धुमसता पंजाब
लेखनप्रकार
सत्य हे नागवे असते , त्याला कोणत्या कुबड्यांची गरज भासत नाही , ते कटू असले तरी पचवावे लागते, ते सुन्न करू शकते वा एखाद्यास पेटवून उठवू शकते. असे फार कमी चित्रपट असतात की ज्यांना सत्य घटनेवर आधारित अश्या कुबड्यांची व बुरख्यांची गरज भासत नाही , जे दाखवितात ते वास्तवच असते नि असे पडद्यावर दाखवण्यात आलेले वास्तव प्रत्यक्षात बदल (निवडणुकांतून ) घडवू शकते. नि असा बदल त्यांनी घडावावा ही पंजाबच्या जनतेकडून अपेक्षा!!!!!
फार तत्वज्ञान न सांगतां मुद्द्यावर येतो. आजच " उडता पंजाब " मॅटीनी शोला पाहिला आणि चित्रपट आवडला. सध्या वास्तव्य गुरगावला असल्यामुळे ( अनेक पंजाबींशी संबंध असल्यामुळे ) नि कालच " I am khalistani , Right to freedom " असा टी -शर्ट घातलेला युवक बघितल्याने चित्रपटाबाबत उत्सुकता होती आणि चित्रपटाने निराश नाही केले. हा चित्रपट मुख्यतः ४ जणांभोवती फिरतो , टॉमी (शहीद कपूर), मेरी जेन/फुगलीया (आलिया), डॉ. प्रीत ( (करीना) -(गीत नाव हिला जास्ती सूट होते ), सरताज ( दिलजीत ). पात्रे चार असली तरी यात तीन समांतर कथा आहेत ज्या शेवटास एकत्र गुंफल्या जातात. नावावरून नि प्रसिद्धीवरून आपण सर्वांस माहीतच आहे की "नशेचे व्यसन" हा या चित्रपटाचा गाभा आहे. ह्यातील तीनही कथा या व्यसनाशी निगडित आहे , परंतु तरी सुद्धा प्रत्येक कथा ही व्यसनाच्या दृष्टीने , नशेखोराच्या पार्श्ववभूमीच्या दृष्टीने वेगळी आहे. कोणी या व्यसनात स्वतःहून ओढला गेलाय नि फार वाहवत गेलाय ,नि ते व्यसन सुद्धा फार किमती नशेचे - कोकेन ! त्यास लोक रोल मॉडेल मानायला लागतात , तो म्हणजे गब्रू ( उर्फ फुद्दु) टॉमी. तर कोणी चुकून मिळालेल्या हेरॉईन पाकिटाच्या विक्रीतून पैसे मिळवण्याच्या नादात , दुष्टचक्रात अडकलेले , ती म्हणजे मेरी जेन. तर कोणी व्यवस्थेचा भाग असून , नशेच्या व्यापारात मिळणाऱ्या चिरीमिरीतून संतुष्ट असताना ,नशेचा वणवा हा स्वतःच्या घरापर्यंत पोहोचला आहे हे कळल्यावर उद्ध्वस्त न होता त्याविरुद्ध लढा देणारा , तो म्हणजे सरताज ( नाव अगदी समर्पक दिलेले आहे ) नि सरताज ची मार्गदर्शक डॉ. प्रीत. टॉमीची व्यक्तिरेखा शहीद कपूर ने चांगली वठवली आहे. टॅटॊ नि वेषभूषेसाठी पैकीच्या पैकी मार्क्स !!!! नशेखोर टॉमी सुधारित नि स्वैर अश्या दोन्ही प्रकृतीत तो उठून दिसतो. दिलजीत हा चित्रपटात ASI च्या भूमिकेत आहे तर करीना ही डॉक्टर /समुपदेशक आहे. दिलजितचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असला तरी त्याने आपल्या व्यक्तिरेखेस योग्य तो न्याय दिला आहे, करीनाने डॉक्टर ची असलेली भूमिका जराही loud न होता संयत पणे साकारली आहे , या बद्दल विशेष कौतुक . परंतु चित्रपटात अजून एक अशी व्यक्तिरेखा आहे , जी स्वतःची वेगळीच छाप सोडून जाते , ती म्हणजे मेरी जेन / पुगलिया / बिहारी मजूर ( आलीया ). तिने या आधी सुद्धा नॉन ग्लॅमरस भूमिका साकारल्या असल्या तरी ही भूमिका तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील फारच वरच्या श्रेणीतील म्हणावी लागेल. या भूमिकेसाठी तिने पकडलेला गावरान लहेजा , कळकट मळकट असूनसुद्धा उत्कट आशावादी असणारी मेरी तिने फार सुंदर रित्या सादर केली आहे.
