Skip to main content

भग्न शरीरे - 2

लेखक रातराणी यांनी बुधवार, 13/07/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस शेखर श्रवंतीला भेटायचा प्रयत्न करत होता. अगदी झोपायचे काही तास सोडले तर जवळ जवळ दर तासाला फोन करून पहात होता. पण मॅडम फोन काही उचलत नव्हत्या. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या श्रवंतीला असं अचानक काय झालं हे त्याला काही केल्या कळत नव्हतं. मनातल्या मनात त्यानं त्यांच्या आधीच्या भेटीत त्याच काही चुकलं असेल का याची पडताळणी केली, पण त्याला तर असं काहीच झाल्याचं आठवत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेली. आता घरी जाऊन खात्री केल्याशिवाय चैन पडणार नाही असा विचार करून शेखर ऑफिसमधून बाहेर पडला. एकीकडे काळजीही वाटत होती की समजा काही सिरीयस नसेल तर तिच्या आईला काय सांगायचं? त्यांना आवडेल का आपण असं अचानक, ओळखपाळख नसताना श्रवंतीची चौकशी केलेलं? श्रवंतीला आवडेल का? इतक्यात घरी सांगायची घाई नको करायला असं म्हणत तर होती. तिला काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार आपल्या जाण्याने? डोक्यात प्रश्नांच काहूर माजलं होतं. पण शेखरचा नाईलाज झाला होता. फक्त एकदा फोनवर तिने सांगितलं असतं सगळं ठीक आहे, काळजी करू नको तरी शेखरच्या मनाचं समाधान होणार होतं. बघू आता पुढचं पुढे असं म्हणून शेखरने श्रवंतीच्या दारावरची बेल वाजवली. काकूंनी दार उघडलं आणि त्यांना वाटलं कुणी सेल्समन आलाय की काय म्हणून त्यांनी जवळ जवळ दार बंद करतच शेखरला वेळ नाही असं सांगितलं. "काकू, एक मिनिट. मी सेल्समन नाहीये. मी शेखर. श्रवंतीचा मित्र. आम्ही एकत्र काम करतो... म्हणजे करायचो.. आता मी दुसरीकडे करतो जॉब. श्रवंती आहे का घरी?" "आहे. या आत." काहीशा तुटकपणे काकू म्हणाल्या. आत गेल्यावर काकूंनी शेखरला पाणी दिलं आणि श्रवंतीला बोलावते म्हणाल्या. थोड्या वेळाने बाहेर आल्या. "शेखर ती नाही म्हणते भेटायचं. ती फोन करेल म्हणाली नंतर." "ठीक आहे काकू. ती बरी आहे ना? नाही म्हणजे जरा काळजी वाटतीये...ती असं टाळत नाही ना मला. " बोलण्याच्या ओघात शेखर बोलून गेला आणि त्याला नंतर त्याची चूक जाणवली. पण काकूंवर विशेष काही परिणाम नव्हता झाला. उलट त्या अतिशय शांतपणे म्हणाल्या, "शेखर मला नाही वाटत ती पुन्हा तुला फोन करेल. तू उगीच आशा लावून बसू नकोस." काकूंच्या त्या स्पष्ट शब्दांनी शेखरच्या डोळ्यात पाणी तरळल. "पण असं झालंय तरी काय? तिचं लग्न ठरवताय का तुम्ही? मला कुणी काही सांगत का नाहीये? अस का मला तोडलं जातंय? " शेखर अगदी कळवळून म्हणाला. "मला वाटतं तुम्ही दोघे एकदा बोलून बघा. मी समजावते तिला." असं म्हणून काकू पुन्हा आत गेल्या. आता श्रवंती भेटेल म्हणून शेखरला आनंद तर झाला पण एकीकडे हुरहुरही वाटू लागली. लग्न वगैरे तसं काही असतं तर काकूंनी स्वतः सांगितलं असतं. काहीतरी वेगळं घडलंय. थोड्या वेळाने काकू बाहेर आल्या आणि काहीशा रडवेल्या सुरातच शेखरला आत जा असं सांगितलं. श्रवंतीच्या रूमचा दरवाजा उघडाच होता. पाठमोरी बसलेली श्रवंती पाहताच आतापर्यत एकवटलेला त्याचा सगळा धीर गळून पडला. दारात उभं राहून तिला हाक मारताच श्रवंतीने मागे वळून पाहिलं. त्याला पाहतांच तिला रडू कोसळलं. श्रवंती थोडी शांत झाल्यावर मग शेखर म्हणाला, "काय झालं शोनु? माझं काही चुकलं का?" श्रवंतीने त्याला मानेनंच नाही म्हणून सांगितलं. "मला काही सांगशील का? मे बी माझ्याकडे असेल तुझ्या प्रॉब्लेमच सोल्युशन." "...." "काय झालंय? तू जेवढा वेळ शांत बसणार आहेस तोपर्यंत इथे माझी काय अवस्था होतीये समजून घे ना जरा. का अशी वागतीयेस तू?" "शेखर... अरे डॉक्टरकडे गेलो होतो." एवढं बोलून श्रवंती पुन्हा शांत. तिला धीर देत शेखर म्हणाला, "शोनु, मी आहे ना! काकू आहेत. काय प्रॉब्लेम आहे हे तू सांगितलं नाहीस तर मला किंवा कुणालाच तुझी मदत नाही करता येणार." श्रवंतीने उठून कपाटातून काही रिपोर्ट्स काढले. वाचता वाचता शेखरच्या डोळ्यापुढची अक्षरं धूसर झाली. "शोनु, हे कसं शक्य आहे? आपण अजून दुसऱ्या डॉक्टरला दाखवू या. काहीतरी चुकलं असणार ग." श्रवंती पुन्हा शून्यात नजर लावून बसली होती. काही दिवसांपूर्वीपर्यंत अत्यंत नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या आपल्याबाबतीत हे का होतंय याचं उत्तर तिला काही केल्या मिळत नव्हतं. चारचौघीसारखं आयुष्य हवं होत तिला. खूप मोठी स्वप्नं,महत्वाकांक्षा कधीच नव्हत्या तिच्या. ऑफिसमधेही आपण बरे आणि आपलं काम बरं अशी काहीशी आपल्याच जगात राहणारी श्रवंती सर्वांचीच लाडकी होती. एकाच प्रोजेकटवर काम करता करता श्रवंती शेखरला आवडू लागली. नाही नाही म्हणता म्हणता तीही त्याच्या प्रेमात पडली. पुढे शेखरने कंपनी बदलली तरी त्यांच्यातल प्रेम कमी नाही झालं. अगदी भेटणं नाही झालं तरी दिवसातून एक दोन फोन तर ठरलेलेच होते. तिचा आवाज ऐकल्याशिवाय त्याला चैन नाही पडायची आणि शेखर नीट जेवला का, घरी पोचला का हे कळल्याशिवाय श्रवंतीला. आपल्याही आयुष्यात काही उलथापालथ करणारं घडू शकतं यावर श्रवंतीचा विश्वासच बसत नव्हता. नाही म्हणायला आतापर्यंत आपण शेखरविषयी घरी सांगितलं नाही याची बोच होती मनात कुठेतरी पण थोडाफार विरोध झाला तरी आई समजून घेईल हा विश्वासही होता. डॉक्टरांकडे जायचं म्हणून श्रवंती त्या दिवशी लवकर घरी आली होती. तसं काही विशेष झालं नव्हतं पण श्रवंतीचे बाबा अचानक गेल्यानंतर काकूंनी सवय लावून घेतलेली एन्युअल चेकअपची. श्रवंती डॉक्टरांकडे गेल्यावर काकू घर आवरत बसल्या होत्या. इकडे श्रवंतीचे चेक अप करता करता डॉक्टरांचा चेहरा मात्र काहीसा चिंताग्रस्त झाला होता. ब्रेस्ट एक्साम करताना डॉक्टर काहीशा काळजीत आहेत असं श्रवंतीला वाटलं खरं पण काही नसेल असा विचार करून ती शांत बसली होती. "श्रवंती, धाप लागल्यासारखं, श्वास फुलल्यासारखा वाटतो का कधी?" "अंह" "कधी ताप येऊन गेलाय का?" "हो मागे एकदा झाली होती जोरात सर्दी." "तसा नाही..