Skip to main content

बाप

लेखक अनाहूत
Published on शनीवार, 02/06/2018
" अय हिकडं कूट ? तिकडं रस्त्याकडंच कपडे बग तुला परवडायची नाहीत इथली कपडे . " दरवाननं त्याला हटकलं. " तस नाय दादा . पोरग लय माग लागलं होत म्हणून आलो होतो . आन मी पैशे जमवल्यात त्यासाठी . " त्यानं अजीजीनं सांगितलं . " बर जा आत " त्यानं सगळीकडं पाहिलं खुपच भारीभारी कपडे होते तिथं . कुठला निवडावा आणि कुठला नाही असं झालं होत त्याला त्यातल्यात्यात एक मस्त ड्रेस बघून त्यानं किंमत विचारली किंमत ऐकून तो बुचकळ्यात पडला " दादा मोठ्या माणसाचं नाय लहान लेकरासाठीच कपडे पायजे त्याची किंमत सांगा . " " अरे दादा ही त्याचीच किंमत आहे . " दुकानदार त्याला न्याहाळत म्हणाला . " बर " असं म्हणत तो निघाला . बाहेर आल्यावर त्याला दरवान न विचारलं " काय झालं ? " " नाही जरा महाग हाय. " तो म्हणाला . " आर मी तुला सांगितलेलं कि महाग आहेत ते, तुला नाही परवडणार . " - दरवान " ते तस न्हाई अजून वेळ आहे घेईन मी अजून थोडं पैसा जमा झाल्यावर . " त्यानं चिकाटी दाखवली . बर झालं आपण लवकर चौकशी केली . आता याच्यासाठी काहीतरी करता येईल पुढचा महिना . त्यानं जास्तीच काम करायला सुरुवात केली शरीराला थकायला होत होत पण त्याची तमा न बाळगता त्यानं आपलं काम सुरु ठेवलं शेवटी एकदाची रक्कम गोळा झाली अन त्यानं आपला मोर्चा दुकानाकडे वळवला . वाटेत नाना भेटला , " आप्पा लगबगीनं निघालाय . " " ती जरा खरेदी करायचीय . " - आप्पा " वा झाक हाय कि . काय खरीदी हाय " - नाना " पोराला शर्ट आणि मला एक बन्याल घेणार हाय . " " घ्या घ्या . " " बरं " असं म्हणत तो निघाला . तिथं पोहचून पाहिलं तर ड्रेसची किंमत वाढली होती "दादा मागं बघितला तवा कमी हुती किंमत . " " दादा आता सिझन आहे त्यामुळं वाढवली आहे . आणि फार नाही वाढवली . " त्यानं हिशोब लावला . त्याचा सगळाच खिसा मोकळा होणार होता . तरीही त्यानं तो ड्रेस घेतला . त्यानं मोठ्या हुरूपान कपडे पोरासमोर धरले . " अप्पा तुमलातर कायसुदिक कळत नाय कपड्यातल कसला आणलाय ड्रेस ? " " आर चांगला हाय कि . घालून तर बग . " " काही नको मला. " असं म्हणून त्यानं तो शर्ट फेकून दिला . अप्पानं तो उचलून घेतला , नीट घडी घालून त्याला आत ठेवला . " अप्पा आर दुपारी कापडं घेऊन आलास ना ? " " हो " " आन बन्यान पण आणणार होतास ना आर मग बदलायचं न्हवत वय , हे पाक फाटलंय कि " " असुदे कि वार येतं चांगलं आणि जाईल अजून काही दिवस . " " अन पोरग जुनीच कापड घालून फिरत होत ते . " " त्याला नाही आवडला . त्याची समजूत काढीन मग घालल त्यो . पण मलाबी नाय कळत कपड्यातल . फूडच्यावेळी त्यालाच घेऊन जाईन मग होतील त्याला हवी तशी कापड . " " आर अप्पा उशिरानं झालेलं पोरग हे आई विना लेकरू हाय , तुजी तब्बेत बी काय फार चांगली नसतेय . अन कूट मरमर करत बसतोस . " " न्हाय पोरासाठी नाय तर कुणासाठी करायचं ? " " हे बग शरीराला जितकं झेपत तेव्हढच करावं माणसांन . आर त्याच्या कुवतीच्या बाहेर गेलं कि हे आमच्यासारख दारू पिऊन पडाव लागत मग काय दुकतय , काय खुपतंय काय कळत नाय पण असं कुठवर परत दारूचं यसनच लागत मग दारू काय सोडत नाय आपल्याला . मग काम राहत बाजूला आणि दारूचं आठवते . शरीराचं पाक मात्र होत . आमचं काय आता आमची दारू काय सुटायची नाय . तुला अजून काय यसन नाय . तू ह्यात पडू नगो . अन हेच न्हाय तर एखादा आजार जडायचा . तुज्या जीवाचं काय बरंवाईट झालं तर मग त्या पोराचं हाल कुत्र बी नाय