मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चौकटींतील रत्ने (उत्तरार्ध)

हेमंतकुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्वार्ध इथे : https://misalpav.com/node/45825 ******************************************************** या लेखाच्या पूर्वार्धात लिहिल्याप्रमाणे मराठी कोड्यांवर हुकुमत यायला माझे एक दशक खर्ची पडले होते. आता एक धाडस म्हणून इंग्लीश कोड्यांकडे वळणार होतो. आतापर्यंत इंग्लीश पेपर चाळताना चौकटीयुक्त कोडे दिसले तरी त्याकडे ढुंकून पाहिले नव्हते. याला कारण माझी इंग्लीशबाबतची भाषिक पार्श्वभूमी. इयत्ता पाचवीपासून शालेय विषय, आठवीपासून विज्ञान व गणित इंग्लिशमधून आणि पुढे व्यावसायिक शिक्षण इंग्लिशमधून झाले. सामान्य व्यवहारातील बोलणे हे मराठीतूनच. याचा अर्थ इतकाच होतो की ‘पुस्तकी इंग्लीश’शी आपली घसट झालेली असते. या जोडीला मर्यादित इंग्लीश साहित्यवाचन आणि अधूनमधून इंग्लीश दैनिके व नियतकालिके चाळणे इतपत तो भाषासंपर्क होता. मात्र ही शिदोरी इंग्लीश शब्दकोडी सोडवायला फार अपुरी असते. याचा प्रत्यय मी जेव्हा ही कोडी नीट वाचू लागलो तेव्हा लगेच आला. सलग २-३ दिवस या कोड्यांवर नजर टाकता काही गोष्टी ध्यानात आल्या. कोड्यातील जी शोधसूत्रे इतिहास, भूगोल, विज्ञान आणि आरोग्य यांवर आधारित आहेत, त्यांचीच उत्तरे आपल्याला सामान्यज्ञानावर देता येतील. मात्र कोड्यातील इतर जे प्रांत आहेत त्यात आपण जेमतेम रांगणारे बाळ आहोत ! आता प्रथम आपण दैनिकांतील इंग्लीश कोड्यांचा आकृतीबंध समजून घेऊ. मागच्या भागात लिहिल्या प्रमाणे शब्द्कोड्यांचे २ मूलभूत प्रकार म्हणजे सामान्य आणि गूढ. माझे लक्ष्य फक्त सामान्य कोडी हेच होते पुढील विवेचन हे तेवढ्यापुरतेच आणि माझ्या दृष्टीकोनातून असेल. या दैनिकांत दर सोमवार ते शुक्रवारच्या कोड्यांच्या कठीणतेची पातळी ‘साधारण’ असते. शनिवारच्या कोड्यात ती त्याहून वरच्या पातळीवर जाते. तर रविवारच्या कोड्याची पातळी ही महाकठीण असते – अगदी मेंदूला झिणझिण्या येतील इतकी. आता सोम ते शुक्रवारच्या कोड्यांपासून प्रारंभ केला. कोडेनिर्माते त्यांना ‘easy’ म्हणतात पण मी त्यांना ‘नॉर्मल’ म्हणणे पसंत करेन. (इंग्लीश मातृभाषिकासाठी ती इझी असणार) एका कोड्यावर सुमारे पाऊण तास घालवल्यावर ते कसेबसे १०% सुटले. हे अपेक्षितच होते. मग एक काम केले. आजच्या कोड्याचे उत्तर उद्याच्या अंकात येत असते. तेव्हा आजचे पान जपून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सरळ उत्तरे बघून ती हातानी त्यात लिहून काढायची. असे करताना इंग्लीश कोड्यांच्या विषयांची व्याप्ती समजू लागली. त्यांचे जे काही खास विषय असतात त्यात सामान्य मराठी माणूस अनभिज्ञ असतो. उदाहरणार्थ काही विषय लिहितो: १. त्यांच्या बोलीभाषेतील अनौपचारिक शब्द, खास अपशब्द, म्हणी आणि वाक्प्रचार २. संगीत, कलाविष्कार, संस्कृती आणि आनंदोत्सवांशी संबंधित शब्द. ३. विशेष खाद्य आणि मद्यपदार्थ ! ४. अ‍ॅडम, इव्ह, नोहा, बायबल.... हे प्रांत ५. ग्रीक व रोमन संस्कृतीविषयक शब्द. या निरीक्षणानंतर एक लक्षात आले. ही कोडी सोडवताना आपण हातात पेन्सिल (पेन नव्हे, कारण खोडता आले पाहिजे) घेऊन निव्वळ स्मरण आणि कल्पनाशक्तीवर काही उत्तरे येणार नाहीत. सुरवातीस आपल्याला शब्दकोशाची मदत घ्यावीच लागेल. जशी ती घेऊ लागलो तसे अजून एक समजले. निव्वळ शब्दकोशापेक्षा इथे समानार्थी कोश अधिक उपयुक्त असणार आहे. तसेच गुगलचा वापरही बऱ्यापैकी करावा लागणार आहे. मग गरजेनुसार या सर्व आयुधांची मदत घेऊन हा कोडेप्रवास चालू केला. इंग्लीश कोड्यांत एक महत्वाचा मुद्दा असतो स्पेलिंगचा. काही शब्दांच्या बाबतीत ब्रिटीश व अमेरिकी शब्दांचे स्पेलिंग भिन्न असते. बरेचदा असा अमेरिकी शब्द एका अक्षराने कमी असतो. कोड्यातील रिकाम्या चौकटीची संख्या आणि शब्दाची अक्षरसंख्या तंतोतंत जुळावी लागते. त्यामुळे दर्जेदार कोडेनिर्माते कोडयाखाली महत्वाची तळटीप देतात, की त्यातले शब्द या दोनपैकी कोणत्या शब्द्कोशानुसार निवडले आहेत. तसे न दिल्यास कोडे सोडविणाऱ्याची कधीकधी चिडचिड होऊ शकते. उदा. ‘चित्रपटगृह’ असे शोधसूत्र असल्यास त्याचे उत्तर theatre का theater असा संभ्रम होतो आणि त्या बदलाचा अन्य उभ्या/आडव्या शब्दशोधावर देखील परिणाम होतो. या शब्द्शोधाचा सुरवातीस एक महत्वाचा फायदा होतो. तो म्हणजे काही प्रसिद्ध विशेषनामांची स्पेलिंग्स आपली पाठ होतात. बऱ्याचदा आपला गैरसमज असतो की आपल्याला ती बरोब्बर माहिती आहेत. पण काही वेळेस तसे नसते आणि इथल्या काटेकोर शब्दसंख्येमुळे आपण गंडतो. स्वानुभावातले उदाहरण देतो. समजा एखादे उत्तर ‘स्वीडन’ हा देश आहे. आपल्या मराठी उच्चारपद्धतीनुसार आपण पटकन ते Sweeden असे करायला जातो आणि चुकतोच. त्या शब्दात ee नसून फक्त एक e आहे हे मला कोडी सोडवितानाच पाठ झाले. मग मी त्या शब्दाचा उच्चार मनातल्या मनात ‘स्वेडन’ असाच पाठ केला. इंग्लीश बोलीभाषेतील