दाद
लेखनप्रकार
दाद . (कथा) . (काल्पनीक)
जांभेवाडी.. चारी बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं , निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटसं गाव . जेमतेमच लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये वीज , एस टी , वाहने अशा आधुनीक सुधारणा अजुन पोचलेल्या नव्हत्या . हे गाव या सुविधांपासुन तसं दुर्लक्षितच राहिलं होतं . रोजच्या कामांसाठी , गरजांसाठी जांभेवाडीच्या ग्रामस्थांना तालुक्याच्या गावाचाच आधार होता .
जांभेवाडीपासुन तालुक्याच्या गावाकडे जाणारी एक पाउलवाट होती . आपल्या कामांसाठी , गरजांसाठी गावकरी हिच पाउलवाट तुडवत तालुक्याच्या गावाला जात येत असत . हि लांबची पायपीट आता त्यांच्या रोजच्या जीवनाचाच भाग झाली होती .
जांभेवाडीच्या वेशीपाशी , या पायवाटेच्या शेजारीच एक मोकळे माळरान होते . गावकरी या माळाला "वेतोबाचा माळ" किंवा "वेताळाचा माळ" असे म्हणत असत . या माळावर लांबट आकाराचा एक मोठा दगड उभा होता . हा दगड म्हणजेच आपल्या गावचे ग्रामदैवत वेतोबा अशी ग्रामस्थांची पुर्वापार श्रद्धा होती . या वेतोबाच्या मुर्ती समोर अनेक लहान आकाराचे दगड एका गोलामध्ये उभे होते . हे गोलाकारात उभे असलेले बाकीचे दगड म्हणजे वेताळाच्या दरबारातले भुतगण असे गावकरी मानत असत . हे दगड या रिंगणामधे वर्षानुवर्षे उन पाउस झेलत उभे होते .
दर अवसेला रात्री बारा वाजता या माळावर वेतोबाचा दरबार भरतो , या दरबारात वेतोबा जांभेवाडीच्या ग्रामस्थांच्या अडचणी सोडवतो , त्यांनी घातलेली साकडी , बोललेले नवस पुर्ण करतो अशी सगळ्या ग्रामस्थांची कित्येक वर्षे चालत आलेली समजुत होती . मात्र अवसेच्या रात्री जो या माळावर येईल त्याचे डोळे जातील अशी एक भीती त्यांच्या मनात पुर्वापार रुजलेली होती . त्यामुळे गावकरी अवसेच्या रात्री माळावर फिरकतही नसत . आपल्या ज्या काय समस्या , नवस असतील त्या अवसेच्या आधीच वेतोबाच्या मुर्तीपाशी सांगत असत . वेतोबाचा कौल मिळावा म्हणुन भक्तीभावाने पुजा करत असत .
गावामध्ये कुणाकडेही पुजा , शुभकार्य असेल तर वेतोबाला न चुकता निवद , धुप आणी शेंदुर हा ठरलेलाच होता . आजपर्यंत असंख्य वेळा शेंदुर लावला गेल्यामुळे मुर्तीचा मुळ रंग कुठला ते ठरवणे अवघड झाले होते .
गुणा हा जांभेवाडीमधील एक गावकरी . गावातील इतर अनेकजणांसारखेच रोज सकाळी लवकर पाउलवाट तुडवत तालुक्याला जायचे . तिथे दिवसभर मिळतील ती रोजंदारीची कामे करायची . चार पैसे कमवायचे . दिवस मावळला की घरासाठी काहि जिन्नस खरेदि करुन परत गावी यायचे असा त्याचा रोजचा क्रम होता .
दोन वर्षांपुर्वी गुणाच्या बायकोचे आजारपणात निधन झाले होते . त्यांना एक मुलगी होती . बायको गेल्यानंतर गुणानेच लेकीची काळजी घेतली होती . नुकतेच त्याच्या लेकीचे शेजारच्याच गावातील एका स्थळाशी लग्न ठरले होते . लेकीच्या लग्नासाठी म्हणुन गुणा तालुक्यातीलच एका बँकेत पैसे साठवत होता . लग्नाच्या खर्चासाठी आज त्याने ते पैसे काढले .
आलेले पैसे मोजताना नकळत त्याच्या डोळ्यासमोर नवरीच्या वेशात सजलेल्या आपल्या लाडक्या लेकीचा हसरा चेहरा आला आणी नकळत त्यालाच समाधानाचे हसु फुटले . मनोमन तो सुखावला .
