Skip to main content

ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 20/02/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
अनुक्रमणिका | १. इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | २. मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | ३. कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | ४. हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | ५. रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | ६. बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | ७. युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ८. ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब | ९. थायरॉइड हॉरमोन्स आणि त्यांचा गोतावळा आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत: ग्लुकोज मेदाम्ले ग्लिसेरॉल किटोन बॉडीज अमिनो आम्ले यांपैकी कशाचा वापर उर्जानिर्मितीसाठी करायचा हे पेशीचा प्रकार आणि त्यातली परिस्थिती यानुसार ठरते. बहुसंख्य पेशींच्या बाबतीत ग्लुकोज हे महत्वाचे इंधन आहे. काही पेशी त्याव्यतिरीक्त इतर इंधनेही वापरू शकतात. पण, रक्तातील लालपेशी मात्र फक्त ग्लुकोजच वापरतात. म्हणजे त्या ‘खाईन तर तुपाशी’ या प्रकारच्या पेशी आहेत. मेंदू सुद्धा शक्यतो ग्लुकोजचीच मागणी करतो पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो इतर इंधन वापरू शकतो. आहार आणि ग्लुकोजचा पुरवठा आता एक नजर टाकूया आपल्या रोजच्या आहारावर. आहाराचा ६०-७०% भाग हा कर्बोदकांच्या रुपात असतो. पोळी, भाकरी आणि भात हे आपले पोट भरायचे मुख्य पदार्थ. त्या सगळ्यांत असतो ‘स्टार्च’. तर मांसाहारातून ‘ग्लायकोजेन’ हे कर्बोदक मिळते. मुळात स्टार्च आणि ग्लायकोजेन हे ग्लुकोजचे polymers आहेत. त्यांचे पचनसंस्थेत पूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला भरपूर ग्लुकोज मिळते. तसेच आपण आहारात अनेक गोड पदार्थ, दूध व फळेही घेतो. त्यातून आपल्याला ग्लुकोजची भाईबंद असलेली अन्य काही कर्बोदके मिळतात. ती पचनसंस्थेतून शोषून जेव्हा पेशींत पोचतात तेव्हा त्यांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात कुठलेही कर्बोदक आहारात घेतले तरी पेशींमध्ये शेवटी त्याचे ग्लुकोज बनवले जाते. त्यामुळे ग्लुकोज हेच आपल्या शरीराचे मुख्य इंधन ठरते. कर्बोदकांच्या पचनातून निर्माण झालेला ग्लुकोज नंतर रक्तात शोषला जातो. रक्तप्रवाहातून तो शरीराच्या सर्व अवयवांना पोचवला जातो. आता तो प्रत्यक्ष पेशीत शिरणे ही एक महत्वाची पायरी असते. यकृताच्या पेशींमध्ये तो अगदी सहज शिरतो पण स्नायू आणि मेदपेशींमध्ये मात्र तसे होत नाही. या दोन्हीकडे शिरण्यास त्याला इन्सुलिनची मदत लागतेच. पेशींमध्ये ग्लुकोजचा वापर तीन प्रकारे होतो: १. ५०% लगेचच ऊर्जानिर्मितीसाठी वापर. उरलेला ५०% हा पेशींना लगेच लागणार नसतो. म्हणून त्याचा ‘साठा’ खालील रूपांमध्ये होतो २. १०% ग्लुकोजचे ‘ग्लायकोजेन’ मध्ये रुपांतर होते आणि ३. ४०% चे रुपांतर मेदात होते. ग्लुकोजचा साठा करण्याचे मार्ग आता ग्लुकोजचे जे दोन साठे होतात त्यांचा हेतू समजून घेऊ. इथे मला बँकेत पैसे ठेवण्याच्या ज्या नेहमीच्या पद्धती आहेत त्यांची उपमा द्यावी वाटते. समजा, मला रोज १०० रु. मिळतात. त्यातले ५० मला रोजच्या खर्चासाठी लागतात, म्हणून मी ते घरीच ठेवतो. उरलेल्या ५० मधले १० रु. मला त्या आठवड्यात कधीही लागू शकतात. पण, मला ते घरी ठेवायचे नाहीत कारण ते लगेच खर्च होण्याची भीती वाटते. मग मी ते माझ्या बचत खात्यात ठेवतो. शेवटी जे ४० उरले आहेत ते मला कधीतरी अडीअडचणीतच लागतात. म्हणून मी त्यांची मुदत ठेव बनवतो. आता वळूया ग्लुकोजकडे. त्याचा १०% साठा हा ग्लायकोजेनच्या रुपात केला जातो. हे संयुग मुख्यतः यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.