✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धूळ

ज
जव्हेरगंज यांनी
Wed, 03/16/2016 - 22:52  ·  लेख
लेख
गाव तसं बरं वाटलं. हायवेलाच लागून होतं. गाव कसलं चार घरांची वस्तीच ती. डांबरीवरुन आत गेल्याशिवाय दिसली पण नसती. आडवळणाला एक देऊळपण होतं. तिथं चिटपाखरुपण नव्हतं. गावातल्या घराघरांत मिनमिनतं दिवं तेवढं दिसलं. बाकी सगळा अंधार. वेळ संध्याकाळची. सुर्य बुडून गेलेला. कानोसा घेत घेत देवळाकडं गेलो. देऊळ दगडी होतं. भरभक्कम. काळा पाषाण. अंधारात न्हाय म्हणलं तरी ते भेसूरच दिसत होतं. बाजूनं मोकळं मैदान आणि त्यापलिकडं घनदाट झाडी. बाकी वाऱ्यानं उडवलेली नुसती धूळ. गाभाऱ्यात एक पणती जळत होती. देव काय ओळखीचा नव्हता. हात जोडायची इच्छा कधीच मरुन गेलेली. आतल्या अज्ञात गुहेत जायचं काही धाडस झालं नाही. घटकाभर एका पायरीवर बसून राहिलो. पोटात भूक जाणवत होती. शिध्याच्या नावाखाली मिळालेली कांदाभजी झोळीतून काढली. पहिला घास भूताचा म्हणून लांब झाडीत फेकून द्यायचा होता. पण तो मीच खाल्ला. सोबत आणलेला काळूबाईचा निवद ही पोटभर खाल्ला. पाण्याच्या शोधात देवळाम्हागं गेलो तर तिथे एक हौद होता. पोट तुडुंब भरोस्तोर पाणी पिलो. हातपाय धुऊन डोकंही भिजवलं. मग मोकळ्या मैदानात जाऊन जरावेळ गारठलो. हिकडं तिकडं करुन पुन्हा पायरीवर येऊन बसलो. माचीस काढून वीडी शिलगावली. मग अंधारातल्या धुळीच्या वावटळी बराच वेळ बघत बसलो. डोळ्यावर झापड आली तसं कोपऱ्यातलं एक गोणपाट हाताला लागलं. मोकळ्या मैदानावर अंधरुन तसाच पडलो. चंद्र झोपला होता आकाशात. चित्कार करत घुबडे देवळाच्या आत जात होती, तर काही आतून बाहेर येत होती. या चिरेबंदी वाड्यात येतात, गातात ही पाखरे. मधूनच एक कोल्हेकुई ऐकू आली अन झोप अनावर झाली. सकाळी कसल्याशा आवाजानं जाग आली. चौकीदार बडबड करत होता. त्याची भाषा कळत नव्हती. पण तो तापला होता. मग लगबगीनं झोळी घेऊन बाहेर निघालो तर मध्येच अडवून काहीबाही बोलायला लागला. " तुज्या बापाचं हाय कारं देवाळ?" मी चिडून बोललो. मग थोडा नरमला. त्याला किती कळलं काय माहीत पण बाजूला सरत पडत्या आवाजात तो अजून काहीबाही बोलतच राहिला. मग मी काढता पाय घेत हायवेवर आलो. एखादा ट्रक थांबतोय का बघितलं. टपरीवर जाऊन एक वीडीपण शिलगावली. डोकं खाजवत मागं बघितलं तर चौकीदार अजूनही माझ्याकडंच बघत होता. तेवढ्यात एक ट्रक येऊन थांबला. मी पळतच जाऊन पकडला. डायवरनं हात हलवत विचारलं, कुठं जायचयं? मी वीस रुपये काढून त्याला दाखवलं. एवढ्यात जिथंवर जाता येईल तिथं सोड. क्लिनरच्या शिटवर त्यानं मला बसवलं. दरवाचा लावून घेत असताना सहजच देवळाकडं लक्ष गेलं. पाठीमागच्या ओबडधोबड घरांतून बाहेर पडणारा धूरही दिसला. हे गाव काय मानवलं नाही. एक रातीतच सोडावं लागलं. डोकं खाजवत मी अजून एक वीडी शिलगावली अन पुढच्या मुक्कामाच्या दिशेनं आगेकूच केलं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
8543 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

वा!

