भग्न शरीरे - 2
गेले आठ दिवस शेखर श्रवंतीला भेटायचा प्रयत्न करत होता. अगदी झोपायचे काही तास सोडले तर जवळ जवळ दर तासाला फोन करून पहात होता. पण मॅडम फोन काही उचलत नव्हत्या. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या श्रवंतीला असं अचानक काय झालं हे त्याला काही केल्या कळत नव्हतं. मनातल्या मनात त्यानं त्यांच्या आधीच्या भेटीत त्याच काही चुकलं असेल का याची पडताळणी केली, पण त्याला तर असं काहीच झाल्याचं आठवत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेली. आता घरी जाऊन खात्री केल्याशिवाय चैन पडणार नाही असा विचार करून शेखर ऑफिसमधून बाहेर पडला. एकीकडे काळजीही वाटत होती की समजा काही सिरीयस नसेल तर तिच्या आईला काय सांगायचं? त्यांना आवडेल का आपण असं अचानक, ओळखपाळख नसताना श्रवंतीची चौकशी केलेलं? श्रवंतीला आवडेल का? इतक्यात घरी सांगायची घाई नको करायला असं म्हणत तर होती. तिला काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार आपल्या जाण्याने? डोक्यात प्रश्नांच काहूर माजलं होतं. पण शेखरचा नाईलाज झाला होता. फक्त एकदा फोनवर तिने सांगितलं असतं सगळं ठीक आहे, काळजी करू नको तरी शेखरच्या मनाचं समाधान होणार होतं. बघू आता पुढचं पुढे असं म्हणून शेखरने श्रवंतीच्या दारावरची बेल वाजवली.
काकूंनी दार उघडलं आणि त्यांना वाटलं कुणी सेल्समन आलाय की काय म्हणून त्यांनी जवळ जवळ दार बंद करतच शेखरला वेळ नाही असं सांगितलं.
"काकू, एक मिनिट. मी सेल्समन नाहीये. मी शेखर. श्रवंतीचा मित्र. आम्ही एकत्र काम करतो... म्हणजे करायचो.. आता मी दुसरीकडे करतो जॉब. श्रवंती आहे का घरी?"
"आहे. या आत." काहीशा तुटकपणे काकू म्हणाल्या.
आत गेल्यावर काकूंनी शेखरला पाणी दिलं आणि श्रवंतीला बोलावते म्हणाल्या. थोड्या वेळाने बाहेर आल्या.
"शेखर ती नाही म्हणते भेटायचं. ती फोन करेल म्हणाली नंतर."
"ठीक आहे काकू. ती बरी आहे ना? नाही म्हणजे जरा काळजी वाटतीये...ती असं टाळत नाही ना मला. " बोलण्याच्या ओघात शेखर बोलून गेला आणि त्याला नंतर त्याची चूक जाणवली. पण काकूंवर विशेष काही परिणाम नव्हता झाला. उलट त्या अतिशय शांतपणे म्हणाल्या,
"शेखर मला नाही वाटत ती पुन्हा तुला फोन करेल. तू उगीच आशा लावून बसू नकोस."
काकूंच्या त्या स्पष्ट शब्दांनी शेखरच्या डोळ्यात पाणी तरळल.
"पण असं झालंय तरी काय? तिचं लग्न ठरवताय का तुम्ही? मला कुणी काही सांगत का नाहीये? अस का मला तोडलं जातंय? " शेखर अगदी कळवळून म्हणाला.
"मला वाटतं तुम्ही दोघे एकदा बोलून बघा. मी समजावते तिला." असं म्हणून काकू पुन्हा आत गेल्या.
आता श्रवंती भेटेल म्हणून शेखरला आनंद तर झाला पण एकीकडे हुरहुरही वाटू लागली. लग्न वगैरे तसं काही असतं तर काकूंनी स्वतः सांगितलं असतं. काहीतरी वेगळं घडलंय. थोड्या वेळाने काकू बाहेर आल्या आणि काहीशा रडवेल्या सुरातच शेखरला आत जा असं सांगितलं.
