Skip to main content

कोकणातला उन्हाळा.

श्रीकृष्ण सामंत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
"त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता." कोकणातला पावसाळा जसा मला आवडतो तसा कोकणातला उन्हाळापण आवडतो.उन्हाळ्यातला तो ताज्या हवेचा थंड वारा,फुलझाडांच्या आणि मोहर आलेल्या आंब्याच्या पानामधून, जेव्हा घाईगर्दीने शिरून बरोबर फुलांचा आणि आंबेमोहराचा सुगंध दरवळत आपल्या नाकावर येऊन आदळतो आणि सोनचाफ्यासारख्या उंचच उंच वाढणार्‍या झाडावरच्या चाफ्याच्या फुलांच्या पाकळ्या हळुवार जमीनीवर पसरवतो किंवा पारिजातकाच्या फुलांचा सडा झाडाच्याच खाली घालतो, तेव्हा अनुभवलेला एखादा बहारदार दिवस आठवून मला त्या वातावरणात परत जावं कसं वाटतं. निरभ्र आकाशातला एखादा पांढरा ढग सूर्याला अडवीत असताना काही सोनेरी किरणं जेव्हा आकाशातून खाली येतात तेव्हाचं वातावरण आठवून मला त्या वातावरणात परत जावं कसं वाटतं. पावसाळा फारसा दूर नसल्याने,कधी कधी वळवाच्या पावसाचं वातावरण निर्माण करून काळोख्या रात्री, अतिशय कोरड्या हवेमुळे दोन ढगात वीजेची चकमक होत असते. अशावेळी एखाद दूसर्‍या काळ्या ढगातून, बाहेर परसात खुर्च्या टाकून बसलेलं असताना, दोन चार पावसाचे थेंब अंगावर झिडपले जातात त्या वातावरणाची मला फार मजा यायची. उन्हाळ्याच्या दिवसात शाळेला सुट्टी असायची.झोप काढायला भरपूर वेळ मिळायचा.शिवाय सुट्टीत मजा करण्यासाठी बरेचसे बेत आखलेले असायचे. आदल्या दिवशी बाजारातून आणलेले रंगीबेरंगी पण काजूच्या बी-सकट आणलेले बोंडू कापून त्याची तिखट करमट खाऊन झाल्यावर रात्रीच्या काळोखात, परसातल्या तीन दगडावर पाण्याचा हंडा ठेवून सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी बनवलेल्या चुलीतल्या उरलेल्या लाकडाच्या कोळशात, ह्या काजूच्या बिया भाजून,नंतर त्या फोडून आतला काजूगर काढून भावंडाबरोबर खायला मजा यायची. उन्हाळातल्या दिवसात एखाद दिवशी खूपच उष्मा व्हायचा. अशावेळी आम्ही सर्व भावंडं,गावातल्या सखल भागात वहाणार्‍या ओहळात पोहायला जायचो.मोत्याला न्यायला विसरायचो नाही.कारण ओहळा जवळच्या वडाच्या झाडाखाली काढून ठेवलेल्या आमच्या कपड्यांचं राखण तो करायचा.ओहळात बरोबर वडाच्या झाडाच्या खालच्या भागात ओहळ जरा खोल होता.दोन पुरूष खोल खड्डा असावा.विहीरी सारख्या खोल असलेल्या त्या ओहळाच्या जागे पासून आम्ही दूर पोहायचो. त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता.घोडग्यांचा दत्तू त्या खड्ड्यात पोहायला गेला आणि त्याला सुनेच्या भुताने आत खेचल्याने तो त्यात बडून मेला. त्याचं प्रेत दुसर्‍या दिवशी मिळालं. कोकणात भुता-खेताच्या गोष्टींना मिणमिणत्या दिव्यात,असल्या गोष्टी आजींकडून ऐकताना, उत येतो असं आम्हाला आमची आई सांगायची. सकाळीच आम्ही सर्व भावंडं बाजारात जायचो.लाल,हिरवे आणि सफेद रंगाचे रसाने पुष्ट असलेले नुकतेच शेतातून पानासकट काढून आणलेले उस विकत मिळायचे.