म्हणजे सर्दी नाही खोकला नाही. नुसता ताप? कुठून आला कळलं नाही असं नाही झालं ना?" शक्य तेवढ आठवायचा प्रयत्न करूनही श्रवंतीला काही नुसता ताप आलेला आठवेना. "नाही. बहुतेक नाही...आला." "एकूण एनर्जी लेव्हल ठीक असते?की थकल्यासारखं वाटतं?" या प्रश्नाचं उत्तरं मात्र तिला माहीत होतं. हसत हसत ती म्हणाली, "हो. लोळत पडावस वाटतं. सारखंचं" डॉ. वैद्यही त्यावर हसल्या. पण तेवढ्यापुरतचं. "श्रवंती ब्रेस्ट एग्ज़ेम घरी कशी करायची तुला मागे दाखवलं होतं. करतेस का तू?" श्रवंती खाली मान घालून नाही म्हणाली. "हे माझा हात आहे तिथे तू बघ बरं जरा. या इथे. लंप असावा असं वाटतंय. मला वाटतं आपण खात्री करून घेण्यासाठी मॅमोग्राम करून घ्यायला हवा. त्यानंतर जर गरज वाटली तर अल्ट्रासाउंड बायॉप्सी करू. बऱ्याचदा पीरीयडसच्या आधी होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे ब्रेस्टमधे लंप जाणवू शकतात.मनात काही शंका न आणता टेस्टस करून घे. घाबरू नकोस. काळजी करू नको. मला वाटतं तू आईला बोलवून घे इथे. मी त्यांना समजावून सांगते. " काकू हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर त्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. पण त्या दोघींना समजावत डॉकटर म्हणाल्या, "तुम्ही दोघीही काही शंका घेऊ नका. शांत रहा. आपण फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी टेस्टस करतोय एवढं लक्षात ठेवा फक्त. मी स्वतः येऊ का तुमच्याबरोबर?" पण काकूंनी स्वतःला सावरलं आणि श्रवंतीला घरी घेऊन गेल्या. रेडियोलॉजी लॅबमध्ये फोन करून त्यांनी डॉक्टर वैद्यांचे नाव सांगून दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतली. शेखरचे अनेक मिस कॉल येऊन गेले पण श्रवंतीची मनःस्थिती नव्हती बोलायची. एकदा सगळ्या टेस्ट झाल्या आणि रिपोर्ट्स नॉर्मल आले की मगच सांगू असा तिने विचार केला. पुढचे काही दिवस तिने आणि काकूंनी अत्यंत तणावाखाली घालवले. एक दिवस डॉक्टर वैद्यांनी तिला फोन करून रिपोर्ट्स आलेत आणि भेटायला ये म्हणून सांगितलं. काकूंनी तर देवापुढचा दिवा बंद होऊ दिला नव्हता. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना लगेच आत बोलावून घेतलं. आता कुठल्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे याचा विचार काकू करत होत्या. मनातल्या मनात सगळ्या देवांना नवस बोलून झाले. डॉक्टरांनी त्यांना दोघींना सर्व रिपोर्ट दाखवले आणि समजावून सांगत म्हणाल्या, "श्रवंती माझी शंका खरी निघाली. मॅमोग्राममध्ये जे लंप दिसतायत ते नॉर्मल लिंफ नोड नसावेत. आणि साईजही मोठा आहे. मला वाटत आपण लवकरात लवकर पुढच्या टेस्ट करून योग्य निर्णय घ्यायला हवा. अल्ट्रासाउंड बायॉप्सी केल्यावर आपल्याला कळेल हे लंप बिनाइन आहेत की कॅन्सरची सुरुवात. मी तुला डॉकटर देसाईंचा नंबर देते. त्यांच्याशी बोलून मी तुझी केस डिस्कस केलीये. ते स्वतः तुला ब्रेस्ट कॅन्सरला उपलब्ध असलेल्या उपचार पद्धती समजून सांगतील. मला माहितीये तुला भीती वाटणं अगदी साहजिक आहे, तुला घाबरवायचा उद्देश मुळीच नाहीये पण तुझ्या मनाची तयारी व्हायला हवी इथून पुढे. यु नीड टू बी स्ट्रॉंग. कदाचित बायॉप्सीमध्ये काळजी करण्यासारखं काही नसेल, पण एक डॉकटर म्हणून सर्व शक्यतांचा विचार करणं आणि त्यांची तुला माहिती देणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुला काही प्रश्न आहेत का?" पुढचा एक अर्धा पाऊण तास काकूच डॉक्टरांना वेगवेगळे प्रश्न विचारत होत्या. श्रवंती मात्र कुठेतरी हरवून गेली होती. बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये श्रवंतीच्या ब्रेस्टमध्ये असलेले लंप ही ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात असल्याचं निदान झालं. अजून हे लंप इतर भागात पसरले नसल्याने फक्त ब्रेस्टवरती ट्रीटमेंट करून कॅन्सर आटोक्यात आणणे शक्य होते. डॉक्टरांनी श्रवंतीला आधी ब्रेस्ट मॅस्टेक्टोमी आणि नंतर किमोथेरपीचा सल्ला दिला. श्रवंतीच्या ट्रीटमेंटविषयी ऐकून काकूंना फार मोठा धक्का बसला. पण त्यांना रडत बसूनही उपयोग नव्हता. श्रवंतीला समजावून ऑपरेशनसाठी तयार करणं हे अवघड काम होत त्यांच्यासाठी. त्यात श्रवंतीचा स्वभाव इतका शांत की ती मनातलं काही स्पष्ट त्यांच्याजवळ बोलतही नव्हती. विचित्र ओढाताण होत होती दोघींची. काकू कशातरी सावरून तिला सांभाळत होत्या पण त्यांना सावरणारं कुणीच नव्हतं. शेखरला भेटल्यावर काकूंना का कुणास ठाऊक वाटलं की निदान ह्याच्याशी तरी श्रवंती मनमोकळं बोलेल. शेखरच्या येण्याने त्यादिवशी काकूंना अंधुकसा आशेचा किरण दिसला होता. पण अचानक मिळालेल्या ह्या बातमीनं शेखरला मात्र आता काय बोलावं सुचत नव्हतं. न राहवून त्यानं श्रवंतीला मिठीत घेतलं. एखाद्या लहान मुलाला थोपटावं तसं तिला थोपटताना दोघांनाही मनाला आवर घालता आला नाही. किती काही बोलायचं होतं शेखरला पण शब्द सगळे हरवून गेले होते. आपण जे बोलू, सांगू त्याचा खरोखर तिला काय उपयोग होईल? तिची वेदना आपल्याला समजेल का? श्रवंतीचा आवेग ओसरल्यावर शेखर म्हणाला, "शोनु, ट्रीटमेंट सुरू करायला हवी लवकरात लवकर. वेडाबाई, मला सांगत जा ग सगळं." श्रवंतीने मात्र इथून पुढचा प्रवास आता एकटीनेच करायला हवा म्हणून आयुष्यातला सगळ्यात अवघड निर्णय घेतला होता. मनाशी काहीतरी ठरवल्यासारखं ती खंबीरपणे म्हणाली, "मला वाटतं आपण इथेच थांबूया, शेखर.