Skip to main content

माझ ब्राम्हण असण

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 05/10/2014 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये . कुठल्या एका वाक्याने किंवा शब्दांनी तसा गैरसमज झाल्यास ती माझ्या लिखाणाची मर्यादा : जेंव्हा तुमच बालपण मुंबई - पुण्याबाहेर आणि सांस्कृतिक - शैक्षणिक राजधानी वैगेरे वैगेरे च्या बाहेर जात तेंव्हा 'जात ' आणि इतर रखरखीत 'वास्तव ' फार लहान वयात कळायला लागतात . जात वैगेरे कस कळायला लागल ? तर लहान असताना आम्ही भाड्याच्या घरात राहायचो . घरमालकीण बाई एकदम धार्मिक - सोवळ्यातल्या वैगेरे वैगेरे . मैदानापासून माझ घर जवळ असल्याने खेळण झाल्यावर माझे मित्र पाणी प्यायला माझ्याकडे यायचे . आमच्या घर मालकीण बाई त्यांच्यावर फार बारीक नजर ठेवून असत . त्या प्रत्येक मित्राला direct आडनाव विचारीत (नाव नाही ) . मित्रांनी आडनाव सांगितलं कि त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव येत किंवा येत नसत . मग मला बाजूला घेत त्या मला सांगत ," अरे कुणासोबत हि राहतोस का रे ? आपल्या ब्राम्हण पोराना काय धाड भरली आहे का ?" त्यांनी बहुदा माझ्या आईकडे पण माझी तक्रार केली होती पण आईने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि नंतर आम्ही ते घरच बदलल . नंतर सर्व ब्राम्हण मुलांप्रमाणे मी पण शाखेत वैगेरे जायचो . तिथे शाखेवरचे गुरुजी गांधीजी बद्दल कधी टिंगल पूर्वक तर कधी विखारी पणे बोलायचे . तिथे फारसे ब्राह्मणेत्तर मुल नसायची . नंतर बर्यापैकी हुशार विद्यार्थी असताना पण मी अकरावीला कला शाखा निवडली . एवढ्या मोठ्या वर्गात दोघेच ब्राम्हण . मी आणि अजून एक मुलगी . एव्हाना कुलकर्णी , देशपांडे , आणि आडनावाच्या शेवटी 'कर ' लागणाऱ्या लोकांसोबतच राहिलो होतो . डाके , अंभोरे , नलदे हि आडनाव पण जगात अस्तित्वात आहेत असा शोध मला लागला . बहुजन समाजाशी कॉलेज च्या निम्मिताने आलेला हा पहिला संपर्क . एकदा इतिहासाच्या देशमुख सरांनी पंढरपूर आणि तिथले बडवे यांच्यावर वर्गात काही जहाल विनोदी comments केल्या आणि अख्खा वर्ग जोरजोरात खिदळयला लागला . माझ्या मागच्या पोराने 'च्यायला हि बामन अशीच ' अशी हसता हसता दिलेली प्रतिक्रिया मला पण ऐकू आली . आपली जात बाकीच्या समाजात फार काही लोकप्रिय नाही अशी खुण गाठ मी मनाशी बांधली . बारावी नंतर पुण्यात एका धार्मिक (का सांस्कृतिक ?) संघटनेचा प्रभाव असणार्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . तिथल्या वसतिगृहातच राहत होतो . तिथे बारापगड जातीची मुल राहत . होस्टेल च्या शेवटच्या वर्षाला असणार्या मुलांपैकी एकाला 'Best Hostelite ' चा पुरस्कार दिला जाई . या पुरस्कारासाठी काही कारणाने ब्राम्हण मुल च (काही मोजके अपवाद वगळता ) पात्र ठरत . इतर जातीची मुल त्यामुळे वसतिगृह व्यवस्थापनावर खार खाउन असत . एकदा याच मोठ्या धार्मिक -सांस्कृतिक संघटनेचा एक कार्यक्रम कॉलेज मध्ये होता . त्या कार्यक्रमात एका