मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीगणेश लेखमाला ९ : माझी चित्तरकथा

अभ्या.. · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
.......................... वर्दळीच्या नव्या पेठेतली सकाळी ७.००ची वेळ. इंच इंच लढवणार्‍या दुकानदारांची स्टँडीज, मॅनिक्वीन बाहेर ठेवण्याची घाई. पाच मजली भव्य शोरूम. २० बाय ५ चा ग्लोसाईन. वजन अंदाजे ३५० किलो. त्यात ट्यूबलाईट्स. लहान जिन्यावरून तो नेता येत नाही, म्हणून बाहेरून चढवतोय. वरून सोडलेले दोर. पाळणा बांधून त्यावर उभे राहून ड्रिल करणारे कामगार. त्यांच्या कमरेला दोर बांधून धरलेला मी. दोर थोडा हलला की धस्स होतंय. बोर्ड हळूहळू जागेवर बसताना निम्म्याच्या वर मी कठड्यावरून बाहेर आहे. .......................... पाच लाख पॅम्पलेट्सची ऑर्डर. एकाच वेळी सोलापूर अन कोल्हापुरात पेपरमध्ये पडले पाहिजेत. वेळ २ दिवस फक्त. प्रिंटिंग व्हायलाच २ दिवस जातात. सोलापुरात पडतील हो, कोल्हापूरचे कसे काय? रात्री १२ला पेपर विक्रेत्याला गाठून त्याचे गठ्ठे पॉईंटवर पोहोचवा. लगेच गाडी कोल्हापूरच्या दिशेने. बरोबर ५ वाजता कोल्हापूरचे पेपरवाले पॅम्पलेट्स टाकतात. .......................... इलेक्शनचे काम. पैसे घ्यायला उमेदवाराने फार्म हाऊसवर बोलावलेले. गावाबाहेर ३० कि.मी.वर सुनसान एरियात. १०-१२ गनमन. तेवढीच दांडगी कुत्री. एखाद्याला टपकवून पुरला तरी खबर कळणार नाही. रोखीत पैसे घेऊन परत येईपर्यंत जिवाची शाश्वती नाही. .......................... असलो तर राजा असतो. नसले तर चहा प्यायलाही पैसे नसतात.. .......................... काय गरज आहे असले धंदे करायची? ११ ते ५ जॉब नाही मिळणार मला? महिन्याचा पगार काय नको वाटतो? रात्रंदिवस फोन वाजत असतो. एकदा घरातून बाहेर पडलो की यायची वेळ कधीच फिक्स नाही. का करतो मग मी हे सगळं? उत्तर एकच.. छंद. व्यवसायाचा छंद. छंदाचा व्यवसाय. .......................... मध्यमवर्गीयच मी. अगदी टिपिकल. वडील बँकेत, आई शाळेत. झालो असतो ना डॉक्टर इंजीनिअर, गेलाबाजार बँकेत तरी. पण नाही. नडली माझी चित्रकला. पूर्ण खानदानात चित्रकला मलाच कशी येते.... माहीत नाही. यात काही करीअर आहे... माहीत नव्हते..... बारावीपर्यंत रितीरिवाजाप्रमाणे शिक्षण झाले. रितीरिवाज म्हणजेच गणिताशी दुश्मनी करून अन इतिहासाची पुस्तके चितारून. नाही म्हणायला प्रत्येक चित्रकला स्पर्धेत शाळेचे नाव गाजण्याएवढी कला माझ्या अंगात होती. दै. सकाळची स्पर्धा असो की कामगार कल्याण केंद्राची. मी राज्यस्तरीय पहिला नंबर कधी सोडला नाही. एवढ्या एका गोष्टीसाठी मला अभ्यासातून सूट मिळायची. घरात कौतुक फक्त वडिलांना. चौथीत असताना मी आर्टिस्ट क्वालिटीचे पोस्टर कलर अन वॉटरप्रुफ इंक वापरलीय. आईच्या दृष्टीने माझा ऊपयोग फक्त दिवाळीत तुळशी वृंदावन रंगवायला किंवा रथसप्तमीला रथ काढून द्यायला. वडिलांच्या ओळखीच्या एकाने सांगितले की कमर्शिअल आर्ट कर. काय असते ते पण माहीत नव्हते. नेहमीच्या कॉलेजपेक्षा वेगळे कॉलेज असते अन तेथे फक्त चित्रेच काढायची असतात हा ईंटरेस्टिंग पार्ट होता. त्यावेळी दहावीनंतर फाऊंडेशनला अ‍ॅडमिशन मिळत असे. मग काय...दहावीनंतर मी लगेच चित्रकला महाविद्यालयासाठी बाहेर जाण्याचे ठरवले. घरच्यांनी ते मात्र ऐकले नाही. "आधी बारावी कर. तब्येत चांगली कर अन मगच जा" असा सल्ला मिळाला. बारावी नापास झाला तरी चालेल, अशीही सूट मिळाली. मग काय, बास्केटबॉल अन टेक्निकल एवढेच दोन वर्षे केले. घरातील आर्थिक स्थिती चढउताराची व्हायला अन मला फाऊंडेशनच्या कोर्ससाठी बाहेर पडायला गाठ पडली. फाऊंडेशन एक वर्षाचे. अगदी ओढगस्तीत पार पडले. सुरुवातीला भीती वाटायची. च्यायला सगळीच आर्टिस्ट पोरं. आपला कुठे निभाव लागावा. एकेकाचे कलर सेट अन ब्रशेस पाहून छाती दडपायची. पण टिकलो. टिच्चून काम केले. मराठवाड्यात पहिला आलो. मग म्हटले, आपले कोल्हापूर गाठावे. उपयोजित कलेची पदविका (पदवी अन पदविका कालावधी सेमच - ४ वर्षे फाऊंडेशननंतर आहे. दोन्हीला जीडी आर्टस म्हणत.) .......................... फाऊंडेशनचा स्वतंत्र कोर्स एक वर्षाचा असे. असाईनमेंटसही भर्पूर असत. ह्या मार्कावरच पुढची दिशा ठरे. सगळ्या शाळांतली चित्रकला चांगली असणारीच मुले वर्गात असल्याने कॉम्पीटिशन टफ वाटायची. ही भीती अगदी कमर्शिअल आर्टच्या प्रथम वर्षात कायम होती. कारण कोल्हापूरचा कलाप्रांतातला दबदबा. तिथला सगळ्या चित्रकला महाविद्यालयापेक्षा वेगळा अनुभव. पण सरावलो थोड्या दिवसात. वाटले होते त्यापेक्षा भरपूर विषय होते. अ‍ॅनॉटॉमी तर अगदी डॉक्टरांना शिकवत नसतील एवढी घटवून घेतली जाई. टायपोग्राफी, फॉन्टस अन स्केचेसच्या कागदांनी बॅगा भरायच्या. अ‍ॅडव्हर्टायझिंग आर्ट एन आयडीयाला ओएनएम चा ऑग्लिव्ही पुस्तकातून पिडायचा. जगातली सगळी गाजलेली न फसलेली कॅम्पेन्स, पिअर्स साबणाच्या गेल्या शतकातल्या अ‍ॅडपासून आजपर्यंतचा प्रवास एकताना भान हरपायचे. एकेक