हा चित्रपट प्रौढांसाठी आहे याचे एकमेव कारण म्हणजे शिवराळ भाषा !!!! परंतु ती कथेची गरज( च ) आहे. शिव्या देण्याच्या बाबतीत या चित्रपटात लिंगभेद नाही , तसेच जो जोरकसपणा अश्या भावना व्यक्त करतांना दाखवायला लागतो त्याबातीत सुद्धा आलियाच्या सर्वांच्या वरचढ ठरेल. चित्रपट संपादन नि छाया चित्रणाच्या बाबतीत फारच उजवा(चांगला)आहे. चित्रपट कोठेही रटाळ होत नाही , प्रत्येक फ्रेमला पुरेपूर न्याय देण्यात आलाय. " चित्ता वे " नी " ऊड - दा पंजाब " ही गाणी आधीच प्रसिद्ध झालीयेत. "एक कुडी - दलजित व्हर्जन " गाणे फारच श्रवणीय आहे. अमित त्रिवेदीने संगीताची बाजू उत्तमरीत्या सांभाळली आहे. दिग्दर्शन उत्तम आहे परंतु, संवाद लेखक विशेष प्रशंसेच्या पात्र आहेत. चित्रपटाच्या निर्मितीत अनुराग कश्यप याचा हात आहे हे सर्वांना माहीत आहेच , पण हा चित्रपट बालाजी फिल्म्स सोबत सहनिर्मिती आहे. असे असून सुद्धा , या चित्रपटावर बालाजीचा किंचित सुद्धा ठसा जाणवत नाही ( हे नमूद करण्याचे कारण की , बाहुबलीचा मध्यंतराच्या आधीच भाग हा करण जोहर निर्मित तर मध्यंतर नंतरचा चित्रपट राजा मौली ने दिग्दर्शित केला आहे , अशी माझी ठाम धारणा आहे ). चित्रपटातील काही प्रसंग मनात विशेष घर करून जातात, पलायनानंतर टॉमी नि मेरीचा प्रसंग , प्रीत नि दिलजीत मधील CCD वाला प्रसंग, दिलजीत कल रात को गलत हुआ हे म्हणणारा प्रसंग . यादी मोठी आहे. चित्रपटात नशेखोर ,पंजाब पोलिस नि हा धंदा चालवणारे व्यापारी/नेते यांचे भयानक कॉकटेल असल्याने मारधोड असणे स्वाभाविक आहे , पण ती बिलकुल कृत्रिम वा बिभत्सक वाटत नाही. सामान्यतः अनुराग कश्यपाचे चित्रपट हे सॅड एंडींग वाले असतात, हा चित्रपट त्यास अपवाद ठरतो. चित्रपटाची लांबी उगाच न वाढवता , योग्य तो संदेश देऊन संपतो हा चित्रपटाचा अजून एक प्लस पॉईंट !!!
ह्या चित्रपटात एक लघु शंकेचा प्रसंग होता जो सेन्सर बोर्डाने कापला , परंतु तो प्रसंग कापण्याची गरज नव्हती असे व्यक्तिशः वाटते. बाकी इतर कुठले कट सुचवले असतील नि ते उच्च न्यायालयाने काढण्यास सांगितले हे बरेच झाले.