ख्रिश्चन विद्यार्थ्याने टिळा लावून घेण्यास नकार दिला तेंव्हा होस्टेल मधल्या चित्पावन पोरांनी त्याला (त्याच्या पाठीमागे ) खूप शिव्या दिल्या होत्या . हि चित्पावन पोर माझ्यासारख्या घाटावरून आलेल्या ला पण खिजगणतीत धरत नसत . त्यामुळे चित्पावन लोक म्हणजे आपल्यापेक्षा भारी हा तेंव्हा पासून आलेला गंड डोक्यातून अजून पण पूर्ण पणे गेलेला नाही . एकदा मी आणि माझा बहुजन समाजातला मित्र एका पेठेत रणरणत्या उन्हात अशाच एका महान धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पत्रिका वाटत असताना आलेला अनुभव तर उच्च श्रेणीतला होता . आम्ही लेले , नेने , देशपांडे यांचे दरवाजे पत्रिका देण्यासाठी वाजवायचो . मग माझा बहुजन साथीदार आपल नाव सांगून आम्ही कुठून व कशासाठी आलो आहोत हे सांगून पत्रिका द्यायचा . मे च उन होत पण कोणी आम्हाला उपचार म्हणून पाणी पण नाही विचारलं . वैतागून माझा मित्र मला म्हणाला , 'आता तू दरवाजा वाजव आणि माहिती दे .' पुढच्या ठिकाणी मी हा सोपस्कार केला . दरवाजा वाजवला आणि नाव सांगितलं . आणि अहो आश्चर्यम . पुढच्या अनेक घरी आम्हाला पाणी आणि काही ठिकाणी तर लिंबू शरबत पण घेण्याचा आग्रह झाला ." नावात आणि त्यातल्या त्यात आडनावात बराच काही असत रे ." खिन्न पणे हसून त्या मित्राने शालजोडीतला दिला . आडनावा वरून आपल्या समाज व्यवस्थेत किती मनांवर चरे उमटले असतील याची अजून गिणती व्हायची आहे . एक अनुभव तर खासच . एकदा मी ट्रेन ने औरंगाबाद ला जात होतो . तर एका आजोबाना मी त्यांची अडचण ओळखून सामान वैगेरे चढवायला मदत केली . बाजूला जागा पण मिळवून दिली . मग आम्ही बर्यापैकी गप्पा पण मारल्या .त्यांनी स्वतहा बद्दल सांगितलं . त्यांनी काय करतोस असे विचारले . त्यावेळेस मी काहीच करत नसल्याने तोंडात येईल ते उत्तर देत असे . मी त्याना काही तरी द्यायचे म्हणून उत्तर दिल ,"मी मिलिंद कॉलेज मध्ये शिकतो ." आजोबांचा नूर एकदम पालटला . आजोबा एकदम बोलायचे थांबलेच . ट्रेन औरंगाबादला पोहोंचल्यावर ''बराय . बाझारात भेट होईल च कधीतरी ." म्हणून आजोबांनी कलटि मारली . दलित असणे म्हणजे काय असू शकते याची बारीकशी चुणूक मला त्या दिवशी मिळाली . हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या . इथे ब्राम्हण समाज म्हणजे आय टी मध्ये नौकरी करणारा आणि देशाबाहेर राहणारा समाज असे अजून एक generalization नाही केले तर अजूनच चांगल . ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे . मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे . जाता जाता - हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे . कुठल्या जाणकाराच किंवा एखाद्या बहुजन समाजतल्या आय डी च यावरच Social Analysis वाचायला मला आवडेल . खूप शिव्या खायला लागणार आहेत पण हरकत नाही . पण चांगली चर्चा घडण्यासाठी हि दिलेली किंमत असे समजू .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22706
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

