Skip to main content

माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 22/05/2018 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन.... 1 मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो... त्यातला एक किस्सा सादर... ...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला. विशेषतः सिनिअर आफिसर्सच्या बायका, ‘ये ना संध्याकाळी आम्हाला बघायचय काय असतं प्लॅंचेट ते.’ असं म्हणून गळ घालत आणि मी देखील, ‘हो-हो जरूर! का नाही? पण रात्रीच्या जेवणाचा बेत माझ्या आवडीचा असू दे’ असं म्हणून त्यांच्यावर थोडीफार हुकूमत गाजवत असे. माझ्या मित्रांना हा प्लॅंचेट करतो आणि सिनिअर आफिसरच्या घरी पार्ट्या झोडतो असा हेवा वाटून त्यांनी माझ्याबरोबर यायचे टाळायला सुरूवात केली. विशेषतः मी श्रीनगरला असताना प्लॅंचेटचे प्रस्थ फार झाले. एकदा तर माझे अकौंट्सचे वरिष्ठ, स्क्वाड्रन लीडर पीव्ही राव, जे कानडी होते, सिगरेट सुलकावत, माझ्याकडे न पाहताच बायकोने सांगितलयं म्हणून जरा तुच्छतेने, ‘आमच्या घरी ये बरं’ असं मोघम निमंत्रण देते झाले. ‘का सर?’ मी मुद्दाम विचारून खोदून पाहिले. ‘अरे ये तर खरं’, असं म्हणून प्लॅंचेट हा शब्द टाळून त्यांनी मला निमत्रंण दिले. रात्री मी त्यांच्या राजबाग या भागातील घरी पोहोचलो. पत्निने आल्या आल्या प्लॅंचेटचे नाव काढल्यावर आमच्या बॉसच्या कपाळाला आठ्या चढल्या. सभ्यतेचा शिष्टाचार म्हणून, ‘ओ आय सी’ असे खोटे खोटे उदगार काढून रोष ओठात दाबला. मी ही जरा आढ्यतेने, ‘सर जरा ते कॅलेंडर काढून द्याना’ असं म्हणून त्यांना कामाला लावले. ‘उद्या ऑफिसात ये तुला दाखवतो’ असे मनात कुढत त्यांनी नाइलाजाने कॅलेंडर काढून पुढ्यात ठेवले. आपला भाव वधारलेला पाहून व ते माझे वरिष्ठपण अकौंट्स ब्रांचचे असल्यामुळे मी चान्स घेत म्हटले, ‘सर मी प्लॅंचेट करीन पण एका अटीवर’, तेंव्हा त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘तुम्ही आहात कानडी. मला कानडीचा गंध नाही आणि प्लॅंचेट करताना नेहमीच, हा ओक कपाचा कान पकडून त्याला हवी ती उत्तरे देतो असे माझ्या अपरोक्ष म्हटले जाते. म्हणून आपण एक प्रयोग करू या आणि मग पाहू काय होते ते.’ कानडीतून प्रयोग ‘ओके नो प्रॉब्लेम’ असे म्हणून त्यांनी नवी सिगरेट शिलकावली आणि त्यांनी कॅलेंडरच्या मागील भागावर कानडी अक्षरांचा एक तक्ता तयार केला व प्लॅंचेटला बसलो. कानडीमध्येच त्यांची नवरा-बायकोत थोडीफार बोलाचाली झाली आणि माझ्या वरिष्ठांनी पत्निच्या कानउघाडणी नंतर हातातली सिगारेट तात्पुरती टाकून, हात जोडून देवाला नमस्कार करून कपावर बोट टेकून ठेवले. एकदोन मित्र तोवर जमले. ते सगळे स्थानापन्न झाल्यावर पैकी एकाने कपावर बोट लावायला उत्सुकता दाखवली. शेवटी मी माझे बोट टेकवले आणि बॉसना ‘कोणा मृताला बोलावणार? असा