चित्रपट का पाहावाच! - पंजाबातील भयाण वास्तव दर्शनासाठी आणि आलियाच्या अभिनयासाठी.
का पाहावू नये - हस्तिदंती मनोऱ्यातच मश्गुल राहायचे असेल तर , करीना नि आलिया अश्या दोन हॉट बेब असून सुद्धा प्रेक्षकांच्या आवडीसाठी आयटम सॉंग नाही म्हणून ( आठवा बाजीराव - मस्तानी ),तीन तास A.C. त बसून डोक्याला ताप करून घ्यायचा नसेल तर वा डोके बाजूला काढून चित्रपट पाहायची अपेक्षा असेल तर
विशेष नोंद - या चित्रपटात एक नशेखोराकडून खून होतो , आणि शुद्धीत आल्यावर त्याला पश्चाताप होतो त्यावेळेस तो केविलवाण्या अवस्थेत रडतांना दाखविला आहे , या वेळेस आमच्या चित्रपट गृहात हशा , टाळ्या नि कुजबुज चालली होती. आश्चर्य वाटले ना !!!! दोन मुली त्याच्या अभिनयावर हसत होत्या की " देखो इसे ठीक से रोना भी नाही आता" , नि त्याच्या expression वर लोक हसून टाळ्या वाजवत होते , याला अज्ञानात सुख म्हणायचे की गांभीर्याची उणीव !!!!
रच्याकने - चित्रपटातील गोवा दाखवणारे बिलबोर्ड चा फोटो कोणास मिळाला तर जरूर मला द्यावा. आलिया प्रमाणे तो बिलबोर्ड मला सुद्धा अच्छा टाइम दाखवेल ही भोळी आशा
वाचने
6589
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
खूप छान परीक्षण केलंय.
चित्रपट पाहायची उत्सुकता अजुन वाढलीय.
परीक्षण मुद्दाय वाचले कारण फार चर्चा झालीय यावर.मुद्दाचं पटकन मांडलंय धन्यवाद.
परिक्षण आवडले. पाहीन असे वाटत नाही. आलिया आवडते म्हणून विचार करीन.
परीक्षण आवडले.
शाहीद कपूर एक प्रामाणिक ऍक्टर आहे. त्याच्यासाठी पाहणारच. स्टोरी पार्ट वेगळा वाटतोय.
परीक्षण आवडले.
जाताजाता. परवाच ह्या विषयावर दिव्य मराठीत लेख आलेला, खरेच एवढी गंभीर परिस्थिती आहे का ओ पंजाबात? एवढे योध्यांचा अन कष्ट करणाऱ्या लोकांचा भाग तो. सिरीयस वाटते.
In reply to शाहीद कपूर एक प्रामाणिक ऍक्टर by अभ्या..
बॉर्डर स्टेट असूनसुद्धा आपले दुर्लक्ष झाले आहे. हे खेदाने मानावे लागेल. यावर सुद्धा आधी झालेल्या ऑपरेशन प्रमाणे गंभीर योजना राबवणे गरजेचे आहे.
अधिक माहिती - सोलापूर मध्ये धाडीत सापडलेल्या प्रमाणे, चित्रपटात हि फार्मा वाल्यांचे लिंक्स आहेत.
In reply to शाहीद कपूर एक प्रामाणिक ऍक्टर by अभ्या..
घरटी काही जण कनाडामें, अर्धे इकडून तिकडून येणाराय बनवून भटकणारे. उरलेले राहिले ते इथे. आधीच दारूचा बोलबाला. मग अजून काय होणार पुढे? तर ड्रग्स!
In reply to शाहीद कपूर एक प्रामाणिक ऍक्टर by अभ्या..
