Skip to main content

रोज रोज

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 02/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज -- कथा ( काल्पनीक ) "रोज़ रोज़ आँखोंतले एक ही सपना चले रात भर काजल जले .." हे गीत ऐकु आले आणी काहि वेळासाठी तिचे मन भुतकाळात हरवुन गेले . तिला तिचे कॉलेजचे सोनेरी दिवस डोळ्यांसमोर दिसु लागले . कॉलेजमधील मनमोकळे वातावरण , मित्र मैत्रिणींचा नवा जमलेला ग्रुप , रोजच्या रंगलेल्या गप्पा टप्पा , ग्रुपबरोबर त्या दिवसांत केलेली धमाल तिला परत एकदा आठवु लागली . या ग्रुपमधेच तिची त्याच्याशी पहिली ओळख झाली . ती एका साध्या , मध्यमवर्गातील घरातली . तर तो शहरातील एका श्रीमंत बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा . कायम लेटेस्ट मॉडेलच्या बाइकवरुन नाहीतर कारमधुन कॉलेजला येणारा , कायम रुबाबदार कपडे घालुन मिरवणारा तो कसा कोण जाणे पण तिच्या ग्रुपमधे चांगलाच मिसळुन गेला . तिच्याशी , ग्रुपमधल्या सगळ्यांशी तो नेहमीच निगर्वीपणे वागत , बोलत असे . आपल्या ग्रुपमधल्या मित्रांसाठी काहिही करण्याची , त्यांच्या अडी अडचणीला धावुन जाण्याची त्याची एका पायावर तयारी असे . कॉलेजमधे पैसेवाल्या मुला मुलींचे वेगळे ग्रुप होते . ती मुले कायम आपल्या श्रीमंतीच्या गुर्मीत इतर मुलां मुलींपासुन फटकुन वागत असत . पण तो मात्र अशा घमेंडखोर पैसेवाल्या मुला मुलींपासुन कटाक्षाने दुर राहात असे . बघता बघता दोन वर्षे निघुन गेली . दोन्ही वर्षी , आपल्या वाढदिवसाला त्याने आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना शहरातील एका आलिशान हॉटेलमधे पार्टी दिली होती . " तु दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला आमची हॉटेलमधेच बोळवण करतोस . या वर्षीच्या वाढदिवसाला मात्र आम्हाला तुझ्या घरी पार्टी हवी . या वर्षीच्या वाढदिवसाला आम्ही तुझ्या घरीच येणार ." ग्रुपमधला एकजण त्याला गमतीने म्हणाला . हे ऐकुन तो थोडा चपापला . पण त्याने लगेच हसत हसत विषय बदलला . ऐन वेळी काहितरी कारण सांगुन त्याने पार्टी देताना शेवटी हॉटेलमधेच दिली . या दोन तीन वर्षांमधे तिची त्याची चांगलीच ओळख झाली होती . त्याचा निगर्वी , हसतमुख स्वभाव तिला आवडु लागला होता . त्यातच या वर्षीच्या गॅदरींगमधे त्या दोघांनी मिळुन चांगली तयारी करुन एकत्र गाणे सादर केले . "रोज़ रोज़ आँखोंतले एक ही सपना चले रात भर काजल जले .." त्यांच्या गाण्याची सर्वांनीच खुप वाहवा केली . काहिंनी दोघांची थट्टा मस्करीही केली . अर्थातच दोघांनीही ती थट्टा हसण्यावारी नेली . नकळत ती त्याच्यामधे गुंतत चालली होती . तिलाही हळु हळु हि जाणीव होत होता . पण त्याच्याशी याबद्दल मनमोकळे बोलण्याचा तिला धीर झाला नाही . ती आपली मनाशीच स्वप्ने रंगवत बसली . तिच्या ग्रुपमधल्या एका जवळच्या मैत्रीणीला मात्र तिच्यात झालेला हा बदल जाणवला . तिची झालेली अवस्था लक्षात आली . "असं नुसतंच गप्प राहुन आणी मनातल्या मनात गुंतुन बसलीस तर त्यात तुझंच नुकसान आहे . त्याच्याशी एकदा मोकळेपणाने बोल आणी काय तो सोक्ष मोक्ष लाव . तुला धीर होत नसेल तर मला सांग . मी तुझ्या वतीने त्याच्याशी बोलेन . " तिच्या रोखठोक स्वभावाच्या फटकळ मैत्रीणीने तिला सल्ला दिला . काहिच न सुचुन ती आपली परत गप्प राहिली आणी तिथुन निघुन गेली . काहि दिवसांनंतर ती कॉलेजच्या लायब्ररीमधे पुस्तके आणायला जात होती . जाताना , वाटेतल्या एका रिकाम्या