शब्द शिकणे हा अजून एक फायदा मला झाला. त्यातले काही तर इतके गोड होते की त्यांच्या प्रेमातच पडायला झाले. त्याचे हे एक उदाहरण. शोधसूत्र असे होते: ‘क्रिकेटच्या एका डावात भरपूर झेल सोडलेला खेळाडू’. उत्तराची अक्षरसंख्या आहे तब्बल १३. आता इथे आपले सामन्यज्ञान किंवा शब्दकोश फारसा कमी येत नाही. लाक्षणिक अर्थाने हा शब्द योजलेला आहे. त्याचे उत्तर आहे : ‘butterfingers’ ! लेखात वर या कोड्यांचे खास विषय दिलेले आहेत. त्यातील अनेक प्रांतातले माझे सामान्यज्ञान हळूहळू वाढत गेले. एकंदरीत या कोड्यांतील विहार म्हणजे युरोप-अमेरिकेची बसल्याबसल्या सांस्कृतिक सफर असते. त्यांच्या पौराणिक, ऐतिहासिक, देव-दैत्यविषयक, कलाविष्कार आणि गाजलेले लेखक/ कलाकार अशा अनेकविध प्रांतातील विशेषनामे आपल्याला माहिती होतात. त्यांच्या विशिष्ट नद्या आणि पर्वतांची नावे इथे वारंवार विचारलेली असतात. इंग्लीश भाषेबाबत आपल्याला ब्रिटीश व अमेरिकी वैशिष्ट्ये आणि भेद माहित असतात. पण कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड इथल्या बोलींतील काही खास शब्दसमूह हे तसे अपरिचित. तेही आपल्याला कोड्यांत भेटतात. जशा आपल्या मराठीच्या विविध बोली तशाच त्यांच्याही. काही कोड्यांतून असे काही खास शब्दसमूह मिळाले की ते माझ्या लेखनाचे विषय ठरले. एका साप्ताहिक कोड्यातील शोधसूत्र होते : “ अपहरणकर्ते आणि ओलीस यांच्यातील प्रेमभावना”. त्याचे उत्तर आहे ‘स्टॉकहोम सिंड्रोम.’ मग उत्सुकतेने या रंजक विषयावर उत्खनन केले आणि लेख लिहीला. (https://misalpav.com/node/43940). अशा प्रकारे दैनिकात नेहमीच्या वारी असणारी सामान्य कोडी मी बराच काळ सोडविली. जेव्हा त्यातले ७०% शब्द सुटू लागले तेव्हा मग हळूच रविवारच्या महाकठीण कोड्यास हात घातला. सुरवातीस पदरी पडले ते फक्त नैराश्य ! अगदी समानार्थी कोश जवळ घेऊन बसले तरी फारसा उपयोग नसायचा. कारण एखाद्या शब्दाचे पन्नासेक पर्यंत समानार्थी शब्द असायचे आणि त्यातला एकच कोड्यातील उभ्या-आडव्या जुळणीत फिट बसणार असायचा. ही दमछाक जबरदस्त असते. कोड्यातील विशेषनामे ओळखायची सूत्रे देखील महाकठीण. कुठल्यातरी अतिप्राचीन ग्रंथांचे लेखक अथवा चित्रकारांची नावे विचारलेली. त्यामुळे पहिले ६ महिने मी साप्ताहिक कोडे अगदी ५% सुटले तरी धन्य मानायचो. यानिमित्ताने एक खूप जुनी आठवण जागी झाली. १९८०च्या दशकांत पेपरात साप्ताहिक कोड्याचे २ भाग करून त्यांच्यामध्ये दोन रेघा मारल्या असत. त्या रेघांच्या मधोमध ‘कॉफी टाईम’ असे लिहिलेले असे ! तेव्हाचे काही दर्दी लोक मी कोड्याचे दरम्यान खरेच चहा पिताना पाहिले आहेत. यावरून त्यातून होणारी मेंदूची थकावट लक्षात यावी. आता मला मराठी व इंग्लीश कोड्यांचा बौद्धिक व्यायाम करीत दोन दशके झाली आहेत. तेव्हा मीच माझा परीक्षक बनून गुण द्यायचे ठरवल्यास काय चित्र आहे? मराठी कोड्याचे बाबतीत सरासरी ९५% कोडे सुटणार याची खात्री वाटते. चौकटीवाले दैनिक कोडे मी ७ मिनिटांत तर साप्ताहिक महाकोडे २० मिनिटांत हातावेगळे करू शकतो. हाच आत्मविश्वास इंग्लीश कोड्याचे नाव काढताच काहीसा डळमळीत होतो. इथे दैनिक कोडे ७०% पर्यंत तर साप्ताहिक ३०% पर्यंत अशी ही गुणतालिका आहे. सोडवायचा वेळ अर्थातच मराठीच्या २-३ पट अधिक असतो. यावर थोडे आत्मविश्लेषण केल्यास त्याचे स्पष्टीकरण मिळते. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने आपली ‘आतड्याची’ भाषा असते. आपल्या जन्मापासून ती आपण विविध रूपांत आणि बोलींत सतत ऐकतो आणि हवी तशी फिरवून आणि वाकवून वापरतो. आपली आपणच ती छान शिकत जातो. मग का नाही त्यावर ठराविक प्रभुत्व येणार? मात्र इंग्लिशचे तसे नाही. व्यवहाराची आणि पोटापाण्याच्या उद्योगाची भाषा म्हणून ती आपल्याला ‘शिकवली’ जाते. तिच्या जागतिक बोली तसेच अनेक पैलू हे आपण अंतरातून आत्मसात करण्यात खूप कमी पडतो. मी हे निव्वळ स्व-निरक्षण म्हणून नोंदवले आहे; त्याबद्दल अजिबात खंत नाही. गूढ इंग्लीश कोड्यांना अजून कधी हातही लावलेला नाही आणि तो लावून मेंदूला अतिरिक्त ताण द्याचीही अजिबात इच्छा नाही ! आता चौकटी-कोडी सोडून इंग्लीशमधल्या अन्य एका प्रकाराकडे वळतो. त्याचे नाव आहे ‘Anagram’. हा एक अनोखा आणि मेंदूला वेगळ्या प्रकारची चालना देणारा शब्दखेळ आहे. यात ५ पासून ९ पर्यंत सुटी अक्षरे दिली असतात. आता ती योग्य क्रमाने जुळवून अनेक किमान ४ अक्षरी अर्थपूर्ण शब्द करायचे असतात. तसेच प्रत्येक शब्दात एक ठराविक अक्षर हे सक्तीने घ्यायचे असते. जास्तीत जास्त किती शब्द होऊ शकतात त्याचा आकडा जाहीर केलेला असतो. आपण जितके शब्द करू त्या प्रमाणात आपल्याला उत्कृष्ट/मध्यम/साधारण अशी श्रेणी मिळते. साधारणपणे एकूण ९ अक्षरांचे कोडे हे प्रमाण मानले जाते. त्यापासून शब्द तयार करताना किमान एक शब्द ९ अक्षरी लागतो आणि बाकीचे अर्थात किमान ४ अक्षरी. कोड्याचे अन्य काही उपनियम असतात. जसे की एखाद्या नामास s किंवा क्रियापदास s /ed असे