त्यानंतर मधून मधून संध्याकाळी परड्यात वैनी दिसू लागली . कधी विहिरीवर पाणी भरताना तर कधी झाडताना . ती दिसली की आम्ही मोठ्ठ्यानं गलका करू, "वैनी अंजीर , वैनी अंजीर ." ती बिचारी अंजीर ओच्यात वेचून घेऊन येई . आमचा अंजीरांचा खुराक पुन्हा सुरु झाला . काही दिवसात आमची आणि वैनीची गट्टी जमली. अलीकडे बळवंतराव लवकर घरी येई . मग तो आणि वैनी फिरायला बाहेर पडत. ती दोघं निघाली की इकडे सरूच्या तोंडाचा पट्टा चालू होई , " आता आइसक्रीम खातले , आमका नाय देवचे . परवा ह्यो गुळयाचे भजे घेऊन इल्लो . खोलीत जाऊन दोघा गुपचूप खाय होती . आमका एक पण देउक नाय , माका वास इलो. खावा खावा, किती खातलास ते " वगैरे वगैरे . आमचा चांगला टाईम पास होई . पण हे फार काळ चाललं नाही . वर्षभरात लग्नाची नवलाई संपली आणि बळवंतराव पुन्हा उशिरा घरी येऊ लागला . वैनी रोज संध्याकाळी परडं झाडताना दिसू लागली .
वैनी एकदम साधी होती . लग्न होईपर्यंत ती एकदाही तिच्या खेड्याबाहेर गेली नव्हती . त्यामुळे तिला आमच्या गावातल्या सगळ्याच गोष्टींच अप्रूप वाटे . आमच्यापैकी कुणी मुंबईला किंवा कोल्हापूरला वगैरे जाऊन आल्याचं कळलं की त्याला तिथले रस्ते , दुकाने, बिल्डीन्गी, पार्कं वगैरे बद्दल ती विचारत बसे. एकूणच तिला लहान मुले आवडत. पण तिथून आल्यावर सगळी मोठी मुलं विचारत, ' काय रे ? वैनी बरोबर गूळ काढी होतं काय ?"
याचा अर्थ कळत नव्हता , घरी विचारायची तर सोयच नव्हती. पण मैदानात होत असलेले बदल हळू हळू लक्षात येवू लागले होते . मुलं गावकरणीच्या परड्याला लागून व्हॉलीबॉल खेळू लागली. वैनी परडं झाडायला आली की कुणाच्या न कुणाच्या हातून बॉल हमखास सुटून परड्यात जाई आणि पोरं " वैनी बॉल बॉल "करून ओरडत आणि मोठ्ठ्याने हसत . काही दिवसात गावकारीण , जी संध्याकाळी कधी बाहेर दिसत नसे, ती बाहेर येउन बसायला लागली . आणि बॉल परड्यात आला की मुलांवर डाफरू लागली . ती वैनीवरसुद्धा चिडत असे . गावाकारणीला चिडताना पूर्वी कधी पाहिलं नव्हतं . पण काही वेगळं घडत होतं खरं . ते समजायला मी अजूनही लहान होतो.
सुट्टी लागली . एक दिवस दुपारी घरी माळा आवारत असताना जुने पेपर ,पुस्तके, फायली असा खजिना हाती लागला . त्यात एक भन्नाट गोष्ट सापडली . राजा रविवर्म्याची कॅलेंडरं आणि चित्रं . अशी चित्र की आई बाबांची चाहूल जरी लागली की पटकन लपवावीशी वाटणारी . माझा रिकामा वेळ कुणाच्या नकळत ती निरखण्यात जाऊ लागला. ती बघण्यासाठी मी मुद्दाम वेळ काढू लागलो . बाई किंवा स्त्री ची नव्यानं ओळख घडत होती आणि स्वतःच्या शरिराचीदेखील . आपण इतके दिवस कित्ती बावळट होतो हे समजलं . सगळ जग नवीन दिसू लागलं . नवी दृष्टी मिळाली .