प्रश्न केला. प्रश्न अनपेक्षित असल्यामुळे त्यांच्यात पुन्हा कानडीत चर्चा झाली. हळूहळू आवाज वाढला. आविर्भावावरून बॉस, 'हा काय फालतूपणा चालवलाय?' म्हणत असावेत. पण पत्नीच्या आग्रहाखातर गप्प बसून तो (मी) सांगतोय ते करायला काय हरकत आहे? असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे असावे. शेवटी मी मध्ये पडून म्हटलं, ‘ठीक आहे असु दे, ते तुम्ही नंतर ठरवा. सध्या मी अशा व्यक्तीला बोलावतो की ज्याला कानडी येत नाही’. ‘ओ येस, दॅटस् ओके’ असं म्हणून माझ्या सरांनी होकार सुचवला. मी मग मराठी व्यक्तिला आवाहन केले आणि त्याप्रमाणे खूपच पटकन कप हालला ‘हो’ म्हणून पुन्हा घरावर स्थिरावला. आता विचारा प्रश्न असं म्हटल्यावर ते एकमेकांच्याकडे पाहायला लागले. त्या बाईंनी म्हटले, ‘अहो, काय प्रश्न विचारायचे असतात, असं असतं का? मला तर माझ्या मैत्रिणीने सांगितले की ओक सगळी उत्तरं सांगतो. आता तुम्हीच प्रश्न विचारा आणि तुम्ही उत्तरं द्या.’ मला हसू यायला लागले. ‘अहो प्रश्न तुम्ही विचारायचा. त्याचे उत्तर प्लॅंचेटच्या तक्त्यावरून मिळते. मी प्रश्नांचे उत्तर देत नाही.’ ‘ओ आय सी, साऊंड्स इंटरेस्टिंग’ असं म्हणून हातातला रमचा ग्लास बॉसनी खाली ठेवला. अती थंडीतील त्या दिवसात बुखारी नामक- शेगडीप्रमाणे घराचे तापमान गरम करायला कोळसे घालायच्या निमिताने ते उठून आपला व मित्रांचा रम पेग भरून खातिरदारी केली, माझ्यासमोर कोक पटकावला व मुंगफलीचे तबक सरकवले. सरांना आधी वाटले तितके प्रकरण फालतू नाही असे त्यांच्या हावभावातून जाणवत होते. कारण उशीरा आलेल्या मित्रांना ते समजाऊन सांगत होते की प्लॅंचेट म्हणजे काय ते! मग पुढचे अर्धा ते पाऊण तास कानडीमधून प्रश्न विचारणे चालू होते. प्रश्न विचारला आणि तो कप हालू लागला. तो कप कुठे हलत होता हे मला तक्त्यावर दिसत होते, परंतु ती अक्षरे माझ्याकरता शून्य होती. कारण त्या अक्षरात कुठलं काय अक्षर आहे हेही माहित नव्हतं आणि त्या अक्षरातून निर्माण होणारा शब्द व वाक्य काय बनते आहे याची मला पुसटशी सुध्दा जाणीव नव्हती आणि मुख्य म्हणजे विचारलेला प्रश्न काय आहे जो कानडीत विचारला गेला त्या प्रश्नाचा काय रोख आहे, उत्तर काय हवय याचा मला पत्ता नव्हता. प्रश्न कानडीतून विचारले गेले. त्यानंतर कप हळूहळू कानडी अक्षरांवरून फिरु लागला. त्यातून काही अक्षरातून अर्थवाही वाक्ये येऊ लागली. त्या शब्दांचा काय अर्थ असेल असा पति-पत्नीत खल होई. त्यातून त्यांनी निर्वाळा दिला की आम्हाला कानडीत अर्थवाही उत्तरे मिळत आहेत.अधून मधून त्यांच्या बोलण्यात जेव्हा इंग्रजी शब्द येत त्यावरून मला थोडाफार अंदाज लागे. पण प्रश्न नक्की काय होता हे मला आधी समजत नव्हते. असे होता होता त्यांचे प्रश्न आणि उत्तरे संपली आणि तो कप उचलून मी त्या फूंक मारली आणि धन्यवाद असे म्हणून तो प्लॅंचेटचा डाव संपवला. त्यानंतर घडलेल्या चर्चेत असे लक्षात आले की त्यांनी कानडीतून प्रश्न विचारून मिळवलेली कानडी भाषेतून मिळालेली उत्तरे समर्पक होती. एकतर ज्या व्यक्तीशी संपर्क केला मृत व्यक्ती कानडी नव्हती त्यामुळे तिला कानडी येण्याचा प्रश्नच नव्हता. मला स्वतःला कानडी येत नाही. हे त्या कुटूंबियांना माहिती होते. तुझ्यामुळे कप फिरतो. त्याला गती येते हे नक्की. पण तू अक्षरे, शब्द, वाक्ये बनवत उत्तरे देतोय असे होत नाही असे खात्रीलायकपणे आम्ही सांगतो. आमचे संपुर्ण समाधान झाले की तू त्या उत्तरांना बनवून सूचित करत नाहीस! त्यामुळे मी प्रश्नांची उत्तरे देतो हा माझ्यावर नेहमी केला जाणारा आरोपही खोटा आहे असे स्वतः रावांनी मान्य केल्याने मला बरे वाटले. व संशोधन तऱ्हेने या विषयाला हाताळल्याचे समाधान मिळाले. शेवटी डेंटिस्टच झाला! असेच आणखी एकांच्याकडे मी प्लॅंचेट करीत असताना खूप मजा आली. किस्सा होता मेजर साठे यांच्या मिसेस बाबतचा. त्यांची ओळख झाली एयर ओपीच्या तेंव्हा कॅप्टन विनायक पाटणकरांच्या घरी. (मी तिसऱ्यांदा श्रीनगरच्या पोस्टींगला असताना ते कारगीलच्या युद्धाच्या प्रसंगी 15 कोअरचे कमांडर होते. २००२-३च्या सुमारास लेफ्ट्नंट जनरल रॅंकवर श्रीनगरहून महत्वाच्या पदावरून रिटायर झाले. आणि गड आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी माझ्या प्रयत्नात 2015 पासून त्यांच्याशी पुण्यात पुन्हा संपर्क आला!) एकदा आम्ही त्यांच्या गुपकार रोड वरील बंगलेवजा घरी एकत्र आलो होतो. माझी किर्ती ऐकून मिसेस साठ्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. त्यावेळेला ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली ती मी विसरून गेलो. परंतु काही वर्षानंतर त्यांची पुन्हा अचानक भेट झाली. त्यावेळी एकदम हस्तांदोलनाला हात पुढे करून त्यांनी म्हटले, ‘ओक, अरे तुला भेटले की मुद्दाम सांगायचे ठरवले होते. आठवतय का? आपण श्रीनगरमध्ये प्लॅंचेट केलं होतं? त्या प्लॅंचेटवर माझ्या मुलाला कॉलेज शिक्षणासाठी कुठली शाखा मिळेल असे मी विचारले होते? ते अगदी बरोबर आले बर का.’ मला गोड धक्का बसला. त्यांच्या मुलाला मेडिकलला जायचं होतं पण प्लॅंचेटवरून तो डेंटिस्ट होईल असे उत्तर आल्यामुळे त्या फार खट्टू झाल्या होत्या, पण शेवटी तो डेंटिस्टच झाला. हे त्यांच्या बरोबर लक्षात राहिले आणि त्यांनी माझी भेट होताच प्रथम उल्लेख केला त्या प्लॅंचेटचा व त्या उत्तराचा. असो. ..... प्रचिती द्या तर मानू.... आणखी एक घरगुती किस्सा... पुढे कधीतरी सादर करेन...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22594
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची ठाणी नेमकी कुठे आहेत आणि ते कोणत्या दिवशी किती वाजता हल्ला करणार हे जाणून घेउ शकतो का?