लावून केलेले शब्द चालत नाहीत. कोडे सोडवायला घेतले की ४ अक्षरी शब्द पटापट जमतात पण अधिक अक्षरी शब्द करताना आपला कस लागतो आणि तो सर्वात जास्त अर्थात ९ अक्षरीच्या बाबतीत. हा मोठा शब्द आपण ऐकलेला आहे की नाही त्यावर आपली अक्षरांशी झटापट किती वेळ होणार हे ठरते. हे कोडे एका बैठकीत हातावेगळे करायचे नसतेच. आरामात दिवसभर पुरवता येते. असेच एके दिवशी मला ९ अक्षरी शब्दाने दिवसभर रडवले होते. जाम जमत नव्हता. दिलेली अक्षरे होती : a p c d h e y m r . दिवसभर काम करता करता मध्येमध्ये खूप प्रयत्न करून झाला होता. संध्याकाळी फिरून आलो, व्यायाम केला आणि बाजारहाटही झाला. डोक्यात सारखे ते ‘नवग्रह’ फिरत होते पण त्यांचा योग्य क्रम काही सुचेना. एव्हाना जवळपास १२ कागद खरडून खर्ची पडले होते. रात्रीचे १० वाजले. अखेरचा प्रयत्न म्हणून ती अक्षरे जुळवली आणि हा शब्द तयार झाला: Pachyderm. तो मी कधी ऐकला नव्हता पण आता याहून डोळ्यांना बरा वाटेल असा अक्षरक्रम होणार नाही याची खात्री वाटली. हा शब्द काहीतरी जीवशास्त्रातील आहे असे मनोमन वाटले. मग उघडला शब्दकोश आणि काय ! होय, तो अधिकृत शब्द निघाला. त्याचा अर्थ ‘हत्ती’ ! हत्ती म्हणजे elephant इतकेच माझे ज्ञान होते. आज त्यात फारच मोलाची भर पडली होती. तेव्हा मी घरी एकटाच होतो. झालेल्या आनंदाने अक्षरशः पागल झालो आणि संगीत लावून १० मिनिटे चक्क नाचलो ! अथक प्रयत्नांती हा शब्द आल्याने झालेला आनंद अवर्णनीय होता हे काय सांगायला पाहिजे? यानंतर गेल्या १० वर्षांत असे अनेक शब्द सुटल्याचा आनंद मी अनेकदा घेतला आहे. असेच एकदा इंग्लीश पेपरात हत्तींच्या फोटोखाली pachyderm शब्द वाचनात आला आणि त्यामुळे पूर्वीचा आनंद द्विगुणीत झाला. अशी कोडी सोडवताना इंग्लिशचा गणिती तत्वाने अभ्यास होत राहतो. म्हणजे, कुठल्या अक्षरानंतर कुठले ‘चालते’ किंवा नाही, sion/ tion /qu/ sh/ th ....इत्यादी अक्षरसमूह वारंवार हाताळले जातात. Anagrams चा एक विस्तारित प्रकार म्हणजे एखाद्या शब्दसमूह किंवा वाक्यापासून अक्षरक्रम बदलून नवा समूह तयार करणे. यात मूळचा समूह अर्थपूर्ण असतोच. नवा समूह होईल तो अर्थपूर्ण किंवा बरेचदा विचित्र अर्थाचा तयार केला जातो. दोन मजेदार उदाहरणे देतो: १. मूळ शब्दसमूह आहे : New York Times आता त्याचा हा anagram : Monkeys write ! २. मूळ शब्दसमूह : mother in law त्याचा हा anagram : woman Hitler !! ( सर्व ज्येष्ठ भगिनींनी हलकेच घेणे हेवेसांनल ! ) या रोचक विषयावर नंतर जालावर माहिती वाचली. Anagrams हा युरोपीय भाषांतला फार जुना शब्दखेळ आहे. पूर्वीच्या राजांच्या पदरी काही कुशाग्र बुद्धीची माणसे Anagramers म्हणून नेमलेली असत. त्यांनी वरीलप्रमाणे विविध मनोरंजक शब्द राजाकडे सादर करायचे असत. त्याचा त्यांना उच्च मोबदला मिळत असे. आजच्या उद्योग जगतातही असे काही बुद्धिमान लोक कंपनीचे सल्लागार म्हणून काम करतात. एखाद्या उत्पादनाला जरा हटके मुद्रानाम शोधणे हे त्यांचे काम असते. त्यासाठी सामान्य शब्द घेऊन त्यांपासून मजेदार Anagrams ते तयार करतात. एक सोपे उदा. देतो. ‘टोयोटा’ कार्सचे जे ‘Camry’ मॉडेल आहे ते चक्क एक Anagram आहे. त्याचा मूळ जपानी शब्द ‘कानमुरी’ आहे खरा, पण जेव्हा ‘Camry’ इंग्लिशमध्ये लिहीले जाते तेव्हा तो my car चा Anagram आहे ! सहज एकदा विचार केला की मराठीत हा खेळ आणता येईल का? तसा अवघड आहे कारण आपल्या अक्षरांना असलेल्या काना, मात्रा, उकार, वेलांटी इत्यादी. तरीही करायचेच झाल्यास ‘वरद तळवलकर’ सारखे निव्वळ मूळाक्षर असलेले शब्द घ्यावे लागतील. इंग्लीश कोड्यांची विविधता मराठीपेक्षा अधिक आहे. त्यांचे जालावर देखील नवनवे शब्दखेळ उपलब्ध असतात. मी या लेखात वर्णन केलेल्या कोड्यांपुरते मला सीमित ठेवलेले आहे. ही पातळी आनंद आणि समाधानाची आहे. याहून अधिक कोड्यांत बागडून ‘कोडे-किडा’ होण्याची इच्छा नाही ! शब्द्कोड्यांचा छंद आपल्याला छान रिझवतो. वेळप्रसंगी आपल्या एकटेपणात तो सुरेख साथ देतो; आपले विचार भरकटण्यापासूनही वाचवतो. कोडे सोडवायला बसताना बाजूस आपले आवडते संगीत मंद आवाजात लावून ठेवायचे, बस्स ! मग शब्द पटापट सुटत जाणे हा स्वर्गीय आनंद असतो. जर एखाद्या कुटुंबात एकत्रितपणे कोडे सोडवायला घेतले तरी त्याची सामूहिक मजा काही औरच असते. आजपर्यंतच्या माझ्या या दीर्घ शब्दप्रवासात शिकलेले नवे विशिष्ट शब्द मी वहीत नोंदवून ठेवतो. असे म्हणतात की प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. जेव्हा मी माझी ती शब्दवही कधी उघडून बघतो तेव्हा त्यातील एकेक शब्द माझे सुरेख स्मरणरंजन करतो. कुठल्या शब्दाने तो सुटत नसताना आपले किती डोके खाल्ले होते याच्या आठवणी आता सुखद वाटतात. कुटुंबापासून एकटे राहण्याच्या परिस्थितीत मी हा छंद स्वीकारला. त्यातून गवसलेल्या हजारभर शब्दांची सोबत आता आयुष्यभर पुरणार आहे. ****** ********************************************** समाप्त.

