वास्तुरचना

वैशाली अर्चिक जनातलं, मनातलं
सध्या टिव्हीवर एक मालिका चालू आहे. त्यातील एका प्रमुख पत्राच्या तोंडी सतत एक वाक्य दिले आहे “ परंपरेशी तडजोड नाही”. ह्या सीरिअलमध्ये आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक काही नियम,चालीरिती आखून दिल्या आहेत आणि त्या पाळणे किती गरजेचे आहे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत. गंमत म्हणून ती सीरिअल पाहताना जाणवले की, खरच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला होता. पण दुर्दैवानी त्या मागील शास्त्र आपण समजून न घेता परंपरेच्या नावाखाली आंधळेपणाने त्याला नको तो अर्थ देत आहोत. कॉलेजमध्ये असताना आम्हाला climatology किंवा ऋतुचक्र / हवामानाबद्दल लेक्चर्स असायची. कुठल्याही वास्तुतज्ञाला इमारत बांधण्यापूर्वी त्या जागेच्या हवामानाबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या इमारती व चेरापुंजीला बांधल्या जाणाऱ्या इमारती ह्यांमध्ये खूप फरक आहे किंवा असावाच. हा फरक मुख्यत्वे दोन्हीच्या भौगोलिक फरकामुळे आहे. ह्याच्या पूर्ण अभ्यासाशिवाय इमारती बांधणे शुद्ध वेडेपणा ठरेल. आणि ह्याचाच सखोल विचार आपल्या पूर्वजांनी केला होता. भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन वास्तुरचनेचे काही नियम त्यांनी लोकांना घालून दिले. ह्यासाठी त्यांनी दिशांचा अभ्यास करून नैसर्गिक उर्जा , जी आपल्याला मुबलक प्रमाणात फुकट मिळते आहे ,त्याचा वापर कसा करावा हे सांगितले. त्याचबरोबर पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश ह्या पंचमहाभूतांचा आपल्या मनावर व शरीरावर होणारा परिणाम त्यांनी अभ्यासिला. थोडक्यात वास्तुरचना म्हणजे नैसर्गिक गोष्टींबरोबर साधलेला समतोल हा मुख्य उद्धेश्य समोर ठेवला. मुळातच दक्षिण दिशेला आपल्याकडे खालनायकाप्रमाणे वागवले जाते. दक्षिण दिशेला दारे –खिडक्या नकोत, तिकडच्या भिंतीची उंची जास्त असावी, घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला नसावा वगैरे वगैरे. नेहमी सावत्र वागणूक मिळणाऱ्या ह्या दिशेप्रती आपसूकच त्यामुळे माझ्या मनात कणव निर्माण झाली. त्याच्यावरील लागलेला बट्टा पुसून टाकण्यासाठी परत climatologyच्या पुस्तकांची मदत घेतली. तेव्हा जाणवले ह्याच्यावरील सगळे आरोप बरोबर आहेत, फक्त त्यामागील शास्त्रीय कारणे कोणीच लक्षात घेत नाही. आपल्याला माहितीच आहे सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो. त्याचा हा प्रवास दक्षिण दिशेकडून होतो. त्यामुळे सूर्याचा जास्तीतजास्त कालावधी दक्षिण दिशेला असतो. साहजिकच ह्या दिशेला असलेल्या खोल्या तापून निघतात. हे मला केव्हा जाणवले जेव्हा आमच्या पुण्याच्या नवीन घरी रहायला गेलो. पूर्वीच्या काळी शेक-शेकोटीने बाळंतीणीची खोली कशी गरम रहायची तशी ही खोली तापायची. दिवसभर अंगाची लाहीलाही आणि बैचेनी. ह्याचे मुख्य कारण ह्या खोलीची जागा. बरोब्बर दक्षिणेला असल्याने दिवसाचे सहा-सात तास उन्हात न्हाऊन निघायची. बरं उन्हापासून संरक्षण करायला पडदे ओढले तर दोन महिन्यात प्रखर उन्हाने पडद्याचा रंग उडून पोतेरे झाले. आता मी सूर्याला तर सांगू शकत नाही तुझा मार्ग बदल, गुपचूप आमची खोली बदलली आणि अशा ठिकाणी गेले जिथे उन्हाचा त्रास कमी होईल. तेव्हा एक गोष्ट पटली की, आपल्या वास्तूचे दक्षिण दिशेकडून येणाऱ्या प्रखर उन्हापासून संरक्षण करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे ह्या दिशेला उंच भिंतीचा आडोसा का करावा व खिडक्या का नसाव्यात हे समजले. ह्या दिशेला असलेल्या खोल्या वर्षातून एकदाच कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी गेस्ट रूम म्हणून किंवा स्टोर रूम म्हणून वापरल्या तर उत्तम. रोजच्या वापरायच्या खोल्या शक्यतो बाकीच्या दिशांना ठेवाव्यात. दुसरे, दक्षिणेला उंच भिंत बांधणे व दारे खिडक्या न ठेवणे ह्याचे प्रमुख कारण म्हणजे भारताची भौगोलिक स्थिती. आपल्याला माहितीच आहे की मान्सूनचा पाऊस दक्षिण- पश्चिमेकडून येतो. वाऱ्यामुळे अडवातिडवा कसाही घरात घुसणाऱ्या पावसाने काय हाल होतात हे मी प्रत्यक्ष बघितले आहे. माझ्या क्लाएंटचा वरळीला १४ व्या मजल्यावर सी फेसिंग फ्लॅट आहे. त्या फ्लॅटची पावसामुळे झालेली दुर्दशा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. ह्याचे मुख्य कारण दक्षिण- पश्चिमेकडील खिडक्या. एकतर आजकाल खिडक्यांना छज्जे नसतात. त्यामुळे पाऊस आडत नाही. खिडक्यांच्या फटींमधून पाणी येउन फक्त ह्याच खोलीत सुनामी सदृश वातावरण झाले होते. बाकीच्या दिशांना असलेल्या खोल्या पाषाणासारख्या कोरड्या ठणठणीत होत्या ! अशावेळी सांगा दक्षिण दिशेची काय चूक? वस्तुतज्ञाने दिशांचा नीट अभ्यास करून खिडक्यांची रचना केली असती तर ही वेळच आली नसती. 