Skip to main content

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १६: तोंडी- मल्लिपट्टिणम ७४ किमी

लेखक मार्गी यांनी रविवार, 31/05/2026 21:16 या दिवशी प्रकाशित केले.

✪ समुद्र, नौका आणि मंदिरांच्या प्रदेशातील राईड 

✪ सेतूभावछत्रमच्या ऐवजी मल्लिपट्टिणममध्ये मुक्काम 

✪ दूरच्या देशबांधवांसोबत जवळची भेट 

✪ अभिमन्युजींचे नावेवरचे थरारक अनुभव 

✪ रात्रीचा मल्लिपट्टिणम बंदराचा परिसर 

✪ लाटा, समुद्राची गाज, दूरवरच्या बोटींचे दिवे आणि आकाशातले व्याध- अगस्त्य 

नमस्कार. २७ जानेवारीची सकाळ! तोंडीवरून निघालो. पुढचे काही टप्पे छोटेच आहेत. आज फक्त ७४ किलोमीटर असतील. एकदा असंही वाटून गेलं की, दोन छोटे टप्पे थोडे मोठे करावेत, पुढचा टप्पाही थोडा मोठा करावा, म्हणजे एक दिवस वाचेल. पण तसं केलं नाही, कारण छोटे टप्पे हे खूप सोपे आहेत. जवळ जवळ रिकव्हरी राईडससारखे आहेत. ते मोठे केले तर एक दिवस तर वाचेल, पण मध्ये जास्त जोर लावावा लागेल. आणि मला माझ्या मर्यादा खूप चांगल्या कळतात. आणि त्यांचा मी आदर करतो. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर मी‌ स्वत:ला मर्यादित फटके मारणारा, मर्यादित रेंज असलेला खेळाडू समजतो. मोठे सिक्स किंवा चौके मला जास्त मारता येत नाहीत. पण मी सिंगल्स नक्कीच जास्त घेऊ शकतो. सोपं जे काम आहे- चेंडू मोकळ्या जागेत ढकलायचा आणि लगेच धावायचं- ते मी करू शकतो. त्यामुळे त्या मर्यादेत राहूनच हे सर्व सायकलिंग करत जाईन. आणि गरज कशाला मर्यादेच्या पलीकडे जायची! केल्याने होत आहे रे! हळु हळु करत राहिलो तर त्याचं एकत्रित स्वरूप मोठं होत जातं. निरामयच्या अर्चना ताई म्हणतात तसं brick by brick करत गेलो तर घर उभं राहातं. आज शेवटून पाचवा दिवस असं मन म्हणतंय! पण त्याला परत चालू ठिकाणी आणतोय. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)  .  .  .  .  .  .   

तोंडीपासून पुढचा रस्ता हा सगळा ईसीआर म्हणजे ईस्ट कोस्ट रोडच आहे. समुद्रालगतच जातोय. आज समुद्र दिसणार्‍या जास्त जागा लागत आहेत. एका गावामध्ये जवळच बीचसुद्धा आहे! दोन मिनिट तिकडे जाऊन आलो. बीच आणि त्याला लागूनच नावाही नांगरलेल्या! वा! आणि तिथेच एक सुंदर मंदिरही आहे. सगळ्या किनारी भागात समुद्राशी संबंधित जीवनशैली महत्त्वाची आहे. मत्स्यपालन आणि जहाजाद्वारे व्यापार इथे चालतात. डॉ. अब्दुल कलामसुद्धा अशाच कुटुंबातले होते. किनारी भागामध्ये नारळाचे वृक्षही मोठ्या प्रमाणात दिसतात. अजूनही फार शहरीकरण न झालेली इथली जीवनशैली दिसते. लोकांचं राहणीमान साधं आणि एकमेकांना धरून आहे. अशाच काही घरांमध्ये मला राहायला मिळतंय. 

पहिल्या ब्रेकनंतर सेवा भारतीकडून संपर्क मिळालेल्या अभिमन्युजींशी फोनवर बोललो होतो. त्यांना इंग्रजी छान येतं आहे. त्यामुळे कुठे भेटायचं ते त्यांनी चांगलं सांगितलं. एक मोठा पोंगलचा नाश्ता आणि एक फक्त चहा- बिस्कीटाचा ब्रेक असे दोनच ब्रेक घेतले. वाटेतल्या दृश्यांचा आनंद घेत राईड छान झाली. दुपारी साडेबारालाच मल्लिपट्टिणमला पोहचलो. अभिमन्यूजींना फोन केल्यावर ते पाच मिनिटातच ठरलेल्या ठिकाणी आले आणि मोटरसायकलने रस्ता दाखवत मला घरी घेऊन गेले. रस्ता बघितला तर तो सरळ बीचकडे जातोय! हायवेवरून गावात आणि गावातही समुद्राकडे! समुद्र अगदी जवळ येतोय! समुद्रापासून फक्त दोनशे मीटर अंतरावर त्यांचं घर आहे! ते मला बोलले की, मी फोन केला तेव्हा ते जहाजावर होते! व्वा! त्यांच वय लहान म्हणजे जेमतेम २० असेल. इंग्रजी छान बोलतात, त्यामुळे संवाद छान झाला. आजचे ७४ किलोमीटर पूर्ण झाले. आधी सेतूभावछत्रमला थांबण्याचा विचार होता, पण तिथला संपर्क मिळाला नाही. म्हणून थोडं पुढे आलो. 

आजच्या राईडइतक्याच नंतरच्या भेटीही छान झाल्या. अभिमन्युजींचे बाबा सेवा भारतीचं काम करतात. मत्स्यपालन करणारं कुटुंब. त्यांच्या आईसुद्धा माझ्याशी खाणा- खुणांनी छान बोलल्या. मंडपम आणि नंतर इथला हा होम स्टे- अर्थात् देशबांधवांसोबत राहण्याचा अनुभव फार विशेष वाटला. आणि अशा भेटीगाठी- संवाद ह्या संदर्भातसुद्धा ही सायकल मोहीम किती वेगळी आणि महत्त्वाची आहे, ही जाणीव झाली. एका कुटुंबातल्या दोन शाखा. त्यांच्यात कुटुंब असण्याचा भाव असण्यासाठी भेटणं अत्यंत आवश्यक टॉनिक! नुसते सारे भारतीय माझे बांधव आहेत, म्हणून काय होणार! ती गोष्ट करता आल्याचं समाधान वाटलं. योगाचा एक अर्थ- connecting and reconnecting आहेच. त्या लोकांनाही खूप छान वाटताना दिसतंय की, मी असा लांबचा त्यांच्याकडे आलोय. लांबचा असेन पण परका अजिबात नाही. कुठेच एक सेकंदालाही कोणी मला परका मानलं नाही. पूर्ण प्रवासात. 

दुपारी भात आणि भाज्यांचं घरचं अप्रतिम जेवण! अभिमन्युजींच्या मदतीने त्याच्या आई- बाबांशीही थोडं थोडं बोललो. त्या ताईंना कळवलं की, जेवण खूप सुंदर आहे. आणि अभिमन्यु इंग्लिश छान बोलतो! तो ते सांगायला किंचित लाजत होता. त्यांच घर छान आहे. जवळ जवळ वाळूमध्ये असलेलं पक्क घर. जुन्या पद्धतीचं गाव. पण पक्की घरं. संध्याकाळी अभिमन्युजींसोबत बंदरावर गेलो! अहा हा! जवळच्यांसोबत मनसोक्त व्हिडिओ कॉल्स केले. इथे बंदर आहे पण बीच थोडा लांब आहे. अभिमन्युजींनी त्यांचे अनुभव सांगितले. ते बोटीने श्रीलंकेपर्यंत गेलेले आहेत. लांब लांब जातात. समुद्रातही जीपीएसने मार्ग शोधतात. वादळही त्यांनी अनुभवलं आहे! ते तिरूचिरापल्लीला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये आहेत. सुट्टीवर आले होते. छान गप्पा झाल्या!

  .  .  .  .  .   

त्यांच्यासोबत संध्याकाळी गावातल्या हॉटेलवर जाऊन चहा घेतला. तिथे डीएमकेची एक सभाही सुरू असलेली दिसली! मी स्टॅलिनच्या राजवटीमध्ये सायकलिंग करतोय, आठवण झाली! गावातलं रामर कोविल- रामाचं मंदिर छान वाटलं. अंधार पडल्यावर परत बंदरावर गेलो. रात्रीचा समुद्र! खाली येऊन आदळणार्‍या त्याच्या मोठ्या मोठ्या लाटा! त्याची गाज! अंधारात चमकणार्‍या बोटी! आणि खूप दिवसांनी रात्रीचं आकाश नीट बघता आलं. दक्षिण भारतातून थोडं उत्तरेला आलो असलो तरी अजूनही बरंच दक्षिण अक्षांश आहे. आकाशामध्ये व्याध आणि अगस्त्य क्षितिजापासून चांगले वर दिसत आहेत! व्वा! त्याच्या काही मित्रांसोबतही थोडा संवाद झाला. 

रात्री त्या ताईंनी जेवायला इडियाप्पम आणि भरपूर सांबार- रस्सम- भाज्या असा बेत केला. माझ्यासाठी व्हेजमधले पंचपक्वान्न बनवले. खूप अगत्य जाणवलं. लोकांकडे असं राहणं, लोक जवळून अनुभवणं आणि कनेक्ट होणं! खरंच मी खूप भाग्यवान आहे. पुढचा प्रवासही अशा विशेष ठिकाणांवरून होणार आहे. माझ्या मित्राने सुचवल्यानुसार मी किनारपट्टीचा पूर्ण रस्ता न निवडता तंजावूर घेतलं होतं. त्यानुसार उद्या तंजावूरला जाईन. आणि पुढेही असाधारण लोक आणि ठिकाणं असतील. दक्षिण भारताच्या इतिहासातल्या आणि सांस्कृतिक वाटचालीतल्या चोला, पांड्य, नायक आणि मराठा अशा महत्त्वाच्या राजवटींच्या वैभवशाली परिसरातून जाईन. आता खरं तर शेवटचे फक्त चार दिवस राहिले म्हणून वाईट वाटतंय! हे लिहीतानासुद्धा ते दिवस आठवून डोळे पाणावत आहेत. 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १७: मल्लिपट्टिणम- तंजावूर ६८ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 31 मे 2026.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 81
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

सुरु ठेवा..... वाचतोय. 

 

-दिलीप बिरुटे