Skip to main content

तू एक विश्वकर्मा

लेखक Sanjay Uwach यांनी मंगळवार, 16/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आई मला लहानपणी मांडीवर घेऊन थापटायची. मी तिचा पदर अंगभर पांघरून घ्यायचो. तिच्या पदरात जगातील मी फारच सुरक्षित व्यक्ती आहे, असे मला वाटायचे. ती मला प्रेमाने विचारीत असे, 'तू मोठेपणी कोण होणार ?' माझे मात्र उत्तर ठरलेलं, 'सुतारमामा!' मग मात्र तिचा माझ्या तोंडावर, नाकावर थोपटण्याचा वेग वाढायचा. "जळलं मेलं तुझं लक्षण! परत अस कुणाला सांगू नकोस," असं ती म्हणायची. मला मात्र याचे कधीच वाईट वाटले नाही. माणसाला ज्या गोष्टी कराव्याश्या वाटतात त्या त्याने मनसोक्तपणे कराव्यात. लहानपणी सुतार व्यवसायाचे मला खूपच आकर्षण होते. एखाद्याच्या घरी गाडी आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे या पेक्षा त्यांच्या घरी हातोडा आहे, करवत आहे, खिळे आहेत अशी माणसे मला खूप श्रीमंत वाटायची. पूर्वी वडलांनी आईला शिलाई मशीन आणून दिले होते. त्यासोबत एक इन्स्ट्रुमेंट बॉक्स मिळाला होता. मशीनपेक्षा तो बॉक्स मला खूप महत्त्वाचा वाटायचा. त्या मधले लहान मोठे पान्हे, छोटे छोटे स्क्रू ड्रायव्हर, तेलाची बुधली, हे सर्व प्रकार पाहून माझे मन मोहून जायचे. एकदा एक सुतारमामा आमच्या घरी कामासाठी आले होते. काही कारणाने ते चार दिवस कामावर येणार नव्हते. मात्र त्यांनी आपली सर्व हत्यारे आमच्या घरातच ठेवली होती. ही संधी म्हणजे माझ्यासाठी मोठी पर्वणीच होती. त्यांनी पाठ फिरवताच मी त्यांची सर्व हत्यारे बाहेर काढली. मग काय, खुल जा सिम सिम... लाकडी जिन्याला मारलेली एक कांबट काढली, त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याची एक ओबडधोबड खुर्ची तयार केली. हाताला खूप ठिकाणी जखमा झाल्या. ती खुर्ची ओबडधोबड असली, तरी ती जगातील मोठा आनंद देणारी एक पहिली कलाकृती होती. पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी जरी ती माझ्याकडे मागितली असती, तरी मी त्यांना ती दिली नसती. कौतुकाने मी लोकांना घरी बोलावून ती खुर्ची दाखवत असे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असत. 'ही काय कैद्यांना फाशी देण्यासाठी तयार केलेली खुर्ची आहे वाटतं?' तर कोणी म्हणे, "सांभाळून ठेव म्हातारपणी, बाथरूम मध्ये वापरता येईल". मला मात्र त्यांच्या प्रतिक्रियेची अजिबात पर्वा नव्हती. आमच्या घराजवळ काही सुतार मंडळींचा ठिय्या होता. ते काम करीत असताना, मी तासनतास ते पाहत असे. त्या ठिकाणी बसण्याची परवानगी द्यावी, म्हणून मी त्यांची बारीकसारीक कामेही करीत असे. त्यांची