मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्त्री-पुरुष समानता - एक चिंतन

सौन्दर्य · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
विसावे शतक हे इतर अनेक कारणांमुळे ओळखले जात असले तरी ‘स्त्री-पुरुष समानता' ह्या दृष्टीने त्याचे अनन्य साधारण महत्व आहे. ह्याच शतकात स्त्रिया पुरुषांसारखे वस्त्र परिधान करून पुरुषांच्या पावलांवर पाय ठेऊन, नंतर पायावर पाय ठेवून, पुढे खांद्याला खांदा लावून आणि कित्येक वेळा पुरुषांच्या डोक्यावर पाय ठेवून काम करू लागल्या. घरापासून बाजारापर्यंत, विनाकारणापासून राजकारणापर्यंत, दैन्यापासून सैन्यापर्यंत, चूली-मूलीपासून वैद्य-वकिलाच्या झुलीपर्यंत, शटल ट्रेनपासून स्पेस शटलपर्यंत, आज सर्वत्र स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे. शाळा, कॉलेज,विज्ञान, कला, सौंदर्य, उद्योग, राजकारण, अर्थकारण, युध्द जेथे पाहावे तेथे स्त्रीयाच स्त्रिया दिसताहेत. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धरी” हे वाक्य तिने अक्षरशः खरे करून दाखवले आहे. मात्र हे करताना तिने पुरुषवर्गावर मोठा अन्याय केला आहे, त्याला अज्ञानाच्या खाईत लोटले आहे, ‘स्त्री-पुरुष समानता’ ह्या तत्वाला काळीमा फासला आहे, पुरुषाला जिणे नकोसे करून सोडले आहे. कैकयीच्या रुपात अचूक वेळी वर मागून घेऊन तिने रामायण रचले, मत्स्यगंधेच्या रुपात भीष्म प्रतिज्ञा घ्यायला लावून तिने महाभारत घडविले. कुंतीच्या रुपात योग्य वेळी सोयीस्कर वर मागून महाभारताच्या युद्धाचा शेवट बदलला, आनंदीबाईच्या रुपात तिने ‘ध’ चा ‘मा' केला, मुमताज होऊन मरणोत्तर ताजमहाल बांधवून घेतला, प्रसंगी गॉडफादरला नमवून गॉडमदर बनली, सर्वत्र दरारा पसरवला, देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती वगैरे होऊन राजकारण केले, समाजकारण केले, अर्थकारण केले, अर्थाचा अनर्थ केला, काय वाट्टेल ते केले पण पुरुषाला समानता मात्र मिळवू दिली नाही. मात्र आजचा पुरुष जागृत झाला आहे, त्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव झाली आहे, त्याची चीड त्याच्या मनात धुमसत आहे. त्या अन्यायाविरुद्ध तो दंड थोपटून आज उभा राहू इच्छितो आहे. समानतेच्या ह्या युगातली ही असमानता त्याला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण हा अन्याय कोणी परक्यांनी केला नाही तर प्रत्यक्ष त्याच्या जन्मदात्या आईने, आजीने, बहिणीने, पत्नीने, मुलीने इत्यादी स्त्रियांनीच केला आहे. आज काळाची गरज म्हणून स्त्रिया घराबाहेर पडून स्व:कर्तृत्व गाजवीत आहेत, आणि चतुर पुरुषाने ह्या चालून आलेल्या संधीचे सोने करण्याचे ठरवले आहे. ह्या असमानतेचे जोखड दूर सारून, समानता निर्माण करण्याची ही सुवर्णसंधी त्याने हातची जाऊ दिली नाही. संसारासाठी नोकरी करतानाच त्याने स्त्रीच्या प्रांतात प्रवेश केला. ज्याप्रमाणे कचाने, विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांच्या आश्रमात प्रवेश मिळविला, त्याच प्रमाणे आद्य कचाने, सर्व प्रथम स्त्रीच्या अनभिषिक्त साम्राज्यात, तिच्याच स्वयंपाकघरात प्रवेश मिळविला. घरच्या सबलेला त्याने आधी टीव्हीवरील सास-बहुच्या सिरियल्सची भूल घातली. ही भूल यशस्वी होत आहे हे दिसल्यावर, तिला टीव्हीवरच्या स्त्रीच्याच इतर नातेसंबंधांच्या चक्रव्युहात गुंतवून टाकले, ‘सवत, विवाहबाह्य संबध’ सारख्या तिला अप्रिय असणाऱ्या गोष्टींची चटक लावून दिली, आणि आखिल पुरुष जातीचा, स्वयंपाकघराचा मार्ग खुला करून दिला. “अहो, जरा चहा ठेवता का ?” ह्या वरवर प्रेमळ आणि लाडिक दिसणार्या प्रश्नातील छुप्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून पुरुषाने, स्त्री-पुरुष समानतेच्या युगात पहिले पाउल ठेवले ते चहा बनवून. “मेला भात करणं का अवघड आहे ? तांदूळ धुवून, त्यात पाणी घालून गॅसवर शिजत ठेवला की झाला मेला भात तयार ? त्यात काय वेद बोलावे लागतात की काय ?” ह्या प्रश्नवजा आज्ञेला देखील त्याने शिरसावंद्य मानले, आणि समानतेची आणखी एक पायरी तो चढला. पुढे पोळ्या, भाज्या, आमट्या, कोशिंबिरी बनवणे त्याच्या डाव्या हातचा मळ ठरू लागले. आज घरोघरी काय चित्र दिसते ? घरची गृहिणी, संसार रथाचा भार उचलून संध्याकाळी थकून-भागून घरी येते आणि तिच्या हातात गरमागरम वाफाळत्या चहाचा प्याला दिला जातो, सोबत उपमा अथवा पोह्याची बशी दिली जाते. ती टीव्ही समोर स्थानापन्न होते न होते तोच भात आधणाला पडतो. पोळ्या लाटल्या जातात, तुरीच्या डाळीचे वरण, वांग्याची भाजी, कोशिंबीर, जमल्यास कांद्याच्या भज्या असा रात्रीच्या जेवणाचा बेत अमलात आणला जाऊ लागतो. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचा डबा देखील तयार होऊ लागतो. “नाहीतरी ह्यांना ऑफिसात मेलं काम ते काय असते ? जरा संसाराला हातभार लावला तर काही कमीपणा येतो का ?” असे काहीतरी सौ तिच्या मैत्रिणीशी अथवा माहेरच्यांशी, ‘ब्रेक के दौरान’, बोलताना पुरुषाच्या कानावर पडतं पण तो तिकडे कानाडोळा करतो. कारण त्याला स्त्री-पुरुष समानता हे ध्येय गाठायचे असते. हळूहळू तो स्वयंपाक शास्त्रात निपुण होतो. त्याचे दाखले, इतर स्त्रिया आपापल्या घरी देऊ लागतात. “माझ्या मैत्रिणीचा नवरा, डायरेक्टर आहे मोठ्ठ्या कंपनीत. तरी घरी आल्यावर संपूर्ण स्वयंपाक तो स्व:ताच बनवतो. त्याला जेवण बनवून खाऊ घालण्याचा छंदच आहे असे ती सांगत होती, नाहीतरी तुम्ही ? इकडची काडी तिकडे करायला नको ! मी म्हणून राब राब राबते आहे तुमच्या संसारात, दुसरी असती तर कधीच गेली असती सोडून. जरा कुठे करमणूक म्हणून टीव्ही बघायला बसावे तर आहेच तुमची मेली ती म्याच सुरु. काय करणार ? मेलं नशीबच फुटकं, दुसरे काय ?” हे ऐकावे लागलेला नवरा आपल्या पत्नीकडे पूर्वी ‘खाऊ की गिळू' नजरेने पाहायचा पण आज मात्र तो ही संधी न दवडता, खायचे आणि गिळायचे बनवायला सरळ स्वयंपाक घराकडे धाव घेतो. ह्याच्या पुढच्या पायऱ्या मात्र त्याने आपल्या अंगभूत हुशारीमुळे सहजच पादक्रांत केल्या. “एखाद दिवशी कामवाली आली नाही तर भांड्यांचा ढिगारा तसाच नव्हते ना मी ठेवंत, वन्सं सारखा ? घासून टाकायची ना मी लगेच ? मग पुरुषासारखे पुरुष असून, असे हात पाय गाळून काय बसलात ? “जो दुसऱ्यावारी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला” असे तुमच्याच तुकारामांनी म्हंटले आहे ना ? मग ? इनमिन चार जणांच्या संसाराची भांडी ती काय असायची ? माझी ही सिरीयल चालू आहे म्हणून नाहीतर कधीच फडशा पाडला असत्या त्या भांड्यांचा.” बायकोच्या तोंडची ही वाक्ये संपतात न संपतात तोच तो पहिले भांडे समोर ओढून घेतो. तीच कथा धुण्याची, केरकचरा काढण्याची आणि जमीन पुसण्याची. कुठ्ठे कुठ्ठे म्हणून तो कमी पडत नाही. इतकेच नव्हे तर बिछाने घालणे, चादरी, उश्यांची कव्हर्स बदलणे, फुलदाणीतील फुले बदलणे, नित्य नियमाने मनीप्लँटला पाणी घालणे, मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना गोष्टी सांगून झोपवणे, ह्या सर्व शास्त्रांत तो पारंगत झाला आहे. मुलांना झोपवताना अंगाई गीत म्हणण्याचा सराव अजून थोडा व्हायला हवा आहे, हे त्याला जाणवते कारण मुले त्याचे अंगाई गीत संपेपर्यंत विचित्र नजरेने त्याच्याकडे बघतच राहतात असे त्याने अनुभवले आहे. ही सर्व समानता साधताना, त्याने एकलव्याच्या कुशलतेने, सहनशीलतेने आणि मेहनतीने स्त्रीच्या सर्व विद्या शिकून घेतल्या आहेत. आजच्या आधुनिक नारीला ह्याची जाणीव झालेली दिसत नाही, आणि त्यातच त्याचे यश सामावले आहे. आजची आधुनिक नारी, ह्या समानतेच्या युगात, पुरुषांची कामे करतानाच आता, टीव्हीवरील सिरियल्स बघण्यात, शॉपिंग करण्यात, ब्युटीपार्लरमध्ये जाऊन आपले वय थोपवण्याच्या प्रयत्नात गुंतली आहे, आणि पुरुषाने आजतागायत फक्त तिच्या आणि फक्त तिच्याचसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात चंचुप्रवेश करून, प्राविण्य मिळविले आहे. आज एकही क्षेत्र असे उरले नाही की ज्यात पुरुषाने स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून आणि गरज पडल्यास तिला बाजूला सारून तिच्याच क्षेत्रात तिला नामोहरम करायचे बाकी ठेवले आहे. आजचा पुरुष हा, स्वयंपाक, धुणी-भांडी, केर-कचरा, जमीन पुसणे, पोराबाळांना आंघोळी घालणे, त्यांना भरवणे, निजवणे, त्यांचा अभ्यास घेणे इत्यादी सर्व शास्त्रांत निपुण झाला आहे. पण तरी देखील तो समाधानी नाही – “आता बाळंत कसे व्हायचे ?” ह्या एकाच चिंतेने त्याला पोखरून टाकले आहे.

वाचने 6261 वाचनखूण प्रतिक्रिया 26

उगा काहितरीच 23/12/2015 - 00:19
मस्त ! एकदम झक्कास लेख . रच्याकने आमची काही हरकत नाही बरं स्वयंपाक करायला . नोकरी वगैरे सोडून househusband बनायलाही एका पायावर तयार आहोत आम्ही . ;-)

अजया 23/12/2015 - 08:21
होईल बाळंतपण पण. चिंता करु नका.नाहीतर सांगितलेली इतर कामं नीट करणार नाहीत मेले पुरुष. मग ओरडून ती कामं करुन घेण्याचं काम परत पडणार स्त्रीवर ;)

स्रुजा 23/12/2015 - 08:29
तेवढं लग्न झाल्यावर सासरी जायचं पण जमतंय का बघा. नवीन समानतेच्या युगात चार दिवस सासर्‍याचे अशी सीरीयल काढु सॉरी सॉरी असा कार्यक्रम काढु, उगाच पुन्हा तीच मालिका का तो कार्यक्रम का नाही वरुन पुरुष मुक्ती सुरु होऊन परत कामं आमच्याच गळ्यात पडायची. ;)

अजया 23/12/2015 - 08:33
'होणार जावई मी त्या घरचा' सिरियलसाठी कास्टिंग सुरु पण झालंय.त्यातल्या जावयाची दीड वर्षानी डिलिव्हरी दाखवणारेत म्हणे.

मितान 23/12/2015 - 08:38
या विषयाला वाचा फोडून फार मोठे काम केले आहे तुम्ही ! बाकी अशा पीडित पुरुषांसाठी काम करणार्‍या संस्था, कार्यकर्त्यांची नावे वगेरे सांगा हो ! हल्ली असे अनेक पुरुष दिसतात न मग पोटात तुटतं अक्षरश :( बाकी अनेक अन्याय सोसूनही स्त्रीयांची बरोबरी करणार्‍या पुरुषांच्या मनोधैर्याला सलाम !!!

पिलीयन रायडर 23/12/2015 - 10:48
घरची गृहिणी, संसार रथाचा भार उचलून संध्याकाळी थकून-भागून घरी येते आणि तिच्या हातात गरमागरम वाफाळत्या चहाचा प्याला दिला जातो, सोबत उपमा अथवा पोह्याची बशी दिली जाते. ती टीव्ही समोर स्थानापन्न होते न होते तोच भात आधणाला पडतो. पोळ्या लाटल्या जातात, तुरीच्या डाळीचे वरण, वांग्याची भाजी, कोशिंबीर, जमल्यास कांद्याच्या भज्या असा रात्रीच्या जेवणाचा बेत अमलात आणला जाऊ लागतो. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचा डबा देखील तयार होऊ लागतो.
जर कुठे स्वर्ग असेल.. तर तो हाच आहे.. हाच आहे.. हाच आहे...!!! ह्या चार ओळींपाशीच कितीतरी वेळ मी घुटमळत आहे.. पुढचा लेख नंतर वाचीन..!

In reply to by Maharani

सौन्दर्य 23/12/2015 - 21:43
ह्या सत्यकथेला, परीकथा संबोधणे हा समस्त पुरुष वर्गाचा अपमान आहे.(ह.घ्या)

डॉ सुहास म्हात्रे 23/12/2015 - 22:13
“आता बाळंत कसे व्हायचे ?” ह्या एकाच चिंतेने त्याला पोखरून टाकले आहे. आँ, चिंता ??? कसली चिंता ???!!! हे तर फार अगोदर अनेक पुरुषांनी करून दाखवले आहे... १. गरोदर राहिलेला पहिला पुरुष २. 'Male pregnancy' figures reveal how 54 MEN gave birth in Australia in the past 12 months ३. इथे अनेक संदर्भ मिळतील : https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=UTF-8#q=man%20gives%20birth%20to%20baby

सौन्दर्य 29/12/2015 - 07:22
हल्लीच्या काळात, स्त्रीने पुरुषांच्या प्रत्येक क्षेत्रात नुसता शिरकावच केला आहे असे नसून त्यात प्राविण्य देखील मिळवले आहे. पण पुरुषाला मात्र स्त्रीची परंपरागत कामे करणे हे नेहेमीच कमीपणाचे वाटत आले आहे. एखादा पुरुष, घरी जर पत्नीला घरकामात मदत करत असेल तर त्याच्याकडे उपहासाने बघितले जाते, त्याची टर उडवली जाते. इतकेच कशाला, त्याची आई, बहिण व इतर स्त्रिया त्यावरून त्याची चेष्टाही करतात. पण असे करताना त्या एक गोष्ट विसरतात किंवा त्याकडे काणाडोळा करतात ती म्हणजे, स्त्रीने स्वीकारलेली पुरुषांची कामे, जसे संसार चालविण्यासाठी केलेली नोकरी, इतर पुरुष प्रधान कौशल्ये,उद्योगधंदे वगैरे. जमाना बदलत असताना प्रत्येकाने बदलणे अपेक्षित आहे. हे काम फक्त पुरुषाचे, हे काम फक्त स्त्रियांचे, असे वर्गीकरण करणे बरोबर नाही. अमेरिकेत सैन्यात आतापर्यंत आघाडीवर लढायला स्त्रियांना पाठवत नव्हते, पण ह्याच वर्षापासून स्त्रिया देखील युद्धात आघाडीवर पुरुषांच्या बरोबरीने लढणार आहेत. ह्याच गोष्टींकडे थोड्याश्या विनोदाने लक्ष वेधण्यासाठी हा लेख मी लिहिला आहे. सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

प्रदीप साळुंखे 29/12/2015 - 08:35
कमवणारी मुलगी मिळाली कि, आम्हीही 'गृहणा' बनायला तयार आहोत. बाकि ते शेवटचं काय जमणार नाही,उगा निसर्गाला आव्हान नको.

In reply to by प्रदीप साळुंखे

सुबोध खरे 29/12/2015 - 10:22
अहो ते माझा स्वप्न आहे. बायको भरपूर पैसे मिळवते आहे आणि मी नुसता आराम करतो आहे. आमच्या (चुलत)बहिणीने विचारले कि बायको पैसे मिळवत असेल तर तू घरकाम करणार का? मी म्हणालो जर बायको नवर्याला पोसत असेल तर दोन मोलकरणी नाही का ठेवु शकत? मी कशाला घरकाम करू? यावर माहेरी आणि सासरी गदारोळ का व्हावा ते मला समजत नाही.

In reply to by सुबोध खरे

मीही बायकोला असेच म्हणतो.... मैं ' गजानन माधुरी दिक्षित ' बनना चाहता हूअँ . बायका स्त्रीसत्ताक पद्धत का आणत नाहीत ?

In reply to by सुबोध खरे

प्रदीप साळुंखे 29/12/2015 - 11:31
कदाचित मोलकरणींबद्दल त्यांना भय असावे.

पिशी अबोली 29/12/2015 - 10:46
शपथ! एवढे गुणी आहेत हल्लीचे नवरे? चला, समानतेच्या युगात माझा हातभार लावायच्या तयारीला लागते. यंदाचा शेवटचा मुहूर्त कधी आहे म्हणे? आणि सध्या लेटेष्ट सिरियली कोणत्या चालू आहेत?

सौन्दर्य 29/12/2015 - 22:35
एकाहून एक मस्त प्रतिसाद.