मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गच्ची

वडापाव · · जनातलं, मनातलं
घरी वायफाय सुरू झाल्यापासून गच्चीत जाणं कमी झालंय. दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा. तहान-भूक लागली, लघवी-परसाकडण्याची घाई आली, तरी तिथून पाय निघत नसे. घरून फोन यायचा, 'जेवलायेस का? ये खाली.' दहा मिनिटांत येतो सांगून आणखी अर्धा तास काढायचो. उन्हं मवाळ झाली की वर टाकीवर जाऊन बसावं. समोर नॅशनल पार्काच्या डोंगररांगांवरच्या ऊनामुळे बदलणा-या हिरव्या छटांची तुलना करत बसावी. कावळ्यांची शाळा भरते असं म्हणवत नाही. कावळ्यांचा भेंडी बाजार भरला की आपल्या जास्त जवळ येऊन काव काव करणा-या एकदोघांना उडवून लावावं. सगळे कावळे एकाच वेळी कसे उडतात आणि थोडंसं फिरून पुन्हा तिथेच किंवा समोरच्या झाडावर, इमारतीवर येऊन का बसतात यावर विचार करत बसावं. यातली लेडीज कोण हा सदैव छळणारा प्रश्न. मग थोड्या वेळानं सगळ्या मित्रांना फोनाफोनी करावी. कोणालाच वेळ नाही म्हटल्यावर अस्ताला जायच्या आधी सूर्याचं खाडीत पडणारं प्रतिबिंब पाहून मन सुखवावं. मग त्याच्याकडेच पाहात बसावं. पिवळ्याचा केशरी, केशरीचा लालबुंद गोळा आणि मग त्यावर ढगांची नाहीतर क्षितीजाची काळसर छटा येत जाऊन शेवटी तो दिसेनासा होईस्तोवर आपण मन रिकामं ठेवून नुसतं शांतपणे बघत बसावं. मधूनच झुळूक येऊन गार गार वाटावं नाहीतर डासांनी चावून हैराण करावं. या सगळ्यानंतर अंधारत चाललेल्या आकाशाखाली आणि प्रकाशत चाललेल्या शहराच्या मधोमध उंचावर बसून एखादी कविता स्फुरावी. ती दहाजणांना पाठवावी. अतिच चांगली झाली असेल तर कोणालाही न दाखवता कुठेतरी स्वतःपासूनच दडवून आतल्या फोल्डरमध्ये ठेवावी. मग भविष्याची चिंता करत बसावं. आयुष्यात काय करावं इथपासून अजून काय काय करावं इथपर्यंतच्या कल्पना रंगवाव्या. त्या कल्पनांनी प्रेरित होऊन एखादा निर्णय घ्यावा. तो निर्णय घेऊन आपलं आयुष्य कसं पालटून जाईल याची तिथेच कल्पना करत बसावं. मग समोरच्या मंदीरातल्या सात वाजता कर्कश्श आवाजात रेकून म्हटल्या जाणा-या आरतीचाही त्रास होईनासा व्हावा. पावसाळा असला तर वीज आणि पाऊस, हिवाळा असला तर ता-यांचं आकाश, आणि उन्हाळा असला तर मधूनच येणारी झुळूक यांनी कल्पनांमध्ये भर पाडावी. पाडत राहावी. शेवटी आता गच्चीतला आजचा कोटा संपत आल्याची जाणीव मनाला बोचत राहावी, आणि नेहमीसारखा 'आज गच्चीत तितकी मजा नाही आली. समाधान झालं नाही' असं मनातल्या मनात म्हणत त्या डुगडुगत्या शिड्या उतरून घरी यावं. आयुष्याच्या कामांत कितीही गुंतून गेलो, तरी असा दिवस येताजाता येतच राहतो. अस्वस्थ करतो. पण एकांतात घालवलेला सर्वोत्तम दिवस असतो तो. आता गच्चीत फिरकणं कमी झालेलं असलं, तरी रोजच हाक येत असते तिची. जाईन म्हणतो कधीतरी. - कौस्तुभ अनिल पेंढारकर

वाचन 5126 प्रतिक्रिया 0