माझ्याबरोबर मी तुझंही भविष्य अंधारात नाही ढकलू शकत. आय एम रीयली सॉरी पण.... " श्रवंतीच्या त्या शब्दानी शेखर कोसळला. त्यांच्यात कधी शपथा, वचनं असलं काही घडलं नव्हतं. दोघेही प्रॅक्टिकल विचार करणारे. लग्नाचा विषय एक दोनदा निघाला तरी दोघांनीही कोणताही आक्रस्ताळेपणा न करता अजून वेळ घेतला पाहिजे असं ठरवलेलं. पण सगळ्याच गोष्टी शब्दांनी बोलून दाखवल्या नसल्या तरी आतल्या आत एकमेकांच्या सहवासाची असलेली ओढ बरच काही बोलून गेली होती. आयुष्यातल्या ज्या क्षणी श्रवंतीला खरोखर शेखरची गरज होती तेव्हाच ती त्याला दूर करत होती. "असं नको करू ना ग शोनु, मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. अगं तू साधं बोलली नाहीस माझ्याबरोबर तर काय अवस्था होते माझी तुला माहितीये का?" "अरे होईल हळू हळू सवय. मला झालीच की गेल्या आठ दिवसात. तुलाही होईल." "श्रवंती, तू माझ्या प्रेमाचा असा अपमान का करतेयस? आणि अगं ट्रीटमेंट आहे ना? तू असा टोकाचा निर्णय का घेतीयेस?" "हा टोकाचा निर्णय आहे मला मान्य आहे पण मी तो पूर्ण विचार करून घेतीये. ट्रीटमेंट जरी यशस्वी झाली तरी आज मी जी आहे ती अजून महिन्याभराने नसेन. सगळं बदलणार आहे शेखर, माझं शरीर, माझं आयुष्य बदलतंय. तू बरोबर आलास तरी तुला देण्यासाठी माझ्याकडे काही असेल का? मग का असं ओझं लादून घेतोयस तू तुझ्यावर?" "सगळं तूच ठरवणार आहेस का? मला काही मन आहे की नाही? प्रेम दोघांनी केलेलं... आता एकावर संकट आलं म्हणून त्यान दुसऱ्याला सोडून जायचं असं केलं तर त्याला प्रेम नाही म्हणत. खेळ म्हणतात त्याला, जो तू खेळतीयेस माझ्याशी. आणि तुझं माझ्यासोबत असणं एवढंच मागणं आहे माझं, अजून काहीही नकोय मला..." "हे आता बोलणं सोपं आहे शेखर, काही दिवसांनी माझी मॅस्टेक्टोमी होईल तेव्हा माझा एक ब्रेस्ट काढणार आहेत.तेव्हाही तुला असेच वाटेल का? वाटेलही कदाचित पण नंतर एका वर्षाने, दोन वर्षांनी, तीन वर्षांनी काय? कशावरून तुला तेव्हा तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही? " "..." "मला वाटलंच होत आता तुला काही सुचणार नाही काय बोलायचं." "श्रवंती अगं, माझ्यासाठी नवीन आहे हे सगळं, मला काही माहीत नाहीये आणि इज इट रियली एंड ऑफ द वर्ल्ड? तुझ्या आयुष्याची किंमत जास्त आहे त्याहून... " "शेखर!! एंड ऑफ द वर्ल्ड? खरंच? तुला कल्पना आहे का हा केवढा मोठा बदल आहे माझ्यासाठी.जगाच काय होईल मला माहीत नाही पण मला एकच प्रश्न छळतोय सतत, इथून पुढे माझं स्त्रीत्व मला जाणवेल का? मनाचं सामर्थ्य मनाचं सामर्थ्य असा जप सुरू असतो आईचा सतत. सांग ना मला, कुठल्या मनाचं सामर्थ्य मला दुसऱ्या ब्रेस्ट मध्ये कॅन्सर होणार नाही याची खात्री देईल. कुठल्या मनाचं सामर्थ्य मला शृंगाराच्या उत्कट क्षणी एखादा पुरुष आपल्या छातीत डोके घुसळतो तसा अनुभव देणार आहे? भुकेनी कासावीस झालेलं तान्ह बाळ जेव्हा आईकडे झेपावत तेव्हा आईच्या स्तनांशी चिकटल्यावर हवं ते मिळाल्याचा बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते देऊ शकल्याचं आईला असलेलं समाधान मला मिळेल? शरीराच्या मर्यादा असतात हेच सांगत आले आतापर्यंत सगळे, मनाच्या मर्यादा कुणी नाही सांगितल्या. पण मला माहितीये शेखर, आता मला चांगलंच कळलंय, मनालाही मर्यादा आहेत. कदाचित मी यातून बरी होईनही, इम्प्लांट्स लावून माझं शरीर पूर्वीसारखं दिसेल अशी सोयही करता येईल, पण खरं सांग कितीही मुलामे लावले तरी मी शेवटी अपूर्णच ना? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुझ्याकडे? तू मला स्वीकारलंस तरी तुझ्या घरचे मला स्वीकारतील का? त्यांना पटेल असं ज्या मुलीच्या भविष्याची खात्री नाही अशा मुलीशी त्यांच्या मुलाचं भविष्य जोडलं गेलेलं?" श्रवंतीच्या प्रश्नांच्या भडिमाराने शेखर बुजून गेला. तिच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्याच्याकडे. त्याला फक्त एवढं कळत होत की जर कधी त्याच्यावर अशी वेळ आली असती तर श्रवंती त्याला कधीच सोडून गेली नसती. स्त्रीच्या बाह्य रुपाला अतोनात महत्व असलेल्या समाजात जर रूपानं, रंगानं सामान्य असलेल्या मुलींना अनेक समस्यांना समोर जावं लागत तर इथं तर.... आपले आई वडील कितीही पुरोगामीपणाचा आव आणत असले तरी ते ही शेवटी सामान्य माणसं आहेत. त्यांना झेपेल हे सगळं? त्यांना स्वीकार करता येईल श्रवंतीचा? आपली स्वतःची आई काय प्रतिक्रिया देईल हे सगळं कळल्यावर? एक स्त्री असून ती श्रवंतीला समजून घेईल की नाही याची आपल्याला खात्री नाही. पण या सर्व गोष्टी खरंच इतक्या महत्वाच्या आहेत का? अगदी लहानपणापासून आपण सगळे नियम जपत आलो समाजाचे. काय मिळालं आपल्याला? मग आता एक वेळ आपण एखादा संकेत नाही पाळला तर घेतील आपल्याला सांभाळून? समाजाने नाही तर नाही घरचे तरी? पण एका प्रश्नचिन्हाशिवाय शेखरकडे काहीही नव्हतं. त्याच्या मनातली चलबिचल श्रवंतीने ओळखली आणि तीच म्हणाली, "कधी कधी मौनही खूप बोलकं असतं शेखर. तू निर्धास्त मनाने जा. तुझ्याविषयी माझ्या मनात काहीही राग नाही हे विसरू नकोस." "नाही जाणार मी. कुणी काही म्हणू देत. मला तू जशी आहेस, जशी असशील तशी हवी आहेस. का अशी शिक्षा देतीयस?" "मी कोण शिक्षा देणारी तुला. माझ्या हातात जर काही असतं तर मी अशी रडत बसले असते का?" "पण तू हे अगदी टिपीकल मुलींसारखं का वागतीयेस? अशी नाहीयेस तू. त्याग करून कुणीही मोठं होत नाही असं म्हणायचीस ना तू? मग का करतीयेस हा त्याग? शेवटी तुलाही आहेच मोठेपणाची हौस..