Skip to main content

कथा – लंचटाईम

Published on शनीवार, 13/04/2019
कथा – लंचटाईम ----------------------------------------------------------------------------------------------------------------- दुपारची वेळ झाली की भूक लागते ... काहीतरी पोटात ढकलावं लागतंच . माझं आणि दिग्याचं जेवण झालं होतं . डबा आवरून ठेवत होतो , तेव्हा दिग्या म्हणाला , “ चल बिडी मारून येऊ “ . इंजिनीरिंगची परीक्षा जवळ आली होती . जशी जशी परीक्षा जवळ येऊ लागते तसं येड्यावानी व्हायला लागतं . उन्हाळ्याचे दिवस . पारा वर - वर चढलेला . नकोशी वाटणारी गर्मी . वातावरणात अस्वस्थ करून टाकणारी तलखी . आम्ही दोघे कॉट बेसिस वर राहतो . कॉलेज चालू असताना रुटीन वेगळं असतं . आता कॉलेज बंद . फक्त अभ्यास ! उठल्यापासून झोपेपर्यंत तो अभ्यास पाठ पुरवतो ; पण तो संपत नाही . हा उन्हाळाही संपत नाही असं वाटतं , तसंच . रोज अकरा वाजता मेसचा डबा येतो . रोज वेगळ्या भाज्या असल्या तरी तेच तेच जेवल्यासारखं वाटतं . कसंतरी पोट भरायचं . पोटाची खळगी भरल्याशिवाय अभ्यास कसा होणार ? पण पाणी पिऊनच पोट भरतं . पोटात अन्न कमी आणि पाणीच जास्त. अभ्यासासारखं … ज्ञान कमी आणि कचराच जास्त . जेवण झालं की दिग्याला सिगारेट ओढायची असते . त्याला नाही म्हणलं तरी तो मला तसल्या उन्हात नेतोच, सोबत म्हणून . आम्ही बाहेर पडलो . बाहेर एखाद्या जुलमी हुकूमशहासारखं उन पडलेलं . त्याच्या तापाखाली सगळीच प्रजा भरडलेली . दुपारची वेळ असली , गरम होत असलं , डोक्यावर ऊन लागलं की नकोसं वाटत असलं ; तरी दुनियेची लगबग चालूच असते . गाड्या पळत असतात . लोक चालत असतात . केस असलेले , टकले, टोपी - हेल्मेट घातलेली माणसं , पदर घेतलेल्या बायका . तर काही तसेच बोडक्या डोक्याने- उन्हाचा तडाखा तसाच डोक्यावर झेलत . पण प्रत्येकजण पळत असतो. कशासाठी ? ...पोटासाठी ! इतका प्रखर प्रकाश ! इतकं कमाल तापमान ! नकोच वाटायला लागतं . त्यापेक्षा अंध:कारात खितपत पडलेलं बरं , असं काहीतरी येड्यासारखं वाटायला लागतं . हा दिग्या ना , मला जायचं नसलं तरी नेतोच . वाटेत एक बांधकामाची साईट चालू होती , तिथले मजूर डबे सोडून जेवायला बसले होते . वाटेत एक वडापावची गाडी होती .एक म्हातारं भिकारी जोडपं आलं . त्यांनी त्या गाडीवाल्याला हात जोडले , तसा तो त्यांच्यावर खेकसला . ते मागे हटले . कुठले होते कोणास ठाऊक ? त्यांचे चेहरे आकसलेले , रापलेले होते . ते शहरी नव्हते ; पण ग्रामीण भागातलेही वाटत नव्हते . अंगात मळकट कपडे पण शहरी . कोणीतरी दिलॆले . त्यांना न शोभणारे . पण अंग झाकावं लागतं म्हणून नाईलाजाने घातलेले . बाईने पिवळ्या रंगाची साडी नुसतीच अंगाला गुंडाळलेली , तर म्हाताऱ्याच्या अंगात पांढरा टीशर्ट होता - ' अपना टाईम आयेगा ' असं लिहिलेला . ते कुठले असावेत ? आदिवासी पट्ट्यातले ? मी विचार करू लागलो . छे ! जाऊ दे . मी तो विचार झटकला . मनात आलं - उगा भिकाऱ्याचं कूळ कुठे शोधत बसता ? … टपरीवर पोचलो . टपरीवालाही डबा उघडून जेवत होता . त्याने बटाट्याच्या भाजीचा एक घास खाल्ला . दिग्याला हाताने सिगारेट काढून घेण्याचा इशारा केला . दिग्याने तसं केलं . दिग्या टपरी मागे गेला . ते जोडपं लांब गेलं . तिथे एका बंद टपरीजवळ कोणी पोळ्या टाकलेल्या होत्या . शिळ्या आणि कडक . कडकडून वाळलेल्या . ते दोघे त्या टपरीच्या सावलीला बसले . बाईने जवळची प्लास्टिकची बाटली काढली . त्या पाण्यात तिने त्या पोळ्या भिजवल्या . आधी- तिने नवऱ्याला एक पोळी दिली . त्याने खायची सुरुवात केली . तिनेही खायची सुरुवात केली . मी टपरीमागे शिरलो . ते नजरेआड झाले . बरं वाटलं . टपरीच्या शेजारी दुसरी टपरी आहे . दोन टपऱ्यांच्या मधून मागे जाता येतं . त्या दुसऱ्या टपरीच्या मागे एक बेंच ठेवलेला आहे . दोन - तीन जण त्यावर बसू शकतात . मागे एक हॉटेलची भिंत आहे . तीन बाजूनी ती जागा बंदिस्त आहे . एकच बाजू उघडी आहे . त्या मागच्या बाजूला एक नाला आहे . घाण पाण्याचा . खरं तर तो ओढा आहे मूळचा ; पण आपल्या देशातल्या प्रथेप्रमाणे त्यात गटाराचं पाणी सोडलेलं आहे . त्यामुळे त्यात काळसर हिरवटसर पाणी दिसतं . घाण वायूचे बुडबुडे येत राहतात . जर तो स्वच्छ पाण्याचा ओढा असता ... अहा ! जर त्याचा परिसर स्वच्छ असता ! - पक्ष्यांचं कूजन ऐकत , झाडांचं