कोणाला कसला अभिमान असला तर तो स्वतःबद्दल असावा या मताची होउन राहिले आहे मी आता. त्यामुळे उगा उठुन कुणी स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहीत असेल तर त्यात माझा अनुभव मिसळुन बे दुनी चार करण सोडुन दिलयं. जाती वरुन हीनवणे , मग ती उच्च असो वा हीन हे जितके इनह्युमन तितकेच जातीवरुन वागणुक देणे सुद्धा वाईटच. त्याही पलिकडे जाउन जेंव्हा एक स्त्री म्हणुन कनिष्ठ वागवल जात तेंव्हा तर जातसुद्धा गळुन पडते. एकून माणसांचे मुखवटे गळुन पडायला ना जातीच कारण पुरतं ना धर्माचं, नाही लिंग!

धाग्यातील विचार, पुढच्या प्रतिसादांतील अनुभव इत्यादी सर्व गोष्टी वास्तवाला धरूनच आहेत. मग वैयक्तिक पातळीवर असतील किंवा व्यापक पातळीवर. त्याबाबत भाष्य न करता एक प्रांजळ मत मांडू इच्छितो. आरक्षणाबाबत आणि त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत. एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जो सतत ज्ञानार्जनास उत्सुक असतो तो ब्राह्मण. ही व्याख्या धरून पुढे म्हणावसं वाटतं, अशा ब्राह्मणाला त्याच्या ज्ञानाचा अभिमान असतो आणि तीच त्याची ताकद असते. आता, सर्वसाधारण अर्थाने किंवा जातीने जे अब्राह्मण असतात ते मूर्ख असतात का? मुळीच नाही. मग; आरक्षणाचा उपयोग करून शिक्षणसंस्थात प्रवेश मिळवणं त्यांना मोठेपणाचं का वाटतं? त्याची गरज त्यांना का लागते? 'आरक्षण' या गोष्टीकडे मी कुबड्यांसारखं बघेन. मला नीटपणे चालता येत असताना कुबड्या घेऊन चालण्याची आणि स्वतःला अपंग म्हणवून घेण्याची इच्छा मला होणार नाही. पण तसं समाजात होताना दिसत नाही. 'मला रिझर्वेशन आहे मित्रा! ओबीसी! ' हे अभिमानाने सांगणारे मित्र बघितलेले आहेत मी. त्यांनाही हा विचार सांगून बघितला, पण मिळतोय फायदा तर का न घ्या? ही त्यांची त्यावरची प्रतिक्रीया असायची. तेंव्हा जोवर हा विचार समाजमनातून नष्ट होत नाही (कठीण आहे ते) तोपर्यंत ७८-३८ चा फॉर्म्युला अबाधित आहे.

लेख आवडला !! जन्माने जात असु नये हे तात्विक दृष्ट्या सर्व जण मान्य करतात.. पण व्यवहारात जात ही जन्मानेच ठरते हे सत्य आहे. काळाप्रमाणे लोकांचे व्यवसाय कामधंदे बदलले पण जाती त्याप्रमाणे बदलल्या नाहीत..

In reply to by बाळ सप्रे

लेख आवडला असे म्हणून आपण लेखकाला शालजोडीतले देत आहात का? कारण ह्या वाक्यानं सरसकट सगळ्या लेखाचं कौतुक होत आहे. सरसकटीकरण हे तर लेखकाला मुळीच आवडत नाही. लेखातल्या या वाक्याबद्दल आपले काय मत आहे? तेही आपल्याला आवडले का? "हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या" ब्राह्मण समाजाला बहुजन समाज हा आपला शत्रु म्हणून लागतो? मुस्लिम लोक शत्रु म्हणून लागतात? युपीचे भय्ये शत्रु म्हणून लागतात? ही कसली गरज म्हणायची ब्राह्मणांची? उत्तर देण्याचे बंधन नाही. मी हा प्रश्न पुन्हा लेखकालापण विचारणारच आहे.

खरं पाहता मी कांहीच प्रतिसाद ह्या धाग्यावर देणार नव्हतो. मुळात, एकदा पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . असा डिस्क्लेमर सुरुवातीलाच टाकला की आपला कल्पनाविलास आपल्याला हव्या त्या दिशेने नेता येतो. कुठल्याही काल्पनिक गोष्टी 'मला आलेला अनुभव' ह्या नांवाखाली लिहून समाजातील कांही जाती वर्गाला भडकवायचं, वादविवाद घडवून आणायचे आणि मिटक्या मारत मजा बघत राहायची, ह्या विकृत उद्देशाव्यतिरिक्त ह्या धाग्यात मला तरी कांही दिसत नाही. ज्यांना भांडायचे असेल त्यांनी भांडावे, पण सूज्ञांनी विचारपूर्वक दूर राहावे असे मी आवाहन करेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्णपणे सहमत आहे. एकद्याच्या वैयक्तिक अनुभवावर काय बोलणार ?? कुठेतरी काड्या लावायच्या आणि आग लागल्यावर गंमत पहात उभे रहायचे..

तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून ठीकाय पण बर्‍याचदा चर्वितचर्वण झालेला विषय असल्याने आता प्रतिसाद द्यायचा उबग आलाय. तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचले हेही नसे थोडके!! मिपाच्या कट्ट्यांबद्दल म्हणाल तर प्रश्न विचारण्यापेक्षा एकदा येऊन बघा तुमचं तुम्हालाच उत्तर मिळेल. ॥इति लेखनसीमा॥