दमामि
Wed, 03/16/2016 - 23:06 नवीन
वा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद! धन्यवाद!!

जव्हेरगंज
Wed, 03/16/2016 - 23:20 नवीन
धन्यवाद! धन्यवाद!! बऱ्याच दिवसांनी दिसलात राजे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

भाषा सुरुवात व्यवस्थित मराठीत

कविता१९७८
Wed, 03/16/2016 - 23:09 नवीन
भाषा सुरुवात व्यवस्थित मराठीत करुन मधेच खेडवळ का लिहीलीये
  • Log in or register to post comments

अध्येमध्ये एखाद दुसरे वाक्य

जव्हेरगंज
Wed, 03/16/2016 - 23:18 नवीन
अध्येमध्ये एखाद दुसरे वाक्य आहे खेडवळ टाईपचे. ते आपसुकच येतं. त्यावर पण नियंत्रण ठेवावं लागेल असं दिसतयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

क्रमशः

आनंद कांबीकर
Wed, 03/16/2016 - 23:25 नवीन
क्रमशः आहे का? छान मांडलय. त्यात काही वादच् नाही पण शेवट समजला नाही.
  • Log in or register to post comments

जव्हेरभौ

बाबा योगिराज
Wed, 03/16/2016 - 23:25 नवीन
लै दिसानी आलात. बर लिहिलय.
  • Log in or register to post comments

देव काय ओळखीचा नव्हता आणि

बोका-ए-आझम
Wed, 03/16/2016 - 23:25 नवीन
देव काय ओळखीचा नव्हता आणि चंद्र झोपला होता आकाशात. ही दोन्हीही वाक्य खास आवडली! कथाही चांगली आहे पण आधीच्या काही कथांसारखा घाव पडला नाही.
  • Log in or register to post comments

आवडली कथा.

गामा पैलवान
गुरुवार, 03/17/2016 - 00:49 नवीन
जव्हेरगंज, तुमची कथा म्हणजे मेजवानीच असते. ज्याम आवडली कथा. लक्षपूर्वक (तिसऱ्यांदा) वाचली तेव्हा कळली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

चारदा वाचली पन कळली नाही.

तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 00:56 नवीन
चारदा वाचली पन कळली नाही. कुणी सांगल का गरिबाला समजावून? :(
  • Log in or register to post comments

झ्याक

महासंग्राम
गुरुवार, 03/17/2016 - 09:59 नवीन
मालक झ्याक जमलीये परागंदा माणसाची गोष्ट
  • Log in or register to post comments

मलाही नाही कळली! :(

रातराणी
गुरुवार, 03/17/2016 - 10:08 नवीन
मलाही नाही कळली! :(
  • Log in or register to post comments

मला आवडली , थोडक्यात बरच

स्पा
गुरुवार, 03/17/2016 - 10:11 नवीन
मला आवडली , थोडक्यात बरच काही धुळी सारखीच स्थिती असलेला माणूस , कुठून आला माहित नाही, कुठे जायचे माहित नाही , कुठे थांबायचे माहित नाही, काहीही अस्तित्व नाही, वारा नेईल तिकडे जायचे.
  • Log in or register to post comments

अहा !! अस हाय व्हय. आत्ता

राजाभाउ
गुरुवार, 03/17/2016 - 10:49 नवीन
अहा !! अस हाय व्हय. आत्ता कळलं. मस्त मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

जव्हेरभाऊ कंटेंट आवडला होता.

