Skip to main content

धूळ

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गाव तसं बरं वाटलं. हायवेलाच लागून होतं. गाव कसलं चार घरांची वस्तीच ती. डांबरीवरुन आत गेल्याशिवाय दिसली पण नसती. आडवळणाला एक देऊळपण होतं. तिथं चिटपाखरुपण नव्हतं. गावातल्या घराघरांत मिनमिनतं दिवं तेवढं दिसलं. बाकी सगळा अंधार. वेळ संध्याकाळची. सुर्य बुडून गेलेला. कानोसा घेत घेत देवळाकडं गेलो. देऊळ दगडी होतं. भरभक्कम. काळा पाषाण. अंधारात न्हाय म्हणलं तरी ते भेसूरच दिसत होतं. बाजूनं मोकळं मैदान आणि त्यापलिकडं घनदाट झाडी. बाकी वाऱ्यानं उडवलेली नुसती धूळ. गाभाऱ्यात एक पणती जळत होती. देव काय ओळखीचा नव्हता. हात जोडायची इच्छा कधीच मरुन गेलेली. आतल्या अज्ञात गुहेत जायचं काही धाडस झालं नाही. घटकाभर एका पायरीवर बसून राहिलो. पोटात भूक जाणवत होती. शिध्याच्या नावाखाली मिळालेली कांदाभजी झोळीतून काढली. पहिला घास भूताचा म्हणून लांब झाडीत फेकून द्यायचा होता. पण तो मीच खाल्ला. सोबत आणलेला काळूबाईचा निवद ही पोटभर खाल्ला. पाण्याच्या शोधात देवळाम्हागं गेलो तर तिथे एक हौद होता. पोट तुडुंब भरोस्तोर पाणी पिलो. हातपाय धुऊन डोकंही भिजवलं. मग मोकळ्या मैदानात जाऊन जरावेळ गारठलो. हिकडं तिकडं करुन पुन्हा पायरीवर येऊन बसलो. माचीस काढून वीडी शिलगावली. मग अंधारातल्या धुळीच्या वावटळी बराच वेळ बघत बसलो. डोळ्यावर झापड आली तसं कोपऱ्यातलं एक गोणपाट हाताला लागलं. मोकळ्या मैदानावर अंधरुन तसाच पडलो. चंद्र झोपला होता आकाशात. चित्कार करत घुबडे देवळाच्या आत जात होती, तर काही आतून बाहेर येत होती. या चिरेबंदी वाड्यात येतात, गातात ही पाखरे. मधूनच एक कोल्हेकुई ऐकू आली अन झोप अनावर झाली. सकाळी कसल्याशा आवाजानं जाग आली. चौकीदार बडबड करत होता. त्याची भाषा कळत नव्हती. पण तो तापला होता. मग लगबगीनं झोळी घेऊन बाहेर निघालो तर मध्येच अडवून काहीबाही बोलायला लागला. " तुज्या बापाचं हाय कारं देवाळ?" मी चिडून बोललो. मग थोडा नरमला. त्याला किती कळलं काय माहीत पण बाजूला सरत पडत्या आवाजात तो अजून काहीबाही बोलतच राहिला. मग मी काढता पाय घेत हायवेवर आलो. एखादा ट्रक थांबतोय का बघितलं. टपरीवर जाऊन एक वीडीपण शिलगावली. डोकं खाजवत मागं बघितलं तर चौकीदार अजूनही माझ्याकडंच बघत होता. तेवढ्यात एक ट्रक येऊन थांबला. मी पळतच जाऊन पकडला. डायवरनं हात हलवत विचारलं, कुठं जायचयं? मी वीस रुपये काढून त्याला दाखवलं. एवढ्यात जिथंवर जाता येईल तिथं सोड. क्लिनरच्या शिटवर त्यानं मला बसवलं. दरवाचा लावून घेत असताना सहजच देवळाकडं लक्ष गेलं. पाठीमागच्या ओबडधोबड घरांतून बाहेर पडणारा धूरही दिसला. हे गाव काय मानवलं नाही. एक रातीतच सोडावं लागलं. डोकं खाजवत मी अजून एक वीडी शिलगावली अन पुढच्या मुक्कामाच्या दिशेनं आगेकूच केलं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8568
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

In reply to by कविता१९७८

अध्येमध्ये एखाद दुसरे वाक्य आहे खेडवळ टाईपचे. ते आपसुकच येतं. त्यावर पण नियंत्रण ठेवावं लागेल असं दिसतयं.

क्रमशः आहे का? छान मांडलय. त्यात काही वादच् नाही पण शेवट समजला नाही.

लै दिसानी आलात. बर लिहिलय.

देव काय ओळखीचा नव्हता आणि चंद्र झोपला होता आकाशात. ही दोन्हीही वाक्य खास आवडली! कथाही चांगली आहे पण आधीच्या काही कथांसारखा घाव पडला नाही.

जव्हेरगंज, तुमची कथा म्हणजे मेजवानीच असते. ज्याम आवडली कथा. लक्षपूर्वक (तिसऱ्यांदा) वाचली तेव्हा कळली. आ.न., -गा.पै.

मालक झ्याक जमलीये परागंदा माणसाची गोष्ट

मला आवडली , थोडक्यात बरच काही धुळी सारखीच स्थिती असलेला माणूस , कुठून आला माहित नाही, कुठे जायचे माहित नाही , कुठे थांबायचे माहित नाही, काहीही अस्तित्व नाही, वारा नेईल तिकडे जायचे.

In reply to by स्पा

असं आहे होय! मी उगा देवळातला देव कंटाळून निघून जातो त्या माणसाबरोबर असा कै च्या कै अर्थ लावत होते :)

In reply to by रातराणी

मी सुद्धा देवाशी टोटल लावत बसलो होतो निनावी म्हणून... या दृष्टीने बघायला हवे हे नक्की लक्ष्यात आले नाही. आणि उगाच मस्त म्हणणे(कळण्या आधीच) रूचत नाही. पंखा ७

रहस्यफोड : कृपया वाचू नये. .... .... .... .... .... .... .... .... लोकहो, प्रस्तुत कथानायक स्वत:च भूत आहे. पहिला घास भुताचा म्हणून स्वत:च खाल्ला. आ.न., -गा.पै. .... .... .... .... .... .... .... .... रहस्यफोड समाप्त

In reply to by अभ्या..

तेच तर.... मुख्यपात्र भूत आहे हे किती ऑब्वियस आहे. रहस्य बिहस्य काय त्यात? भूतं टरक बिरक वीस रुपयाची नोट दाखवुन थांबवायला लागले तर झाला वाचकाच्या डॉक्याचा जुरासिक पार्क. जव्हेरभाऊ, कथा चांगली वातावरण चांगलं. सरळ आहे तरी गडबड वाटती. साध्या सरळ कथांची आजकाल अँटीसिपेशननी वाट लावली आहे.

काही कळली नाही भुताची म्हणावी का ? की आणखी काही गूढ ?
धुळी सारखीच स्थिती असलेला माणूस , कुठून आला माहित नाही, कुठे जायचे माहित नाही , कुठे थांबायचे माहित नाही, काहीही अस्तित्व नाही, वारा नेईल तिकडे जायचे.
असंच म्हणायचय का नक्की ? असं वाटतय की आपणास काहीतरी विशेष सांगायचय इतकं नक्की पण वाचून ते समजत नाहीये आणि न समजल्याची रुखरुख वाटत आहे

कमीत कमी व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ आणि जागा यांचा व्यवस्थित मेळ बसवून लिहिलेली कथा आवडली! कथेतील सजीव पात्रे १) स्वत: कथानायक २) वटवाघळे ३) रातकिडे ४) चौकीदार ५) ट्रक ड्रायव्हर कथेतील निर्जीव पात्रे १) मंदीरसदृश पडका दगडी चिरेबंदी वाडा २) मिनमिनतं दिवं ३) पाण्याचा हौद ४) धुळीची वावटळ ५) माचिस आणि विडी ६) कांदाभजी आणि काळुबाईचा निवद ७) गोणपाट ८) झोपलेला चंद्र (याला निर्जीव म्हणवत नाही!) ९) टपरी १०) वीसची नोट ११) ट्रक १२) गावातली ओबडधोबड घरे १३) क्लीनरची सीट आणि अशा रितीने जव्हेरभाऊंनी निर्जीव पात्रांना खेळवून ही मॅच जिंकलेली आहे. आणि हो, कथानायक झोपलेला ते मंदीर नव्हते! ;) धन्यवाद, Sandy

स्पावड्यानं अजूक अर्थ लावलाय मंडळी. त्याबद्दल आभार! बाकी लोकांना हे समजायला एवढं अवघड का गेलं कळेना. बाकी भुताबिताची किंवा देवाची काय भानगड नाही बरका या कथेत ! - आभारी आहे (कॉपी टू ऑल !)

In reply to by जव्हेरगंज

धन्यवाद! तेच म्हटलं, भूत आणि देव इतके ओब्वियस विषय नाही आहे. सगळं गमक शिर्षकात. व्वा!

नंबर एक.. जव्हेरभौंचा इजय असो..