श्रवंतीच्या रूमचा दरवाजा उघडाच होता. पाठमोरी बसलेली श्रवंती पाहताच आतापर्यत एकवटलेला त्याचा सगळा धीर गळून पडला. दारात उभं राहून तिला हाक मारताच श्रवंतीने मागे वळून पाहिलं. त्याला पाहतांच तिला रडू कोसळलं. श्रवंती थोडी शांत झाल्यावर मग शेखर म्हणाला,
"काय झालं शोनु? माझं काही चुकलं का?"
श्रवंतीने त्याला मानेनंच नाही म्हणून सांगितलं.
"मला काही सांगशील का? मे बी माझ्याकडे असेल तुझ्या प्रॉब्लेमच सोल्युशन."
"...."
"काय झालंय? तू जेवढा वेळ शांत बसणार आहेस तोपर्यंत इथे माझी काय अवस्था होतीये समजून घे ना जरा. का अशी वागतीयेस तू?"
"शेखर... अरे डॉक्टरकडे गेलो होतो." एवढं बोलून श्रवंती पुन्हा शांत.
तिला धीर देत शेखर म्हणाला,
"शोनु, मी आहे ना! काकू आहेत. काय प्रॉब्लेम आहे हे तू सांगितलं नाहीस तर मला किंवा कुणालाच तुझी मदत नाही करता येणार."
श्रवंतीने उठून कपाटातून काही रिपोर्ट्स काढले. वाचता वाचता शेखरच्या डोळ्यापुढची अक्षरं धूसर झाली.
"शोनु, हे कसं शक्य आहे? आपण अजून दुसऱ्या डॉक्टरला दाखवू या. काहीतरी चुकलं असणार ग."
श्रवंती पुन्हा शून्यात नजर लावून बसली होती. काही दिवसांपूर्वीपर्यंत अत्यंत नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या आपल्याबाबतीत हे का होतंय याचं उत्तर तिला काही केल्या मिळत नव्हतं. चारचौघीसारखं आयुष्य हवं होत तिला. खूप मोठी स्वप्नं,महत्वाकांक्षा कधीच नव्हत्या तिच्या. ऑफिसमधेही आपण बरे आणि आपलं काम बरं अशी काहीशी आपल्याच जगात राहणारी श्रवंती सर्वांचीच लाडकी होती. एकाच प्रोजेकटवर काम करता करता श्रवंती शेखरला आवडू लागली. नाही नाही म्हणता म्हणता तीही त्याच्या प्रेमात पडली. पुढे शेखरने कंपनी बदलली तरी त्यांच्यातल प्रेम कमी नाही झालं. अगदी भेटणं नाही झालं तरी दिवसातून एक दोन फोन तर ठरलेलेच होते. तिचा आवाज ऐकल्याशिवाय त्याला चैन नाही पडायची आणि शेखर नीट जेवला का, घरी पोचला का हे कळल्याशिवाय श्रवंतीला. आपल्याही आयुष्यात काही उलथापालथ करणारं घडू शकतं यावर श्रवंतीचा विश्वासच बसत नव्हता. नाही म्हणायला आतापर्यंत आपण शेखरविषयी घरी सांगितलं नाही याची बोच होती मनात कुठेतरी पण थोडाफार विरोध झाला तरी आई समजून घेईल हा विश्वासही होता.
डॉक्टरांकडे जायचं म्हणून श्रवंती त्या दिवशी लवकर घरी आली होती. तसं काही विशेष झालं नव्हतं पण श्रवंतीचे बाबा अचानक गेल्यानंतर काकूंनी सवय लावून घेतलेली एन्युअल चेकअपची. श्रवंती डॉक्टरांकडे गेल्यावर काकू घर आवरत बसल्या होत्या. इकडे श्रवंतीचे चेक अप करता करता डॉक्टरांचा चेहरा मात्र काहीसा चिंताग्रस्त झाला होता. ब्रेस्ट एक्साम करताना डॉक्टर काहीशा काळजीत आहेत असं श्रवंतीला वाटलं खरं पण काही नसेल असा विचार करून ती शांत बसली होती.
"श्रवंती, धाप लागल्यासारखं, श्वास फुलल्यासारखा वाटतो का कधी?"