महान श्रवंती. द ग्रेट श्रवंती." "हो करतीये. का माहितीये? उद्या लग्न झाल्यावर माझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक नजरेत मला फक्त एकच भाव दिसेल कुठला माहिती, द ग्रेट शेखर! नकोय मला ते ओझं! नाही जगायचं मला असं गुदमरून जाऊन." "कोणत्या नजरा? कुणाच्या नजरा? माझं काय? माझ्या नजरेत काय दिसेल तुला?आतापर्यंत जे दिसलं त्याची किंमत शून्य? आणि तुला खरंच असं वाटतं का की फक्त बाळाला दूध पाजता आलं म्हणून कुणी चांगली आई होत? निदान तू तरी असा विचार करत नसशील असं वाटलेलं मला... तू वेगळी आहेस म्हणून मला आवडतेस. हे असं काहीतरी बोलून तूसुद्धा इतरांसारखीच आहेस हे का सिद्ध करतेयस तू? यातून सावरू शकतो आपण दोघे. तू एक संधी तर दे मला..." "मला वाटत शेखर तू जावस आता. मला जे प्रश्न पडलेत त्यांची उत्तरं मला मिळतील की नाही मला माहीत नाही पण मला सिरीयसली आता तुझ्या प्रश्नांचा विचार करायला वेळ नाही. तू जा इथून." डोळ्यात आलेल पाणी तसंच लपवून शेखर बाहेर पडला. स्वैपाकघरात उगीच खुडबुड करत बसलेल्या काकूंच्या हातातून गडबडीत चहाचा कप फुटला. घाईघाईत त्या बाहेर आल्या. "शेखर... अरे शेखर.. चहा ठेवला होता रे." घशात दाटून आलेला आवंढा कसाबसा मागे ढकलत काकू म्हणाल्या. "आज नको काकू. परत येईन." भरल्या डोळ्यांनी शेखर म्हणाला आणि गेटबाहेर पडला. रेलिंगच्या आधाराने काकू तिथेच पायरीवर बसल्या. दाराआडून शेखरला पाहात असलेली श्रवंती तो नजरेआड होताच बाहेर आली. आईच्या खांद्यावर डोके ठेऊन शांत बसून राहिली. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. पदराने डोळे पुसत शेवटी काकू म्हणाल्या, "बाळा, तू स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतिये, कळतंय ना तुला?" इकडे घरी शेखरने सर्व गोष्टींची कल्पना दिली आणि जणू काही वादळच आलं. त्यांच्याशी बोलताना क्षणोक्षणी शेखरला जाणवत होतं की कधी कधी काही प्रश्न अनुत्तरित राहिलेलेच बरं असत. श्रवंतीला समजावून सांगणे तर दूरच पण तिने घेतलेला निर्णयच कसा योग्य आहे आणि बरं झालं आपली आपण ब्याद टळली पासून ते काहीतरी पुण्य असेल म्हणून लग्नाच्या आधी कळलं, लग्न झाल्यावर गळ्यात पडली असती असे सर्व शेरे त्याला ऐकायला मिळाले. इकडे श्रवंती शेखरला टाळत होती आणि घरच्यांचा असा वैताग. सगळ्याला कंटाळून शेखरने बेंगलोरला ट्रान्सफर मागून घेतली. श्रवंतीला एकदा भेट म्हणून विनवणी केली पण ती तयार झाली नाही. काही दिवस शेखर काकूंच्या संपर्कात राहिला पण ते श्रवंतीच्या लक्षात आल्यावर तिनं त्यावरही त्रागा केला. शेवटी होऊ दे तुझ्या मनासारखं असं म्हणून शेखरनेही तिला पुन्हा संपर्क केला नाही. श्रवंतीची ट्रीटमेंट पूर्ण झाली. मेसेक्टॉमीनंतर श्रवंतीने डॉक्टरांनी सांगितलेला ब्रेस्ट रीकन्स्ट्रक्शनचा पर्याय स्वीकारला. शरीरात तयार झालेली पोकळी तिला उपचारांनी भरून काढता आली. पण मनात तयार झालेली पोकळी? खूप प्रयत्न करून तिनं स्वतःला सावरलं. तीसुद्धा इतर स्त्रियांसारखीच नॉर्मल आहे हे लक्षात ठेवण्याची तिला सवय करून घ्यावी लागली. श्रवंती आता नोकरी करत करत एका ब्रेस्ट कॅन्सर अवेयरनेसचे काम करणाऱ्या ग्रुपबरोबर काम करतीये. सुट्टीच्या दिवशी खेडोपाडी जाऊन तिथल्या स्त्रियांना,मुलींना माहिती देणं, त्यांचे प्रश्न डॉकटरांकडे पोचवणं आणि जमतील तशी योग्य उत्तरं देणं ह्या कामात तिन स्वतःला गुंतवून घेतलंय. त्यांचे प्रश्न ऐकताना, त्यांचे प्रोब्लेम्स समजून घेताना एक मात्र श्रवंतीला कळत होतं की ती खूप नशीबवान आहे. योग्य वेळी कॅन्सरच निदान होणं, त्यावर उपचार मिळणं ही किती दुर्लभ गोष्ट असू शकते हे तिला काही स्त्रियांशी बोलताना जाणवत होतं. मनात खूप इच्छा असूनही, खूप आठवण येऊनही ती शेखरला पुन्हा भेटली नाही. काही वादळं सगळं उध्वस्त करतात. अगदी तुमचं स्वतःच अस्तित्वही. अशा एका वादळाला तोंड देऊन श्रवंती खंबीर झालीये. पण म्हणून स्वतः कुणाच्या आयुष्यात वादळ होऊन राहणं तिला मान्य नाही. तिचं शेखरला स्वतःपासून दूर करणं हे आततायीपणाच आहे असं काकूंना मनापासून वाटतं. आपल्यामागे तिचं काय होईल अशी चिंता त्यांना आहे पण इतके कठोर निर्णय घेऊन त्यावर ठाम राहनाऱ्या श्रवंतीबद्दल त्यांना आता विश्वासही वाटतोय. तिच्या आयुष्याचे बरे वाईट निर्णय स्वतः घेणाऱ्या आणि त्यांच्या परिणामांना सामोरं जाणाऱ्या श्रवंतीच त्यांना कौतुक वाटतं. स्त्री असणं म्हणजे नेमकं काय? केवळ स्त्रीचा देह मिळाला म्हणून स्त्री म्हणायचं का? ह्या तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तिला अजूनही मिळाली नाहीयेत, पण त्यांची तीव्रता नक्कीच कमी झालीये. असं म्हणतात की काहीतरी गमावल्याशिवाय काही मिळत नाही. श्रवंतीला तिची नवी ओळख मिळाली, बरंच काही गमावून. टीप: कथेतून कुठलीही चुकीची वैद्यकीय माहिती तर जात नाहीये अशी शंका असल्याने डॉ. खरेना कथा वाचायची आणि काही त्रुटी असतील तर समजावून सांगायची विनंती केली होती. त्यांनी वेळात वेळ काढून कथा वाचली आणि सोप्या शब्दात त्रुटी समजावून सांगितल्या याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. शक्य ते बदल करण्याचा प्रयत्न मी केला आहे तरीही काही कमतरता राहून गेली असल्यास हा माझ्या लेखनातील दोष समजून खरेसरांनी आणि मिपावर वावरणाऱ्या इतर डॉक्टरांनी माफ करावे ही विनंती.
लेखनविषय:

वाचने 10473
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

शरीराच्या मर्यादा असतात हेच सांगत आले आतापर्यंत सगळे, मनाच्या मर्यादा कुणी नाही सांगितल्या.>>शानदार, जबरदस्त

कथा म्हणून आवडली. असले प्रकार कुणाच्या आयुष्यात येऊ नयेत. असो!

हम्म. शेखरला दूर करण्याचा श्रवंतीचा निर्णय थोडा आततायी किंवा अनावश्यक वाटला. पण काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी हेही खरेच. (स्तनाच्या कर्करोगावरील या कथेच्या निमित्ताने थोडेसे अवांतर - मुंबईतील एका अंडरगारमेंट्स कंपनीबद्दल मागे वाचनात आले होते. मॅसेक्टॉमी झालेल्या स्त्रियांसाठी ते खास ब्रेसिअर पुरवतात. तेही मोफत. जेणेकरून समाजात वावरताना त्यांना आत्मविश्वास परत लाभावा.) बाकी कथा आवडली हेवेसांनल.

In reply to by एस

आगाऊपणा -- कथा माझी नसताना प्रतिसाद देण्याचा आगाऊपणा करतो आहे या बद्दल क्षमस्व मॅसेक्टॉमी झालेल्या स्त्रियांसाठी ते खास ब्रेसिअर पुरवतात. तेही मोफत. जेणेकरून समाजात वावरताना त्यांना आत्मविश्वास परत लाभावा.) लेखिकेने अत्यंत अचूक शब्दात वर्णन केलेले आहे तेच इथे उद्धृत करतो शरीरात तयार झालेली पोकळी तिला उपचारांनी भरून काढता आली. पण मनात तयार झालेली पोकळी? खूप प्रयत्न करून तिनं स्वतःला सावरलं. तीसुद्धा इतर स्त्रियांसारखीच नॉर्मल आहे हे लक्षात ठेवण्याची तिला सवय करून घ्यावी लागली. ही वस्तुस्थिती आहे. बाहेरून इम्प्लांट कितीही दुसऱ्या स्तनासारखाच दिसत असला तरी त्या स्त्रीला मात्र तिथे पोकळी आहे हे जाणीव सतत मनात असते आणि ही जाणीव बोथट व्हायला काही वर्षे जावी लागतात. मग ती स्त्री साठीच्या पुढची असली तरीही. कथा अतिशय सुंदर झालेली आहे यात शंकाच नाही. बऱ्याच वेळेस कर्करोग झाल्यावर मुलीची विचारसरणी बदलते. भावनेच्या भरात पुरुष लग्नास तयार होतीलही परंतु जर आयुष्यभर मला त्याने मी तुझ्यावर उपकार केलेले आहेत हे ऐकवले तर आयुष्य नकोसे होईल असा विचार त्यांच्या मनात नक्की येतोच उद्या लग्न झाल्यावर माझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक नजरेत मला फक्त एकच भाव दिसेल कुठला माहिती, द ग्रेट शेखर! नकोय मला ते ओझं! नाही जगायचं मला असं गुदमरून जाऊन." या शब्दात लेखिकेने ते छान मांडलेले आहे. श्रवंती अतिरेक करते आहे या म्हणण्यासाठी हे उत्तर आहे. वरील दोन्ही गोष्टी मी कर्करोगाच्या रुग्णांमध्ये प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. माझ्या वर्गमित्राला लग्नाच्या अगोदरच्याच महिन्यात कर्करोग निदान झाले होते. त्यावर त्याच्या वाग्दत्त वधुने सर्व समजून उमजून लग्नाची तयारी ठेवली होती. परंतु तेंव्हा मित्राच्या वडिलांनी तिला स्पष्ट नकार दिला होता, हे सांगून की मुलाच्याच आयुष्याचा भरवसा नाही तर अजून तू कुठे आगीत उडी घेते आहेस?

In reply to by सुबोध खरे

आगाउपणा काय त्यात सर. तुम्ही खूप छान समजावून सांगता. असं नेमकं कदाचित मला नसतं सांगता आलं.

अगदी काल संध्याकाळीच बायकोने तिच्या मैत्रिणीबद्दल सांगितले... मैत्रिण चार महिन्याची गर्भवती होती, पण बाळाचे आरोग्य व्यवस्थित नसल्यामुळे डाॅक्टरांनी अॅब्वाॅर्शन करायला सांगितले. तोपर्यंत स्तनांत येऊ लागलेल्या दूधाच्या गाठी तयार झाल्या अन् ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. आता परवाच आॅपरेशन करून एक ब्रेस्ट काढला. :( लेख आवडला.

:(

हरलेली वाटली गोष्ट.लवकर कळालेला ब्रेस्ट कँसर पूर्णपणे बरा होतो हल्ली.स्त्रीत्व हे फक्त एखाद्या अवयवापुरतंच सिमित असतं का? या गोष्टीलाच इतकं महत्त्व दिल्याने कथा नकारात्मक झाली असं वाटलं.

In reply to by अजया

स्त्रीत्व हे फक्त एखाद्या अवयवापुरतंच सिमित असतं का? या गोष्टीलाच इतकं महत्त्व दिल्याने कथा नकारात्मक झाली असं वाटलं.
अगदी हेच वाटलं. कित्येक विनापत्य जोडपीही समाधानाने जगात असलेली पहिली आहेत. शिवाय सेक्स हेच काही विवाहाचे अंतिम उद्दिष्ट नसते.

In reply to by सस्नेह

मानसिकतेवर अवलंबून आहे. एका टप्प्यावर इतका वैताग येतो की काहीच नको असं वाटतं. सेकंड हॅंड अनुभव असले तरी फर्स्ट हॅंड बघितले आहेत. विनापत्य वगैरे उदाहरण इथे थोडंसं अस्थानी वाटतं. माणसाचं स्वत:वर सगळ्यात जास्त प्रेम असतं आणि आपण काहीही कारणाने कुठंतरी कमी होणार आहोत ही भावना प्रचंड चिडचिड निर्माण करवणारी असू शकते. त्या मानाने अपत्य प्राप्ती न होणे यात स्वत: मध्ये काही कमी असल्याची 'प्रत्यक्ष' भावना नसते. अर्थात ती भावना आपल्या जागी तितकीच महत्त्वाची आणि वेगळी आहे हे मान्य आहे. अवांतर- नविन आलेला waiting सिनेमा बघावा. छान आहे.

साहित्य दर्जा बद्दल गळा काढणार्यांसाठी ही मालिका आणि मोसाद्,एक संघ्,ती,ओपन व्यथा अश्या मालीका हेच खणखणीत उत्तर आहे. पुभाप्र

ओळखीच्या माणसांत दोन अश्या केसेस पाहिल्याने ,श्रवंती चे प्रश्न योग्य वाटतात. प्रेम का व्यवहारिकपणा अश्या कात्रीत असताना चूक की नि बरोबर काय याचा निर्णय घेणे कठीण असते. तेव्हा एक गोष्ट पटते " there is nothing right or wrong in this world. " अवांतर - कथा १ नि २ या पूर्णतः वेगळ्या होत्या . त्यामुळे कथा ३ वाचण्यास उत्सुक .....

कथा ठीक. सुखांत पाहिजे असे नव्हे, पण नायिकेचे विचार टोकाचे वाटले. नकारात्मकच खरे तर. ती स्वतःलाही आहे तसे स्वीकारू शकली नाही असे काहीसे.

कथा म्हणुन आवडली. पण श्रवंतीचा निर्णय नाही पटला. आततायी आहे निर्णय.
ती स्वतःलाही आहे तसे स्वीकारू शकली नाही
ह्याच्याशी सहमत. माझ्या पाहण्यात एक आज्जी होत्या त्यांना असच उमेदीच्या काळात ब्रेस्ट कँन्सर झाला होता,एक ब्रेस्ट काढुन टाकला होता त्यांचा. पण जगणं सोडल नाही त्यांनी आजोबांनी खूप छान साथ दिली. हल्लीच १० वर्षापूर्वी आजोबा गेले त्यानंतर ही आयुष्य "जगल्या". त्यांच्या मैत्रिणी पण भारी आहेत. खूप सपोर्ट केल्या. संध्याकाळी वॉक ला यायच्या आमच्या भागात तेव्हा भेटायच्या रोज. सतत चेहर्‍यावर हसु. आता आज्जीपण नाहीयेत. पण त्यांची आठवण येते अशीच. आणि त्यांच्यासारखच आपण व्हाव अस वाटत :)

फारच सुरेख आणि सशक्त, मुद्देसुद मांडणी. अतिशय आवडली ही गोष्ट. अभिनंदन,पुढची कथा लवकर लिहा. पैजारबुवा,

काही वादळं सगळं उध्वस्त करतात. अगदी तुमचं स्वतःच अस्तित्वही. अशा एका वादळाला तोंड देऊन श्रवंती खंबीर झालीये
वाह अप्रतिम +११

कथा आवडली पण थोडं संयतपणे घेऊ शकली असती श्रवंती, असो. कदाचित असा प्रसंग समोर आल्यावर मुळातून हादरवून टाकणा-या गोष्टी घडतात म्हणून असा आततायीपणाचा निर्णय घेणं हे नॅचरल असेल.

उलट तिने शेखरला मोकळं केलं. खरं प्रेम कुणालाही बंधनात अडकवत नाही, तर मोकळं करतं. मला वाटतं तिचं शेखरवर खरं प्रेम होतं म्हणूनच तिने त्यालाही बंधनांत जखडून ठेवलं नाही आणि स्वतःही जखडून राहिली नाही.

In reply to by बोका-ए-आझम

हम्म, खरंय अगदी. 5 वर्षाच्या लव्ह चे अरेंज मध्ये रूपांतर करून लग्न ठरल्यावर अपघातात एक पाय गमावलेला मित्र आठवला. मुलीच्या घरच्यांनी लग्न मोडल्याचे सांगितले. प्रेमामुळे मुलाने फक्त एकदा मुलीशी भेटायची इच्छा व्यक्त केली. ते सुद्धा न होऊ देता मुलीचे लग्न दुसर्या ठिकाणी लावून दिले गेले. आता चक्क चित्रपटाप्रमाणे दोघेही एकाच कार्यालयात आहेत. फरक एवढाच कि अंगाच्या हुशारीने तो मॅनेजर झालाय, ती अजून अकौंटसला आहे. मी दोघांनाही ओळखतो, पूर्वायुष्याबद्दल चकार शब्द दोघांकडून निघत नाही.

ब्रेस्ट कॅन्सर मुळे जर कोणाची अवस्था श्रवंती सारखी होत असल्यास, झालेली पाहिल्यास, सदर स्त्रीला समुपदेशन फेऱ्या सुरु असताना, एंजेलिना जोली ची केस स्टडी जरूर द्यावी असे वाटते (एखादा ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट गृप ती देत असल्यास कल्पना नाही, हे माझे अज्ञान मी मान्य करतो) जोली, एंजलीना जोली, जगातल्या कित्येक कोटी लोकांनी सौंदर्याचा मानदंड मानलेली स्त्री, तिला सहचर लाभला तो ही साक्षात ब्रॅड पिट सारखा देखणा पुरुष जो तिला तोडीस तोड होता/आहे, ब्रेस्ट कॅन्सर किंवा एकंदरीत कॅन्सर मध्ये येणारे, पॅनिक>डीनायल>एंगर>एक्सेप्टन्स हे phase तिने अन पिट ने कसे हाताळले हे एका राईटअप मध्ये अतिशय सुंदर मांडलेले वाचले होते, दुर्दैवाने ते आत्ता सापडत नाहीये.

. पुढील कथेची वाट बघत आहोत. :)

सुंदर कथा . आवडली. श्रवंतीला अतातायी , नकारत्मक वागली का ? तिने शरीराला किंवा शरीराच्या एका भागाला एव्हड महत्व का द्याव ? असे प्रश्न नक्कीच निर्माण होउ शकतात पण कथेतील एखाद्या पात्राला वागण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. कथाकार त्यातला एक निवडतो आणि तो त्याला/तिला जे म्हणणे मांडायचे आहे त्याला अनुसरुन असतो. वरील मालिका भग्न शरीरे हि शरीर आणि मन/भावना यांचा संबंध अशीच असल्याने श्रवंतीचे वागणे, तिचा निर्णय हे मालिकेच्या मुळ विषयाला योग्य न्याय देतो असे वाटते. भग्न शरीरे भाग ३ च्या प्रतिक्षेत

In reply to by राजाभाउ

तिने शरीराला किंवा शरीराच्या एका भागाला एव्हड महत्व का द्याव ? राजाभाऊ शरीर आणि सौंदर्य हा स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग असतो. आणि तो पुरुषांना सहजासहजी कळणार नाही. साधे उदाहरण म्हणजे सकाळी दूध आणण्या साठी जाताना पुरुष असेल तो पेहराव घालून जाईल पण कोणतीही स्त्री आपला चेहरा, केस आणि कपडे नीटनेटके केल्याशिवाय जाणार नाही. लग्नात पाहिले असता एखाद्या आजी सुंदर साडी नेसून दागिने घालून नटून आलेल्या असतात पण तेच आजोबा बेंगरूळ कपडे घालूनही निससंग पणे वावरत असतात. साधे उदाहरण. टकलावर घालायचा "केसांचा टोप" किती विकले जातात आणि "पॅडेड ब्रा" किती विकले जातात याचे व्यस्त प्रमाण आपल्याला मी म्हणतो तो मुद्दा समजावून देण्यास मदत करतील

In reply to by तुषार काळभोर

हे उदाहरण देण्याचे विविक्षित कारण आहे. गंगावन वापरण्यासाठी साहजिक कारण असतेच. पण जी गोष्ट बाहेरून सहज दिसत नाही तिथे पण स्त्रिया आपले सौंदर्य वाढवण्यासाठी प्रसाधने वापरतात.

In reply to by सुबोध खरे

१००% सहमत आहे डॉक. माझा मुद्दा किंचित वेगळा होता. माझ्या मते तिने शरीराला किंवा शरीराच्या एका भागाला एव्हड महत्व द्याव का नाही द्याव हा मुद्दाच मुळात नॉन इश्यु आहे कारण कथेचा किंवा मालिकेचा विषयच मुळी "भग्न शरीरे" म्हणजे शरीराच्या भग्न (अपुर, वेगळ ह्या अर्थी) पणाचा मनाशी असणारा संबंध, त्याचा त्या व्यक्तिवर व पर्यायाने इतरांवर होणारा परिणाम असा आहे. अर्थात हि माझी समज आहे आणि ती नक्कीच चुकीची किंवा लेखीकेला अभिप्रेत नसणारी असु शकती. हा मुद्दा कदाचित माझ्या प्रतिसादात निट मांडला गेलेला नसावा.

वेगळ्या विषयावरील कथा आपण लिहित आहात याबद्दल अभिनंदन. लेखनशैली नेहमीप्रमाणेच अत्युत्तम. पण कथा म्हणून विशेष नाही आवडली.
कुठल्या मनाचं सामर्थ्य मला शृंगाराच्या उत्कट क्षणी एखादा पुरुष आपल्या छातीत डोके घुसळतो तसा अनुभव देणार आहे? भुकेनी कासावीस झालेलं तान्ह बाळ जेव्हा आईकडे झेपावत तेव्हा आईच्या स्तनांशी चिकटल्यावर हवं ते मिळाल्याचा बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते देऊ शकल्याचं आईला असलेलं समाधान मला मिळेल?
अविवाहित (आणि कथेच्या प्लॉटप्रमाणे बहूधा कुमारिकाही) असलेल्या मुलीच्या तोंडी ही वाक्य थोडी जास्तच वाटतात. असो. अवांतर :
त्यात श्रवंतीचा स्वभाव इतका शांत की ती मनातलं काही स्पष्ट त्यांच्याजवळ बोलतही नव्हती.
अशा शांत स्वभावाच्या नायिका तुमच्या कथांमध्ये(च) सापडतात ..छान वाटतं असं काही रम्य (पण काल्पनिक ) वाचायला :)

In reply to by मराठी कथालेखक

स्त्रियांच्या आॅरगॅझमवरुन वाद होऊन गेलेला आहे. एका मर्यादेच्या पलिकडे स्त्री आणि पुरुष यांच्या अतिसूक्ष्म भावना तेच व्यक्त करु शकतात. दुसरी व्यक्ती (भिन्नलिंगी या अर्थाने) ते करु शकणार नाही, त्यांचा कितीही मानसशास्त्रीय अभ्यास असला तरीही. त्यामुळे मुलीच्या तोंडी ही वाक्यं जास्त वाटतात किंवा नायिका अशा स्वभावाची असूच शकत नाही किंवा हे काल्पनिक आहे (सत्यापासून दूर या अर्थाने) ही तुमची मतं पटली नाहीत.