कामे पाहता पाहता मी इतका तल्लीन होत असे, की हळूहळू त्यांच्या खूपच जवळ जात असे. मग मात्र ते ओरडत, 'ए बाळ, मागे सरक. नाहीतर पंचतंत्रातल्या माकडा प्रमाणे शेपूट फटीत अडकवून घेशील!" त्यांचे काम पाहणे माझ्या साठी दिव्य चमत्कार असायचा. ही माणसे एवढा मोठा ओंडका कसा काय कापतात, याचे मला फार कुतूहल वाटायचे. त्यांची आरी चालताना भुरूभुरू उडणारा चुरा लग्नात पडणार्‍या अक्षतांसारखा वाटायचा आणि त्यातून निघणारा तो ओल्या लाकडाचा वास. काय विचारू नका! सध्या बाजारात मिळणार्‍या कोणत्याही सेंटची तुलना त्याच्या बरोबर होणार नाही. लाकूड कापल्यानंतर त्या वर उमटलेली ती कलाकृती म्हणजे, या विधात्याने मुक्त हस्ताने रंगवलेले अप्रतिम रंगछटांचे प्रदर्शन ! त्यातील काळ्या, पिवळ्या, तपकिरी छटा अशा काही चितारलेल्या असतात की माणूस त्यावर प्रेमाने हळुवार हात फिरवतो. लाकडात असणारी गाठ देखील एक सुंदर कलाकृती बनून जाते. जवळजवळ सर्वच सुतार मंडळींचा पेहराव हा एक विशिष्ट पद्धतीचा असतो. अंगात फुल बाह्यांचा बनियन, त्याला एक दोन भोके, आखूड विजार व पायात पट्टीला सेफ्टीपीन लावलेली स्लीपर! चष्म्याच्या दोन भिंगांमधील काडीला ही मंडळी चिंधी का गुंडाळतात कुणास ठाऊक? काम करीत असताना चष्मा मागे पुढे होऊन नाकाची झीज होऊ नये म्हणून केलेली ही उपाययोजना असावी. यांची चहा पिण्याची पद्धत ब्रिटिशांनाही लाजवेल अशी असते. कधीही कुठलाही सुतार आपल्या सारखा डायरेक्ट चहा पिणार नाही. चहाचे आधी तांब्याभर पाणी घेणार, मग चार पाच चुळा भरणार, मग थोडे पाणी तोंडावर मारून घेणार, मग तांब्याने वरून गटागटा पाणी पिणार, मग कपातील सर्व चहा बशीत ओतून फुरका मारत चहा रिचवणार.. काम करताना ही मंडळी तोंडात खिळे धरतात. ते पाहिले की बघणाऱ्याचा हात भितीने तोंडावर जातो. ज्या प्रमाणे विवाहित स्त्रीला मंगळसूत्र गळ्यात घालणे बंधनकारक असते, त्या प्रमाणे कानात पेन्सिल ठेवणे हे सुतार लोकांना बंधनकारक असावे. कानावर पेन्सिली न ठेवणारा सुतार म्हणजे विना तिकिट प्रवास करणारा प्रवासी होय! एवढ्या पसार्‍यात त्यांची पेन्सिल कधीच हरवत नाही व सुरक्षितही राहते. कधी कधी असे वाटते, की हा विधाता हातात आरी घेतलेला विश्वकर्मा तर नाही ना? तो कधी कुणाला वाकवेल तर कधी कुणाला सरळ करेल, कधी तुटलेले जोड हळुवार जोडेल, तर विरुद्ध ठोकळ्यांचा असा जोड मारेल की जन्मभर एकत्र राहावे लागेल. हे सर्व करीत असताना, त्या विश्वकर्म्याचे हात मात्र कधीच कुणाला दिसले नाहीत!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7134
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