यापैकी यकृतातील ग्लायकोजेनचे गरजेच्या वेळी अत्यंत वेगाने ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात हे झाले ग्लुकोजचे बचत खाते! आता त्याचा उपयोग बघा. रोज रात्रीचे जेवणानंतर ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या न्याहारीपर्यंत आपण ‘उपाशी’ असतो. तेव्हा मध्यरात्र ते सकाळ या काळात यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. मग सर्व पेशी ते वापरू लागतात. म्हणजेच, रोज दिवसभरात आपण आहारातला ग्लुकोज थेट वापरतो तर रात्रीत हा ‘बचत’ केलेला ग्लुकोज वापरात आणतो. शेवटी जो ४०% ग्लुकोज उरलाय त्याचे मेदात रुपांतर केले जाते आणि ते मेद (fat) शरीराच्या मेदसाठ्यांमध्ये( adipose tissue) साठवले जाते. हे साठे खर्या अर्थाने ‘fixed deposits’ असतात! जेव्हा काही कारणाने दीर्घकाळ उपोषण घडते, त्या काळात त्यांचे विघटन करून त्यातून काही प्रमाणात ग्लुकोज मिळवला जातो. तसेच त्यातून मिळालेली मेदाम्लेही इंधन म्हणून वापरली जातात. आपण साठवलेला मेद ही एका अर्थी आपली ‘संपत्ती’च असते. ज्याप्रमाणे व्यवहारातील कुठलीही संपत्ती निर्माण करण्यास मुळात आपल्याकडे भरपूर ‘चलन’ असावे लागते, तद्वत शरीरात जेव्हा ग्लुकोजचा पुरवठा भरपूर असतो तेव्हाच आपण मेदरुपी संपत्ती निर्माण करतो. ज्याप्रमाणे गरजेहून अधिक संपत्ती आयुष्यात कटकटी निर्माण करू शकते त्याप्रमाणे मेदाचे साठेही नको इतके झाल्यास काही व्याधी उत्पन्न होतात. शरीरातील ग्लुकोजचे कार्य १. सर्व पेशींमध्ये इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीत वापर २. ग्लुकोजपासून ribose तयार होते, जे DNA व RNA यांच्या उत्पादनासाठी लागते. ३. पुरुषाच्या जननेंद्रियात ग्लुकोजपासून fructose तयार होते, जे शुक्राणूंना उर्जा पुरवते. ४. स्तनांमध्ये स्तनपानाच्या काळात जे Lactose तयार होते त्यासाठी ग्लुकोज आवश्यक असते ५. ग्लुकोज हा अन्य मेद व प्रथिनांशी संयोग पावतो आणि त्यातून काही महत्वाची संयुगे तयार होतात, जी पेशींच्या बळकटीसाठी आवश्यक असतात. या विवेचनातून लक्षात येईल की ग्लुकोज हा शरीरातील अनेक रासायनिक घटनांचा मूलाधार आहे. ग्लुकोजचा चयापचय आणि हॉर्मोन्सचे कार्य जेव्हा आपण नियमित पुरेसा आहार घेतो तेव्हा ग्लुकोजचा ग्लायकोजेन व मेदांच्या रुपात साठा केला जातो. या दोन्ही कामांत इन्सुलिनचा वाटा मोठा आहे. हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. जेवणानंतर जेव्हा आपली ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते तेव्हा इन्सुलिनही अधिक प्रमाणात रक्तात सोडले जाते. ते पेशींमध्ये ग्लुकोजचा व्यवस्थित वापर आणि साठा करण्यात मोलाची मदत करते. त्याच्या या महत्वाच्या क्रियेमुळेच ग्लुकोजची वाढलेली रक्तपातळी अल्पावधीत पूर्ववत केली जाते. तेव्हा पुरेसा आहार आणि इन्सुलिनचे कार्य यांचा मिलाफ होऊनच ग्लुकोजपासून मेदनिर्मिती होते. जेव्हा बऱ्याच तासांसाठी आपण आहार घेत नाही तेव्हा शरीरातील घडामोडी बघू. सुरवातीस रक्तातील ग्लुकोज पेशींकडून वापरले जाते. ते बऱ्यापैकी वापरल्यावर त्याची रक्तपातळी कमी होऊ लागते. आता हा ‘संदेश’ अन्य काही हॉर्मोन्सकडून टिपला जातो आणि ती अधिक प्रमाणात स्त्रवू लागतात. या हॉर्मोन्समध्ये प्रामुख्याने ‘ग्लुकॅगॉन’ व ‘एपिनेफ्रीन’ चा समावेश आहे. मुळात ही दोन्ही ‘इन्सुलिन-विरोधी’ गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती या बरोबर इन्सुलिनच्या विरुद्ध असतात. आता ती कार्यरत झाल्यावर यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. जोपर्यंत पुढील अन्नग्रहण होत नाही तोपर्यंत हे ग्लायकोजेन ग्लुकोजची रक्तपातळी टिकवते. जास्तीतजास्त १६ तासांच्या उपासापर्यंत हा ग्लायकोजेनचा साठा टिकतो. समजा, आता एखाद्याने त्याहीपुढे उपोषण करायचे ठरवले तर काय होते ते पाहू. आपण वर पाहिले आहे की लालपेशी आणि मेंदू यांना सतत ग्लुकोज लागतेच.त्यामुळे आता ती पातळी टिकवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया यकृतात होते. तिला ‘नव-ग्लुकोज निर्मिती’ असे म्हणतात. ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीरातील प्रथिने आणि मेद यांच्या विघटनातून ग्लुकोज तयार होतो आणि मग रक्तात सोडला जातो. किंबहुना या अनोख्या क्रियेमुळेच माणूस( मर्यादित काळाचे) उपोषण करूनही जिवंत राहतो. या प्रक्रियेस गती देण्याचे काम ग्लुकॅगॉन व एपिनेफ्रीन ही हॉर्मोन्स करतात. रक्तातील ग्लुकोजची योग्य पातळी आपले खाणे आणि ही पातळी यांचा थेट संबंध आहे. सकाळी उपाशी पोटी ही सर्वात कमी असते( ७० – १०० mg/dL ). जेवणानंतर ती वाढू लागते आणि एक तासाने ती सर्वोच्च असते. दरम्यान जे वाढीव इन्सुलिन स्त्रवलेले असते त्याच्या प्रभावाने ती पुढील तासाभरात बऱ्यापैकी खाली येते. निरोगी अवस्थेत जेवणानंतर दोन तासाने ती १४० mg /dL चे आत असते. ज्या लोकांचा जेवणानंतरचा ‘इन्सुलिन-प्रतिसाद’ अत्युत्तम असतो, त्यांचे बाबतीत तर ती उपाशी-पातळी इतकी खाली येते. आपण आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जेवढे वाढवू त्याच प्रमाणात स्वादुपिंड अधिक इन्सुलिन सोडते. ग्लुकोजची पातळी खाण्यानंतर बेफाम वाढू नये यासाठीच इन्सुलिनचा लगाम आपल्याला निसर्गाने दिला आहे. इन्सुलिन आणि इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वयाने संपूर्ण २४ तासांत ग्लुकोज-पातळी नियंत्रित राहते. बिघडलेल्या ग्लुकोज-पातळीचे परिणाम जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन आणि त्याविरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वय बिघडतो तेव्हा अर्थातच ग्लुकोजची रक्तपातळी जास्त वा कमी होते. या दोन स्थिती अशा: १. ग्लुकोज अधिक्य(hyperglycemia) : याची महत्वाची कारणे अशी: अ) इन्सुलिनची कमतरता आ) इन्सुलिनचा पेशींवर प्रभाव न पडणे (resistance) इ) इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्सचे अधिक्य यापैकी (अ) आणि (आ) मिळून जो आजार होतो तोच ‘मधुमेह’. मधुमेह हे अवाढव्य प्रकरण असून तो एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही. मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे! निरोगी अवस्थेत या दोघांचा कसा सुंदर मिलाफ होतो ते आपण पाहिले आहे. किंबहुना ही पूर्वपीठीका समजून घेणे हे मधुमेहाबद्दल वाचण्यापूर्वी आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कार्याअभावी गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात साठून राहतो कारण तो पेशींमध्ये शिरू शकत नाही. मग हा साठून राहिलेला ग्लुकोज ‘बिनकामाचा’ ठरतो आणि तो कटकटीही निर्माण करतो. २. ग्लुकोज-कमतरता (hypoglycemia) : याची महत्वाची कारणे अशी: अ) जे मधुमेही इन्सुलिनचे उपचार घेत असतात त्यांच्यात कधीकधी त्याचा ‘ओव्हरडोस’ होतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज जास्त प्रमाणात पेशींत शिरते आणि रक्तपातळी नको इतकी कमी होते. आ) अतिरिक्त मद्यपान : जर एका बैठकीत फाजील मद्यपान केले आणि त्यानंतर अन्न खायची शुद्धी राहिली नाही तर हा बाका प्रसंग ओढवतो. अल्कोहोलच्या प्रभावाने पेशींमधील नव-ग्लुकोजनिर्मितीस मोठा अडथळा होतो. जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होत होत ४० mg/dL इतकी उतरते तेव्हा रुग्णात लक्षणे (चक्कर, आकलन न होणे) दिसू लागतात. याहीपुढे जर पातळी २० mg/dL चे खाली उतरली तर मात्र रुग्ण बेशुद्ध पडतो. ही स्थिती धोकादायक असते आणि तेव्हा रुग्णास तातडीने ग्लुकोज पुरवावे लागते. .....तर असे हे ग्लुकोज – आपले महत्वाचे इंधन. आपल्याला क्षणोक्षणी लागणारे. तसेच आपल्या पेशींचा रासायनिक मूलाधार. मात्र त्याची रक्तपातळी योग्य प्रमाणातच हवी. ती फार जास्त झाल्यास कटकटीची तर फार कमी झाल्यास धोकादायक ठरणार. आपणा सर्वांची ती कायम आटोक्यात राहो या सदिच्छेसह लेख संपवतो. ***************************************************************************** टीप: आरोग्य लेखमालेतील या १०व्या लेखाबरोबरच ही माला आता थांबवत आहे. यादरम्यान वाचकांनी जे अजून काही विषय सुचवले आहेत त्यावर आता चिंतन व मनन करेन. कालांतराने त्यावर स्वतंत्र लेख लिहीता येतील. आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45341
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

