Skip to main content

डिजिटल चक्रव्यूह

डिजिटल चक्रव्यूह

Published on 20/04/2026 - 01:08 प्रकाशित मुखपृष्ठ

आदल्या दिवशी दुपारची वेळ. स्वरालीचा फोन वाजला. पलीकडून रोहनचा मद्याच्या नशेतला आणि विकृत हसण्याचा आवाज आला.

"ऐक भिकारडे, उद्या कोर्टात काय होतंय बघच तू. तुला घटस्फोट देताना अक्षरशः रस्त्यावर आणेन. माझा वकील ॲडव्होकेट हंबीरराव आहे. तो आजवर एकही केस हरला नाहीये, त्याने सगळ्या न्यायाधीशांना पैशाने खिशात टाकलंय. पोटगीचे १५-२० लाख तोंडावर फेकेन आणि माझा अंश तुझ्याकडून कायमचा हिरावून घेईन. आणि हा... जास्त शहाणपणा केलास ना, तर 'चिन्मय भाई' तुझा कायमचा गेम करील!" रोहन बीभत्सपणे हसला आणि त्याने फोन कट केला.

रोहन आणि त्याचा दोन नंबरी धंदे करणारा बाप, आबासाहेब  यांना वाटत होतं की स्वराली म्हणजे एक साधी, 'बीए (मराठी साहित्य)' झालेली आणि सीए (CA) चं शिक्षण अर्धवट सोडलेली 'अबला नारी' आहे. पण त्यांना कुठे माहिती होतं की, सीएच्या अभ्यासासोबतच तिने कॉम्प्युटर, प्रोग्रॅमिंग, डार्क वेब, सिस्टीम हॅकिंग, स्नूपिंग आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये मास्टरी मिळवली होती. सीए मध्ये अकाउंट्स , हिशोब याचा अभ्यास झाला होता. सुरुवातीची काही वर्ष रोहन तिलाच काही हिशोबाची आणि ऑडिट ची कामे करायला सांगायचा त्यामुळे तिला त्याचे काळे पांढरे व्यवहार व्यवस्थित माहित हॊते आणि तिचा पाच वर्षांचा चिमुकला अंश? तो तर आईच्याही पुढे होता. वयाच्या पाचव्या वर्षी तो एक 'बाल हॅकर' होता आणि क्रिप्टोकरन्सीच्या विश्वात लीलया खेळत होता.

फोन ठेवल्यावर स्वराली क्षणभर रडली, पण पुढच्याच सेकंदाला तिचे डोळे एका भयंकर निर्धाराने चमकले. "खूप सहन केलं, आता फक्त प्रहार!" ती पुटपुटली.

तिने आपला सुपर लॅपटॉप उघडला. हा काही साधा लॅपटॉप नव्हता— २ टीबी रॅम, १ पेटा बाईट हार्ड डिस्क आणि इंटेल आय-२१ (२७th जनरेशन) प्रोसेसर असलेला हा एक महाकाय सेटअप होता. तिने एकाच वेळी 7 वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम (OS) मधून लॉग-इन केले. तिच्या बोटांनी कीबोर्डवर अक्षरशः जादू करायला सुरुवात केली.

सर्वात आधी तिने रोहनच्या 'केमन आयलंड' (Cayman Islands) मधील तीन बेनामी खात्यांवर हल्ला केला. तिथले करोडो डॉलर्स तिने जगभरातील ७ वेगवेगळ्या डमी अकाउंट्समधून फिरवले. रोहनच्या कॉम्प्युटरवर मात्र तिने एक 'फेक इंटरफेस' सेट केला, ज्यामुळे त्याला त्याचे पैसे तिथेच सुरक्षित असल्याचा खोटा भास होत राहील. यातले काही पैसे तिने भारतातील एका हवाला ऑपरेटरकडे वळवले. तिथून डार्क वेबचा वापर करून ते पैसे एका एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले. सोबत एकच मेसेज होता— 'आज रात्री चिन्मय भाईचा गेम झाला पाहिजे.'

इकडे अंशने आबासाहेबांच्या  वाड्यातील सर्व स्मार्ट डिव्हाइसेस आधीच हॅक करून ठेवले होते. अंशने रोहनच्या फोनमध्ये एक 'बॅकडोर प्रोग्रॅम' प्लांट केला होता, जो वायफाय द्वारे आपोआप आबासाहेब आणि ॲडव्होकेट देसाईंच्या फोनमध्ये घुसला होता.

स्वरालीने देसाई वकिलाच्या फोनमधील सर्व काळे धंदे, भ्रष्टाचाराचे पुरावे आणि न्यायाधीशांना दिलेल्या लाचेचे रेकॉर्ड्स काढले आणि ते डार्क वेबवरून योग्य त्या 'वरच्या' सरकारी यंत्रणांना पाठवून दिले. मध्यरात्र होताच ॲडव्होकेट देसाईंना दिल्लीतील बड्या न्यायाधीशांचे आणि नेत्यांचे धमकीचे फोन येऊ लागले.

रात्रीचे दोन वाजले होते. आबासाहेबांच्या फोनवर अचानक एक व्हिडिओ कॉल आला. स्क्रीनवर पाहताच आबासाहेबांच्या काळजाचा ठोका चुकला. स्क्रीनवर त्यांची मृत पत्नी होती— जिचा त्यांनीच छळ करून जीव घेतला होता! स्वरालीने 'एआय' (AI) चा वापर करून हा हुबेहूब व्हिडिओ आणि आवाज तयार केला होता. भूतकाळातील पापे समोर आल्याने आणि त्या भयानक दृश्याने आबासाहेबांना तिथेच हार्ट अटॅक आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारच्या खोलीत दारूच्या नशेत तर्र असलेला रोहन या सगळ्यापासून अनभिज्ञ होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन उठला. हँगओव्हरमध्येच तो वॉशरूमला गेला आणि स्मार्ट कमोडवर बसला. पण अंशने त्याचे 'स्मार्ट टॉयलेट' हॅक केले होते. अचानक टॉयलेटच्या जेटमधून उकळत्या पाण्याचा फवारा उडाला आणि रोहनचा पार्श्वभाग भयंकर भाजला गेला!

वेदनांनी विव्हळत त्याने ॲडव्होकेट देसाईंना फोन लावला, तर नंबर बंद! त्याला मेसेज आला की रात्रीच्या भयंकर धमक्यांना घाबरून देसाई पळून गेलेत. घाबरलेला रोहन लंगडत आबासाहेबांच्या खोलीत गेला, तर बाप पलंगावर मृतावस्थेत पडलेला!

धक्क्यातून सावरण्यासाठी त्याने टीव्ही लावला, तर ब्रेकिंग न्यूज सुरू होती— "कुख्यात गुंड चिन्मय भाईचे पोलिसांकडून रात्रीत एन्काउंटर!"

त्याच्या मेंदूला सुन्न करणारा आणखी एक धक्का बसला. त्याचा फोन वाजला. बल्गेरियाहून आंतरराष्ट्रीय स्मगलर 'अदनान अल निडाल बिन हबतूर'चा तो कॉल होता. "रोहन! आमचं जॉईंट अकाउंट रिकामं कसं झालं? माझा हिशोब संध्याकाळपर्यंत झाला नाही, अकाउंट खाली तू वर !"

रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. शरीरातली ताकद संपली होती. तो थरथर कापत खिडकीजवळ आला आणि बाहेर बघतो तर काय... घराच्या आवारात 'ED' (अंमलबजावणी संचालनालय) च्या गाड्यांचा ताफा सायरन वाजवत घुसत होता!

भाजलेला जीव, पळून गेलेला वकील, मेलेला बाप, एन्काउंटर झालेला गुंड, आंतरराष्ट्रीय माफियाची धमकी आणि दारात उभी असलेली ईडी... हा अफाट ताण रोहनला सहन झाला नाही. तो छातीला हात लावून जमिनीवर कोसळला... आणि तिथेच त्याचा शेवट झाला!

थोड्या वेळाने अंशने आईला फोन केला, "मॉम, ऑल क्लिअर!"

स्वरालीने एक थंड हास्य केले. तिने आपल्या लॅपटॉपमधील सर्व डेटा एन्कोड केला आणि आफ्रिकेतील एका सुरक्षित 'क्लाउड सर्व्हर'वर टाकून लॅपटॉपचा माग पुसून टाकला. तिने पर्समध्ये आपल्या मेकअप किटसोबत 'ग्लिसरीन'ची एक बाटली टाकली आणि ती कोकाटे वाड्याकडे निघाली.

डार्क वेबवरून ईडीला ती टीप कुणी दिली? रोहनचे परदेशातील हजारो कोटी रुपये कुठे गायब झाले? हे कोणालाच कधीच कळणार नव्हते. आणि स्वरालीवर तर कोणाचाच संशय येणार नव्हता, कारण जगाच्या आणि पोलिसांच्या दृष्टीने ती फक्त एक 'बीए (मराठी साहित्य)' शिकलेली साधीभोळी आणि एकाच रात्रीत नवरा-सासरा गमावलेली दुःखी विधवा होती!

घर जवळ येताच स्वरालीने डोळ्यांत ग्लिसरीन घातले. मनातल्या मनात ती आपल्या स्वातंत्र्यावर हसत होती, पण जगाला दाखवण्यासाठी ती 'ढसाढसा रडत' घरात शिरली! 

एक नवा अध्याय सुरू झाला होता.


याद्या 17
प्रतिक्रिया 0