अभ्या..
गुरुवार, 03/17/2016 - 10:56 नवीन
जव्हेरभाऊ कंटेंट आवडला होता. अर्थ स्पावड्यामुळे लागला. जरा सरकारी मर्क्युरी हाय मी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अस्सं हाए व्हय

अर्धवटराव
गुरुवार, 03/17/2016 - 11:26 नवीन
आत्ता अर्थ लागला कथेचा. तरिच म्हटलं.. जव्हेरभौ नुसतच उकळतं पाणि कसं घेऊन आले.. च्या पत्ती नाइ कि साकर नाइ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

असं आहे होय! मी उगा देवळातला

रातराणी
गुरुवार, 03/17/2016 - 11:44 नवीन
असं आहे होय! मी उगा देवळातला देव कंटाळून निघून जातो त्या माणसाबरोबर असा कै च्या कै अर्थ लावत होते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+११

नाखु
गुरुवार, 03/17/2016 - 12:08 नवीन
मी सुद्धा देवाशी टोटल लावत बसलो होतो निनावी म्हणून... या दृष्टीने बघायला हवे हे नक्की लक्ष्यात आले नाही. आणि उगाच मस्त म्हणणे(कळण्या आधीच) रूचत नाही. पंखा ७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

छान...नेहमीप्रमाणेच! रच्याकने

उगा काहितरीच
गुरुवार, 03/17/2016 - 11:19 नवीन
छान...नेहमीप्रमाणेच! रच्याकने एक छोssटीशी पण सुंदर शॉर्टफिल्म होईल याच्यावर आणी तेही स्वस्तात. ;-)
  • Log in or register to post comments

रहस्यफोड : कृपया वाचू नये.

गामा पैलवान
गुरुवार, 03/17/2016 - 12:04 नवीन
रहस्यफोड : कृपया वाचू नये. .... .... .... .... .... .... .... .... लोकहो, प्रस्तुत कथानायक स्वत:च भूत आहे. पहिला घास भुताचा म्हणून स्वत:च खाल्ला. आ.न., -गा.पै. .... .... .... .... .... .... .... .... रहस्यफोड समाप्त
  • Log in or register to post comments

आयच्या गावात

अर्धवटराव
गुरुवार, 03/17/2016 - 12:08 नवीन
कसरत करणं बंद केलं पाहिजे राव. बुद्धी मठ्ठ होतेय असं वाटायला लागलय. हे रहस्य लक्षातच आलं नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

भुताला हिंडायला टरक कशाला

अभ्या..
गुरुवार, 03/17/2016 - 12:42 नवीन
भुताला हिंडायला टरक कशाला लागतीय? टरकीत बसायचं तर भूत कधी पैसे देतं व्हय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तेच तर.... मुख्यपात्र भूत आहे

तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 13:05 नवीन
तेच तर.... मुख्यपात्र भूत आहे हे किती ऑब्वियस आहे. रहस्य बिहस्य काय त्यात? भूतं टरक बिरक वीस रुपयाची नोट दाखवुन थांबवायला लागले तर झाला वाचकाच्या डॉक्याचा जुरासिक पार्क. जव्हेरभाऊ, कथा चांगली वातावरण चांगलं. सरळ आहे तरी गडबड वाटती. साध्या सरळ कथांची आजकाल अँटीसिपेशननी वाट लावली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

साभारः राजा गोसावी, खेळ सावल्यांचा

अर्धवटराव
Fri, 03/18/2016 - 03:35 नवीन
भूताला कुठुन आलाय एव्हढा कॉमनसेन्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

काही कळली नाही

मराठी कथालेखक
गुरुवार, 03/17/2016 - 12:22 नवीन
काही कळली नाही भुताची म्हणावी का ? की आणखी काही गूढ ?
धुळी सारखीच स्थिती असलेला माणूस , कुठून आला माहित नाही, कुठे जायचे माहित नाही , कुठे थांबायचे माहित नाही, काहीही अस्तित्व नाही, वारा नेईल तिकडे जायचे.
असंच म्हणायचय का नक्की ? असं वाटतय की आपणास काहीतरी विशेष सांगायचय इतकं नक्की पण वाचून ते समजत नाहीये आणि न समजल्याची रुखरुख वाटत आहे
  • Log in or register to post comments

जव्हेरभाउंचा नादच खुळा.