त्यात थोडासा भाग भूगोलाचा पण आहे. भारतीय उपखंडात अफू पिकवणारे दोन भाग - एक अफगाणिस्तान आणि दुसरा आपला मध्यप्रदेश (नीमछ-मंदसौर हा भाग). पंजाब या दोन्हीही भागांच्या बरोबर मध्यभागी येतो. त्यामुळे तो एक मोठा transit point आहे. अफगाणी अफू पुढे थायलंडमध्ये पाठवणारे आणि आपली मध्यप्रदेशी अफू इराणमार्फत तुर्कस्तान आणि दक्षिण युरोपमध्ये पाठवणारे अनेक स्मगलर्स आहेत. पाकिस्तानची आय.एस.आय.या स्मगलर्सना हाताशी धरून असते. आपली राॅसुद्धा काही कमी नाही. पाकिस्तान तर ड्रग्जनी पूर्ण पोखरला गेलेला आहे. अगदी आपल्या पंजाबपेक्षाही जास्त. पंजाबमधील सामाजिक परिस्थिती - हाती येणारा पैसा, दारूला असलेली प्रतिष्ठा, गरीब-श्रीमंत अशी वाढणारी दरी - या सगळ्यांनी मिळून पंजाबची कोंडी केलेली आहे.
In reply to अभ्याभौ by बोका-ए-आझम
आपली राॅसुद्धा काही कमी नाही. पाकिस्तान तर ड्रग्जनी पूर्ण पोखरला गेलेला आहे.
तुम्ही सीआयटी एक्स अन सीआयटी जे बद्दल बोलताय का बोक्या भाऊ?
In reply to आपली राॅसुद्धा काही कमी नाही. by कैलासवासी सोन्याबापु
याचा counter intelligence शी सरळ संबंध नाहीये.
In reply to नाही बापू by बोका-ए-आझम
असायला हरकत नाही ;)
In reply to शाहीद कपूर एक प्रामाणिक ऍक्टर by अभ्या..
बोक्या भाऊ म्हणतात तसे भौगोलिक संदर्भ आहेतच त्या शिवाय ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहेत अभ्या , बोक्या भाऊ अन मंडळी, राजपूत , जाट, सरदार ह्या जाती राष्ट्रवाद (आधुनिक संदर्भात) यायच्या आधी शुद्ध मर्सिनरी होत्या, विकण्याचे एकमेव प्रॉडक्ट म्हणजे शौर्य असे, अर्थात ते जर अजून वाढवून दाखवता आले तर बरे अन ते अँप्लिफाय करायला एक रस्ता आहे नशा!! नशेच्या यूफोरिया मध्ये जर शौर्य कालवले तर अचाट पराक्रम होतात! उदाहरणादाखल महाभारत पहा (मूळ मध्ये आहे का नाही माहिती नाही) त्यात कर्ण/भीम/दुर्योधन वगैरे गदायुद्धच्या अगोदर 'हंडेच्या हंडे मैरेयक मद्य' रिचवून आखाड्यात मंडले घेऊ लागले वगैरे वाचायला मिळेल (वल्लीजी, बोक्या भाऊ डिटेल्स सांगू शकतील) , पंजाब (पंचनद) + राजस्थान + हरियाणा येथे नशेची ही मुळं आहेत अभ्या, भावा आमचा मित्र आहे जाट (राजस्थानी) त्यांच्याकडे आलेल्या पै पाहुण्याला अफीम उर्फ अफू पाजणे हा पाहुणचार असतो खास, पळसाच्या द्रोणात अफूचं जांभळट काळसर पाणी घोट घोट सर्वात फिरते सोबत हुक्का मस्ट असतो, घरातील स्त्रिया सुद्धा किमान भांग घातलेली गुडगुडी ओढतीलच अशी रीत असते भावा, कचरा तेव्हा झाला जेव्हा ह्या 'परंपरागत' नशेच्या जागी तो अफगाणी गु येऊ लागला, सुरुवातीला नशा समाजमान्य अन संस्कारात समाविष्ट असणाऱ्या ह्या समाजाला विचित्र असे काहीच वाटले नाही नशेचे कारण ती राजरोस होतीच फक्त जेव्हा हे नवे विष अख्खा प्रांत गिळू लागले होते तेव्हा फार जास्त उशीर झाला होता, एकेकाळी आयएमए वर राज्य करत सरदार कॅडेट लोकं ह्या वर्षी फक्त 27 आहेत 35 आपले मराठी फाकडू आहेत ही एक समाधानाची बाब त्यातल्या त्यात
In reply to बोक्या भाऊ म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
खरोखरच दुर्दैवाचीं गोष्ट, सीमेवरचा संपन्न प्रदेश म्हणून कायम युद्धाच्या छायेत. त्यामुळे फक्त आज पाहणारी अन साजरा करणारी ही दिलदार, शूर आणि हुशार लोकं कशी ह्या विषांपायी पोखरली जाताहेत. अवघड आहे सारं.
