मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इराकची खातून

विशाखा पाटील · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि इराकची वाताहत सुरू झाली. २००३ मध्ये अमेरिकेने हा हल्ला केला तेव्हा अमेरिकेच्या सैन्याने सर्वात आधी तेलमंत्रालयावर कब्जा केला. जवळच बगदादच समृद्ध वस्तुसंग्रहालय होतं. तिथे फक्त दोन सैनिक एका रणगाड्यावर उभे होते. त्यांना न जुमानता लोकांनी हजारो वर्षांचा ठेवा लुटून नेला. सुमेरिअन, बेबिलोनिअन, अकडीअन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना लोकांनी दिवसाढवळ्या लुटला. हा ऐवज जगभर विकला गेला. या वास्तूसंग्रहालयाची संस्थापक होती गरट्रुड बेल ही ब्रिटीश स्त्री. खरं तर, ही इराक या देशाची शिल्पकार. या देशाचा नकाशा घडवणारी एक चतुर स्त्री. आज तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पण तरीही तिचं नाव इराकच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये टिकून आहे. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान अरब जगात ब्रिटीश सरकरने अनेक चाली खेळल्या. तुर्कस्तानमधल्या ऑटोमन साम्राज्याविरूद्ध त्यांनी अरबांशी मैत्री केली होती. 'लौरेन्स ऑफ अरबिया' या चित्रपटामुळे प्रसिध्द झालेला टी. इ. लौरेन्स हा यातला मुख्य कारभारी होता. गरट्रुड बेल ही दुसरी. दोन्हीही इतिहासाचे, पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक. त्यासाठी ते अरबस्तानात आले. पण ब्रिटीश सरकारने त्यांचा उपयोग इतिहास घडवण्यासाठी करून घेतला! गरट्रुड ही व्हिक्टोरिअन समाजात जन्मलेली आधुनिक विचारांची स्त्री. प्रखर बुद्धिमत्ता, प्रचंड उर्जा आणि साहसी असलेली. ऑक्सफड विद्यापीठात इतिहास या विषयात तिने पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवली. परंतु त्याकाळी स्त्रियांना पदवी दिली जात नव्हती. शिक्षणानंतर काय करायचं, हा प्रश्न तिला सतावू लागला. वडील श्रीमंत होते, पण व्हिक्टोरिअन समाजात राहणं तिला आवडत नव्हतं. तिने मार्ग शोधला तो वाळवंटात. तो ही मध्ययुगात जगणाऱ्या समाजात. जेरुसलेम, दमास्कस, जॉर्दन या पट्ट्यात ती इतिहासाच्या अभ्यासासाठी फिरू लागली. हे देश अस्तित्वात येण्याच्या आधीचा हा काळ. टोळ्यांमध्ये राहणारी लोकं, स्त्रियां काळ्या अवगुंठनात राहणाऱ्या. पुढे गरट्रुड बेल मेसोपोटेमियात आली. मैलोनमैल वाळूने भरलेल्या या परिसरात पुरातन वस्तूंचा शोध घेत ही शिडशिडीत बांध्याची स्त्री भटकत होती. अनेक टोळ्यांच्या शेखांशी अरबीत आत्मविश्वासाने संवाद साधत होती. तेही तिला आदराने वागवत होते. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याला तुर्कस्तानच्या सैन्याने सळो की पळो करून सोडले होते. गालीपोलीची लढाई ही मित्र पक्षांसाठी फार मानहानीकारक ठरली. याच युद्धात गरट्रुडचा प्रियकर मारला गेला. या पराभवानंतर ब्रिटीश सरकारने वेगळी चाल खेळली. भारतातून सैन्य मेसोपोटेमियात (इराक) उतरवायचं आणि तिथून तुर्कांना हाकलायचं. जवळच्या पर्शियात तेव्हा नुकतंच ब्रिटीश पेट्रोलियम कंपनीला तेल गवसलं होतं, ते ही जपायचं होतं. भारतातून आलेल्या सैन्याला रस्ता दाखवण्याचं काम गरट्रुड बेलकडे सोपवण्यात आलं. पुढे महायुद्ध संपलं, तुर्क हरले आणि संपूर्ण अरब जग ब्रिटीश आणि फ्रेंचांच्या ताब्यात आलं. आज या देशांमध्ये आणि पर्यायाने जगामध्ये असलेल्या अशांतीला त्यांनी त्यावेळी खेळेलेलं राजकारण जबाबदार आहे. महायुद्धानंतर झालेल्या शांतता परिषदेत गरट्रुड ही एकमेव महिला अधिकारी होती. तिच्यावर जबाबदारी होती ती इराकचा नकाशा घडवण्याची. तिच्याशिवाय या भागाला जाणणारं कुणीही नव्हतं. ती घडवत असेलला देश तीन भागात विभागलेला होता- उत्तरेकडच्या भागात कर्दवंशीयांचं प्राबल्य, मध्यभागी सुन्नी पंथीय आणि दक्षिणेकडे शिया पंथीय. या तीन तुकड्यांना जोडून तिने इराकचा नकाशा घडवला. या देशाच्या ठसठशीची मूळ यात दडलेली आहेत. पुढचा प्रश्न होता, हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा? इराक म्हणजे अनेक धर्म आणि पंथांचा गोतावळा. त्यासाठी पुन्हा बरंच राजकारण घडलं आणि ब्रिटीश सरकारने मक्केच्या शरीफांच्या मुलाला सिंहासनावर बसवलं. त्याची आणि इराकी जनतेची ओळखदेख नव्हती. पण चाणाक्ष ब्रिटीशांना तेलाची काळजी होती. शिवाय गरट्रुने आपल्या सरकारला इथली सामाजीक आणि धार्मिक वीण नीट उलगडून दाखवली होती. तिची या आयात केलेल्या राजे फैसल यांची सल्लागार म्हणून नेमणूक झाली. हळूहळू या राजांनी राज्यावर पकड बसवली, तसे ब्रिटीश अधिकारी मायदेशी परतले. पण तिने मात्र इराकलाच आपला देश मानला होता. राजकारणातून अंग काढून घेऊन ती पुन्हा पुरातन वस्तूंच्या शोधात फिरू लागली. हा ऐवज ती सहज मायदेशी पाठवू शकली असती. तिथल्या वस्तुसंग्रहालयात देशोदेशींच्या वस्तूंमध्ये या वस्तूंनाही जागा मिळाली असती. पण तिने पाठपुरावा करून बगदादला संग्रहालय उभं केलं. या कामादरम्यान ती आजारपणाने त्रासली होती, निराशेने तिला घेरलं होतं. ब्रिटनला परत न जाण्याचा तिचा निर्धार मात्र ठाम होता. सात भाषा पारंगत असणारी ही विदुषी, लेखिका, आल्प्स पर्वतराजीतले शिखरं सर करणारी, तळपत्या सूर्याचा तडाखा सहन करत वाळवंट तुडवणारी, राजे, धर्मगुरू, शेख, सामान्य स्त्रिया सर्वांशी चर्चा करणारी. पण तिचा जीवनातला आनंद संपला होता. १९२६ साल. तिचा अठठावन्नावा वाढदिवस दोन दिवसांवर येऊन ठेपला होता. पण त्याआधीच तिने झोपेच्या गोळ्या घेऊन जीवन संपवलं. पहिल्या महायुद्धात शेकडो भारतीय सैनिकांनी जिथे चिरनिद्रा घेतली तिथेच तिनेही घेतली. अलीकडे इराकचा भडका उडाल्यावर तिची आठवण लोकांना पुन्हा येऊ लागली आहे, तिचे लेखन धुंडाळले जाते आहे. इराकी लोकांमध्ये आपापसात वैर असले, तरी तिच्याविषयीचा आदर मात्र आजही टिकून आहे. त्यांच्यासाठी ती 'खातून' होती - इराकची खातून. (अन्यत्र पूर्वप्रकाशित - मूळ लेखात थोडे बदल केले आहेत.)

