कलेचा बाजार....
लेखनप्रकार
राम राम मंडळी,
मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.)
"अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!"
असा मनाशी विचार करून मी तो कार्यक्रम पाहाणे सुरू ठेवले. आज माझा काय दुर्दैवी योग होता हे माहिती नाही, परंतु हा कार्यक्रम मी शेवटपर्यंत पाहिला आणि नंतर मला असा प्रश्न पडला की आज आपण नक्की काय पाहिलं?
नृत्याच्या स्पर्धा?, रडारडीचा तमाशा?, की लग्नाच्या बाजाराचा कौटुंबिक तमाशा? की स्टारप्लसने प्रेक्षकांना एखादं नाट्य दाखवून चुत्त्या बनवायचा केलेला प्रयत्न? (अर्थात, त्या प्रेक्षकात मीही आलोच!)
आता मंडळी, वास्तविक हा कार्यक्रम म्हणजे स्त्रीपुरुषांच्या एकूण सहा स्पर्धक जोड्यांचा सहभाग असलेली नृत्याची एक स्पर्धा होती. म्हणजे त्यात नक्की काय अपेक्षित असायला हवं हो? तर प्रत्येक जोडीने मंचावर यावं, काय ते नृत्य करून दाखवावं, आणि परिक्षकांनी त्यांना गुण द्यावेत व शेवटी कोण जिंकलं, कोण हारलं, पुढच्या राऊंड करता कोण टिकलं, कोण गळालं, हे जाहीर करावं. That's all! हो की नाही सांगा पाहू!
निदान माझ्या अल्पमतीला तरी कुठलीही स्पर्धा म्हटली की इतकाच अर्थ ठाऊक आहे! आणि स्पर्धा म्हटली की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे ओघाने आलंच. तेव्हा त्यातही काही विशेष नाट्य निदान मला तरी जाणवत नाही. आणि अहो कला हा तर असा विषय आहे की त्यात प्रत्येक जण आयुष्यभर शिकतच असतो. तुम्हाआम्हा सर्वांना व्यापून टकणारा विषय आहे तो! अनंत आहे! कलेच्या अविष्कारात वेळेच्या घडीलाही महत्व असतं. एखादा स्पर्धक हारला म्हणजे तो कमी आहे आणि एखादा स्पर्धक जिंकला म्हणजे त्याचे हात त्या कलेत आभाळाला टेकले असंही समजण्याचं कारण नाही.
त्यामुळे जिंकलेल्या स्पर्धकाने अजून 'खूप काही बाकी आहे असं म्हणून हुरळून न जाता, व हारलेल्या स्पर्धकाने बेटर लक नेक्स्ट टाईम असं म्हणून अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत, साधना केली पाहिजे! निदान मला तरी यात कुठे गंभीर नाट्य, रडारड दिसत नाही. आपण जिंको किंवा हारो, कलेची साधना आयुष्यभर सुरूच ठेवली पाहिजे इतकी साधी खिलाडूवृत्ती ठेऊन कुठल्याही कलेकडे, स्पर्धेकडे पाहिले पाहिजे!
पण हे रिऍलिटी शोवाले याचा कसा तमाशा करतात, बाजार मांडतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा तो 'आजा माहिवे' चा कार्यक्रम!
आजच्या कार्यक्रमातले तमाशाचे दोन प्रसंग -
१) आज ज्या जोड्या नाचत होत्या, त्यापैकी एका जोडीचा नाच करून झाल्यावर त्यातल्या मुलीच्या घरचा एक कौटुंबिक तमाशाही दाखवण्यात आला. त्या जोडीतली जी मुलगी होती, ती म्हणे तिच्या बापसाला न सांगता त्या स्पर्धेला आली होती. त्यामुळे तिचा बाप तिच्यावर नाराज होता, त्याने मौनव्रत धारण केलं होतं. त्या मुलीची आयशी आज त्या कार्यक्रमाला आली होती. नाच झाल्यावर तिला सेटवर बोलावलं गेलं! मग "मम्मा, आय लव्ह यू.." असं म्हणून मायलेकी एकमेकींना मिठ्या मारून स्टेजवर रडल्या! वातावरण गंभीर. प्रेक्षक, परिक्षक सगळे गंभीर. प्रत्येकाचा गंभीर चेहेर्यावरून एकेकदा कॅमेरा फिरला. शिवाय त्या मुलीच्या बापसाला तो मुलगाही पसंत नव्हता म्हणे! मग त्या मुलाने आपल्या भावी सासूला जवळ घेऊन "मै जब कुछ बनके दिखाकर लायक बन जाउंगा तेव्हाच तुझ्या मुलीचा हात मागेन..!" असं म्हटल्यावर लगेच टाळ्यांचा कडकडाट. मगासचं गंभीर वातावरण आता निवळलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या चेहेर्यावर आता हास्य आणि समाधान आहे हे दाखवायला पुन्हा एकदा सर्वांच्या थोबाडाचा क्लोजप!
२) आजच्या स्पर्धकांपैकी एक जी जोडी होती, त्यातली मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्सुलमान! त्यामुळे त्यांचा नाच संपल्यावर हिंदूमुस्लिम प्रश्न, त्यांच्या घरचे रितीरिवाज, ती मुलगी त्या मुलाच्या घरी सूट होईल किंवा नाही, धर्म कुणाचा बदलणार? इत्यादी प्रश्न त्या स्टारप्लसच्या सेटच्या ऐरणीवर घेतले गेले! त्या मुलाचा थोरला भाऊ, त्याची वहिनी आणि दोन पुतणे इत्यादी मंडळींना सेटवर पाचारण करण्यात आलं. मग त्या थोरल्या भावाने आपला धाकट्या भावाच्या या आंतरधर्मीय लग्नास विरोध आहे असं ठासून सांगितलं. थोरल्या वहिनीने त्या मुलीला "तुझा धर्म वेगळा, रितिरिवाज वेगळे, तू आमच्या घरात सूट होणार नाहीस" असं सांगितलं! त्यानंतर त्या मुलीच्या घरच्या हिंदू मंडळींचा त्या लग्नाला विरोध आहे असं सांगणारं एक क्लिपिंग दाखवलं गेलं. मग परिक्षक मंडळींनी, 'ते दोघे जर एकमेकांवर प्यार करत असतील तर त्यांनी लग्न करणं कसं योग्य आहे, म्हटलं तर ते पळून जाऊनही लग्न करू शकतात!' असा सूर लावला! हे सगळं झाल्यावर मग त्या हिंदू मुलीने तिथेच गळा काढला. मग त्या थोरल्या वहिनीने त्या "जाऊ" म्हणून पसंत नसलेल्या मुलीस जवळ घेऊन तिचे सांत्वन केले!"
अरे हे नक्की चालू तरी काय आहे भांचोत? नृत्याची स्पर्धा आहे की तमाशा? पण चुकलो मंडळी! आज जी काही थेरं दाखवली गेली त्याला "तमाशा " असं संबोधणं हे योग्य होणर नाही. महाराष्ट्रातील एका पारंपारिक लोककलेचा तो अपमान होईल!
मग शेवटी निकाल!
पुन्हा एकदा वातावरण गंभीर अन् नाट्यमय. प्रेक्षकांचे, परिक्षकांचे चेहेरे चिंतातूर! सहा जोड्यांपैकी एक कुठलीतरी जोडी आज बाद होणार होती! आणि थोडा वेळ नाट्यपूर्ण पॉजेस आणि वेळ काढत शेवटी एकदा बाद जोडीचे नाव जाहीर झाले! इतर जोड्यांच्या आता एका डोळ्यात हासू अन् एकात आसू! हारलेल्या जोडीबद्दल सहनुभूती म्हणून परिक्षकही रडले, तिघा परिक्षकांनी एकमेकांना धीर दिला आणि सांत्वन केले!
आता शेवटचे काही सेकंद शिल्लक आहेत. जी जोडी बाद झाली होती त्यातल्या मुलीला ती हार सहन न झाल्यामुळे सेटवरच चक्कर आली आणि ती खाली पडली. तिच्या जोडीदाराने तिला सावरलं, परिक्षक मंडळी तिच्या दिशेने धावली. जिंकलेल्या जोड्यांपैकी कुणीतरी एक जण बिसलेरी बाटली घेऊन धावला अन् मुर्छित मुलीच्या चेहेर्यावर त्यातले पाणी शिंपडले. शेवटच्या दृष्यात त्या मुलीला एका कारमध्ये बसवून ती कार कुठेशी रवाना झाल्याचे दाखवले अन् आजचा स्टारप्लसचा 'आजा माहिवे' चा एपिसोड संपला!
मंडळी, खरंच काय म्हणावं या बाजाराला? काय म्हणावं कलेच्या या व्यभिचाराला? नृत्यासारखी अवघड कला! ज्यात पं बिरजू महाराजांसारखी, पं दुर्गालालसारखी, आयुष्यभर खडतर साधना केलेली मंडळी आहेत त्या नृत्याच्या स्पर्धेच्या या बाजाराला म्हणावे तरी काय?
त्यापेक्षा काही वर्षांपूर्वी मुंबईच्या फोरासरोडवरच्या ज्या एका बाजारात एका देशीदारूच्या बारमध्ये मी नौकरीला होतो, तो बाजार कितीतरी बरा! काय ते पाचपंचवीस रुपये घेतले आणि आलेल्या गिर्हाईकासोबत झोपले. बात खतम! गिर्हाईकाच्या शरीराची आग विझली, बाईच्या पोटाची आग विझली! मॅटर एन्डस्! इतका स्वच्छ, अन् रोकडा बाजार होता तो..! कलेच्या नावावर रडारड, नाट्य, एसएमएसचे आर्थिक राजकारण, इत्यादी कलेचा व्यभिचार मांडणारा बाजार तरी नक्कीच नव्हता तो!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
5874
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
नाद
नाट्य...
निव्वळ
नुसती कला नाही...
In reply to नुसती कला नाही... by देवदत्त
त्यांच्या
In reply to त्यांच्या by सखाराम_गटणे™
नाडी सतत
हा
ज्या कलेची (नाच, गाणी)
मुंबईतले भिकारी
In reply to मुंबईतले भिकारी by सर्वसाक्षी
>>लोकांनी
In reply to मुंबईतले भिकारी by सर्वसाक्षी
दुनिया झुकती है...
In reply to दुनिया झुकती है... by प्रमोद देव
असेच म्हणतो.
सर्वसाक्षी, सहमत.
हे कार्यक्रम..
रियॅलिटी शो चा बाजार
In reply to रियॅलिटी शो चा बाजार by अभिजीत
छ्या! काय