चिनू ची गोष्ट !!
चिनू ची गोष्ट !!
मे महिन्याचे दिवस होते.यंदाची मे ची सुट्टी काकांच्या गावाला साताऱ्याला घालवायची असे समस्त बच्चे कंपनी चे ठरले होते.
मला ते साताऱ्याचे घर फार काही आवडायचे नाही. तसा वाडा मोठा होता, पण जुनाट वाटायचा. रात्रीच्या वेळी तर भयंकर शांततेचा आणि भकास वाटायचा. कधी मुक्काम केलाच तर कधी एकदा उजाड़ते आणि सगळे उठतात ....अस होऊन जायचं मला. आईला मी म्हणायचेही नेहमी... की मला नाही आवडत इथे.... पण काय ...आई काहीतरी सांगुन विषय टाळायची.....उगीच काका काकूंना काय वाटेल असे त्यांनी ऐकले तर......
काकांची आर्थिक परिस्थिति तशी बेताचीच. त्या वाड्यातल्या भाड़ेकरूंन कडुन मिळणारे भाडे आणि छोटेसे किराणा मालाचे दुकान यातून पुरेसे उत्पन्न होत असे. त्यांना दोन मुले . नाना आणि पंढरी. नाना कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला होता आणि पंढरी ने 8 ची परीक्षा नुकतीच दिली होती. दोघेही स्वभावाने खुप चांगले होते. नेहमी हसतमुख असत. पण गेल्या 1-2 वर्षात नाना ची सारखी तब्बेतिचि तक्रार असे .... आणि पंढरी चे अभ्यासात काही लक्ष नाही, भाडेकरू पण मिळत नाहीत असे म्हणून काकू कायम चिंतेत असायची. बिचारी , ती तरी कुठे कुठे बघणार......... ती काही फार शिकलेली नव्हती........पण काकांबरोबर सुखाचा संसार करत होती......त्यांना दुकानात बरोबरीने काम करू लागायची... परत घराची कामे .......मुलांची दुखणी खुपणी.....सग्गळं सग्गळं......
आता यावेळी आम्ही सगळे सुट्टीला साताऱ्याला येणार म्हणून ते सगळेही खुप आनंदात होते..... मी, मोठ्या काकांच्या दोन मुली शारदा आणि सुमित्रा आणि आमचा अजुन एक आतेभाऊ कुमार. अशी सगळी बच्चे कंपनी एका जागी जमलो की धम्माल उड़ायाची.
सगळे साधारण एकाच वयाचे. एक दोन वर्ष पुढे मागे. मग काय ... लपाछपी , विषअमृत, डबा ऐसपैस, क्रिकेट , बैडमिंटन, चेस , कैरम, व्यापार, पत्ते असे एक ना अनेक ....हजारो खेळ खेळायचो.....
पण यंदा मला काही उत्साह नव्हता.. का कुणास ठाउक! 4-5 दिवस उशिरा च पोचले मी, सगळे जमल्यानन्तर . आई बाबा रात्रीच्या गाडीने परत जाणार होते. बाबांना दुसऱ्या दिवशी ऑफिसला जावे लागणार होते... म्हणून काकुने आग्रह करूनही आई बाबा काही थांबले नाहीत. .....
मी पण रमले होते ... आम्ही मुलींनी भांडी कुंडी काढली होती खेळायला......रात्रीचे जेवण पण मस्त झाले....काकुने छान बेत केला होता....मग आम्ही झोपायला जाणार इतक्यात दारावरची कड़ी कुणीतरी वाजवली..." आली वाटतं...... बघ रे नाना जरा " काकू म्हणाली.
नाना ने जाऊन दार उघडले , सत्तरी ला आलेली एक जक्ख म्हातारी आत आली. पान्ढ़ऱ्या केसांचा अम्बाडा, चेहऱ्यावर सुरकुत्या, सावळा रंग, कपाळावर मोठा लाल टीळा , मोठ्ठे भितीदायक डोळे, गळ्यात कसल्या कसल्या माळा, अंगावर पिवळ्या धमक रंगाची नऊ वारी साड़ी , पायात स्लीपर .......असा गावठी पण जरा विचित्रच पोशाख असलेली म्हातारी हळु हळु आत आली अन एकदम माझ्याकडे रोखून म्हणाली " ही पोर कुणाची? " " पुतणी माझी ! सांगलीची !! " काकू म्हणाली ....
" शाळंला जाती का ? " म्हातारी ने पुढे विचारले " हो , सहावीला आहे मी " असे मी सांगितले.
" म्हातारे , कुठे फिरत असते गं , रात्र झालिये की ...." अस म्हणत नाना ने खूंटी वर टांगलेली किल्ली तिला दिली....... " आरं बाबा , जवळच गेले होते...फिरायला..... काय करावे म्हातारीने ......." हसत हसत ती तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली.थोडा वेळाने पंढरीने पत्ते आणले आतल्या खोलीतून आणि म्हणाला "चला रे पत्ते खेळु " ......आणि आम्ही सगळे गच्ची वर निघालो ..... जिन्या तुन जाता जाता म्हातारीच्या खोलीच्या खिड़की तुन मी सहजच आत डोकावले ..... ..म्हातारी शांत झोपली होती.....डोक्या पाशी लोटी फुलपात्र ठेउन.
गच्चीवर मस्त गार वारा होता, चंद्रकोर लोभस वाणी दिसत होती , आजू बाजूला झाडांच्या पानांची सळ सळ होती, झाडांच्या चित्र विचित्र सावल्या गच्चीत पडत होत्या....
तशात आमचे पत्त्याचे डाव ही रंगले. शारदा, सुमि ताई , पंढरी , नाना , कुमार सगळे च पत्त्यामधे अगदी दंगले ,पण मला मात्र अस्वस्थ वाटू लागले होते.
कदाचित आई बाबान्ची आठवण येत होती, की आता रात्री उगीचच कसली बसली भीती वाटत राहिल ,इथे वाड्यात ,असे वाटत होते.... उगीचच! .... ती म्हातारी आठवली अचानक! इतक्यात मागुन एक थाप पडली पाठीवर आणि घाबरून मी एकदम ओरडले " आ आ आ !!" सगळे माझ्याकडे पाहत होते, मला काय झाले इतके ओरडायला असे म्हणत एकदम हशा पिटला ...... ती काकू होती .. " चला रे पोरांनो, झोपायला " .......
" चला चला ...... निट झोप ग चिनू ,,, भूते आहेत बरं का वाड्यात..... चावशील एखाद्याला ... आणि मग तेच घाबरून पळेल तुला ..... हा हा हा " ...... कुमार मला चिडवत होता आणि सगळे हसत होते.....
" बोलू नका रे काहीबाही ! तिला .." काकू ने सगळ्यान्ना दटावत म्हटले ........
मी काकुचा हात धरून खाली निघाले ...... जिन्यातुन जाताना अगदी सहज नजर गेली म्हातारीच्या खिड़की कड़े......... खिड़की बंद होती .... आत मधे कभिन्न काळोख होता.....
पण कसलातरी पुसटसा दण दण असा आवाज येत होता....
" लागली वाटतं म्हातारी मिरच्या कुटायाला..... काय पण अवदसा आहे.... किती सांगितले तरी ऐकत नाही ......." काकू तण तण करत आत गेली आणि काकांवर ओरडली " आहो, किती वेळा सांगितले तुम्हाला , म्हातारी ला काढून टाका म्हणून.... हा महिना झाला की बघ म्हणावं दुसरीकडे खोली ..... आम्हाला चालणार नाही हे..... भुतिण्ण कुठची !!!"
" अग अग शांत हो ...... बिचारी म्हातारी... तिच्याबद्दल तुमा सगळ्यान्ना कसला राग आहे, कोण जाणे ! " काका समजुतिच्या स्वरात म्हणाले ....
"अहो पण ....."
" ठीक आहे..... बोलतो मी उद्या ...... ती म्हातारी पण ना......!" अस म्हणुन काकांनी चादर ओढली आणि ते झोपून गेले.
काकू आणि मी आतल्या खोलीत गेलो..जाताना परत एकदा माझी नजर म्हातारीच्या खोलीकडे......
खरंच ही काय करत असेल अंधारात.......इतक्यात बाकी मंडळी जिन्यावरून खाली आली हसत हसत....... आणि नाना मजेच्या सुरात ओरडला " म्हातारे , झोप आता ......... उद्या आम्ही सगळे येतो कुटायला ...." आणि एकच हशा ....सगळे मोठ्यामोठ्याने हसत होते.....
आणि कर्र कर्र कर्र असा आवाज आला दाराचा तसे सगळे पळत सुटले ... " म्हातारी आली , म्हातारी आली ....." .