सुतारमामांच्या आठवणी आपण छान रंगवल्यात. छोट्या माणसांच्या डोक्यातले सगळे चांगले प्लॅन्स मोठे होतांना मागे राहुन जातात, हेही आलेच.

सुतारांचे चित्रण आवडले. तुमच्या निरीक्षणशक्तीला दाद द्यावीशी वाटते. लहानपणी मलाही सुतार, गवंडी वगैरे कारागिरांच्या कामाचे निरीक्षण करायला आवडायचे.

मलाही लहानपणी सुतारकाम खूप आवडायचे, आता आमच्या पिलूला आवडते - ह्या वाढदिवसाला टूलबॉक्स पाहिजे अशी फर्माईश आहे! :-) थोरोने वॉल्डेनमध्ये लिहिले आहे - सुतारकामात इतका आनंद आहे, तो आपण सुताराला का देतो काय माहित? लिखाण आवडले, छान लिहिले आहे! :-)

मलाही शाळेत जाता येता , एका पेन्टरच्या दुकानासमोर तास न तास , तो पेंटिंग कसा करतो, अक्षरे कशी काढतो , अक्षरांना वळणदार कसे बनवितो, हे पहाण्याची संवय लागली होती. त्यामुळे माझा आयुष्यात सर्वात मोठा फायदा झाला , तो म्हणजे माझे अक्षर खूप म्हणजे खूपच सुधारले. धुळे येथे गल्ली नं. ५ व पारोळा रोड च्या कॉर्नरला , विट्ठल पेन्टर चे दुकान होते. शाळेत असतांना इयत्ता १ ली ते तीसरी पावेतो कित्ता वही गिरवल्याने , अक्षर सुंदर व छान कसे येइल ह्याचाच विचार माझ्या मनी असायचा. आज त्या निरिक्षणाचा फार फायदा झाला आहे. आज सारेजण माझ्या अक्षराची वाहवा करतात.

आपले निरीक्षण व लिखाण अफलातून आहे. माझ्या अनेक स्वप्नांपैकी हे एक स्वप्न होते. सुदैवाने घरात ही सगळी हत्यारे असल्याने घरातील छोटीमोठी सुतारकामे करत असतो. त्यातून निघणारा तो ओल्या लाकडाचा वास. काय विचारू नका! सध्या बाजारात मिळणार्‍या कोणत्याही सेंटची तुलना त्याच्या बरोबर होणार नाही. अगदी खरे आहे. मलाही हा वास व भुसा आवडतो मी तो जपून ठेवतो, भुशात थोडे फेविकॉल घालून लाकडाची मोठी छिद्रे बुजवता येतात. सुतारमामा नेहमीच पटाशीने पेन्सिलला टोक करतात. ब्लेड किंवा शार्पनरचा वापर कधीही करत नाही. सुतारमामांची वामकुक्षी फक्त १५ मिनिटाचीच असते परंतू आडवे पडल्याबरोबर गाढ झोपी जातात व टायमर लावल्याप्रमाणे १५ मिनिटांनी उठून कामाला लागतात. मला नेहमीच ह्या दोन्ही गोष्टिंचे कुतूहल वाटते. आपला लेख खुपच आवडला.पावसामुळे हा लेख वाचताना वेगळाच फील येतो.

मी सुद्धा लहाणपणापासून सुतार्मामा पहात आले आहे. आम्ही तर आळीपाळीने त्यांची करवत दुसर्‍या टोकाला धरायचो, आणि त्या खसक्याने पुढे मागे धडपडायचो. मग करवत तुटेल म्हणुन हात सोडावा लागायचा.

छान, असेच लिहीत रहा... त्यातून निघणारा तो ओल्या लाकडाचा वास. काय विचारू नका! सध्या बाजारात मिळणार्‍या कोणत्याही सेंटची तुलना त्याच्या बरोबर होणार नाही. वुडी फ्रेग्रंन्स्ची अत्तरे मिळतात... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

अत्तिशय मस्स्स्स्स्स्त वाटलं वाचतांना! @ त्यांची आरी चालताना भुरूभुरू उडणारा चुरा लग्नात पडणार्या अक्षतांसारखा वाटायचा आणि त्यातून निघणारा तो ओल्या लाकडाचा वास. काय विचारू नका! सध्या बाजारात मिळणार्या कोणत्याही सेंटची तुलना त्याच्या बरोबर होणार नाही.>> :-D __/\__ :-D

खूप मस्त लेखन, मलाही टेक्निकलमध्ये सुतारकामच लय आवडायचे-यद्यपि रंधा इ. कधी धड जमले नसले तरी.

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार! इंटरनेटची ओळख झाल्यानंतर हळूहळू इतर गोष्टीही समजून घेतो आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी, तुमच्या प्रोत्साहनाने अधिक हुरुप येतो. तुमच्या सूचना लेखनाला अधिक निर्दोष बनवतील.. धन्यवाद.

छान.. सुंदर लिहिले आहे. मलाही लहानपणी घरात सुतारकाम चालू होते तेव्हा ते पाहायला फार आवडायचे. इन्जिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला लेथ मशीन वापरुन एका लाकडी तुकड्यावर छान कलाकुसर करायला मिळाली होती, आणि ते पूर्ण झाल्यावर काय समाधान मिळाले होते!

श्री. संजय, तुम्हाला या लिखाणाबद्दल खालील विश्र्वकर्म्याच्या मुर्तीचे चायचित्र बक्षीस ! ही मुर्ती मोधेराच्या सूर्यमंदीरात आहे. विश्र्वकर्म्याची मी पाहिलेली ही एकमेव मुर्ती. याच्या हातातील पट्टीवरील आकडे स्पष्ट दिसतात...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire

In reply to by जयंत कुलकर्णी

जंयवंतराव,आपण माझ्या पहील्याच लेखाला दिलेले बक्षिस पाहून ,माझे मन खुप भाराउन गेले आहे. ह्या विश्वकर्माच्या मुर्ति पासून, आपण प्रत्येक गोष्ट सुबक,बिनचुक व आकृतीबंध कशी करता येइल याची प्रेरणा घेउया.आपण दिलेले हे बक्षिस मी माझ्या ह्र्दयाच्या कोपर्‍यात जन्मभर सांभाळून ठेवीन व आणखीन चांगले लिहण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद. - संजय वाशीकर.

जंयतराव,आपण माझ्या पहील्याच लेखाला दिलेले बक्षिस पाहून ,माझे मन खुप भाराउन गेले आहे. ह्या विश्वकर्माच्या मुर्ति पासून, आपण प्रत्येक गोष्ट सुबक,बिनचुक व आकृतीबंध कशी करता येइल याची प्रेरणा घेउया.आपण दिलेले हे बक्षिस मी माझ्या ह्र्दयाच्या कोपर्‍यात जन्मभर सांभाळून ठेवीन व आणखीन चांगले लिहण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद. - संजय वाशीकर.

अत्यंत सुंदर मुक्तक..
कधी कधी असे वाटते, की हा विधाता हातात आरी घेतलेला विश्वकर्मा तर नाही ना? तो कधी कुणाला वाकवेल तर कधी कुणाला सरळ करेल, कधी तुटलेले जोड हळुवार जोडेल, तर विरुद्ध ठोकळ्यांचा असा जोड मारेल की जन्मभर एकत्र राहावे लागेल. हे सर्व करीत असताना, त्या विश्वकर्म्याचे हात मात्र कधीच कुणाला दिसले नाहीत!
हे खासच..
चष्म्याच्या दोन भिंगांमधील काडीला ही मंडळी चिंधी का गुंडाळतात कुणास ठाऊक? काम करीत असताना चष्मा मागे पुढे होऊन नाकाची झीज होऊ नये म्हणून केलेली ही उपाययोजना असावी.
हाच प्रश्न मला पण पडायचा.. घामाने चष्मा घसरु नये, म्हणून घाम टीपायला केलेली सोय असेल कदाचीत. अवांतर : असाममधे 'विश्वकर्मा पुजा' असते.. मला वाटतं, असाम/बंगाली लोक सोडल्यास इतर कुठे ती होत नसावी..

लेख आवडला. सुतार कामातील करवतीचा आवाज माझा सर्वात प्रिय !!!!!!! चूक असो व खिळा ठोकतांना त्यांचे घाव लयीत पडतात न थांबता….व ते अस्मादिकास करण्यास जमते म्हणून काय तो आनंद……… विश्वकर्मा पूजा हि दसर्याच्या अगोदर बहुतांश कारखान्यात करतात. मी स्वतः महाराष्ट्रात बदलापूर MIDC त असतांना केलेली आहे

छान लेख. निरीक्षणशक्ती भारीच !