Skip to main content

Happy new year!!!

लेखक Maheshswami यांनी बुधवार, 24/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
बारमध्ये, परमिट रूम मध्ये, लाईट्स जमेल तेवढ्या मंद करून काळाकुट्ट अंधार करून ठेवण्याचे काय प्रयोजन असेल, हा मला नेहमी सतवणारा प्रश्न आहे. दारू पिणे काही गुन्हा आहे काय कि सगळ्यांच्या नजरा चुकवत अंधारात लपून करावा? गेल्या दहा मिनिटात वेटरचे "हेल्लो , शूक शूक " करून लक्ष वेधून घेण्याचा माझा दहावा प्रयत्न या अंधाराने हाणून पाडला होता. शेवटी, जोरात ओरडून बोलावल्यावर तो धावत पळत टेबलाकडे आला . मी तोंड उघडायच्या आधीच माहितीवजा धमकी दिली त्याने . "साब, और कुछ मंगानेका रहेंगा , तो अब्भीच बोलो . कल कि थरटी फष्ट की तैय्यारी के वास्ते बार आज जल्दी बंद होएंगा . भोत काम है कल." "एक काम करो, ओल्ड मंक सिक्स्टी और सोडा लेके आव . और ये क्या है ? शेंगदाणे एकदम मऊ हो गयेले है . कैसे खानेका इसकू ?" "वो क्या है ना साब , पिचले हफ्ते के अवकाळी बारीश कि वजै से सब चकणा अयेसाहीच हुएला है . फिर भी मै देखता है, कुछ कुरकुरीत रहेंगा तो" . असं म्हणून निघून गेला तो . हा मला पडलेला दुसरा प्रश्न ! दारू पिल्यावर आपले आणि वेटर चे संभाषण नेहमी हिंदीतच का असते? हे संभाषण ऐकून हुशार वाचकांनी ओळखलेच असेल कि दोन अस्सल मराठी मानसं बोलत आहेत . पण नाही , आपलं उगीच हिंदीची मारून ठेवायची . असो , सगळं आटपून घरी पोचायला अकरा वाजलेले. मांजराच्या पावलांनी आपल्या खोलीत जावून हळूच आडवा झालो. डोळ्यासमोर उद्याच्या "हैपी न्यू इयर " च्या पार्टीची न पाहिलेली दृश्य तरंगायला लागली . सोम्या , नित्या , सच्या , मंग्या , गोप्या इत्यादींची परिस्थितीही या वेगळी नसावी . बऱ्याच दिवसांनी सगळ्यांनी एकत्र "बसण्याचा" योग आला होता. प्रसाद आणि प्रकाश मात्र दारू पिणारे नसून सुद्धा नुसती कंपनी द्यायला येणार होते. कुणी पिऊन लास झालं तर त्याला संभाळायला , परत येताना गाडी चालवायला वगैरे अशी मित्र कामाला येतात, हे एक बरं आहे . तसा एकदम मस्त ग्रुप आमचा . खंगरी एकदम! या वर्षीचा वेन्यु, ते नवीनच उघडलेलं "इंगळे बार एन्ड रेस्टोरंट" ठरला होता . संध्याकाळी आठच्या सुमारास सगळ्यांनी जमून "थोडीशी " घेऊन , जेवण वगैरे करून , रात्रभर गप्पा मारत, पत्ते खेळत नवीन वर्षाचे स्वागत करावे असा प्लान होता . झोपताना मी स्वतःला माझ्या न्यू इयर रेजोल्युशन ची हजार वेळा आठवण करून दिली . "पुढच्या वर्षीपासून दारूला स्पर्श हि नाही करायचा ." आजकाल, नाही म्हटलं तरी, परमिट रूमकडे बऱ्याच वेळा पाय वळायला लागले होते . सेलिब्रेशन चा प्रसंग असला तरी आणि नसला तरी . थांबण्याची वेळ आली होती. शेवटची एकदाच दारू प्यायची, म्हणून उद्याची एक्साईटमेंट काही औरच होती. एकतीस तारखेचा दिवस उजाडला. संध्याकाळ कधी एकदा होतेय असं झालं होतं . दिवसभर कशात मन लागत नव्हतं. उद्यापासून दारू नाही प्यायची हा विचार पण मनाला थोडा दिलासा आणि भीती एकाच वेळी देत होता. अगदी ठेवणीतले कपडे कडक इस्त्री करून ठेवले होते. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास, छानपैकी तयार होऊन, लुना बाहेर काढली. आणि हाय ! दुधात मिठाचा खडा टाकावा, तसा लुनाने असहकार पुकारला. सुरु व्हायचे नाव नाही. किक मारून मारून दमून गेलो. परीटघडीचे कपडे घामाने भिजून चिंब होऊन गेले , पण लुना काही केल्या दाद देईना . (नंतर काही वर्षांनी , दारू प्यायला निघालं कि बायकोही असाच असहकार पुकारते, आणि म्हणून ही लुना माझी मागच्या जन्मीची बायको असावी असाही एक विचार उगीच मनाला चाटून गेला होता.) ताई खिडकीतून अगदी आसूरी आनंद झाल्यासारखी हसत होती. म्हणाली "जावू दे रे, कशाला एवढा आटापिटा करतोयस ? घरीच बसून टीव्ही बघ . चांगले कार्यक्रम दाखवतात आजकाल ." मी लक्ष न देता वडिलांच्या खोलीकडे वळलो . शेवटी ज्या गोष्टी ला टाळत होतो , ते करावेच लागले . पिताश्रींकडे त्यांची गाडी उधार मागणे ! वडिलांशी बोलण्याचा प्रसंग मला उगीच शक्ती सिनेमा ची आठवण करून द्यायचा . उगाच वाटायचे कि आपण अमिताभ आहोत आणि वडील म्हणजे खडूस दिलीप कुमार. अमिताभ - [मनात: पिताजी , आपकी गाडी आज के लिये मै लेके जा रहा हुं . अगर रोक सकते हो रोक लो . वैसे भी मुझे रोकने के अलावा किया हि क्या है आपने जिंदगीभर! ] पप्पा , ते आज माझ्या लुनाला माहित नाही काय झालेय . सुरूच होत नाहीये. प्लीज तुमच्या बाईक ची चावी द्याल का ? मित्रांना भेटायला जायचे आहे. उद्या सकाळी परत आणीन . दिलीप कुमार - [मनात : बेशक लेके जा, बदतमीज. दारू पिके चला, और मिला दे मेरी इज्जत और पानी मे ! दो कौडी कि औकात नही , और मेरी गाडी चलायेगा. ] (दोन वेळा दुर्लक्ष करून झाल्यावर). नाही रे . रिक्षा नि जा पाहिजे तर. गाडी नाही मिळणार . आणि काय, दारू वगैरे प्यायचा तर विचार नाहीये ना आज ? आधीच तुझे मित्रं फार गुणी . खबरदार तसले काही अपेयपान केलेसे तर. अमिताभ - [मनात: बस्स , यही पहेचाना आपने मुझे . जिंदगी मी पहली बार कुछ मांगा और वोह भी मना कर दिया ?] नाही पप्पा , तसलं काही नाही . फक्त जेवायला चाललोय . रात्री थोड्या गप्पा मारून सोम्याच्या घरी झोपणार . सकाळी लगेच परत येईन . दारूसारख्या गोष्टींपासून, आम्ही मित्र दूरंच राहतो . राखी - जाऊद्या हो, लेकरू एवढं म्हणतंय तर घेऊन जाऊद्या गाडी त्याला . या वयात मित्रांसोबत बाहेर जावू वाटते . बाळ , गाडी सावकाश चालव हं . जा घेऊन जा . दिलीप कुमार - [मनात : तुम्हारे लाड प्यार ने हि इसे बिगाडके रखा है . और हिम्मत कैसे हुई तुम्हारी मेरी मर्जी के बगैर इसे इजाजत देने की ?] असं म्हणतेस, ठीक आहे रे , घेऊन जा रे पण ते दारूचं मात्र लक्षात ठेव . अमिताभ - [ मनात : अपने बेटे कि जरासी ख़ुशी बर्दाश्त नाही होती आपसे . वोह तो मैं मां की वजह से इस घर मी टीका हुं , वरना कब का छोड के जा चुका होता .] थैनक्स पप्पा . काळजी करू नका . धक्का सुद्धा नाही लागू देणार तुमच्या गाडीला मी आजिबात. ( दमदार पावलं टाकत अमिताभ फ्रेम मधून निघून जातो ) बाईक ला किक मारून सुसाट वेगात "इंगळे" वर जावून पोचलो . ठरल्याप्रमाणे बरोबर आठ वाजता सगळेजण जमले होते. एक नित्या आणि सोम्या तेवढे गायब होते. मी विचारले "काय रे गोप्या, सोम्या कुठंय , दिसत नाही?" "अरे, सिगारेटचं पाकीट आणायला गेलंय . येईल पाच मिनिटात" सोम्या चे आई वडील आज बाहेरगावी गेले होते, म्हणून जेवण आटपून आम्ही सगळे त्याच्या घरी राहणार होतो . दोन मिनिटांनी लंगडत लंगडत एक कुबडी घेऊन येणारी सोम्याची मूर्ती दिसली . बऱ्याच दिवसांनी आज सोम्या कुठल्यातरी पार्टीला जॉइन झाला होता. "काय म्हणतोय पाय सोमाशेठ ? कसा आहे पाय आता?" "बरा व्हतोय रे . डाक्टर म्हणला मार्च पर्यंत येळ लागंल पुरा बरा व्हयला ." "अरे झक्कास , म्हणजे लातूर डान्सिंग स्टार च्या पुढच्या सीजन मध्ये भाग घेता येईल तुला मग !" "आरं बाबा , कानाला खडा लावलाय डान्स च्या नावानं . गेली इज्जत पुरं झाली . गल्लीत हसत्यात सगळे मला". सोम्या म्हणजे आमच्या गल्लीतला "ह्रिथिक". गणेशोत्सव असो , नवरात्र असो की कुणाचा वाढदिवस , सोम्याच्या डान्स शिवाय पूर्ण व्हायचा नाही. दोन महिन्यांपूर्वी नवरात्रीचा शेवटचा दिवस. गल्लीतल्या पोरींसमोर( स्पेशली शकूवर ) जबरदस्त इम्प्रेशन पाडायचे म्हणून सोम्यानी मन लावून प्र्यकटिस केलेली. ठेवणीतली जीन्स घातलेली, मित्राचे मागून आणलेलं लालभडक जर्कीन , गुळगुळीत केलेली दाढी, शेजारच्या "साजन" कटिंग सलून मधून बाळू नाव्ह्याने केलेले "पेशल फेशियल" अशी जय्यत तयारी होतॆ. "हम्मा हम्मा " या बॉम्बे मधल्या गाण्यावर डान्स होता . सोम्याने मंडळाचा लाईट म्यानेजर अर्ज्याला आधीच सूचना केलेली . "हे बघ अर्ज्या, डिस्को इफेक्ट पडला फायजेल. ष्टेजवरल्या लायटी बंद चालू , बंद चालू कर माझ्या एन्ट्री ला. पह्यल म्युजिक संपेपर्यंत तसच कर. एकदा का गाणं म्हणायला सुरु केलं शिंगरनं कि मग नॉर्मल लाईट सुरु कर. एकदम छा जाना चाहिये मै आज. " सोम्याची एन्ट्री झाली स्टेज वर. शिट्ट्यांचा कहर केला आम्ही मित्रांनी. स्टेज वरची लाईट बंद सुरु बंद सुरु . मस्त इफेक्ट आला होता . लाईट सुरु आणि सोम्या उताणा झाला. आता खास जंप चा टाईम होता . पुढच्या क्षणी लाईट बंद . सोम्या हातांच्या पंज्यावर जोर देऊन उसळी मारून उठणार होता . पुढच्या क्षणी लाईट सुरु , आणि…… पब्लिक थिजलेलं ! शिट्ट्या बंद! सोम्याच नाही स्टेजवर ! कुठंय सोम्या कुठंय, म्हणेपर्यंत पुढच्या रांगेतून किंचाळण्याचे आवाज. प्रमुख पाहुण्यासहित अजून दोघांना घेऊन सोम्या जमिनीवर आडवा. दोन्ही पाय खुर्चीत अडकेलेले . मरेस्तोवर हसली पब्लिक (आम्ही पण). सोम्याचा पाय आणि समोरच्या "शकू" ला पटवायचं स्वप्न , दोन्ही एकदाच प्लास्टर मध्ये जायबंदी झाले . सोम्याला समजावत , आम्ही बार मध्ये घुसलो. नित्याची वाट न पाहता बीअरची ऑर्डर दिली. ग्लासमधली , ती थंडगार फेसाळती बीअर बघून सगळ्यांच्याच अंगात चैतन्य आले. गटागटा दोन चार घोट रिचवून झाल्यावर गप्पांचे पेव फुटले. हास्यविनोद व्हायला लागले. माहौल बनायला सुरुवात झाली. फाटलेल्या स्पीकरमुळे पंकज उधास चा "इक तरफ उसका घर, इक तरफ मयकदां" म्हणणारा आवाज घसा बसल्यासारखा येत होता. ग्लासांचा किणकिणाट, सिगरेटचा धूर , चढ्या आवाजातल्या गप्पा , विनोद यांनी वातावरण भरून गेलं होतं. तेवढ्यात नित्याची एन्ट्री झाली . तोंड सुज्लेलं , डोळ्याखाली काळानिळा डाग , ओठ फाटलेला. आम्ही काळजीनं विचारलं "काय रे नित्या , ठीक आहे न सगळं , कुणाला नडला आज?" नित्या एका सधन शेतकऱ्याचा पोर. पन्नास एकर पाण्याखालची शेती . ऊस लावलेला . बक्कळ पैसा होता. आमच्या बऱ्याच पार्ट्या नित्याच स्पोन्सर करायचा. एक तंबाखू खाण्याची तेवढी वाईट सवय नित्याला. आता बाप दिवसभर तंबाखू मळत असतो, तंबाखूचं कवतिक गात असतो. म्हणल्यावर पोरगा काय करणार? आडातलं पोहऱ्यात येणारंच ना. मोठ्या फुशारकीनं त्याचा बाप नित्याच्या आजीची ष्टोरी सांगायचा कि कसं तिच्या तंबाखूच्या व्यसनामुळे तिला साप चावला तर सापच मारून गेला . म्हातारीला काहीच झालं नाही. खरं काय खोटं काय ते म्हातारी आणि तो सापंच जाणें . बापाला मात्र नित्याच्या व्यसनाबद्दल काही माहित नव्हतं, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं . नित्याला विचारलं तेव्हा त्याने त्याची कर्मकहाणी सांगितली. "घात केला राव तंबाखूनं!" "काय रे काय झालं , हळूच पिचकारी मारताना बापानी बघितलं कि काय?" "नाही रे, नेहमीप्रमाणे अभ्यासाचं निमित्त करून गच्चीवर गेलो रात्री. म्हणजे मग रात्रीच्या फ़ुल्ल जेवणानंतर मस्त बार लावता येतो तंबाखूचा. रात्री झोप लागायला लागली तेव्हा तोंडातली तंबाखूची गोळी काढून ठेवली वहीवर. आन सकाळी गेलो न लेका वह्या वरच विसरून. आईने दुपारी चक्कर मारली, कपडे वाळू घालायला गच्चीवर. आणि माझे झाले कल्याण. रात्री बाप शेतावरून आल्यावर, सांगितली आईने सगळी स्टोरी. पुढं मागं न बघता, कुत्र्यासारखा तुडवला बापानी. मी म्हणालो मी नाय खात तंबाखू , चिमणी हागली असेल वहिवर. मग तर आईनी पण हात धुवून घेतला." "मग काय रागारागाने घर बिर सोडून आला कि काय इकडे?" "घर कशाचं सोडतोय, हाकललं बापानी घराबाहेर". मंग्याला हळू हळू चढायला लागली होती . "नित्या भाड्खावू , सांगत होतो तुला तंबाखू आरोग्याला हानिकारक असते म्हणून. ऐकले नाही मझे. आता थोबाड फुटले ना लेका ?" इति मंग्या. सगळेजण जोरजोरात हसायला लागले हा किस्सा ऐकून. नित्याला कसाबसा समजावत चुचकारत जर कम्फरटेबल केले सगळ्यांनी. "जाऊ दे यार विसर थोडावेळ सगळे" म्हणून अजून एक एक बीअर ची ऑर्डर सुटली. ग्लासावर ग्लास रिचवले जात होते. डोकं हळूहळू हलकं होत होते. कशासाठी पितोय , किती पितोय ह्याचं भानही राहिलं नव्हतं. गोप्या सगळ्यात जास्त आउट झाला होता. गप्प बसून गटागटा पीत होता नुसतं. थोड्या वेळात उठून उभा राहिला. "जरा, जाउन येतो धारवाडला !" (हा परवलीचा शब्द होता बाथरूम ला जाण्यासाठी) "जपून जा , पाय बघ कसे लटलटायला लागलेयत तुझे" "अरे , जेवढी पिलोय आत्तापर्यंत , तेवढी तर मला सकाळी चूळ भरायला लागते." "जा लवकर , नाहीतर इथेच भरशील चूळ ." लटपटत गेले गोपालशेठ कसेबसे. आमची पार्टी कंटीन्यू राहिली. "धा, मिंट झाली , गोप्या कुठं तडमडला ". सोम्या म्हणाला. मी आणि मंग्या शोधायला निघालो त्याला. मंग्या चे हाल हि काही फारसे चांगले नव्हते. अंधाऱ्या बारमध्ये, खुर्च्या-टेबला मधून कसाबसा रस्ता काढत पोचलो. "पुरुषांसाठी" ची पाटी दोनदा वाचून, खात्री करूनच आत घुसलो. दरवाजात जाताना, साला एक बेवडा तर्र होऊन तिथेच पडला होता . त्याला चुकवत अंगावरून उडी मारून आत गेलो. गोप्याचा पत्ता नाही. जोरजोरात हाका मारल्या पण गोप्या काही सापडेना. एका संडासातनं जोरजोरात आवाज येत होते . कुणाचं तरी पोट बिघडलं होतं हे नक्की. मंग्याला जाम चढलेली , जोरात बोम्बलला मंग्या - "कौन है वो आमिर बाप कि बिगडी हुई औलाद, जो बिना दिवाली के पटाखे फोड राहा है ?" आतून जोरात आवाज आला "कोण आहे रे , तुझ्या आयला थांब तिथंच , तुझ्या कानाखाली जाळ काढतो येउन!" आम्ही जोरात धूम ठोकली तेथून , जाताना परत त्या लास होऊन पडलेल्या बेवड्याला, पाय अडकून मंग्या पडला धप्पकन. त्या हि पेक्षा जोरात ओरडला , "च्यायला हा बघ , गोप्या पडलाय इथं". गोप्या, सगळी शुध्द हरपून पडला होता. कसबसं आम्ही दोघे त्याला फरफटत घेऊन आलो टेबलापर्यंत. साळसुद्पणे परत पार्टी सुरु. पाच मिनिटांनी, एकजण अत्यंत खुनशी नजरेने कुणाला तरी शोधत बाहेर येताना दिसला. हसू आवरेनासे झाले होते आम्हाला. हाच तो आमिर बाप कि बिगडी हुई औलाद असावा. बारा वाजत आले होते. मस्त किक बसलेली सगळ्यांना. सगळेजण फुल आउट. प्रसाद आणि प्रकाश उगीच सुरज बडजात्या च्या पिक्चर मधल्या अति चांगल्या हिरोंसारखे वागायला लागले. खूपच काळजी घ्यायला लागले