हीन दर्जाच्या लोकप्रियतेसाठी लिहिलेला लेख ! माझे बालपण ठार खेड्यात गेले. माझे आई- वडील शिक्षक होते त्याच शाळेत ,तरीही आमचे जाधव मास्तर सानुनासिक स्वरात " काका" म्हणून आम्हाला हाक मारायचे ! माझे वय तेव्हा फक्त ८ वर्षे होते. अश्या शालेतून मी चौथीची शिष्यवृत्ती मिळवल्यावर हा द्वेष आणखीनच वाढला ! शेवटी जंग जंग पछाडून वडिलांनी बदली करुन घेतली तालुकयाच्या गावाला !. (तालुक्याचा सभापती ९६ कुळी , तो कशाला बामणाचे काम करेल? पण एका मुसलमान शिक्षणाधिकार्‍याला दया आली.)तिथेही द्वेष होताच पण तुलनेने कमी .. त्याच गावांत मी कॉलेजला गेल्यावर मराठ्यांच्या पोरांना , " ए कुळवाड्या " म्हनून हाक मारुन बदला घेतल्याचे समाधान मिळवायचो ! आजही त्या खेड्यातील ब्राह्मण द्वेष तसाच आहे !!! गेल्या १० वर्षात तर तिथे आता नावाला देखील ब्राह्मण राहिला नाही. मग संघाच्या संपर्कात आलो, राजाभाऊ भोसले होते प्रचारक , त्यांनी समाजावून सांगितले आणि अंतर्बाह्य शुद्ध झालो. पुढे तर औरन्गाबादला असताना स्वरुपवर्धिनीचे काम करायला लागलो , बुद्धवंदना शिकलो. मनात कसलेही किल्मिष राहीले नाही. ब्राहमण असल्याचा मला काहीही फायदा झाला नाही, उलट बाल-मनावर अत्यन्त वाईट आघात झाले. माझे आई- वडील नीर-क्षीर विवेक करणारे होते, मला संघाचा परिस स्पर्श झाला म्ह्णून माझे किल्मिष जळून गेले. असे किती भाग्यवंत असतील? उदगीरकरांचा धागा निव्वळ राळ उडविण्यासाठी काढला आहे. ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. पु. लं नी दलित साहित्याचे स्वागत आणि कौतुक दोन्ही केले.. असो अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लक्षात कोण घेतो ? खरे तर प्रतिसाद देणारच नव्हतो .. पण अगदीच राहवले नाही . म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , काळ सोकावतो आहे.

ज्या बहुजन समाजाच्या नावाने ते गळा काढताहेत , त्यासाठी परिश्रम करणारे बहुतांशी उच्च समाजातील होते ,हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत. तो बहुजन समाजही किती लक्षात ठेऊन आहे? ब्राम्हणांनी माझा उद्धार (चांगल्या अर्थाने) केला / ब्राम्हणांची सांगत होती म्हणून माझ्यात अमुलाग्र बदल झाला हे कितीजण मान्य करतील ? दुर्दैव हेच आहे की ब्राम्हणाने काढलेला धागा त्यावर ब्राम्हणांनी दिलेले प्रतिसाद आणि ब्राम्हणेतरानी दिलेले प्रतिसाद किंवा "मला आहे अभिमान दलित असण्याचा " किंवा "आहे मी मराठा मग...?" असा एखादा धागा ब्राम्ह्णेतराने काढावा त्याला येणारे प्रतिसाद तपासावेत मगच कळेल काहीतरी. एक ब्राम्हण दुसर्या ब्राम्हणाच्या बाजूने उभा रहात नाही पण बाकी सगळ्या जातीतले लोक आपल्या जातीतल्या माणसामागे उभे राहतातच हा अनुभव आहे.

अशा विषयांवर उघडपणे काही लिहिण्याबोलण्याची सोय राहिलेली नाही. मग ते एका समाजातले असो वा दुसर्‍या. वेळ मिळाल्यास व्यनि/खवद्वारे चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

