लेक लाडकी
लेक लाडकी
.
आठवणींच्या गावाची सफर करत मागे मागे जात इथे येऊन पोहचले. इथून आणखीन मागच काहीच दिसत नाहीये, हिच ती पहिली आठवण!! मला फूलपंखी दिवसांमध्ये घेऊन जाणारी..
मी तीन-साडेतीन वर्षांची असेन, बालवाडीत जाणारी.. बालवाडीच्या दुसऱ्या वर्षाला होते तेव्हा. आमची बालवाडी आणि आमच्या गावातलं महिला मंडळ एकाच छता खाली जमायच.. आणि मग आमचे सामाईक असे सांस्कृतिक कारेक्रम व्हायचे.
कोणता दिवस होता बरं तो.. कांदे-नवमी /सरस्वती-पुजन /की नवरात्र.. आता नक्की आठवत नाही ... धुवाधार पाऊस पडत नव्हता.. म्हणजे पावसाळा संपत आलेला.. नवरात्रिचेच दिवस असावेत.. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा चालू होत्या.. भाग तर मी सगळ्यातच घेतला असणार, ते प्रत्येक गोष्टीत बुडवून निघण्याचे दिवस होते.. काही येत असो नसो सगळ्यात भाग घ्यायचा.. आई आणि बाई जे जे सांगतील ते ते करत जायचं.. धाव म्हटलं की धावायचं.. नाच म्हंणटल की नाचायचं.. मला नक्की काय काय येत होत नव्हत त्या दोघीच जाणोत.
पण त्या वर्षी मला माझं पहिलं बक्षीस मिळाल.. माला पहिला नंबर मिळवून देणारी ती फॅन्सी ड्रेसची स्पर्धा होती.. तेव्हाचा माझा चेहरा आता आठवत नाही पण बाकी ध्यान आज ही नजरे समोर उभं राहत. आईनं मला खूप छान सजवलं होत.. मोरपंखी रंगाची मऊसूत रेशमी साडी.. तिच्यावरची काळी रंगाची चौकटींची नक्षी..माझ्या खांद्या येव्हड्या केसांचा.. आत बॉल ठेवून बनवलीला अंबाडा, त्याच्यावर गुंडाळलेला अंगणातल्या जाईच्या फुलांचा गजरा.. कपाळावरची छानशी चंद्र कोर.. आणि त्या रुपाला विसंगत अशी माझ्या हातातली कापडी भावली.. माझी ठकी तीला सोडून मी कुठेच जायचे नाही.. आणि माझ्या कडून घोकवून घेतलेल्या दोन ओळी. गोड दिसत असेन नाही!!
तेव्हाचा फोटो असता तर आणखीन मज्ज आली असती. नाही तर नसो!! हा ही एक फोटोच आहे की शब्द चित्र म्हणू हवं तर.. तेव्हा पासून हे असे फोटो साठवण्याची सवयच लागली.. आता एक एक फोटो डव्हलप करत चालली आहे.. तेव्हा छायाचित्र काढण माझ्या हातात नव्हत, पण म्हणून काय झालं चित्र आणि शब्दचित्र मी रेखू शकतेच की!
लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची.. याच त्या दोन ओळी.
ज्यांचा अर्थ ही तेव्हा नीटसा कळला नव्हता.. आईनं या ओळी म्हणताना दोन्ही हात पुढे गंफून इकडून तिकडे तिकडून इकडे मुरकल्या सारखे डुलायला सांगितले होते.. हे शब्द बडबडत स्वप्नांच्या दुनियेत टाकलेलं पहिलं पाऊल.. मला बक्षीस देऊन गेलं.. आणि जोडिला काही प्रश्न..
लेक लाडकी या घरची...
आणि मग त्या ओळी कायम सोबत राहिल्या.. कधी गोड आठवण बनून तर कधी प्रश्न बनून.. आणि सुरुवात झाली क्षणांच्या साठवणींची.
माझ्या आठवणींची.
===================================
स्वाती फडणीस .......... २७-०७-२००८
वाचने
3755
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
छान !!!
सुरेख...
मनापासून आभार
आवड्ला
मनापासून आभार!
खुप छान
मस्त लेख...
आणि मग
स्वाती ताई
मनापासून आभार..