आतल्या खोलीत आम्ही सगळे गेलो तशी काकू म्हणाली " चेष्टा नका करू .....तसंही आता महिनाभर..... मग काही तिला ठेवणारच नाही आहोत आपण....."
पंढरी म्हणाला," हो ना , रोजची कटकट ,,शाळेत पण मला चिडवतात..... तुमच्या वाड्यात भूत रहाते म्हणून..... " ...
नाना तसा लगेच बोलला " हम्म तुझं राहु दे .....ते तुलाच भूत म्हणत असतील ......" आणि हसता हसता जोराचा खोकला आला त्याला ....तसा तो पाणी प्यायला निघून गेला . " ठेचा जास्त खाल्लास का रे ???" काकू ओरडली ........
न राहवून शारदा म्हणाली " ए काकू , काय ग पण खरंच ही म्हातारी रात्री कसला आवाज करते ...मी पण ऐकतिये 2 दिवस झाले."
" काय माहित नाही गं... कधी विचारले तर टाळ ते .... किंवा काहीबाही बोलते ...त्याचा अर्थ काही आपल्याला कळत नाही...... मला ती जरा विचित्रच वाटते , म्हणून तर कधीची यांच्या मागे लागले आहे की तिला सांगा जायला !!
पण खरंच ती म्हातारी आल्यापासून सगळ बिघडले आहे....हा नाना सारखा आजारी काय पडतो , पंढरी पण अगदी काठावर पास झाला कसाबसा .....दुकान पण पुर्वीसारखं निट नाही बघ चालत...." तिच वाक्य तोडत सुमिताई म्हणाली " अग काकू , चालायचंच असं थोडफ़ार मधून अधून ..... उगी कशाला आपण कुणाला दोष द्यायचा ......... नाही त्या तुमच्या अंधश्रद्धा!
हां ....म्हातारी दिसायला तशी विचित्रच आहे ....अन तिचे ते डोळे ....बाप रे ....आत्ता बुबुळे बाहेर पडतात की काय असं वाटतं ......बरं जाऊ दे आता तो विषय ....उगीच ही चिनू घाबरून उठायची....आजच अलिये !" अन हसू लागले परत सगळे. मग मी पण धीट पणे म्हणाले " छ्या ! मी नाही घाबरत कुणाला !" ......
" शहाणं ग बाळ ते !" अस म्हणून पंढरी हसू लागला ....आणि आम्ही सगळे लाइट बंद करून झोपलो. मी आपली काकूच्या जवळच झोपले.
मनात माझ्या ती सगळी चर्चा , ती म्हातारी, ती तिची खिड़की, तो आवाज असं सगळं घोळतंच राहिलं......पुरती धीट झाले होते मी आता.....सगळे हसत होते आणि मीच बावळट घाबरत होते , म्हणून सगळे माझी टिंगल करत होते. असं वाटुन स्वताचेच हसू आले मला.
पंख्याचा घर्र घर्र आवाज आता शांततेत घुमत होता, बाहेरच्या वाऱ्याच्या झुळुकी बरोबर खिडकीचा पडदा हालत होता, बाकी सगळं शांत. अन त्या शांततेला भंग करणारी एखादी टिटवी मधुनच ओरडत होती.
खोलीत अचानक बाहेरून कसला तरी प्रकाश दिसू लागला.मी आजुबाजुला पाहिले तर सगळे शांत झोपले होते . मी पण मग पांघरूणात तोंड खुपसले. हळूच परत पाहिले तर प्रकाश दिसतच होता. मग विचार केला की काय आहे ते बघू ... आता मी धाडसी झाले होते ना !! मग सरळ उठले, हळु हळु पावले टाकत खोलीच्या बाहेर आले......हॉल मधून घराचे दार उघडून बाहेर आले ...... तो प्रकाश म्हातारीच्या खोलीतुनच येत होता ..... तिच्या खिड़की पाशी जाऊन पहावे असे ठरवले ..... तेवढ्यात लक्षात आले की जिन्यातुन दिसतेच की खोलीतले तिच्या! म्हणून ....मी जिन्यापाशी गेले....पहिल्याच पायरी वर पाय ठेवला अन कर्र्र्र्र्र असा आवाज झाला.....मीच दचकले.....आता म्हातारीच्या खोलीतून दण दण असा आवाज पण मोठ्याने येउ लागला, काय चाललंय ते पहायचा निर्धार करुनच मी चार सहा पायऱ्या अजुन वर चढले.....पाहिले खिडकी तुन ......म्हातारी उखळामधे काहीतरी लाल लाल कूटत होती. ती मला पाठमोरी दिसत होती .
तेवढ्यात पाया जवळ मला काहीतरी जाणवलं....मी खाली पाहिले तर दोन असे म्हातारे हात दिसले अंधारात.........चर्र्र्र झालं काळजात ......आणि जीवाचा थरकाप उडाला जेव्हा पाहिले की ते नुसते दोन हात होते....खान्द्यापसून तोड्लेले ....मागे शरीरच नव्हते......मी मोठ्ठ्याने किंकाळी फोडली अन धावत सुटले......अन पळत आले ते म्हातारीच्या दारापाशी ......ती ते कुटायाची थांबली आणि तिने मागे वळुन पाहिले ........तर तर ......कुणी नव्हतेच म्हणजे नव्हतेच कुणी गुंडाळलेल्या त्या साड़ी मधे ......मी अजुनच घाबरले ......उखळाकडे लक्ष गेले तर ते रक्ताने भरुन वाहत होते.....आजुबाजुला खोलीभर रक्त सांडले होते ......लोटी फुलपात्र पण त्यानेच भरलेले होते......
मी ओरडत होते ,पळत होते पण कुणाला कदाचित काहीच ऐकू जात नव्हते .......मी पळत गच्चीवर गेले सगळ्या न्ना हाका मारत मारत........तर गच्चीवरच सगळे झोपलेले....शांत .....मी गदगदा हालवत होते पण कुणीच उठले नाही......मग आजुबाजुला पाहिले तर एका झाड़ा च्या फांदीवर चक्क ती म्हातारी बसली होती .....आणि ...तिचे लांबच्या लांब पाय वाडयातल्या विहिरी मधे ......पायाने पाण्याचा आवाज करत काहीतरी गुणगुणत ती बसली होती.......माझ्याकडे पाहून म्हणाली " किल्ली दे आणून खोलिची , माझे दुखणारे हात खाली वाट बघत आहेत तुझी " .......
अन मी प्रचंड घाबरून खाली निघाले आणि मागे फिरले तर गच्चीच्या दारात म्हातारी उभी..... तश्शीच ....अगदी पहिल्यांदा पाहिली होती तशी......... पान्ढ़ऱ्या केसांचा अम्बाडा, चेहऱ्यावर सुरकुत्या, सावळा रंग, कपाळावर मोठा लाल टीळा , मोठ्ठे भितीदायक डोळे, गळ्यात कसल्या कसल्या माळा, अंगावर पिवळ्या धमक रंगाची नऊ वारी साड़ी , पायात स्लीपर ........
" ही पोर कुणाची? " .
......परत तोच प्रश्न ..........
" ही चिनू, चार वर्ष झाले ही इथेच आहे......" एक पांढऱ्या साड़ीतली नर्स बोलत होती ......"येणा जाणारी कोणी बाई दिसली की ही तिला 'म्हातारी' म्हणते ......विहिरीतले पाणी प्यायला सांगते ......भावंड म्हणून कुणाकुणाची नावे घेते ..आणि काय काय........."
" डॉक्टर म्हणतात ' होईल बरी' ..... पण तोपर्यंत काय .......मी रोज गोष्टी ऐकते ......."
".....आजीबाई , पहिल्याच दिवशी तुम्हाला का उशीर झाला?? ..... अहो, वार्ड स्वच्छ नसेल तर डॉक्टर चिडतात......."
" अगं बाई काय सांगू, माझ्या खोलिची किल्ली सापडेना बघ सकाळी ........ अन काल पासून हात पण दुखत आहेत .....ठेचा करत होते खुप दिवसांनी ".......
..असं म्हणत आजीबाई ने एक नजर टाकली चिनू कड़े आणि चिनू पण गालातल्या गालात हसत राहिली.......म्हातारी कड़े बघून ...........!!
।...............फिझा
वाचने
4172
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
दोनतीन वेळा परत परत वाचली.
ही चिनू मनाने खुपच नाजुक दिसते
थरारक
सॉलिड जमली आहे गोष्ट...
जमली आहे..
In reply to जमली आहे.. by योगी९००
त्या शास्त्रीय गायकाच्या
मस्तच जमलीये शैली आवडली
गोष्ट लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता.......
पहिलाच प्रयत्न असूनही कथेची
मी सकाळी सकाळी ऑफिसमध्ये
मस्त कथा...
छान.
छान... जमलीये कथा...