1 दक्षिण दिशेच्या अगदी विरुद्ध, पट्ट राणीसारखी असलेली दिशा म्हणजे पूर्व दिशा. पूर्वाभिमुख घर असावे, अभ्यास करताना पूर्वेला तोंड करावे,स्वयंपाकघर पूर्व किंवा अग्नेयला असावे वगैरे गोष्टी आपण ऐकतो. ह्यामध्येसुध्दा निसर्गाचा शास्त्रोक्त अभ्यास केलेला जाणवतो. पूर्वीपासून आपल्याला सांगितले जाते की सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. पूर्वीच्या काळी हा अभ्यास बाहेर झाडाखाली बसून होत असे. साहजिकच पूर्वेला बसून अभ्यास केल्याने सूर्याची पहिली कोवळी उन्हे अंगावर पडत. ज्यामुळे विद्यार्थी दशेतील मुलांना भरपूर नैसर्गिक उर्जा मिळत असे. त्याच प्रमाणे कोवळे ऊन म्हणजे विटामिन डी चा मुबलक स्त्रोत. सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक फायद्याची माहिती आपल्या पूर्वजांना नक्कीच असणार. आजकाल प्रत्येक दुसऱ्या माणसामध्ये विटामिन डीची जी कमतरता आढळते व त्यामुळे हाडांच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते, ह्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाकडून फुकट उधळलेली ही उर्जा आपण घेतच नाही. आपल्या पूर्वजांनी मात्र जाणून- बुजून, कधी धाक-दपटशहाने किंवा कधी धार्मिकतेचे कारण देऊन हे नियम आचरणात आणायला भाग पाडले. ज्याचा फायदा फक्त एका व्यक्तीला व कुटुंबाला न होता पूर्ण समाजाला झाला. अभ्यासाच्या जागेप्रमाणेच भर दिला गेला स्वयंपाकघरावर. सकाळची लगबग सुरु होणारे घरातील हे प्रथम व मुख्य स्थान. ह्याच्या स्थानाबद्दलसुध्दा मला वाटते की सुर्याचा प्रामुख्याने विचार केला गेला असावा. सूर्याची कोवळी उन्हे अन्न पदार्थावर पडल्यास त्यातील बॅक्टेरिया नाश पावून सकसपणा वाढीस लागतो हे आपण जाणतोच. हेच प्रमुख कारण असावे पूर्वेला किंवा अग्नेयला स्वयंपाकघर ठेवण्याचे. त्याचप्रमाणे पूर्वी खिडकी हे एकच साधन होते स्वयंपाकघरातील वास व धूर बाहेर घालवायचे. अशावेळी भारतीय उपखंडातील वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास करून स्वयंपाकघर ह्या दिशांना ठेवल्यास वास व धूर घराच्या आतमध्ये न शिरता बाहेर फेकला जाई. पश्चिमेचा वारा म्हणजे सर्वात आल्हाददायक! त्यामुळे पूर्व –पश्चिम दिशेला घराचे तोंड असण्याचा अजून एक फायदा म्हणजे उत्कृष्ट वायुवीजन किंवा ventilatilation. नवरा बायकोच्या भांडणाने तापलेले वातावरण थंड करण्याचा हा नैसर्गिक उपाय. तुम्ही आलिया भटचा “टू स्टेट्स” पिक्चर पहिला असेल, तर तुम्हाला तिच्या घराच्या मधोमध असलेला चौक नक्कीच आवडला असेल. मोहेंजोदडो संस्कुतीपासून ते आत्ता आत्ताच्या वाडा संस्कृतीपर्यंत असे “ओपन टू स्काय” चौक भारतीय वास्तुरचनेची खासियत होती. पूर्व –पश्चिम दिशेला उघडणारा हा चौक घरात हवा खेळती ठेवून, तापमान आल्हाददायक ठेवण्याचे काम करायचा. आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे ही रचना काळाच्या पडद्या आड गेली आहे. पण जर का आपण पूर्व-पश्चिम दिशेला दारे- खिडक्या असणारे घर निवडले तर हवा खेळती रहायला नक्कीच मदत होईल. मला आठवतंय लहानपणी आजीला छळायला म्हणून मुद्दामून दक्षिणेकडे पाय करून झोपायचे. त्यावेळी ती परोपरीने समजवायची की दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने तब्येत बिघडते, नको झोपूस. पण मला ती त्यावेळी कटकट वाटायची . तिच्याकडेपण त्यावेळी “असे का झोपू नये” ह्याचे समाधानकारक उत्तर नसायचे. साहजिकच जुन्या काहितरी चाली-रिती म्हणून मी कानाडोळा करायचे. नंतर कळले की ही अंधश्रद्धा नसून ह्यालापण शास्त्रीय आधार आहे. आपल्या पृथ्वीला उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही दोन चुंबकीय क्षेत्रे आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. ह्या चुंबकीय लहरी उत्तर ते दक्षिण सतत वाहत असतात. आपल्या रक्तात लोह असल्याने ह्या चुंबकीय प्रवाहाचा आपल्या शरीरावर साहजिकच परिणाम होतो. आपण ह्या चुंबकीय प्रवाहाच्या दिशेने म्हणजे उत्तरेला डोके व दक्षिण दिशेला सतत पाय करून झोपलो तर आपल्या रक्तातल्या लोहावर व पर्यायाने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गरगरणे, चक्कर येणे ,डोकेदुखी व रक्ताशी संबंधीत दुखणी सुरु होतात. ह्यासाठी म्हणून उत्तर दिशेला सोडून बाकी कुठल्याही दिशेला डोके करून झोपल्यास आपली तब्येत नीट राहते व झोपपण नीट लागते. आजीची कळकळ आत्ता समजतीये ! sorry आजी. प्रत्येक दिशेची खास वैशिठ्ये आपण पहिली. पण त्याच बरोबर घरात भरपूर नैसर्गिक उजेड येणेपण शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. इंग्लंड सारख्या ठिकाणी हिवाळ्यात जेव्हा दिवसेन दिवस सूर्याचे दर्शन होत नाही, त्यावेळी लोकांमध्ये नैराश्याचे झटके येण्याचे प्रमाण कैक पटीने वाढते. अशावेळी BBC वर लोकांचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम मुद्दामून दाखवले जातात. आपल्याकडे नशिबाने भरपूर उजेड असतो, त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. वास्तूरचने बद्दल हा शास्त्रीय दृष्टीकोन समजल्यानंतर मनोमन मी आपल्या पूर्वजांसमोर नतमस्तक झाले. हाताशी काहीही साधने नसताना प्रत्येक गोष्टीची शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आखणी बघून आपल्या परंपरेविषयीचा अभिमान दुणावला. टीव्हीवरील सीरीअलचे पुढे काय होईल माहीत नाही. पण शास्त्रीय कारण दिलेत तर परंपरेशी हातमिळवणी करायला मला मात्र नक्कीच आवडेल.
वर्गीकरण
लेखनप्रकार