सुट्टी संपल्यानंतर पुन्हा संध्याकाळचं खेळाचं रुटीन चालू झालं . आता मात्र वैनी वेगळीच भासू लागली . वैनी दिसायला जरी सुमार असली तरी पुढं मागं भरलेली होती. पुष्कळाच जणू . तिच्यापुढे रविवर्माच्या चित्रातील नायिका झक मारतील . कितीही व्यवस्थित पदर घेतला तरी हे सर्व लपण्यासारखं मुळीच नव्हतं . मुलांची व्हॉलीबॉल खेळायची जागा का बदलली असावी , वैनी दिसताच मुलं बॉल बॉल का ओरडतात, गूळ काढणं म्हणजे काय अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं मला आपोआप कळली . आता चिंचा आवडेनाशा झाल्या . सारखा अंजीर मागायला जाऊ लागलो. वैनी काहीतरी मला विचारत असे पण माझं लक्षच नसे . नजर अंजीर सोडून भलतीकडे भिरभिरत असायची . वैनी अजून मला लहानच समजत होती . पण तिच्याकडे बघितल्यावर माझी कानशिलं चांगलीच तापत असत . मला मिसरूड फुटू लागलं होतं . गोट्या , काजी हे खेळ चिल्ल्यापिल्ल्यांचे वाटायला लागले . व्हॉलीबॉल खेळणं प्रतिष्ठेचं वाटू लागलं . मी माझा ग्रुप बदलला . हळूहळू चुकत माकत मीही खेळायला लागलो . उंची ताडमाड वाढली होती. लवकरच मी पट्टीचा व्हॉलीबॉलपटू झालो . पण तरीही मला कच्चा लिंबू गणलं जाई . गेम झाला की सगळे एका कोपऱ्यात चकाट्या पिटत बसत पण मला मात्र घरी पिटाळत. खूप वाईट वाटे . त्या अड्ड्यात सामील व्हायला काय वाट्टेल ते करायला मी तयार होतो पण मार्ग सापडत नव्हता.
गणिताच्या पुस्तकातून जर रविवर्मा अभ्यासला तर परीक्षेत काय होणार ? व्हायचं तेच झालं होतं . सातवीच्या परीक्षेत मार्क कमी पडले होते . आता आईला माझं संध्याकाळचं खेळायला जाणं खटकू लागलं . "कुठं त्या उनाड मुलांच्या नादी लागतोस , वाया चाललायास " वगैरे वगैरे संभाषण रोजचं झालं . शेवटी वैतागून बाबांनी परुळेकर सरांचा क्लास चालू केला . आठवड्यातले तीन दिवस संध्याकाळी ६ ते ८ मला अडकवून टाकलं . पण तरी इतर दिवशी व्हॉलीबॉल चालूच होता . मैदानावर मी व्हॉलीबॉल सकट बऱ्याच नवीन गोष्टी शिकत होतो . मी शाळेच्या व्हॉलीबॉल टीम मध्ये निवडला गेलो. जिल्हा स्तरापर्यंत जिंकून सुद्धा आलो . पण...... पण अजूनही मोठ्यांच्या गृपमध्ये माझं बस्तान बसत नव्हतं . माझी बेचैनी वाढत होती . आणि इकडे रविवर्मा जाम त्रास देत होता .
एक दिवस खेळताना माझ्याकडून बॉल सुटला आणि नेमका गावकरणीच्या परड्यात गेला . तिथं वैनी झाडत होती . सगळी मुलं धावत धावत परड्यापाशी आली. मी पुढं होतो. "वैनी बॉल" मी धापा टाकत म्हणालो . वैनीने बॉल दिला , "काय रे आज काल अंजीर मागूक येणा नाय तो? " वैनी म्हणाली . वैनीकडे बघताच माझी कानशिलं तापायाला सुरुवात झाली होती . . परड्यापाशी अख्खी व्हॉलीबॉलची गॅंग जमली होती . समोर वैनी हातात बॉल घेऊन उभी होती . वाटलं ग्रुपमध्ये खऱ्या अर्थी सामील व्हायची हीच वेळ आहे . होता नव्हता तो धीर एकवटला आणि मी बोलून गेलो , " वैनी , मला आता बॉल आवडतात . ते सुद्धा व्हॉलीबॉल सारखे मोठ्ठे . " क्षणभर शांतता पसरली . आणि नंतर हसण्याचा स्फोट झाला . वैनीने माझ्याकडे बघितले ," मोठा झालास तू " असे पुटपुटत ती मान खाली घालून घरात निघून गेली .