माझ्या एका शंकेपायी बोकेश आणि आमचे सोल्जरभाऊ बापूसाब यांनी वेळ काढून विस्तृत प्रतिसाद दिला, ज्ञानाचे अन प्रत्यक्ष अनुभवाचे बोल सांगितले. समाधान वाटले.
लवकरच ह्या समस्येवर कुणाकडून का होईना काहीतरी प्रभावी तोडगा निघो एवढीच मनापासून इच्छा. अशा चित्रपटाने जर काही जनजागरण झाले तरी ते नसे थोडके.
In reply to बोक्या भाऊ म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
च्याकडे आलेल्या पै पाहुण्याला अफीम उर्फ अफू पाजणे हा पाहुणचार असतो खास, पळसाच्या द्रोणात अफूचं जांभळट काळसर पाणी घोट घोट सर्वात फिरते सोबत हुक्का मस्ट असतो, घरातील स्त्रिया सुद्धा किमान भांग घातलेली गुडगुडी ओढतीलच अशी रीत असते भावा, कचरा तेव्हा झाला जेव्हा ह्या 'परंपरागत' नशेच्या जागी तो अफगाणी गु येऊ लागला, सुरुवातीला नशा समाजमान्य अन संस्कारात समाविष्ट असणाऱ्या ह्या समाजाला विचित्र असे काहीच वाटले नाही नशेचे कारण ती राजरोस होतीच फक्त जेव्हा हे नवे विष अख्खा प्रांत गिळू लागले होते तेव्हा फार जास्त उशीर झाला होताहा पॉईंट कळला नाही. नशा नशा आहे ना. मग अफगाणी असली काय आणि परसदारात उगवलेली असली काय.
In reply to च्याकडे आलेल्या पै पाहुण्याला by आदूबाळ
अहो म्हणजे आधी परसदारी होती तेव्हा त्याला एक अधिष्ठान होते अमुक सणाला प्यायची तमुक पाहुणे आली का प्यायची असे, strictly prescribed by societal laws, जेव्हा हे अफगाणी प्रकरण 'ओटीसी' उर्फ ओव्हर द काउंटर मिळू लागले तेव्हा पासून घरबंध होता तो लूज झाला वाटेल तेव्हा वाटेल तशी नशा उपलब्ध होऊ लागली, थोड्यावेळात अजून डिटेल सांगतो कसे ते :)
छान लिहिलेय. फक्त आलियाचे खरे नाव काय हे चित्रपटात कुठेही येत नाही. शेवटी तिच्या तोंडात मेरी जेन येते म्हणौन तिला परिक्षणात मेरि जेन म्हणणे बरोबर नाहि हेमावैम. चित्रपटात जसे अॅडिक्शनवर भाष्य केलेय तसेच आलियासारख्या तमाम मुलांवरही भाष्य हवे होते, पण तो चित्रपटाच विषय नव्हता हेही तितकेच खरे. आलिया हॉकी खेळात स्टेटलेवल पर्यंत पोचुनही अचानक वडील गेल्यावर शेतमजुर म्हणुन काम करताना दाखवलीय
In reply to छान लिहिलेय. फक्त आलियाचे by काजुकतली
खरे नाव येत नाही यबाबत सहमत, म्हणूनच मेरी जेन / फुगलीया ( पगलीया ) असे लिहिलेय…. बिहारी accent पटकन कळत नाही त्यामुळे फुगलीया लिहिले गेले , ते पगालीया ( birdbrain ) असे आहे , अर्थातच तेसुद्धा तिचे नाव नसून विशेषण आहे. असो नावात काय आहे…. आलियाचे सामाज्ञ ज्ञान साशारण असले तरी अभिनयातील ज्ञान चांगलेच ( असामान्य म्हणणे थोडे घाईचे ठरेल ) आहे .
मुद्देसुद परिक्षण,
या निमित्ताने काहींनी लेकहन्सन्यास सोडला हे छान.
विशेष नोंद प्रकार मी प्रकाश बाबा आमटे आणि आणखी एका सिनेमात अनुभवला आहे.
आपण सिनेमा पहायला आलो आहोत पण नीट पाहण्यास (अजिबात) लायक नाही आहोत यासाठी सिनेमात टाळ्या नि कुजबुज /अर्वाच्य शेरेबाजी करणे असले प्रकार चाल्तात (हे प्रकार बहुपडदामध्येही अनुभवले आहेत).
पिटातला सरधोपट नाखु
In reply to आणखी एक by नाखु
आपल्या प्रेक्षकांना इतक्या थेट आणि अंगावर येणाऱ्या हिंसेची आणि अस्वस्थ करणाऱ्या चित्रपटांची सवय नाहीये. त्यामुळे ते अस्वस्थ झाले की त्यातून बाहेर येण्यासाठी अशी उलटी प्रतिक्रिया देतात. गिरीश कार्नाडांनी त्यांच्या आत्मचरित्रात एक प्रसंग सांगितलाय - इडिपस नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांना हाच अनुभव आला होता. नाटकातली हिंसा असह्य होऊन लोक खिदळायला लागले आणि त्यांना प्रयोग चालू ठेवणं कठीण झालं.
खूप सुंदर चित्रपट आहे. प्रभावी अभिनय आणि मांडणी.
लई बेस परीक्षण
परीक्षण आवडले. एवढी गंभीर परिस्थिती पंजाबात असेल तर भारतीय सेनादलाचे काही काळाने कसे चालणार? सगळ्याच सैन्यात पन्जाबी (शिख्/हिन्दू/जाट) - पोखरलेले गेल्यामुळे - अपुरे पडले तर?
काल पाह्यला हा चित्रपट. अर्थातच अंगावर आला. इतकी भीषण परिस्थिती नसावी पंजाबमध्ये अशी मनापासून इच्छा.
हा पण सिनेमा अजिबात बघणार नाही.
पण परिक्षण मात्र उत्तम जमले आहे.
In reply to हिंदी सिनेमे न बघायचे व्रत घेतले असल्याने... by मुक्त विहारि
तुम्हि मग फक्त Marvel Comics चेच चित्रपट बघा.
आवडले बुवा, पिक्चर पण लय आवडलं, शाहिद आणि आलिया भन्नाट!
अवांतर :
लेख व प्रतिसादांवरून कर्नल विनीतची आठवण झाली. छोटीशी पण बोधप्रद उपकथा आहे.
-गा.पै.
बाहुबलीचा मध्यंतराच्या आधीच भाग हा करण जोहर निर्मित तर मध्यंतर नंतरचा चित्रपट राजा मौली ने दिग्दर्शित केला आहे.!
जरा स्पष्ट कराल का ???????
बाहुबली हिंदी - करण जोहर ने distribute केला होता, म्हणून विनोद केलेला आहे. बाहुबली खरेतर मध्यंतरानंतरच पकड घेतो. पूर्वार्ध थोडा रटाळ नि गुडीगुडी करण जोहर टाईप वाटतो.
खूप छान परीक्षण केलंय.