शब्दांचा काळजीपूर्वक केलेला उपयोग अन अभ्यास पाहून वाचनाची गोडी लागली. एखाद्या प्रॉडक्टचा यूएसपी (युनिक सेलींग पॉइन्ट) हेच सर्वस्व झाले. जगातील उत्तमोत्तम मॅगझीन्स, व्हिडिओज अन फोटोग्राफ यातून जाहिरातक्षेत्र म्हणजे ६५ वी कला का म्हणतात याचे भान आले. सेकंड इयरला असाईनमेंट्स शोकेसमध्ये लागू लागल्या. इतर मुलांकडून अन शिक्षकांकडून कौतुक चालू झाले. सेकंड इयरला परीक्षेला ऑप्शनल विषय निवडायचा असे. अ‍ॅडव्हरटाईझिंग, पब्लिक वेल्फेअर अन पब्लिकेशन. ऐन वेळी मी कुणी न निवडणारा पब्लिकेशन निवडला. टिच्चून काम केले. त्या वेळी डेडलाईन सांभाळून काम करायच्या माझ्या मर्यादांची मलाच जाणीव झाली. पहिल्यांदाच स्वतःच्या कलेविषयी आत्मविश्वास जाणवायला लागला. इतरांना वाटायचे - ५ वर्षे काय शिकवतात चित्रे काढायला? पण खरे सांगतो, ती ५ वर्षे पुरेशी वाटायची नाहीत. कॅलिग्राफी, टायपोग्राफी, अ‍ॅनॉटॉमी हे करत तीन वर्षे पार पडली. खर्च अगदी मेडिकल-इंजीनिअरिंगवाल्यांप्रमाणे नसायचा, पण तोसुद्धा जड व्हायचा. शिक्षण शुल्क तर अगदी नाममात्र म्हटल्याप्रमाणे. मिरजला मावशीकडे राहून रोज रेल्वेने कोल्हापूरचा जाण्या-येण्याचा पास काढून कॉलेज पूर्ण केले. शेवटच्या वर्षाची परीक्षा मुंबईला जे.जे.मध्ये. तिथे रहेजा, सोफिया अन अमरावतीची मुले परीक्षेला यायची. बांद्र्याच्या कलानगर जे.जे. हॉस्टेलमध्ये राहून एकदाची परीक्षा पार पडली. लगेच नोकरी मिळवायला इतर सहाध्यायींची धडपड सुरू झाली. आपापले पोर्टफोलिओ घेऊन अ‍ॅड एजन्स्यांची अन अ‍ॅनिमेशन हाउसेसची दारे ठोठावू लागली. काय जाणे, पण मला त्यात इंटरेस्ट वाटेना. सरळ गावी निघून आलो. .......................... गावी एक आठवडा तेवढा पिक्चर बघण्यात अन फिरण्यात घालवला. कॉलेजात असताना बाईक वगैरे वापरलेली, पण घरी बाईक देईनात. त्या काळात मला बाईक रेसिंगचा नाद लागलेला. गाड्या थोड्याशा मॉडीफाय करून द्यायची कामे करायचो. पैशाची गरज भासू लागली. शिकत असताना थोडी प्रिंटिंगची कामे केली होती, त्या अनुभवावर एक दिवस बाबांना म्हणालो, "मला ५० हजार हवेत." "कशाला?" "पीसी अन स्कॅनर, प्रिंटर घ्यायचाय. प्रिंटिंगची कामे चालू करतो." "त्याशिवाय होणारच नाहीत का? सध्या तर मी देऊ शकत नाही." "नाही होणार." "मग एक काम देतो तुला, सध्या बाहेरून करून घे. जमेल का?" एका बँकेच्या लोगोचे अन स्टेशनरीचे काम होते. काम भरपूर होते. बरीचशी आर्टवर्क हाताने केली. डीटीपीवाल्याकडे बसून उरलेली केली. जवळपास ३ महिने काम चालले. सगळे फिरणे बस आणि रिक्षाने, दरम्यान माझा जो होईल तो खर्च वडील देत. तीन महिन्यांनी बँकेचे बिल मिळाले. ७८ हजाराचे होते, डीटीपीवाल्याचे पैसे तेव्हाच दिले. उरलेली रक्कम देताना वडिलांनी तोपर्यंत मला खर्चाला जेवढे पैसे दिले, त्याचे व्हाऊचर बनवून ठेवले होते. ते वजा करून उरलेले १४ हजार माझ्या हातात आले. "आता मला सांग, १४ हजार कमवायला काय करावे लागते? किती वेळ लागतो?" उत्तर मला माहीत झाले होते. "मग तुला एकरकमी ५० हजार कसे द्यायचे?" आता तेही मला नको होते. वडिलांनी दिलेल्या धड्यापेक्षा मौल्यवान गोष्ट मला कळली होती. मला स्वतःला पैसे कमवता येतात. निदान एका पद्धतीने तरी. .......................... अचानक मला एका अ‍ॅनिमेशन प्रॉडक्शन हाऊसची स्वप्नवत पगाराची ऑफर आली. इंटरव्ह्यू पार पाडून जॉइन झालो. घरच्यांना अगदी हायसे वाटले. पण माझे मन नोकरीत लागेना. प्रिंट मीडियाचे आकर्षण गप्प बसू देईना. एक दिवस नोकरी सोडून पुन्हा घरी आलो. परत माझी प्रिंटिंगची कामे सुरू झाली. मित्रपरिवार होताच. लहानसहान कामे करत दिवस सरू लागले. तेव्हा पहिली सेकंडहँड बाईक घेतली. ग्राफिक्सच्या नॉलेजसाठी मल्टीमिडीयाचा डिप्लोमा केला, लागणार्‍या सॉफ्टवेअरचे सर्टिफिकेट कोर्स केले. या सार्‍यांना लागणारा पैसा म्हणजे सोबत कामे चालू असतच. .......................... अचानक एका मित्राने म्हटले, ऑफिस टाकू या. माझ्याकडे जास्त भांडवल नव्हते. घरून मागायची सोय नव्हती. ही संधी भारी वाटली. लहान स्वरूपात ऑफिस सुरू झाले. जसजशी कामे येऊ लागली, तसे मला कळू लागले - धंदा एवढा सोपा नाही. लहान कोटेशन्सही चुकू लागली. थोड्याशा गफलतीमुळे पूर्ण असाईनमेंट रिजेक्ट व्हायचे प्रमाण वाढू लागले. रिकव्हरीचा प्रश्न होताच. मला एकट्याने ही कामे झेपेनात. पार्टनर वेगळ्या फील्डमधला. त्याला माझे प्रोब्लेम कळेनात. शेवटी ६ महिन्यात ऑफिसचा कारभार आटोपला. आटोपला असे वाटले, पण ओळखीच्या काही स्क्रीन प्रिंटर्सनी मला परत मदतीचा हात देऊ केला. त्यांना डिझाईनसाठी माझी गरज होती. त्यांनी ऑफिससाठी लागणारे पैसे दिले. परत जुनी कथा रिवाईंड. मला मॅनेजमेंट जमेना. प्रिंटिंगसाठी लागणारे पेपर, बाईंडिंग, प्लेटा याच्या हिशोबात वारंवार चुकू लागलो. डिझाईन्स सुंदर असायची, पण प्रिंटिंगला वाट लागायची. काय करावे समजेना. त्यात बँकांचा व्यवहार, चेक्स इ. गोष्टींचे गांभीर्य नव्हते. एका बँकेने