खाणार . आर तुज पोरग हुशार हाय . त्याला शिकवं . त्याच्या नशिबानं झालं तर काहीतरी चांगलं होईल . हे आमचं बेनं जितक दिवस शिकायला गेलं तेवडे दिवस मास्तरलाच शाळा शिकवून आलं. त्यामुळं त्याच आता काय वाटत नाय . तो त्याच्या नशिबाचा . पण त्याला यवार कळतो . तो कसाही राहील . तुझ्या पोराचं तस न्हाय . त्याला यवार कळत नाय . त्याला जप . आन पैसा त्याच्या शिक्षणाला घाल . त्यालाबी लै पैका लागतो . " " नाना तू हाइस म्हणून काय तरी कळतंय बग न्हायतर नुसताच यड्या बगाड्यावानी व्हायचं माझं . तू म्हनतु तसाच करतो बग . " रात्री झोपलेल्या पोराच्या डोक्यावरन हात फिरवताना त्याला बरीच काळजी पडली होती . ' शेवंता कशी सोडून गेलीस मला . आता दोनीकडचा इचार करावा लागतोय . स्वतःची काळजी घेऊनच कष्ट करायला हवं . पण तू काळजी नगो करू, मी करीन सगळं यवस्तीत . ' =========================================================== " आर आप्पा आपला शिरपती सायब झालाय . त्यानं हिकड कुणाची काही वळकं न्हाय ठिवली त्यामुळं कुणाला दिखील माहित नाही . आज कार्यक्रम आहे त्याचा . आपला ईशनु गेला हुता त्यानं फोटो बघितला आणि वळाकल . " " बर झालं मला सांगितलं मी जातो आता तिकडं . त्यानं घरातली सांदीकपारी शोदली . हाताला लागलं तेवढ पैस घेतलं . वडाप लागलच होत म्हातारा कोपऱ्यात जाऊन बसला . उतरताना " आबा आर २ रुपये अजून " " न्हायती माझ्याकडं हूत तिवड दिल . " त्यानं एकवेळ म्हाता-याकडे पाहिलं आणि हातातली चिल्लर त्याला माघारी दिली " असू दे आणि माघारी जाताना ये तुला सोडतो . " चौकशी करत करत म्हातारा त्या इमारतीपाशी पोहोचला पण त्याला बाहेरच अडवलं " म्हातारबाबा हिकडं कूट देवाळ हाय का हे ? कार्यक्रम आहे मोठा . " " आर म्हायती हाय मला . तुमचा सायब आमच्या गावचा हाय . एक टाइम बघतो अन मग जातो . " " व्हय का बर जा आन बाजूला उभा राहा लय पुढं जाऊ नको . " म्हातारा सगळीकडे कौतुकाने बघत निघाला होता . मोठा हॉल होता . बरीच गर्दी होती . म्हातारा एका बाजूने हळूहळू पुढं जात सगळ्यांच्या पुढं जाऊन पोहोचला . समोर श्रीपती बोलत होता . " मी स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत आलो आहे . कोणाचीही काहीही मदत नाही घेतली . " - श्रीपती म्हाताऱ्याच्या डोक्यात भूतकाळ रुंजी घालत होता . " आप्पा मला दप्तर पायजेल ती पिशवी नगो पोर हसत्यात . " " आर कशाला ती दप्तर आन काय ही पिशवी हाय कि भारी " " नाय मला दप्तर पायजेच नायतर मी जात नाय साळला . " " बर आणू आपण " " मुकादम ते जरा पैस पायजे होत . " - आप्पा " अर मग घे कि जाताना पगार " - मुकादम " ते न्हाय वायच अंगावर पायजे हूत " " आप्पा सारक सारक हुतंय बग तुज . आन तुला दिल्यावर बाकीचीबी मागणार कि " " ह्या टायमाला द्या वायच नड हाय " " बर घे . पण आता परत नाही . " " जी जी " " मला डिसेकशन बॉक्स घ्यायचाय " " ते काय असत ते लागत त्याशिवाय बसू देत नाहीत " " आर पोराला आन कि कामाला कशाला शिकायची नाटक करताय कूट मोठा सायब होणारे ? तुला झेपत नाही आता , सारख्या सुट्या होताहेत . " " नाय मला काय बी नाय झाल , मला सुट्टी नको मी यतो कामाला . " " आप्पा सारक सारक पैस द्यायला काय झाड लागलाय का ? " " मी देतो कि सायब तुमचं सगळं पैस " " मला क्लाससाठी पैसे हवे आहेत . " " न्हायत माझ्याकडं . " आप्पा पहिल्यांदाच तोडून बोलला . " मग मी जातो घर सोडून . " " कधी जाणार ? " " आत्ता जातो " " जा मग " त्यानं तणतणत सामान भरलं आणि तो निघाला . तो दृष्टीआड होईपर्यंत आप्पा त्याच्याकडं बगत बसला . ' बर झालं चांगल्या टायमाला गेलास ' रात्र डोळ्यातच गेली , सकाळी कधीतरी त्याला डोळा लागला असेल तेव्हड्यात कुणीतरी दार वाजवलं . त्यानं दार उघडलं . दारात रंगा उभा होता . " ए आप्प्या चल पैशे टाक माझं " असं म्हणून गचांडी धरली त्याची आणि दोन तीन ठेऊन दिल्या . म्हातार तडपडल . " आर म्हाताऱ्याला कूट मारतो " - रावजी म्हणाला . पण रंगा ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवता . " जीव घेईन त्याचा माझं पैसे पायजेल मला आत्ताच्या आत्ता . " . " आर त्याचा जीव घेऊन मिळनारेत का तुला पैशे ? कायतरी कामाचं बघ . " - रावजी त्याला समजावत म्हणाला . " हे घर कर माझ्या नावावर . चल हो भायेर . " रंगा काही ऐकेल असं वाटत न्हवत पण रावजी मध्ये पडला म्हणून ते तेव्हढ्यावर भागात पण त्याला घर सोडणं भागच होत . तसल्या थंडीत मार खाऊन म्हातार बाहेर पडलं त्या धक्क्यानं त्याची तब्बेत खालावली ती काय परत सुधारली नाही पोराला त्यानं हुडकून काडलं . त्याच्या पत्त्यावर मनी ऑर्डर करू लागला . पोरग भेटलं तर नाय पण मनी ऑर्डर तरी घेत होत . फार काही देता येत न्हवत पण जमल तस देत होता तो . सगळा भूतकाळ फेर धरून त्याच्यासमोर नाचत होता . " स्वतःच्या जीवावर शिकलोय आणि इथवर पोहोचलोय मी " टाळ्यांचा कडकडाट होत होता . "आप्पा हुईल सगळं पण अपेक्षा ठेवू नको काही . " नानाच शब्द त्याच्या कानात परत ऐकू आले . म्हातारा समाधानानं बाहेर पडला . ऊन फारच झालं होत थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटत होत म्हणून थोडासा टेकला . " ए म्हाताऱ्या ऊठ इथून . " त्याला तिथंही हटकलं . " आर जरा भोवळ आल्यासारखं वाटलं म्हणून टेकलो होतो . " " आर आमचं काय नाय पण मालकाला नाय आवडत डायरेक नोकरीची धमकी देतात . पोरंबाळं हायेत म्हणून म्हणालो . " " न्हाय न्हाय मला काय झालय मी उठतो कि तू काळजी नगो करू " उठताना म्हातारा थोडा तडपडला तस त्यानं हात दिला . म्हातारा उभा राहिला . " हे घे " म्हणत त्यानं खिशातली चिल्लर काढून त्याला दिली . " पोरास्नी चाकलेट घे " " अहो कशाला ? " " असू दे असू दे " म्हणत म्हातारा निघाला . थोडं अंतर पुढं गेला आणि चक्कर येऊन पडला . जाणारे येणारे पाहत होते, कुणी थांबत होत, बराच वेळाने कुणीतरी जवळ जाऊन पाहिलं " गेलं म्हातार " म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान होत पण डोळ्यात कुणाचीतरी प्रतीक्षा मात्र दिसत होती .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3111
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

:(

:(

भुस्कट केलं डोसक्याचं, ह**** औलाद असण्यापरी निपुत्रिक मेलेलं काय वाईट नाय, असं न तसं रस्त्यावरच मरायचंय की.

जाळ कथा पुलेशु वाचक नाखु

कथाविषयामध्ये नाविन्याचा अभाव आहे. भाषा शैली चांगली आहे. पु ले शु

काही वाचल कि काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचत नाही लिहीत राहा

:(

वहिनीच्या बांगड्या कि मोलकरीण कि असल्याचं कायतरी नावाचे सुलोचनाचे सिनेमे होते ना.... हाडाची काडं करणारी मोठी माणसं आणि हरामखोर, कृतघ्न पुढची पिढी. लहानपणी वाट आणलेला असल्या कथांनी. काळ जाईल तशा या इमोसनल अत्याचारी कमी होतील अशी आशा होती. पण कसलं काय....आई, वहिनी सोबत आता बाप, भाऊ, काका, मामापण येऊ लागलेत (कपाळावर हात मारून घेणारी भावली) असो पब्लिक डिमांड हाये असल्या गोष्टींना. पुरवठा होत राहणार....