In reply to by बोका-ए-आझम

त्यामुळे मुलीच्या तोंडी ही वाक्यं जास्त वाटतात
हे तुम्हाला पटलं नाही. पण ह्याबद्दल एखादी स्त्रीच सांगू शकेल ना .. लेखिका अर्थातच एक स्त्री आहे पण लेखनाच्या आवेगात कदाचित त्यांनी कुमारिकेच्या मानसिकतेचा विचार केला नसेल म्हणून मी म्हंटले आहे. शिवाय इथे भावना या शृंगाराबद्दलच्या आहेत, ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्याबद्दल इतक्या तपशिलात एखादी मुलगी भावना कशा प्रकट करेल असा मला प्रश्न पडला.
किंवा नायिका अशा स्वभावाची असूच शकत नाही किंवा हे काल्पनिक आहे (सत्यापासून दूर या अर्थाने) ही तुमची मतं पटली नाहीत.
शांत स्वभावाची नायिका काल्पनिक आहे असे मी म्हंटले.. हा एक हलकाफुलका विनोद होता.. असो :)

शेवट पटला नाही, मात्र एवढा मोठा आणि कठिण निर्णय तिने अर्थातच विचारपूर्वक घेतला असेल. छान लिहिते आहेस, पुभाप्र.

कथा खरंच विचार करायला लावणारी आहे. म्हणून माझे काही प्रश्न कॅन्सर झालेल्या रूग्णाला उपचाराच्या बरोबर समुपदेशन देखील करतात ना? तेव्हा श्रवंती तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल (जोडीदारबद्दल) सकारात्मक विचार का करू शकली नाही ? शेखर नाॅर्मल आहे म्हणून त्याच्यावर आपले ओझे होईल हा विचारसुध्दा ठिक आहे पण म्हणून तिने संसारसुख उपभोगूच नये का? अशा परिस्थितीत ती स्त्री आई होऊ शकते का? शेवटच्या प्रश्नावर डॉक्टरांनी प्रकाश टाकला तर बरे होईल.

In reply to by शि बि आय

कर्करोग झालेल्या रुग्णाचे समुपदेशन करतातच परंतु एखाद्या स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्यात किती लक्ष घालायचे याची डॉक्टरना मर्यादा असते. त्यातून याच माणसाशी आपण विवाह करावा असे डॉक्टर सांगू शकणार नाहीत. कर्करोग झालेल्या स्त्रीने संसारसुख नक्कीच उपभोगावे त्यात कोणतीच आडकाठी नाही. समजा हीच गोष्ट लग्नानंतर लक्षात आली असती तर? येथे उद्धृत करण्याचा एक मुद्दा असा आहे की १० % स्त्रियांची स्तनातील गाठ ही त्यांच्या नवऱ्याला लक्षात येते.( बहुसंख्य ९५% स्त्रिया स्वतःच्या स्तनाची तपासणी करीत नाहीत ही शोकांतिका आहे) यामुळे तरुण स्त्रियांमध्ये लग्न झाल्यावर पहिल्या काही वर्षात कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण बरेच कमी असले तरी नगण्य नाही. कर्करोग पूर्ण बरा झाल्यावर साधारण तीन ते पाच वर्षे थांबण्यास सांगतात.( कर्करोग परत उद्भवला तर साधारणपणे तो पहिल्या २ वर्षात उद्भवतो) यानंतर ती स्त्री नक्कीच आई होऊ शकते. बऱ्याच वेळेस अशा वेळेस त्या स्त्रीची स्त्रीबीजे केमोथेरेपीचं अगोदर काढून गोठवली जातात. यामुळे नंतर मूल होण्याचा मार्ग सुकर होतो. केवळ शरीराच्या एखाद्या अवयवाला कर्करोग झाला म्हणून त्या स्त्रीने "संसारसुख किंवा मातृसुखाला" पारखे व्हावे याला शास्त्रीय आधार नाही. पण हा निर्णय त्या स्त्रीने घ्यायचा आहे आणि तो शांत डोक्याने आणि समजून उमजून घ्यावा असेच समुपदेशनात सांगितले जाते.

पण वर काहींनी म्हटल्याप्रमाणे शेवट नकारात्मक वाटला. अर्थात "Never say never" हेही आहेच.

कथा व प्रतिसादांवरून काही निरिक्षणे : १. एक वगळता इतर सर्व स्त्री सदस्यांना कथानायिकेचा दृष्टीकोन व कथेचा शेवट अतिरेकी/नकारात्मक वाटला. २. बहुतांश पुरुष सदस्यांना कथानायिकेचा दृष्टीकोन प्रशंसनीय वाटला. ३. कथानायक व नायिका स्वत:पेक्षा दुसऱ्याचा विचार करून अवास्तव उदात्त भूमिका जगत आहेत. असे कोणालाच वाटले नाही.

In reply to by सस्नेह

सहमत आहे. प्रतिक्रिया वाचताना एग्झॅक्टली हाच विचार करत होते. स्त्रिया आणि पुरुष यांचे प्रातिनिधिक विचार म्हणावेत का? स्त्रियांना त्यांच्यासारख्या एका स्त्रीने परिस्थितीचा, नात्यातील संकटाचा सामना न करता विनाकारण पळ काढावा हे आवडले नाही. तर पुरुषांना त्यांच्यासारख्या एका पुरुषाला संकटाचा आयुष्यभराचा सामना टळला म्हणून सुटकेची भावना वाटली? दुसर्‍याचा विचार एका मर्यादेपर्यंत करावा, पण काहीवेळा नक्कीच स्वार्थी व्हायला शिकले पाहिजे. आशा काळे टाईप त्यागमूर्ती नायिकांचे दिवस कधीच गेले.

In reply to by पैसा

(असे) पैलु बघण्याऐवजी (लेखन) शैलीकडे लक्ष गेले असावे. दोन्ही माननीयांनी हलके घ्या. नितवाचक नाखु

In reply to by नाखु

घेतले हलके. :) या कथेचा विचार करताना 'मिली' आठवला. तो चित्रपट नायिकेबद्दल खूप सहृदय होता.

In reply to by पैसा

हे जर शेखर वागला असता - म्हणजे श्रवंतीने संबंध तोडण्याऐवजी त्याने तिला कर्करोग आहे हे समजल्यावर संबंध तोडले असते तर त्याच्या वागणुकीचं समर्थन याच शब्दांत केलं असतंत का - हे जाणण्यासाठी उत्सुक.

In reply to by बोका-ए-आझम

तेव्हाही नायकाच्या वागण्यावर टीका झाली असती. कारण त्या परिस्थितीत तो दुसर्‍याच्या बाबत जास्त असंवेदनाशील ठरला असता त्यामुळे सहजच व्हिलन ठरू शकला असता. माणसाने स्वार्थी आपल्यापुरते असावे, पण कृतघ्न किंवा फक्त चांगल्या काळात साथ देणारे असू नये असेच आपल्याला शिकवलेले असते. एकूण आपण सगळेच बहुधा स्टिरिओटाईप विचार करतो. कोणाचाही एक व्यक्ती म्हणून लिंगनिरपेक्ष विचार करणे बहुतेकांना कठीण जाते.