ब्राह्मणांनी कुठले फायदे ओरपले ते कळले नाही. अजूनही दरिद्री ब्राह्मण खूप आहेत. ब्राह्मणांची शेती कुळकायद्यात गेली. आरक्षण नसल्याने ब्राह्मणांना शासकीय नोकर्‍यांची आणि शिक्षणाची शक्यता जवळ-जवळ संपुष्टात आलेली आहे. ब्राह्मण शेकडो एकर जमिनीचे मालक, जमीनदार, साखर कारखान्यांचे मालक, भव्य कॉलेजेसचे मालक, सहकारी सूत गिरण्यांचे प्रवर्तक वगैरे कधीच नव्हते. ते आधीपासूनच शिक्षणाच्या बळावर जगत आलेले आहेत. कधी काळी (६०-७० वर्षांपूर्वी) ब्राह्मणांनी पाळलेल्या अस्पृश्यतेपेक्षा कितीतरी पट जास्त अस्पृश्यता आणि पराकोटीचा आकस पाळणार्‍या जाती आजही महाराष्ट्रात आहेत. ब्राह्मण कुणालाही मदत करतांना जात विचारून कधीच मदत करत नाहीत. माझ्या बाबांनी गेल्या ४५ वर्षात कित्येक गरीब आणि ब्राह्मण (उच्चवर्णीय) नसणार्‍या गरीब मुलांना मोफत शिकवले आहे. त्यांनी कुणालाही मदत करतांना कधीच जात विचारात घेतलेली नाही. आणि अशी कित्येक उदाहरणे मला माहित आहेत. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात (आणि इतर क्षेत्रातदेखील) कित्येक ब्राह्मणांनी कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता आयुष्याचे प्रामाणिक समर्पण केले आहे. राजगुरु, सेनापती बापट, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, यांनी आयुष्य देशासाठी वेचले. साने गुरुजी, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, टिळक, दादा धर्माधिकारी, र. धो. कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाबा आमटे अशा कित्येक थोर ब्राह्मणांनी समाजसुधारणेसाठी आयुष्य खर्ची घातले. ही यादी अजून बरीच मोठी होऊ शकेल. या लोकांनी फक्त ब्राह्मण लोकांचेच भले व्हावे म्हणून आयुष्य वेचले असेल असे वाटत नाही. संत ज्ञानेश्वरांनी जे अलौकिक साहित्य निर्माण केले त्यात कुठेही जातीपातीचा किंवा इतर जातींचा द्वेष करावा असे लिहिलेले नाही. काळाच्या पुढचे इतके सुंदर पद्धतीने लिहिणारे हे संत ब्राह्मणच होते. संत एकनाथांनी कधी जात-पात पाळली नाही. आजच्या युगातदेखील माधव गाडगीळांसारखे निस्वार्थ आणि निस्पृह व्यक्तिमत्व निसर्ग वाचावा म्हणून जीवाचे रान करत आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन व्हावे म्हणून झटणारे दाभोलकर असोत किंवा तर्कशुद्ध जगण्याची शिकवण देणारे डॉ. श्रीराम लागू असोत, ब्राह्मणांनी प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम केलेले आहे. आजची परिस्थिती ब्राह्मणांसाठी उलट भयावह आहे. कुठलेच संरक्षण नाही. अकारण पसरविलेल्या गेलेल्या ब्राह्मणद्वेषाने आजचा ब्राह्मण हवालदिल झालेला आहे. जीव मुठीत धरून जगतो आहे. मी स्वत: कधीच जातपात मानली नाही आणि माझ्या आई-बाबांनी तसे मला कधीच चुकूनही शिकवले नाही. असा भेद करावा असे इतक्या वर्षात माझ्या मनालादेखील कधी शिवले नाही. आणि मी नेहमी तसेच वागत आलो. माझ्यासोबतचे कित्येक ब्राह्मण अगदी असेच वागतात हे मी अनुभवले आहे. माझ्या कित्येक चुलत-मावस बहिणींनी केलेले आंतरजातीय विवाह माझ्या नातेवाईकांनी आनंदाने स्वीकारले आहेत आणि त्या गेली कित्येक वर्षे सुखाने जगत आहेत. त्यावरून कधी हाणामारी, कापाकापी, सूडनाट्य वगैरे कधीच घडले नाही. माझ्या कमीत कमी ५ चुलत-आते-मावस भावांनी आंतरजातीय विवाह केले आहेत आणि ते देखील यशस्वी झालेले आहेत. मी ब्राह्मण असल्याचा मला अभिमान वगैरे नाही पण त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी, विचार, संस्कार वाट्याला आले त्यांचा अभिमान नक्कीच आहे. प्रत्येक जातीमध्ये, धर्मामध्ये, माणसामध्ये गुण-दोष असतातच. म्हणून ती जातच वाईट ठरत नाही. ब्राह्मणांविषयीचा हा अनाठायी द्वेष जेव्हा संपेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

दरिद्री + ब्राम्हण हीच मुळात द्विरुक्ती आहे. बाकी माझा एक मित्र नेहमी त्याच्या मोठ्या भावाबद्दल सांगतो "तसा आमचा णाणा म्हणजे ब्राम्हनच"

In reply to by समीरसूर

फुलेंच्या शाळे साठी आपला वाडा देणारा ब्राह्मणच होता, त्याने खूप त्रास सहन केला. पण आता कोणी नाव घेते का त्याचे? पुण्याच्या MIT college ला अनेक एकर जमीन घैसास नावाच्या ब्राह्मणानी दिली, आता MIT च्या नावाखाली कोण लुटालुट करतय?