पिणाऱ्यांची. "अरे पडशील, किती प्यायला, चांगले नसते पिणे, वाया गेलात तुम्ही" वगैरे डायलौग मारायला लागले. आता गाडी तेच चालवणार ना, त्यामुळे ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता. "इंगळे" बाहेर पडलो सगळे. प्रसाद , मंग्या आणि मी (त्याच क्रमाने) बाबांच्या बाईक वर. प्रकाश , सोम्या , गोप्या एका बाईक वर. आणि सच्या व नित्या एका बाईक वर. सच्या पण टाइट होता पण गाडी चालवीन असा आत्मविश्वास होता त्याला. "हैपी न्यू इयर " च्या आरोळ्या देत निघालो. मंग्याने मधेच विचारले "२००० कि २००१ रे? कुठले वर्ष सुरु होतेय ?" "गप्प झोप रे तू" म्हणून आम्ही ओरडतच राहिलो. आज रात्री सगळ्यांचा मुक्काम सोम्याच्या घरी होता. आता शिवाजी चौक संपला कि पुढे लगेच त्याचे घर होते. बरीच गर्दी दिसली चौकात. एवढ्या मोठ्या गाड्या थांबलेल्या. आम्हाला वाटलं सेलिब्रेट करतायत लोक. मात्र, गाडी चौकात पोचताच बऱ्याच घटना एकत्र घडल्या. एका धिप्पाड माणसाने मर्द मावळ्यासारखी हातातली काठी गर्रकन्न फिरवून खाड्कन आमच्या बाईक वर मारली. पायाला झन्न मुंग्या आल्या. पुढच्या क्षणी प्रसाद, मंग्या आणि मी आडवे झालो होतो रस्त्यावर. काठीचे दोन तीन तुकडे झालेले. वर पाहिल्यावर कळाले को तो धिप्पाड माणूस पोलिस हवालदार आहे. पोलिसांचे चेकिंग सुरु होते. पुढच्याच क्षणी सच्याची गाडी भरधाव येउन पोलिसांच्या गाडीवर धडकली . कळवळून, दोन तीन पोलिसांनी धाव घेतली . सच्या सुसाट पळत सुटला , पण नित्या मात्र तावडीत सापडला त्यांच्या . आज दुसऱ्यांदा धुलाई झाली वाईट त्याची. हवालदाराने माझ्या बाईकची चावी काढून घेतली आणि त्याच्या सहकाऱ्याला म्हणाला, "जाऊन स्टेशन मध्ये लाव रे गाडी. ए बेवड्यानो , उद्या दंड भरून घेऊन जा गाडी. सगळी उतरल्यावर मगच या." पायातल्या मुंग्यांचे रुपांतर आता विंचवामध्ये झाले होते. लय जोरात लागली होती काठी. नित्याला मात्र, पोलिस गचांडी पकडून स्टेशन मध्ये घेऊन घेले. दहा मिनिटासाठी शांत बसून राहिलो सगळे, तिथेच बाजूला . मग ठरवले कि स्टेशन मध्ये जाऊन बघू नित्याचे काही करता येतेय का. तशाच अवस्थेत स्टेशन मध्ये घुसलो. पाहतो तर नित्याला जमिनीवर कोंबडा करून बसवले होते. एवढं प्यालेला तो, सतत तोंडावर पडत होता , पुन्हा उठून कोंबडा बनायचा. एका हवालदाराने तोपर्यंत एक तांब्या भरून पाणी आणले आणि तांब्या उपडा केला नित्याच्या डोक्यावर. नित्याची एकदम उतरली सगळी. हवालदाराच्या गयावया करायला लागला. "जाउद्या ना साहेब , चूक झाली . चांगल्या घरचा आहे मी . ते बघा माझे मित्र आलेत, जाऊद्या आता " आमच्याकडे बोट दाखवत नित्या म्हणाला . "सावकार , आजच्या रात्रीपुरते ते नाही, तर हे मित्र आहेत तुमचे ", बाजूच्या कोठडीकडे बोट दाखवत हवालदार मिश्किलपणे म्हणाला. सगळं स्टेशन फिदीफिदी हसायला लागलं . सगळे भुरटे चोर, दारुडे होते त्या कोठडीवजा खोलीत. नित्याचा चेहरा रडवेला झाला. शेवटी काहीतरी जुगाड करून आम्ही त्याला तेथून सोडवून आणलं. गाड्या मात्र स्टेशन मधेच राहिल्या आमच्या. सोम्याच्या घरी पोचताच श्रमाने , दमून भागून झोपलो सगळे. कशाचं न्यू इअर आणि काय. सगळं बाजूला राहिलं. सकाळी उठून निरोप घेऊन रिक्षाने घरी पोचलो. ताई ने गेल्या गेल्या ओरडून दवंडी पिटली घरात "पप्पा, रिक्षा नि आलाय बघा हा , गाडी कुठे तडमडवली तुमची काय माहिती ?" "पंक्चर झालीय गाडी सकाळी येताना रस्त्यात. एक पण गारेज उघडे नाही. म्हणून तिथे दत्त मंदिरासमोर लावून आलो गाडी. १० वाजता जावून घेऊन येतो बरका गाडी, पप्पा" दिलीप कुमार सकाळचा चहा घेत होते, पेपर वाचत . मूड चांगला असतो जनरली त्या वेळेस त्यांचा. फारसे लक्ष नाही दिले त्यांनी. गाडी आणतो म्हणालो १० वाजता खरा , पण काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा होता माझ्यापुढे. अंघोळ वगैरे उरकून घेतली . डोकं जाम गरगरत होतं ह्यांगओवर मुळे. एक फर्स्ट क्लास झोप काढली चहा पिउन परत. दारूला हजार शिव्या घालत, आपल्या केलेल्या निर्धारचं कौतुक करत छान झोपी गेलो. मला जाग येतंच होती, तोवर बाहेरून आवाज आला. "आहेत का स्वामी साहेब घरात ?" . आमच्या घरासमोरचे दीक्षित काका. आले होते. "या या" म्हणत दार उघडले मी. नमस्कार चमत्कार झाल्यावर माझ्या वडिलांना अगदी खासगीत विचारले काकांनी. "काय स्वामी साहेब, कालची पार्टी अगदी जंगी केलेली दिस्तेय. स्टेशन मध्ये होता काय रात्रभर?" वडील वीतभर उडालेच हे ऐकून . "काय म्हणताय दीक्षित साहेब? मी कधीच दारू घेत नाही. आणि, आमच्या खानदानात अजून पर्यंत कोणी पोलिस स्टेशन ची पायरी चढलं नाही" "काय सांगता? अहो, आज मॉर्निंग वॉक वरून परत येताना, स्टेशन मध्ये गाडी दिसली तुमची . सव्वीस पंच्याहत्तर तुमचीच गाडी आहे ना. ओळखतो मी चांगलीच. चौकशी केल्यावर कळाले कि रात्री पकडलेल्या गाड्या आहेत त्या सगळ्या " वडील काही बोलले नाहीत. म्हणाले गैरसमज झालाय तुमचा काहीतरी आणि विषयांतर केले. 'रिटायर झाल्यापासून ह्या टकल्या दीक्षितला काही काम नाही राहिलं. चांभार चौकश्या करत फिरतो' माझ्या मनात विचार आला. वडिलांची थंड विषारी नजर माझ्यावरून फिरली. पुढचा सीन काय असेल त्याचा अंदाज आला मला . अमिताभचा शक्ती मधला डेथसीन. अजून काय ? फुकटचा चहा मारून दिक्षित काका परत गेले. न भूतो न भविष्यती शिव्यांचा भडीमार झाला माझ्यावर. नको तेवढे अपमान , बोलणी झाली. सगळ्या खानदानाच्या शपथा घालून झालं. "पोकेट मनी बंद. लुनावर जप्ती. टीव्ही पाहायला बंदी. पुढच्या महिन्यातली सहल कॅनसिल. मित्रांना भेटायची बंदी" असा