सीसी दिली, पण तो पैसा कसा खर्चायचा याचे ताळतंत्र राहिले नाही. भरीस भर म्हणून स्क्रीन प्रिंटर्सनी गैरफायदा घ्यायला सुरुवात झाली. शेवटी डोक्यावर मोठ्ठा कर्जाचा भार घेऊन, मी मालक नसलेल्या या धंद्याचा अंत झाला. सुरुवातीला घरी काही बोललेलो नव्हतो. मध्यंतरात त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. शेवटी असा अपेक्षाभंग करून बसलो. कर्जाचा भार पूर्ण उचलायचे ठरवले. वडिलांनी मुदत मिळवून दिली. नेमके त्याच वेळी एका प्रॉडक्शन युनिटचे मालक मला नोकरीसाठी हुडकत आले. सर्व मानापमान बाजूला ठेवून नोकरी चालू केली. रोज ४-४ तास ओव्हरटाइम करून, बाहेरची कामे घेऊन अन चक्क एक वेळा जेवून कर्जाचा भार उतरला. याच काळात धंद्यातल्या सार्‍या खाचाखोचा खर्‍या अर्थाने कळू लागल्या. हे आधीच केले असते तर बरे, असे वाटायचे. प्रिंटिंगमधल्या लहानसहान गोष्टी आत्मसात झाल्या. फील्डमधल्या लोकांच्या ओळखी झाल्या. डिझाईनर म्हणून लोक मला ओळखू लागले. धंद्याची इच्छा मात्र अजून जिवंत होती. मात्र आयटीमधला पैसा खुणावू लागला. एक दिवस नोकरी सुटली अन सरळ एका कंपनीत व्हिज्युअलाईझर म्हणून जॉइन झालो. तिथे टीममध्ये अ‍ॅक्चुअल कामाचा अनुभव असणारा मी एकटाच होतो. गावातील पगारापेक्षा तिप्पट पगारात बरे चालले होते. वीकेंडला गावी आलो असता दोघातिघांनी पार्टनरशिपसाठी ऑफर दिली होती. ९ महिन्यात आयटीला रामराम ठोकला. घरच्यांच्या विरोधाला जुमानून एकट्याने फ्रीलान्स कामे सुरू केली. .......................... अशातच एका अपघाताला तोंड द्यावे लागले. पुण्याहून येताना ट्रॅव्हल्सची वोल्व्हो सरळ पुलात कोसळली. मला बराच मार लागला. चेहरा पूर्ण फाटला, खालचा जबडा डिस्प्लेस झाला. डोक्यावर अन पाठीवर जखमा झाल्या. माझ्या शेजारचा जागीच मृत झाला. केवळ खेळाचे शरीर होते म्हणून लवकर रिकव्हर झालो. तरी या अपघाताने व्यवसायातून ६ महिन्यांसाठी बाहेर फेकला गेलो. हातातल्या मोठ्या असाईनमेंट्स गेल्या. हे प्रिंटिंगचे फील्ड धार्जिणे नाही, असे घरच्यांचे बोलणे रोज ऐकू लागलो. एक दिवस ठरवले. सरळ उठून नात्यातल्या एकाचा बार रेस्टॉरंट सांभाळायच्या कामाला मदत करायला सुरुवात केली. प्रिंटिगची कामे ज्या तन्मयतेने करायचो, त्याच पद्धतीने हॉटेलमध्ये काम केले. स्टॉक, गोडाऊन, किचन, टेबल अन काऊंटर अशा सगळ्या ड्युट्या केल्या. रोज रात्री झोपायला ३ वाजायचे. मनुष्यस्वभावाचे हरेक नमुने तिथे पाहायला मिळाले. लवकरच एका नवीन बारची पार्टनरशिप अन चालवायसाठी ऑफर आली. जवळपास हे डिल फिक्स होतच होते. पण..... नवीन हॉटेलचे बोर्ड अर्थातच मी डिझाईन अन प्रिंट केलेले होते. ते पाहून तिथेही माझ्या लाडक्या प्रिंटिंगने पाठ सोडली नाही. कस्टमर तिथे येत अन मी कामे करून देई. हळूहळू प्रिंटिंगच्या कामाचीच व्याप्ती वाढू लागली. एका जिवलगाने सल्ला दिला - "ज्यात तुझे मन खर्‍या अर्थाने रमतेय, तेच कर. जसे जमेल तसे कर. अगदी परत शून्यातून सुरुवात कर, पण तेच कर." नुसता सल्ला देऊन न थांबता या जिवलगाने नवीन ऑफिसच्या प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य केले. प्रसंगी तासनतास वाद घातला, पण अभ्याचे स्वतःचे ऑफिस ही संकल्पना प्रत्यक्षात येईपर्यंत सर्व प्रकारची मदत केली. पैसा, भावनिक पाठबळ, तांत्रिक मदत अगदी जे जे लागेल ते ते पुरवले. त्यावेळी ह्या जिवलगाची मदत नसती तर कदाचित मी एखाद्या बारच्या काऊंटरवर दिसलो असतो. .......................... आता माझ्या या ऑफिसात सर्व प्रकारच्या अ‍ॅडव्हर्टाईझिंगची कामे केली जातात. मोठी कॅम्पेन्स अगदी प्रोफेशनली कम्प्लीट होतात. रेडिओसारख्या माध्यमाच्या अ‍ॅडस सदैव चालू असतात. त्यांचे स्क्रिप्ट्स अन क्रियेटिव्हज यामध्ये माझी मोनोपली तयार झाली आहे. न्यूजपेपर अ‍ॅडसाठी सर्व मोठ्या पेपर्सची एजन्सी आहे. सोशल मीडिया मार्केटिंग अन एसईओमध्ये बरीचशी कामे चालू असतात. फ्लेक्स अन प्रिंट हा तर माझा जुना व्यवसाय. ती कामे अगदी प्रॉपरली पूर्ण होतात. आज जुन्या चुकांची शक्यतो पुनरावृत्ती टाळली जाते. हिशोबातला पै न पै टिपला जातो. आरोग्याकडे तर अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाही. कस्टमर्सच्या कंपनीचे मोटो अन टॅगलाईन्स तयार करता करता स्वतः मात्र केवळ पुस्तकी वाक्ये न अवतरित करता काम करत राहिलो. मला जमतेय अन लोक देतायत तोपर्यंत कामे मिळत राहणारच. कामे होत राहतील, पण जोडलेली माणसे अन कमावलेला लौकिक हेच अ‍ॅसेट्स मानून सध्यातरी वाटचाल चालूय. लोक म्हणतात, बिझनेसमन म्हणजे फक्त पैसा पैसा अन पैसा करणारी जात. कमर्शिअल आर्ट म्हणजे तर शुद्ध उपयोजित कला. आर्ट फॉर पीपल. आमची प्रत्येक कलाकृती लोकांचा विचार करून साकारलेली असते. मिळणार्‍या पैशाला बांधील असते. पैसा गरजेचा आहेच, पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची.... त्या दिवशी माझ्या अपेक्षा फार म्हणजे फार कमी असतील, यात शंका नाही. ..........................

