बिल्ला
शाळेत सायंकाळी पाचचे टोल पडले आणि गण्या, किशा, दिल्या, दस-या, जया ही सगळी चौथीतली पोरे इतरांना ढकलत रस्त्याला लागली. आज गण्या खूप खूष होता. निबंध स्पर्धेत पहीला नंबर आल्यामुळे त्याला पन्नास रुपयांचे बक्षिस मिळाले होते. कधी एकदा आईला सांगतो असे त्याला झाले होते.
"ए गण्या, सांग ना, पन्नास रुपयांचे काय करणारे.." - किशा.
"लय मजा करणारे "- गण्या , " आपल्या सु-याकडं टॉय टॉय करणारी गाडी हाय ना, तशी आणनार हे. ती गाडी गर्कन वळती आन उल्टी उडी बी मारती. मला लय आवडती ती गाडी पण सु-याचा आजा मला हात लावून देत नाय. सु-याला म्हणतो, ते गरीबाचं पॉर हे, रोज आंघूळ बी करीत नाय, तेला हात लावून दिऊ नको.आता त्याला दाखवतोच "
"अजून काय करणारे? " दिल्या.
"अजून? पांडबाच्या हाटेलात भरपेट जिल्बी खाणारे.कवा खाल्लीच नाय" - गण्या.
"आजून ? "
" एक बिल्ला घेणारे खिशावर लावायला. लय भारी वाटतं. लाल निळा गोल बिल्ला आन तेच्याखाली दोन तिरक्या रिबीनी." गण्या.
"हॅ ! बिल्ल्यात कशाला पैशे घालवतो? गुर्जी म्हणले की जो चांगलं काम करील, त्याला हेडमास्तरांच्या हातानी सगळ्यांसमोर बिल्ला लावण्यात यील म्हणून. " दस-या.
"खरंच? चांगलं काम केल्यावर हेडमास्तर बिल्ला लावतील मला? " गण्या.
"खरंच. गोटयानी नाय का परवा एका म्हता-याला यष्टी स्ट्यांडपर्यंत हात धरून नेलं. दिवसभर बिल्ला लावून लय भाव मारत होता." दस-या.
"असं करू ना, " जया, " माझ्याकं फळी हे. बारक्या सुतार म्हंटला वीस रुपयात चांगली बॅट बनवून देतो. पण आय नाही म्हणती. बॅट करायची का? दररोज खेळायला व्हईल "
"बेष्ट आयडीया. पण मी कॅप्टन बरका !" गण्या.
सगळ्या पोरांनी मान डोलावली. घर आलं तसं गण्या "आई ..." हाक मारत सुसाट स्वयपाक घरात घुसला.
चूल बंद दिसत होती. आई आणि तायडी चूलीसमोर चिंताग्रस्त चेह-यानी बसली होती. तायडीने गण्याला चापले,"गण्या, रोजच्यासारखं आल्या आल्या भूक लागली म्हणून आईमागं भूनभून करू नको. आज घरात एक दाणा बी शिल्लक नाय आन आईला आज मजुरीबी मिळाली नाय."
दुस-या दिवशी गण्या शाळेत बिल्ला लावून फिरत होता.
वाचन
17453
प्रतिक्रिया
0