Skip to main content

माझ्या मराठी मातीत

लेखक सायकलस्वार यांनी शनिवार, 31/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
- या कवितेची प्रेरणा विशाल कुलकर्णी यांच्या 'माझ्या सोलापुरी मातीत' या कवितेवरून मिळाली, त्याबद्दल त्यांचे, आणि त्यांनी ज्यांच्या कवितेवरून प्रेरणा घेतली(!) त्या बोरकरांचेही आभार ;) ******* माझ्या मराठी मातीत पडे छाया आभाळाची दरी-खोर्‍यांतून जाती संथ पावले काळाची माझ्या मराठी मातीत येते गाज सागराची गंध वाहे मोहराचा हवा खारी आगराची माझ्या मराठी मातीत वाहे शांतरस साचा समाधिस्थ आहे तीत कुणी पोर संन्याशाचा माझ्या मराठी मातीत रंग दूर्वांनाही लाल रक्त सांडलेले इथे पावनखिंडीत काल माझ्या मराठी मातीला नाद टाळ-मृदंगाचा देई विश्वाला अवघ्या वर पसायदानाचा माझ्या मराठी मातीत ऐका स्वर जुने येती देती निरोप प्रियेला 'जातो गं पानिपती!...' माझ्या मराठी मातीत थकून ओढिता जाते 'अरे संसार संसार' एक ग्रामकन्या गाते माझ्या मराठी मातीत उभे रायरी-पन्हाळा घेती टक्कर मेघांशी आठवित शिवबाला माझ्या मराठी मातीत ऐशी गरिमा भक्तीची देव भक्ता भेटी धावे वीट सोडून पायीची
लेखनविषय:

वाचने 3124
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

पण ही कविता "माझ्या गोव्याच्या भूमीत" वर आधारलेली किंवा तिचे विडंबन अशी न राहता स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करू शकेल आणि तशी व्हायला हवी असे मला वाटते! त्यातच या कवितेचा आणि महाराष्ट्राचा गौरव आहे! महाराष्ट्रचरणी एक उत्तम काव्य वाहिल्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन! ____/\____ Sandy

In reply to by चांदणे संदीप

+1

In reply to by चांदणे संदीप

धन्यवाद संदीप चांदणे, ही कविता स्वतंत्रच आहे पण कवितेची कल्पना त्या कवितेवरून सुचली होती एवढंच नमूद केलं.
महाराष्ट्रचरणी एक उत्तम काव्य वाहिल्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन!
कसचं कसचं!

In reply to by चांदणे संदीप

पूर्णतः सहमत!

माझ्या मराठी मातीत ऐशी गरिमा भक्तीची देव भक्ता भेटी धावे वीट सोडून पायीची
हे अप्रतिम!

समाधिस्थ आहे तीत कुणी पोर संन्याशाचा..... हम्म..... क्लेष.. रचना सुरेख.

केवळ अप्रतिम! अतिशय सुरेख कविता. एक एक कडवे पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतेय.

सहमत एक प्रेरणा सोडले तर एक स्वतंत्र आणि स्व तंत्र ही काव्य... सायकलस्वार जोरात !!! अभिनंदन

सायकलस्वार काय जोरात पळवलीये सायकल. सुंदर कविता. फार आवडली.

छान आहे कविता. मस्त.