मी गड सर केला होता .
सगळ्यांची माझ्याकडे बघण्याची नजर एकदम बदलली. टीम मधली माझी जागा पक्की झाली . आज पहिल्यांदा गेम झाल्यावर मी सर्वांच्यात गप्पा मारत बसलो. त्या आनंदात तरंगत तरंगत उशिरा घरी आलो . पण रात्री झोप येईना. वैनीने आईला सांगितले तर ही भीती वाटू लागली. पण त्याहीपेक्षा वैनीचा दुखावलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता . वैनीने आजपर्यंत माझ्यावर निष्पाप माया केली होती . तिच्याशी असं वागायला नको होतं. चूक घडून गेली होती . त्यावेळी मोठ्या विजयी विराप्रमाणे हसलो पण आता पश्चात्ताप होत होत . फुग्यातली हवाच निघून गेली .
दुसऱ्या दिवशीसुद्धा याचा विसर पडेना . खेळायला जावसंच वाटेना . वैनी दिसली तर? तिच्यापुढे जायची हिम्मत नव्हती . आजपर्यंत जी मला मुलाप्रमाणं वागवत होती तिच्याशी आपण फार चुकीचं वागलो हे कुठंतरी टोचत होतं . वैनीचं तोंड चुकवायला क्लास होताच. मी क्लासला जायला लांबचा मार्ग निवडला आणि सायकलनं गेलो . हे नेहमीचंच झालं . मी मैदानात न जाण्याचे बहाणे बनवू लागलो . आईला वाटलं , बर झालं, सुंठीवाचून खोकला गेला . तिनं कधीच खेळायला जा असा आग्रह केला नाही. पण माझा व्हॉलीबॉल बंद झाला . खेळावसच वाटेना. मी शाळेची टीमसुद्धा सोडून दिली. नंतर नववी दहावी ही महत्त्वाची वर्षं होती . दहावी नंतर कॉलेज साठी शहरात आलो आणि गावही सुटलं. फक्त सुट्टीपुरता गावाचा संबंध राहिला. परस्पर नोकरीनिमित्त परदेशात गेलो , लग्न झालं पण तेही रजिस्टर . त्यामुळे गावी यायची , फार कुणाला भेटायची वेळ आली नाही . वैनी, व्हॉलीबॉल सर्व विसरून गेलो .
पण आईनं सरू गेल्याचं सांगितलं आणि जुनं सगळं आठवलं . कितीही टाळलं तरी आई काही पाठ सोडेना . म्हणून तीस वर्षांनी मी पुन्हा पाणंदीत शिरत होतो. गावकरीण जाऊन दहा बारा वर्षे होऊन गेली होती .आजूबाजूचं गाव बदललं तरी गावकरणीचं घर होतं तसंच होतं चिंच , मैदान उरलं नसलं तरी अंजीर आपल अस्तित्व टिकवून होता . माझी चाहूल लागताच " कोण आसा ? " म्हणत वैनी बाहेर आली . वैनीचे केस आता पिकले होते. तोंडाचं बोळकं झालं होतं . बारीक झाली होती . वाकली होती . एकदम म्हातारी दिसत होती .