पंचकलमी कार्यक्रम जाहीर झाला. दिलीप कुमार ने पार कच्चा खाऊन टाकला अमिताभला. दोन आठवडे सरले ह्या गोष्टीला. अगदी परिवर्तन आले होते माझ्यामध्ये. अमिताभचा अमोल पालेकर झाला होता अगदी. आई,पप्पांचा राग हळूहळू ओसरायला लागला होता. पप्पा अजूनही बोलत नव्हते , पण एकंदर माझ्या वागण्याने त्यांना थोडे बरे वाटत होते असं दिसत होते. संक्रांत होती उद्या. सणावाराचे वातावरण असल्यामुळे सगळे खुश होते घरी. आईने पूजेचे सामान घेऊन यायला सांगितले मला.पप्पांनी स्वतःहून बाईक ची चावी दिली. किती दिवसांनी स्वातंत्र्य मिळाले होते ! आज खरे महत्व कळाले होते स्वातंत्र्याचे. हार, फुले , नारळ घेतला. बाजूलाच मंग्या राहतो . चला त्याला भेटून येवू पाच मिनिट, असा विचार करून त्याच्या घरी गेलो . काकूंनी हसत दरवाजा उघडला . तीळगुळ दिलं. "मंगेश कुठे आहे काकू ?" "वरच्या मजल्यावर बसलाय अभ्यास करत. नितीन आणि सोमनाथ पण आलेत थोड्या वेळापूर्वी वह्या पुस्तकं घेवून" "ठीक आहे, भेटून येतो त्यांना ". असं म्हणत मी वर गेलो पायऱ्या चढून . वरच्या खोलीत गेलो आणि पाहतो तो काय? टेबलावर ओल्ड मंक ची चकचकीत काळी बाटली . फेसाळता सोडा, ग्लास मध्ये फसफसत होता. कुरुकुरित खमंग चकल्या आणि चकना एका तेलकट कागदात बांधलेला. आत्ताच सुरुवात केली असावी त्यांनी . "ये ना भावड्या , वेळेवर आला एकदम. नित्या ओत रे अजून एक पेग !" मंग्या म्हणाला. "नाही रे, सोडली मी" मी म्हणालो. "एक घे रे पेग. आयुष्याचा काय भरोसा आहे. आज आहे उद्या नाही." "नकोच" नाकपुड्या थरथरायला लागल्या. डोकं भन्न झालं. मन सांगायला लागलं पळून जा इथून. शेवटी …… मनाला न्यू इअर रेजोलुशन परत बजावून सांगितलं . "दारू ला स्पर्शही नाही करायचा ……… पुढच्या वर्षापासून !" अरे हो "पुढच्या वर्षापासून !" शब्दाचा अगदी पक्का आहे हो मी तसा. आणि हळूच, माझा हात पुढे सरकला. ग्लास घ्यायला !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2811
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्तं लिहिलंय. विशेषतः दिलीपकुमार आणि अमिताभ. बघा , आमच्या लात्त्तूरचेच निघालात राव स्वामी तुम्ही.

लूना चालवलीच कशी तुम्ही...तो मान फक्त आणि फक्त ब्रम्हेंचा"च" लेखात कोणी "वकार युनुस" नाहीत त्यामुळे लेख वास्तवापासून दूर कल्पनारंजन वाटले पण तरी लेख मात्र फर्मास :)

लेख आवडला . अशाच काही भन्नाट आठवणी ताज्या झाल्या :)

नावावरून वाटलं होतं की शुभेच्छा देण्यासाठी धागा काढलाय की काय. झकास लिवलंयत...मजा आली!!

ज्या क्षणी थांबायला हवे होते, तोच क्षण पकडलात.... असो, एक कथा म्हणून चालून जातंय.पण खर्‍या आयुष्यात थांबण्याची हीच वेळ असते. बादवे, तुम्ही पण लातूरचे का? आमचा एक खास मित्र पण लातूरलाच असतो.