क्लासरुममधुन तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला . आवाज ऐकुन थबकुन ती क्लासरुमच्या दाराच्या अलीकडेच थांबली . हा आवाज तिच्याच त्या फटकळ मैत्रिणीचा होता . ती कुणाशी तरी , नव्हे , त्याच्याशीच बोलत होती . "मला माझ्या मैत्रिणीची अवस्था बघवत नाही . ती काही तुझ्याशी मोकळेपणाने बोलेल असं दिसत नाही . म्हणुन मीच शेवटी एक घाव नी दोन तुकडे करायचे ठरवलं . ती तर तुझ्यामधे गुंतलेली आहे . पण तुला तिच्या बद्दल काय वाटतं आहे ? " "तु जे काही सांगत आहेस त्याबद्दल मला काहिच कल्पना नव्हती .ती स्वभावानी खुप चांगली आहे . पण मी तिच्याकडे केवळ एक मैत्रिण , एक ग्रुपमेट म्हणुनच बघत आलो आहे . बाकी माझ्या मनात कसल्याही भावना नाहीत. " त्याचा आवाज तिला क्लासरुममधुन ऐकु आला . तिचा श्वास क्षणभर कोंडल्याचा तिला भास झाला . "का ? ती तुझ्यासारखी पैसेवाल्या घरातील नाही म्हणुन ? " तिच्या फटकळ मैत्रीणीने त्याला रोखठोक सवाल केला . त्याने थोड्या दुखावल्या आवाजात उत्तर दिले . "तसे काहि नाही . आणी श्रीमंतीबद्दल बोलशील तर तिला माझ्यापेक्षाही श्रीमंत नवरा सहज मिळेल . एक मित्र म्हणुन माझ्या तिला कायम शुभेच्छा असतील . माझ्या घरामधे सध्या खुप प्रॉब्लेम्स सुरु आहेत . बिझनेसच्या वाढत्या ताणामुळे अलिकडे डॅडचं पिणं खुप वाढलं आहे . त्यावरुन त्यांचे रोज मम्मीशी खटके उडतात . सतत वाद विवाद होत असतात . घरातली शांतता जशी नाहिशी झाली आहे . अशा वेळी लग्न करुन या अशांत वातावरणात एखाद्या नवीन व्यक्तीला आणण्याचा मी विचारही करु शकत नाही . लवकरात लवकर बिझनेस सांभाळुन घरातील ताण कमी करणे हेच माझे सध्या एकमेव ध्येय आहे . " यापुढे काहिही न ऐकता ती तिथुन घरी निघुन गेली . तिला घडल्या प्रकाराने खुप वाइट वाटले होते . पण त्याच बरोबर कुठेतरी मनावरचा एक मोठा ताण हलका झाल्यासारखेही वाटत होते . पुढल्याच दिवशी तिला तिची फटकळ मैत्रिण भेटली . तिने आपले त्याच्याबरोबर झालेले सगळे संभाषण ऐकवले आणी त्याला विसरुन जाण्याचा सल्ला दिला . "जे झालं ते चांगलंच झालं . तुझ्या मनावरचा ताण वेळीच हलका झाला . आता सगळं विसरुन जा आणी अभ्यासाला लाग . परीक्षा आता दोन महिन्यांवर आली आहे ." तिनेही काही माहित नसल्याचे भासवत आपल्या मैत्रिणीचे आभार मानले . आणी अभ्यास , परीक्षा याच्यावर लक्ष केंद्रीत केले . बघता बघता परीक्षा संपली . ती पदवीधर झाली . पुढे एका वर्षात तिचे लग्नही ठरले . तिचा होणारा नवरा पराग हाही एक बिझनेसमन होता . आपल्या लग्नाला , रीसेप्शनला तिने आपल्या कॉलेजच्या सगळ्या ग्रुपला बोलावले . या ग्रुपबरोबर तोही आला होता . "अभिनंदन ..आणी शुभेच्छा..." असे हसतमुखाने म्हणत तो स्टेजवर आला . सोबत आणलेला पुष्पगुच्छ त्याने तिच्या आणी परागच्या हातात दिला . दोन तीन मिनीटे आपली ओळख करुन देत तो परागशी हसतमुखाने बोलला . जेव्हा दोन बिझनेसमन अगदी थोड्या वेळासाठीही एकमेकांना भेटतात , तेव्हा बहुतांशी वेळा त्यांच्यामधे बोलणे होते ते बिझनेसबद्दलच . या दोन तीन मिनीटाच्या भेटीतही त्याच्या व्यक्तीमत्वाने , त्याच्या बिझनेसविषयक ज्ञानाने पराग अगदी भारावुन गेला . तो स्टेजवरुन उतरताच परागने तिच्याकडे बघुन " हा अगदी जाणकार माणुस आहे ." अशा अर्थाची खुण केली . तिला काय बोलावे हे काहीच सुचेना . ती आपली नुसतीच मक्खपणे बघत बसली . लग्नानंतरचे नव्या नवलाइचे दिवस संपले . परागला सतत बिझनेस टुरसाठी बाहेर जावे लागत असे . अशा वेळी