वैनीनं इतक्या वर्षांनंतरही मला ओळखलं ."भटाचो झिल मा रे तू? " पण मग माझे सुशिक्षित उच्चवर्गातले कपडे बघून ती एकेरीवरून अहो जाहो वर आली . " या या बसा ". मी अवघडून बसलो . "तुम्ही इलात ते ह्यांनी सांगला व्हता . मी म्हटलंय यांका ,माका भेटाक इल्याशिवाय रवाचे नाय तुम्ही. "
मला कुठं तोंड लपवू असं झालं . "घराकडे सगळा ठीक ना? बायको पोरा बरी आसत ना ? " वैनीनं चौकशी केली . मग ती सरुबद्दल गावकरणीबद्दल आणि इतरही बरंच काही बोलली . "हो नाही "याशिवाय माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता . मी खाली बघत उत्तर देत होतो . पुढं काय बोलावं ते सुचेना . वैनी जुनं सगळं विसरली असावी , पण माझ्या डोक्यातून ते जात नव्हतं . "वायज चा ठेवतंय " वैनीने असं म्हणताच मी भानावर आलो . "नको नको , उशीर झाला.निघतो मी " म्हणत मी उठलो . इतक्या वेळात वैनीच्या डोळ्यात पहायची हिम्मत झाली नव्हती . मग काय विचार आला माहित नाही ," वैनी चूक झाली , येतो मी " म्हणून वैनीचे मी पाय धरले. " अरे अरे, असू दे असू दे. सुखी राहा. येत जा इलात की " डोळ्याला पदर लावून तिनं आशीर्वाद दिला . . आणि अगदी हलका हलका होऊन मी तिथून बाहेर पडलो .
वाचने
12176
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
..............
सुंदर
वाढत्या वयात झालेल्या चुकीची
शेवटी तरी माफी मागितली हे फार
अतिशय सुंदर लिहिले आहे.
+१
In reply to अतिशय सुंदर लिहिले आहे. by एस
आवर्जून लॉगइन करून प्रतिसाद द्यावासा वाटला!+१. वाचनीय लेखनशैली! रेवती, प्रदीप आणि यशोधरा यांच्या प्रतिसादांशीही सहमत.आवर्जून लॉगइन करून प्रतिसाद
In reply to +१ by बहुगुणी
स्वॅप्स, बहुगुणी, विंजीनेर,
In reply to आवर्जून लॉगइन करून प्रतिसाद by विंजिनेर
लेखन आवडले.
......
खासच!
.
फार छान लिहिलंयेत. नि:शब्द
खूपच आवडलं. स्वॅप्स यांनी वर
आवडलं
कथा खूप आवडली!
गोष्ट
खूप भावलं
जबरदस्त
In reply to खूप भावलं by श्रीरंग_जोशी
तात्यांचं लेखन नेहमीच आवडतं.
In reply to खूप भावलं by श्रीरंग_जोशी
मस्त लिहिलीय शेवट आवडला.
छान लेखन..
शेवटी स्वतःपासून सुटका नाही..
शेवटी स्वतःपासून सुटका नाही
In reply to शेवटी स्वतःपासून सुटका नाही.. by जयंत कुलकर्णी
+१००
कथाशैली आणि मांडणी उत्तम.
शेवट आवडला. मनातली अपराधी
शेवट वाचल्यावर हलके वाटले.छान
माफी मागितली ते बरं केलं
छान कथा
क्या बात! धन्यवाद!
In reply to छान कथा by नाखु
छान जमलिये कथा....पुलेशु
जबरदस्त!!!
आवडली गोष्ट!
खूप सुरेख
वेळ काढून वाचल्याबद्दल आणि
नविन कथा
आशय, लेखनशैली सगळंच
अतिशय आवडले
+१
In reply to अतिशय आवडले by चित्रगुप्त
छान हो…
भलताच अवघड प्रश्न आहे हो .:)
In reply to छान हो… by शि बि आय
मनाच्या डंखाला उतारा दिला
छान लिहिली आहे. शेवट मस्त
कथा चांगली जमली आहे. अजून
सर्वांनाच धन्यवाद!
अगदी सुरेख जमलीये कथा..असेच
वैनी मनात घर करुन गेली.