वाचने 9196 वाचनखूण प्रतिक्रिया 32
आवडला लेख.त्या काळातल्या अरब विश्वात एका स्त्रीने इतके मानाचे स्थान मिळवले,देशाचा नकाशा घडवला.कशाकशातून गेली असेल ती.तिचे काही अात्मचरित्र आहे का? वाचायला आवडेल.

In reply to by अजया

विशाखा पाटील 29/01/2015 - 15:17
तिची शेकडो पत्रे, दैनंदिनी, तिने काढलेले फोटो असं बरंच साहित्य न्यूकासल विद्यापीठाच्या siteवर उपलब्ध आहे. 'धागे अरब जगाचे' लिहितांना पत्र संदर्भासाठी वाचली होती. परंतु भाषा व्हिक्टोरिअन काळातली आणि बारीकसारीक details भरपूर आहेत. इंग्रजीत तिची दोनतीन चरित्रही आहेत.

बॅटमॅन 29/01/2015 - 14:59
या मॅडमबद्दल काहीच माहिती नव्हते. अतिशय धन्यवाद माहितीकरिता. सोबतच त्यांच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग, फोटो, एखादी लिंक, इ. दिल्यास अजून बरे झाले असते.

In reply to by विशाखा पाटील

खटपट्या 30/01/2015 - 06:13
काय जबरद्स्त साईट आहे. आपणसुद्धा आपल्या ऐतिहासीक कागदपत्रांची अशी साईट बनवायला पाहीजे. मोडीतल्या कागदपत्रांचे भाषांतर करणे हे एक अव्हान आहेच.

स्वाती दिनेश 29/01/2015 - 19:53
लेख आवडला, नवी माहिती.. थोडी अजून माहिती टाकून दोन-तीन लेखांची एक मालिका लिहू शकाल काय ह्या विषयावर? स्वॅप्स शी सहमत, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मधुरा देशपांडे 29/01/2015 - 21:32
असेच म्हणते.

बोका-ए-आझम 29/01/2015 - 23:08
इतकं नाट्यमय आयुष्य जगलेल्या स्त्रीच्या आयुष्यावर काही चित्रपट वगैरे आहेत का? नसतील तर आश्चर्यच आहे!

श्रीरंग_जोशी 30/01/2015 - 07:11
या विदुषीबद्द्ल प्रथमच वाचले. या लेखनासाठी धन्यवाद. मिपावर फोटो प्रकाशित करण्याबद्दल मदत येथे आहे. मिपाच्या मदत पानाचा दुवा काही महिन्यांपासून मुखपृष्ठावरून गायबला आहे. कधीही तांत्रिक अडचण आल्यास खरडफळ्यावर लिहा. नेहमी कुणी ना कुणी ऑनलाइन असतेच. विनाविलंब शंकानिरसन होईल.

बबन ताम्बे 30/01/2015 - 20:08
सुमेरिअन, बेबिलोनिअन, अकडीअन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना लोकांनी दिवसाढवळ्या लुटला हे वाचून वाईट वाटले.

In reply to by बबन ताम्बे

डॉ सुहास म्हात्रे 30/01/2015 - 23:56
हेच इजिप्तच्या अरब स्प्रिंगमध्ये काही प्रमाणात झालं. या दोन्हीतल्या बर्‍याचश्या वस्तू कवडीमोलाने पाश्चिमात्य संग्रहालयांत किंवा तथाकथित खाजगी संग्राहकांच्या (कलेक्टर) साठ्यात जमा झाल्या असणार. :(

डॉ सुहास म्हात्रे 31/01/2015 - 22:57
इतिहासाची पुनरावृत्ती सतत होतच राहते... ही आजची बातमी... Iraqi libraries ransacked by Islamic State in Mosul ...He reported particularly heavy damage to the archives of a Sunni Muslim library, the library of the 265-year-old Latin Church and Monastery of the Dominican Fathers and the Mosul Museum Library with works dating back to 5000 BC.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशाखा पाटील 01/02/2015 - 09:34
खरंय. असंच मध्ययुगात घडलं होतं. अब्बसीद खालीफांच्या काळात बगदादला समृद्ध ग्रंथालय होतं. त्याकाळी या राज्यात पूर्व आणि पश्चिमेकडच्या ज्ञानाचा मिलाफ होत होता. पण पुढे मध्य आशियातल्या मंगोलांनी बगदादवर हल्ला केला, चेंगीझ खानाच्या मंगोल फौजांनी पुस्तकं नदीत फेकली. तेव्हा परक्या फौजांनी ते विध्वंसक काम केलं, आता ते कृत्य तिथलेच लोक करतायत, हाच काय तो फरक...