एवढंसं आभाळ
लेखनप्रकार
कालच झी टिव्ही वर "एवढंसं आभाळ" हा सिनेमा बघितला. दिग्दर्शकानं फार सुरेख हाताळलाय हा नाजूक विषय. प्रतिक्षा लोणकर, आनंद शिंदे आणि ऋत्विक नाडकर्णी ह्यांच्या नैसर्गिक अभिनयाने अधिकच वास्तविक सुद्धा वाटतो.
आई वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे सुद्धा न कळण्याइतका भाबडा मुलगा....जेव्हा ते सगळं आपल्या कुवतीप्रमाणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो... तेव्हा त्याची होणारी चिडचिड, सोबत आई-वडिलांची अगतिकता....... आणि मग अचानक त्याला मिळालेला मार्ग... असं काहिसं कथानक.
प्रत्येक छोट्या मुलाचं आभाळ त्याच्या आई-वडिलांच्या आभाळातच असतं.....आणि तो तेच आभाळ आपलं समजत असतो. पण जेव्हा ते आई-वडिल एकमेकांपासून दूर होतात..... ते आभाळ फाटतं. त्याला कळतंच नाही की आता नक्की कुठलं आभाळ आपलं. आईच्या आभाळात आता दुसराच कोणी "पप्पा" असतो आणि त्याच्यासोबत त्याची कुठलंच नातं नसलेली भावंडं सुद्धा. त्याला गुदमरायला होतं. तसा दुसरा पप्पा काही वाईट नसतो. पण आईवरचा त्याचा एकाधिकार मात्र अगदीच संपतो. संपूर्ण त्याची असलेली आई आता त्याला अजून तिघांसोबत वाटून घ्यायची असते. इथेच तर सगळा घोळ होतो. आपल्या हातातून काहितरी निसटून जातंय असं त्याला वाटतं... तो धडपड करतो...पण काही गोष्टी अशा घडतात की त्याचा स्वत:वरचा ताबा सुटतो. आईची होणारी घालमेल त्याला कळत असते पण तरी मन काही आपला हक्क सोडायला तयार नसतं.
ह्यातून आपल्या परीने तोच मार्ग सुचवतो.... पप्पांकडे जायची परवानगी मिळवतो. त्याला वाटतं की आपलं हरवलेलं आभाळ आपल्याला आपल्या पप्पांकडे नक्कीच मिळणार. तो खूप उत्साहात असतो. पण घरी पोचल्यावर त्याचं स्वागत बंगाली भाषेत बोलणारी आंटी करते. सोबत एक छोटं बाळ पण. म्हणजे इथेही आपल्याला पुन्हा वाटूनच घ्यावं लागणार आभाळ !
त्याला काही कळेनासंच होतं. इवल्याशा मनात प्रचंड उलाघाल होत असते.......कोणासोबत बोलावं मनातलं....आईसोबत...... पण तिला तर फारच दुखावून आपण आलो आहोत. पप्पा.....आज पप्पांसोबत बोलुयाच असं ठरवतो तर पप्पाच त्याला त्यांचा निर्णय सांगतात.... बोर्डींग स्कूलमधे जायचा. तो खूप प्रतिकार करतो. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्या क्षणी समोरुन आलेली वॉर्डन त्याला आईच वाटते. तो तिच्या कुशीत शिरुन हमसाहमशी रडतो....तिची माफी मागतो. पण नंतर त्याला जाणवतं की आई नाहीच. मग तो आपलं मन पक्कं करतो........बाबांकडे पाठ फिरवून होस्टेलच्या खोलीत येतो. तिथे त्याच्यासारखीच कितीतरी मुलं असतात.......पण सगळी हसरी मुलं...... कोणीच त्याच्यासारखी रडत नसतात. तो ही हसायचा कसानुसा प्रयत्न करतो.
तिथे त्याला छान मित्र मिळतो.... हळुहळु तो खुलत जातो.... फुलत जातो. आई-पप्पांची आठवण येत असते पण इथेही मजा असते. नवी जागा, नवे मित्रं, नवं ध्येय....... आणि अचानक एक नवं आभाळ सुद्धा !! ह्या अचानक सापडलेल्या आपल्या हक्काच्या आभाळाखाली तो खूप खूप सुखावतो. आईला त्याने लिहिलेल्या पत्रातच सिनेमा संपतो. अतिशय सुंदर शेवट !! कुणालाही न दुखावता, कुणालाही न दुरावता.... त्याला त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होते. त्याचं एवढसं आभाळ आता खूप मोठ्ठं होतं आणि त्या आभाळाखाली तो स्वत:चं "मी पण" घडवणार असतो.
हा सिनेमा मी माझ्या १२ वर्षाच्या मुलासोबत बघितला........प्रचंड रडले बघताना. पिल्लाने पण अगदी मन लावून बघितला.....खूप प्रश्न विचारले..... आणि त्याला उत्तरं देताना मात्र मी फार विचार करत होते.... आई-वडीलांना पण स्वत:चं आभाळ वेगळं करताना मुलाच्या डोक्यावर काही आभाळ उरतंय का ह्याचा विचार करायलाच हवा. नाहीतर आपलं इवलंसं आभाळ कुठे आहे हे शोधण्यात कदाचित ते मूल भलत्याच वाटेला जाऊ शकतं आणि मग फक्त पश्चातापच हातात उरतो.
फारसे संवाद नसूनही सुरेख अभिनयामुळे सिनेमा मनात अगदी घर करुन राहतो. एक आवर्जून बघण्यासारखा सिनेमा !!
वाचने
2856
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
सुरेख परिक्षण ...
नक्की बघणार...
ह्म्म..
आभार
.
जयूताई..
फारसे
शुक्रिया !!