वाचने 41520 वाचनखूण प्रतिक्रिया 58

स्मिताके 19/12/2019 - 21:23
नेहमीप्रमाणे छान माहितीपूर्ण आणि रंजक लेख. एक चांगला छंद अनेक वर्षे जोपासून त्यात प्राविण्य मिळवण्याच्या आपल्या चिकाटीला सलाम!

मारवा 19/12/2019 - 21:31
तुमचे लेख वाचुन मला आवडलेल्या काही रोचक शब्दांवर लेख लिहिण्याची इच्छा वाढत चालली आहे. कधी कधी काही शब्द जरी नेहमीचे असले तरी त्याचे वापर प्रांतागणिक बदलतात यात खुप मजा असते. तुमचे शब्दप्रेम लोभसवाणे आहे.

In reply to by मारवा

हेमंतकुमार 20/12/2019 - 08:07
मु वि, याही भागातील उद्घाटन प्रतिसादाबद्दल आभार ! खेळातील पहिली धाव खूप महत्वाची असते ! स्मिताके, प्रोत्साहनाबद्दल आभार . मारवा, रोचक शब्दांवरील लेख जरूर लिहा. प्रतीक्षेत !

कंजूस 20/12/2019 - 06:20
नेहमीप्रमाणे छान माहितीपूर्ण आणि रंजक लेख. +१ __________ तुमचे इंग्रजी कोड्यांचे उपाय वाचून सुचलं की कोडं आणि त्याचं उत्तर असे एका पिडीएफमध्ये* एका पानावर कोडे आणि दुसऱ्या पानावर उत्तर असं मोबाईलमध्ये साठवायचे. प्रश्न आणि उत्तर लगेच पाहायचे. हे सोपेही पडेल आणि प्रवासात कामाला येईल. निरनिराळ्या विषयावरचे प्रश्न असतात आणि ते आपल्या बटरफिंगर्समधून निसटणारच आहेत तर धडपड कशाला करायची! गंमत चालू ठेवायची. *- फोटो काढायचे कोडे आणि उत्तराचे आणि एप वापरून पिडीएफ करायची. दोन्ही एकाच पिडीएफमध्ये येणार.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 20/12/2019 - 08:13
जॉन, स्क्रीबल फक्त लांबून पाहिले आहे ! तुम्ही लिहा ना एखादा परिच्छेद त्यावर. शेखर, बराच काळ तुम्ही लुप्त होतात. तुमच्या भेटीने कोडे पूर्ण सुटण्याइतकाच आनंद झालेला आहे ! कंजूस, तुम्ही सुचवलेल्या तांत्रिक युक्त्या रोचक आहेत. छान !

मात्र कोड्यातील इतर जे प्रांत आहेत त्यात आपण जेमतेम रांगणारे बाळ आहोत !
हे आवडले. थिएटर आणि बटरफिंगर्स आवडली. झेल सोडणार्‍याला चिकनफार्मर असेही म्हणतात. मराठीत आम्ही कोंबडीपकड म्हणत असू. हत्ती आवडलाच. १ आणि २ असे दोन्ही अ‍ॅनाग्राम्स सुरेख.
ही पातळी आनंद आणि समाधानाची आहे. याहून अधिक कोड्यांत बागडून ‘कोडे-किडा’ होण्याची इच्छा नाही !
ही पातळी अत्युच्च समाधानाची आहे. त्याबद्दल अभिनंदन. फारच थोड्यांना हे जमते. दोन चित्रातील फरक ओळखा इ. छोट्यांची कोडी पण आनंद देऊन जातात. एखादे गाणे कोणत्या शास्त्रीय संगीतातल्या रागावर आधारित आहे हे ओळखणे या गोष्टी पण असाच निर्भेळ आनंद देऊन जातात. या सर्वातला आनंद कळला की मग आपण किरकोळ राजकारण, डावपेच, शह-काटशह यापासून दूर होतो आणि आयुष्यच सुंदर बनून जाते. या नितांतसुंदर लेखद्वयाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

गणेशा 20/12/2019 - 08:46
अप्रतिम.. मस्त. पण इंग्लिश कोडे अवघड आहे.. तुम्ही सुंदर लिहिले आहे.. असेच लिहीत रहा... वाचत आहे..

मनो 20/12/2019 - 09:10
माझ्या आजोबांना मराठी कोडी सोडवण्याचा फार नाद होता. त्याकाळी म्हणजे १९८० च्या दशकात मासिकातून येणारी कोडी सोडवण्यासाठी बक्षिसे असत. त्यातल्या त्यात थोडेफार चावट म्हणून प्रसिद्ध असलेले 'जत्रा' मासिक, विशेषतः त्याचा दिवाळी अंक यात येणारे कोडे बहुतेक मोठ्या बक्षीसाचे असावे. आजोबांना त्यात गती असल्यानं बहुदा बरीच बक्षिसे मिळतही असावीत. त्यामुळे कोड्याच्या निमित्ताने ते अंक घरात येत. तसेच बाकी मजकूर पाहून आपण घेणार नाही असे पेपर, मासिके कोड्यांसाठी घरात येत - 'दक्षता', पोलीस टाइम्स अशी काही नावे आता आठवतात. एकदा कोडी सोडवून झाली की जुने अंक आम्हा लहान मुलांच्या हातात लागत. त्या लेखामधील बरेच काही कळायचे ते वय नव्हते, पण त्या लेखांचे आणि शब्दांचे अर्थ कुणाला विचारण्याची हिम्मत होत नसे हे ही खरे. तुमच्या लेखामुळे त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या, धन्यवाद, असेच लिहीत रहा.

हेमंतकुमार 20/12/2019 - 10:15
सुधीर,चिकनफार्मर असेही म्हणतात. मराठीत कोंबडीपकड म्हणत असू. >>>> चिकणे शब्द ! •
एखादे गाणे कोणत्या शास्त्रीय संगीतातल्या रागावर आधारित आहे हे ओळखणे या गोष्टी पण असाच निर्भेळ आनंद देऊन जातात. ......आणि आयुष्यच सुंदर बनून जाते.
>>>> क्या बात है ! गणेशा, मराठीपेक्षा इंग्लिश कोडे अवघड हे मान्यच. मनो,
बाकी मजकूर पाहून आपण घेणार नाही असे पेपर, मासिके कोड्यांसाठी घरात येत –
>>>>> अगदी ! रोचक आठवणी

हेमंतकुमार 20/12/2019 - 12:18
वामन, धन्यवाद. .................... या विषयाचे सादरीकरण मुद्दाम २ भागांत ( मराठी व इंग्लिश कोडी) केले होते. ज्यांना लेख आवडले असतील त्यांनी या दोनपैकी कोणता भाग अधिक भावला, हे सांगितल्यास आभारी होईन. (आत्मपरीक्षण हा हेतू).

कंजूस 20/12/2019 - 13:46
दोनपैकी कोणता भाग अधिक भावला, >> दोन्हीही. छंदासाठी, पुस्तकवाचनासाठी कुणीतरी वेळीच डिवचावे लागते. अरेच्चा अशीही गंमत असते काय? आणि मग ती आपण करून बघतो. आयुष्यात जेवढ्या लहानपणी डिवचलो जाऊ तेवढे चांगले. नाही जमलं तर सोडून देतो पण वेळ निघून गेल्यावर पिपाण्या वाजवण्यात शिकण्यात गंमत निघून जाते. आता ते का तुम्ही केलेत. छान.

इंग्रजी कोड्यांच्या वाट्याला जायची कधी हिम्मत झाली नाही. पण स्क्रॅबल मात्र भरपुर खेळलो आहे. मी आणि माझा लहान भाउ डिक्षनरी घेउन बसायचो स्क्रॅबल खेळायला. मोबाईल वर एक हॅगमॅन नावाचा गेम होता तो पण खेळायला मजा यायची. पैजारबुवा,

हेमंतकुमार 20/12/2019 - 14:52
वामन, बरोबर. मराठीचा भाग लिहिताना आत्मीयता जरा जास्तच राहते. कंजूस, अगदी बरोबर. सहमत. ज्ञा पै , अनुभव आवडले. इंग्लीशच्या नादी लागण्याअही माझाही एक पाय मागे ओढला जात होता !

हेमंतकुमार 20/12/2019 - 19:31
गा पै, छान ! Anagram ला ‘विपर्ययी नवशब्द’ असे नाव मी भाषातज्ञांच्या लेखात वाचले होते. ..... बघूया आता १-२ मोठे मराठी शब्द जमतात का.

श्वेता२४ 20/12/2019 - 20:57
तुमचे दोन्ही भाग चांगले आहेत. खरं तर तुमच्या सगळेच लेखन हे अतिशय दर्जेदार लेखना पैकी आहे असे म्हणले गेले पाहिजे .तुमचे सर्वच लेख माहितीपूर्ण व सर्वांना समजेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत असतात. तुमच्या सर्वच लेखांची मी पंखा आहे. मी इंग्रजी शब्द कोड्यांच्या वाट्याला फारशी गेलेली नाही .तरीही हा भाग आवडला.

वामन देशमुख 20/12/2019 - 21:09
दोन्ही लेख एकेकाळच्या रम्य विश्वात घेऊन गेले. लहानपणी लोकसत्ता,लोकमत, तरुण भारत, मार्मिक, चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ नंतरच्या काळात पुण्यनगरी, मुंबई चौफेर अश्या अनेक वृत्तपत्रांमध्ये कोडे मी सोडवायचो. In fact, आज कोण शब्दकोडे सोडवणार यावरून आम्हा भावंडांमध्ये वादंग व्हायचं. मामांकडे, काकांकडे गेल्यानंतर त्यांच्याइथले जुने पेपर्स शोधून काढून त्यातले शब्दकोडे आम्ही सोडवायचो. अर्थात हे सगळं मराठीपुरतंच मर्यादित होतं. त्याकाळात चित्रलेखा वृत्त समूहाचं "जी" ह्या नावाचं मराठी फिल्मी मासिक यायचं. त्यात सिनेमासंबंधी शब्दकोडी असायची. ती आम्ही सोडवायचो. शब्दकोड्यांमुळे शब्दसंपत्ती वाढायला खरंच खूप हातभार लागला. कधीकधी गंमतीनं, शब्दकोड्यांना मी शब्दकोंडा म्हणतो. म्हणजे,ज्याप्रमाणे काळा केसांमध्ये पांढरा कोंडा असतो त्याप्रमाणे काळ्या चौकटींच्या दरम्यान कोंड्यासारखे शब्द पसरलेले असतात!

हेमंतकुमार 21/12/2019 - 07:56
श्वेता, तुमच्यासारख्या अभ्यासू वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच लेखनातील सातत्य राहते. धन्यवाद. वामन, शब्दकोंडा >>>>> मस्तच !
भावंडांतील वादंग
>>> माझ्या माहितीतील एक एकत्र कुटुंब आहे. तिथे २ वेगळे मराठी व १ इंग्लिश दैनिके घेतात. दोन्ही मराठीत कोडी असतात. त्या दोघांची सक्त विभागणी झालेली आहे – एक आजोबांचे व दुसरे आजीचे. एखादे वेळीस जर आजोबांनी चुकून आजीच्या पेपरातले कोडे सोडवून ठेवले, तर मग त्या दिवशी त्यांचे काही खरे नसते !

जॉनविक्क 22/12/2019 - 20:36
जॉन, स्क्रीबल फक्त लांबून पाहिले आहे ! तुम्ही लिहा ना एखादा परिच्छेद त्यावर.
कसे खेळावे ते नियम जालावर आहेतच. सोळाव्या वर्षी मला हट्टी मुलगा म्हणून मानसोपचार तज्ञाकडे समुपदेशनाला न्हेण्यात आले होते तेथे त्याने माझ्याशी गप्पा मारायला हा खेळ बाहेर काढला, इंग्रजीचा इ सुद्धा ओळखीचा नसल्याने जाम गडबडलो होतो पण अर्धा तास म्हणता म्हणता दीड तास कसा गेला ते कळले नाही मला विशेष आवड वा नावडही नंतर निर्माण झाली नाही पण HIGHLY INTELECTUAL PERSON असे इंप्रेशन जमा करायला हा खेळ मी विकत घेतला व समोरच्याला खेळायला बसायलाही भाग पाडायचो :)

हेमंतकुमार 23/12/2019 - 17:24
* कोड्याचे उत्तर : लांबलचक कंटाळा आणणारे भाषण >>>> लापणिका जॉन, पूरक माहितीसाठी आभार !

हेमंतकुमार 03/01/2020 - 11:32
इंग्लिश कोड्यांत आपल्याला गंडवणारी एक शब्दजोडी आहे : salon & saloon . आपण बहुतेक दोघांचा उच्चार 'सलून' असाच करतो व त्यानुसार स्पेलिंग करायला जातो. आता दोन्हीच्या अर्थातला फरक पहा. salon - दुकान किंवा प्रदर्शनाची खोली. saloon - मद्यविक्री आणि मद्यपानाचे ठिकाण !

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 06/01/2020 - 03:29
कटिंग सलून माहीत आहे. ज्या प्रमाणे चहा ३/४ करून कटिंग चहा होतो त्याप्रमाणे पेग ३/४ (कटिंग) करून "बार" ला देखील कटिंग सलून म्हणता येईल काय? :))

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 06/01/2020 - 18:03
कुमारेक, salon शब्द ओळखीचा वाटला म्हणून जाळ्यावर धुंडाळला तर तो फ्रेंच निघाला : https://en.wikipedia.org/wiki/Salon_(gathering) याचा उच्चार सॅलाँ होतो व याचा अर्थ काहीएका उद्दिष्टाने एखाद्या खोलीत जमलेली लोकं असा होतो. हा अर्थ लॅटिन वरनं आलेला असावा. भारतात आपण ज्याला नमाज म्हणतो त्याला अरबी मध्ये सलाह म्हणतात. त्यातही एका विशिष्ट हेतूने जमलेला माणसांचा जमाव असाच अर्थ अभिप्रेत आहे. अरबी व लॅटिन शब्दांत असं साम्य सापडावे हे नवल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 06/01/2020 - 19:19
उपयुक्त माहिती, धन्यवाद. अरबी व लॅटिन शब्दांत असं साम्य >>>> होय, आहेत अशी काही उदा. हे एक थोडे वेगळे बघा: music आणि मौसीकी ( उर्दू)

In reply to by हेमंतकुमार

>>saloon - मद्यविक्री आणि मद्यपानाचे ठिकाण ! अरेच्चा आता समजले बर्याच काऊ बॉय टाईप वेस्टर्न चित्रपटात संभाषणात उल्लेख असायचा कि मी अमुक अमुक गावी सलून मध्ये गेलो तेव्हा त्या काऊबॉयची वेशभूशा पाहुन मला वाटायचे तो दाढी करायला गेला असावा व त्या सलून मध्ये दारू वगैरेही मिळत असावी असे काहीसे. पण आता योग्य अर्थ वाचुन उलगडा झाला.