वाचने 105174 वाचनखूण प्रतिक्रिया 187

नीलमोहर 26/09/2015 - 23:37
खूप काही लिहायचंय पण आत्ता शब्द साथ नाही देत आहेत त्यामुळे.... "रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे चल के मिलेंगे साये बहार के ओ राही, ओ राही नैन आंसू जो लिये हैं, ये राहों के दिये हैं लोगों को उनका सब कुछ देके तू तो चला था सपने ही लेके कोई नहीं तो तेरे अपने हैं सपने ये प्यार के सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के साथी ना कारवाँ है, ये तेरा इम्तिहान है यूँ ही चला चल दिल के सहारे करती है मंजिल तुझ को इशारे देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के." ................

नंदन 27/09/2015 - 08:38
लेख आवडला. श्रीगणेश लेखमालेच्या निमित्ताने चाकोरीबाहेरच्या वाटा जिद्दीने चोखाळलेल्यांचे जे अनुभव वाचायला मिळत आहेत, त्यांची रेंज थक्क करणारी आहे!

सौन्दर्य 27/09/2015 - 11:42
अभ्या जी नमस्कार. लेख वाचून अंगावर रोमांच उभे राहिले. तुमची जिद्द, आवड आणि ती पूर्ण करण्यासाठी उपसलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. तुमचा हा लेख वाचून असंख्य होतकरू कलाकारांना स्फूर्ती मिळेल ह्यात शंकाच नाही. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

लाल टोपी 27/09/2015 - 14:16
तुझा संपूर्ण प्रवास जबरा रेखाट्ला आहे. गेली काही वर्षे मिपावर फिरेलेले कौशल्यपूर्ण हात दिसले होते त्यामागचा माणूस आज दिसला. लेखन खूप आवडले भविष्याबद्दल केलेला विचारही एका कलाकाराला शोभेल असाच आहे. (आंजावर वावरतांना पहिल्यांदाच 'अरे.. तुरे.. अगदी जवळचा मित्र असावा अशी भाषा वापरली आहे..कारण या लेखनात खरच अगदी जवळचा मित्र संवाद साधतो आहे असे वाटले आणि तुला हा आगाऊपणा वाटणार नाही याची खात्री आहे).

अत्रुप्त आत्मा 27/09/2015 - 16:03
पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची.... त्या दिवशी माझ्या अपेक्षा फार म्हणजे फार कमी असतील, यात शंका नाही.
एक कडकडून मिठी मारलेली आहे तुला.. या वाक्यांसाठी.