48 टिप्पण्या 10,761 दृश्ये

Comments

मराठी कथालेखक नवीन

उदाहरणः
सकाळची लगबग सुरु होणारे घरातील हे प्रथम व मुख्य स्थान. ह्याच्या स्थानाबद्दलसुध्दा मला वाटते की सुर्याचा प्रामुख्याने विचार केला गेला असावा. सूर्याची कोवळी उन्हे अन्न पदार्थावर पडल्यास त्यातील बॅक्टेरिया नाश पावून सकसपणा वाढीस लागतो
.. अन्न शिजवूनही नाश न झालेले बॅक्टेरिया कोवळ्या उन्हाने मरुन जातात ? सिध्द करता येईल हे ? मग पाण्यातील बॅक्टेरिया मारायला UV filter घेतलाच नसता. माठात (बाटली पारदर्शक असते , पण इथे ती ही निषिध्द असेल) भरुन पुर्वेला ठेवले की मेलेत बॅक्टेरिया बाकीचे अनेक मुद्दे असेच आहेत...असो.

काळा पहाड नवीन

In reply to by मराठी कथालेखक

कोवळी उन्हे बॅक्टेरिया मारतात की नाही याबद्दल संशोधन झालं असेल तर माहिती नाही, पण सूर्याच्या किरणांनी बॅक्टेरिया मरतात हे तर शोधलं जातंयच. तुमच्यासाठी काही खास विदेशी लिंक्स देतोय. http://www.rsc.org/Publishing/ChemTech/Volume/2009/03/solar_power_kills_bacteria.asp http://wonderopolis.org/wonder/can-the-sun-help-to-kill-germs/ http://science.howstuffworks.com/life/cellular-microscopic/light-virus.htm

पैसा नवीन

सगळेच मुद्दे पटले नाहीत. पण घर पूर्वाभिमुख असावे अशा काही गोष्टींचे कारण कोणालाही सहज कळण्यासारखे आहे.

सुबोध खरे नवीन

आपल्या लेख मध्ये अतिशयोक्ती अलंकार बराच जाणवतो. उदा. आपण ह्या चुंबकीय प्रवाहाच्या दिशेने म्हणजे उत्तरेला डोके व दक्षिण दिशेला सतत पाय करून झोपलो तर आपल्या रक्तातल्या लोहावर व पर्यायाने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गरगरणे, चक्कर येणे ,डोकेदुखी व रक्ताशी संबंधीत दुखणी सुरु होतात. ह्यासाठी म्हणून उत्तर दिशेला सोडून बाकी कुठल्याही दिशेला डोके करून झोपल्यास आपली तब्येत नीट राहते व झोपपण नीट लागते. याला कोणताही शास्त्राधार नाही. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ०.१ गॉस इतके असते. एम आर आय या तंत्र ज्ञानात शरीरातील १ कोट्यांश पेक्षा कमी रेणूवर चुंबकीय प्रभाव दाखवण्यासाठी १. ५ टेसला इतके शक्तिशाली चुंबक लागते. म्हणजे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा दीड लाख पट शक्तिशाली चुंबक लागते. या ऐवजी आपण जर उत्तरेकडे पाय करून झोपलो तर ते कसे चालते? केवळ जुन्या समजुतीला अर्धवट शास्त्राधार लावणे चूक आहे. घराच्या रचनेबाबत शहाणपण हे लोकांना तंत्र वापरून समजले हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे. कोकणात कौलारू घराच्या ऐवजी धाब्याचे घर बांधून गच्ची बांधली तर घरात एक वर्षात गळती लागेल हे अनुभवातून समजल्यावर कोण कशाला धाब्याचे घर बांधेल. त्याला "शास्त्राधाराचा" टेकू लावण्याची गरज नाही. कोवळ्या उन्हाने जंतू मरतात याला कोणताही शास्त्राधार नाही. दुपारच्या प्रखर उन्हाने नक्कीच जास्त जंतू मरतात म्हणून आपण काचेचे छत असलेले स्वयम्पाकघर ठेवतो का? चुलींमुळे होणार्या प्रदूषणाची कल्पना येण्यासाठी एक विदा देत आहे. कृपया वाचून घ्यावी. Household cooking is "probably the largest single source of exposure in the country, http://timesofindia.indiatimes.com/india/Chulhas-make-Bharat-as-polluted-as-India/articleshow/50505567.cms उगीच आमच्या कडे पण ब्रम्हास्त्र होते आणि पुष्पक विमान होते म्हणून आपली पाठ थोपटण्यासारखे वाटते. अनुभवातून आलेल्या शहाणपणाला शास्त्राधाराचा टेकू लावण्याची गरज नाही. भोपळा हे फळ आहे हे ज्ञान( वैज्ञानिक दृष्ट्या) आहे. पण फ्रुट सलाड मध्ये भोपळा घालू नये हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे

काळा पहाड नवीन

In reply to by सुबोध खरे

थ्वीचे चुंबकीय क्षेत्र ०.१ गॉस इतके असते. एम आर आय या तंत्र ज्ञानात शरीरातील १ कोट्यांश पेक्षा कमी रेणूवर चुंबकीय प्रभाव दाखवण्यासाठी १. ५ टेसला इतके शक्तिशाली चुंबक लागते. म्हणजे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा दीड लाख पट शक्तिशाली चुंबक लागते.
डॉक्टर साहेब, तसं असेल तर मॅग्नेटो रिसेप्शन (https://en.wikipedia.org/wiki/Magnetoreception) पण आस्तित्वात नसायला हवं होतं. हो ना?
कोकणात कौलारू घराच्या ऐवजी धाब्याचे घर बांधून गच्ची बांधली तर घरात एक वर्षात गळती लागेल हे अनुभवातून समजल्यावर कोण कशाला धाब्याचे घर बांधेल. त्याला "शास्त्राधाराचा" टेकू लावण्याची गरज नाही.
लेखक त्याला शास्त्राधाराचा टेकू लावतच नाहीये. लेखक शास्त्राधाराला विज्ञानाचा आणि कॉमनसेन्स चा टेकू लावतोय. मला वाटतं तो गुन्हा नसावा.
कोवळ्या उन्हाने जंतू मरतात याला कोणताही शास्त्राधार नाही. दुपारच्या प्रखर उन्हाने नक्कीच जास्त जंतू मरतात म्हणून आपण काचेचे छत असलेले स्वयम्पाकघर ठेवतो का?
कोवळ्या उन्हाने असं काही होत असेल तर मला माहिती नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. पण ज्या बाजूला स्वयंपाकघर असेल तिकडेच वस्तू वाळवणासाठी ठेवल्या जातील. म्हणजे सगळं घर ओलांडून कुणी विरूध्द दिशेला वाळवणासाठी जाणार नाही. तेव्हा प्रखर उन्हाचा उपयोग करण्यासाठी स्वयंपाकघर पूर्वेला असेल हे ओघानंच आलं.
उगीच आमच्या कडे पण ब्रम्हास्त्र होते आणि पुष्पक विमान होते म्हणून आपली पाठ थोपटण्यासारखे वाटते.
लेखक या गोष्टींमधल्या तार्किक दृष्ट्या समर्थनीय गोष्टी शोधतोय. त्याचा हेतू स्वतःची पाठ थोपटण्याचा आहे असे वाटत नाही.

सुबोध खरे नवीन

In reply to by काळा पहाड

पहाड साहेब "आपण ह्या चुंबकीय प्रवाहाच्या दिशेने म्हणजे उत्तरेला डोके व दक्षिण दिशेला सतत पाय करून झोपलो तर आपल्या रक्तातल्या लोहावर व पर्यायाने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गरगरणे, चक्कर येणे ,डोकेदुखी व रक्ताशी संबंधीत दुखणी सुरु होतात. ह्यासाठी म्हणून उत्तर दिशेला सोडून बाकी कुठल्याही दिशेला डोके करून झोपल्यास आपली तब्येत नीट राहते व झोपपण नीट लागते." याचा आणि मॅग्नेटो रिसेप्शनचा काय संबंध मॅग्नेटो रिसेप्शन हे बर्याच प्राण्यांमध्ये असते उदा. डॉल्फिन मासे आपले चुंबकीय क्षेत्र वापरून नौका नयन( navigation) करत असतात. डॉल्फिन मासे किंवा वटवाघळे कर्णातीत( ultrasound) ध्वनी वापरून आपला मार्ग शोधतात. गरुड आपले डोळ्याचे भिंग पुढे मागे करून दुर्बिणीसारखे दूरचे स्पष्ट पाहू शकतो. मानवी मेंदूची जशी वाढ होत गेली तशी मानवाच्या अशा क्षमता कमी होत गेल्या. पण याचा नि दक्षिण दिशेला सतत पाय करून झोपलो तर डोके दुखण्याचा कुठे संबंध आला? आपले पूर्वज वस्तू वाळवणासाठी गच्चीत किंवा मागील अंगणात वर्षानुवर्षे ठेवत आले आहेत. त्यासाठी स्वयाम्पाक्घर कोणत्याही दिशेला असल्याने काय फरक पडेल. "पण दुर्दैवानी त्या मागील शास्त्र आपण समजून न घेता परंपरेच्या नावाखाली आंधळेपणाने त्याला नको तो अर्थ देत आहोत".हे लेखिकेचे चौथेच वाक्य आहे. अनुभवातून आलेले शहाणपण याला शास्त्राचा टेकू लावण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे एवढेच माझे म्हणणे आहे. हा प्रयत्न म्हणजे एखाद्या गोष्टीला हास्यास्पद पुरावा देण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

काळा पहाड नवीन

In reply to by सुबोध खरे

मॅग्नेटो रिसेप्शन जर इतकुश्या प्राण्यां मध्ये जर इतकी महत्वाची भूमिका बदलतं तर मानवी मेंदू वर त्याचा परिणाम शून्य आहे हे सिद्ध झालं आहे का? मानवी मेंदू ही एक अती जटिल रचना आहे. शास्त्राचा विद्द्यार्थी असल्यानं जोपर्यंत एखादी थियरी त्यावर संशोधन होवून डिस्कार्ड केली जात नाही, तोपर्यंत मी तिची थट्टा उडवत नाही. कदाचित ही थियरी खरी असेलही.
अनुभवातून आलेले शहाणपण याला शास्त्राचा टेकू लावण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे एवढेच माझे म्हणणे आहे. हा प्रयत्न म्हणजे एखाद्या गोष्टीला हास्यास्पद पुरावा देण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
त्या एक थियरी मांडतायत. ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत.

सुबोध खरे नवीन

In reply to by काळा पहाड

Magnetotherapy self help book. All you wanted to know about magneto therapy. हे यांचे बरेच दुवे आहेत जे छद्म शास्त्रीय म्हणता येतील. शिवाय फक्त ४० ते सुद्धा "महिला" विद्यार्थी त्यांनी निवडले आहेत. इतक्या कमी नमुन्यात नक्की निष्कर्ष काढणे कठीण आहे. शिवाय चुंबकीय क्षेत्रामुळे मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो हे अतिशयोक्त आहे. मेंदूला सदा सर्वकाळ एकाच तर्हेने रक्तपुरवठा होत राहतो हे सिद्ध झालेले आहे. https://en.wikipedia.org/wiki/Cerebral_autoregulation तुमच्या नावावर संशोधन असले पाहिजे या विद्यापीठाच्या पात्रतेसाठी निघणार्या ढीगभर पेपर सारखा असावा अशी शंका येते आहे.

उगा काहितरीच नवीन

कदाचित अनेक दुष्ट शक्ती या लेखातील सकारात्मक शक्ती नष्ट करण्याच्या हेतूने प्रतिसादातून हल्ले करतील. म्हणून प्रामाणिकपणे सांगतो. तुम्हाला पटलं तुम्ही अंगीकार करा. इथे लेख लिहीला त्याबद्दल धन्यवाद . हे वाचून ज्याला पाळायची इच्छा असेल ते पाळतील. तुम्ही उगाच दुष्ट शक्तिंना प्रतिवाद करू नका .

काळा पहाड नवीन

In reply to by उगा काहितरीच

बरोबर. प्रतिकार करण्याचं माझ्यासारख्या सकारात्मक शक्तींना मदत करणार्‍या दुष्ट शक्तीवर सोडा. तथाकथित रित्या पारंपारिक दुष्ट शक्ती सुद्धा माझ्या इतक्या खालच्या लेव्हलला जावू शकत नाहीत.

बोका-ए-आझम नवीन

हे मुद्दे आवडले. बाकीचे पटले नाहीत. उदाहरणार्थ सूर्याच्या कोवळ्या उन्हाचा जो संदर्भ दिला आहे तो. व्हिटॅमिन डी हा मुद्दा ही बरोबर आहे पण चुंबकीय क्षेत्राचा मुद्दा पटला नाही. पृथ्वीचे चुंबकीय उत्तर-दक्षिण ध्रुव हे भौगोलिक ध्रुवांच्या बरोबर उलटे आहेत. म्हणजे आपण जर भौगोलिक उत्तरेकडे डोकं केलं असेल तर ती चुंबकीय दक्षिण होईल आणि भौगोलिक दक्षिण ही चुंबकीय उत्तर होईल. मग जेव्हा उत्तरेला डोकं करुन झोपू नका असं सांगतात तेव्हा ती कोणती उत्तर? भौगोलिक की चुंबकीय? आणि झोप नीट न लावण्याचं आजच्या काळातलं एक कारण म्हणजे शारीरिक मेहनतीचा अभाव हे आहे. जर शारीरिक कष्ट असतील (मुळात किंवा मुद्दाम केलेले) तर माणसाला कुठल्याही दिशेला डोकं केलं तरी झोप लागायला हवी. एकंदरीत संमिश्र वाटला लेख.

काळा पहाड नवीन

In reply to by बोका-ए-आझम

पृथ्वीचे चुंबकीय उत्तर-दक्षिण ध्रुव हे भौगोलिक ध्रुवांच्या बरोबर उलटे आहेत. म्हणजे आपण जर भौगोलिक उत्तरेकडे डोकं केलं असेल तर ती चुंबकीय दक्षिण होईल आणि भौगोलिक दक्षिण ही चुंबकीय उत्तर होईल.
काहीही! earth

बोका-ए-आझम नवीन

In reply to by काळा पहाड

काहीही? कुठलीही चुंबकीय सुई ही दक्षिणोत्तर स्थिर राहते. आणि चुंबकाचे विरूद्ध ध्रुव आकर्षिले जातात. याचाच अर्थ चुंबकीय सुई जी उत्तर दिशा दाखवते आहे तिथे पृथ्वीचा चुंबकीय दक्षिण ध्रुव हवा आणि दक्षिण दिशेकडे चुंबकीय उत्तर ध्रुव हवा. नाहीतर होकायंत्राची सुई दक्षिणोत्तर स्थिर होण्याचं कारण काय?

काळा पहाड नवीन

In reply to by बोका-ए-आझम

बोका साहेब, तुम्ही पूर्वी म्हटलेलं वेगळं होतं. तुम्ही म्हणाला होता,
पृथ्वीचे चुंबकीय उत्तर-दक्षिण ध्रुव हे भौगोलिक ध्रुवांच्या बरोबर उलटे आहेत.
म्हणजे तुम्ही "मॅग्नेटीक पोल्स" हे "जिऑग्रॉफिक पोल्स" च्या विरुद्धार्थी आहेत असं म्हणाला होता. आणि ते तसं नाहीये. जर तुम्हाला फक्त "मॅग्नेटीक पोल्स" बद्दल बोलायचं होतं तर "जिऑग्रॉफिक पोल्स" मध्ये आणायचं काय कारण? आता तुम्ही दुसर्‍याच गोष्टीचं स्पष्टीकरण देताय. तेही बालिश. पोल्स उत्तर आणि दक्षिण तेच आहेत. म्हणजे उत्तरेला उत्तर पोल आणि दक्षिणेला दक्खनी पोलच आहे. होकायंत्राच्या सुईवर उत्तर पोल लिहीलंय म्हणून पृथ्वीचे पोल बदलायचे म्हणजे फारच झालं. त्या होकायंत्रावरची सुई "सांगतेय" की उत्तर पोल तिकडे आहे. कारण सुईचा दक्षिण पोल उत्त्र पोल कडे आकर्षित होतोय. होकायंत्राची सुई "तिचा" उत्तर पोल कुठे यावरून लिहिलेला नसतो, तर "पृथ्वीचा" उत्तर पोल कुठे आहे हे दाखवण्यासाठी लिहिलेला असतो. काय काहीही स्पष्टीकरण देताय राव!

बोका-ए-आझम नवीन

In reply to by काळा पहाड

होकायंत्राची सुई भौगोलिक उत्तर दिशाच दाखवते आणि दक्षिण दिशाही भौगोलिक दक्षिण दिशाच दाखवते. पण का त्याचं कारण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी निगडीत आहे. होकायंत्र जर उत्तर दिशा दाखवतंय तर त्याचा स्पष्ट अर्थ तिथे चुंबकाचा दक्षिण ध्रुव असला पाहिजे. Earth's magnetic field, also known as the geomagnetic field, is the magnetic field that extends from the Earth's interior out into space, where it meets the solar wind, a stream of charged particles emanating from the Sun. Its magnitude at the Earth's surface ranges from 25 to 65 microteslas (0.25 to 0.65 gauss).[3] Roughly speaking it is the field of a magnetic dipole currently tilted at an angle of about 10 degrees with respect to Earth's rotational axis, as if there were a bar magnet placed at that angle at the center of the Earth. The North geomagnetic pole, located near Greenland in the northern hemisphere, is actually the south pole of the Earth's magnetic field, and the South geomagnetic pole is the north pole.

चौकटराजा नवीन

विश्व अनंत आहे व त्यात प्रुथ्वी नावाचा एक गोलक आहे. अशा स्थितीत पूर्व पस्चिम इ दिशा फक्त तुलनेने स्थान कळावे म्हणून मानलेल्या आहेत. जसे इन्टर नॅशनल डेट लाईन . उद्या या लाईन वरून जर ९००० वर्शानंतरच्या लोकानी आपले पूर्वज किती महान होते असा निषकर्ष काढला तर तो जितका हास्यास्पद होईल तसेच आपल्या दिशांवरून आपल्या भल्या बुर्याचा आडाखा मांडणे आहे. बाकी खर्‍या वास्तुशास्त्रात हवामान , भूगर्भ या॑ दोन बाबीना अनन्यसाधारण महत्व आहे. माणसाने वापरायचे दार ७ फूट उंच का ? बेड साडेसहा फुटाचा का ? स्वयंपाक घरातील ओटा ३० इण्चच उंच का याची उत्तरे सोपी आहेत. त्यामागे कुणाचेही फार गाढे तत्वज्ञान वगैरे काही नाही.

काळा पहाड नवीन

In reply to by चौकटराजा

विश्व अनंत आहे
हो? नक्की का? कारण माझं विज्ञानातलं मर्यादित ज्ञान मला असं सांगतं की विश्व अनंत नाही. It is estimated that the diameter of the observable universe is about 28.5 gigaparsecs (93 billion light-years, 8.8×1026 metres or 5.5×1023 miles), putting the edge of the observable universe at about 46.5 billion light-years away. https://en.wikipedia.org/wiki/Observable_universe
अशा स्थितीत पूर्व पस्चिम इ दिशा फक्त तुलनेने स्थान कळावे म्हणून मानलेल्या आहेत. जसे इन्टर नॅशनल डेट लाईन . उद्या या लाईन वरून जर ९००० वर्शानंतरच्या लोकानी आपले पूर्वज किती महान होते असा निषकर्ष काढला तर तो जितका हास्यास्पद होईल तसेच आपल्या दिशांवरून आपल्या भल्या बुर्याचा आडाखा मांडणे आहे.
तुम्हाला विषय खरोखरच कळलेला आहे का? इथे दिशा शोधून काढल्याबद्दल बोलणं चाललेलं नाहीये. मॅग्नेटीक लाइन्स चा लोकांच्या तब्येतीवर काही परिणाम होतो असं लेखकाने म्हटलं आहे. त्याबद्दल बोलणं चाललेलं आहे.
बाकी खर्‍या वास्तुशास्त्रात हवामान , भूगर्भ या॑ दोन बाबीना अनन्यसाधारण महत्व आहे. माणसाने वापरायचे दार ७ फूट उंच का ? बेड साडेसहा फुटाचा का ? स्वयंपाक घरातील ओटा ३० इण्चच उंच का याची उत्तरे सोपी आहेत. त्यामागे कुणाचेही फार गाढे तत्वज्ञान वगैरे काही नाही.
हो ना. लेखकानं हे गाढं तत्वज्ञान आहे म्हटलेलं नाहीये. निरिक्षणामुळे आणि विचारांमुळे आपल्या पूर्वजांनी काही ठोकताळे ठरवले होते असं लेखक सांगतोय. त्यात तत्वज्ञान कुठे दिसलं तुम्हाला?