प्रचेतस
गुरुवार, 03/17/2016 - 12:41 नवीन
जव्हेरभाउंचा नादच खुळा.
  • Log in or register to post comments

कोई शक

नाखु
गुरुवार, 03/17/2016 - 14:57 नवीन
और होना भी नही चाहीये !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओ सांगा कि नक्की काय ते, उगा

राजाभाउ
गुरुवार, 03/17/2016 - 13:34 नवीन
ओ सांगा कि नक्की काय ते, उगा जीव टांगणीला.
  • Log in or register to post comments

छान कथा!

चांदणे संदीप
गुरुवार, 03/17/2016 - 14:55 नवीन
कमीत कमी व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ आणि जागा यांचा व्यवस्थित मेळ बसवून लिहिलेली कथा आवडली! कथेतील सजीव पात्रे १) स्वत: कथानायक २) वटवाघळे ३) रातकिडे ४) चौकीदार ५) ट्रक ड्रायव्हर कथेतील निर्जीव पात्रे १) मंदीरसदृश पडका दगडी चिरेबंदी वाडा २) मिनमिनतं दिवं ३) पाण्याचा हौद ४) धुळीची वावटळ ५) माचिस आणि विडी ६) कांदाभजी आणि काळुबाईचा निवद ७) गोणपाट ८) झोपलेला चंद्र (याला निर्जीव म्हणवत नाही!) ९) टपरी १०) वीसची नोट ११) ट्रक १२) गावातली ओबडधोबड घरे १३) क्लीनरची सीट आणि अशा रितीने जव्हेरभाऊंनी निर्जीव पात्रांना खेळवून ही मॅच जिंकलेली आहे. आणि हो, कथानायक झोपलेला ते मंदीर नव्हते! ;) धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments

जव्हेरभौनी न(व)कथा लिवायला

सस्नेह
गुरुवार, 03/17/2016 - 15:19 नवीन
जव्हेरभौनी न(व)कथा लिवायला सुरुवात केली वाट्टं...
  • Log in or register to post comments

कथा खरच काही मन्जे काहीच नाय

दिपुडी
गुरुवार, 03/17/2016 - 18:21 नवीन
कथा खरच काही मन्जे काहीच नाय कळली ब्बा
  • Log in or register to post comments

स्पावड्यानं अजूक अर्थ लावलाय

जव्हेरगंज
गुरुवार, 03/17/2016 - 18:51 नवीन
स्पावड्यानं अजूक अर्थ लावलाय मंडळी. त्याबद्दल आभार! बाकी लोकांना हे समजायला एवढं अवघड का गेलं कळेना. बाकी भुताबिताची किंवा देवाची काय भानगड नाही बरका या कथेत ! - आभारी आहे (कॉपी टू ऑल !)
  • Log in or register to post comments

हुश्श...

मराठी कथालेखक
गुरुवार, 03/17/2016 - 19:23 नवीन
धुरळा उडाला आणि खाली बसला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

धन्यवाद! तेच म्हटलं, भूत आणि

तर्राट जोकर
गुरुवार, 03/17/2016 - 19:30 नवीन
धन्यवाद! तेच म्हटलं, भूत आणि देव इतके ओब्वियस विषय नाही आहे. सगळं गमक शिर्षकात. व्वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

छान

अर्धवटराव
Fri, 03/18/2016 - 03:38 नवीन
म्हणजे तालीम बंद करायची गरज नाहि तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

स्पांडुरंगाचे आभार.कथा कळली

अजया
गुरुवार, 03/17/2016 - 19:26 नवीन
स्पांडुरंगाचे आभार.कथा कळली.मग परत वाचली.आता आवडली!
  • Log in or register to post comments

आवडेस

निशांत_खाडे
Mon, 03/21/2016 - 16:48 नवीन
नंबर एक.. जव्हेरभौंचा इजय असो..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा