आई मला लहानपणी मांडीवर घेऊन थापटायची. मी तिचा पदर अंगभर पांघरून घ्यायचो. तिच्या पदरात जगातील मी फारच सुरक्षित व्यक्ती आहे, असे मला वाटायचे. ती मला प्रेमाने विचारीत असे, 'तू मोठेपणी कोण होणार ?' माझे मात्र उत्तर ठरलेलं, 'सुतारमामा!' मग मात्र तिचा माझ्या तोंडावर, नाकावर थोपटण्याचा वेग वाढायचा. "जळलं मेलं तुझं लक्षण! परत अस कुणाला सांगू नकोस," असं ती म्हणायची.
मला मात्र याचे कधीच वाईट वाटले नाही. माणसाला ज्या गोष्टी कराव्याश्या वाटतात त्या त्याने मनसोक्तपणे कराव्यात. लहानपणी सुतार व्यवसायाचे मला खूपच आकर्षण होते. एखाद्याच्या घरी गाडी आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे या पेक्षा त्यांच्या घरी हातोडा आहे, करवत आहे, खिळे आहेत अशी माणसे मला खूप श्रीमंत वाटायची. पूर्वी वडलांनी आईला शिलाई मशीन आणून दिले होते. त्यासोबत एक इन्स्ट्रुमेंट बॉक्स मिळाला होता. मशीनपेक्षा तो बॉक्स मला खूप महत्त्वाचा वाटायचा. त्या मधले लहान मोठे पान्हे, छोटे छोटे स्क्रू ड्रायव्हर, तेलाची बुधली, हे सर्व प्रकार पाहून माझे मन मोहून जायचे.
एकदा एक सुतारमामा आमच्या घरी कामासाठी आले होते. काही कारणाने ते चार दिवस कामावर येणार नव्हते. मात्र त्यांनी आपली सर्व हत्यारे आमच्या घरातच ठेवली होती. ही संधी म्हणजे माझ्यासाठी मोठी पर्वणीच होती. त्यांनी पाठ फिरवताच मी त्यांची सर्व हत्यारे बाहेर काढली. मग काय, खुल जा सिम सिम... लाकडी जिन्याला मारलेली एक कांबट काढली, त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याची एक ओबडधोबड खुर्ची तयार केली. हाताला खूप ठिकाणी जखमा झाल्या. ती खुर्ची ओबडधोबड असली, तरी ती जगातील मोठा आनंद देणारी एक पहिली कलाकृती होती. पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी जरी ती माझ्याकडे मागितली असती, तरी मी त्यांना ती दिली नसती. कौतुकाने मी लोकांना घरी बोलावून ती खुर्ची दाखवत असे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असत.
'ही काय कैद्यांना फाशी देण्यासाठी तयार केलेली खुर्ची आहे वाटतं?'
तर कोणी म्हणे, "सांभाळून ठेव म्हातारपणी, बाथरूम मध्ये वापरता येईल". मला मात्र त्यांच्या प्रतिक्रियेची अजिबात पर्वा नव्हती.
आमच्या घराजवळ काही सुतार मंडळींचा ठिय्या होता. ते काम करीत असताना, मी तासनतास ते पाहत असे. त्या ठिकाणी बसण्याची परवानगी द्यावी, म्हणून मी त्यांची बारीकसारीक कामेही करीत असे. त्यांची कामे पाहता पाहता मी इतका तल्लीन होत असे, की हळूहळू त्यांच्या खूपच जवळ जात असे. मग मात्र ते ओरडत, 'ए बाळ, मागे सरक. नाहीतर पंचतंत्रातल्या माकडा प्रमाणे शेपूट फटीत अडकवून घेशील!" त्यांचे काम पाहणे माझ्या साठी दिव्य चमत्कार असायचा. ही माणसे एवढा मोठा ओंडका कसा काय कापतात, याचे मला फार कुतूहल वाटायचे. त्यांची आरी चालताना भुरूभुरू उडणारा चुरा लग्नात पडणार्या अक्षतांसारखा वाटायचा आणि त्यातून निघणारा तो ओल्या लाकडाचा वास. काय विचारू नका! सध्या बाजारात मिळणार्या कोणत्याही सेंटची तुलना त्याच्या बरोबर होणार नाही. लाकूड कापल्यानंतर त्या वर उमटलेली ती कलाकृती म्हणजे, या विधात्याने मुक्त हस्ताने रंगवलेले अप्रतिम रंगछटांचे प्रदर्शन ! त्यातील काळ्या, पिवळ्या, तपकिरी छटा अशा काही चितारलेल्या असतात की माणूस त्यावर प्रेमाने हळुवार हात फिरवतो. लाकडात असणारी गाठ देखील एक सुंदर कलाकृती बनून जाते.
जवळजवळ सर्वच सुतार मंडळींचा पेहराव हा एक विशिष्ट पद्धतीचा असतो. अंगात फुल बाह्यांचा बनियन, त्याला एक दोन भोके, आखूड विजार व पायात पट्टीला सेफ्टीपीन लावलेली स्लीपर! चष्म्याच्या दोन भिंगांमधील काडीला ही मंडळी चिंधी का गुंडाळतात कुणास ठाऊक? काम करीत असताना चष्मा मागे पुढे होऊन नाकाची झीज होऊ नये म्हणून केलेली ही उपाययोजना असावी. यांची चहा पिण्याची पद्धत ब्रिटिशांनाही लाजवेल अशी असते. कधीही कुठलाही सुतार आपल्या सारखा डायरेक्ट चहा पिणार नाही. चहाचे आधी तांब्याभर पाणी घेणार, मग चार पाच चुळा भरणार, मग थोडे पाणी तोंडावर मारून घेणार, मग तांब्याने वरून गटागटा पाणी पिणार, मग कपातील सर्व चहा बशीत ओतून फुरका मारत चहा रिचवणार.. काम करताना ही मंडळी तोंडात खिळे धरतात. ते पाहिले की बघणाऱ्याचा हात भितीने तोंडावर जातो. ज्या प्रमाणे विवाहित स्त्रीला मंगळसूत्र गळ्यात घालणे बंधनकारक असते, त्या प्रमाणे कानात पेन्सिल ठेवणे हे सुतार लोकांना बंधनकारक असावे. कानावर पेन्सिली न ठेवणारा सुतार म्हणजे विना तिकिट प्रवास करणारा प्रवासी होय! एवढ्या पसार्यात त्यांची पेन्सिल कधीच हरवत नाही व सुरक्षितही राहते.
कधी कधी असे वाटते, की हा विधाता हातात आरी घेतलेला विश्वकर्मा तर नाही ना? तो कधी कुणाला वाकवेल तर कधी कुणाला सरळ करेल, कधी तुटलेले जोड हळुवार जोडेल, तर विरुद्ध ठोकळ्यांचा असा जोड मारेल की जन्मभर एकत्र राहावे लागेल. हे सर्व करीत असताना, त्या विश्वकर्म्याचे हात मात्र कधीच कुणाला दिसले नाहीत!
वाचने
7134
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! छान लिहिलंय मुक्तक.
सुतारमामा
वाह छानच
चांगले लिहिले आहे.
छान लिहिलंय!
सुंदर लघुनिबंध! धन्यवाद!
मलाही लहानपणी सुतारकाम खूप
आवडलं!
आवडलं :)
नेटके अन सुबक लेखन.
खूप छान!
एक चांगले
मलाही शाळेत जाता येता , एका
वा.. रिप्लाय आवडला...
In reply to मलाही शाळेत जाता येता , एका by जयन्त बा शिम्पि
आपले निरीक्षण व लिखाण अफलातून आहे.
मी सुद्धा लहाणपणापासून
छान, असेच लिहीत रहा...त्यातून
अत्तिशय मस्स्स्स्स्स्त वाटलं
खूप मस्त लेखन, मलाही
तर्रीच
In reply to खूप मस्त लेखन, मलाही by बॅटमॅन
तरीच
तू अगदी "तासतोस" कधी कधी !!!! प्रेक्षक रांग क्र ३ असान क्र ७धन्यवाद!
अप्रतिम मुक्तक.. मनापासुन
मस्त लिहिलंय. लिहीत रहा!
छान.. सुंदर लिहिले आहे. मलाही
वा ! आवडला लेख , लिहीत रहा.
आमच्या घरी काम करणारे सुतार काका आठवले
श्री. संजय, तुम्हाला या
मनां पासुन आभार,
In reply to श्री. संजय, तुम्हाला या by जयंत कुलकर्णी
निरीक्षणशक्तीला दाद दिलीच
निरीक्षणशक्तीला दाद दिलीच
मनां पासुन आभार,
बक्षिस आणि त्याला दिलेली दाद.
In reply to मनां पासुन आभार, by Sanjay Uwach
छान लिहिलंय... :-)
चांगल लिहिलय
सुंदर लेख..
विश्वकर्मा पूजा
अप्रतिम!
लेख मस्तच...