Skip to main content

मुलाचं शिक्षण आणि मुलीचं लग्न.

लेखक आजी यांनी शुक्रवार, 08/05/2026 13:05 या दिवशी प्रकाशित केले.

आपण सगळेच व्यवहारात बोलताना हेच वर लिहिलेले शब्द नेहमी वापरतो. पूर्वीपासून वापरत आलोय. आपल्याला नेहमीच मुलाचं शिक्षण महत्त्वाचं वाटतं. आणि मुलीचं फक्त लग्न महत्त्वाचं वाटतं. फक्त लग्न. तिच्या जन्मापासूनच तो आईबापांना चिंतेत टाकणारा प्रश्न. एखाद्या बचतयोजनेची जाहिरात असो किंवा पर्सनल लोन.

 

आपण मुलांचं लग्न आणि मुलीचं शिक्षण याला महत्त्व देत नाही. एका प्रसिद्ध लेखकानं काहीशा कडवटपणानं एका लेखात लिहिले होते की,'आपल्या देशात पुरुष कसाही का असेना, त्याला एक  बायको मिळतेच.'मुलानं शिकावं, कुठं तरी नोकरी मिळवावी की त्याचं काय लग्न होतंच. पण मुलगी उलट जास्त शिकलेली नसावीच. उगीच नवऱ्याच्या पेक्षा जास्त शिकलेली असेल आणि त्याच्या डोक्यावर बसली तर? लग्नाच्या बाजारात एलिजीबल  ठरण्याइतकंच तिनं शिकावं. ती गोरी, सुंदर, उत्तम स्वयंपाक करणारी, सासरच्या माणसांची सेवा करणारी, कुलाचार, कुलधर्म, व्रतवैकल्ये, उपवास पाळणारी असावी. लग्नानंतर लगेच तिनं गरोदर व्हावं. आणि मुलगा जन्माला घालावा. "स्वकुलतारक सुता,सुवरा वरुन वाढवी वंश वनिता." 

बस एवढीच अपेक्षा. तिच्या शिक्षणाशी काय देणं घेणं? शिक्षणाचा उपयोग व्हावा यासाठी हवं तर तिनं घरच्या घरी शिकवण्या घ्याव्यात. शहरात परिस्थिती बदलली असली तरी लहान गावांमध्ये अजूनही फार वेगळं काही नाही.

 

का नको असते मुलगी? ती बायको म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून हवी असते पण पोटी मुलगी म्हणून जन्माला यायला नको असते.

 

याचं कारण म्हणजे मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाते. कुणी आणि कशी ही प्रथा/पद्धत रूढ झाली/केली कळत नाही. तिचं खाणं, पिणं, कपडालत्ता, शिक्षण, आरोग्य, आणि लग्नविधीवर करावा लागणारा, त्यांना कर्जबाजारी करणारा खर्च. याचे रिटर्न्स त्यांना मिळत नाहीत. मुलगी शिकते. अगदी डाॅक्टर, इंजिनिअरही होते. पण ती लग्नानंतर मिळवलेल्या पैशांनी सासरचं घर भरते. तिचे पैसे तिचा नवरा घेतो,वापरतो. तिचे आईवडील नाही वापरत. हा आतबट्ट्याचा व्यवहार नाही आईबापांच्या दृष्टीने? फार कटु,विखारी सत्य आहे हे! तिनं मिळवलेले पैसे तिनं आईबापांना द्यायचे ठरवले तर त्यासाठी तिला नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. समजा तिला तशी परवानगी मिळालीच तरी तिच्या बापाचा स्वाभिमान जागा होतो. जावयाचे पैसे घ्यायचे? अरे हट्! मेलो तरी घेणार नाही.

हे समर्थन नव्हे. काहीशी कारणमीमांसा.

शिवाय एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. म्हणजे लोक असा विचार करतात की, मुलगा म्हातारपणात आधार देतो. काळजी घेतो. किमान तशी शक्यता असते. मुलीचा काय उपयोग? ती तर तिच्या सासूचं बेडपॅन उचलते.   म्हणजे मुलीचा म्हातारपणातही काही उपयोग नाही.

थोडक्यात मुलीची उपयुक्तता शून्य. अ बिग झीरो. 

म्हणून तिचा जन्म, तिचा जीव जणू  मूल्यरहित! मुलीनं माहेरहून सासरी जाणं हे मला भातशेती सारखं वाटतं. एका जमिनीत चांगली रुजलेली रोपं उपटून दुसरीकडं लावायची !

 

अजूनही थोडं रफ् आणि कटू वास्तव समोर मांडायचं तर... हे "उपयुक्तता मूल्य" आपली मानवजात बऱ्याच प्राण्यांच्या बाबतीत वापरते.

 

म्हशीला म्हैस (मुलगी) झाली तर ते चांगलं. रेडा (मुलगा)झाला तर त्याला उपयुक्तता मूल्य नाही. गायीला फक्त गायच व्हायला नको. दुधाला गाय आणि ओझ्याला बैल असे दोन्ही हवे. तिला बैलही व्हायला हवा. कारण तो शेतीच्या कामासाठी उपयोगी पडतो. आणि एखाद्या कोटींच्या मालकिणीच्या दृष्टीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीला मात्र मुलगीच व्हायला हवी. कारण तिचा उपयोग होतो. मुलगा होऊन काय उपयोग? त्याचा तिला पैका मिळवण्यासाठी काय उपयोग?  निसर्गानं सगळे जीव समत्वाने जन्माला घातले. पण माणसाने मात्र सर्वत्र उपयुक्तता पाहिली.

 

आई मुलीला म्हणते, "माहेर हे तुझं घर नाही. सासर हेच तुझं घर." मग ती सासरी तनुमनाने समर्पित होते. पण जर का नवरा संतापला, तर तो म्हणतो,"तू माझ्या घरातून चालती हो." 

मग स्त्रीचं खरं घर कोणतं? का तिला घर नसतंच? आपण नीट लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसतं की , अनेक राण्या,महाराण्या ,थोर समाजसुधारक स्त्रिया,राजकारणी स्त्रिया यांनी पराक्रम गाजवला तेव्हा त्या विधवा होत्या. किंवा कुमारिका होत्या. इथं त्यांच्या मागे त्यांचा पती,भाऊ, वगैरे वगैरे कोणताही पुरुष उभा नाही.

 

भावासाठी रक्षाबंधन, भाऊबीज असते. नवऱ्यासाठी वटसावित्री आहे. मुलग्यासाठी अश्विन पौर्णिमा आहे. पण स्त्रीसाठी काय?

 

तिच्या साठी सतत कंठाळी उपदेश. "तू अशी वाग, तशी वागू नकोस. नाहीतर पुढे तुझ्याही नशिबात पोटात मूल असतांना वनवास येईल."

 

हं! याचसाठी मुलाचं शिक्षण आणि मुलीचं लग्न is very very important.Understood?

 

आता अनेक कायद्यांमुळे स्त्री हिताचं रक्षण केलं जातंय. अनेक कायदे स्त्रियांच्या बाजूने झालेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना झपाट्याने कमी होत आहेत. अनेक मुली लग्नानंतरही आपल्या आईवडिलांना आर्थिक मदत करताहेत. त्यांच्या आजारपणात त्यांची शुश्रुषा करताहेत. त्यांच्या उपचारांवर खर्च करताहेत. त्यांचे पतीही खर्चाचा भार उचलताहेत. वृद्ध आई वडिलांना आपल्या सासरी कायमचं राहायला आणताहेत.