"अंह"
"कधी ताप येऊन गेलाय का?"
"हो मागे एकदा झाली होती जोरात सर्दी."
"तसा नाही..म्हणजे सर्दी नाही खोकला नाही. नुसता ताप? कुठून आला कळलं नाही असं नाही झालं ना?"
शक्य तेवढ आठवायचा प्रयत्न करूनही श्रवंतीला काही नुसता ताप आलेला आठवेना.
"नाही. बहुतेक नाही...आला."
"एकूण एनर्जी लेव्हल ठीक असते?की थकल्यासारखं वाटतं?"
या प्रश्नाचं उत्तरं मात्र तिला माहीत होतं. हसत हसत ती म्हणाली,
"हो. लोळत पडावस वाटतं. सारखंचं"
डॉ. वैद्यही त्यावर हसल्या. पण तेवढ्यापुरतचं.
"श्रवंती ब्रेस्ट एग्ज़ेम घरी कशी करायची तुला मागे दाखवलं होतं. करतेस का तू?"
श्रवंती खाली मान घालून नाही म्हणाली.
"हे माझा हात आहे तिथे तू बघ बरं जरा. या इथे. लंप असावा असं वाटतंय. मला वाटतं आपण खात्री करून घेण्यासाठी मॅमोग्राम करून घ्यायला हवा. त्यानंतर जर गरज वाटली तर अल्ट्रासाउंड बायॉप्सी करू. बऱ्याचदा पीरीयडसच्या आधी होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे ब्रेस्टमधे लंप जाणवू शकतात.मनात काही शंका न आणता टेस्टस करून घे. घाबरू नकोस. काळजी करू नको. मला वाटतं तू आईला बोलवून घे इथे. मी त्यांना समजावून सांगते. "
काकू हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर त्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. पण त्या दोघींना समजावत डॉकटर म्हणाल्या,
"तुम्ही दोघीही काही शंका घेऊ नका. शांत रहा. आपण फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी टेस्टस करतोय एवढं लक्षात ठेवा फक्त. मी स्वतः येऊ का तुमच्याबरोबर?"
पण काकूंनी स्वतःला सावरलं आणि श्रवंतीला घरी घेऊन गेल्या. रेडियोलॉजी लॅबमध्ये फोन करून त्यांनी डॉक्टर वैद्यांचे नाव सांगून दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतली. शेखरचे अनेक मिस कॉल येऊन गेले पण श्रवंतीची मनःस्थिती नव्हती बोलायची. एकदा सगळ्या टेस्ट झाल्या आणि रिपोर्ट्स नॉर्मल आले की मगच सांगू असा तिने विचार केला. पुढचे काही दिवस तिने आणि काकूंनी अत्यंत तणावाखाली घालवले. एक दिवस डॉक्टर वैद्यांनी तिला फोन करून रिपोर्ट्स आलेत आणि भेटायला ये म्हणून सांगितलं. काकूंनी तर देवापुढचा दिवा बंद होऊ दिला नव्हता. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना लगेच आत बोलावून घेतलं. आता कुठल्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे याचा विचार काकू करत होत्या. मनातल्या मनात सगळ्या देवांना नवस बोलून झाले. डॉक्टरांनी त्यांना दोघींना सर्व रिपोर्ट दाखवले आणि समजावून सांगत म्हणाल्या,
"श्रवंती माझी शंका खरी निघाली. मॅमोग्राममध्ये जे लंप दिसतायत ते नॉर्मल लिंफ नोड नसावेत. आणि साईजही मोठा आहे. मला वाटत आपण लवकरात लवकर पुढच्या टेस्ट करून योग्य निर्णय घ्यायला हवा. अल्ट्रासाउंड बायॉप्सी केल्यावर आपल्याला कळेल हे लंप बिनाइन आहेत की कॅन्सरची सुरुवात. मी तुला डॉकटर देसाईंचा नंबर देते. त्यांच्याशी बोलून मी तुझी केस डिस्कस केलीये. ते स्वतः तुला ब्रेस्ट कॅन्सरला उपलब्ध असलेल्या उपचार पद्धती समजून सांगतील. मला माहितीये तुला भीती वाटणं अगदी साहजिक आहे, तुला घाबरवायचा उद्देश मुळीच नाहीये पण तुझ्या मनाची तयारी व्हायला हवी इथून पुढे. यु नीड टू बी स्ट्रॉंग. कदाचित बायॉप्सीमध्ये काळजी करण्यासारखं काही नसेल, पण एक डॉकटर म्हणून सर्व शक्यतांचा विचार करणं आणि त्यांची तुला माहिती देणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुला काही प्रश्न आहेत का?"
