परिक्षा
गणपत वाणी आयुष्यभर दहा बाय आठ खोपटातल्या काउंटरमागे बसून उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरत राहिला. ‘आयुष्यभर’ असे तो नुसता म्हणायचा. कारण पुर्वी याशिवाय आपले दुसरे एखादे आयुष्य होते हे त्याला दात कोरतांना एकदाही आठवले नव्हते. यापुढच्या काळात आपले दुसरे एखादे आयुष्य असेल हेदेखील त्याला दात कोरतांना पटले नसते. म्हणजेच उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरणे एवढेच त्याचे एकमेव माफक आयुष्य होते. या माफक आयुष्यात त्याला एकाच कठीण परीक्षेला सतत सामोरे जावे लागत होते. त्याची काही तक्रारदेखील नव्हती. दातात अडकून बसलेला खाद्याचा एखादा हट्टी कण उदबत्तीच्या काड्यांनी उचकटवून काढणे हीच ती परीक्षा. ही परीक्षा सतत देणे हे त्याच्या एकमेव माफक आयुष्याचे raison d'etre (अस्तित्वाचे कारण) होते. लोक जरी त्याला हसायचे तरी गणपत वाण्यासाठी ही परीक्षा मोठे आव्हान होते. तो दररोज इमान-इतबारे ही परीक्षा देत होता. बहुतेक वेळा तो अडकलेला कण काढण्यात यशस्वी व्हायचा. जमले तर त्या जिद्दी कणाला तावातावाने दाताखाली रगडून, नाहीच जमले तर गिळून तो हे यश साजरे करत होता. पण अनेकदा कण उचकटवून काढण्याच्या परीक्षेत तो नापासही होत असे. पास होणे आनंदाने साजरे केले तरी नापास होणे मात्र मोठी शिक्षा होती. खोल लपलेला कण शोधण्याचे कार्य आता अहोरात्र करावे लागायचे. ते साध्य होईस्तोवर त्याचे कशातच लक्ष लागायचे नाही. बाण मारण्याआधी अर्जुनाला मस्याचा डोळा दिसला, तो कितीतरी मोठा होता. शिवाय टळटळीत उघड्यावर, मस्याबरोबर गिरक्या घेत होता! तो दिसला तर अर्जुनाचे आजतागायत कोण कौतुक! गरीब बिचाऱ्या गणपत वाण्याला सूक्ष्म कण, कुठे दडून बसला हेच माहित नसायचे. अर्जुनाचे बाण तीक्ष्ण! गणपत वाण्याचे बाण सूक्ष्म! अर्जुनाचे बाण मोठाली भोके पाडी. याचे बाण हिरड्या सोली. कौतुक अर्जुनाचेच. नॉट फेअर अॅट ऑल!
बाणावरुन आठवले. अर्जुनाला देवांकडून आयतीच शस्त्रे मिळाली होती. गणपत वाण्याला रोज मेहनत घेऊन भाले किंवा बाण परजून घ्यावे लागत. एखादा दुष्ट कण बोच लावत असतांना योग्य बाण तयार करा. कणाचा अंदाजे साईज जोखून त्याला परजून घ्या. अंदाजानेच एखाद्या कपारीत ढोसले की बाण तुटायचा किंवा कपारीत रुतायचा. बाण तुटणे परवडले. पण रूतलेला बाण रक्ताचा झरादेखील काढायचा. अर्जुनाने बाण मारून नुसते पाणीच बाहेर.. असू देत! पाण्यापेक्षा रक्त दाट असते हे केवळ म्हणीपुरतेच खरे आहे.
