Skip to main content

सप्तपदीतलं वचन

प्रकाशित मुखपृष्ठ
सुरुवात कात्री शोधण्यापासून झाली होती, नेहमीच्या जागेवर मिळाली नाही, तिला विचारलं तर तिने आणून दिली. नेहमीची जागा बदलली होती तिने. नेलकटरचं पण तेच झालं. आणि मग लक्षात आलं खुप काही बदललयं. लग्न समारंभाचे धावपळीचे दिवस संपले आणि हळूहळू घर तिच्या सुरात गावू लागलं. आधी फक्त माझी सवय असलेल्या घरात ‘ती’ चा प्रवेश झाला होता. लग्नापुर्वी निदान वर्षभर तरी त्याच फ्लॅट मधे एकटा रहात होतो मी, त्यामुळे दैनंदिनी माझ्या मनाप्रमाणे चाले, मला हवं तेव्हा घरी पोहचणं असो, हवी तेव्हा बाथरूम टॉयलेट रिकामी असणं असो किंवा आणि काही, सब अपना राज. दुसऱ्या कोणासोबत आपली जागा, आपल्या वस्तू किंवा अगदी स्वतःला सुद्धा शेअर करणं तसं माहितचं नव्हतं मला. कठीण गेलं काही दिवस हे आंगवळणी पडणंं. तिलाही एका नविन व्यक्तिला आपल्या आयुष्यात स्थान देणं इतकचं नव्हे तर नविन जागा, नविन माणसं, नविन जबाबदाऱ्या निभवणं सोपं गेलं नसेल हा विचारही तेव्हा आला नव्हता. काहिच माहित नव्हतं एकमेकांबद्दल, आवडीनिवडी, स्वभाव, सवयी सगळचं अपरिचित. माझी माणसं-तुझी माणसं, तिच्याकडून माझ्या, माझ्याकडून तिच्या आणि आम्हा दोघांकडून इतर सगळ्यांच्या अपेक्षा, या गोंधळातून फारसं चांगलं काही निष्पन्न झालं नाही. म्हटलं तर खुप छोटा शब्द आहे ‘अपेक्षा’ पण आयुष्य व्यापून टाकतो. सगळ्या वादांच्या मुळाशी असते ती हिच, अपेक्षा. ‘अहो, ऐकलतं का?’ तिच्या हाकेने माझी विचारांची मालिका तुटली, आणि मी वर्तमानात आलो ’काय गं?’ ’काही नाही, असचं’ हल्ली हे असचं सुरू असतं आमचं, घरात दोघेचं असतो आता, मुलं आपापल्या कुटुंबासोबत नोकरीच्या ठिकाणी स्थायिक, घरी येणार एकतर दिवाळीत नाहितर आमच्या आजारपणात. नाही, तक्रार नाहीए काही त्यांच्या बद्दल, त्यांची इच्छा असूनही या शहरात नाही साध्य झाली त्यांची उद्दिष्ठं, मीही असाच नव्हतो का आलो या शहरात. बघा भरकटलो पुन्हा, तर हल्ली हे असचं सुरू असतं आमचं, शरीरंही थकलीत आता, डोळे दमलेत, वाचनही होत नाही सलग. टिव्ही किती बघणार? अंथरुणात पडून असतो जास्त वेळ, मधेच कधी डोळा लागला तर ती अशी हाक मारते, मी प्रतिसाद देतो जाग येवून तर कधी कधी मीही अशी हाक मारतो, खरं सांगू? आपल्या जोडीदाराला निपचिप पहुडलेला पाहून शंका येते उगाच मनात आणि त्याला आवाज देवून तो ‘असल्याची’ खात्री करून घेतली जाते आपसूकच. बरं वाटतं प्रतिसाद मिळाला की, जीव भांड्यात पडतो. आपल्या जोडीदाराचं फक्त ‘असणं’ देखील किती गरजेचं आहे ते आता या वयात कळलं. आता एकमेकांकडून इतर काहीच अपेक्षा नाहियेत उरलेल्या, फक्त सोबत असावी हिच एक इच्छा आणि अपेक्षा. मला आठवतयं अजून, लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस एकमेकांना जोखण्यात गेले. जोडीदार कसा आहे ते स्विकारण्यापेक्षा तो कसा असायला हवा याचीच प्रतिमा मनात तयार होत राहिली, सत्याकडे प्रतिमेची झापड लावलेल्या डोळ्यांनी बघतांना नकळत जोडीदारावर अन्यायच होत गेला आणि हे नातं फुलायला उशिर होत गेला. दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या, मला घरातचं बसून वाचन करायला आवडे तर तिला भटकायला, नाटक-सिनेमे हा तर तिचा विक पॉइंट त्यामुळे हा नेहमीचं वादाचा विषय राहिला. दोघांपासून सुरू झालेल्या या नात्यात कितीतरी वळणं येत गेलीत, काही गोष्टी आपसूक चालून आल्यात काहींचा हव्यास करून त्या मिळवल्यात. धावत राहिलो फक्त. फक्त दोघांसाठी अशी किती क्षण जगता आलीत? घर, मुलं, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळे काही जीवनात आलेत, प्रसंगी त्यांच्यावरून आपसात वादही झालेत, काही लगेच विरलेत, काहींनी आयुष्यभर पुरतील असे ओरखडे मागे ठेवलेत. झालेला प्रत्येक वार, अप्रत्यक्षरित्या दोघांच्या नात्यावरचं झाला, कधी त्याने नातं बळकट झालं आणि कधी भांबावून सुद्धा गेलं. सुरवात दोघांपासून आणि आता शेवटाला परत दोघंच मधे जे जे काही जीवनात आलं ते मृगजळ असावं तसं विरलय. सुखी होण्यासाठी म्हणून कधी एक एकट्याने कधी सोबतीने ज्या ज्या गोष्टींच्या मागे धावलो त्यांचा काही उपयोग आणि महत्वचं वाटेनासं झालयं आता. आज वाटतयं ‘आपण दोघं एकमेकांसाठी एकत्र आहोत हेच कारण जीवन आनंदात जगण्यासाठी पुरेसं आहे’. आज आयुष्याच्या संध्याकाळी मिळालेली ही समज जर सहजीवनाच्या सुरुवातीला कळली असती तर नातं अधिक फुललं असतं, गहिरं झालं असतं. कोणीतरी लिहिलयं, ‘तुम मसर्रत का कहो या इसे गम का रिश्ता, कहते हैं प्यार का रिश्ता हैं जनम का रिश्ता’ माझ्या प्रत्येक ‘अगं, ऐकतेस नां’ ला तिचा आणि तिच्याही ‘अहो, ऐकतायं नं’ ला माझा प्रतिसाद असतोच पण केव्हातरी असा एक क्षण येईल की दोघांपैकी कोणी एक प्रतिसाद देणार नाही आणि तो हक्क मलाच मिळावा, आता हिच काय ती अपेक्षा. सहजीवन जगतांना हा एक स्वार्थ जपलाय मी. आणि हो ती जर आधी गेली तर मात्र एक एक श्वास लवकर लवकर संपवून मीही जाईन तिच्याकडे, सप्तपदी मधे वचन दिलंय न तसं मी तिला. ( ‘चतुरंग’ लोकसत्ता मधे पुर्वप्रकाशीत )

याद्या 3680
प्रतिक्रिया 10

लेखनप्रकार

अतिशय आवडला आहे आणि वाचनखूण साठवली आहे. ... नाखु

लग्न झाल्या पासून मृत्यू पर्यंत एकत्र सुख दुखत राहणारे स्त्री पुरुष आता अस्तित्वात नाहीत . त्या मुळे फक्त कल्पनेत असे जोडपं असू शकत . जिथे लग्न च मान्य नाही कारण ते स्त्री शोषणाला प्रवृत्त करते असे विचार करणारी आजची पिढी करते .त्या काळात वरील सर्व कथा ही परिकथा च आहे आणि आजच्या पिढी शी बिलकुल मिळती जुळती नाही