In reply to by प्रसाद१९७१

उदार मनाने चांगल्या कार्यासाठी सढळ हाताने संपत्ती देणारे ब्राह्मण अगणित आहेत. आणि ते ही कुठल्याही फायद्याच्या आणि प्रसिद्धीच्या अपेक्षेशिवाय! कुठेही नाव नाही, मान, सन्मान नाही अशी समाजोपयोगी कामे ब्राह्मणांनी अनेक केली आहेत. महाराष्ट्रात भ्रष्टाचार, लबाडी, फसवणूक करून १०-२५-३०-४० कोटींची अमाप संपत्ती कमवणारे किती ब्राह्मण असतील? किती ब्राह्मणांची संपत्ती वर्षागणिक कोट्यवधी रुपयांनी वाढलेली आहे? किती संपन्न ब्राह्मण समाजात गुंडगिरी करून दहशत माजवतात? कुठला लेले, कुळकर्णी, बापट त्याच्या भागात भ्रष्टाचारी-कम-गुंड-कम-राजकारणी-कम-पुढारी म्हणून कुख्यात आहे? कुठल्या ब्राह्मणाने बेकायदेशीर बांधकाम करून करोडोंची माया गोळा केलेली आहे? कुठल्या ब्राह्मणाने साखर कारखान्याची मालकी कारखाना बुडवण्यात वापरली आहे? कुठल्या ब्राह्मणाने एखाद्या सहकारी बँकेचे दिवाळे काढून स्वतःच्या करोडोंच्या कमाईची दिवाळी साजरी केलेली आहे? या प्रश्नांची उत्तरे जर प्रामाणिकपणे शोधली तर मला वाटते ब्राह्मणांविषयीचा असुयेपोटी जन्माला घातलेला आणि पोसलेला अकारण आणि तद्दन निरर्थक द्वेष कमी होईल. पण नेमकं तेच कुणालाच करायचं नाहीये. कारण मग गलिच्छ, जातीजातींमध्ये विष पेरणारं राजकारण कसं खेळता येणार? या विषामुळे तयार होणार्‍या सामजिक अस्वस्थतेच्या धगीवर स्वतःच्या स्वार्थाची पोळी कशी भाजून घेणार? सामजिक सलोखा वगैरे राजकारण्यांच्या निव्वळ गप्पा असतात. खरंच सामाजिक सलोखा अस्तित्वात आला तर कित्येक गुंठामंत्री, बाहुबली, 'ध'रणी, आणि 'जाणत्या' राजकारण्यांची राजकारणाची भ्रष्ट आणि गलिच्छ दुकाने बंद होतील. आणि ते कुणालाच होऊ द्यायचं नाहीये. :-)

In reply to by समीरसूर

ब्राह्मण ही समाजात दबावगट नसलेली दुबळी जात आहे. त्यामुळे आपले वैफल्य (सूडापोटी उद्भवलेले) काढण्यासाठी त्यांचा वापर इतर अब्राह्मण वर्गाकडून केला जातो. त्यांना उत्तरे देत बसून त्यांचे वैफल्य कुरळवाण्यात कांहीच हशील नाही.

In reply to by समीरसूर

माझ्या बाबांनी गेल्या ४५ वर्षात कित्येक गरीब आणि ब्राह्मण (उच्चवर्णीय) नसणार्‍या गरीब मुलांना मोफत शिकवले आहे. प्रतिसाद आवडला व ठळक वाक्याशी सहमत! कित्येक मुलांच्या शिक्षणावर जो खर्च झालाय तो सख्ख्या मुलांच्या शैक्षणिक खर्चापेक्क्षा जास्त झाला असेल. नुसते तेवढेच नाही तर मोफत शिकवण्या, कित्येक शस्त्रक्रियांना मदत, आणि देणग्या, लग्नाला रोख मदत. त्यातील किती लोकांची आभाराची दोन ओळींची चिठ्ठी आली हेही बघण्याजोगे आहे. जातीबद्दल तर नकोच बोलायला. अजूनही बाबांचे तेच चालू आहे? माझी चिडचिड होते ती यामुळे. मदत घेताना ती कोणत्या जातीतून आली हे बघता का? पण हे बोललेले बाबांना चालत नाही. आपण करत रहायचे, फलाची अपेक्षा न करता वगैरे….... …. जौदे! डोक्याला नस्ता त्रास! त्यावेळी माझे डॉक्टर काका असले तर विचारायला नको. त्यांनी वयाच्या साठ वरषांनंतर फक्त मोफत डोक्टरी केली. कुठं काही बोलायचं नाही यामुळे आम्ही सगळी चुलत भावंडे एक होऊन चिडतो ते दोघेही शांत असतात. मग आणखी चिडचिड!

In reply to by रेवती

माझ्या बाबांनीदेखील अशाच पद्धतीने कित्येक विद्यार्थ्यांना मोफत शिकवले, त्यांच्या पुस्तक-वह्यांचा खर्च केला. इतर कित्येकांना अडीअडचणीत मदत केली. कुणी आठवण ठेवून मान द्यावा यासाठी त्यांनी कधीच हे सारे केले नाही. शक्य तेवढी मदत करत राहणे हेच आपले काम आहे असं ते म्हणतात. अजूनही कुणालाही मदत करण्यासाठी ते तयार असतात. यात जात-पात, धर्म, वर्ण हा प्रश्नच कधी येत नाही, आला नाही. आणि यायलाच नको! माणूस हा माणूस आहे. माणूस जेव्हा कोट्यधीशापासून तर रस्त्यावरच्या अतिगरीब माणसापर्यंत सगळ्यांना त्या व्यक्तींच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मान राखत आपल्या चांगुलपणाने आपलेसे करून घेतो तेव्हा माणसातले माणूसपण खर्‍या अर्थाने तेजाळते.

In reply to by समीरसूर

असं लिहू नका तुम्ही "कधी काळी (६०-७० वर्षांपूर्वी) ब्राह्मणांनी पाळलेल्या अस्पृश्यतेपेक्षा कितीतरी पट जास्त अस्पृश्यता आणि पराकोटीचा आकस पाळणार्‍या जाती आजही महाराष्ट्रात आहेत" कारण मग हे "मूखंड" विदा मागतील आणि या सगळ्याला हाच ब्राह्मसमाज कसा जबाब्दार आहे असा (स्वघोषीत) जावई शोध ही लावतील. आणि या "ब्राह्मणांविषयीचा हा अनाठायी द्वेष जेव्हा संपेल तो खरा सुदिन! " साठी सलाम!

मिपावर बामणांची संख्या भरपूर आहे. आता ब्राह्मणेतरांचे मिपावर प्रमाण कमी का ? याचा धागा काढा !

माझ ब्राम्हण असण माझं ब्राह्मण असणं

एकदा आम्ही चाळीतील मित्र गोट्या खेळत होतो. शेजारचा मित्र मराठे त्याच्या पाहुणा आलेल्या आतेभावाबरोबर आला. आमच्याबरोबर खेळण्यासाठी त्याने खिशातून गोट्या काढल्या तेव्हड्यात त्याच्या आतेभावाने त्याला बाजुला ओढले व विचारले अरे गोट्या खेळायला आपण थोडेच मराठे आहोत? मित्र म्हणाला तू नसशील पण मी आहे.

इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ?
कधी कधी असते कधी कधी नसते हेच वास्तव आहे पण मिपाकर जातिधारित कंपूव्यवस्थेचा पुरस्कार कटाक्षाने टाळतात. इथे कंपू लेखन क्षमता , समान शत्रु , गाव, विचार, टारगेट या घटकातुन निर्माण होतात. कट्यात तर जात हां विषयही उपस्थित झालेला अनुभवलेला नाही. थोडक्यात मिपा तुमच्या जातीला नाही सोशल नेट्वर्किंग स्किल ला न्याय देते.

ब्राह्मणांना आरक्षण देण्याची वेळ लवकरच येईल (जर तोपर्यंत ब्राह्मण भारतात शिल्लक राहीले तर) या निवडणुकीत मराठ्यांना मिळालं पुढच्या निवडणुकीत ब्राह्मणांना... जय आरक्षण!

In reply to by रामपुरी

गपा हो!ब्राह्मणांना आरक्षणाची काहीही गरज नाहिये. परिश्रम, अभ्यास आणि चिकाटी या जोरावर जगात टिकून रहायला ते समर्थ आहेत.

ब्राह्मण असणं म्हणजे आपलं लोकांनी जाळलेलं घर उघड्या डोळ्यांनी पाहणे, ब्राह्मण असणं म्हणजे स्वतःची शेतजमीन इतरजण गिळंकृत करत असताना हताश होऊन बघत बसणं, ब्राह्मण असणं म्हणजे गुणवत्ता असताना सुद्धा डावललं जाणं, ब्राह्मण असणं म्हणजे सरकारच्या पाठिंब्याने सुरू असलेली इतिहासातील ब्राह्मण संत/स्वातंत्र्यसैनिक/राज्यकर्ते इ. ची असभ्य बदनामी मुकाट्याने सहन करणं, ब्राह्मण असणं म्हणजे इतरांच्या मत्सराला पात्र होणे, ब्राह्मण असणं म्हणजे जातीयवादी टिंगल व उपरोधाला बळी पडणं, ब्राह्मण असणं म्हणजे राजकारणातून हद्दपार होणं, . . . आणि ब्राह्मण असणं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणे, ब्राह्मण असणं म्हणजे सर्व वाटा बंद होत असताना नवीन वाट शोधणं, ब्राह्मण असणं म्हणजे कालबाह्य होत असलेल्या जुन्या रूढी त्यागून आधुनिक विचार स्वीकारणं, ब्राह्मण असणं म्हणजे शिक्षणावर भर देणं, ब्राह्मण असणं म्हणजे परंपरागत क्षेत्रे टाळून नवीन क्षेत्र शोधणं, . . .