मधुमेह उपचारांची नवी दिशा या आजारावर साध्या गोळीपासून ते इन्शुलिनच्या विविध पंपांपर्यंत अनेक प्रकारचे उपचार सध्या उपलब्ध आहेत. तरीदेखील सर्व रुग्णांना समाधानकारक वाटेल अशा उपचारांची गरज कायम आहे. अलीकडे संशोधकांनी अल्ट्रासोनिक लहरींचा शरीरावर ठराविक भागात मारा करून काही प्रयोग केले आहेत. यामध्ये पोटावरील यकृताचा भोवतालच्या भागामध्ये ठराविक प्रकारच्या लहरींचा बाहेरून मारा केला जातो. त्यातून ग्लुकोजचा चयापचय आणि इन्शुलिनचे कार्य सुधारते असे प्राण्यांमध्ये दिसून आले आहे. नुकताच एक प्रयोग मानवी स्वयंसेवकांरही करण्यात आलेला आहे त्याचे निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध व्हायचे आहेत.

इथे दिली आहे : वय वर्षे 2 ते 60 वर्षापर्यंत रिकाम्या पोटी ग्लुकोजचा टप्पा ७० -१०० mg/dL असा असतो. .... कुठून कॉपी करतात असले तक्ते कुणास ठाऊक ?

मधुमेहाच्या पहिल्या प्रकारासंदर्भात (T 1) काही महत्त्वाची माहिती प्रकाशित झालेली आहे. सुमारे 201 देशातील अशा रुग्णांचा अभ्यास करून एक महाविदा तयार केलेला आहे . या आजाराची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातली वाटचाल अशी असणार आहे: १. या आजाराची सुरुवात लहान वयात होते असे आता राहिलेले नाही. या आजाराने.बाधित रुग्णांचे जागतिक सरासरीचे (median) वय 37 झाले आहे. २. सध्या या आजारामुळे बाधित असलेल्या सुमारे ८४ लाख रुग्णांपैकी सुमारे वीस टक्के रुग्णांचा मृत्यू वयाच्या 25 वर्षांच्या आत होतो. आजाराचे वेळीच निदान न होण्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. ३. सन २०४० पर्यंत एकूण रुग्णांची जागतिक संख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे. ही वाढ मुख्यत्वे गरीब देशांमध्ये होईल.