ते घरी आणून गाठी,गाठी जवळ कोयत्याने कापून उभे चिरून त्याची चिवट साल काढून टाकून लहान लहान करवे करून चावून चावून खायचो. माझी मोठी भावंडं स्वतःच्या दातानेच उसाची साल काढून दातानेच करवे तोडून खायचे.आम्हाला असं तुम्ही करू नका म्हणून सांगायचे.कारण म्हणे आमचे दात अजून दुधाचे दात आहेत. एकदा मी त्यांचं म्हणणं न जुमानता माझ्या दाताने उसाची साल काढण्याचा प्रयत्न केला.मला आठवतं मी माझा खालचा दात केव्हा गमावून बसलो ते कळलंच नाही.कारण दात पडल्यावर म्हणावं तसं रक्त काही आलं नाही.कदाचीत उसाच्या करव्याला चावताना आणि रस गिळताना रसाबरोबरच तो दात पोटात गेला असावा. सकाळी उठल्यावर दंतमंजन मशेरी दाताला चोळताना गायब झालेला दात मझ्या लक्षात आला असावा. कधी कधी आम्ही संध्याकाळी कॅम्पात फिरायला जायचो.बाबल्याच्या हाटेलातलं दूध-कोल्ड्रींग प्यायला आमची चूरस लागायची.थंड दुधात आईसक्रीम टाकून त्यावर साखरेचं सुवासीक रंगीबेरंगी पाणी शिंपडून केलेलं हे दुध-कोल्ड्रींग प्यायला मस्त लागायचं.मुंबईत अशाच ड्रींकमधे सब्जाच्या बिया टाकून विकत असलेल्या ड्रींकला फलुदा म्हणतात हे आम्हाला नंतर कळलं.कोकणातल्या उन्हाळ्याच्या दिवसात असलं ड्रींक प्यायला मिळत असल्याने उन्हाळा हवा हवासा वाटायचा.इतक्या लांब कॅम्पात जायला न मिळाल्यास,बाजारातून आईसफ्रूट, बर्फाचा गोळा म्हणजेच पॉपसीकल आणून आम्ही सर्व भावंडं ते चोखून-चाटून खाण्यात आनंद मानायचो. मला आठवतं,अशावेळी मी किती चोखंदळ असायचो.मला समजत नसायचं की,काही गोष्टी दिसतात त्यापेक्षा जास्त महत्वाच्या असतात.आमच्या आजोबांनी मला शिकवलं होतं की,लहानसहान गोष्टीतच मन रमवून जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घ्यावा.उन्हाळ्यात गावात आनंद-मेळा भरायचा. आमचे आजोबा आम्हाला पाळी पाळीने जवळ घेऊन फिरत्या उंच चक्रात चक्कर मारून आणायचे. अशावेळी उन्हाळा आम्हाला सर्वात जास्त आवडायचा.तसं पाहिलंत तर प्रत्येक ऋतू आपआपल्यापरीने आवडण्यासारखाच असतो.पण उन्हाळ्यातली मजा निराळीच.पावसाळ्यात खेळायला मिळायचं नाही. उन्हाळ्यात पोहायला मिळायचं.जीवनातला प्रत्येक उन्हाळा आठवणीने इतका समृद्ध होत असतो की पाठीमागे कसलाच खेद उरलेला नसतो. एखाद्या दिवशी मागे वळून सर्व आठवणी ताज्या करून पहाताना,आपल्याच जवळच्या माणसासमोर लज्जा येण्यासारखा एखादा वेडपटपणा केल्याची घटना किंवा एखाद्या भावंडाबरोबर मस्करी करीत असताना त्याची परिणीती कुस्करी होण्यात व्हावी अशी घटना किंवा आजोबांबरोबर सर्वानी बंदरावर जाऊन त्या गरम गरम वाळूत उभं राहून स्वच्छ निळ्या निरभ्र आकाशाकडे पाहून गडद निळ्या समुद्रात सूर्याचं लालबूंद बिंब बुडताना पहातानाची ती घटना,लक्षात आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. वाईट असो किंवा चांगली असो प्रत्येक स्मृती गोड तशीच अनमोल असावी.प्रत्येक स्मृती खास आणि विशीष्ट असावी. कोकणातला प्रत्येक उन्हाळा,आठवणी देऊन गेला.त्या आठवणी उगाळून उगाळून तसंच काहीसं वाटतं. श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
बाबा योगिराज