डोलणं पहात , पाण्यातल्या माश्यांच्या सुळकांड्या पहात त्याच्या काठाने चालण्यात काय मजा वाटली असती . तेही कोणाचा हात हाती घेऊन ! … एखाद्या झाडाला टेकून उभं राहायचं , ज्याने वर लाल फुलांची नक्षी डोक्यावर पांघरलीये अशा एखाद्या गुलमोहोराला . त्याच्या खाली मधुर काही बोलत. ऊन , ऊन भासलं नसतं . शीतल चांदण्याची बरसात जणू ! … पण त्या पाण्याचा वास येतो . त्यामध्ये सगळी कडे राडा पसरलेला आहे . काळसर हिरवट पाण्यात चिखलाचे घाणेरडे गोळे दिसतात . त्यात नाना तऱ्हेचा कचरा . कुठे प्लॅस्टिकच्या पिशव्या तर कुठे बिअरच्या फुटलेल्या बाटल्या , चटक मटक पदार्थांचे रॅपर्स … सुंदरतेचा विनाश सारा ! मी उभा राहून पाहत होतो , त्याच्या दूसऱ्या बाजूला खाली उतरायला मातीचा ढिगारा होता . त्यावर काहीतरी खसफसलं . पाहिलं , तर एक काळं कुत्रं तिथून खाली गेलं .वेडं कुठचं ! खाली जाऊन काय उपयोग होता ? पण दुपारची वेळ होती ना .काही पोटासाठी मिळतंय का ते पाहायला ते गेलं असावं . पण त्याच्या हालचालीने तिथून काहीतरी उडालं .मी पाहत राहिलो .मला अंदाज आला नाही . मग ते कुत्रं आल्या पावली परत फिरलं .उडून गेलेला पक्षी पुन्हा आला . तो एक बगळा होता . आधी मला तो दिसलाच नव्हता . तिथे असलेल्या सुक्या मातीशी तो जणू एकरूप झाला होता . बगळा असला तरी तो पूर्ण पांढरा शुभ्र नव्हता . खालचा , छातीचा भाग पांढरा असला तरी वरच्या बाजूची पिसं , भरपूर दुध घातलेल्या चहाच्या रंगाची होती . त्याची लांब चोच खुपसून तो टिपून टिपून किडे खात होता . त्या घाण पाण्यात मासे असणं शक्यच नव्हतं … पण त्या किड्यांची पैदास वाढायला मात्र अगदी पोषक वातावरण होतं . आजूबाजूला लक्षही न देता तो किडे खात होता . सह्जपणे . चवीचवीने तो किडे मटकावत होता . दिग्याची सिगरेट संपली. आम्ही निघालो. ------------------------------------------- दुसऱ्या दिवशी तेच . जसा उन्हाळ्याचा दिवस सरत नाही , जसे उन्हाळ्याचे दिवस सरत नाहीत -तसं . काल जे घडलं तेच पुन्हा . तो बगळाही तिथेच बसलेला होता . किडे खात. ती त्याची रोजची वेळच झाली होती जणू . आज तो मला गेल्या गेल्या दिसला होता . ----------------------------------------------- असं रोजच होऊ लागलं . एके दिवशी मी दिग्याला तो बगळा दाखवला . त्याला तो माहितीच नव्हता . तो अगदी तल्लीन होऊन सिगरेट ओढत राहायचा . “ सालं पोट कोणालाच चुकत नाही . नाही का ? भरावंच लागतं ! “दिग्या म्हणाला . “ हं ! दिग्या , पण एक बघ ना , आपला जसा लंचटाईम होतो , तेव्हा सगळ्यांचाच लंच टाईम होतो काय रे ? कोणी ना कोणी ,कुठे ना कुठे ,काही ना काही खात असतात. त्या मजुरांचा ,टपरीवाल्याचा , भिकाऱ्यांचा सुद्धा आणि या बगळ्याचा सुद्धा . हा बगळा बघ ना ,मी रोज बघतो . त्याची इथे किडे खायची वेळ ठराविक. जागा ठराविक . त्याचाही लंच टाईम असतोय बघ ! … “ “ बगळ्याचा लंच टाईम ? “ दिग्याने विचारलं आणि तो हसतच सुटला. ----------------------------------- जेवण झालं .आम्ही रोजच्या प्रमाणे निघालो . ढग आले होते . कसं तरी होत होतं घुसमटल्यासारखं . दिग्याने सिगरेट घेतली . मी टपरीमागे घुसलो . आज तो बगळा दिसला नाही .मी सगळीकडे पाहिलं .ज्या जागी उभा होतो तिथून नजरेच्या टप्प्यात येऊ शकेल तेवढा नाल्याचा भाग पहिला . तो - दिसला नाही .मला चुकल्याचुकल्यासारखं वाटलं . मनात आलं - तो पक्षी आहे ,एके ठिकाणी तो कसा ठरेल ? निघताना पुन्हा एकदा पाहिलं .मला राहवलं नाही .त्याला तिथे पाहायचा मला जणू चाळाच लागला होता . शेवटी त्या बेंचवर चढलो . आता नीट दिसत होतं . नाल्यात पाहिलं आणि … थोडं लांबवर - त्या भिकारणीने जाळ पेटवला होता . म्हाताऱ्याच्या हातात मान टाकलेला तो बगळा होता . ‘अपना टाईम आयेगा ‘ असं लिहिलेल्या अक्षरांच्या अगदी जवळ धरून तो त्याची पिसं पिसं काढत होता . बगळ्याचा ‘ टाईम ‘ आला होता . म्हाताऱ्याचाही ‘ टाईम ‘ आला होता . थोड्याच वेळात त्याचा लंच टाईम होणार होता . दुपारची वेळ झाली की भूक लागते . काहीतरी पोटात ढकलावं लागतंच… -------------------------------------------------------------------------------------------------------- बिपीन सांगळे Bip499@hotmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8224
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