गणपत वाण्याचे दहा बाय आठ खोपट वाणसामानानी भरले असायचे. ते सहसा रिकामे रहात नसे. रिकामे करायला मुळात गिऱ्हाइक यायला तर हवे! गणपत वाणी उदबत्त्यांचे पुडे मात्र सतत ऑर्डर करीत असे. रोजच्या परीक्षा सुरू होत्या ना! पुड्यातली उदबत्ती कधीतरी विकली गेलीच तर ती नक्कीच तुटक्या शेपटीची असेल. विकली गेली असली तरी जाळण्यासाठी शेपटी उपयोगी नसल्याने कोणी तक्रारही केली नसती. तोडलेली शेपटी खलनायकी अभिर्भावात न्याहाळून गणपत वाणी तिला दातानेच मधोमध उभा छेद द्यायचा. आता शेपटीचा बाण झाला असायचा. गरज पडलीच तर टोकाला हलकेच कुरतडून तो चेवाने दातातल्या कपारीत ढोसायचा आणि परीक्षेचा पेपर सुरू! पेपर संपला की गणपत वाणी बाण जिभेने चाटून आणि सदऱ्याच्या टोकाने साफ करुन व्यवस्थित काउंटरच्या खाली जमवून ठेवायचा. ‘जिभेने चाटून’ हे ऐकल्यावर तुम्ही हसलात हे मला काही आवडले नाही. अहो, रक्त त्याचेच, कणही त्याचेच आणि चाटणारी जीभही त्याचीच. तुम्ही दात कशाला दाखवताय? बाण ठेवलेली जागा कधी झाडली जाणार नाही याची विशेष काळजीही घ्यायचा. त्या निरुपयोगी काड्या नव्हत्या. अथक परिश्रमांचे स्टेटमेंट होते. जय पराजयाचा इतिहास होता.
अशा अनेक ‘कण उच्चाटन’ परीक्षांमधून गेल्यावर एकदा गणपत वाणी अचानक फार फार आजारी पडला. फार फार म्हणजे इतका की त्याला उचलून दंतवैद्याकडे न्यावे लागले. तुम्ही म्हणाल दंतवैद्याकडे का? तर एका जालीम परीक्षेत बाणाचे काही तुकडे कपारीत गायबच झाले. त्यानंतरची परीक्षा मात्र मदर ऑफ ऑल परीक्षाज होती. आता गणपत वाण्याला अडकलेले कणच नव्हे तर गायब झालेले बाणाचे तुकडे उकरून काढायचे होते. नेहमीच्या उदबत्ती काड्या कुचकामी होत्या. गणपत वाण्याने सूचिकास्त्र वापरायचे ठरवले. सदरा शिवण्याची सुई घेऊन त्याने ती स्टोववर गरम केली. आणि अर्धी दंतपंक्ती आवळत दुसऱ्या बाजुने नेम साधला. चटका तर त्याने सहन केला. सूचिकास्त्राचे क्षरीत अग्रही कपारीत जाऊन जमा झालेले मात्र त्याच्या लक्षात आले नाही. ती महापरीक्षा गणपत वाण्याने दिलेली शेवटचीच परीक्षा ठरली. त्यानंतर मात्र नवीन परीक्षा समोर आलीच नाही. कारण नवीण कण लपून बसायची वेळच आली नाही. गणपत वाण्याचा जबडा सुजून आकाराने आणि रंगाने हनुमानासारखा झाला. खोपटासमोरून जाणाऱ्या एकाने त्याचा हनुमान हुंकार ऐकला आणि तातडीने ढकलगाडीवर टाकून गणपत वाण्याला दंतवैद्याच्या खुर्चीत डंप केले.
आयुष्यभर एक बाय एकच्या स्टुलावर टिंगोरी चेपून घेणाऱ्या गणपत वाण्याला वातानुकुलित खोलीतील दंतवैद्याच्या आरामशीर खुर्चीत बसल्याबसल्याच शांत झोप लागली. ते पाहून दंतवैद्याला भूलीचे औषध वाचवावे असा क्षणिक मोह झाला. पण नको उगाच! झोपी गेलेला त्रस्त हनुमान आपल्या शस्त्रांनी जागा झाला तर लंकादहनाचा प्रयोग तिथे झाला असता. त्यामुळे त्याने डबल भूल देऊन आपले काम सुरू केले. गणपत वाणीमात्र हनुमानासारखा हवेत उड्डाण करत खालची मनोहर दृश्ये निरखत होता. त्याचा फायदा असा झाला की खोपटात परीक्षा देण्याआधीचे त्याचे पुर्वीचे आयुष्य त्याला बघायला मिळाले. गणपत वाण्याने पाहिले की जन्मापासून तो खोपटात आसनस्थ होईपर्यन्त तो एकसारखा परिक्षाच देत होता.
जन्माला आल्याबरोबर रडला नाही म्हणून उलटे टांगून घेत कुल्ल्यावर चापट्या सहन करण्याची परीक्षा, जी केकाटून रडल्यानेच संपली. आई मोबाइल मोबाइल खेळण्यात बिझी असल्याने वेळेवर दूध मिळाले नाही, तेव्हा किती वेळ भुके राहू शकतो ही परीक्षा. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून गाल चोंबाळून घ्यायचे पण रडायचे नाही ही परीक्षा. पावले टाकणे शिकतांना पडायचे नाही ही परीक्षा. पुढे शाळेत तर परिक्षाच परीक्षा. आणि प्रत्येक परीक्षेआधी धावपळ, परिश्रम आणि एक खोटी आशा! बस, आणखी काही दिवस कष्ट सहन कर, मग काय सुट्टीच आहे! ती सुट्टी मात्र कधी मिळालीच नाही. थोडा आराम केला की पुढची परीक्षा आ वासून उभी होती. पुन्हा त्याच खोट्या आशा! आणखी काही दिवस कष्ट सहन कर, मग काय सुट्टीच आहे! शाळा संपल्यावर कॉलेजचे एकच वर्ष कसे तरी केले. तिथे तेच! आणखी काही दिवस कष्ट सहन कर, मग काय नोकरीत पैसा कमवायचा! तोवर मात्र गणपत शहाणा झाला होता. परीक्षांच्या वेढ्यात न अडकता त्याने खोपटात आसन मिळवले आणि तो ससेमिरा विसरला. त्याचे नशीब बघा खाऊन पिऊन सुखी झाला असता! पण कण संशोधन मोहिमेत अडकून उरलेल्या आयुष्यात परीक्षा देत बसला! अरे धत तुझ्या जिनगानीवर! हवेतून खाली उतरता उतरता त्याला जबरदस्त झटका बसला. त्याला वाटले बहुदा दंतवैद्याने त्याचा शेवटचा दात उपटून निश्वास सोडला असावा. तसे काही नव्हते. भूल संपत आली म्हणून जबड्यात आणखी एक इंजेक्शन ठोकले असावे. नक्की माहित नाही.
गणपत वाण्यावाटची शेवटची परीक्षा दंतवैद्याने प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण केली. दंतवैद्याने काढलेला अडकलेला समग्र माल तिथल्या नालीत वाहून गेला हे गणपत वाण्याचे दुर्दैव! त्याच्या हातात असते तर त्याने खोपटातल्या कौंटरखालच्या ऐतिहासिक ठेव्यात ही मोलाची भर नक्कीच टाकली असती. असो! लोकांना कदर नसते हेच खरे. इन्फेक्शन नाहीसे केल्यावर गणपत वाण्याची सतत परीक्षा घेणारे किडलेले दात काढावे लागले. कण अडकावे अशी खिंडारे बोळक्यात राहिलीच नाहीत. त्यामुळे पुड्यातल्या उदबत्तींच्या शेपट्या सलामत राहू लागल्या. गणपत वाण्यामागचा परीक्षांचा ससेमिरा थांबला. अस्तित्वाचे कारणच नाहीसे झाल्यावर गणपत वाणी झुरून झुरून अंथरुणावर पडला. एका रात्री त्याला स्वप्न पडले. “इथल्या परीक्षा संपल्या. आता काही काळ सुट्टी उपभोगून नवीन परीक्षांसाठी जायचे आहे.” गणपत वाणी लोकांच्या आठवणीत आधीही नव्हता, त्यामुळे ‘लोक हळूहळू गणपत वाण्याला विसरले’ हे वाक्य लिहिण्याचे माझे कष्ट वाचले.
पुढे कोणत्या नवीन परीक्षा गणपत वाण्यासमोर आल्या हा संशोधनाचा विषय आहे. पुन्हा कधी परीक्षा विषयावर वाचकांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली आणि संशोधनात काही सापडले तर विस्ताराने लिहिता येईल. तोवर इत्यलम् !
.....
मस्त!
छान, मजा आली!
- (अनूनही परीक्षा चालू असलेला) सोकाजी
सुरेख
सुरेख
छान.. पुलेप्र...
छान..
पुलेप्र...