घरामधे अनेक दिवस ती एकटीच असे . ते घर तिला अगदी खायला उठत असे . ती अगदी कंटाळुन गेली होती . अशा वेळी तिच्या मनामधे आयुष्यातल्या जुन्या घटना आठवुन नको नको ते विचार येत असत . आपण परागपासुन काही लपवत तर नाही आहोत ना ? आपण परागला त्याच्याबद्दल काहीच सांगीतले नाही . आपण हे परागला सांगायला हवे होते का ? असे अनेक अपराधीपणाचे विचार तिच्या मनात येत असत . अखेरीस ही रुखरुख असह्य होउन तिने एकदा आपल्या रोखठोक स्वभावाच्या फटकळ मैत्रीणीला फोन केला . आणी आपल्याला होणारा त्रास बोलुन दाखवला . पण तिच्या मैत्रीणीने उलटी तिचीच चांगली खरडपट्टी काढली . "तु जर वेळीच सावध झाली होतीस आणी तुझ्या हातुन जर काहि घडलेलंच नाही , तर तु सांगणार तरी काय ? उलट तु जर काही घडलेलं नसतानाही काहितरी सांगायला गेलीस , तर त्यातुन अजुन गुंतागुंत निर्माण होईल . तेव्हा तु मनातुन ही अपराधीपणाची भावना काढुन टाक आणी स्वताला कशात तरी गुंतवुन घे . " मैत्रीणीने केलेला हा उपदेश ऐकल्यावर तिला थोडे बरे वाटले . पण तरीही तिच्या मनातील अपराधीपणाची भावना अजुन पुर्ण गेली नव्हती . असेच दिवस जात राहिले . आज खुप दिवसांनंतर पराग लवकर घरी आला होता . एक महत्वाचे बिझनेस डील फायनल झाल्यामुळे तो खुशीत होता . एकदम सेलीब्रेशनच्या मुडमधे होता . आल्या आल्याच त्याने तिला सांगितले . "चल , लवकर तयार हो . आज आपण लाँग ड्रायव्हींगला जाउ . बाहेरच एखाद्या चांगल्या हॉटेलमधे जेवायला जाउ . " त्याचा हा बदललेला आनंदी मुड तिच्यासाठी नवीनच होता . पण तिलाही बरे वाटले . ती झटपट तयार झाली . दोघंही कारमधुन फिरायला बाहेर पडली . थोड्याच वेळात त्यांची कार शहरापासुन बाहेर पडली आणी एका पिकनीक स्पॉटच्या दिशेने जाउ लागली . रस्ता तसा मोकळाच होता . आजुबाजुला वारा ही हलकेपणाने वाहात होता . खुशीत येउन परागने कारमधल्या सिडी प्लेयरवर गाणी सुरु केली . एखादे आवडते गाणे लागले तर तोही जोर जोरात गाउ लागला . थोड्या वेळाने अचानक त्याचे लक्ष तिच्याकडे गेले . त्याचे हे बदलेले रुप ती चकीत होउन पाहात होती . " सॉरी .. मी माझ्याच नादात होतो . तुझ्याकडे माझे लक्षच गेले नाही . " पराग थोडा वरमुन म्हणाला . ती काहीच बोलली नाही . परागला अचानक काहितरी सुचले . तो तिला उत्साहाने म्हणाला . "आता मी तुझ्या आवडीचं गाणं लावतो ." "आपल्या आवडीचं गाणं ? " ....तिला काहीच समजेना . पण तोपर्यंत परागने सिडी प्लेयरवर गाणे सुरु केले होते . "रोज़ रोज़ आँखोंतले एक ही सपना चले रात भर काजल जले .." ती चपापली . तिच्या मनात अनेक प्रश्न , अनेक नको त्या शंका , कुशंका येउ लागल्या . " या गाण्याबद्दल परागला कसं काय कळलं ? " . तिच्या मनातली अपराधीपणाची जाणीव परत वर येउ पाहात होती . तरीही तिने चाचरतच त्याला कसेबसे विचारले . " तु... तुला हे माझे आवडतं गाणं आहे हे कसं कळलं ? " "असतात ... आमचेही काही दोस्तलोग असतात . " परागने हसत हसत उत्तर दिले . आज तिला खुप दिवसांनंतर शांत झोप लागली . ------------------------------------ समाप्त ------------- ( काल्पनीक ) --------------------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5794
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

फुलायच्या आधीच कळी तोडलि

खूप शांत आणि समाधानी मनाने झोप लागली असेल, 'त्याने'च परागला 'तिच्या' मनाची घालमेल सांगितली असेल आणि ते आवडीचे गाणेही..

छान.

छान आहे कथा

साधेपणा जपणारी सरधोपट नाखु