म्हणजे तिला मी पहिल्यांदा पाहिलेले तेव्हाच आतून काहीतरी हललेले. पण सांगतोय कोणाला. सारेच हसले असते.
मी अगदीच पोरसवदा भासत होतो तिच्यासमोर. ती अगदीच गोलमटोल नव्हती, पण पुरेशी धष्टपुष्ट होती. अगदीच गोरी नसली, तरी गव्हाळ उजळ कांतीची होती. अगदीच मराठी नाही, पण मराठी बोलता येणारी होती. आयुष्यात पहिल्यांदा मी एका गुजराती मुलीच्या प्रेमात पडलो होतो, अगदी पहिल्याच नजरेत पडलो होतो.
तिलाही माझ्यात नक्कीच काहीतरी आवडले होते, ते ही पहिल्याच नजरेत. तिची नजरच तसे सांगत होती. पण माझा तो पहिल्या जॉबचा पहिलाच दिवस होता. आणि ती तिथे आधीच सरावलेली खेळाडू होती. मागाहून समजले की तिलाही जॉईन करून चारच महिने झाले होते. तिचाही तो पहिलाच जॉब होता. पण तरीही तिच्यामानाने मी नवखाच होतो.
कोणीतरी मग दुसर्याच दिवशी चिडवाचिडवीत माझी तिच्याशी जोडी जमवली. आणि पुढे त्या चिडवण्याला आणखी कोणी खतपाणी घालू नये म्हणून उगाचच, अगदी उगाचच मी तिच्याशी एकदा तुसडेपणाने वागलो. फक्त एकदाच..
बस्स ! मग ज्या मुलांनी मला तिच्यावरून चिडवायला घेतले होते, तेच आता आमच्यातील खुन्नसचे किस्से रंगवू लागले. आमच्यात तसे काहीही नसताना आमच्यातील शीतयुद्धाच्या कहाण्या रचू लागले. मी देखील वेड्यासारखा, कसेही का होईना, तिच्यासोबत आपले नाव जोडले जातेय यातच आनंद मानू लागलो. कधीतरी फटक्यात या सर्व अफवांतील फोलपणा जगासमोर येईल आणि आमच्यातील तथाकथित शत्रुत्व प्रेमात बदलेल या विचारांत रमू लागलो. हळूहळू मला जाणवत होते, की मी तिच्यात आता गुंतू लागलो होतो.
जेव्हा ती माझ्याकडे बघायची, रागानेच बघायची. मी सुद्धा माझी नजर कोरडीच ठेवायचो. पण नेहमी माझ्या नजरेला नजर मिळेल, अश्याच जागी ती बसायची.
माझ्या अगदी शेजारून जायची. तिच्यासाठी मी अस्तित्वातच नाही असे दर्शवून जायची. पण ज्या दिवशी मी ऑफिसला यायचो नाही, तेव्हा हलकेच माझी चौकशीही करायची.
मी कधी तिची खोडी काढल्यास, थेट माझ्याशी भांडायलाही लाजायची. पण तिच्यावरून मला चिडवणार्या, माझ्या मित्रांशी लाजत लाजत बोलायची.
एक वेगळीच केमिस्ट्री होती आमच्यात. तिचे नाव घेताच लोकांना मी आठवायचो, माझे नाव घेताच ती आठवायची..
वर्ष गेले अश्यातच..
आणि मग ठरवले आता बोलायचे..
निमित्त होते दिवाळीनिमित्त ऑफिसमधील एका कार्यक्रमाचे. प्रत्येकाला दहाबारा कागदांचे चिटोरे वाटण्यात आले होते. आणि ठरले असे होते की प्रत्येकाने आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तींबद्दल त्या कागदावर लिहून तो चिटोरा त्यांच्यात्यांच्या डेस्कवर लावायचा. स्वत:चे नाव मात्र लिहायचे नाही. आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात याचा थेट फिडबॅक..
मला फक्त एकाच कागदात ईंटरेस्ट होता. काय लिहू, आणि काय नको...
अशी संधी पुन्हा येणार नव्हती... थेट भिडायचेच ठरवले !
ठरलं ! लिहून यायचे, तू मला आवडतेस !
पण भावना नेहमी मातृभाषेतच पोहोचतात. मराठी लिहिता बोलता येणारी असली तरी होती मात्र ती गुजरातीच.. मग मेहुलची मदत घेतली.. आणि गुजराती भाषेतील सर्वात गोड वाक्य त्या कागदावर अवतरले,
"तू मन्ने गमे छे ! "
दुपारच्या सत्रात बाहेर सारे कार्यक्रमात मग्न असताना मी हळूच तो कागद तिच्या डेस्कवर डकवून आलो. जणू काळजाचा छोटासा तुकडाच तिथे ठेवून आलो. आता प्रतीक्षा होती ते तिने माझे काळीज वाचण्याची.
