✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

श्रीगणेश लेखमाला ९ : माझी चित्तरकथा

अ
अभ्या.. यांनी
Sat, 09/26/2015 - 00:03  ·  लेख
लेख
.......................... वर्दळीच्या नव्या पेठेतली सकाळी ७.००ची वेळ. इंच इंच लढवणार्‍या दुकानदारांची स्टँडीज, मॅनिक्वीन बाहेर ठेवण्याची घाई. पाच मजली भव्य शोरूम. २० बाय ५ चा ग्लोसाईन. वजन अंदाजे ३५० किलो. त्यात ट्यूबलाईट्स. लहान जिन्यावरून तो नेता येत नाही, म्हणून बाहेरून चढवतोय. वरून सोडलेले दोर. पाळणा बांधून त्यावर उभे राहून ड्रिल करणारे कामगार. त्यांच्या कमरेला दोर बांधून धरलेला मी. दोर थोडा हलला की धस्स होतंय. बोर्ड हळूहळू जागेवर बसताना निम्म्याच्या वर मी कठड्यावरून बाहेर आहे. .......................... पाच लाख पॅम्पलेट्सची ऑर्डर. एकाच वेळी सोलापूर अन कोल्हापुरात पेपरमध्ये पडले पाहिजेत. वेळ २ दिवस फक्त. प्रिंटिंग व्हायलाच २ दिवस जातात. सोलापुरात पडतील हो, कोल्हापूरचे कसे काय? रात्री १२ला पेपर विक्रेत्याला गाठून त्याचे गठ्ठे पॉईंटवर पोहोचवा. लगेच गाडी कोल्हापूरच्या दिशेने. बरोबर ५ वाजता कोल्हापूरचे पेपरवाले पॅम्पलेट्स टाकतात. .......................... इलेक्शनचे काम. पैसे घ्यायला उमेदवाराने फार्म हाऊसवर बोलावलेले. गावाबाहेर ३० कि.मी.वर सुनसान एरियात. १०-१२ गनमन. तेवढीच दांडगी कुत्री. एखाद्याला टपकवून पुरला तरी खबर कळणार नाही. रोखीत पैसे घेऊन परत येईपर्यंत जिवाची शाश्वती नाही. .......................... असलो तर राजा असतो. नसले तर चहा प्यायलाही पैसे नसतात.. .......................... काय गरज आहे असले धंदे करायची? ११ ते ५ जॉब नाही मिळणार मला? महिन्याचा पगार काय नको वाटतो? रात्रंदिवस फोन वाजत असतो. एकदा घरातून बाहेर पडलो की यायची वेळ कधीच फिक्स नाही. का करतो मग मी हे सगळं? उत्तर एकच.. छंद. व्यवसायाचा छंद. छंदाचा व्यवसाय. .......................... मध्यमवर्गीयच मी. अगदी टिपिकल. वडील बँकेत, आई शाळेत. झालो असतो ना डॉक्टर इंजीनिअर, गेलाबाजार बँकेत तरी. पण नाही. नडली माझी चित्रकला. पूर्ण खानदानात चित्रकला मलाच कशी येते.... माहीत नाही. यात काही करीअर आहे... माहीत नव्हते..... बारावीपर्यंत रितीरिवाजाप्रमाणे शिक्षण झाले. रितीरिवाज म्हणजेच गणिताशी दुश्मनी करून अन इतिहासाची पुस्तके चितारून. नाही म्हणायला प्रत्येक चित्रकला स्पर्धेत शाळेचे नाव गाजण्याएवढी कला माझ्या अंगात होती. दै. सकाळची स्पर्धा असो की कामगार कल्याण केंद्राची. मी राज्यस्तरीय पहिला नंबर कधी सोडला नाही. एवढ्या एका गोष्टीसाठी मला अभ्यासातून सूट मिळायची. घरात कौतुक फक्त वडिलांना. चौथीत असताना मी आर्टिस्ट क्वालिटीचे पोस्टर कलर अन वॉटरप्रुफ इंक वापरलीय. आईच्या दृष्टीने माझा ऊपयोग फक्त दिवाळीत तुळशी वृंदावन रंगवायला किंवा रथसप्तमीला रथ काढून द्यायला. वडिलांच्या ओळखीच्या एकाने सांगितले की कमर्शिअल आर्ट कर. काय असते ते पण माहीत नव्हते. नेहमीच्या कॉलेजपेक्षा वेगळे कॉलेज असते अन तेथे फक्त चित्रेच काढायची असतात हा ईंटरेस्टिंग पार्ट होता. त्यावेळी दहावीनंतर फाऊंडेशनला अ‍ॅडमिशन मिळत असे. मग काय...दहावीनंतर मी लगेच चित्रकला महाविद्यालयासाठी बाहेर जाण्याचे ठरवले. घरच्यांनी ते मात्र ऐकले नाही. "आधी बारावी कर. तब्येत चांगली कर अन मगच जा" असा सल्ला मिळाला. बारावी नापास झाला तरी चालेल, अशीही सूट मिळाली. मग काय, बास्केटबॉल अन टेक्निकल एवढेच दोन वर्षे केले. घरातील आर्थिक स्थिती चढउताराची व्हायला अन मला फाऊंडेशनच्या कोर्ससाठी बाहेर पडायला गाठ पडली. फाऊंडेशन एक वर्षाचे. अगदी ओढगस्तीत पार पडले. सुरुवातीला भीती वाटायची. च्यायला सगळीच आर्टिस्ट पोरं. आपला कुठे निभाव लागावा. एकेकाचे कलर सेट अन ब्रशेस पाहून छाती दडपायची. पण टिकलो. टिच्चून काम केले. मराठवाड्यात पहिला आलो. मग म्हटले, आपले कोल्हापूर गाठावे. उपयोजित कलेची पदविका (पदवी अन पदविका कालावधी सेमच - ४ वर्षे फाऊंडेशननंतर आहे. दोन्हीला जीडी आर्टस म्हणत.) .......................... फाऊंडेशनचा स्वतंत्र कोर्स एक वर्षाचा असे. असाईनमेंटसही भर्पूर असत. ह्या मार्कावरच पुढची दिशा ठरे. सगळ्या शाळांतली चित्रकला चांगली असणारीच मुले वर्गात असल्याने कॉम्पीटिशन टफ वाटायची. ही भीती अगदी कमर्शिअल आर्टच्या प्रथम वर्षात कायम होती. कारण कोल्हापूरचा कलाप्रांतातला दबदबा. तिथला सगळ्या चित्रकला महाविद्यालयापेक्षा वेगळा अनुभव. पण सरावलो थोड्या दिवसात. वाटले होते त्यापेक्षा भरपूर विषय होते. अ‍ॅनॉटॉमी तर अगदी डॉक्टरांना शिकवत नसतील एवढी घटवून घेतली जाई. टायपोग्राफी, फॉन्टस अन स्केचेसच्या कागदांनी बॅगा भरायच्या. अ‍ॅडव्हर्टायझिंग आर्ट एन आयडीयाला ओएनएम चा ऑग्लिव्ही पुस्तकातून पिडायचा. जगातली सगळी गाजलेली न फसलेली कॅम्पेन्स, पिअर्स साबणाच्या गेल्या शतकातल्या अ‍ॅडपासून आजपर्यंतचा प्रवास एकताना भान हरपायचे. एकेक शब्दांचा काळजीपूर्वक केलेला उपयोग अन अभ्यास पाहून वाचनाची गोडी लागली. एखाद्या प्रॉडक्टचा यूएसपी (युनिक सेलींग पॉइन्ट) हेच सर्वस्व झाले. जगातील उत्तमोत्तम मॅगझीन्स, व्हिडिओज अन फोटोग्राफ यातून जाहिरातक्षेत्र म्हणजे ६५ वी कला का म्हणतात याचे भान आले. सेकंड इयरला असाईनमेंट्स शोकेसमध्ये लागू लागल्या. इतर मुलांकडून अन शिक्षकांकडून कौतुक चालू झाले. सेकंड इयरला परीक्षेला ऑप्शनल विषय निवडायचा असे. अ‍ॅडव्हरटाईझिंग, पब्लिक वेल्फेअर अन पब्लिकेशन. ऐन वेळी मी कुणी न निवडणारा पब्लिकेशन निवडला. टिच्चून काम केले. त्या वेळी डेडलाईन सांभाळून काम करायच्या माझ्या मर्यादांची मलाच जाणीव झाली. पहिल्यांदाच स्वतःच्या कलेविषयी आत्मविश्वास जाणवायला लागला. इतरांना वाटायचे - ५ वर्षे काय शिकवतात चित्रे काढायला? पण खरे सांगतो, ती ५ वर्षे पुरेशी वाटायची नाहीत. कॅलिग्राफी, टायपोग्राफी, अ‍ॅनॉटॉमी हे करत तीन वर्षे पार पडली. खर्च अगदी मेडिकल-इंजीनिअरिंगवाल्यांप्रमाणे नसायचा, पण तोसुद्धा जड व्हायचा. शिक्षण शुल्क तर अगदी नाममात्र म्हटल्याप्रमाणे. मिरजला मावशीकडे राहून रोज रेल्वेने कोल्हापूरचा जाण्या-येण्याचा पास काढून कॉलेज पूर्ण केले. शेवटच्या वर्षाची परीक्षा मुंबईला जे.जे.मध्ये. तिथे रहेजा, सोफिया अन अमरावतीची मुले परीक्षेला यायची. बांद्र्याच्या कलानगर जे.जे. हॉस्टेलमध्ये राहून एकदाची परीक्षा पार पडली. लगेच नोकरी मिळवायला इतर सहाध्यायींची धडपड सुरू झाली. आपापले पोर्टफोलिओ घेऊन अ‍ॅड एजन्स्यांची अन अ‍ॅनिमेशन हाउसेसची दारे ठोठावू लागली. काय जाणे, पण मला त्यात इंटरेस्ट वाटेना. सरळ गावी निघून आलो. .......................... गावी एक आठवडा तेवढा पिक्चर बघण्यात अन फिरण्यात घालवला. कॉलेजात असताना बाईक वगैरे वापरलेली, पण घरी बाईक देईनात. त्या काळात मला बाईक रेसिंगचा नाद लागलेला. गाड्या थोड्याशा मॉडीफाय करून द्यायची कामे करायचो. पैशाची गरज भासू लागली. शिकत असताना थोडी प्रिंटिंगची कामे केली होती, त्या अनुभवावर एक दिवस बाबांना म्हणालो, "मला ५० हजार हवेत." "कशाला?" "पीसी अन स्कॅनर, प्रिंटर घ्यायचाय. प्रिंटिंगची कामे चालू करतो." "त्याशिवाय होणारच नाहीत का? सध्या तर मी देऊ शकत नाही." "नाही होणार." "मग एक काम देतो तुला, सध्या बाहेरून करून घे. जमेल का?" एका बँकेच्या लोगोचे अन स्टेशनरीचे काम होते. काम भरपूर होते. बरीचशी आर्टवर्क हाताने केली. डीटीपीवाल्याकडे बसून उरलेली केली. जवळपास ३ महिने काम चालले. सगळे फिरणे बस आणि रिक्षाने, दरम्यान माझा जो होईल तो खर्च वडील देत. तीन महिन्यांनी बँकेचे बिल मिळाले. ७८ हजाराचे होते, डीटीपीवाल्याचे पैसे तेव्हाच दिले. उरलेली रक्कम देताना वडिलांनी तोपर्यंत मला खर्चाला जेवढे पैसे दिले, त्याचे व्हाऊचर बनवून ठेवले होते. ते वजा करून उरलेले १४ हजार माझ्या हातात आले. "आता मला सांग, १४ हजार कमवायला काय करावे लागते? किती वेळ लागतो?" उत्तर मला माहीत झाले होते. "मग तुला एकरकमी ५० हजार कसे द्यायचे?" आता तेही मला नको होते. वडिलांनी दिलेल्या धड्यापेक्षा मौल्यवान गोष्ट मला कळली होती. मला स्वतःला पैसे कमवता येतात. निदान एका पद्धतीने तरी. .......................... अचानक मला एका अ‍ॅनिमेशन प्रॉडक्शन हाऊसची स्वप्नवत पगाराची ऑफर आली. इंटरव्ह्यू पार पाडून जॉइन झालो. घरच्यांना अगदी हायसे वाटले. पण माझे मन नोकरीत लागेना. प्रिंट मीडियाचे आकर्षण गप्प बसू देईना. एक दिवस नोकरी सोडून पुन्हा घरी आलो. परत माझी प्रिंटिंगची कामे सुरू झाली. मित्रपरिवार होताच. लहानसहान कामे करत दिवस सरू लागले. तेव्हा पहिली सेकंडहँड बाईक घेतली. ग्राफिक्सच्या नॉलेजसाठी मल्टीमिडीयाचा डिप्लोमा केला, लागणार्‍या सॉफ्टवेअरचे सर्टिफिकेट कोर्स केले. या सार्‍यांना लागणारा पैसा म्हणजे सोबत कामे चालू असतच. .......................... अचानक एका मित्राने म्हटले, ऑफिस टाकू या. माझ्याकडे जास्त भांडवल नव्हते. घरून मागायची सोय नव्हती. ही संधी भारी वाटली. लहान स्वरूपात ऑफिस सुरू झाले. जसजशी कामे येऊ लागली, तसे मला कळू लागले - धंदा एवढा सोपा नाही. लहान कोटेशन्सही चुकू लागली. थोड्याशा गफलतीमुळे पूर्ण असाईनमेंट रिजेक्ट व्हायचे प्रमाण वाढू लागले. रिकव्हरीचा प्रश्न होताच. मला एकट्याने ही कामे झेपेनात. पार्टनर वेगळ्या फील्डमधला. त्याला माझे प्रोब्लेम कळेनात. शेवटी ६ महिन्यात ऑफिसचा कारभार आटोपला. आटोपला असे वाटले, पण ओळखीच्या काही स्क्रीन प्रिंटर्सनी मला परत मदतीचा हात देऊ केला. त्यांना डिझाईनसाठी माझी गरज होती. त्यांनी ऑफिससाठी लागणारे पैसे दिले. परत जुनी कथा रिवाईंड. मला मॅनेजमेंट जमेना. प्रिंटिंगसाठी लागणारे पेपर, बाईंडिंग, प्लेटा याच्या हिशोबात वारंवार चुकू लागलो. डिझाईन्स सुंदर असायची, पण प्रिंटिंगला वाट लागायची. काय करावे समजेना. त्यात बँकांचा व्यवहार, चेक्स इ. गोष्टींचे गांभीर्य नव्हते. एका बँकेने सीसी दिली, पण तो पैसा कसा खर्चायचा याचे ताळतंत्र राहिले नाही. भरीस भर म्हणून स्क्रीन प्रिंटर्सनी गैरफायदा घ्यायला सुरुवात झाली. शेवटी डोक्यावर मोठ्ठा कर्जाचा भार घेऊन, मी मालक नसलेल्या या धंद्याचा अंत झाला. सुरुवातीला घरी काही बोललेलो नव्हतो. मध्यंतरात त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. शेवटी असा अपेक्षाभंग करून बसलो. कर्जाचा भार पूर्ण उचलायचे ठरवले. वडिलांनी मुदत मिळवून दिली. नेमके त्याच वेळी एका प्रॉडक्शन युनिटचे मालक मला नोकरीसाठी हुडकत आले. सर्व मानापमान बाजूला ठेवून नोकरी चालू केली. रोज ४-४ तास ओव्हरटाइम करून, बाहेरची कामे घेऊन अन चक्क एक वेळा जेवून कर्जाचा भार उतरला. याच काळात धंद्यातल्या सार्‍या खाचाखोचा खर्‍या अर्थाने कळू लागल्या. हे आधीच केले असते तर बरे, असे वाटायचे. प्रिंटिंगमधल्या लहानसहान गोष्टी आत्मसात झाल्या. फील्डमधल्या लोकांच्या ओळखी झाल्या. डिझाईनर म्हणून लोक मला ओळखू लागले. धंद्याची इच्छा मात्र अजून जिवंत होती. मात्र आयटीमधला पैसा खुणावू लागला. एक दिवस नोकरी सुटली अन सरळ एका कंपनीत व्हिज्युअलाईझर म्हणून जॉइन झालो. तिथे टीममध्ये अ‍ॅक्चुअल कामाचा अनुभव असणारा मी एकटाच होतो. गावातील पगारापेक्षा तिप्पट पगारात बरे चालले होते. वीकेंडला गावी आलो असता दोघातिघांनी पार्टनरशिपसाठी ऑफर दिली होती. ९ महिन्यात आयटीला रामराम ठोकला. घरच्यांच्या विरोधाला जुमानून एकट्याने फ्रीलान्स कामे सुरू केली. .......................... अशातच एका अपघाताला तोंड द्यावे लागले. पुण्याहून येताना ट्रॅव्हल्सची वोल्व्हो सरळ पुलात कोसळली. मला बराच मार लागला. चेहरा पूर्ण फाटला, खालचा जबडा डिस्प्लेस झाला. डोक्यावर अन पाठीवर जखमा झाल्या. माझ्या शेजारचा जागीच मृत झाला. केवळ खेळाचे शरीर होते म्हणून लवकर रिकव्हर झालो. तरी या अपघाताने व्यवसायातून ६ महिन्यांसाठी बाहेर फेकला गेलो. हातातल्या मोठ्या असाईनमेंट्स गेल्या. हे प्रिंटिंगचे फील्ड धार्जिणे नाही, असे घरच्यांचे बोलणे रोज ऐकू लागलो. एक दिवस ठरवले. सरळ उठून नात्यातल्या एकाचा बार रेस्टॉरंट सांभाळायच्या कामाला मदत करायला सुरुवात केली. प्रिंटिगची कामे ज्या तन्मयतेने करायचो, त्याच पद्धतीने हॉटेलमध्ये काम केले. स्टॉक, गोडाऊन, किचन, टेबल अन काऊंटर अशा सगळ्या ड्युट्या केल्या. रोज रात्री झोपायला ३ वाजायचे. मनुष्यस्वभावाचे हरेक नमुने तिथे पाहायला मिळाले. लवकरच एका नवीन बारची पार्टनरशिप अन चालवायसाठी ऑफर आली. जवळपास हे डिल फिक्स होतच होते. पण..... नवीन हॉटेलचे बोर्ड अर्थातच मी डिझाईन अन प्रिंट केलेले होते. ते पाहून तिथेही माझ्या लाडक्या प्रिंटिंगने पाठ सोडली नाही. कस्टमर तिथे येत अन मी कामे करून देई. हळूहळू प्रिंटिंगच्या कामाचीच व्याप्ती वाढू लागली. एका जिवलगाने सल्ला दिला - "ज्यात तुझे मन खर्‍या अर्थाने रमतेय, तेच कर. जसे जमेल तसे कर. अगदी परत शून्यातून सुरुवात कर, पण तेच कर." नुसता सल्ला देऊन न थांबता या जिवलगाने नवीन ऑफिसच्या प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य केले. प्रसंगी तासनतास वाद घातला, पण अभ्याचे स्वतःचे ऑफिस ही संकल्पना प्रत्यक्षात येईपर्यंत सर्व प्रकारची मदत केली. पैसा, भावनिक पाठबळ, तांत्रिक मदत अगदी जे जे लागेल ते ते पुरवले. त्यावेळी ह्या जिवलगाची मदत नसती तर कदाचित मी एखाद्या बारच्या काऊंटरवर दिसलो असतो. .......................... आता माझ्या या ऑफिसात सर्व प्रकारच्या अ‍ॅडव्हर्टाईझिंगची कामे केली जातात. मोठी कॅम्पेन्स अगदी प्रोफेशनली कम्प्लीट होतात. रेडिओसारख्या माध्यमाच्या अ‍ॅडस सदैव चालू असतात. त्यांचे स्क्रिप्ट्स अन क्रियेटिव्हज यामध्ये माझी मोनोपली तयार झाली आहे. न्यूजपेपर अ‍ॅडसाठी सर्व मोठ्या पेपर्सची एजन्सी आहे. सोशल मीडिया मार्केटिंग अन एसईओमध्ये बरीचशी कामे चालू असतात. फ्लेक्स अन प्रिंट हा तर माझा जुना व्यवसाय. ती कामे अगदी प्रॉपरली पूर्ण होतात. आज जुन्या चुकांची शक्यतो पुनरावृत्ती टाळली जाते. हिशोबातला पै न पै टिपला जातो. आरोग्याकडे तर अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाही. कस्टमर्सच्या कंपनीचे मोटो अन टॅगलाईन्स तयार करता करता स्वतः मात्र केवळ पुस्तकी वाक्ये न अवतरित करता काम करत राहिलो. मला जमतेय अन लोक देतायत तोपर्यंत कामे मिळत राहणारच. कामे होत राहतील, पण जोडलेली माणसे अन कमावलेला लौकिक हेच अ‍ॅसेट्स मानून सध्यातरी वाटचाल चालूय. लोक म्हणतात, बिझनेसमन म्हणजे फक्त पैसा पैसा अन पैसा करणारी जात. कमर्शिअल आर्ट म्हणजे तर शुद्ध उपयोजित कला. आर्ट फॉर पीपल. आमची प्रत्येक कलाकृती लोकांचा विचार करून साकारलेली असते. मिळणार्‍या पैशाला बांधील असते. पैसा गरजेचा आहेच, पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची.... त्या दिवशी माझ्या अपेक्षा फार म्हणजे फार कमी असतील, यात शंका नाही. ..........................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
104935 वाचन

💬 प्रतिसाद (187)

प्रतिक्रिया

अरे वल्लाह..... क्या बात है

बाबा योगिराज
Sat, 09/26/2015 - 11:30 नवीन
अरे वल्लाह..... क्या बात है संदीप भौ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

ढालान की मस्ती

राही
Sat, 09/26/2015 - 12:06 नवीन
फार सुंदर आहेत हो या ओळी. किस कदर चोटी चढ के हैं आये ! . उतारावरच कळतं किती आणि कसा चढ चढून आलोय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

ढलान

राही
Sat, 09/26/2015 - 12:09 नवीन
ढलान हवे वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

संदीपभाऊ जिंकलेत राव तुम्ही.

अभ्या..
Sat, 09/26/2015 - 13:24 नवीन
संदीपभाऊ जिंकलेत राव तुम्ही. जसे लेखन तशाच सच्च्या भावना. त्यात सोलापूरचे तुम्ही. अहाहा.
ये ढलान की मस्ती बता रही है, किस कदर चोटी, चढके है आये!
लिख लिया दिलपे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

____/\____

चांदणे संदीप
Sat, 09/26/2015 - 13:32 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आहेच आमचा अभ्यादादा भारी!

पिशी अबोली
Sat, 09/26/2015 - 11:37 नवीन
आहेच आमचा अभ्यादादा भारी! अर्थात हा लेख वाचेपर्यंत किती भारी आहे याची कल्पनापण नव्हती. __/\__ ही एवढीच प्रतिक्रिया देऊ शकते. स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी काय मेहनत, काय जिद्द आणि काय त्याग करावा लागतो याची कहाणीच वाचायला मिळाली. __/\__
  • Log in or register to post comments

मस्त चित्तरकथा !

मोहन
Sat, 09/26/2015 - 11:48 नवीन
मस्त चित्तरकथा ! तुमचे स्वप्न लवकरात लवकर पुर्ण होवो.
  • Log in or register to post comments

अभ्या.. उत्तम कलाकार आहे हे

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/26/2015 - 11:54 नवीन
अभ्या.. उत्तम कलाकार आहे हे त्याच्या मिपावरील कलाकारीने वारंवार सिद्ध झाले आहेच. पण जीवनातही त्याने इतकी "कलाकारी" दाखवून मुख्य म्हणजे "आपल्याला काय हवे हे त्याला समजले" आणि "ते समजल्यावर त्याने हातातल्या दुसर्‍या गोष्टी सोडून हवे त्याचा एककल्लीपणे पाठपुरावा केला." हे विशेष. बर्‍याच जणांना पहिली गोष्टच माहीत होत नाही आणि ज्या थोड्यांना माहीत होते त्यापैकी फारच थोड्यांना दुसरी गोष्ट करायला जमते... कारण पहिल्या गोष्टीला बुद्धी पुरते, दुसरीसाठी डोक्यात विचित्र वेड असावं लागतं ! या दोन्ही गोष्टी जमल्या की मात्र बहुदा एक जगावेगळं अजब रसायन तयार होतं. त्यातच जर अभ्या.. ला सापडला तसा तंबूला वार्‍या-वादळात बल देणारा आणि त्याचबरोबर जमीनीला घट्ट धरून ठेवणारा आधार (गोड पाश ?!) सापडला तर सोन्याहून पिवळे ! अश्या तिहेरी संगमाने कर्तृत्वाला व्यावहारीक झळाळी दिली नाही तरच आश्चर्य ! या सर्व गोष्टी खूप खूप विरळा आणि जीवनभर जीवापाड जपून ठेवाव्या अश्याच असतात ! कला, व्यावसायिक आणि वैयक्तीक आयुष्यातल्या उत्तरोत्तर उत्कर्षासाठी अभ्या.. ला अनेकानेक शुभेच्छा !!! आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची.... त्या दिवशी माझ्या अपेक्षा फार म्हणजे फार कमी असतील, यात शंका नाही. हे ज्या दिवशी विचारपूर्वक आणि समाधानाने केले जाईल त्यावेळची चित्रे पहायची मजा काही और असेल... आठवण ठेवा ! ;) :)
  • Log in or register to post comments

3 वेळा प्रतिसाद अपडेट झाला का

प्यारे१
Sat, 09/26/2015 - 12:30 नवीन
3 वेळा प्रतिसाद अपडेट झाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद डॉक्टरसाहेब.

अभ्या..
Sat, 09/26/2015 - 13:27 नवीन
धन्यवाद डॉक्टरसाहेब. तहेदिलसे (हा आम्च्या दुसर्‍या प्राडॉक्टरांचा आवडता शब्द बर्का) शुक्रीया. आणि विसरत काहीच नाही मी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अफलातून चित्तरकथा

मित्रहो
Sat, 09/26/2015 - 12:10 नवीन
__/\__ अजून काय बोलनार
  • Log in or register to post comments

क्या बात है अभ्या भाऊ....

वेल्लाभट
Sat, 09/26/2015 - 12:21 नवीन
क्या बात है अभ्या भाऊ.... कडक्कच ! कडक्कच... सलाम घ्या आमचा.....
  • Log in or register to post comments

साष्टांग दंडवत स्वीकारा

जगप्रवासी
Sat, 09/26/2015 - 12:21 नवीन
साष्टांग दंडवत स्वीकारा.
  • Log in or register to post comments

अप्रतीम!

अनुप ढेरे
Sat, 09/26/2015 - 12:27 नवीन
अप्रतीम!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा..

प्रभाकर पेठकर
Sat, 09/26/2015 - 12:34 नवीन
सुरक्षित हमरस्ता सोडून आपल्या आवडीची, काटाकुट्यांनी भरलेली, वेगळीच पायवाट चोखंदळायची आणि आत्मविश्वासाने आरामदायी महामार्गाला जाऊन मिळायचं, ह्यासाठी शरीराच्या हाडं आणि स्नायूंइतकेच मनाची हाडं आणि स्नायू दणकट असावे लागतात. कष्टसाध्य यशाचं कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे. मनमौजी आणि मस्त कलंदर कल्पनांसाठी अगदी पोटभर शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

लय भारी वो!

सुधीर
Sat, 09/26/2015 - 12:56 नवीन
मिपाच्या सुंदर बॅनर्सच्या पाठचा माणूस एवढा कलंदर आहे हे आज कळले. दंडवत!
  • Log in or register to post comments

कलाकार म्हटलं की ,त्याने ह्या

Sanjay Uwach
Sat, 09/26/2015 - 13:03 नवीन
कलाकार म्हटलं की ,त्याने ह्या मनावर कब्जा केलाच. हीच आमच्या कलानगरीची परंपरा आहे. कदाचित आपण या गोष्टीचा अनुभव ही घेतला असेल. चांगला लेख , जिद्दीला सलाम.
  • Log in or register to post comments

क्या बात है. जबरदस्त वाटचाल.

खटपट्या
Sat, 09/26/2015 - 13:15 नवीन
क्या बात है. जबरदस्त वाटचाल. कलाक्षेत्रात जायचेच हे ठरवून केवळ घरच्यांच्या धमकीमुळे कलाक्षेत्रात न गेलेला खटपट्या. कधी कधी अभ्या दादासारखेच वाटते की जे पायजे ते करावे. पण तेवढा जीगर राहीला नाही आता. फुकटचे स्वतःला बांधून घेतले....जाउदे. आम्ही साले असेच मरणार..
  • Log in or register to post comments

नाही ओ खटपट्याराव. नावातच

अभ्या..
Sat, 09/26/2015 - 13:30 नवीन
नाही ओ खटपट्याराव. नावातच खटपट का काय फक्त? असे नाही विचार करु. आपले चिगो साहेब म्हैतेत का? त्यांची स्वाक्षरी लक्षात ठेवायची. तबियतसे एक पथ्थर तो ऊछालो यारो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अभिनंदन! लै भारी

मास्टरमाईन्ड
Sat, 09/26/2015 - 13:17 नवीन
जबरदस्त आहे राव तुमची चित्तरकथा. काही गोष्टी वाचून मात्र नॉस्टॅल्जिक झालो.
  • Log in or register to post comments

सहकार्य मिळाल्यास मदत होईल

pradnya deshpande
Sat, 09/26/2015 - 13:18 नवीन
प्रथम तुमच्या जिद्दीला सलाम. प्रिंटींग व्यवसायात जम बसवणे खरच अवघड आहे. या व्यवसायात अलिकडच्या काही वर्षात किती स्पर्धा वाढली आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मीही घेतला आहे. गावगाडा आणि महानगराचा गाडा ही दोन साप्ताहिके चालवताना स्वतःची प्रिंटींग प्रेस होती. साप्ताहिकांचे काम दोनच दिवस चालत असल्याने बाहेरची प्रिंटींगची कामे घेणे सुरु केले. एक एक अनुभव येत गेले. शाई संपली त्यापासून पेपर खरेदी करण्यापर्यंत सर्वाचा हिशोब जुळवता जुळवता दमछाम व्हायची. त्यात मशिनवर काम करणारे कामगार त्यांच्या शिफ्ट आणि त्यांचे नखरे सांभाळताना अनेकदा आपणच आता हेही काम शिकून घ्यावे असे वाटायचे. पुढे पुढे तर कामगार आपल्या माघारी वैयक्तिकरित्या कामे आणून आपल्याच मशिनवर छापून देतात हे कळले तेव्हा नको हा व्यवसाय असे झाले. साप्ताहिके बंद केली त्यानंतर प्रिंटींग मशीनही विकून टाकली. दरम्यान वृत्तपत्रात पत्रकारिता सुरु असल्याने पैश्याची अडचण नव्हती. तरिही तुमच्यासारखेच स्वतःचे काहीतरी सुरु करावे ही इच्छा अजून तग धरुन आहे. नुकतीच क्रिएटीव्ह मिडीया नावाची फर्म फक्त नोंदणी करुन ठेवली आहे. इमेजबिल्डींग पासून ते पब्लीसिटीपर्यंत बरीच कामे या क्रिएटीव्ह मिडीयाच्या माध्यमातून करण्याची आखणी केली असली तरी माझे स्वतःचे एक्सपोजर आधी व्हावे या दृष्टrने कुठे अनुभव मिळतो का याचा प्रयत्न सुरु आहे. आपण मला काही मदत करु शकाल का? आपल्या फर्म मध्ये येऊन आपण कसे काम करता हे जाणून घेण्याची इच्छा आहे. आपले सहकार्य मिळाल्यास खूप मदत होईल.
  • Log in or register to post comments

अवश्य. कधीही विचारा काय हवे

अभ्या..
Sat, 09/26/2015 - 13:31 नवीन
अवश्य. कधीही विचारा काय हवे ते. जरुर सांगेन. मिपावर एखादा धागा काढलात आपण तर मिपाकरांनाही माहीती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pradnya deshpande

अप्रतिम!

पद्मावति
Sat, 09/26/2015 - 13:24 नवीन
अप्रतिम! सुरेख लिहिलंय. तुमची जिद्द, चिकाटी आणि मेहेनत, जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.
  • Log in or register to post comments

सुन्दर लेख, सगळेच - चान्गले

शेखरमोघे
Sat, 09/26/2015 - 13:57 नवीन
सुन्दर लेख, सगळेच - चान्गले तसेच वाईट - अनुभव टिपणारा! आवडला.
  • Log in or register to post comments

अभ्या भाऊ ,आवडेश !!

स्वप्निल रेडकर
Sat, 09/26/2015 - 13:59 नवीन
अभ्या भाऊ ,आवडेश !!!मी सुद्धा comercial artist आहे.सध्या एका नियतकालिक प्रकाशनामध्ये काम कर्तोय illustrator म्हणून . खूपशा आठवणी ताज्या झाल्या.अर्थात एवढी मेहनत आणि चिकाटी नवती .थोडाफार धोपटमार्गी प्रवास :) तुज्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम!
  • Log in or register to post comments

वाह...! गणेशा

द-बाहुबली
Sat, 09/26/2015 - 13:59 नवीन
वाह...! गणेशा लेखमालेनिमित्ताने मिपावर रोज असे काही वाचायला मिळत आहे की वाटते... मायला आपले अयुष्यच अजुन सुरु झालं नाहीये अनं लोक मेहनतिवर कुठच्या कुठं पोचले. और आनं दो.
  • Log in or register to post comments

कांहिना लेख वाचून डोले ओले

दिवाकर कुलकर्णी
Sat, 09/26/2015 - 14:00 नवीन
कांहिना लेख वाचून डोले ओले झाल्याची भावना झाली,मला प्रतिक्रिया वाचूनहि तीच भावना झाली,सर्व मिपाकर जरूर थट्टेखोर असतील,पण खरेतर पहिल्यांदा ते सर्हदयी आहेत हे अधोरेखित झाले
  • Log in or register to post comments

__/\__

चाणक्य
Sat, 09/26/2015 - 14:31 नवीन
साॅलिड. तुमच्या वडिलांनी दिलेला धडा फारच भारी आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देणारा तुमचा जिवलगही भारी
  • Log in or register to post comments

कथा आवडली पण मनात

विवेकपटाईत
Sat, 09/26/2015 - 14:45 नवीन
कथा आवडली पण मनात असल्याप्रमाणे जगू न शकण्याची रुखरुखहि जाणवली.
  • Log in or register to post comments

"पैसा गरजेचा आहेच, पण न जाणो

अद्द्या
Sat, 09/26/2015 - 14:58 नवीन
"पैसा गरजेचा आहेच, पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची..." ^^^ अभ्या . . हे जेव्हा वाटेल न . तेव्हा फक्त बँक बेलेंस चेक कर . . पुढील १५ -२० वर्षे तुझ्या नंतर बसून खातील एवढे पैसे असतील . तर बिनधास्त जा :) (अशीच काही स्वप्ने डोक्यात ठेऊन घासत असलेला अद्द्या)
  • Log in or register to post comments

तुमची कहाणी वाचून अशा

शिव कन्या
Sat, 09/26/2015 - 16:32 नवीन
तुमची कहाणी वाचून अशा माहितीतल्या दोनेक कलावंतांची सहज आठवण आली. असा संघर्ष, आणि त्यावरची मात! एक दिवस तुम्ही केवळ स्वतः स्वतः साठी चित्र काढू लागाल, तो दिवस लवकर उगवो,...... शुभेच्छासह.
  • Log in or register to post comments

अभ्या __/\__

नि३सोलपुरकर
Sat, 09/26/2015 - 17:34 नवीन
जिंकलस मित्रा, तुझ्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम.
  • Log in or register to post comments

खतरा जमलाय लेख. अव्वल स्ट्रगल

मृत्युन्जय
Sat, 09/26/2015 - 19:30 नवीन
खतरा जमलाय लेख. अव्वल स्ट्रगल करुन यशस्वी झालास भावा. अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभ्या :)

यशोधरा
Sat, 09/26/2015 - 19:45 नवीन
अभ्या :)
  • Log in or register to post comments

ही चित्तरकथा थेट पोहोचली!

जव्हेरगंज
Sat, 09/26/2015 - 20:03 नवीन
ही चित्तरकथा थेट पोहोचली!
  • Log in or register to post comments

मस्त रे अभ्या!

पैसा
Sat, 09/26/2015 - 20:12 नवीन
खूपच छान मनापासून लिहिलंस! लै भारी! मात्र हे सगळे वाचून लोकांनी तुला पुरता अभ्याशेट करू नये बस! या सगळ्यात एक लहान, त्याच्या वयाप्रमाणे वागणारा अभ्या आहे. कधी वाईट वाटलेलं सांगेल, तर कधी गप्पच होऊन जाईल, कधी लहान भावासारखा रुसेल, पण अगदी सच्चा, खराखुरा! कधीही हाक मारली की मदतीला हजर! खूप खूप मोठा हो अभ्या!! आत्ता कुठे सुरुवात झालीय.
  • Log in or register to post comments

हेच मनात आलं

श्रीरंग_जोशी
Sat, 09/26/2015 - 20:34 नवीन
बर्‍याच प्रतिक्रिया वाचून असं वाटलं की अभ्याकडे पाहण्याची लोकांचा दृष्टीकोन बदलतोय की काय? माझ्या नशिबाने मला काही मोठमोठ्या कलावंतांबरोबर निवांत वेळ घालवता आला आहे. ती बहुतेक मंडळी सामान्य माणसांप्रमाणे वागणूक मिळण्यासाठी तरसत असतात. अभ्याला त्याच्या आनंदासाठी चित्रे काढायला निवांतपणा मिळत नाही याबाबत सहानुभूती व्यक्त केली जात आहे. बहुधा त्यालाही ते अपेक्षित नसावे. अशा अवलिया कलाकाराला अन कर्तॄत्ववान माणसाला त्याच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सदिच्छा जरुर व्यक्त करावी परंतु तिचे रुपांतर सहानुभूतीमध्ये झाल्यास त्यालाही ते त्रासदायकच असेल. हे माझ स्वतःचं मत आहे इतरांना पटायलाच हवं असा आग्रह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खुप छान लेख.तुमच्या मेहनतीचे

इशा१२३
Sat, 09/26/2015 - 20:34 नवीन
खुप छान लेख.तुमच्या मेहनतीचे कौतुक.
  • Log in or register to post comments

|| तेथे कर माझे जुळती ||

चौथा कोनाडा
Sat, 09/26/2015 - 20:40 नवीन
|| तेथे कर माझे जुळती || प्रवाहा विरुद्ध पोहत धडपडत खरचटत केलेल्या प्रवासाची कलात्मक सुंदर कहाणी ! स्पेसिफिक अन पॉवरफुल लेखन ! अभ्यादादा च्या लेखनास सलाम !
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलेस अभ्या , खुप मोठा

पियुशा
Sat, 09/26/2015 - 20:55 नवीन
मस्त लिहिलेस अभ्या , खुप मोठा हो गूणी कलाकार आहेस:)
  • Log in or register to post comments

दंडवत रे अभ्या..

पिंगू
Sat, 09/26/2015 - 21:19 नवीन
दंडवत रे अभ्या..
  • Log in or register to post comments

keep up the passion !!

नीलमोहर
Sat, 09/26/2015 - 23:37 नवीन
खूप काही लिहायचंय पण आत्ता शब्द साथ नाही देत आहेत त्यामुळे.... "रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे चल के मिलेंगे साये बहार के ओ राही, ओ राही नैन आंसू जो लिये हैं, ये राहों के दिये हैं लोगों को उनका सब कुछ देके तू तो चला था सपने ही लेके कोई नहीं तो तेरे अपने हैं सपने ये प्यार के सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के साथी ना कारवाँ है, ये तेरा इम्तिहान है यूँ ही चला चल दिल के सहारे करती है मंजिल तुझ को इशारे देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के." ................
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Sun, 09/27/2015 - 08:38 नवीन
लेख आवडला. श्रीगणेश लेखमालेच्या निमित्ताने चाकोरीबाहेरच्या वाटा जिद्दीने चोखाळलेल्यांचे जे अनुभव वाचायला मिळत आहेत, त्यांची रेंज थक्क करणारी आहे!
  • Log in or register to post comments

फारच प्रेरणादायी

सौन्दर्य
Sun, 09/27/2015 - 11:42 नवीन
अभ्या जी नमस्कार. लेख वाचून अंगावर रोमांच उभे राहिले. तुमची जिद्द, आवड आणि ती पूर्ण करण्यासाठी उपसलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. तुमचा हा लेख वाचून असंख्य होतकरू कलाकारांना स्फूर्ती मिळेल ह्यात शंकाच नाही. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभ्या..

लाल टोपी
Sun, 09/27/2015 - 14:16 नवीन
तुझा संपूर्ण प्रवास जबरा रेखाट्ला आहे. गेली काही वर्षे मिपावर फिरेलेले कौशल्यपूर्ण हात दिसले होते त्यामागचा माणूस आज दिसला. लेखन खूप आवडले भविष्याबद्दल केलेला विचारही एका कलाकाराला शोभेल असाच आहे. (आंजावर वावरतांना पहिल्यांदाच 'अरे.. तुरे.. अगदी जवळचा मित्र असावा अशी भाषा वापरली आहे..कारण या लेखनात खरच अगदी जवळचा मित्र संवाद साधतो आहे असे वाटले आणि तुला हा आगाऊपणा वाटणार नाही याची खात्री आहे).
  • Log in or register to post comments

अर्थात लाल टोपी सर.

अभ्या..
Sun, 10/04/2015 - 12:46 नवीन
अर्थात लाल टोपी सर. मला आवडेल अभ्या म्हणलेले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

जहबर्‍या रे अभ्या.....!

प्रास
Sun, 09/27/2015 - 15:42 नवीन
जहबर्‍या रे अभ्या.....! ___/!\___
  • Log in or register to post comments

पण न जाणो एक दिवस माझा कलंदर

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/27/2015 - 16:03 नवीन
पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची.... त्या दिवशी माझ्या अपेक्षा फार म्हणजे फार कमी असतील, यात शंका नाही.
एक कडकडून मिठी मारलेली आहे तुला.. या वाक्यांसाठी.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा, या लेखमालेतील

आनंदी गोपाळ
Sun, 09/27/2015 - 21:10 नवीन
पुन्हा एकदा, या लेखमालेतील भिडलेला लेख. कदाचित अनुभवकथनशैलीपेक्षा, अनुभवांच्या सच्चेपणामुळे अन त्या अनुभवांचे अनप्रिटेंशियस साधे सरळ वर्णन करण्यामुळे जास्त भावला. बरंच काही लिहावसं वाटतं आहे, पण दोन बाबी इथे सांगू इच्छितो. पहिलं, चौथीत असतानाच उत्तम रंग/कागद हाताळायला मिळाले ते तीर्थरूपांना 'कौतुक' असल्याने. हा पहिला धडा, दुसरा व्यायामाचा त्यांनीच दिला असावा, अन तिसरा फायनान्स मॅनेजमेंटचा, जेव्हा ५० हजार मागितले ते कसे कमवावेत याचा वस्तूपाठ दिला. मला खात्री आहे, असे अनेक धडे त्यांनी दिले असतील. बाप यासाठी असावा लागतो. तो गेल्यावर आकाशातल्या बापाचे महत्व कळते. आपल्या तीर्थरूपांना दंडवत कळवा. दुसरं, थोडं मुक्त चिंतन. तुमच्या एस्टॅब्लिश होतानाच्या फायनान्शिअल गटांगळ्या वाचून. (मीही असाच शिकलोय ही बाब अलाहिदा) सेल्फ एंप्लॉयमेंट फील्ड्समधे 'धंदा' कॉलेजात का शिकवत नाहीत कुणास ठाऊक. यार, मी जर उदा. डॉक्टर होणारे, त्याचंच प्रोफेशनल ट्रेनिंग घेतोय. त्यानंतर स्वतःचं दुकान मांडणार आहे हे निश्चित. मग त्या दुकानात विकायचा माल बनवायचं ट्रेनिंग देता, तसं थोडं तरी धंदा चालवायचं ट्रेनिंग द्या की? धर्म अर्थ काम मोक्ष.. धर्म मार्गाने अर्थार्जन करावे, हे नीट शिकवायला प्रॉब्लेम कुठंय? (धर्म= कायदा, सरळ मार्ग. चोरी कधी करू नये, खोटे कधी बोलू नये इ. धारयति इति धर्मः.. या अर्थाने) साला आयुष्यातल्या गरजेच्या बाबी शाळेत नीट शिकवाव्या हे कधी कळेल आपल्याला? असो. कमर्शिअल आर्ट्स फिल्डमधली आपली वाटचाल आपण मांडलीत, तशाच यातील इंटरेस्टिंग गोष्टी, ज्यामुळे या क्षेत्रात नव्या मुलांना रस उत्पन्न होईल, तसेच नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या मुलांना मार्गदर्शक होतील अशा काही बाबी लिहिल्यात तर अधिक आनंद होईल.
  • Log in or register to post comments

आयुष्यातल्या गरजेच्या बाबी शाळेत नीट शिकवाव्या......

मुक्त विहारि
Mon, 09/28/2015 - 03:05 नवीन
हे कधी कळेल आपल्याला?" +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा