Skip to main content

....कार्यकर्ता 2

लेखक Patil 00
Published on मंगळवार, 26/06/2018
एके दिवशी साहेबांनी सत्तूला बोलावले. म्हणाले, "आपलेच दात आणि आपलेच ओठ. चिरंजीव ऐकायला तयार नाहीत. पण मला चिरंजीवा पेक्षा सत्तू कार्यकर्ता जवळचा आहे. ज्यानं माझ्यासाठी उभी हयात घालवली, त्यांना आम्ही विसरणार नाही. पण चिरंजीव ऐकत नाहीत. आम्ही काय करावं? तू म्हणशील तस करू." साहेबांची अवस्था बघून सत्तूला भरून आलं. सत्तूनं साहेबाना ठामपणे सांगितलं, "धाकल्या साहेबांचा अर्ज भरा. घरातच फाटाफूट नको. आम्ही पक्षासाठी एवढे दिवस राबलो. आता साहेबांच्या घराण्यासाठी राबु........" सत्तूला उदास वाटत होतं. हयात राजकारणात घालवली. घरात बापाच्या जागी साहेबांचा फोटो लावला. बागा पण गेल्या. शेती संपली. घरदार उध्वस्त झालं. पोरगा निवडून येणार या आशेवर बाप मरून गेला. बायका पोरं देशोधडीला लागली. बरोबरीचे मित्र प्रगती करुन कुठल्या कुठं गेले. आपण मात्र साहेबांचे खंदे समर्थक. विश्वासू साथीदार. घरात नाही ज्वारीचा दाणा आणि आणि पुढारी उताणा, अशी अवस्था. उद्या पोरांनी विचारलं तर बापाचं कर्तव्य काय सांगायचं ??????? सत्तुला सकाळी उशिरा जाग आली ती धाकल्या साहेबांच्या हाकेनं. सत्तू जागा होऊन बाहेर आला. धाकल्या साहेबानी पाय धरले. म्हणाले, "तुमच्या सारखे कार्यकर्ते आहेत म्हणूनच राजकारणात आमच्या घराण्याचं नाव आहे. आता आमचं निवडून येणं तुमच्याच हातात आहे." धाकल्या साहेबानी पुन्हा एकदा पाय धरले. सत्तूने त्यांना उठवले...... धाकल्या साहेबांच्या प्रचारासाठी सत्तू नावाचा कार्यकर्ता कामाला लागला. त्याने पुन्हा पायाला भिंगरी बांधली..... समाप्त
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3553
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

गेले ते दिवस. आता गडी खाऊन (पिऊन) रु. ५०० आणि बाय रु. ३०० शिवाय उमेद्वारामागे प्रचाराला फिरायला येत नाहीत. === नेत्यांच्या मागे मागे फिरून बक्कळ कमावणारे बरीच उदाहरणे पाहिली आहेत. त्यामुळे ही कथा मनाला भिडली नाही, हे प्रांजळपणे सांगू इच्छितो. === पण प्रयत्न खूप चांगला होता. उत्तरतोर प्रगती करत करत जावो ही सदिच्छा..!!

In reply to by विशुमित

हायला ५०० म्हणाजे बरा आहे की रेट ! ते ही खाऊन " पिऊन " म्हणजे चैनच ! महिनाभर नुसतं निवडाणुकी साठी फिरलं तरी १५ ह सुटतील ! बेस्ट !

लेखनशैली आवडली. पण आयुष्य सरले तरी एखाद्याला जाग येवू नये हे तितकंस पटलं नाही... अर्थात असू शकतील असेही लोक..

In reply to by Patil 00

अहो पाटीलसाहेब, तुम्ही चांगलंच लिहिलंय! पण खाली सोमनाथराव म्हणतात तसं, अशा कार्यकर्त्यांचे दिवस दोन अडीच दशकांपूर्वी संपले. आता नगरसेवकांचा पहिल्या फळीतला कार्यकर्ता किमान स्विफ्टवाला व महिन्याला सरासरी उत्पन्न किमान लाखभर असलेला असतो. दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्तेसुद्धा पोट भरल्याशिवाय एक पाऊल उचलत नाहीत. बाकी मग आमदार, खासदार, मंत्री यांच्या कार्यकर्त्यांचे हिशोब करा गुणाकार भागाकार करून. आणि अजून पण सत्तूसारखा कोणी कार्यकर्ता कोणालाही नजरेस पडला तर माझ्याकडे पाठवा, मला 'समजावून' सांगायला खूप आवडतं!!

हे असले कार्यकर्ते कुठेच शिल्लक नाही हो , आता साहेबा बरोबर कार्यकर्ते पण भरपूर कमवतात . ज्याच्या कडे पैशाचा माज आहे तोच राजकारणात उतरतो . कुठे ना कुठे तरी वर्णी लागतेच आणि कार्यकर्ते पण खोऱ्याने पैशे ओढायला सुरवात करतात . लिहीत रहा , प्रयत्न चांगला आहे .

जुन्या काळातील निष्ठावान कार्यकर्त्याचे अस्सल चित्रण . सर्व प्रतिसादही बदललेला काळ दाखवुन देणारे .

पण दोन भाग न करता एकाच भागात सर्व आणलं असतं तर अजून प्रभावी वाटली असती असं वाटलं

http://www.mukhyamantri.com/2017/01/blog-post_25.html इथे प्रकाश बा. पिंपळे या नावाने आहे. बर्‍याच ठिकाणी ही कथा वेगवेगळ्या नावाने सापडली. तुमच्या ब्लोगवर किंवा चेपुवर आहे का ? (पूर्वप्रकाशित तरी लिहायचेत) ( इथल्या वाचकांसाठी योग्य स्पष्टीकरण दिलेत तर उत्तम )