In reply to by हेमंतकुमार

बोका 18/01/2022 - 11:21
भारतीया रेल्वे च्या खास अधिकार्यांसाठी असलेल्या डब्यांना सुद्धा सलून म्हणतात. आता प्रवासी सुद्ध आरक्षण करु शकतात. https://twitter.com/IRCTCofficial/status/1066552661716201472?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1066552661716201472%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.ndtv.com%2Fbusiness%2Firctc-saloon-coach-ticket-prices-routes-schedule-of-railway-home-on-wheels-in-pictures-1953589 image

In reply to by हेमंतकुमार

बोका 18/01/2022 - 11:22
भारतीया रेल्वे च्या खास अधिकार्यांसाठी असलेल्या डब्यांना सुद्धा सलून म्हणतात. आता प्रवासी सुद्ध आरक्षण करु शकतात. https://twitter.com/IRCTCofficial/status/1066552661716201472?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1066552661716201472%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.ndtv.com%2Fbusiness%2Firctc-saloon-coach-ticket-prices-routes-schedule-of-railway-home-on-wheels-in-pictures-1953589 image

Nitin Palkar 03/01/2020 - 14:49
दोन्ही लेख आवडले तरीही पहिला अधिक आवडला कारण मराठी नाळ. मी स्वतः शब्द कोड्यांचा बऱ्यापैकी छंदिष्ट आहे. सुडोकुचीही आवड आहे. महानगर मधील शनिवारचे महा शब्द कोडे आम्ही काही मित्र शर्यत लावून सोडवत असू. चित्रलेखा साप्ताहिकातिल शब्द कोडे सोडवून दोन वेळा बक्षीसही मिळाले आहे... सुडोकू सारखी कोडी सोडवून logical thinking सुधारते असं मला वाटतं. गमतीची एक वैयक्तिक गोष्ट सांगावीशी वाटते.... शब्द कोडे सोडवण्याची आवड बायकोलाही आहे. वयाच्या पंचावन्न नंतर(तिच्या) अलीकडेच तिला सुडोकू सोडवण्यातली गंमत समजावून सांगितली आणि आता तीही आनंदाने सुडोकू सोडवत असते. हे दोन्ही लेख अंमळ उशिरा वाचले गेले. अशाच रोचक लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.

हेमंतकुमार 07/01/2020 - 08:14
अ आ, धन्यवाद ! तुमचे चलतचित्र सुरेख आहे. अथांग जालसागरात डुबकी मारून तुम्ही जे अनुरूप चित्र शोधून काढता, त्याबद्दल कौतुक वाटते. म्हणतात ना, की एका चित्रातून १००० शब्दांचा आशय व्यक्त होतो. याची प्रचिती तुमचे चित्र नक्कीच देते. जर एखाद्या वाचकाने तुमचे चित्र आधी पाहिले तर मग त्याने हा लेख वाचला नाही तरी चालेल ! ☺️

हेमंतकुमार 07/01/2020 - 15:28
इंग्लिश कोड्यांत काही रंजक वाक्प्रचार वारंवार येतात. त्यांचे मूळ युरोपच्या इतिहासात आहे. तेव्हा इंग्रजांचे आजूबाजूच्या देशांशी वैर होते; त्यातल्या काहींशी तर त्यांची युद्धे झाली. त्यामुळे इंग्लिश माणूस टीका करताना किंवा नकारात्मक / कुत्सित बोलताना त्या देशांची नावे असलेले वाक्प्रचार वापरतो. अशा काहींचा परिचय करून देत आहे. आता Dutch चा वापर असलेले २ बघू. १. Go Dutch : जेव्हा एखाद्या समूहाने केलेला खर्च सर्वांनी वाटून घ्यायचा असतो तेव्हा असे म्हणतात. २. double Dutch : जेव्हा एखादा मूर्खासारखी बडबड करत असतो, तेव्हा He just speaks “double Dutch“ !

हेमंतकुमार 08/01/2020 - 11:15
आता फ्रेंचांना उद्देशून असलेले वाक्प्रचार पाहू: १. French leave : याचा मूळ अर्थ असा. जेव्हा समारंभाला आलेला एखादा पाहुणा यजमानांचा निरोप न घेताच निघून जातो तेव्हा असे म्हणतात. पुढे कालौघात असा अर्थ झाला. 'विना परवानगी कामावर सुटी घेणे" = दांडी मारणे ! २. French shower: स्वच्छ अंघोळ करण्याऐवजी अंगावर सुगंधी फवारा मारून काम भागवणे.

हेमंतकुमार 27/03/2020 - 09:45
सध्या छापील पेपर बंद आहेत. सक्तीच्या स्थानबद्धतेमुळे कोड्यांची गरज अजूनच वाढली आहे. म्हणून मग जालावरच्या क्रॉसवर्ड्सकडे वळलो. टिचकी मारून सोडवायची पद्धत छान असते, पण सतत पडद्याकडे पहावे लागल्याने डोळ्यांना ताण येतो. एका कोड्यात एक छान इंग्लीश वाक्प्रचार मिळाला. शोधसूत्र होते : प्रेमपत्रातील खास शब्द. उत्तरासाठी तब्बल १५ जागा सोडलेल्या. चांगले आव्हान होते. प्रयत्न करता आधी शेवटची ४ अक्षरे जमली ‘kiss’. मग एकदम उत्साह संचारला ! इतर शब्द जुळवत शेवटी उत्तर गावले : Sealed with a kiss . मस्तच ! प्रथमच ऐकला. इंग्लीश जगतात याला SWAK असे लघुरूप आहे. काही वेळेस अशा पत्रावर बाहेरून लिपस्टिकची खूण उमटवली जाते !

हेमंतकुमार 03/04/2020 - 11:39
काही खेळांच्या सामन्यांत जेव्हा एखादा खेळाडू असामान्य कामगिरी करतो, त्याचे वर्णन करण्यासाठी काही खास वाक्प्रचार आहेत. ते कोड्यातून समजले. ते मनोरंजक वाटले. हे पाहा नमुने : १. बॉक्सिंग : punched the clock २. व्हॉलीबॉल : Spiked a drink ३. बेसबॉल : pitched a tent ४. फुटबॉल : Passed the butter

In reply to by हेमंतकुमार

१. बॉक्सिंग : punched the clock २. व्हॉलीबॉल : Spiked a drink ३. बेसबॉल : pitched a tent ४. फुटबॉल : Passed the butter या सर्व वाक्प्रचारांचा आणि खेळांचा काही संबंध नाही. विशेषतः #३. पिचिंग अ टेंट चा एक अर्थ अश्लील आहे.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

हेमंतकुमार 20/01/2022 - 09:12
संबंधित खेळाशी त्यांचा शब्दशः संबंध नाही हे बरोबर. ते लाक्षणिक अर्थाने बोलीभाषेत वापरले जातात. आपल्याकडचे एक उदाहरण देतो : समजा, एखाद्या फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघातील सर्व गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला असेल आणि भरपूर धावा काढल्या असतील ,तर आपण जसे म्हणतो की, त्याने गोलंदाजांना ‘तुडवले’, धुलाई केली, त्यांचा ‘कचरा केला’... इत्यादी. त्या धर्तीवर ते वाक्प्रचार आहेत

हेमंतकुमार 11/05/2020 - 12:30
दोन मजेदार शोधसूत्रे : १. ‘current problem?’ हे सूत्र होते. मी आपला करोना, कोविड, आर्थिक मंदी असे उत्तर शोधत बसलो. पण शेवटी सोडवताना उत्तर आले ‘short circuit’ ! २. ‘food processor’ साठी मी mixer, blender वगैरे शोधत बसलो. पण उत्तर आले ‘stomach’ ! .....यातूनच निखळ आनंद मिळतो.

हेमंतकुमार 30/06/2020 - 14:25
इंग्लीश क्रॉसवर्ड्सच्या उगमाबद्दलचा एक रोचक लेख इथे: मुळातील त्या खेळाचे नाव होते “FUN’s Word-Cross Puzzle.” पण नंतर छपाईतील चुकीने क्रॉसवर्ड असे झाले. पुढे तेच नाव कायम राहिले !

हेमंतकुमार 04/10/2021 - 11:22
सर्वात लांब असलेला इंग्लिश शब्द असा आहे. या मूळ ग्रीक शब्दात 175 अक्षरे असून त्याच्या इंग्लिश रूपांतरात 183 अक्षरे आहेत: Lopado­temacho­selacho­galeo­kranio­leipsano­drim­hypo­trimmato­silphio­karabo­melito­katakechy­meno­kichl­epi­kossypho­phatto­perister­alektryon­opte­kephallio­kigklo­peleio­lagoio­siraio­baphe­tragano­pterygon पण याचा अर्थ काय? तर हा एक खाद्यपदार्थ आहे , जो सोळा विविध घटक वापरून तयार केला जातो ! असा हा चित्रविचित्र शब्द सर्वात लांब म्हणून गिनिज बुकात नोंदलेला आहे. https://en.m.wikipedia.org/wiki/Lopado%C2%ADtemacho%C2%ADselacho%C2%ADgaleo%C2%ADkranio%C2%ADleipsano%C2%ADdrim%C2%ADhypo%C2%ADtrimmato%C2%ADsilphio%C2%ADkarabo%C2%ADmelito%C2%ADkatakechy%C2%ADmeno%C2%ADkichl%C2%ADepi%C2%ADkossypho%C2%ADphatto%C2%ADperister%C2%ADalektryon%C2%ADopte%C2%ADkephallio%C2%ADkigklo%C2%ADpeleio%C2%ADlagoio%C2%ADsiraio%C2%ADbaphe%C2%ADtragano%C2%ADpterygon

हेमंतकुमार 18/01/2022 - 10:57
ज्यांना ऑनलाइन इंग्लिश शब्दखेळ आवडतात त्यांच्यासाठी हा एक मस्त खेळ इथे आहे दररोज एक पाच अक्षरी शब्द ओळखायचा असतो. खेळण्याची प्रक्रिया खूप छान आहे. जरूर खेळुन बघा !

In reply to by हेमंतकुमार

बोका 18/01/2022 - 11:13
गेले पाच दिवस खेळत आहे. छान आहे. सध्या याची सोशल मिडिया वर हवा आहे.

हेमंतकुमार 29/01/2022 - 08:54
2021 हे वर्ष जागतिक स्तरावर कोविडमय होते. त्या काळात अमेरिकी संगणक अभियंता Josh Wardle आणि त्याची शब्दप्रेमी प्रेमिका पलक शाह यांनी मिळून Wordle हा खेळ विकसित केला. पुढे तो जालावर उपलब्ध झाला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. या खेळाची एक पुढची पायरी म्हणून या द्वयीने Absurdle या खेळाची निर्मिती केली. या दोन्ही खेळांची लोकप्रियता बघून अन्य लोकांनी त्या खेळासारखी काही प्रारूपे तयार केली. ती सुद्धा जालावर खेळण्यास उपलब्ध आहेत. ऑनलाइन इंग्लिश शब्दखेळांच्या विश्वातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यानिमित्ताने या सर्व खेळांची एकत्रित यादी इथे करून ठेवणे महत्त्वाचे वाटते. १. Wordle याची माहिती वरील प्रतिसादात आलीच आहे. २. Absurdle याची सर्व माहिती इथे मिळेल. ३. Primel : हा अंकप्रेमींसाठी असून त्यात पाच अंकी मूळ संख्या तयार करायची असते. (https://converged.yt/primel/) ४. Sweardle : हे चार शब्दांचे Wordle असून इथे फक्त बोलीभाषेतील उद्धट शब्दांचा वापर केला जातो. ५. Lewdle : या खेळात बोलीभाषेतील लैंगिक शब्दांचा वापर केला जातो. अशा तर्‍हेने एका सूत्रावर आधारित वरील प्रकारचे विविध खेळ जालावर उपलब्ध आहेत. प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे हवा तो खेळ निवडता येईल. धन्यवाद !