पुढचा एक अर्धा पाऊण तास काकूच डॉक्टरांना वेगवेगळे प्रश्न विचारत होत्या. श्रवंती मात्र कुठेतरी हरवून गेली होती.
बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये श्रवंतीच्या ब्रेस्टमध्ये असलेले लंप ही ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात असल्याचं निदान झालं. अजून हे लंप इतर भागात पसरले नसल्याने फक्त ब्रेस्टवरती ट्रीटमेंट करून कॅन्सर आटोक्यात आणणे शक्य होते. डॉक्टरांनी श्रवंतीला आधी ब्रेस्ट मॅस्टेक्टोमी आणि नंतर किमोथेरपीचा सल्ला दिला. श्रवंतीच्या ट्रीटमेंटविषयी ऐकून काकूंना फार मोठा धक्का बसला. पण त्यांना रडत बसूनही उपयोग नव्हता. श्रवंतीला समजावून ऑपरेशनसाठी तयार करणं हे अवघड काम होत त्यांच्यासाठी. त्यात श्रवंतीचा स्वभाव इतका शांत की ती मनातलं काही स्पष्ट त्यांच्याजवळ बोलतही नव्हती. विचित्र ओढाताण होत होती दोघींची. काकू कशातरी सावरून तिला सांभाळत होत्या पण त्यांना सावरणारं कुणीच नव्हतं. शेखरला भेटल्यावर काकूंना का कुणास ठाऊक वाटलं की निदान ह्याच्याशी तरी श्रवंती मनमोकळं बोलेल. शेखरच्या येण्याने त्यादिवशी काकूंना अंधुकसा आशेचा किरण दिसला होता. पण अचानक मिळालेल्या ह्या बातमीनं शेखरला मात्र आता काय बोलावं सुचत नव्हतं. न राहवून त्यानं श्रवंतीला मिठीत घेतलं. एखाद्या लहान मुलाला थोपटावं तसं तिला थोपटताना दोघांनाही मनाला आवर घालता आला नाही. किती काही बोलायचं होतं शेखरला पण शब्द सगळे हरवून गेले होते. आपण जे बोलू, सांगू त्याचा खरोखर तिला काय उपयोग होईल? तिची वेदना आपल्याला समजेल का? श्रवंतीचा आवेग ओसरल्यावर शेखर म्हणाला,
"शोनु, ट्रीटमेंट सुरू करायला हवी लवकरात लवकर. वेडाबाई, मला सांगत जा ग सगळं."
श्रवंतीने मात्र इथून पुढचा प्रवास आता एकटीनेच करायला हवा म्हणून आयुष्यातला सगळ्यात अवघड निर्णय घेतला होता. मनाशी काहीतरी ठरवल्यासारखं ती खंबीरपणे म्हणाली,
"मला वाटतं आपण इथेच थांबूया, शेखर.माझ्याबरोबर मी तुझंही भविष्य अंधारात नाही ढकलू शकत. आय एम रीयली सॉरी पण.... "
श्रवंतीच्या त्या शब्दानी शेखर कोसळला. त्यांच्यात कधी शपथा, वचनं असलं काही घडलं नव्हतं. दोघेही प्रॅक्टिकल विचार करणारे. लग्नाचा विषय एक दोनदा निघाला तरी दोघांनीही कोणताही आक्रस्ताळेपणा न करता अजून वेळ घेतला पाहिजे असं ठरवलेलं. पण सगळ्याच गोष्टी शब्दांनी बोलून दाखवल्या नसल्या तरी आतल्या आत एकमेकांच्या सहवासाची असलेली ओढ बरच काही बोलून गेली होती. आयुष्यातल्या ज्या क्षणी श्रवंतीला खरोखर शेखरची गरज होती तेव्हाच ती त्याला दूर करत होती.
"असं नको करू ना ग शोनु, मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. अगं तू साधं बोलली नाहीस माझ्याबरोबर तर काय अवस्था होते माझी तुला माहितीये का?"
"अरे होईल हळू हळू सवय. मला झालीच की गेल्या आठ दिवसात. तुलाही होईल."
"श्रवंती, तू माझ्या प्रेमाचा असा अपमान का करतेयस? आणि अगं ट्रीटमेंट आहे ना? तू असा टोकाचा निर्णय का घेतीयेस?"
"हा टोकाचा निर्णय आहे मला मान्य आहे पण मी तो पूर्ण विचार करून घेतीये. ट्रीटमेंट जरी यशस्वी झाली तरी आज मी जी आहे ती अजून महिन्याभराने नसेन. सगळं बदलणार आहे शेखर, माझं शरीर, माझं आयुष्य बदलतंय. तू बरोबर आलास तरी तुला देण्यासाठी माझ्याकडे काही असेल का? मग का असं ओझं लादून घेतोयस तू तुझ्यावर?"
"सगळं तूच ठरवणार आहेस का? मला काही मन आहे की नाही? प्रेम दोघांनी केलेलं... आता एकावर संकट आलं म्हणून त्यान दुसऱ्याला सोडून जायचं असं केलं तर त्याला प्रेम नाही म्हणत. खेळ म्हणतात त्याला, जो तू खेळतीयेस माझ्याशी. आणि तुझं माझ्यासोबत असणं एवढंच मागणं आहे माझं, अजून काहीही नकोय मला..."
"हे आता बोलणं सोपं आहे शेखर, काही दिवसांनी माझी मॅस्टेक्टोमी होईल तेव्हा माझा एक ब्रेस्ट काढणार आहेत.तेव्हाही तुला असेच वाटेल का? वाटेलही कदाचित पण नंतर एका वर्षाने, दोन वर्षांनी, तीन वर्षांनी काय? कशावरून तुला तेव्हा तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही? "
"..."
"मला वाटलंच होत आता तुला काही सुचणार नाही काय बोलायचं."
"श्रवंती अगं, माझ्यासाठी नवीन आहे हे सगळं, मला काही माहीत नाहीये आणि इज इट रियली एंड ऑफ द वर्ल्ड? तुझ्या आयुष्याची किंमत जास्त आहे त्याहून... "
"शेखर!! एंड ऑफ द वर्ल्ड? खरंच? तुला कल्पना आहे का हा केवढा मोठा बदल आहे माझ्यासाठी.जगाच काय होईल मला माहीत नाही पण मला एकच प्रश्न छळतोय सतत, इथून पुढे माझं स्त्रीत्व मला जाणवेल का? मनाचं सामर्थ्य मनाचं सामर्थ्य असा जप सुरू असतो आईचा सतत. सांग ना मला, कुठल्या मनाचं सामर्थ्य मला दुसऱ्या ब्रेस्ट मध्ये कॅन्सर होणार नाही याची खात्री देईल. कुठल्या मनाचं सामर्थ्य मला शृंगाराच्या उत्कट क्षणी एखादा पुरुष आपल्या छातीत डोके घुसळतो तसा अनुभव देणार आहे? भुकेनी कासावीस झालेलं तान्ह बाळ जेव्हा आईकडे झेपावत तेव्हा आईच्या स्तनांशी चिकटल्यावर हवं ते मिळाल्याचा बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ते देऊ शकल्याचं आईला असलेलं समाधान मला मिळेल? शरीराच्या मर्यादा असतात हेच सांगत आले आतापर्यंत सगळे, मनाच्या मर्यादा कुणी नाही सांगितल्या. पण मला माहितीये शेखर, आता मला चांगलंच कळलंय, मनालाही मर्यादा आहेत. कदाचित मी यातून बरी होईनही, इम्प्लांट्स लावून माझं शरीर पूर्वीसारखं दिसेल अशी सोयही करता येईल, पण खरं सांग कितीही मुलामे लावले तरी मी शेवटी अपूर्णच ना? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुझ्याकडे? तू मला स्वीकारलंस तरी तुझ्या घरचे मला स्वीकारतील का? त्यांना पटेल असं ज्या मुलीच्या भविष्याची खात्री नाही अशा मुलीशी त्यांच्या मुलाचं भविष्य जोडलं गेलेलं?"
