मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुरोगामी, लिबरल्स लोकांनी आता करायचे तरी काय ??? कोणती नवी चाल खेळायची?

सुधीर मुतालीक · · जनातलं, मनातलं
संघाचे काल भूमी पूजनाच्या निमित्ताने झालेले भव्य दर्शन त्या समस्त तथाकथित बुद्धिवंत पुरोगामी आणि लिबरल लोकांस किती त्रासदायक असेल ??? संघाच्या एक एक अजेंड्याची अशी पूर्तता होताना बघून किती यातना होत असतील ? चार पाच वर्षांपूर्वी पर्यंत स्वप्नात देखील या देशात कुणी कल्पना केली नव्हती की 370 कलम इतक्या लवकर हटवले जाईल. संघ गेली सत्तर वर्षे सातत्याने समस्त परिवारातल्या कार्यकर्त्याना 370 कलम हटविण्या संबंधीचा नारा देत होता आणि आपल्या उरीचे ते स्वप्न कार्यकर्ता जगत होता. सत्ता अशा स्वप्नांसाठी करायची आहे याची पदोपदी जाण होती आणि आहे. हमे राज नही, समाज बदलना है - कार्यकर्ता हेच तत्व जगतो आहे. त्यामुळे समाज बदलण्याच्या हेतूने सत्तेचा अट्टाहास केला. त्यात यश मिळाल्यावर - सत्ता मिळाल्यावर - देखील दांडगाईने पहिल्याच पाच वर्षात नव्हे, तर संपूर्ण संयत भूमिका घेऊन कायदेशीर मार्गानी, दंगेधोपे, गोंधळ न करता. सात्त्विक समाधानाची पखरण करत. हा हा म्हणता ते सत्तर वर्षाचे दुखणे असणारे 370 कलम हटवले गेले, शेतकरी एकशे चौतीस वर्षांनी बाजाराच्या बंधनातून मुक्त केला गेला, शेकडो वर्षे शाब्दिक घटस्फोटाच्या धाकात जगणाऱ्या मुस्लिम महिलेला मुक्त केले गेले आणि आता पाचशे वर्षे हिंदू समाजाच्या हृदयात बोचणारी सल नाहीशी केली, काल आत्मनिर्भर भारताची सुवर्ण वीट रचली. संघाचे हे विराट दर्शन किती छळत असेल त्या पुरोगामी, लिबरल्स वगैरे व्याख्या आणि बिरुदावली घेऊन समाजात वावरणाऱ्या ढोंगी लोकांना ??? अगदी ठामपणे सांगतो आज किंवा गेल्या काही वर्षात, दशकात ही लेबले लावून, खादीचे झब्बे घालून, खांद्यावर झोळी, अडकवून दाढीचे खुंट, वाढवून कपाळावर लालबुंद मोठी बिंदी लावून, कधी हातात डफली घेऊन, कधी गोलात बसून जागतिक हवामानाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे, कधी ह्या पक्षाच्या कधी त्या पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे, इस्लाम खतरेमें है चा नारा देऊन गरीब पीडित मुसलमानांना फितवणारे आणि भारतीय समाजात फूट पाडून आपले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात कोणत्याही नीचतम स्तराला जाणारे हे लोक ते खरे पुरोगामी नव्हेत. नवरा गेल्यावर पोरीला चितेवर ढकलणाऱ्या समाजाला जागेकरून पोरीला मुक्त करणारे किंवा जातीच्या उतरंडीमध्ये पिचून गेलेल्या दलित समूहांना माणूस म्हणून त्यांचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे किंवा आजारी पडलेल्या माणसाला मांत्रिकाकडे नाही तर डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी इथल्या अडाणी जनतेला शिक्षित करणारे किंवा भारतीय लेकीच्या हाती पाटी पेन्सिल देणारे इत्यादी हे सगळे खऱ्या अर्थाने आमच्या हृदयात सदैव आदरणीय असणारे पुरोगामी. आज आजुबाजुला दिसणारे पुरोगामी ते हे नव्हेत. हे कोण आहेत माहितीय ? कुठून आले कळलंय ?? गांधीजींच्या दांडी यात्रेत शेवटी शेवटी असणारे आणि ट्रॅफिक पोलिसाच्या थाटात रस्त्यात मध्येच 'चलो चलो आगे बढो' म्हणत लोकांना हाकणारे. पण अगदी पुढल्या फळीतल्या गांधींवर लाठी चार्ज करत इंग्रजांचा पोलीस पुढे सरकतो आहे असे समजल्यावर हळूच रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या आजुबाजुच्या बघ्यांमध्ये सामील होणारे किंवा त्या मागच्या झाडीमध्ये लपून बसणारे, गांधी आमरण उपोषणाला बसले की त्यांच्या तंबूत काहीकाळ आपण देखील उपोषणाला बसलो आहोत असा आव आणणारे पण धोतराच्या वळचणीला बायकोने दिलेला नागलीचा लाडू लपविणारे, जेपींच्या चळवळीत गल्ली बोळातून हातात झेंडा घेऊन बिल्ले लावून फिरणारे पण आणिबाणी पुकारल्यावर घरी बायकोला सांडगे पापड बनवायला मदत करणारे, मोरारजीभाईंना खुर्चीवर बसवून सत्तेच्या जवळपास गेले पण ज्या साठी एकत्र आलो त्या संकल्पाशी प्रामाणिक न राहता सत्ता गमवायला भाग पडणारे, नंतर मात्र फक्त घरी बसून राहिलेले आणि संध्याकाळी घरी आल्यावर विजार घालताना बायकोला फर्मास शिरा करण्याचे फर्मान सोडणारे ते सगळे असे तेच ! मग लिंबाचे लोणचे खोचलेला शिरा मिटक्या मारत खात "एक दिवस हा देश विकणार लेकाचा" "हे लोक घातक" "ते ही घातक" "शिक्षणाची फार दुरावस्था झाली आहे" "मंदिर काय लेको शाळा किंवा हॉस्पिटल बांधा म्हणावं तिथे" "शेवटी हे निधर्मी राष्ट्र आहे म्हणावं..... " अशी रोज एक दोन वाक्ये बायकोसमोर आरामखुर्चीत बसून टाकणारे ! पुढे फेसबुक व्हॉट्सऍप आल्यावर साने गुरुजी, गांधी, विनोबा इत्यादींच्या जयंत्यांना त्यांच्या विषयी फोटोसह पोस्टी टाकणारे आणि उर्वरित दिवसात विचारधन गुरुजी मोदी यांची टिंगल टवाळी करणाऱ्या पोस्टी फॉरवर्ड करणारे....! . यांचा ना समाजाला कधी उपयोग झाला ना या जमातींनी कधी काही करण्याची तसदी घेतली. संघटीत होऊन समाजासाठी भरीव काही केल्याचे दाखले भारतीय इतिहासात सापडतात का बघाना ! यांना साधे संघटीत देखील होता आले नाही, रचनात्मक काही काम उभे करणे तर दूरच राहिले. एकोणीसशे पन्नास सालापासून संघाच्या नावाने सतत खडे फोडणाऱ्या या फुटकळ लोकांनी पर्यायी व्यवस्था का उभी केली नाही ? एखादी ग्राम पंचायत तरी स्वतःच्या तत्वावर उभा केलेल्या पक्षाच्या जोरावर यांना कधी घेता आली आहे काय ? माफीवीर, तडीपार, हिटलर अशी गलिच्छ टीका टिपण्णी करण्याव्यतिरिक्त या लोकांनी काय केलं आपल्या देशात आजवर ? फक्त आणि फक्त ढोंग आणि ते करत संघाला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधणे. बस्स. हिंदू मुस्लिम अशी फूट पाडण्याचे आणि ती पाडून संघाला बदनाम करण्याचे डाव सातत्याने हे लोक खेळत आले. आपण काही करू शकलो नाही याचे वैफल्य पदरी होतेच पण संघ दिसामाजी वाढतो आहे याची चरफड देखील. याच मुळे या तमाम जनतेने या देशात मुस्लिम समाजाला संघाविरुद्ध फितविण्याचे सातत्याने प्रयत्न केले. अर्थात संपूर्ण मुस्लिम समाजावर किंवा ख्रिस्ती समाजावर प्रभाव उत्पन्न करण्याची क्षमता आणि लायकी यांच्याकडे कधीच नव्हती. त्यामुळे संघाला बदनाम करण्याचे यांचे प्रयत्त्न कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत ना कोणत्या धर्मियांनी यांच्या आवईला कधी भीक घातली. कालचे भूमीपूजन झाल्यावर देशभरात पसरलेल्या समाधानाने आणि शांततेने हे दाखवून दिले की यांचे समाजात दुफळी माजविण्याचे गेल्या सत्तर वर्षातले प्रयत्न उध्वस्त झाले आहेत. यांना प्रश्न असा पडला असेल की आता काय करायचे ? नेहरू तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रबाबूंवर सोमनाथच्या जीर्णोद्धार समारंभाला गेले म्हणून उखडले होते. आपले राष्ट्र निधर्मी असल्यामुळे आपल्यापैकी कुणी अशा समारंभांना जाणे हा गुन्हा आहे असे नेहरूंचे म्हणणे होते. इथे तर चक्क पंतप्रधान आणि सरसंघचालक यांच्या नावाने निमंत्रण पत्रिकाच छापली असे नव्हे तर दोघांनी एकत्रित एका मंदिराचे भूमिपूजन केले ! त्या समस्त पुरोगामी लिबरल इत्यादी लोकांनी आता काय स्वतःला उलटे टांगून मिरचीची धुरी लावून घ्यायची काय ??? सत्तर वर्षाच्या षडयंत्राचा असा खेळखंडोबा झाल्यावर आता पुढे काय आणि कसे करायचे या विवंचनेत असतील मंडळी. त्यामुळे गेल्या दोनचार दिवसात फारशा पोस्टी नाहीत. हिंदू मुस्लिम या विषयात तंटे दंगे धोपे झाले नाहीत तर प्रश्न या जमातींच्या अस्तित्वाचा आहे !!! @सुधीर मुतालीक

वाचन 26994 प्रतिक्रिया 0