मिळालेले पैसे आपल्या बंडीच्या खिशात ठेवत तो बँकेच्या बाहेर आला . अचानक त्याच्या कानावर शब्द पडले .
"काय गुणा , लई पैकं हाईती की रं तुझ्याकडं . मग माझं देणं कशापाई देत नाहिस रं ? माझंबी पैकं चुकवुन टाक कि गड्या ."
समोर तालुक्यातला सावकार रंगोजी खवचटपणे हसत उभा होता . बाजुला त्याचे चार भाडोत्री गुंड हातात काठ्या घेउन मारक्या बैलासारखे उभे होते . गुणाने आपल्या बायकोच्या आजारपणात वाढता खर्च भागवण्यासाठी नाईलाजाने या रंगोजीकडुन काहि कर्ज घेतले होते . हे कर्ज तो फेडत आला होता . लेकीचे लग्न आले म्हणुन त्याने मागच्याच महिन्यात सावकाराला भेटुन , आपली अडचण सांगुन शेवटचा हप्ता भरण्यासाठी थोडा जास्त वे़ळ मागितला होता . रंगोजीने तो मान्यही केला होता . पण आज गुणाकडचे पैसे बघुन रंगोजीची मती पालटली . त्याला हाव सुटली . तो मागचे सगळे विसरुन गेला .
गुणाला रंगोजीचे बोलणे ऐकुन धक्काच बसला . तरी तो काकुळतीने म्हणाला .
"सावकार , माझ्या लेकीचे लगीन हाये . त्यापाई हे पैसे लागणार हायेत . थोडा वेळ द्या . म्या तुमचं समदं पैकं परत करीन ."
पण रंगोजीच्या मनात कपट होते . तो काही ऐकायला तयार नव्हता . तो गुर्मीत म्हणाला .
"ते काहि नाही . मलाबी नड आहे . मी काहि थांबणार नाही . हवं तर तु लेकिचं लगीन पुढं ढकल . "
"सावकार ..." गुणा संतापाने थरथरत ओरडला . त्यामुळे रंगोजी अजुन भडकला . तो चिडीनं म्हणाला .
"काय रं . कुणावर दाब दाखवतोस ? या रंगोजीवर ? कातीला आलास काय ? आनं तुम्ही काय बघत बसलां रं ? धरा .. बडवा या गुणाला . काढुन घ्या त्यांचं समदं पैकं "
रंगोजीचा हुकुम ऐकुन त्याचे गुंड पुढे सरसावले . सगळ्यांनी मिळुन गुणाला काठ्यांनी बडवले . अखेर गुणा बेशुद्ध होउन खाली कोसळला . तेव्हा त्याचे खिसे चाचपुन रंगोजीने सगळे पैसे काढुन घेतले . तो आपल्या गुंडांबरोबर ऐटीत तिथुन चालता झाला .
हा प्रकार घडत होता तेव्हा तिथे गुणाला ओळखणारे , त्याचे गाववाले मित्रही होते . पण मध्ये पडण्याची , रंगोजीच्या गुंडांना अडवण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही . सगळे नुसते एकमेकांकडे बघत बसले .
गुणा शुद्धीवर आला तेव्हा त्याला आपण साठवलेले सगळे पैसे गेल्याची जाणीव झाली . आता लेकीचे लग्न कसे पार पाडायचे हा विचार त्याला छळु लागला . त्याचे अंगही माराने ठणकत होते . आपल्या गावातल्या मित्रांच्या आधाराने कसाबसा तो परत जांभेवाडीला घरी आला . त्याची ही अवस्था पाहुन , मारहाणीचा झाला प्रकार ऐकुन त्याची लेक धास्तावुन गेली .
गुणाकडचे पैसे गेल्याची बातमी शेजारच्या गावातील मुलाकडच्यांना कळली . त्यांनी टाकोटाक एका मध्यस्थाला गुणाच्या घरी पाठवुन हे लग्न मोडल्याचे जाहिर केले . गुणा आणी त्याची लेक दु:खात बुडुन गेली . गावातील लोकं लेकीकडे पाहुन हळहळु लागली . त्यांच्या नजरांना वैतागुन अखेर लेकीने त्याच दिवशी गावामागच्या काळडोहात उडी घेतली आणी या बदनामीपासुन आपली कायमची सुटका करुन घेतली . काळडोहाला अनेक वर्षांनी एक बळी मिळाला .