श्रवंतीच्या प्रश्नांच्या भडिमाराने शेखर बुजून गेला. तिच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्याच्याकडे. त्याला फक्त एवढं कळत होत की जर कधी त्याच्यावर अशी वेळ आली असती तर श्रवंती त्याला कधीच सोडून गेली नसती. स्त्रीच्या बाह्य रुपाला अतोनात महत्व असलेल्या समाजात जर रूपानं, रंगानं सामान्य असलेल्या मुलींना अनेक समस्यांना समोर जावं लागत तर इथं तर.... आपले आई वडील कितीही पुरोगामीपणाचा आव आणत असले तरी ते ही शेवटी सामान्य माणसं आहेत. त्यांना झेपेल हे सगळं? त्यांना स्वीकार करता येईल श्रवंतीचा? आपली स्वतःची आई काय प्रतिक्रिया देईल हे सगळं कळल्यावर? एक स्त्री असून ती श्रवंतीला समजून घेईल की नाही याची आपल्याला खात्री नाही. पण या सर्व गोष्टी खरंच इतक्या महत्वाच्या आहेत का? अगदी लहानपणापासून आपण सगळे नियम जपत आलो समाजाचे. काय मिळालं आपल्याला? मग आता एक वेळ आपण एखादा संकेत नाही पाळला तर घेतील आपल्याला सांभाळून? समाजाने नाही तर नाही घरचे तरी? पण एका प्रश्नचिन्हाशिवाय शेखरकडे काहीही नव्हतं. त्याच्या मनातली चलबिचल श्रवंतीने ओळखली आणि तीच म्हणाली,
"कधी कधी मौनही खूप बोलकं असतं शेखर. तू निर्धास्त मनाने जा. तुझ्याविषयी माझ्या मनात काहीही राग नाही हे विसरू नकोस."
"नाही जाणार मी. कुणी काही म्हणू देत. मला तू जशी आहेस, जशी असशील तशी हवी आहेस. का अशी शिक्षा देतीयस?"
"मी कोण शिक्षा देणारी तुला. माझ्या हातात जर काही असतं तर मी अशी रडत बसले असते का?"
"पण तू हे अगदी टिपीकल मुलींसारखं का वागतीयेस? अशी नाहीयेस तू. त्याग करून कुणीही मोठं होत नाही असं म्हणायचीस ना तू? मग का करतीयेस हा त्याग? शेवटी तुलाही आहेच मोठेपणाची हौस..महान श्रवंती. द ग्रेट श्रवंती."
"हो करतीये. का माहितीये? उद्या लग्न झाल्यावर माझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक नजरेत मला फक्त एकच भाव दिसेल कुठला माहिती, द ग्रेट शेखर! नकोय मला ते ओझं! नाही जगायचं मला असं गुदमरून जाऊन."
"कोणत्या नजरा? कुणाच्या नजरा? माझं काय? माझ्या नजरेत काय दिसेल तुला?आतापर्यंत जे दिसलं त्याची किंमत शून्य? आणि तुला खरंच असं वाटतं का की फक्त बाळाला दूध पाजता आलं म्हणून कुणी चांगली आई होत? निदान तू तरी असा विचार करत नसशील असं वाटलेलं मला... तू वेगळी आहेस म्हणून मला आवडतेस. हे असं काहीतरी बोलून तूसुद्धा इतरांसारखीच आहेस हे का सिद्ध करतेयस तू? यातून सावरू शकतो आपण दोघे. तू एक संधी तर दे मला..."
"मला वाटत शेखर तू जावस आता. मला जे प्रश्न पडलेत त्यांची उत्तरं मला मिळतील की नाही मला माहीत नाही पण मला सिरीयसली आता तुझ्या प्रश्नांचा विचार करायला वेळ नाही. तू जा इथून."
डोळ्यात आलेल पाणी तसंच लपवून शेखर बाहेर पडला. स्वैपाकघरात उगीच खुडबुड करत बसलेल्या काकूंच्या हातातून गडबडीत चहाचा कप फुटला. घाईघाईत त्या बाहेर आल्या.
"शेखर... अरे शेखर.. चहा ठेवला होता रे." घशात दाटून आलेला आवंढा कसाबसा मागे ढकलत काकू म्हणाल्या.
"आज नको काकू. परत येईन." भरल्या डोळ्यांनी शेखर म्हणाला आणि गेटबाहेर पडला.
रेलिंगच्या आधाराने काकू तिथेच पायरीवर बसल्या. दाराआडून शेखरला पाहात असलेली श्रवंती तो नजरेआड होताच बाहेर आली. आईच्या खांद्यावर डोके ठेऊन शांत बसून राहिली. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. पदराने डोळे पुसत शेवटी काकू म्हणाल्या,
"बाळा, तू स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतिये, कळतंय ना तुला?"
इकडे घरी शेखरने सर्व गोष्टींची कल्पना दिली आणि जणू काही वादळच आलं. त्यांच्याशी बोलताना क्षणोक्षणी शेखरला जाणवत होतं की कधी कधी काही प्रश्न अनुत्तरित राहिलेलेच बरं असत. श्रवंतीला समजावून सांगणे तर दूरच पण तिने घेतलेला निर्णयच कसा योग्य आहे आणि बरं झालं आपली आपण ब्याद टळली पासून ते काहीतरी पुण्य असेल म्हणून लग्नाच्या आधी कळलं, लग्न झाल्यावर गळ्यात पडली असती असे सर्व शेरे त्याला ऐकायला मिळाले. इकडे श्रवंती शेखरला टाळत होती आणि घरच्यांचा असा वैताग. सगळ्याला कंटाळून शेखरने बेंगलोरला ट्रान्सफर मागून घेतली. श्रवंतीला एकदा भेट म्हणून विनवणी केली पण ती तयार झाली नाही. काही दिवस शेखर काकूंच्या संपर्कात राहिला पण ते श्रवंतीच्या लक्षात आल्यावर तिनं त्यावरही त्रागा केला. शेवटी होऊ दे तुझ्या मनासारखं असं म्हणून शेखरनेही तिला पुन्हा संपर्क केला नाही.
श्रवंतीची ट्रीटमेंट पूर्ण झाली. मेसेक्टॉमीनंतर श्रवंतीने डॉक्टरांनी सांगितलेला ब्रेस्ट रीकन्स्ट्रक्शनचा पर्याय स्वीकारला. शरीरात तयार झालेली पोकळी तिला उपचारांनी भरून काढता आली. पण मनात तयार झालेली पोकळी? खूप प्रयत्न करून तिनं स्वतःला सावरलं. तीसुद्धा इतर स्त्रियांसारखीच नॉर्मल आहे हे लक्षात ठेवण्याची तिला सवय करून घ्यावी लागली. श्रवंती आता नोकरी करत करत एका ब्रेस्ट कॅन्सर अवेयरनेसचे काम करणाऱ्या ग्रुपबरोबर काम करतीये. सुट्टीच्या दिवशी खेडोपाडी जाऊन तिथल्या स्त्रियांना,मुलींना माहिती देणं, त्यांचे प्रश्न डॉकटरांकडे पोचवणं आणि जमतील तशी योग्य उत्तरं देणं ह्या कामात तिन स्वतःला गुंतवून घेतलंय. त्यांचे प्रश्न ऐकताना, त्यांचे प्रोब्लेम्स समजून घेताना एक मात्र श्रवंतीला कळत होतं की ती खूप नशीबवान आहे. योग्य वेळी कॅन्सरच निदान होणं, त्यावर उपचार मिळणं ही किती दुर्लभ गोष्ट असू शकते हे तिला काही स्त्रियांशी बोलताना जाणवत होतं. मनात खूप इच्छा असूनही, खूप आठवण येऊनही ती शेखरला पुन्हा भेटली नाही. काही वादळं सगळं उध्वस्त करतात. अगदी तुमचं स्वतःच अस्तित्वही. अशा एका वादळाला तोंड देऊन श्रवंती खंबीर झालीये. पण म्हणून स्वतः कुणाच्या आयुष्यात वादळ होऊन राहणं तिला मान्य नाही. तिचं शेखरला स्वतःपासून दूर करणं हे आततायीपणाच आहे असं काकूंना मनापासून वाटतं. आपल्यामागे तिचं काय होईल अशी चिंता त्यांना आहे पण इतके कठोर निर्णय घेऊन त्यावर ठाम राहनाऱ्या श्रवंतीबद्दल त्यांना आता विश्वासही वाटतोय. तिच्या आयुष्याचे बरे वाईट निर्णय स्वतः घेणाऱ्या आणि त्यांच्या परिणामांना सामोरं जाणाऱ्या श्रवंतीच त्यांना कौतुक वाटतं. स्त्री असणं म्हणजे नेमकं काय? केवळ स्त्रीचा देह मिळाला म्हणून स्त्री म्हणायचं का? ह्या तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तिला अजूनही मिळाली नाहीयेत, पण त्यांची तीव्रता नक्कीच कमी झालीये. असं म्हणतात की काहीतरी गमावल्याशिवाय काही मिळत नाही. श्रवंतीला तिची नवी ओळख मिळाली, बरंच काही गमावून.
टीप:
कथेतून कुठलीही चुकीची वैद्यकीय माहिती तर जात नाहीये अशी शंका असल्याने डॉ. खरेना कथा वाचायची आणि काही त्रुटी असतील तर समजावून सांगायची विनंती केली होती. त्यांनी वेळात वेळ काढून कथा वाचली आणि सोप्या शब्दात त्रुटी समजावून सांगितल्या याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. शक्य ते बदल करण्याचा प्रयत्न मी केला आहे तरीही काही कमतरता राहून गेली असल्यास हा माझ्या लेखनातील दोष समजून खरेसरांनी आणि मिपावर वावरणाऱ्या इतर डॉक्टरांनी माफ करावे ही विनंती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
छान
खूप छान.
छान आहे कथा
कथा म्हणून आवडली.
हम्म. शेखरला दूर करण्याचा
आगाऊपणा -- कथा माझी नसताना
आगाउपणा काय त्यात सर. तुम्ही
उत्तम कथा
अगदी काल संध्याकाळीच बायकोने
:(
हरलेली वाटली गोष्ट.लवकर
+१
मानसिकतेवर अवलंबून आहे.
मिपा
छान आहे कथा
कथा आवडली.
कथा ठीक
कथा म्हणुन आवडली. पण
आवडली...
सर्व वाचकांची आभारी आहे.
लय भारि
छान आहे कथा... आणि कथा
कथा आवडली पण थोडं संयतपणे घेऊ
श्रवंतीचा निर्णय आततायी वाटला नाही.
हम्म, खरंय अगदी.
रातराणींची कथा आवडली सांगायच
कथा आवडली हे सांगायला विसरलो.
हा प्रतिसाद संयुक्तिक अन कथेशी संबंधित आहे का ते माहिती नाही पण,
http://mobile.nytimes.com
येथे आहे.
मस्त..
छान कथा
सुंदर कथा . आवडली.
तिने शरीराला किंवा शरीराच्या
अजून "साधे उदाहरण"
हे उदाहरण देण्याचे विविक्षित
ओह!
१००% सहमत आहे डॉक. माझा
वेगळ्या विषयावरील कथा आपण
इथे मिपावर याआधी
त्यामुळे मुलीच्या तोंडी ही
कथा अत्यंत आवडली. पुलेशु...!!
कथा म्हणून छान,
ह्म्म
खूपच सुंदर लिहिलंय...
सुरेख लेखन.
कथा खरंच विचार करायला लावणारी
कर्करोग झालेल्या रुग्णाचे
माहितीपूर्ण
उत्तम लेखनशैली!