बढ़िया है. येक लंभर लिव्लै.
08/10/2015 - 07:50 Permalink
अगम्य

खूप छान लिहिता तुम्ही. कितीतरी रम्य आठवणी साध्या आणि लहान गोष्टिन्शी निगडित असतात.
08/10/2015 - 08:00 Permalink
अभय म्हात्रे

जुन्या ८वनि ताज्या झाल्या.
08/10/2015 - 08:14 Permalink
सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

लेख आवडला. लिहीत रहा
संध्याकाळी कॅम्पात फिरायला जायचो
म्हणजे कुठे नक्की? वेंगुर्ल्यातच का?
08/10/2015 - 12:24 Permalink
अंतरा आनंद

अप्रतिम सुंदर . लहानपणी आत्याकडे घालवलेले माझेही कोकणातले दिवस आठवले. ते दुपारी व्हाळातले चमचमणारे मासे बघणं हा माखा आवडता उअद्योग होता आणि भर दुपारी तिथे जाउ नये म्हणून अश्या काहाण्यांसोबत ओरडा मिळायचा. (वहाळ) श्वास मुळे प्रसिद्ध झालेले भोगवे हे माझ्या आजीचे माहेर . तिथे गेले की माडांमधली थंड दुपार , गोडे रतांबे , समुद्राचा आवाज आणि हवेत भरुन राहेलेला खारट वास. अहा. फारशी धार्मिक नसले तरी कोकणातल्या देवळातले चाफा आणि जास्वंदीचा साधाच साज लेवून बसलेले देव फार फार आपले वाटतात. सगळ्या आठवणी तुमच्या लेखाने परत जाग्या केल्या.
09/10/2015 - 08:22 Permalink
श्रीकृष्ण सामंत

In reply to by अंतरा आनंद

थॅन्क्स अंतरा आपल्या वरील लिहिलेल्या गोष्टी वाचून माझ्याही आणखी आठवणी जागृत झाल्या
10/10/2015 - 06:33 Permalink
द-बाहुबली

एकदमं मस्त. फार आवडले. तुम्ही वाचकांच्या मनात कोकण प्रत्यक्ष उभा करता. ललित लेखन गांभिर्याने मनावर घ्या. धन्यवाद.
10/10/2015 - 16:17 Permalink
मोदक

आदल्या दिवशी बाजारातून आणलेले रंगीबेरंगी पण काजूच्या बी-सकट आणलेले बोंडू कापून त्याची तिखट करमट खाऊन झाल्यावर..
या करमटांची पाककृती आहे का? नक्की कोणता प्रकार आहे का?
10/10/2015 - 17:27 Permalink
श्रीकृष्ण सामंत

In reply to by मोदक

. असे, लाल,पिवळा,हिरवा,संत्री रंगाचे बोंडू, मिळतात.वरचा भाग फळाचा आणि खालचं बी, त्यात काजू असतो.बहुदा,इतर फळांच्या आत बी किंवा बिया असतात पण बोंडू त्याला अपवाद आहे.बोंडूचं बी फळाच्या बाहेर लटकट असतं.फळाला बोंडू म्हणतात आणि बीला काजू म्हणतात.बोंडू कापून (लहान लहान फोडी करून) झाल्यावर त्यावर थोडंसं मिठ आणि जरूरी वाटेल तेव्ह्डं तिखट टाकून,हे सर्व चांगलं मिक्स करून हे मिक्ष्चर थोडावेळ मुरूं द्यावं.यालाच बोंडूची करमट म्हणतात.
11/10/2015 - 06:48 Permalink
बोका-ए-आझम

TIFR आणि कोकण हे दोन्हीही विषय सारख्याच ताकदीने हाताळले आहेत सामंतसाहेब! मस्तच!
13/10/2015 - 13:40 Permalink