आनंदी गोपाळ 27/09/2015 - 21:10
पुन्हा एकदा, या लेखमालेतील भिडलेला लेख. कदाचित अनुभवकथनशैलीपेक्षा, अनुभवांच्या सच्चेपणामुळे अन त्या अनुभवांचे अनप्रिटेंशियस साधे सरळ वर्णन करण्यामुळे जास्त भावला. बरंच काही लिहावसं वाटतं आहे, पण दोन बाबी इथे सांगू इच्छितो. पहिलं, चौथीत असतानाच उत्तम रंग/कागद हाताळायला मिळाले ते तीर्थरूपांना 'कौतुक' असल्याने. हा पहिला धडा, दुसरा व्यायामाचा त्यांनीच दिला असावा, अन तिसरा फायनान्स मॅनेजमेंटचा, जेव्हा ५० हजार मागितले ते कसे कमवावेत याचा वस्तूपाठ दिला. मला खात्री आहे, असे अनेक धडे त्यांनी दिले असतील. बाप यासाठी असावा लागतो. तो गेल्यावर आकाशातल्या बापाचे महत्व कळते. आपल्या तीर्थरूपांना दंडवत कळवा. दुसरं, थोडं मुक्त चिंतन. तुमच्या एस्टॅब्लिश होतानाच्या फायनान्शिअल गटांगळ्या वाचून. (मीही असाच शिकलोय ही बाब अलाहिदा) सेल्फ एंप्लॉयमेंट फील्ड्समधे 'धंदा' कॉलेजात का शिकवत नाहीत कुणास ठाऊक. यार, मी जर उदा. डॉक्टर होणारे, त्याचंच प्रोफेशनल ट्रेनिंग घेतोय. त्यानंतर स्वतःचं दुकान मांडणार आहे हे निश्चित. मग त्या दुकानात विकायचा माल बनवायचं ट्रेनिंग देता, तसं थोडं तरी धंदा चालवायचं ट्रेनिंग द्या की? धर्म अर्थ काम मोक्ष.. धर्म मार्गाने अर्थार्जन करावे, हे नीट शिकवायला प्रॉब्लेम कुठंय? (धर्म= कायदा, सरळ मार्ग. चोरी कधी करू नये, खोटे कधी बोलू नये इ. धारयति इति धर्मः.. या अर्थाने) साला आयुष्यातल्या गरजेच्या बाबी शाळेत नीट शिकवाव्या हे कधी कळेल आपल्याला? असो. कमर्शिअल आर्ट्स फिल्डमधली आपली वाटचाल आपण मांडलीत, तशाच यातील इंटरेस्टिंग गोष्टी, ज्यामुळे या क्षेत्रात नव्या मुलांना रस उत्पन्न होईल, तसेच नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या मुलांना मार्गदर्शक होतील अशा काही बाबी लिहिल्यात तर अधिक आनंद होईल.

In reply to by आनंदी गोपाळ

अभ्या.. 29/09/2015 - 01:03
गोपाळराव, धन्यवाद. वडिलांच्या कौतुकाला सीमाच नाही. खरच त्यांनी खूप केलं माझ्यासाठी. मा. बाबासाहेबांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला तेव्हा मी सांगितलेली आठवणीत माझे वडीलच ते चित्र घेऊन बाबासाहेबांकडे गेलेले होते. बर्‍याचदा आतबट्ट्याची मोठी शेती, नोकरी हे सांभाळता सांभाळता मेटाकुटीला आले पण कौतुकात ऊणेपणा नाही येऊ दिला. व्यवहाराची ओळख तर फार आधीपासून करुन दिली. मला बर्‍याचदा जमत नाही पण प्रत्येक पैसा लिहून ठेवला पाहिजे ही शिकवण सुरुवातीपासून द्यायचा प्रयत्न केला. मी आर्टिस्ट म्हणून नोकरी करावी असे त्यांना (सगळ्याच नातेवाईकांना) कायम वाटते पण बिझनेसला विरोध करत नाहीत. या सगळ्यात माझी आई पण महत्त्वाची. तिने बारकावे टिपायचे अन चिकाटीने ध्येय गाठण्याचे शिक्षण दिले. रुपया रुपया जोडून हजार होतात हे तिने शिकवले. कालपरत्वे तिचाही स्वभाव एवढा टोकदार राहिला नाही पण आता तिच्याकडून निरपेक्ष माया कशी करावी हे शिकतोय. त्यांचे ऋण कसे फेडिन वगैरे माहीत नाही पण तुमच्या प्रतिसादामुळे एवढे लिहू शकलो. धन्यवाद. बाकी महाविद्यालयीन शिक्षणातच व्यवसाय शिक्षण देणे वगैरे... होईल तेंव्हा होइल. (तोपर्यंत आमच्यासारख्यांचे कौतुक होऊ द्या ;) ) ह. घ्या. गोपाळराव. . तुम्च्या स्वाक्षरीप्रमाणेच. एक अभ्या असतो, तो धडपडत असतो.

प्रभू-प्रसाद 27/09/2015 - 22:33
सुरेख जमलाय लेख. आपली चित्तरकथा नक्कीच प्रेरणादायी आहे. असेच अनुभवकथन येऊ द्या.
पद्धतीने चितारलेला आलेख! तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेले मोलाचे धडे तुमच्यातला आत्मविश्वास जागाकरुन गेले आणि आयुष्यभराची शिकवण देऊन गेले. आवडीचे काम हा पोटाचा व्यवसाय व्हावा, करता यावा याची मजा औरच असते. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! :) श्रीगणेश लेखमालेमूले अनेक अनवट वाटचालींबाबत माहिती मिळते आहे, मालिका रंगतदार आहे.

हेमंत लाटकर 28/09/2015 - 09:38
अभ्या मस्तंच! तुझ्या व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती होवो ही शुभेच्छा. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपुर्णं!

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 28/09/2015 - 11:51
_/\__/\__/\_

सानिकास्वप्निल 28/09/2015 - 16:16
अभ्या खरा कलाकार आहेस, अशीच मेहनत, जिद्द कायम ठेव व तूला अशीच प्रगति मिळो, यशवंत हो, अगदी मनापासून शुभेच्छा!! लेख खूप आवडला __/\__

सूड 28/09/2015 - 17:26
मस्त रे अभ्या!! बाकी पंतांनी ही र्‍हस्व का करायला लावलंनीत ते कळलं नाही!

In reply to by श्रीरंग_जोशी

डॉ सुहास म्हात्रे 28/09/2015 - 23:03
ही... ही... ही... बादवे तो विनंतीअगोदरचा 'ही' दीर्घ होता. हे वाक्य स्वतंत्रपणे वाचले तर त्याचा अर्थ बदल करण्याच्या विनंतीअगोदर 'ही' हा शब्द दीर्घ होता असा होतो... म्हणजेच विनंती करून तो 'हि' असा केला गेला असा अर्थ होतो. :) अश्या तर्‍हेने, 'ही'ची हीच गोष्ट सगळ्या चर्चेचे कारण झाली ;) (मुळात "अगत्याने यावे हि नम्र विनंती" मधल्या 'हि' कडे निर्देश होता हा उलगडा आता 'वर'चे दोन वेगवेगळे प्रतिसाद एकमेकाशी जोडून पाहिल्यावरच झाला !) केस सॉल्व्ह्ड !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग_जोशी 28/09/2015 - 23:10
धन्यवाद. विनंती शब्दाअगोदरचा ही दीर्घ हवा होता (जो र्‍हस्व टंंकला गेला होता) असे लिहायला हवे होते. असो त्या निमित्ताने मिपावर शुद्धलेखनाबाबत चर्चा घडली :-) .

दत्ता जोशी 28/09/2015 - 19:43
अभय जी, वाचायचं मागे राहून गेला होतं. एकूणच चित्तरकथा आणि लिखाण शैली दोन्ही आवडलं. लागे राहो.तुमच्या संघर्षाला सलाम. कलोपासना कराच पण यशस्वी होण्यासाठी थोडं व्यवहारी होणंही गरजेच आहे असा मला वाटत. बाकी हा सल्ला म्हणून घेऊ नका. फक्त मला वाटलं ते लिहिलं.

In reply to by दत्ता जोशी

अभ्या.. 29/09/2015 - 01:07
धन्यवाद जोशीबुवा. खरय तुमचं. या चित्तरकथेचा एक उपसंहार लिहायचे फार मनात आहे. कॅन्व्हासची मागची बाजू म्हणून. पाहू कसे जमते ते. झोंबेल कदाचित बर्‍याच जणांना पण लिहिणार जरुर. :)

हेमंत लाटकर 28/09/2015 - 19:54
"माझी चित्तरकथा" हे शिर्षक खटकते. खुप गरिब परिस्थितीतून संघर्ष करून वर आलेल्यासाठी हे शिर्षक बरोबर आहे.

In reply to by यशोधरा

अभ्या.. 28/09/2015 - 20:27
ह्या ह्या दुर्लक्ष नाही. आता अस्सल सोलापुरी प्रतिसाद. अबे जिंदगीभर चित्तर काढलो ते बघ बे. निघाला गरामर शिक्वायला. खटकल बिटकल ना खुट्टीवर अटकवल.

In reply to by अभ्या..

अत्रुप्त आत्मा 28/09/2015 - 20:38
@अबे जिंदगीभर चित्तर काढलो ते बघ बे. निघाला गरामर शिक्वायला. खटकल बिटकल ना खुट्टीवर अटकवल. >> http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying-laughter-smiley-emoticon.gif जब्री हानला! http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying-laughter-smiley-emoticon.gif

In reply to by हेमंत लाटकर

प्रभाकर पेठकर 28/09/2015 - 20:23
खुप गरिब परिस्थितीतून संघर्ष करून वर आलेल्यासाठी हे शिर्षक बरोबर आहे. गरीबांची ती 'चित्तरकथा' आणि मध्यमवर्गियांची काय 'परीकथा'? संघर्षाच्या वैविध्याने नटलेल्या(?) कुठल्याही यशोगाथेला 'चित्तरकथाच' म्हणावे लागेल. मग ती गरीबाची असो, मध्यमवर्गियाची असो वा श्रीमंताची.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 28/09/2015 - 20:59
आक्षेप! मध्यमवर्गीयांना असला काही स्कोपच नसतो. रस्त्यावरच्या डांबाखाली बसून केलेला अभ्यास नसला, पाचसात भावंडं नसली, आईनं शिवणमशिनवर शिवलेलं कापड नसलं, बाप हातभट्टी पिऊन ल्हास हुन किंवा हाणामार्‍या करणारा तरी किंवा एकदम आक्ख्या घरासाठी खस्ता खाणारा, पाठीला पोक आलेला असा नसला ..... तर तुमची कथा चित्तरकथा नसते. मध्यमवर्गीयांची दुखणी सुद्धा मध्यम आणि त्यांची यशं सुद्धा. :-/ (आक्खा प्रतिसाद उपरोधात्मक आहे.- कळावे, लोभ असावा)

In reply to by हेमंत लाटकर

सुबोध खरे 28/09/2015 - 20:49
चित्तर कथा हा चित्रकथा चा अपभ्रंश आहे आणि ते सिनेमाचे जुने नाव आहे. आणि त्याचा गरीबाच्या संघर्षाशी काहीही संबंध नाही. श्री व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकात याचा संदर्भ वाचला होता. मिळाला कि देतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेमंत लाटकर 29/09/2015 - 07:41
लेखकाचा व्यवसाय पाहता "चित्तरकथा" या शब्दात श्लेष असेल असे वाटले नाही काय ?! चित्तरकथा हा शब्द श्र्लेष नाही. त्यातून करूण रस जाणवते. म्हणजे खुप हालअपेष्टातून जीवनाशी संघर्ष करून यश मिळाले असे वाटते.

हेमंत लाटकर 28/09/2015 - 22:43
अबे जिंदगीभर चित्तर काढलो ते बघ बे. निघाला गरामर शिक्वायला. खटकल बिटकल ना खुट्टीवर अटकवल. काबे इतके उखडायला काय झाले. चांगल्या भाषेत सांगता आले असते ना. मी लेख चांगला आहे असेच लिहले होते. तुझा सोलापुरी बाणा गेला तेल खात.

In reply to by हेमंत लाटकर

कॅप्टन जॅक स्पॅरो 28/09/2015 - 23:03
मिपावरची जी छान छान चित्रसजावट बघताय ना ती त्या चित्तरकथेमधल्या कष्टांचं फळ आहे. गरिबीतुन वर यायच्या संघर्षाला चित्तरकथा म्हणतात? शिर्षकाचा जरा लेखाशी संबंध जोडुन बघा मग अर्थ लागेल कदाचित. नै लागला तर मग करा व्यनि. आणि चित्तरकथेचा तुम्हाला काय अर्थ वाटला ते लिहा बघु. एखादा लेख. ते मधे तुम्ही आख्खा मेन बोर्ड पाचकळ लेख टाकले होतेत ना त्यापेक्षा काहितरी कन्स्ट्रक्टिव्ह (आणि लोकांना नं खटकणारं) लिहिता येतय का ते ही बघा. धन्यवाद.

In reply to by हेमंत लाटकर

कॅप्टन जॅक स्पॅरो 28/09/2015 - 23:05
तुझा सोलापुरी बाणा गेला तेल खात.
आ बैल मुझे मार. त्याचं तेलानी चंपी होतेय आता.

हेमंत लाटकर 28/09/2015 - 22:48
डाॅ. किशोर शांताबाई काळे यांचे "काेल्हाट्याचे पोर" हे पुस्तक वाचल्यावर कळते संघर्ष म्हणजे काय असतो ते.

