शकतं का असं मनात येऊन गेलं.