In reply to by टवाळ कार्टा

जसे ब्रिज खेळात डाव संपला की त्यावरील गरमागरम चर्चा फार होते तसे प्रकार प्लॅंचेटचा व्हायला लागलेला पाहून मी ते प्रकरण आवरते घेतले. अशा कटकटीमुळे पुढे मी ब्रिजचा, रमी, पपलू-टिटलू, तीनपत्ती आदीचा नाद धरला नाही. आणि माझ्या प्लॅंचेटच्या विद्येबाबत जास्त वाच्यता केली नाही!
सेनेतील नोकरीत सुंदर सुंदर मुली पहायला ही मिळणे अशक्य होते. मात्र मला ती संधी ऐतीच आली. व्हायचे असे की आम्हाला पगार वाटपाला पैसे स्टेट बँकच्या लाल चौक शाखेतून काढायला वरचेवर जावे लागे. तिथल्या ऑफिसात एकाहून एक अती सुंदर गुलाबी गालाच्या, नितळ गोऱ्या गोऱ्या कांतीच्या मुली कामात गर्क असत. मी ऑफिसर म्हणून मला काऊंटरच्या आत बोलावून चहापाणी करायची रीत होती. भिभिरत्या नजरेने पोरीही मला पाहताना खूष व्हायला होई. त्यात होती एक टीटा. काश्मिर की कली म्हणावी अशीच. नजरानजर करून मी तिला थरथरत्या आवाजात हाय हॅलो करून म्हणे. ती ही मानेने होकार देत पुन्हा कामात दंग असल्याचा बहाणा करत आहे असा मला भास होई. मला धीटपणा शिकवायला माझे मित्र संध्याकाळी बारमधे बसून भरीला घालत, म्हणत ‘गटव तिला’.. ‘मी ही तावात, ‘हो हो’ म्हणून, ‘आता पहा पुढील भेटीत तिला मेसच्या पार्टीत बोलावतो’ म्हणून भाव खात असे. मात्र तसे घडले नाही. मी थोडासा उदास झालो श्रीनगर सोडताना तिला आठवून. ( 2012 मधील लेखनात घातलेली भर - नंतर 1977 ते 1979 मधे दुसऱ्यांदा पोस्टींगवर मी पुन्हा बँकेत कामाला गेलो तोवर तिला सिनियॉरिटीप्रमाणे केबीनमधे स्थान मिळाले होते. तिच्या कपाळावर माँग भरलेली होती. काश्मिरी पद्धतीचे कानांना लटकणारे सोन्याचे आभूषण तिच्या सौभाग्याची खूण सांगत होते. जुजबी शिष्टाचाराच्या गोष्टी बोलून मी हसून निरोप घेई. एकदा चहाचा कप मागवून तिने माझी जास्त विचारपूस केली. तेव्हा माझ्या जीवनात घडलेल्या उलथापालथीची कल्पना दिली, तेंव्हा तिला ते धक्कादायक वाटले. 1996 ते 1998 च्या माझ्या तिसऱ्या पोस्टींग मधे मला चकीत व्हायची वेळ आली. कारण पंडितांच्यावर जी भयानक देशोधडीला जायची पाळी आली त्यात तिचे कुटुंबिय श्रीनगर सोडून गाझियाबादला स्थलांतरित झाल्याचे कळले.) 1 हिंदी सिनेमातील हवाईदलात कार्यरत दाखवलेले हीरो - राजकपूर संगममधे, आराधनातला राजेश खन्ना आदी...निळ्या सेरिमोनियल ड्रेसमधे दिसतात. तर कधी कथानकाच्या सोईसाठी इंटरव्हलपर्यंत देशासाठी शहीद होऊन नायिकेला खऱ्या हीरोकडे आकर्षित करण्याला मदत करतात!

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, अतिरेक्यांची ठाणी व हल्ला शोधणे ही समस्या नाहीये. समस्या वेगळीच आहे. त्यावर मोदी काम करताहेत. चिंता नसावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्हाला आम्हा सामान्य माणसांपेक्षा जास्त समजते असे मानुया नक्की समस्या काय त्याची चर्चा इथे नको, हवा तर दुसरा धागा काढा.....आणि माझी शंका धागा लेखकासाठी होती...तुम्हाला प्लांचेट येत नाही त्यामुळे तुमच्याकडून उत्तर नकोय अवांतर - इतकी आंधळी व्यक्तिपूजा खांग्रेसीसुद्धा करत नाहीत

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, तुम्हांस फक्त लेखकाकडून उत्तर हवंय याची कल्पना आली नाही. त्याबद्दल क्षमा असावी. तुमच्या प्रश्नाचं माझ्या मते उत्तर होय असं आहे. तरीपण तुम्ही लेखकास विचारून नक्की करून घेऊ शकता. आ.न., -गा.पै.

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, हो, खुशाल करा. फक्त कारवाया करण्यासाठी वेगळा विभाग उघडा. रॉ व आयबी माहिती मिळवण्यासोबत कारवाया देखील करतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ह्यावर अजून सांगा की थोडं!.

आत्मा नवीन शरीरात जातो ना ? मग प्लॅनचेताला आत्मा पुन्हा कसा available होतो ?

In reply to by manguu@mail.com

हे हे ... हा मात्र प्वाईन्ट आहे बर का मंगूऍटमेलडॉटकॉम सर. कदाचित जन्म घ्यायच्या वेटिंग लिस्ट मध्ये असलेले (लिम्बो म्हणतात ना त्याला?) आत्मे येत असतील. त्यांचाही तेव्हडाच टाइम पास :)

In reply to by manguu@mail.com

मंगु चाऊस, त्या पाप्या औरंग्याला पुढिल जन्म डुकराचा दिसला व्हता म्हन... तु बि घे कि जानुन निदान पुढल्या जन्मात युनानि हकिम तरी होशिल का...काय मग ऊपवास सुरु असतिल नाहि साबुदाणा खिचडि खाऊन.

In reply to by manguu@mail.com

हा ना राव औरंग्या झोपलाय थडग्यात खुल्दाबादला कयामतची वाट बघत

In reply to by सुबोध खरे

डुक्कर रूपात पुनर्जन्म कुणाचा होतो ते ' जशी आहे तशी' पुस्तकात सचित्र दिले आहे.

जय जवान... कवाची गोष्ट आहे म्हणायची ही तुमची. तिकड सिमेवर जवान... असलं कायबाय म्हणत्यात लोकं. तर पार हवा काढुन घेतलीत की त्यातली राव तुमी. सायेब आन् शिपाई यात तुमच्यातबी बराच भेदभाव असतोय की. तुमी राव भुताला बोलवत बसलाय.. उगा नाय त्या बीयेसयेफवाल्याला जेवणबी नीट मिळंना म्हणून व्हिडो काढायला लागला व्हता ते. जवानांची काळजी घ्या साहेब लोकांनो.

In reply to by शाली

लेखक एअर फोर्स मध्ये होते लेखक अकाउंटंट आहेत लेखक दारू पित नाहीत लेखक प्लॅनचेट वगैरे करण्यात वाकबगार आहेत त्यांची ती कला वापरून त्यांनी ऑफिसर्स वाईफ मंडळात लै नाव कमावले होते त्यावर त्यांचे मित्र जळत एकदा असेच एका अकडू कानडी बॉसच्या मिसेसच्या आमंत्रणावरून त्यांनी प्लॅनचेट केलं कानडी दाम्पत्याला प्रचिती आली पुढं माझा बी दम सरला _/\_

प्लँचेट चे साहित्य आणि कृती जरा सविस्तर सांगा की! आणि तो मराठी आत्मा कानडीतले प्रश्नला कानडीतून उत्तरे कसे काय देत होता. त्याला कानडी येत होत का? तुम्ही तर येत नसाव अस म्हणताय.

In reply to by टवाळ कार्टा

मला पण व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा मृत्यु हा "कत्ल" होता की "खुदखुशी" हे जाणून घ्यायचे आहे. त्याने फ्रेंच भाषेत सांगितले तरी चालेल, किंवा चित्रकलेचे सामान ठेऊया जवळ. तो बहुतेक चित्र काढूनच सांगेल. ओकसाहेब, घ्याच पुण्यात प्लान्चेटाची कार्यशाळा. ..

In reply to by प्रकाश घाटपांडे

ओ काका, आत्म्याला सर्व भाषा येतात. रच्याकने - माझ्या रूम पार्ट्नरने टीवीचा रीमोट हरवला तो मिळेल का? त्याने तो घरी नेला असेल का? त्याच्या टीवीला तो चालत असेल का? अशा प्रश्नांची उत्तरे मिळता का?

दाभोळकरांच्या आत्म्याला प्लँचेटवर बोलावून नेमके काय घडले हे विचारु या, म्हणजे त्या दिशेने तपास करता येईल. समजा यशस्वी झाले नाही तर एक प्रयत्न वाया गेला असे समजू.

काय लोक आहेत एकेक!! पाकृ मागायला प्लँचेट म्हणजे काय मॅगी वाटली काय? ओकसर, पुण्यात एखादा कट्टा करूयात का? लाईव्ह डेमोच द्या सगळ्यांना. बोलतीच बंद करा.

In reply to by सस्नेह

एव्हढं काय डबोलं लपवलय? कांदा चीरायला तलवार? तो कुठलासा मंत्र म्हटला की मिळेल की "की" :)

ओह काल्पनिक किस्सेत होय !, आधी मला ओक साहेब खरेच असे काही करतात की काय वाटले, आणी मलेशियाचे ते विमान नेमक्या कोणत्या समुद्रात कोणत्या अक्षांश रेखांशावर पडले आणि आता ते समुद्रात नेमके कुठे आहे ते विचारणार होतो पण काल्पनिक आहे हे लक्षात आल्यावर आपलीच गोची झाल्याचे कळले . :(

टवाळ कार्टा,
अर्थातच पण तेसुद्धा प्लांचेत करून मराठा आर्मितल्या मावळ्यांना बोलावून करता आले तर?
फारंच उत्तम. तुमच्याकडे तंत्रज्ञान असेल तर तशा स्वरूपाची एखादी सेवा सुरू करा. नंतर तिचं व्यावसयीकरण करता येईल. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अपेक्षीत तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय काय अपेक्षित असायला हवे? धागाकर्त्याकडे कोणते तंत्रज्ञान आहे याची माहिती तुमच्याकडे कशी? धागाकर्त्याकडे असलेल्या तंत्रज्ञानात कोणत्या गोष्टी नाहीत ज्यामुळे तुम्हाला समजले की ते मर्यादीत आहे?

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, धागालेखकाकडे तंत्रज्ञान आहे असा तुमचा दावा आहे. तस्मात या प्रश्नांची तुम्हीच उत्तरं द्यावी ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by टवाळ कार्टा

धागालेखकाचा कुठलाही दावा करीत नाही. रॉ व आयबी ऐवजी प्लांचेट करायची कल्पना तुमची आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

होच्च मुळी....प्लँचेट करून जर प्रश्नांची उत्तरे मिळत असतील तर अज्जून त्याचा वापर का केला जात नाहीये का आत्मे फक्त आर्मी ऑफिसर्सच्या बायकांनी आठवण काढली तरच येतात? बाकी इतक्या हिरीरीने प्लँचेटसारख्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीची पाठराखण करण्यापेक्शा जरा इथे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची जमत असतील तर उत्तरे सांगा अथवा उत्तरे येत नाहीत हे मान्य करा की....

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, आयबी व रॉ यांचं कार्य प्लांचेटकडून करवून घेण्याची कल्पना तुमची आहे. माझी नाही. तेव्हा तुम्हीच सांगा कसं करायचं ते. जमत असतील तर उत्तरे सांगा अथवा उत्तरे येत नाहीत हे मान्य करा की.... आ.न., -गा.पै.

मित्रांनो, धागा इतका धावतोय हे पाहून प्लँचेट बरेच जणांची उत्सुकता ताणतो याची मजा वाटली... पकाकाका, चित्रगुप्त आदि पुरान्यांना स्वाभाविकपणे लिहायला सुरसुरी आली आहे हे ही नसे थोडके! सैन्यदलात असेही चाळे(?) चालतात याचे नवल वाटणे साहजिक आहे. प्लँचेटने काय साध्य होते किंवा मिळवायचे याचा तारतम्याने विचार हवा. परंतु या सारख्या विधातून मृतात्म्यांशी संपर्क साधला जाऊ शकतो याचा प्रत्यय मला प्लँचेट शिवाय ऑटोरायटींग या प्रकारातून अनुभवायला मिळाला आहे. ते असो. मी धागा ज्या साठी काढला तो पॉइंट मागे पडला! मातृभारती या साईटवर आपले लेखन फुकट सादर करायची सोय आहे हे मला जसे पारितोषिक मिळून कळले ते इतरांनाही प्रेरणादायी व्हावे असे वाटत होते... त्यामधे मी सादर केलेल्या पारितोषिक लेखातून सेनादलातील वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो... त्या लेखाची विचारणा केली गेली जाईल असे वाटले होते... त्या निमित्ताने हवाईदलातील व्यक्ती कशा संवेदनशील असतात याचा प्रत्यय यावा हा उद्देश होता पण एकेकाचे प्रतिसाद वाचून मला माझ्याकडून त्या महत्वाच्या लेखमालेला प्लँचेट विषयाशी जोडून काहीच्या काहीच झाले असे वाटते...

In reply to by शशिकांत ओक

एकेकाचे प्रतिसाद वाचून मला माझ्याकडून त्या महत्वाच्या लेखमालेला प्लँचेट विषयाशी जोडून काहीच्या काहीच झाले असे वाटते...
छे छे , उलट एक नवा, वेगळा विषय चर्चेला आला हे छानच झाले. मारकसपंतांना आलेले अनुभव त्यांनी अवश्य इथे द्यावेत, आणि धागाकर्त्याने पुण्यात (वा पिंपरी-चिंचवड, डोबीवली, ठाणे, नाशीक, सोलापूर वगैरे कुठेही) खास प्लानचेट कट्टा करावा. (पुणे एवढ्यासाठी म्हटले की हाकेसरशी दहा-वीस विद्वान-विदुषी सहज उपलब्ध होतील)

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त, भरीला घालायला तुमचा हात धरणारा कोणी नसावा! असो यावरून किस्सा काव्य कट्ट्याच्या आठवला! ! सारसबागेच्या रम्य संध्याकाळी नाडीग्रंथातील काव्याच्या रसग्रहणाचा कट्टा ४ चौघात चालला होता. आसपास बागडणाऱ्या चिमुकल्यांनी लाथाडलेल्या चेंडूचे धक्के कधी पाठीवर तर कधी डोक्यावर घेऊन प्रेमळपणे पाहून त्यांच्या बरोबर आलेल्या आजोबांच्या डोळ्यातले कौतुक पहात, खाऱ्या दाण्याच्या कागदी सुरळ्या सोडत काव्यानंद आवरता घेऊन शेजारच्या खाबू चौपाटीवरील हाटेलातील कलकलीत कट्ट्याची सांगता झाली... असेच एकदा आत्मा प्रत्येक कट्टेकरीच्या मनगटावर त्यांच्या आवडत्या सुगंधी अत्तराचा ठिपका देण्यात गर्क, काही प्लेटमध्ये कुठले पदार्थ आहेत, यामधे कट्ट्याच्या विषयांतरून, 'चला लांब जायचय चलतो' अशी घाई अनुभवायला मिळाली! असो. प्लँचेट हे प्रकरण गूढ राहिलेले बरे...!

In reply to by चित्रगुप्त

मी तिसरीत असेन. स्थळ वाई. आमच्या वडिलानी प्लॅन्चेटचा प्रयोग घरी करून पहाण्याचे ठरवले. आता प्रश्न काय विचारला ते आता आठवत नाही पण लोकमान्य टिळक यान्च्या आत्म्याला बोलवले होते हे पक्के आठवते. मधे एक मोठा पाट त्यावर इन्ग्लीश मधे लिहिलेली मुलाक्षरे. मधोमधे एक काचेचा ग्लास उपडा ठेवलेला . आम्ही चौघांनी चार बाजूने ग्लासवर एकेक बोट ठेवलेले . जराशाने ग्लास हलू लागला . या मुळाक्षरावरून त्या मुळाक्षराकडे प्रवास करू लागला . मी आजच्या इतका त्यावेळी चिकित्सक नव्हतो . तिसरीतील मुल त्याला काय आयुष्याचे टक्के टोणपे माहीत असणार ? आज असे वाटते हा प्रयोग पुन्हा करुन आताच्या चिकित्सक मनाचे समाधान होते का ? की चार माणसे आपापल्या हाताने जो जोर त्या ग्लास वर लावतात त्याचा रिझल्टन्ट म्हणून काहीतरी एक अक्षराकडे ग्लास जातो बाकी आत्मा बित्मा काही नाही असे दिसून येते.? असो. अजून करून काही पाहिलेले नाही. बाकी विषय तो नाही एका सैनिकाचे एक अनुभव कथन म्हणून मला लेख आवडला .

In reply to by शशिकांत ओक

सादर केलेल्या पारितोषिक लेखातून सेनादलातील वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो... त्या लेखाची विचारणा केली गेली जाईल असे वाटले होते...
1 मिसळपावकर आपल्या मित्रांनो, पारितोषिक विजेते लेखन प्रसिद्ध झाले आहे. आपण देखील काही आपले लेखन सादर करुन पहावे...

