मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साखर खाल्लेला माणूस - एक शुगरकोटेड ब्लॅक कॉमेडी अर्थात एक प्रसन्न नाट्याविष्कार

श्रीगुरुजी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
विलास व माधवी देशपांडे हे एक मध्यमवर्गीय जोडपं. यांना २२-२३ वर्षांची ऋचा ही एकुलती एक मुलगी. ती जाहिरात क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडतेय. विलास एका खाजगी विमा कंपनीत व्यवस्थापक आहे. जास्त वेतनाच्या अपेक्षेमुळे सरकारी नोकरी सोडून तो खाजगी क्षेत्रात आला आहे. लठ्ठ वेतनाबरोबरच तिथे असलेले विक्रीचे चढते लक्ष्य, व्यवसायवृद्धीची जबाबदारी, त्यामुळे येणारे ताणतणाव या सर्वांचा त्याच्या प्रकृतीवर व वागणुकीवर परीणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव बराचसा चिडचिडा व उतावळा झाला आहे. कामाबरोबरच येणार्‍या दारू पार्ट्या, धूम्रपान, जागरणे याने तो त्रस्त आहे. तरूण मुलीचे बिनधास्त वागणे हे देखील त्याच्या तणावाचे अजून एक कारण आहे. अत्यंत वेगवान जीवनशैली, प्रचंड काम, कुटुंबासाठी फार वेळ देता न येणे या टीपिकल गोष्टींचा तो बळी आहे. अशा परिस्थितीत एक दिवस त्याला तपासणीतून समजते की त्याला मधुमेह झाला आहे व डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याची जीवनशैलीच त्यासाठी कारणीभूत आहे. मधुमेहामुळे आता त्याला आता नियमित औषधोपचार घेणे, नियमित तपासण्या, नियमित व्यायाम, जागरणे, धूम्रपान, मद्यपान इ. सोडून देणे हे करावे लागणार आहे. यामुळे तो त्रस्त झाला आहे. त्यात भर पडते ती त्याची पत्नी मधुमेहाबद्दल रोज नवीन ज्ञान मिळवून त्याच्यावर करीत असलेल्या प्रयोगांची. त्याच्या सासूबाई तसेच इतर सर्वजण त्याला आपापल्या परीने मधुमेहासाठी अनेक गोष्टी सुचवित राहतात व त्यामुळे तो पूर्ण वैतागतो. एक दिवस ओंकार आपटे नावाचा एक तरूण त्याला भेटायला येतो. ऋचाच्या सांगण्यावरून आपण आलो आहोत व आपण डॉक्टर असून मधुमेहासंबंधी सल्ला देण्यासाठी ऋचाने मला सांगितले आहे असे तो सांगतो. अनेकांकडून ऐकलेल्या त्याच त्याच गोष्टी पुन्हा एकदा ओंकारकडून ऐकल्यावर विलास वैतागतो व तो ओंकारची खिल्ली उडवून त्याला घालवून देतो. आपल्याला सल्ले देणार्‍या सासूचीही तो खिल्ली उडवितो. काही काळाने पुन्हा एकदा ओंकार येतो व ॠचा व आपण लग्न करणार आहोत असे सांगितल्यावर विलासला ते मान्य होत नाही कारण त्याला ओंकार आवडलेला नसतो. त्यांच्या लग्नात मोडता घालण्यासाठी तो ओंकारला ऋचाच्या बीअर पिण्याविषयी, मुलांच्या आवडीविषयी अनेक नकारात्मक गोष्टी सांगून ऋचाचेच मन त्याच्याविषयी कलुषित करतो व शेवटी ऋचाच लग्नाला नकार देते. माधवीला ओंकार जावई म्हणून आवडलेला असतो, परंतु ती काहीच करू शकत नाही. निराश झालेला ओंकार निघून गेल्यानंतर अचानक ऋचा आपण गर्भवती असल्याचे सांगून धक्का देते. त्या धक्क्यामुळे विलासला रूग्णालयात दाखल करावे लागते. यानंतर पुढे काय होते व नाटकाचा शेवट सुखान्त होतो का दु:खान्त हे रंगमचावरच बघायला हवे. विद्यासागर अद्यापक यांनी 'साखर खाल्लेला माणूस' हे नाटक प्रचारकी स्वरूपाचे न बनविता अत्यंत खेळकर स्वरूपात लिहिले आहे. एका गंभीर विषयावरील नाटक त्यांनी अत्यंत मिष्कील ढंगात, खेळकर शैलीत फुलविले आहे. नाटकात अक्षरश: क्षणाक्षणाला हशा पिकतो इतके चटकदार संवाद त्यांनी लिहिले आहेत. विषय गंभीर असूनसुद्धा नाटक अजिबात मेलोड्रामाटिक, गंभीर होत नाही. विलासच्या भूमिकेत प्रशांत दामलेने अक्षरशः धमाल केली आहे. त्याचे वाचिक विनोद व देहबोलीतून प्रचंड करमणूक होते. एका गंभीर विषयावरील नाटक त्याने अतिशय प्रसन्न करून टाकले आहे. रंगमंचावर इतक्या सहजतेने वावरणारा दुसरा मराठी कलाकार अपवादानेच सापडेल. शुभांगी गोखलेने विलासच्या पत्नीच्या माधवीच्या भूमिकेत तर प्रेक्षकांना धक्काच दिला. छोट्या पडद्यावर कायम गंभीर भूमिका करणारी शुभांगी गोखले एका अत्यंत वेगळ्या विनोदी स्वरूपाच्या भूमिकेत आहे. विलासची मुलगी झालेली ऋचा (कलाकार ऋचा आपटे) व डॉक्टर ओंकार आपटे (संकर्षण कर्‍हाडे) यांनी देखील भूमिकेला न्याय दिला आहे.

वाचन 9431 प्रतिक्रिया 0