पात्राच्या मनातल्या संकल्पना अज्ञानमूलक व समाजाची प्रतिक्रिया काय असेल याची ढाल करुन एका प्रिय व्यक्तिला आयुष्यातुन उठवले, बरे जे स्वतःलाच नीट झेपले नाहीं त्याचे इतरांना समुपदेशन कसे करते हे पात्र? समाजाला काही कसे कळाले असते, पुढे? जसे शेखरने दूर बदली करुन घेतली तसेच लग्नानंतर/उपचारानंतर पण करता आले असतेच की. आजच्या वैज्ञानिक जगात स्त्रियां अजूनही असे निर्णय घेतात हे कथेतुन पुढे मांडले जातेय हे म्हणजे अति नकारात्मक. नशीब म्हणजे इथे पुरुष पात्रावर कसले लांछन न लावता भागवलेत. विषयक्षेत्र सोडुन कथा फुलवलीत तर अजून रंगत येईल, शब्द मर्यादा नाहीं असे समजतो.

In reply to by नमकिन

आजच्या वैज्ञानिक जगात स्त्रियां अजूनही असे निर्णय घेतात
हा निर्णय आर्थिक कारणांमुळेही घेतलेला असू शकतो. विज्ञान पुढारलंय आणि नवनवीन इलाज आता आलेले आहेत पण ते सामान्य माणसाला परवडणारे आहेत का? हे म्हणजे माणूस आता मंगळावर चाललाय आणि तुम्ही ट्रेन उशिरा आली म्हणून का वैतागताय असं म्हणण्यासारखं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

विचार केला की एक प्रमुख भाषा हे दर्शवते की आर्थिक असहायता नाहीं, लेखिका स्पष्ट करु शकतील. तसेच तज्ञ सल्ला मुख्यतः प्रथम श्रेणीतला कर्करोग सुचवतो व उपचाराची दिशा देखील स्पष्ट होती. सहचरी पात्र व घरवाले पण खर्चाला आडकाठी करत नव्हते. रच्याकने- मंगलवारी सुटते का मंगला एक्सप्रेस?

काहीही लिहिणार नव्हते पण अगदीच राहवल नाही. नायिकेचा निर्णय अतिरेकी वाटणार्या सर्व सदस्यांना विचारते आयुष्यात सगळेच निर्णय तोलूनमापून घेतले जातात का? तुम्ही स्वतः भावनेच्या भरात एकही निर्णय घेतला नाहीये का? एवढा महत्वाचा नाही घेत असं उत्तर कदाचित काही सदस्य देतील पण हे जगातल्या प्रत्येक माणसाबाबत खरे असू शकते का? अनेक महत्वाचे निर्णयसुद्धा चुकू शकतातचं. हा कथेतील पात्राचा वीक पॉईंट असू शकतो हे का समजून घेतलं जात नाहीये? नायिका आणि तिची आई याव्यतिरिक्त इतर कुणाही नातेवाईकांचा कथेत उल्लेख नाही. ही तिच्या आयुष्यातील कमतरता तिला लग्नानंतर पूर्ण करावं वाटणं खरोखर चुक आहे का? लग्न म्हणजे फक्त मी माझा नवरा असं जर एखाद्या स्त्रीला नको असेल तर? लग्नाबरोबर जोडल्या जाणाऱ्या फक्त नवराचं नव्हे तर इतर सर्व नात्यांची गोडी अनुभवता यावी असं वाटणं चुक आहे का? ते होण्याची शक्यता नाही असं वाटल्यान तिनं जो निर्णय घेतला तो तिचे विचार पुरातन काळातले आहेत असं दर्शवत का? आपल्या ज्या अपेक्षा आहेत तसं जीवन जगण्याची इच्छा करण आणि कोणताही आव न आणता त्या मान्य करण हे व्यक्ती सापेक्ष आहे. नायिकेच्या मनातील हे द्वंद्व तितक ठळकपणे उतरले नाहीये कथेत. तसंच शेखरचं पुढं काय झालं? तो सावरला का वगैरे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत हे मान्य आहे. हा लेखनातील दोष असू शकतो पण उगीच किती स्त्रियांना निर्णय पटला नाही , किती पुरुषांना पटला अशी चीरफाड़ करून स्त्री विरुध्द पुरुष असा वाद उभा करून काय साध्य होणार आहे? मुळात ही लढाई कधी थांबणार आहे?एक व्यक्ती म्हणून एकमेकांचे निर्णय स्वीकारने इतकं का अवघड आहे? नायक नायिका दोघेही प्रॅक्टीकल विचार करणारे आहेत असा उल्लेख आलाय कथेत. एका मर्यादेपर्यंत प्रयत्न करून जर समोरचा योग्य प्रतिसाद देत नसेल तर स्वतःला अशा नात्यातून बाहेर काढणे हा पळपुटेपना का बरं? उलट अशा वेळी एकमेकांना स्पेस देणं जास्त चांगलं नाही का? स्वतःला स्वीकारू न शकने हे कुणाच्याही बाबतीत कुठल्याही काळात घडू शकत. तसं नसतं तर आत्महत्या वगैरे प्रकार झालेच नसते. पण अशा धक्क्यातून सावरून पुन्हा स्वतःला उभ करायचा प्रयत्न करण आणि आपल्या सारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्याना मदत करायचा प्रयत्न करण हे नकारात्मक आहे? इती लेखनसीमा.

कथा आवडली. जवळजवळ अशाच प्रसंगात माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राचा मुखवटा खाडकन गळून पडलेला पाहिला आहे. त्यामुळे "प्रातिनिधिक मतां"चं आश्चर्य वाटलं नाही. @रातराणी : संवाद जास्त वास्तवपूर्ण / सहज झाले तर कथा आणखी रंगेल.

In reply to by आदूबाळ

मुखवटा? कसला मुखवटा ओ सर? बायका जास्त कमिटेड असतात हे ठाऊक आहे, मान्य देखील आहे पण पुरुष लोक असे असत नाहीत याबाबत असहमत आहे. बरेच पुरुष आपल्या घरातल्या स्त्री/स्त्रियांचं आनंदाने करत असतात. नायिकेचा निर्णय तिने वैयक्तिक रुपात घेतला आणि त्या निर्णयाला आक्षेप घेण्याचं काय कारण असावं? बाकी अमुक एका पद्धतीने वागली तर च ती रणरागिणी अन्यथा नाही वगैरे टाइप कास्ट मतांचं आश्चर्य वाटत नाही.

In reply to by धनंजय माने

नायिकेचे निर्णयस्वातंत्र्य आणि लेखिकेचे लेखनस्वातंत्र्य अर्थातच Unbeatable आहे. चर्चा चाललीय ते प्रत्यक्षात एखादी स्त्री असा निर्णय (भावनेच्या भरात ?) घेईल का याबद्दल.

टीप: कथेतून कुठलीही चुकीची वैद्यकीय माहिती तर जात नाहीये अशी शंका असल्याने डॉ. खरेना कथा वाचायची आणि काही त्रुटी असतील तर समजावून सांगायची विनंती केली होती. त्यांनी वेळात वेळ काढून कथा वाचली आणि सोप्या शब्दात त्रुटी समजावून सांगितल्या याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. शक्य ते बदल करण्याचा प्रयत्न मी केला आहे तरीही काही कमतरता राहून गेली असल्यास हा माझ्या लेखनातील दोष समजून खरेसरांनी आणि मिपावर वावरणाऱ्या इतर डॉक्टरांनी माफ करावे ही विनंती.
तरीही कथा वाचल्यावर मला पडलेली शंका मी विचारतो.
बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये श्रवंतीच्या ब्रेस्टमध्ये असलेले लंप ही ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात असल्याचं निदान झालं. अजून हे लंप इतर भागात पसरले नसल्याने फक्त ब्रेस्टवरती ट्रीटमेंट करून कॅन्सर आटोक्यात आणणे शक्य होते.
Fine Needle Biopsy ने metastasis चे निदान करता येते का? की शस्त्रक्रीया केल्यावर लिंफ नोड तपासून कॅन्सर इतर भागात पसरला आहे की नाही ह्याचे निदान करता येते?