प्रतीक्षा संपली. ती जागेवर आली. आम्ही टोळके करून जवळपासच उभे होतो. तिने तो डकवलेला कागद काढला. तो तसाच हातात घेऊन मुद्दामच आमच्या ग्रूपसमोर आली. आणि आम्हाला स्पष्ट दिसेल असे दोन्ही हातांत धरून तो टर्राटरा फाडला..
जरा धक्का लागल्यास खळ्ळकन फुटावे अश्या काचेच्या हृदयावर कोणीतरी तीक्ष्ण खिळ्याने कर्रकचून ओरखडा ओढावा असे झाले..
पण ते शेवटचेच ...
त्यानंतर मन कोडगे करून घेतले. पुन्हा त्याला नजरांचे चुकीचे अर्थ काढण्यापासून परावृत्त केले. साधारण दिडदोन महिन्यातच मला नवीन जॉब लागला आणि मी तिथून बाहेर पडलो. तेथील काही मित्र नंतरही संपर्कात होते. पण पुन्हा कधी तिचा विषय निघाला नाही. पुढे तिचे लग्न झाले हे मात्र उडत ऊडत कानावर आले. पण फारसे काही वाटले नाही. कारण एव्हाना माझेही झाले होते.
पण जगही किती छोटे असते ना..
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेत अखेर आमची पुन्हा एकदा एकाच कंपनीत गाठ पडली.
बावरलेली नजर आम्हा दोघांची. काय बोलावे, कसे बोलावे. कि बोलूच नये. एक अवघडलेपण.
तरी सहा वर्षे झाली.. पण फरक असा काहीच नाही..
शेवटी मीच ठरवले, दोघांचीही लग्ने झाली आहेत. जे होते ते माझे एकतर्फी होते. उत्तरही तेव्हाच मिळाले होते. म्हणून संकोच सोडून हसतच तो विषय काढला, आणि जे झाले ते विसरून जाऊया म्हणालो..
चेंडू मी तिच्या कोर्टात ढकलला होता. आता अवघडून जायची वेळ तिची होती.
पण तिच्या डोळ्यात अविश्वास होता !
ते.. ते.. तू लिहिलं होतंस?? पण असं कसं.. तू मन्ने गमे छे.. ते अक्षर तर मेहुलचे होते ना ....
थोडसं गरगरलं मला.. आणि ते तर होणारच होते.
क्षणात जे एवढ्या वर्षांची कॅसेट रिवाईंड होत माझ्याच डोक्यावर आदळली होती...
- भन्नाट भास्कर
वाचन संख्या
8862
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्र्...=))) मस्तं लिहिल आहे.
मस्त लिहीलय
Such a cute story आवडली :-)
आरारारारा रारा!!!
मन्ने
@ राही,
In reply to मन्ने by राही
रुखरुख वाटली राव वाचून . लेखन
हा हा छान कल्पनाविलास.
In reply to रुखरुख वाटली राव वाचून . लेखन by खिलजि
भन्नाटच रे भास्करा.
भारीच लिहिलंय.
अर्र!!
अर्र र्र !
तेवढं नाव नका विचारू, लेखात
In reply to अर्र र्र ! by सस्नेह
मस्तच
माई आयुष्यात अश्या सर्व
In reply to मस्तच by माईसाहेब कुरसूंदीकर
भारीच
खुसखुशीत किस्सा
तिन्नेचे लग्न मेहूलसोबत झाले
नाही.
In reply to तिन्नेचे लग्न मेहूलसोबत झाले by सतिश गावडे
१ वर्ष???? मग दुसरे काय होणार
अश्या नाजूक बाबतीत मुखदुर्बळ
In reply to १ वर्ष???? मग दुसरे काय होणार by टवाळ कार्टा
प्रतिसादांबद्दल धन्यवाद :)
गोड
अरेरे. नेहमी प्रेमभंगा च्या
वाईट झालं!
कथा आवडली पण तुमच्या
म्हणून भास्कराचार्य मातृभाषा उत्तम!
धन्यवाद,
In reply to म्हणून भास्कराचार्य मातृभाषा उत्तम! by जेम्स वांड
खूप मनापासून लिहीले आहे
प्रत्येकाने प्रत्येकालाच
In reply to खूप मनापासून लिहीले आहे by पुष्कर जोशी
हा हा!
(No subject)
In reply to हा हा! by तिमा
:-) :-) :-)
In reply to हा हा! by तिमा
ढोकळा