माझ्या मराठी मातीत
लेखनविषय (Tags)
- या कवितेची प्रेरणा विशाल कुलकर्णी यांच्या 'माझ्या सोलापुरी मातीत' या कवितेवरून मिळाली, त्याबद्दल त्यांचे, आणि त्यांनी ज्यांच्या कवितेवरून प्रेरणा घेतली(!) त्या बोरकरांचेही आभार ;)
*******
माझ्या मराठी मातीत
पडे छाया आभाळाची
दरी-खोर्यांतून जाती
संथ पावले काळाची
माझ्या मराठी मातीत
येते गाज सागराची
गंध वाहे मोहराचा
हवा खारी आगराची
माझ्या मराठी मातीत
वाहे शांतरस साचा
समाधिस्थ आहे तीत
कुणी पोर संन्याशाचा
माझ्या मराठी मातीत
रंग दूर्वांनाही लाल
रक्त सांडलेले इथे
पावनखिंडीत काल
माझ्या मराठी मातीला
नाद टाळ-मृदंगाचा
देई विश्वाला अवघ्या
वर पसायदानाचा
माझ्या मराठी मातीत
ऐका स्वर जुने येती
देती निरोप प्रियेला
'जातो गं पानिपती!...'
माझ्या मराठी मातीत
थकून ओढिता जाते
'अरे संसार संसार'
एक ग्रामकन्या गाते
माझ्या मराठी मातीत
उभे रायरी-पन्हाळा
घेती टक्कर मेघांशी
आठवित शिवबाला
माझ्या मराठी मातीत
ऐशी गरिमा भक्तीची
देव भक्ता भेटी धावे
वीट सोडून पायीची
प्रतिक्रिया
व्वा
छान कविता!
वा!
+1
+2. तंतोतंत!
धन्यवाद संदीप चांदणे,
+१००
माझ्या मराठी मातीत
समाधिस्थ आहे तीत
सुंदर कविता.
केवळ अप्रतिम!
तंतोतंत
वा! क्या बात! एक स्वतंत्र अन्
सायकलस्वार
सुंदर
सुरेक्ख्ख कविता .... छानच....
खूप सुंदर कविता! _/\_
सर्व प्रतिसादकांचे घाऊक