नाखु नवीन

वास्तुस्थीती आणि वस्तुस्थीती यांच्यात नेमकी गडबड झालेला लेख. तरीही प्रयत्न चांगला आहे असे म्हणावे लागेल. पुर्वाभिमुखी घरातला उत्तरदायी नाखु

गवि नवीन

पूर्ण भारताचं हवामान एकच आहे. पूर्ण भारतात वारे पाऊस यांची दिशा एकच आहे अशी अनेक गृहीतकं आणि पूर्वेकडे तोंड करुन बसणे आणि पूर्वेकडे बसणे या सूर्यप्रकाश मिळवण्याबाबतच्या कन्सेप्टस फार मिसळल्या गेल्या आहेत. घराच्या आतच अभ्यासाला बसलं तर पूर्व काय आणि आणखी दिशा काय. शिवाय अभ्यास फक्त सकाळीच केला जातो काय? पूर्वी तर दिवसभर लोक उघड्यावर श्रम करायचे, मुलं बाहेर खेळायची.. त्यावेळी या खास ठिकाणी बसवून डी विटॅमिन मिळवण्याची निकड होती का? खूपच जनरलायझेशन आहे.

सुनील नवीन

आप्ले पूर्वज कित्ती कित्ती थोर्थोर नै? सग्ळ्सग्ळं म्हैत होतं त्यांना!!

मराठी कथालेखक नवीन

आपल्याला माहितीच आहे सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो. त्याचा हा प्रवास दक्षिण दिशेकडून होतो. त्यामुळे सूर्याचा जास्तीतजास्त कालावधी दक्षिण दिशेला असतो. साहजिकच ह्या दिशेला असलेल्या खोल्या तापून निघतात
काल जास्त टंकायचा कंटाळा आला होता, म्हणून याबद्दल आज लिहित आहे. अहो सुर्याचा प्रवास दक्षिणेकडून होतो ते फक्त दक्षिणायन चालू असताना म्हणजे हिवाळ्यात , या काळात जर खोली तापत असेल तर त्यात वाईट काय ? उन्हाळ्यात म्हणजे सुर्याचे उत्तरायण चालू असताना उत्तरेकडील खोली अधिक तापेल. त्याअर्थाने पाहिले तर झोपायची खोली पुर्वेला असणे जास्त चांगले म्हणजे ती दुपारनंतर तापणार नाही आणि सकाळी खोलीत उजेड आलाकी आपसूकच लवकर उठणेही होईल (पण रात्रपाळीकरुन दिवसा झोप घेणार्‍यास थोडे कठीण होईल).
ह्या दिशेला असलेल्या खोल्या वर्षातून एकदाच कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी गेस्ट रूम म्हणून किंवा स्टोर रूम म्हणून वापरल्या तर उत्तम.
अशी चैन परवडेल का आजच्या काळात (खासकरुन शहरी मध्यमवर्गाला) ?

मार्मिक गोडसे नवीन

उन्हाळ्यात म्हणजे सुर्याचे उत्तरायण चालू असताना उत्तरेकडील खोली अधिक तापेल
भारत विषुववृत्ताच्या उत्तरेला असल्याने सुर्याचे उत्तरायण चालू असताना तो पुर्णपणे भारताच्या उत्तरेकडून प्रवास करत नाही. त्यामुळे उत्तरायण चालू असताना फेब्रु ते मे पर्यंत दक्षिणेकडील खोली अधिक तापेल. Simulator ने समजायला सोपे जाईल. https://www.learner.org/jnorth/tm/mclass/season_simulator.html

मराठी कथालेखक नवीन

In reply to by मार्मिक गोडसे

तुमचा सिम्युलेटर् माझ्या Proxy वर उघडत नाही. पण हात कंगन को आरसी क्या. जरा सकळी वा सायंकाळी बाहेर पडून सावल्या बघा (सोबत होकायंत्र ठेवा हवं तर) आणी मला सांगा

विजय पुरोहित नवीन

In reply to by मार्मिक गोडसे

भारत विषुववृत्ताच्या उत्तरेला असल्याने सुर्याचे उत्तरायण चालू असताना तो पुर्णपणे भारताच्या उत्तरेकडून प्रवास करत नाही. +१११

मराठी कथालेखक नवीन

In reply to by विजय पुरोहित

चला निदान महाराष्ट्रापुरते बोलू, कर्कवृत्त महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे.

मार्मिक गोडसे नवीन

जरा सकळी वा सायंकाळी बाहेर पडून सावल्या बघा (सोबत होकायंत्र ठेवा हवं तर) आणी मला सांगा
माझ्या घराचे तोंड उत्तरेला आहे. दुपारचे १२.३० झाले आहेत, घराच्या दक्षिणेच्या व पुर्वेकडच्या भिंतीवर ऊन पडलेले आहे. उत्तरेकडील भित सावलीत आहे(मधे अडथळा नाही).

मराठी कथालेखक नवीन

In reply to by मार्मिक गोडसे

कोणत्या राज्यात राहता ? माझ्या उत्तरेकडील (मी पुण्यात रहातो) बाल्कनीत आता उन येते, झाडांना उन मिळू लागले, हिवाळ्यात अजिबात मिळत नव्हते.

मार्मिक गोडसे नवीन

होकायंत्र असेल तर रस्त्यावरील एखाद्या खांबाची सावली बघा कोणत्या दिशेला पडली आहे. अद्यापही सावली ईशान्येकडे आहे. पुर्व दिशा क्रॉस केलेली नाही. जशी आपल्याकडे दक्षिणायनात सावली ईशान्येकडे दिसते तशी पुर्ण उत्तरायणात खांबाची सावली आग्नेय दिशेला दिसायला हवी हे फक्त विषुववृतीय प्रदेशातच शक्य आहे, कदाचीत पुणे तेथे सरकले असेल.

मराठी कथालेखक नवीन

In reply to by मार्मिक गोडसे

कदाचीत पुणे तेथे सरकले असेल
शक्य आहे, (तुम्ही कोणत्या शहरातले ते सांगितलं नाहीत.) प्रत्येक शहरासाठी अक्षांशाप्रमाणे सुर्या उत्तरेला असण्याचा निश्चितदिवस वेगळा असेल. पण तरी २१ जून ला जेव्हा सुर्य सर्वाधिक उत्तरेला असेल तेव्हा तसेच त्याच्या थोडे दिवस आधी व नंतरही पुर्ण महाराष्ट्रासाठी सुर्य नक्कीच उत्तरेला असेल. image

चौकटराजा नवीन

3 डी स्टूडियो मैक्स मधे अक्षान्श व रेखांश व् तारीख दिल्यास सावली कशी पडेल हे आर्किटेक्ट ना दिसण्याची सोय आहे.

मार्मिक गोडसे नवीन

तुमच्याकडे Simulator चालत नसल्यामुळे तुमचा गोंधळ होतोय. त्यात सध्या आपण जेथे रहातो तेथे ठरावीक दिवशी सुर्यकिरणांचा कोण कसा असेल ते बघता येते.

सुबोध खरे नवीन

साधी सरळ गोष्ट आहे. जेथे तुम्ही घर बांधणार आहात तेथे अगोदरच असलेले घर पाहून सावली उन्हाळ्यात कुठे आहे आणि हिवाळ्यात कुठे असते हे पाहायला कोणतेही वैज्ञानिक ज्ञान लागत नाही.त्याप्रमाणे आपल्या झोपण्याची खोली किंवा स्वयाम्पाक्घर कुठे बांधायचे ते ठरवता येईल. साधे निरीक्षण पुरेसे आहे त्यात आपल्या पूर्वजांचे उदात्तीकरण करण्याची गरज कुठे पडते?

सुबोध खरे नवीन

मुंबईत घर घेताना( विकत किंवा भाड्याने) सर्वात वरचा मजला घेऊ नये कारण उन्हाळ्यात गरम होतं आणि पावसाळ्यात गळती होते. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. हे समजण्यासाठी फार मोठे वैज्ञानिक आडाखे लागत नाहीत.

गवि नवीन

In reply to by मराठी कथालेखक

तोच मजला सर्वात वर बांधण्याऐवजी पहिल्या आणि दुसर्या मजल्याच्या मधे घुसवून एकूण मजल्यांची संख्याही राखता येईल.. ;-)

नाखु नवीन

In reply to by गवि

वरचा मजला रिकामाच ठेवावा...... तथाकथीत विचारवंतांसारखा.
बाधल्याचे समाधान, वापरल्याचा पस्तावा नाही.
खुलासेदार नाखु सचिव अखिल मिपा "बघता काय वरचा मजला शोधा" संघटना.

सस्नेह नवीन

सध्या मी राहते त्या घरातील अनुभवलेली वस्तुस्थिती. १. उन्हाळ्यात उत्तरायण असते आणि उत्तरेकडील खोल्या कडक उन्हात तापलेल्या राहतात. २. दक्षिणेकडे असलेल्या खोल्यांच्या दक्षिणेकडील खिडक्यांमधून नैऋत्य वाऱ्यांच्या थंड सुखद झुळुका आत्ताच्या उन्हाळ्याच्या दिवसात येतात. दक्षिणेकडेल दारातून तर उन्हाळ्यात संध्याकाळी अविरत थंड झुळुका येत असतात. ३. हिवाळ्यात सूर्य दक्षिणेकडे असतो आणि दक्षिणेकडील खोल्यावर दिवसभर उन्ह असते, त्या उबदार राहतात. पूर्वेकडे रिकामी जागा आहे तिचा सकाळी वॉशिंग साठी उपयोग होतो कारण स्वैपाकघराला लागून आहे. पण संध्याकाळी तिथे ना वारा ना उजेड. त्यामुळे काहीच वापर करता येत नाही. ४, पश्चिमेकडे रस्ता आहे व थोडी बाग. तिचा मात्र संध्याकाळी हवा खाण्यासाठी, उजेडात वाचनासाठी उपयोग होतो. ५. उत्तरेला उंच नारळी लावल्यापासून उन्हाळ्यात उत्तरेच्या कडक उन्हापासून बचाव होतो.