 

शिवाय मुलगा अंत्यसंस्कार पार पाडतो. त्यानं अग्नी दिला तर स्वर्ग मिळतो. पण हल्ली मुलीही अग्नी देतात. अंत्यसंस्कार करतात. मुलगा आपलं नाव, आडनाव लावतो. ते पुढे चालू राहातं. पण हल्ली बऱ्याच मुली माहेर ,सासर ही दोन्ही आडनावं लावतात. काही जणी तर फक्त माहेरचंच आडनाव लग्नानंतरही लावतात. त्या सैन्यात,IT क्षेत्रात, पोलिस खात्यात,हेर खात्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. त्या वैमानिक असतात, अंतराळवीर असतात. इस्रोत,नासात वैज्ञानिक असतात. क्रीडा क्षेत्रात सुवर्ण पदकं मिळवतात. हे चित्र नक्कीच आशादायक आहे. फक्त ही सजगता समाजातील सर्व स्तरातील स्त्रियांपर्यंत पोहोचली पाहिजे.

 

कशी बदलेल ही परिस्थिती? बदलली तर पाहिजेच. बदलावी तर आपल्यालाच लागेल! आशेची असंख्य किरणं हळुहळू फाकताहेत. असंख्य बदल दृग्गोचर होताहेत. स्त्रियांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान जागा झालाय. पुरुषांना बदलत्या परिस्थितीची जाणीव झालीय. त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली आहे. हळुहळू मेट्रो सिटीतून, शहरांतून परिस्थिती सुधारली आहे. बदल झालाय. घडतोय. हे समाजभान आता निमशहरातल्या आणि खेड्यातल्या स्त्री पुरुषांमध्ये ही झिरपेल.

बीज रोवले गेलं आहे. अंकुर तर फुटणारच.

मुलगा, मुलगी दोघांचंही शिक्षण समान महत्त्वाचं आहे. सुयोग्य साथीदारासह दोघांचंही सहजीवन विकसित होईल!!!

 

विश्व संत तुकाराम महाराज म्हणतात,"शुद्ध बीजापोटी फळे

रसाळ गोमटी."

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 243
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

चांगला लेख. संथ गतीने का होईना बदल घडत आहे, पण वरवरचे बदल होण्यापेक्षा समाजाच्या मानसिकतेत मुळापासून बदल होणे गरजेचे आहे. थोडेसे अवांतर म्हणजे कुठल्याही मंगल प्रसंगी अजूनही बऱ्याच ठिकाणी विधवा स्त्रियांना अक्षरश: वाळीत टाकल्यासारखी मिळणारी वागणूक. असे काही प्रसंग पाहिल्यापासून मी अशा समारंभांना जाणे पूर्णपणे सोडून दिले.


मुलींची लग्न शिक्षण पूर्ण होतास वयाच्या 21 -२५व्या वर्षी करून दिले पाहिजे. त्या सासरी जाऊन नोकरी शोधू शकतात. उशीर केल्यावर अनेक समस्या निर्माण होतात. एका जागी पाच वर्षे नोकरी केल्यानंतर वयाची तिसी जवळ आली की दुसऱ्या जागी जाऊन नोकरी करणे कठीण होते कारण अधिकांश कंपन्या फ्रेशर्सला प्रेफरन्स देतात.  मग नोकरी करणारा शहरात मुलगा मिळत नाही आणि मुलींचे लग्न रेंगाळतात. आज शिक्षित आणि नोकरी  करणाऱ्यांचे लग्न  ३० उलटल्यानंतरच होत आहे. एक अपत्य पैदा करणे ही कठीण होऊ लागले आहे.  लग्न न झालेल्या मुला मुलींची संख्या भयंकर रीतीने वाढत आहे.  ब्राह्मण समाजात ही समस्या पराकोटीला गेलेली आहे. पुढील तीन-चार पिढ्या मराठी ब्राह्मण समाज अस्तित्वहीन होणार आहे.

दुसरा परिणाम वाढत्या वयाच्या मूुली लव   जिहाद मध्ये ही फसतात.