सर्व मधुमेहीना जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा ! आज बालदिन सुद्धा आहे. भारतातील एकूण मधुमेह रुग्णांपैकी 12 टक्के रुग्ण बालके आहेत.

जागतिक मधुमेह नियंत्रणासंबंधी WHO ने नुकतीच सन 2030 पर्यंतची उद्दिष्टे जाहीर केलेली आहेत : • मधुमेह असणाऱ्या 80 टक्के लोकांचे रोगनिदान झाले पाहिजे • 80 टक्के मधुमेही रुग्णांची ग्लुकोज पातळी नियंत्रणात रहावी • 80 टक्के मधुमेही रुग्णांचा रक्तदाब 140 /90 च्या आत असावा • टाईप 1 मधुमेह असणाऱ्या 100% रुग्णांना इन्शुलिन आणि घरच्या घरी ग्लुकोजपातळी स्वतः मोजण्याची यंत्रणा उपलब्ध व्हावी

प्रगतीपथावरील संशोधन: stevia या वनस्पतीपासून बनवलेला गोड पदार्थ सध्याच्या साखरेइतकाच (किंवा जास्त) गोड, परंतु न्यूनतम उष्मांकयुक्त. https://scitechdaily.com/a-sweeter-more-environmentally-friendly-altern…

मधुमेह (प्रकार २) नियंत्रित करण्यासाठी 21 प्रकारच्या वनस्पतींवर नुकतेच भारतात संशोधन झालेले आहे. या उपयुक्त वनस्पतींमध्ये विजयसार, जांभूळ, जिरे, दारूहरीद्र, तोंडली, बेल, मेथी, लिंबू, आवळा आणि हळद यांचा समावेश आहे. यातील काही वनस्पतींपासून BGR 34 हे औषध तयार करण्यात आलेले आहे. सदर संशोधन JIPMER - पुदुच्चेरी आणि AIIMS -कल्याणी या संस्थांमध्ये झाले. संबंधित शोधनिबंध "वर्ल्ड जर्नल ऑफ डायबिटीस" मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

गव्हाचे पदार्थ खाल्ल्यानंतर वाढणारा ग्लुकोज निर्देशांक हा मधुमेहींच्या दृष्टीने कळीचा मुद्दा. अलीकडेच पंजाब कृषी विद्यापीठाने गव्हाची एक नवी जात (PBW RS1) विकसित केली आहे. या गव्हात रेझीस्टंट स्टार्चचे प्रमाण जास्त आहे. हा गहू आतड्यांमध्ये सावकाश पचतो आणि त्यामुळे ग्लुकोज निर्देशांक नियंत्रणात राहतो. तसेच या गव्हाच्या पदार्थांमुळे पोट भरण्याची भावना लवकर येते. ( बातमी : छापील इंडियन एक्सप्रेस, १० जुलै 2023).

निर्बंध
एनसीपीसीआर म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स या आस्थापनेने नुकतीच सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्राहक व्यवहार विभागांना नोटीस पाठवून बोर्नव्हिटासह तत्सम कोणतीही पेये आरोग्यदायी पेये म्हणून विकली जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे. ..... बालरोगतज्ज्ञांनी मात्र या कंपन्यांचे दावे खोडून काढले होते. त्यांच्या मते आरोग्यदायी पेये म्हणून मुलांना दिल्या जाणाऱ्या पेयांमध्ये असलेली साखर मुलांच्या रोजच्या हालचालींसाठी अतिरिक्त ठरते. या साखरेचे सेवन केल्याने मुलांमध्ये तृष्णा, चिडचिड, थकवा इत्यादी गोष्टी वाढू शकतात. आरोग्यदायी पेय म्हणवल्या जाणाऱ्या पेयांमुळे प्रत्यक्षात मुलाचे आरोग्य सुधारत नाही.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त (७ एप्रिल) सर्वांना उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा ! सद्यस्थितीत भारतातील प्रमुख आजारसमस्या अशा आहेत : १.सर्वच राज्यांमध्ये बिगर-संसर्गजन्य रोग आणि अपघाती इजा यांचे प्राबल्य आहे. या दोन समस्यानी मिळून, संसर्गजन्य रोग आणि बालरोग यांना मागे टाकले आहे. २.परंतु उत्तरेकडील गरीब राज्यांमध्ये मात्र हगवण, श्वसनविकार, लोहन्यूनता, क्षयरोग आणि नवजात बालकांचे आजार या प्रमुख समस्या आहेत. ३.बिगर-संसर्गजन्य रोगांमध्ये, हृदयविकार, मधुमेह, श्वसन अडथळ्याचे विकार, मनोविकार, मेंदूविकार, कर्करोग, हाडांचे विकार आणि दीर्घकालीन मूत्रपिंड विकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. ४. विविध आजारांचे धोके वाढवणारे घटक असे दिसले आहेत : *कुपोषण आणि अतिपोषण *उच्च रक्तदाब *उपाशीपोटीची वाढलेली ग्लुकोज पातळी *वाढलेली कोलेस्टेरॉल पातळी या घटकांचा वाटा एकूण आरोग्यसमस्यांच्या एक चतुर्थांश आहे. असे हे सर्वसाधारण चित्र.

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद कुमारजी! खुप छान माहिती आहे.जागतिक आरोग्य दिवस पण कशाप्रकारे सामूहिकरित्या याविषयी ऊहापोह करावा हे समजत नव्हते.तुमची ही माहिती स्टेटसला आज ठेवली, खुप जणांना आवडली. प्लीज प्रश्नाचा आवाका मोठा आहे पण थोडक्यात सांगाल का?
उपाशीपोटीची वाढलेली ग्लुकोज पातळी
म्हणजे काय व कसे?

In reply to by Bhakti

ही माहिती स्टेटसला आज ठेवली
>>> धन्यवाद !
उपाशीपोटीची वाढलेली ग्लुकोज पातळी म्हणजे काय व कसे?
चांगला प्रश्न आहे. निरोगी माणसात उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी ७० - १०० mg/dL असते. या पुढील टप्प्यात जेव्हा ती १०१ - १२५ mg/dL या रेंजमध्ये येते त्याला आपण बिघडलेली पातळी ( IFG) किंवा मधुमेहपूर्व अवस्था म्हणतो. त्यानंतर सुमारे दहा वर्षांच्या आतच ( नक्की हे संक्रमण नक्की किती वर्षांमध्ये होईल हे अर्थातच आनुवंशिकता आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असते) ही पातळी १२६ mg च्या वर जाऊ शकते आणि मधुमेह-निदान होते. म्हणूनच निरोगीपणात चाळणी चाचण्यांचे महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला एखाद्याची पातळी मधुमेहाच्या पूर्व अवस्थेतच मिळते तेव्हा आपण आहार आणि व्यायामासारखे नैसर्गिक उपाय राबवू शकतो. सध्याच्या भारतातील परिस्थितीत खूप जण अशा पूर्व अवस्थेमध्ये आहेत. तसेच, जिथे आरोग्य सुविधा पुरेशा उपलब्ध नाहीत त्या भागात चाचण्याही न झाल्यामुळे असे अनेक छुपे लोक आहेत. ते शोधून काढणे महत्त्वाचे आहे.

नवे संशोधन बटाटा हा अनेकांना खाण्यास अत्यंत प्रिय असतो. परंतु त्यातील गच्च भरलेल्या स्टार्चमुळे तो ग्लुकोज निर्देशांकाच्या बाबतीत काळजी उत्पन्न करतो. यावर उपाय म्हणून इसराइलमधील संशोधकांनी जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या मदतीने PoLoPo या प्रकारचे नवे बटाटे तयार केले असून ते प्रथिनसमृद्ध आहेत. सन 2026 मध्ये ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकतील.

In reply to by हेमंतकुमार

या संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे, गरीब देशांमधील कुपोषित बालकांसाठी या नव्या बटाट्याच्या रूपाने एक चांगला (बऱ्यापैकी) स्वस्त आणि मस्त प्रथिनयुक्त आहार उपलब्ध होईल.