अनपेक्षित शेवट. कथा फुलवण्यात हातखंडा आहे तुमचा.

कम्युनिकेशन सिम्प्लेक्स ऐवजी डुप्लेक्स किमान हाफ डुप्लेक्स हवं असं तुमच्या कथा वाचल्यावर नेहमी वाटतं.

कथा आवडली. एक शंका जेवण झालं की दिग्याला सिगारेट ओढायची असते . मग तो “ चल बिडी मारून येऊ “ . अस का म्हणाला ?

खूप खूप आवडली कथा. प्रत्यक्षदर्शी आणि काळजाला भिडणारे चित्रण

सॉरी टु से , पण मला नाही आवडली कथा. प्रसंग छान रंगवलाय पण कथाबीज कमकुवत वाटलं.

फारच जबरी लिहिलंय, अंगाला उन्हाचा दाह जाणवल्यासारखं वाटलं

छान.. शहरी भागात बगळा.. जरी ओढा असला तरी तेथे बगळा येतो ? आश्चर्यच आहे.. असो.. बाकी कथा चांगली आहे.

In reply to by मराठी कथालेखक

तुम्ही सारसबागेत जात नाही वाटत. बिपीन भाऊ कथा एकदम जबरदस्त तुमच्या नेहमीच्या शैलीतील पण थोडी वेगळी.

शब्दानुज आभारी आहे तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल

| पैलवान कम्युनिकेशन सिम्प्लेक्स ऐवजी डुप्लेक्स किमान हाफ डुप्लेक्स हवं असं तुमच्या कथा वाचल्यावर नेहमी वाटतं. क्षमा असावी मला कळलं नाही कृपया समजावून सांगावे

| श्वेता२४ खूप छान लिहिले आहे. काही वाक्ये अगदी मनाला भिडली. कृपया ती वाकी कुठली , सांगाल काय ? आभार

| उगा काहितरीच सॉरी टु से , पण मला नाही आवडली कथा. प्रसंग छान रंगवलाय पण कथाबीज कमकुवत वाटलं. तुमच्या प्रतिक्रियेचाही मी स्वीकार करतो आभार

| प्रमोद देर्देकर तुमच्या सारख्या तुमच्या कथा ही नवोदित आहेत म्हणून आवडतात . येवू द्या अजून. आभारी आहे पण मी नम्र पणे विचारतो कि ? नवोदित म्हणजे , त्या मध्ये काही त्रुटी जाणवतात का ?

मराठी कथालेखक आपल्या माहिती साठी मी सांगू इच्छितो तो नाला मी रोज पाहतो आणि बगळा सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटलं , यात काही आश्चर्य नाही त्या वरून हे कळतं की आपले पर्यावरण किती प्रमाणात खालावलेले आहे पुढच्या पिढी चं तर अवघड आहे

| सिक्रेटसुपरस्टार म्हाताऱ्याचाही टाइम आला होता यातून काही डार्क शेवट अपेक्षित आहे का? तसं असेल तर उत्तम जमलीये. नाही , असे काही डार्क अपेक्षित नाही आपले आभार