In reply to by हेमंत लाटकर

कोमल 29/09/2015 - 08:39
प्रत्येक संघर्षाची तुलना कोल्हाट्याच्या पोराशी करणार्‍या तुम्हाला कोपरा पासून दंडवत. धोत्रितील प्रस्पुट पंपू

सिरुसेरि 28/09/2015 - 23:36
छान अनुभव . तुम्ही चित्रकला क्षेत्रात करीअर केले त्यामुळे लेखाला "माझी चित्तरकथा " हे नाव दिले आहे हे लक्षात आले . व समर्पक वाटते .
अभ्या, हे सगळं शब्दबद्ध केलंस त्यासाठी आभार. तू या गोष्टीचा खरा हिरो आहेस हे कायम लक्षात ठेव. तू हे सगळं उभं करु शकलासं कारण तुझ्यात ते इन्स्टिक्ट होतं. बाकी लोक-परिस्थिती, हे सारे निमित्तमात्र. आजूबाजूची लोकं बदलतील तशी परिस्थिती पण बदलेल. पण जोवर तू आहेस, तोवर तुझ्या प्रवासाला अंत नाही. अब निकल पडे है राहोंपर, तो रुकना नहीं है, थमना नहीं है| बाकी तर तुला माहित आहेच. :)

किसन शिंदे 29/09/2015 - 08:55
बाकी चित्तरकथा या शब्दाचा अर्थ शोधू गेलं तर 'चित्रांच्या साहाय्याने सांगितलेली कथा', 'थरारक कथा' हे अर्थ सापडतात. वर लाटकर साहेब म्हणतात तसे करूण कथा तसा अर्थ नाही सापडत. :)

नाखु 29/09/2015 - 09:36
देवा शपथ खरं सांगतो हा लेख शीर्षका शिवाय आणि शीर्षका सह वाचला तितकाच भिडला , अस्सल वाटला आणि जिद्दीची-चिकाटीची प्रेरणादायी प्रांजळ अनुभव-कथन वाटला. अभामिपामांप्मिम संचालीत पाम्जेम्मीनीरास्फॉर्चुन्लिबर्टीधारासफोलासूर्यफूल्सोयाबीन्शेंगदाणारास्ब्रॅण्ड तेलात पुरीभजीपनीरजिल्बीगुलाब्जामुनपाप्ड तळून फस्त करणारा महासंघ

ब़जरबट्टू 29/09/2015 - 09:52
खुप काही शिकण्यासारखे.. सर्व अनुभव आवडले.. बढते रहो.. :)

अनिरुद्ध.वैद्य 29/09/2015 - 14:27
अफाट लिहिलेले! खरच चित्तरकथा आहे तुमची! मस्त अनुभवाची शिदोरी बांधलीत आपण :) 'ज्यात तुझे मन खर्‍या अर्थाने रमतेय, तेच कर. जसे जमेल तसे कर. अगदी परत शून्यातून सुरुवात कर, पण तेच कर.' - मनाला भिडले राव हे वाक्य!

तुमचा अभिषेक 29/09/2015 - 17:01
हॅटस ऑफ ! जितके अफलातून जगला आहात तितकेच अफलातून हे सारे मांडलेही आहे.

चौकटराजा 29/09/2015 - 18:13
अभ्या,गड्या काय बोलणार तुझ्या या लेखावर ?आजपासून तू काका नि मी पुतण्या ! तू खरा जाणता काका रे !लेखनाची शैली लिरिकल लाईन सारखी आहे काही वेळा स्पष्ट फ़राटा तर काही जागी सूचक पणे कागद कोरा सोडावा अशी लिरिकल लाईन !या पूर्वी सोलापूराचा एक चाटी नावाचा चित्रकार भेटला होता दहा मिनिटात त्याने माझे चारकोल ने पोट्रेट काढून विस्मयाचा प्रत्यय दिला होता मग पुण्यात सोलापूराचे मूळ हे ए ए आल्मेलकर भेटले आपल्या लई भारी स्केचबुकासह व आता तुझी ही अजीब चित्तरकथा .ही मराठीतील लेखक ह मो मराठे याना फार भावेल .सलाम अभ्या अंकल !

चित्रगुप्त 30/09/2015 - 03:47
चित्रकाराने केलेले लिखाण वाचायला मिळणे म्हणजे पर्वणीच. त्यातून हे अगदी लिखाण अस्सल. फार भावले. "पुढे कधीतरी नक्की आपण पूर्ण वेळ चित्रकार बनू" ही मलासे वाटते प्रत्येक (नोकरी वा व्यवसाय करणार्‍या चित्रकारांची) आस असते, बर्‍याच जणांच्या बाबतीत ती कधीच पूर्ण होत नाही, प्रपंचाच्या वाढत्या धबडग्यात ते स्वप्न स्वप्नच राहून जाते. किंवा पुढे तसा वेळ मिळतो, तेंव्हा बर्‍याच गोष्टी - मुख्यत: उमेदीचा काळ, निरागसता आणि भाबडा आशावाद - निसटून गेलेल्या असतात. 'आता फार उशीर झाला' अशी खंत दाटून येऊन निष्क्रियता येते (माझ्या प्रिय गुरूंचे असे झाले, याचे मला अजूनही वाईट वाटत असते). यावर उपाय म्हणजे धार्मिक लोक जसे देवळात, मशिदीत वा शिर्डी, मक्का वगैरेला जायला रोजच्या धबडग्यातून आवर्जून वेळ काढतात, तसा आपण चित्रांसाठी काढायचाच. अगदी रोज जमत नसेल तर आठवड्यातला पूर्ण एक दिवस आणि वर्षातून एक-दोनदा सलग आठदहा दिवस थोडे नुकसान सोसूनही काढायचेच. अश्या प्रकारे चित्रे काढण्यातही एक सातत्य राहून पुढे खरोखर पूर्ण मोकळा वेळ मिळेल तेंव्हा बर्‍याच पायर्‍या ओलांडून झालेल्या असल्याने अगदी सुरुवातीपासून सुरुवात करावी लागत नाही आणि वर म्हटल्याप्रमाणे खंत वा निराशा वाटत नाही. मी नोकरी करत असताना रोज सकाळी ७ ते ९ पेंटिंग करायचो, आता अगदी पूर्ण वेळ रिकामा असतो, तरी ते अधून मधूनच करत असतो -- पूर्वी सातत्य राखले नसते, तर बहुधा सोडुनच दिले गेले असते... --- कीर्ती आणि संपत्ती यांच्या मोहपाशातून सुटका झाल्यानंतरच मनाची प्रशांत अवस्था लाभत असते --- हे मला काही वर्षांपूर्वी माझ्या (दुसर्‍या एका) गुरूने सांगितले होते, तेंव्हा अजिबात पटले नव्हते, परंतु आता मी त्या अवस्थेच्या अनुभूतीत जगतो आहे. पुढे कधीतरी करणार असलेल्या चित्रांसाठी, आणि त्यापूर्वी करत असलेल्या सर्व प्रकारच्या कामांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा. . चित्रकारः Charles Francois Daubigny