एका मागे एक बसलेल्या या धक्क्यांमुळे गुणा निराशेने पार हवालदिल होउन गेला . त्याने ठरवलेले सगळे बेत , सगळी स्वप्ने या दोन दिवसांत धुळीला मिळाली होती . दु:खाने , संतापाने तो आतल्या आत धुमसत होता .
त्याला धीर द्यायला त्याचे गावातले मित्र घरी आले होते . त्यांना त्याने आपला बेत बोलुन दाखवला .
"त्या रंगोजीनं माझ्या घराला आग लावली . माझ्या घराचा इस्कोट केला . पन म्या गप राहनार नाही . आज अवस हाये . आज रातीला .. अवसंच्या रातीला म्या वेतोबाच्या माळावर जाणार . वेतोबाकडे माझ्या नुकसानीची दाद मागणार . "
त्याला गावातल्या लोकांनी खुप समजावले . पण गुणा आता कुणाचे ऐकण्याच्या पलीकडे गेला होता . अंधार पडताच सगळे गावकरी अवसेची रात्र म्हणुन आपापल्या घरांत चिडिचुप बसले . गुणा मात्र संतापाच्या भरात तरातरा वेतोबाच्या माळावर गेला .
वेतोबाच्या मुर्तीपाशी जाउन गुणाने वेतोबाचे पाय धरले . तो वेतोबासमोर रंगोजीने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा बोलु लागला . आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागु लागला .
"वेतोबा , त्या रंगोजीपायी माझ्या लेकीचं लगीन मोडलं ..माझी लेक मला सोडुन गेली ..मला न्याव पायजे ..न्याव .. मला न्याव मिळाल्याबिगर म्या तुझं पाय सोडनार न्हाई . "
गुणाचा आक्रोश किर्र अंधाराला चिरुन जात होता . पण समोरच्या मुर्तींवर त्याचा काहिच परिणाम होत नव्हता . त्या सर्व दगडाच्या मुर्ती निश्चलपणे तशाच शांत उभ्या होत्या . गुणाही न थकता निर्धाराने परत परत वेतोबासमोर न्याय मागत होता. अखेरीस तर त्याने आपले डोके वेतोबाच्या पायावर जोरजोरात आपटण्यास सुरुवात केली . तो परत परत म्हणत होता .
" मला न्याव पाहिजे .. न्याव पाहिजे .."
गुणाचा हा आक्रोश अंधार कापत जांभेवाडी गावात ऐकु येउ लागला . गावकरी घाबरुन गेले . पण कुणाचाच अशा मध्यरात्री वेतोबाच्या माळावर जाण्याचा धीर झाला नाही .
वेतोबाच्या पायावर गुणा थाड थाड आपले डोके आपटतच होता . हळु हळु त्याच्या कपाळातुन रक्ताच्या धारा वाहु लागल्या . वेतोबाच्या मुर्तीला त्या रक्ताचा अभिषेक होत होता .
दिवस उजाडला तसे जांभेवाडीचे गावकरी नेहमीप्रमाणे पाउलवाटेवरुन तालुक्याच्या गावाकडे चालु लागले . वेतोबाच्या माळापाशी आल्यावर तिथले दॄष्य बघुन त्यांना धक्काच बसला .
वेतोबाच्या मुर्तीच्या पायापाशी रक्ताच्या थारोळ्यात गुणाचा निष्प्राण देह पडला होता . मुर्तीच्या पायावर सतत डोके आपटुन त्याच्या डोक्याचा पार चेंदामेंदा झाला होता . वेतोबाची मुर्ती गुणाच्या रक्ताने माखुन गेली होती . मुर्तीवरील शेंदुर आणी गुणाचे रक्त एकमेकांत मिसळुन एकजीव होउन गेले होते .
बघता बघता गुणाची बातमी त्याच दिवशी तालुक्याच्या गावात पसरली . रंगोजीच्याही कानावर हि बातमी आली . तो खदाखदा हसत जो येईल त्याला सांगु लागला .
"बघा .. तो गुणा मला मारण्यासाठी वेतोबाच्या पायावर डोकं आपटत होता . पण शेवटी तोच गेला . मला ढेकळं काहि फरक पडला नाही . मला मारणारे मेले .. मी जिता हाये . मर गय मारनेवाले .."
रंगोजीचा हा माज बघुन गावातली लोकं हळहळत होती . आपल्या डोळ्यातले पाणी पुसत म्हणत होती .
"कलीयुग आलं बाबा . हि काहि ख-याची दुनिया राहिली नाही . बिचारा गुणा मेला . आणी हा राक्षस आराम करतोय . आज गुणा गेला . काय सांगावं उद्या आपल्यावरबी हिच येळ येइल ."
गुणाचा एक गाववाला मित्र कसाबसा रडे आवरत म्हणाला .
"आपलंबी चुकलं .. ते गुंड गुणाला मारत होते तवाच आपण मधी पडायला हवं होतं . आपण त्यांना पुरुन उरलो असतो . पण आता काय उपेग .."
दिवस मावळला तसा एकमेकांना धीर देत ते सगळे परत त्या पायवाटेने गावाकडे चालु लागले . गावच्या वेशीपाशी , वेतोबाच्या माळापाशी आल्यावर त्यांना फिकट चंद्रप्रकाशात मुर्तीसमोर डोके आपटणारा , आक्रोश करणारा गुणा दिसु लागला . कसेबसे , भीती आवरत ते आपापल्या घरी पोचले .
दुसरा दिवस उजाडला , सकाळ झाली , तशी तालुक्याच्या गावात एका बातमीने हलकल्लोळ उडवला . काहितरी इपरीत , आक्रीत , अघटीत घडलं होतं .
सकाळी सकाळीच रंगोजी सावकार अचानक रक्ताच्या उलट्या होउन मरण पावला होता . तपासणीमध्ये त्या रक्तात शेंदुराचा अंश सापडला .
-------------- समाप्त ---- काल्पनीक ------------------------------
वाचने
7946
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
छान लेखन
अप्रतिम लिहिलीय कथा सिरुसेरीजी. मस्त.
दिवसेंदिवस कथांचा दर्जा उंचावत चाललाय. आवडली मनापासून कथा.
मस्त आहे!
अतिशय तरल शैली ....और अन्दौ
अप्रतिम कथा. आवडली
अप्रतिम कथा.
शेवटपर्यंत नेहेमीसारखीच सरधोपट ठेवली आहे पण पुन्हा शेवटात सिक्सर हाणला आहे.
पण शेवट एका ओळीत केलात राव. जरा अजुन थ्रीलर चालला असता.
भाषा - ४/५
फ्लो - ५/५
संवाद - ४/५
कथानक - २/५
सावकार, गरीब शेतकरी, लेकीच्या लग्नाचा पैसा इत्यादी फारच क्लिशे कथानक आहे पण सांगण्याची शैली जबरदस्त आहे म्हणून वाचविशी वाटते.
छान लिहिलीय, कथा आवडली.
आपणा सर्वांच्या प्रतिसादांसाठी व सुचनांसाठी मनापासुन आभारी आहे .
थरारक आणि दमदार लेखन...
या कथेचा एक असाही शेवट सुचला होता .
"सकाळी सकाळीच रंगोजी सावकार अचानक रक्ताच्या उलट्या होउन मरण पावला होता . तपासणीमध्ये त्या रक्तात शेंदुराचा अंश सापडला . हे कसं घडलं , कुणी घडवलं याचा काहिच थांगपत्ता लागत नव्हता . या आश्चर्यात भर म्हणुन कि काय कुणा अपरिचितानं तिथल्या भिंतीवर एक शब्द खरडला होता - "विषप्राशनम"
-- सर्व धर्मं परित्यज्या मामेकं शरणं व्रज ---- "
पण आंतरजालावर शोध घेताना , गरुडपुराणात "विषप्राशनम" अशी कुठली शिक्षा सापडली नाही , म्हणुन हा शेवट रद्द केला .
In reply to एक असाही शेवट by सिरुसेरि
नको! वरचाच शेवट अगदी झकास जमलाय...
In reply to एक असाही शेवट by सिरुसेरि
नाही केलात ते बरं झालं. मला विक्रमचा 'अपरिचितडू' आठवला असता.
मस्त जमलिये कथा
कता आवडली. शैली छान आहे.
(शुद्धलेखन आणि विरामचिन्हे यांकडे थोडे लक्ष द्यावे अशी विनंती.)
कथा आवडली. जो आहे तो शेवट आवडला.
हि कथा कशी कोण जाणे वाचायची राहून गेली होती.भारी लिहीली आहे.
छान लेखन