In reply to by शशिकांत ओक

ओक काका तुम्ही दिलेल्या दुव्यावर गेलो तर ते अमुक तमुक आयडी ने साईन इन करा म्हणतय . आम्हाला सरळसोट चाचण्यासारखे काहीतरी कराना जसे की ब्लॉगबीगवर पब्लिश करा अथवा इथेच अधिक व्य्वस्थित गोषवारा द्या; म्हणजे अमुक साईन इन तमुक साईन न करता सगळ्यांना अभ्यासणे सुलभ होईल .

प्लॅन्चेट खरेच असते , मी स्वतः करुन पाहिले आहे ! अगदी अविश्वसनीय रित्या खरे ! नो किडिंग !!

प्लॅन्चेट कसे करावे याची कृती द्या ! ( व्हेजीटेरियन आत्मे शोधणे आले )

रच्चाकने, प्लँचेट सह कट्टा झाला SSS च पायजेले सर्व आजी - माजी, भौतिक - अधिभौतिक, उपस्थितीत - आंजापस्थित (व्हिडो कॉन्फरन्स द्वारे) मिपाकरांसह प्लँचेट कट्टा झालाच पायजेले. ओक काका, काही मान्यवर मिपात्म्यांना प्लँचेट द्वारे या कट्टयाला आमंत्रित करता येईल का? मला वाटते ते आनंदाने येतील.

In reply to by शशिकांत ओक

पुर्वी मी अशी पुस्तके वाचायचो. आता गतस्मृती चा भाग म्हणून परत वाचू लागलो आहे. मृत्यु नंतरचे जीवन- लेखक रेमंड मूडी

In reply to by प्रकाश घाटपांडे

कुणी डॉक्टरेट झालेल्या एक मराठी बाईही या विषयावर व्याख्याने देतात आणि त्यांचेही काहीशा अशाच नावाचे पुस्तक आहे. मला आता त्यांचे नाव आठवत नाही.

अमच्या लहानपणी इमारतीतल्या तमिळ कुटुंबाकडे प्लांचेट व्हायचं. त्यांच्याकडची दोन मुलं (आठवी नववीतली) बरोबरची होती त्यांनी दाखवल्याप्रमाणे मे महिन्याच्या सुटीत दुपारी करायचो. एक ठरिविक नातेवाइकाला तो बोलवायचा. एक पत्र्राचे झाकण वापरायचो. झाकण फिरायचे. उत्तरे काही खास नसायची. वीसेक मिनिटांनी आत्मा थकायचा. व्यसनच लागले. पण एकदा ते झाकण असे काही गरागरा फिरायला लागले की पळालो आणि खेळ बंद पडला. फार पावरफुल आत्मा असला तर पितळी स्टोव वापरतात म्हणे. प्लांचेट अति करून लोक वेडे झाल्याने तो प्रकार कमी झाला. पण आता डाइनमो जादुगाराच्या जादू पाहिल्यावर हे शक्य आहे असे वाटू लागले.

अतिंद्रिय सामर्थ्यवाल्या बाईंबद्दल वाचले. त्या बातमीत बाईंचा ईमेल दिलेला आहे. संपर्क करून बघायला हवे. कोणी करायचा ? काय विचारायचे ?

In reply to by चित्रगुप्त

नमस्कार अतींद्र सामर्थ्यवाल्या मेहर किंवा मेहरा श्रीखंडे बाई माझ्या संपर्कात पुर्वी होत्या. कारण त्यांना ऑटोरायटिंग संदर्भात अनुभव ऐकायला आवडत असावे...नंतर त्यांनी पीएचडी केल्याचे दिसते.... ऑटोरायटिंग मधील माझे संपर्क गुरू मेहेर बाबांवरून त्यांचे नाव पडले किंवा ठेवले असावे का हे माहित नाही... हवाईदलातील एक ऑफिसरचे पहिले नाव मेहेर असे त्याच्या आई-वडिलांनी मेहेरबाबांच्या आठवणी खातर ठेवले होते. तसेच काही असेल तर माहीत नाही. या त्यावेळच्या फ्लाईंग ऑफिसर मेहर बरोबर घडलेला ऑटोरायटिंगचा किस्सा नंतर कधीतरी ....