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 04/10/2015 - 12:35
अगदी मनापासून धन्यवाद चित्रगुप्तजी. तुमच्या चित्रकारकिर्दीपुढे मी अगदी क्षुल्लक आहे. केवळ एक क्षेत्र हेच साम्य. तुमच्या प्रवासातले टप्पे अनुभवाचे, केलेल्या कष्टांचे अन रंगलेल्या कॅन्व्हासचे. . अशा संपन्न आयुष्याला सलाम.
अभ्या अतिशय प्रेरणादायी अनुभव आहे. कलाकार म्हणून तू किती मोठा आहेस हे माहीत होतेच. आता त्यामागे असलेले कष्ट, चिकाटी आणि साहस या तुझा गुणांची देखिल ओळख झाली. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

साती 05/10/2015 - 00:43
आवडली चित्तरकथा! छान शब्दबद्धं केला आहात आपला व्यवसायाचा प्रवास. एकदम प्रेरणादायी.

साती 05/10/2015 - 00:55
अवांतर- चित्तरकथा या नावात खटकण्यासारखे काही नाही. या शब्दाचा गरिबीशी संबंध लावायचीही काही गरज नाही. चित्रकथी किंवा चित्रकथा हा लोककलेचा एक प्रकार आहे ज्यात एकामागोमात एक चित्रे दाखवून मग गोष्ट सांगणारा त्यानुसार वर्णन /संवाद इ . करतो. http://97artandideas.com/portfolios/traditional-indian-art/ या लिंकवर याची जास्त माहिती मिळेल. यात उलट राजारजवाड्यांच्या , पुराणातल्या गोष्टी जास्त असतात. त्यामुळे कुठल्याही आठवणींचा चित्रबद्ध किंवा शब्दचित्रबद्ध प्रवाससुद्धा चित्रकथा म्हणवता येईल. इथे आठवणी व्यक्त करणारा एक चित्रकार असल्याने उलट हा शब्द अधिकच चपखल बसतोय. अतिअवांतर- लहानपणी हालापेष्टा काढत शिकलेल्या 'नाजुका' नामक मुलीची जिचं काम चारुशीला साबळे यांनी केलं होतं अशी एक मालिका दूरदर्शनवर लागायची. तिचं शीर्षकगीत 'माझ्या जन्माची चित्तरकथा असे होते' म्हणून सगळ्या चित्तरकथा हालापेष्टांच्याच असाव्यात असे म्हणणे आहे का कुणाचे? :)

विलासराव 05/10/2015 - 14:37
अभ्याशेट आवडली तुमची चित्तरकथा. आता आपल्या रॉयल कॅफेसाठी ८बाय ३ फुट बॅनर बनवून दया. लोखंडी फ्रेम रेड़ी आहे. दूसरे समोर मेनू लावायला दोन बाजू असलेला बोर्ड़ बनावलाय. त्यासाठी मस्त स्टिकर अथवा बॅनर बनवून देने. मी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेम्बरच्या पहिल्या आठवड्यात सोलापुरला येणार आहे तेव्हा भेटुच. माझा जवळचा मित्र शेटफळला रहतो. गुरुकुलचे केशव शिंदे आपले खुप जवळचे स्नेही आहेत, त्यांचे २ की ३ शाळा आहेत.तिथे तुझे काही काम असेल व्यवसायाशि निगडित तर मी तुझी ओळख करुण देईल. बाकी प्रत्यक्ष भेटित बोलुच.

In reply to by विलासराव

अभ्या.. 06/10/2015 - 00:01
या विलासराव. कधीही या. तुमचे स्वागत असेल. तुमचे काम झालेच म्हणून समजा. :) गुरुकुलचे प्रा. केशव शिंदे अन प्रा. विद्याताई शिंदे हे खरोखरीच उत्तुंग व्यक्तिमत्वे आहेत. त्यांचा स्नेह म्हणजे खरेच मोठी गोष्ट. आपण अवश्य भेटूयात त्यांना. धन्यवाद पुन्हा.

राजाभाउ 26/07/2016 - 16:02
अभ्या भावा जिकलास तू !!! तुझी जिद्द,कष्ट, चिकाटी यांना सलाम. हे येव्हड सगळ वाचल्यावर तुला एकेरी "अभ्या" कस म्हणु असा विचार आला होता, पण म्हणल जौदे अभ्याच बर वाटतय. रच्याकान हा लेख तेंव्हा कसा मिसला कोणास ठाउक (डोक खाजवणारी स्माइली).

मितभाषी 26/07/2016 - 16:14
लिहीतोसपण भारी. मला ज्यादिवशी असं लिहिता येईल त्या दिवशी जन्माचं सार्थक होईल.

पुंबा 16/03/2017 - 15:46
अभ्यादादा, तुमच्या जिद्द, चिकाटीला मानाचा मुजरा. अवांतरः ह्या कथामालेचे इतर लेख कुठे वाचायला मिळतील?

In reply to by पुंबा

अभ्या.. 16/03/2017 - 15:53
धन्यवाद, वर मिपाविशेषांक म्हणून टॅब आहे त्यात गणेशलेखमाला २०१५ आहे, त्यात पहावे, त्या टॅबमध्ये मिपाच्या सगळ्याच विशेषांकाच्या लिंक्स आहेत. तरी हि लेखमाला, आमच्या लाडक्या मुविकाकानी गुंफलेली. मिस यू मुविकाका.

केदार-मिसळपाव 22/03/2017 - 16:55
नमस्कार स्विकारावा आभ्याशेठ.