माझे एक नेहमीचेच मत आहे. ब्राह्मणांनी हींदू धर्मातुन बाहेर पडुन, कुठल्यातरी दुसर्‍या धर्माची स्थापना केली पाहीजे ( नावापुरते का होइना ). तसे केले तर अल्पसंख्या़क म्हणुन गणना होइल आणी मग ब्राहम्णांसाठी च्या अल्पसंख्यांक शाळा कॉलेज काढता येतील.

In reply to by प्रसाद१९७१

एवढे च बाकी राहिले आहे. जर पार्श्वभागावर निरनिराळ्या जातीच्या सेवा सवलतींच्या लाथा लागल्यावर युरोप अमेरीकेपर्यंतच्या वाट शोधायच्याच आहेत तर धर्मांतर तरी करू. पण शिंचे तिथे हि चित्पावन देशस्थ कऱ्हाडे देवरुखे (ह्यांची वेदना अंमळ जास्तच आहे.) हे आरक्षण येईल त्याचे कसे करायचे ? सारस्वत आणि दैवेज्ञ(!!??) ह्यांन्ना प्रवेश द्यायचा का ? एक ना धड असे चालूच राहील. त्यापेक्षा "निर्जात " अशीच एक जात काढा आणि जे जात मनापासून मानत नाहीत त्या "ब्राम्हणांना" प्रवेश द्या ?

अपेक्षित असलेला परिणाम झाला. पेटवापेटवी करून धागालेखक पळून गेले आणि लांबून मजा बघत आहेत.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बाकी पुण्यातल्या लोकांनी कसं ओळखलं ब्वा या धागालेखकाला असं वागवायला हवं म्हणून? यांचे पाय पाळण्यातच दिसले होते वाटतं!

In reply to by काळा पहाड

बाकी पुण्यातल्या लोकांनी कसं ओळखलं ब्वा या धागालेखकाला असं वागवायला हवं म्हणून?
म्हणूनच मला पुण्याचा असल्याचा जाज्वल्य अभिमान आहे :) जोक्स अपार्ट, सदर धागाकर्त्याची आजपर्यंतची मिसळपावीय कारकिर्द बघितलीत तर हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही :)

हा तद्दन भपंक व एकांगी लेख वाचला आणि रामदास काकांच्या एका लेखात वाचलेले वाक्य आठवले जे कूळ कायद्यात गमावले ते सिलिकॉन वैलीमध्ये कमावले, व पु च्या वाक्यात थोडाफार बाल करून लिहितो अजूनही अनेकांना आरक्षणाची पिसे लावून गरुड भरारी मारता आली नाही. कारण आकाशात झेप घेण्याची ओढ जन्मजात असावी लागते , रक्तात धंदा असलेले ज्यू अमेरिकेत व सिंधी भारतात नेसत्या वस्त्रानिशी आले त्यांना जगण्याची सोय तत्कालीन सरकारने केली पण आज ते वैभवाच्या शिखरावर आहेत , तसेस महाराष्ट्रीयन ब्राह्मणाने स्वतःचा उत्कर्ष स्वतः केला आहे ,इतरांना तो करता येत नसेल तर त्यासाठी उगाच ब्राह्मणांना दोष देऊ नये पुराणातील वांगी पुराणातच असू द्या

In reply to by निनाद मुक्काम …

टाळ्या! जळितात घर जळाल्यावर माझ्या आजोबांनी गांव सोडले, सांगलीला भाड्याच्या घरात बिर्‍हाड केले. वर्षाभरातच गावचे लोक सांगलीला आले , हाता- पाया पडले , म्हणाले , काका , गांवी चला, आमची चूक झाली. तुमचे घर पुन्हा बाम्धून देतो. . . . आजचे माझे आजोळचे घर गावकर्‍यांनी बांधून दिले आहे. ब्राह्मण द्वेषाचे वाईट परिणाम सार्‍या गावाने भोगले.

बाकी काही म्हणा. ब्राह्मण यांव नि ब्राह्मण त्यांव छापाचे लेख नेहमी सेंच्युरी मारतातच! ब्राह्मणांची महती ती हीच असावी काय? =))