मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुडबाय, अमेरिका!

समीरसूर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अमेरिकेतले आता काहीच (७) दिवस राहिलेत आणि इथे घालवलेल्या या ६.५ महिन्यांच्या वास्तव्यातील आठवणी मनात येत आहेत. भारतात परत गेल्यावर त्या आणखी जास्त येतील...सुरुवातीला थोडी धास्ती होती. लक्ष्मण देशपांडेंच्या 'वर्‍हाड निघालंय लंडनला' मधल्या "कस्स होईल? क्काय होईल?" सारखी मनस्थिती होती. पहिल्यांदाच बायकोला सोबत घेऊन इतक्या लांबचा प्रवास आणि वास्तव्य करणार होतो. इथे येऊन पोहोचलो आणि सगळं सुरळीत होत गेलं. माझ्या एका सहकार्‍याने (गगन) माझ्या नावावर आधीच अपार्टमेंट घेऊन ठेवलं होतं; त्यामुळे हॉटेलात न राहता आम्ही सरळ आमच्या अपार्ट्मेंटमध्ये रहायला आलो. अपार्टमेंटची आगाऊ रक्कम, विम्याची रक्कम असे सगळे सुरुवातीचे सगळे खर्च त्याच भल्या सहकार्‍याने केले. यथावकाश वीजेची आणि फोनची सोय देखील झाली. इथल्या एका सहकार्‍याने (उमेद) ब्लॅक वायरलेस नावाच्या एका किफायतशीर सेवेची माहिती दिली. फोन आमच्याकडे होतेच; ब्लॅक वायरलेसची दोन सिमकार्डे मागवून आमचे फोन्स सुरु झाले. प्रतिमहिना $३० मध्ये अमर्यादित अमेरिका कॉल्स आणि मॅसेजेस आणि १२० मिनिटे भारतात कॉल्स असा फोनचा प्लॅन होता. $१० अजून टाकून अमर्यादित भारत कॉल्स आणि मॅसेजेसची सुविधा आम्ही एका फोनवर घेतली. शिवाय ५०० एमबी डेटादेखील उपलब्ध होता. आम्ही वापरला नाही कारण आमचे फोन्स स्मार्ट नाहीत; आमच्यासारखेच आहेत. हे खूपच सोपं आणि किफायतशीर होतं असं वाटलं म्हणून मग शेवटपर्यंत तेच वापरत आहोत. इथे आल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण कार्यालयात आणि बाजारात कसे जायचे! इतक्या कमी काळासाठी कार घेणे शक्य नव्हते. माझा अपार्टमेंट बुक करणारा सहकारी मदतीला धावून आला. मी त्याच्या कारमधून ऑफीसला जाणे-येणे करू लागलो. काही दिवसांनी एक खूप सुस्वभावी जोडपे आमच्या परिचयाचे झाले. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली. सगळ्यात मोठी मदत म्हणजे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी ते आम्हाला सोबत घेऊन जाऊ लागले. निखळ मैत्री म्हणावी असे संबंध या जोडप्याशी तयार झालेले आहेत. त्यांची नावे मयूर आणि सीमा. मूर्सव्हील हे एक अत्यंत छोटे आणि टूमदार गाव आहे. शॉर्लेटपासून साधारण २५-२८ माईल्स दूर असलेल्या या गावात लोकवस्ती तशी बर्‍यापैकी विरळ आहे. हळू-हळू आम्ही स्थिरस्थावर झालो. काम व्यवस्थित सुरु झाले. आम्हाला शक्य तेवढे फिरून घ्यायचे होते. इथे पोहोचल्यानंतर १५ दिवसातच आम्ही नायगारा, १००० आयलंड्स, वॉशिंग्टन डीसी, फिलाडेल्फिया, आणि न्यूयॉर्कच्या सहलीचे बुकींग केलं. फिनिक्समध्ये माझा सचिन नावाचा एक जवळचा मित्र राहतो. त्याने याबाबतीत खूप मदत केली. आल्या-आल्या पैसे असण्याचे काही कारण नव्हते म्हणून त्याने पैशांची मदत देखील केली. ऑक्टोबर ११, २०१३ या दिवशी आम्ही न्यूयॉर्कला पोहोचलो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी टेकटूर्स नावाच्या कंपनीच्या पॅकेज टूर मध्ये नायगाराला जायला निघालो. नायगाराचे ते भव्य आणि उदात्त रूप पाहून डोळ्याचे पारणे फिटले. १००० आयलंड्सची क्रूज खूप छान होती. कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर अलेक्झांड्रिया बे नावाच्या गावाजवळ सेंट लॉरेन्स नदीमध्ये ही १८००+ बेटे आहेत. फिलाडेल्फियाची ईंडिपेंडन्स बेल आणि ईंडिपेंडन्स हॉल पाहिला. यापेक्षा मला हे गाव खूप आवडले. छान वाटले तिथे फिरून. अमेरिकेच्या सरकारचा संप असल्याने आम्हाला वॉशिंग्टन डीसी मध्ये बाहेरून व्हाईट आणि युएस कॅपिटॉल बघावे लागले. बाकी सगळी उद्याने, स्मारके, संग्रहालये बंद होती. तिसर्‍या दिवशी रात्री न्यूयॉर्कला पोहोचून आम्ही टाईम्स स्क्वेअरला गेलो. न्यूयॉर्कला संध्याकाळी आमची सहल संपली. टाईम्स स्क्वेअरला आम्ही दोघेच टॅक्सीने गेलो. न्यूयॉर्कची महती खूप ऐकून होतो आणि त्याचप्रमाणे न्यूयॉर्क भासले. प्रकाशमान, देदीप्यमान, वेगवान, आणि एक रहस्यमय ऊर्जेने भारलेले! दुसर्‍या दिवशी वॉल स्ट्रीट, युनो, एम्पायर स्टेट बिल्डींग, मादाम तुसॉ संग्रहालय, स्वातंत्र्यदेवता अशा ठळक जागा पाहिल्या. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा खरोखर खूप सुंदर आणि भव्य आहे. एक प्रकारचे गूढ वलय या पुतळ्याला आहे. हडसन नदीच्या तीरावर थोडा वेळ व्यतीत केला. संध्याकाळी आम्ही शॉर्लेटला यायला निघालो. ही सहल खूप छान झाली. आमची पहिलीच इतकी मोठी आणि इतक्या जगप्रसिद्ध ठिकाणांची सहल होती ही! आम्ही दोघे खुश झालो. पुढे मयूर आणि सीमा या उत्साही मित्रांसोबत आम्ही स्मोकी माऊंटनची सहल केली. गॅटलिनबर्ग या टेनीसी राज्यातल्या एका सुंदर गावात आम्ही राहिलो. स्मोकी माऊंटन हा अपालाचिअन पर्वतरांगांचा एक भाग आहे. ही पर्वत रांग कॅनडाच्या अमेरिकेकडील टोकापासून तर अमेरिकेतल्या दक्षिण भागातल्या राज्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. फॉलचे अनेकविध रंग बघून छान वाटले. चेरोकी नावाच्या खूप सुंदर अशा गावात आम्ही थोडा वेळ थांबलो. हे तर अगदी चित्रातले गाव वाटते. नोव्हेंबर २०१३ मध्ये आम्ही (म्हणजे आम्ही दोघे आणि मयूर आणि सीमा) अटलांटाच्या सहलीवर गेलो. अटलांटाचे डाऊनटाऊन, मार्गारेट मिशेल ('गॉन विथ द विंड'च्या लेखिका) यांचे निवासस्थान, झू अटलांटा, जॉर्जिया अ‍ॅक्वेरिअम, स्टोन माऊंटन, सीएनएन स्टुडिओ, कोकाकोला फॅक्टरी, इत्यादी सुरेख ठिकाणांना भेट दिली. अटलांटामध्येच भरवण्यात आलेल्या ऑलिंपिकच्या शंभराव्या क्रीडोत्सवाप्रीत्यर्थ अटलांटा डाऊनटाऊनमधील सीएनएन स्टुडिओजवळ एक सुरेख उद्यान उभारले आहे; त्या उद्यानामध्ये थोडा वेळ फिरलो. जानेवारी २०१४ मध्ये आम्ही दोघेच फ्लोरिडाच्या भेटीला निघालो. ओरलँडो आणि मयामी ही दोन सुंदर शहरे पाहिली. मयामीचे जगप्रसिद्ध साऊथ बीच पाहिले. ओरलँडोच्या युनिव्हर्सल स्टुडिओजच्या अ‍ॅडवेंचर पार्कला जाऊन चित्तथरारक राईड्स केल्या. अशा राईड्स मी आयुष्यात कधीच केल्या नव्हत्या. घाबरत घाबरत का असेना पण माझ्या बायकोने सगळ्या सो-कॉल्ड भयानक राईड्स यशस्वीरीत्या केल्या. हा अनुभव अगदी नवा आणि आनंद देणारा होता. मयामी ला दीड तासाच्या क्रूजमध्ये आम्हाला फिशर आयलंड या अतिश्रीमंत भागाचे दर्शन घडले. अमेरिकेतल्या सिनेमासृष्टीतले आणि इतर क्षेत्रातले नामवंत आणि धनवंत इथे राहतात. जसे जमले तसे थोडे फार शॉर्लेटमध्येही फिरलो. या सहलींनी खूप आनंद दिला; समाधान दिले. मूर्सव्हीलमधल्या वास्तव्यात वाचन बर्‍यापैकी केले. पाच-सहा चांगली पुस्तके वाचून झालीत. आणि चित्रपटांनी मात्र चिरकाल टिकून राहील असा अवीट आनंद दिला. गॉन विथ द विंड, गुडफेलाज, कॅसिनो, सायको, शिंडलर्स लिस्ट, वर्टीगो, द शायनिंग, इट हॅपन्ड वन नाईट, वन फ्लू ओवर द कक्कूज नेस्ट, मॅकेनाज गोल्ड, सेवन समुराई, द मॅग्निफिशन्ट सेवन, सेवन ब्राईड्स फॉर सेवन ब्रदर्स, अ स्ट्रीटकार नेम्ड डिजायर, सिटीझन केन, द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, ईटी, द गॉडफादर, द बायसिकल थिफ, फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर, रिबेका, सायलेंस ऑफ द लँब्ज, टॅक्सी ड्रायव्हर, द परफेक्ट स्टॉर्म, जॉज, बॅक टू द फ्युचर, स्कारफेस, द गुड द बॅड अंड द अग्ली असे बरेच उत्तमोत्तम चित्रपट (अर्थातच जालावर) पाहिले. अगदी झपाटल्यासारखे एकामागोमाग २-३ अशा वेगाने हे चित्रपट पाहिले. खूप समाधान वाटले. मी इंग्रजी चित्रपट तसे कमीच बघतो पण ही काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांची नावे लहानपणापासून ऐकत आलो होतो. उत्सुकता म्हणून सुरुवात केली आणि मग भरपूर चित्रपटांचा आनंद लुटला. फेब्रुवारी २२, २०१४ या दिवशी श्री. धमाल मुलगा आम्हाला भेटायला म्हणून शॉर्लेटवरून आले. येतांना मस्त काजू कतली घेऊन आले. त्यांच्याशी २-२.५ तास भरपूर गप्पा झाल्या. त्यांचा मनमोकळा स्वभाव आणि गप्पांची हातोटी भावली. मिपाच्या गप्पा रंगल्या. बर्‍याच विषयांवर बोलणे झाले. असा हा मिनी मूर्सव्हील कट्टा छान रंगला. त्यांच्या येण्याने खूप बरे वाटले. फोटो काढले आहेत नंतर टाकीन. सहा-सात महिन्यापूर्वी मी मिपावर 'मदत हवी आहे' म्हणून अमेरिकेला येण्याच्या आधी मार्गदर्शनासाठी म्हणून धागा टाकला होता. आज आमची अमेरिकेतले वास्तव्य संपत आलेले आहे. पुन्हा कधी येऊ का? आलोच तर कधी? किती दिवसांसाठी? या प्रश्नांची उत्तरे नाहीत. पुन्हा येण्याचे कदाचित शक्य नव्हते म्हणून आम्ही जेवढे जमले तेवढे फिरून घेतले. वस्तूंची खरेदी करण्यापेक्षा अनुभवांचा खजिना लुटला. स्वयंपाकाची भांडी, एक कंफर्टर, दोन ब्लँकेट्स, एक लॅपटॉप, दोन फोन्स, एक बेडशीट, कपडे, इथे विकत घेतलेला मिक्सर, आणि इस्त्री फक्त एवढ्या वस्तू घेऊन आम्ही राहिलो. फर्निचर, कार वगैरे विकत घेणे टाळले. त्यामुळे आम्हाला फिरण्यावर थोडे जास्त पैसे खर्च करता आले. मिपावर 'मदत हवी आहे' धाग्याला उत्तम प्रतिसाद लाभला. सगळ्यांनी आपापल्या परीने मार्गदर्शन केले. धमाल मुलगा, हेमांगीके, श्रीरंग जोशी, रेवती, लंबुटांग, सिद्धार्थ कुळकर्णी (सिद्धार्थ४), उपास, मराठे, राघव८२, जुइ, आणि इतर बर्‍याच जणांनी खूप मोलाची माहिती दिली आणि मदतीची तयारी देखील दर्शवली. काहींनी ताबडतोब ईमेल आयडीज आणि फोन नंबर्स देखील दिलेत. श्रीरंग जोशींचा त्या धाग्यावरचा माझ्या ख्याली खुशालीबद्दलचा प्रतिसाद मी आत्ता वाचला. क्षमस्व! अर्थात त्यानंतर आमचा संपर्क झाला. सगळ्यांशी व्यक्तीशः संपर्क साधणे शक्य झाले नाही त्याबद्दल देखील क्षमस्व! आता परत जाण्याचे वेध लागले आहेत. तिथली कामे आ वासून उभी आहेत. अजून इथली तयारी राहिली आहे. हे राहिलेले ७-८ दिवस भुर्रकन उडून जातील. म्हणून आजच या सगळ्या चांगल्या आठवणींना उजाळा (धावता) दिला. भारतात पोहोचल्यावर हा लेख वाचतांना आणखी छान वाटेल. या वास्तव्यात आणि वास्तव्यासाठी बर्‍याच जणांनी मोलाची मदत केली. आम्हाला जी मदत मिळाली ती आम्ही कधीही विसरणार नाही. सगळ्यांचे मनापासून आभार! परत जाऊन मी काय मिस करणार? इथे मिळणारा मोकळा वेळ, शिस्तभद्ध आणि खूप कमी रहदारी, इंटरनेटचा स्पीड, स्वतंत्रपणे जगण्याची मुभा, बाहेरच्या कुठल्याही कामाला लागणारा कमी वेळ आणि ऊर्जा, झटपट होणारी कामे, कामातला सोपेपणा, इथली सुबत्ता, इथल्या लोकांचा मदत करण्याचा आणि इतरांच्या अडचणींची जाणीव ठेवणारा शिस्तबद्ध स्वभाव, आणि आमच्या इथल्या अपार्टमेंटच्या बाल्कनीमधून अनुभवायला मिळणारी नीरव शांतता! हे सगळं मी नक्कीच मिस करणार. पण पुणे तिथे काय उणे हे ही तितकचं खरं! त्यामुळे परत जातांना या सगळ्या गोष्टींना आता मुकणार याचे थोडे वाईट तर वाटतेय पण पुन्हा पुण्यात आणि आपल्या लोकांमध्ये जाणार याचा आनंद देखील होतोय. मनात अशा संमिश्र भावनांचं वादळ म्हणजेच जीवन असावे कदाचित... गुडबाय, अमेरिका! आता भेटू पुण्यात!

वाचने 12100 वाचनखूण प्रतिक्रिया 42

राघवेंद्र 01/03/2014 - 01:59
अरे मित्रा, लवकरच येशील परत. एवढ्या लवकर गुडबाय, अमेरिका! म्हणु नकोस. पुन्हा संधी मिळेलच.

In reply to by राघवेंद्र

समीरसूर 03/03/2014 - 22:37
शक्यता धूसर आहे म्हणूनच गुडबाय म्हटले. :-) आम्हालाच काही कारणानिमित्त परत जायचे होते. त्यामुळेच पुन्हा येणे जमणार नाही. सहा महिन्यांसाठीच जाऊ याच एका अटीवर आम्ही येण्यासाठी तयार झालो होतो. त्यामुळे शक्यता खूप कमी आहे. :-) एनीवे, थँक्स!

स्रुजा 01/03/2014 - 02:09
आवडला. आपण च एखादी चांगली गोष्ट आपल्याच बद्दल सांगताना सच्चेपणा खूप कमी दिसतो. तुमच्या लेखात तो आहे. एखादा लहान मुल जसा निरागसतेने आजू बाजूच्यांना स्वतःची नवीन गोष्ट आपणहून दाखवतं आणि ते बघताना त्याला झालेला आनंद लगेच आपल्यापर्यंत पोहोचतो तसा काहीसा वाटला मला तुमचा लेख. म्हणजे तुम्हाला बालिश नाही म्हणायचय हां… तुमचा साधेपणा भावला

मधुरा देशपांडे 01/03/2014 - 02:30
आवडले. तुम्ही जे लिहिलंय की अनुभवांचा खजिना लुटला ते लेखनातून जाणवते आहे. शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.

जॅक डनियल्स 01/03/2014 - 08:50
गॅटलिनबर्ग या टेनीसी राज्यातल्या एका सुंदर गावात आम्ही राहिलो
आमच्या गल्लीत येऊन गेलात तुम्ही..."गॅटलिनबर्ग" म्हणजे आमचे लोणावळा आहे.

In reply to by जॅक डनियल्स

समीरसूर 03/03/2014 - 23:58
गॅटलिनबर्ग, पिजन फोर्ज, चेरोकी ही गावे फार सुंदर आहेत. चेरोकीमधून तर माझा पाय निघत नव्हता. :-) तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला इतके सुंदर लोणावळा मिळाले आहे. ऐश करा... :-)

इरसाल 01/03/2014 - 10:22
काही दिवसांनी एक खूप सुस्वभावी जोडपे आमच्या परिचयाचे झाले. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली. सगळ्यात मोठी मदत म्हणजे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी ते आम्हाला सोबत घेऊन जाऊ लागले. निखळ मैत्री म्हणावी असे संबंध या जोडप्याशी तयार झालेले आहेत. त्यांची नावे मयूर आणि सीमा.
आपण जसे असतो आपल्याला मित्रही तसेच मिळतात.

In reply to by इरसाल

समीरसूर 03/03/2014 - 22:48
ते दोघे खरंच खूप सुस्वभावी आहेत यात शंका नाही. आम्ही कदाचित इतके सुस्वभावी नाही आहोत बहुधा! ;-) एक सांगायचं राहिलं; आम्ही ओरलँडोवरून संध्याकाळी ७-८ वाजता शॉर्लेटच्या विमानतळावर उतरल्यावर आम्हाला घ्यायला हे दोघे आले होते. मरणाची थंडी होती. आम्ही खूप थकलो होतो. आणि रात्री ९ वाजेपर्यंत घरी पोहोचून काहीतरी खाऊन झोपायचे होते. त्यांनी आम्हाला घरी सोडले आणि एक बॅग दिली. त्यात त्यांनी आमचा दोघांचा जेवणाचा डबा आणला होता. पोळ्या, भात, आमटी, भाजी, कोशिंबीर असे छान जेवण होते आणि इतके थकल्यानंतर त्याची नितांत गरज होती. गरम केले, वचावचा जेवलो आणि झोपलो. त्यांचे आभार मानले पण त्यात औपचारिकताच जास्त होती. जवळचे सख्खे नातेवाईकदेखील कधी कधी असे सुखद आणि गरजेचे अनुभव देत नाहीत. आता मार्च ८ रोजी आम्हाला संध्याकाळी ६:४० चे विमान आहे. या दोघांना शॉर्लेट विमानतळावर दुपारी १२ वाजता पोहोचून भावाला घेऊन घरी यायचे आहे आणि पुन्हा ३:३० वाजता ते आम्हाला शॉर्लेट विमानतळावर सोडायला येणार असा हट्ट धरून बसले आहेत. आम्ही परोपरीने समजावून सांगीतले की दोन वेळा जाऊन येणे त्रासदायक ठरेल किंवा भावासोबत त्यांना जास्त वेळ घालवता येईल किंवा टॅक्सी मिळत असल्याने त्यांनी तसदी घेण्याची आवश्यकता नाही वगैरे...पण ते दोघे ऐकायलाच तयार नाहीत. :-) त्यांना मिस नक्कीच करणार परत गेल्यावर...

आत्मशून्य 01/03/2014 - 10:41
आपल्याला अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत राहो ही शुभेच्छा.

स्पंदना 01/03/2014 - 14:38
मनापासून व्यक्त केलेल्या भावना आवडल्या. वस्तू जमविण्याऐवजी अनुभव जमवण्याची धडपड आवडली. दोघेच आहात तोवर खरच जास्त सामान न करता असेच फिरुन घ्या.

In reply to by स्पंदना

समीरसूर 04/03/2014 - 00:12
सामान (वस्तू) जमविण्यात मला फारसा रस नाही. सुदैवाने बायकोदेखील (बर्‍याचदा हौसेचा बळी देऊन) साथ देते. तिला तसा सामान जमविण्याचा सोस नाही. जे आहे ते नीटनेटके असावे असा तिचा विचार. त्यामुळे भारतातल्या घरातदेखील फार जास्त वस्तू नाहीयेत. एकदा १२-१५ वर्षांपूर्वी पुण्यात गौतम राजाध्यक्षांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरले होते. मी बघायला गेलो. प्रदर्शन अप्रतिमच होते. मला एक अमिताभ बच्चनचे छायाचित्र खूप आवडले आणि रु. १५ देऊन मे ते पोस्टकार्ड आकाराचे छायाचित्र विकत घेतले. ते घेऊन मी घरी आलो आणि आता त्याचं काय करायचं मला कळेनासं झालं; मग मी माझ्या प्रमाणपत्रांच्या फाईलमध्ये ते जपून ठेऊन दिले. नंतर बर्‍याच दिवसांनी मी फाईल चाळत असतांना ते मला दिसले आणि मला प्रश्न पडला की मी ते छायाचित्र घेऊन काय साधले. मी भिंतीवर लावणार नव्हतो; सिनेअभिनेते घरातल्या भिंतींवर विराजमान व्हावेत एवढे काही त्यांचे कार्य महान नसते. आणि एखाद्या महान व्यक्तीचा आदर्श ठेवणे ही मानसिक पातळीवर घडणारी क्रिया असते; त्याला भौतिक मिती देण्यावर माझा तितकासा विश्वास नाही. मग त्या फोटोमुळे माझे वस्तूसंग्रहातले स्वारस्य बर्‍यापैकी संपले. आता हे बरोबर की चूक हे माहित नाही पण त्यामुळे अ‍ॅटेचमेंट्स कमी राहतात आणि पाहिजे त्या बाबींवर लक्ष केंद्रित करता येते असा थोडाफार अनुभव आहे...पण प्रत्येकाचे विचार वेगळे, सुखाच्या कल्पना वेगळ्या, यशाच्या संकल्पना वेगळ्या; त्यामुळे माझेच बरोबर आणि बाकीच्यांचे चूक असे अजिबात नाही. टू ईच हिज ओन्..हेच खरे. :-)

In reply to by समीरसूर

स्पंदना 04/03/2014 - 05:29
अतिशय आवडला हा प्रतिसाद. :)

साती 01/03/2014 - 17:28
मस्तं जीवाची अमेरिका केलीत. अनुभव खूप छान शब्दबद्ध केलात. तुम्हाला नवनविन जागा अनुभवायची संधी मिळो ही शुभेच्छा!

भडकमकर मास्तर 01/03/2014 - 22:17
छान लिहिले आहे... पुढच्या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !!

सस्नेह 01/03/2014 - 22:23
स्वयंपाकाची भांडी, एक कंफर्टर, दोन ब्लँकेट्स, एक लॅपटॉप, दोन फोन्स, एक बेडशीट, कपडे, इथे विकत घेतलेला मिक्सर, आणि इस्त्री फक्त एवढ्या वस्तू घेऊन आम्ही राहिलो. फर्निचर, कार वगैरे विकत घेणे टाळले
शाबास ! अमेरिका-वास्तव्य खर्‍या अर्थाने जगलात म्हणायचे !

उपास 01/03/2014 - 23:40
तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही अमेरिका जगलात. बरेच लोकं इथे २-४ महिने आले तरी हिरव्या नोटा/ रुपये यांची गणिते मांडत बसतात, अर्थात ते त्यांनी करायचे की नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न पण अनुभवातून नक्की सांगू शकेन की पैसे कधीही कमवता येतातच, तुम्ही जोडीदाराबरोबर आलात आणि एकत्र अमेरिका फिरलात/ अमेरिकेत वेळेचा उपयोग करुन चिरंतन अनुभव घेतलेत हे खरच खूप खूप स्पृहणीय आहे. अहो, अजून पश्चिम किनार्‍याची जादू, यल्लो स्टोन नॅशनल पार्क, लेक ताहो ते थेट हवाई बेटे बाकी आहे, बी एम एम, महाराष्ट्र मंडळातल्या मौज-मजा सगळं बाकी आहे, इतकंच म्हणेन 'Never say never again' :) असाच गुडबाय कधीतरी केला होता पूर्वी एदिऑस अमेरिका म्हणत आणि इथे परत येऊन आता पुन्हा गुडबाय करायच्या तयारीत आहे.. एकदा ग्लोबल सिटिझन म्हटल्यावर एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जायचं इतकच, हे शिकलोय आता.. शुभेच्छा! - (ग्लोबल सिटीझन) उपास

In reply to by उपास

लंबूटांग 02/03/2014 - 20:14
मनापासून अमेरिका जगलात असेच म्हणतो. इथे येऊन जवळ जवळ ७ वर्षे झालीत. त्यातील पहिली २ विद्यार्थी दशेतील वगळली तरी उरलेल्या ५ वर्षांत मिळून जितके फिरलो नाही तितके तुम्ही काही महिन्यांत फिरलात :). लवकर परत या. अजून बॉस्टन बघणे बाकी आहे तुमचे :).

In reply to by लंबूटांग

समीरसूर 03/03/2014 - 22:50
शक्य तेवढे फिरून घ्यायचे असे थोडे ठरवले होते आणि सामान विकत घ्यायचे आणी ६ महिन्यांनी पुन्हा विकत बसायचे हा उद्योग करायचा कंटाळा ही होताच. आळस म्हणा हवं तर! :-)

In reply to by लंबूटांग

वाटाड्या... 04/03/2014 - 21:55
इथे येऊन जवळ जवळ ७ वर्षे झालीत. पण ससु ईतकं फिरायला नाही मिळालं..... अवांतर : आयला, हा धम्या अमेरीकेत कवा आला? तरीच म्हणलं इतके दीस कुठे गायबला आहे.... - वाट्या

वेल्लाभट 02/03/2014 - 08:26
लेख आवडला, विचारही आवडले. मला एका परिक्षेनिमित्त ३-४ महिने अमेरिकेत रहायला मिळालं तिथून इथे आल्यावर माझा काही दिवस थयथयाट झाला लहान सहान गोष्टींवरून. पण नंतर सवय झाली. असो. पण... व्हॉट इज
शिस्तभद्ध
:D टायपो आहे, कारण दुस-या ठिकाणी बरोबर लिहीलंयत तुम्ही. पण ३ ३ वेळा वाचलं हो :P

लौंगी मिरची 02/03/2014 - 10:51
छान अनुभव लिहिलात , इतकी वर्ष इथे अमेरिकेत राहिल्यानंतरही घरी जाण्याची ओढ मात्र कायम तश्शीच असते नव्यानव्यासारखी . उत्तम लेख .

श्रीरंग_जोशी 03/03/2014 - 07:31
मनापासून लिहिलेले अनुभवकथन आवडले. थोडेफार का होईना फटू हवे होते.

समीरसूर 03/03/2014 - 23:55
नवीन विचार वगैरे काही नाही; जे सहज शक्य झालं ते केलं. जे करण्याचा कंटाळा आला; ते सोडून दिलं. :-) सगळ्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद! भारतात परतल्यानंतर फोटो टाकण्याचा प्रयत्न करेल.

अनय सोलापूरकर 04/03/2014 - 01:23
अत्यन्त छान लिहिलय... फिरके लिया ये अच्छा किया. गुणिले ६० की ६१ हे आपल्या साठीपर्यन्त चालतच राहणारेय. इरसाल -१००% सहमत .. "आपण जसे असतो आपल्याला मित्रही तसेच मिळतात." मीपण ८ मार्चला परत. इकड्ची राजधानी ते आपली राजधानी दिल्ली मन्ग पुणे ... टेशन - स्वारगेट - सोलापूर .. :) प्रवास सुरुच. परत जायचा विचारच खूप मजेदार ..

In reply to by अनय सोलापूरकर

समीरसूर 04/03/2014 - 20:59
परत जायचा विचार खरंच खूप मजेशीर असतो. एक विचित्र हूरहूर असते. परत आपल्या घरी जाण्याची एक सुखद भावना मधूनच समुद्राच्या एखाद्या अवखळ लाटेसारखी मनाच्या खडकाळ किनार्‍यांवर येऊन आदळते आणि मनाला चिंब भिजवून जाते...आणि मग मस्त वाटतं. पण इथली एक वेगळ्या प्रकारची निवांत गंमत तिथे नाही हा खारटपणा मात्र मनाला थोडा खट्टू करून जातो.... बाप रे...लईच साहित्यिक झालं वाटतं... :-) तुमच्या प्रवासाला शुभेच्छा! भेटू पुण्यात...

गणपा 04/03/2014 - 02:23
धावता आढावा आवडला समीरसूर.

प्रमोद देर्देकर 04/03/2014 - 12:00
घर का पंछी वापस घर पे आ गया. चलो एक फटु सेशन होवुन जावु द्या. बाय द वे (अवांतर) तुम्ही तिकडे काय जॉब करत होतात आणि इकडे आल्यावर काय करणार आहत म्हणजे तुम्ही सगळे सोडुन आलात म्हणताय तर जॉब सोडताय का? (कृ. ह. घ्या)

In reply to by प्रमोद देर्देकर

समीरसूर 04/03/2014 - 21:03
मी ६ महिन्यांसाठी आलो होतो इथे. काम संपलं त्यामुळे आता परत भारतात येत आहे. मी अगदी मोजून ६.५ महिने राहिलो. भारतातला जॉब आहेच. :-)

म्हैस 04/03/2014 - 15:39
सुंदर. मी साधारण पुढच्या महिन्यात हेल्लो अमेरिका म्हणणार आहे . तुम्हाला मदत करायला २ मित्र तरी होते. मला तर कुणीच नाहीये. माझीही अवस्था काय होणार कसं होणार अशी झाली आहे. :-(

In reply to by म्हैस

वाटाड्या... 04/03/2014 - 21:59
म्हणजे अमेरीकेत आल्या आल्य मदत करायला बरेच जण पुढे येतील. आपले मिपाकर आहेतच. नंबर पाठवा आल्या आल्या म्हणजे अजुनच सोप्पे होईल... - वाट्या...

In reply to by म्हैस

समीरसूर 04/03/2014 - 22:41
चिंता नसावी. मिपा सर्वव्यापी आहे. मंगळावर गेलात तरी मिसळपाव मिळत राहील. आणि तुम्ही जिथे जाताय तिथे तुम्हाला मदत मिळेलच. त्यामुळे चिंता सोडा आणि एंजॉय करा...सगळं फर्स्ट्-क्लास होणार याची खात्री बाळगा. :-) अपने कदम बढाते रहो; राहे तो मिल ही जाती है, बढते हाथों की कलियां भी फिर खिल ही जाती है.

दिव्यश्री 04/03/2014 - 16:05
"कस्स होईल? क्काय होईल?" >>> हे माझ पुण्यातून निघताना झाल आणि इथे पाहिलं वर्ष खूप खराब गेल . रोज प्यांटवाल्यांच्या मागे भुणभुण करून शेवटी आम्ही परत जायला निघालो होतो .आता जरा रूळलेय. खरतर मिपा.आणि मायबोली मुळेच माझा वेळ चांगला जातो . अनेक नवीन गोष्टी समजतात , शिकायला मिळते. त्याबद्दल मी मिपाची ऋणी आहे. खूप धन्यवाद तात्या आणि समस्त मिपाकर . :) बाकी आमच्यावरही कधीतरी हि वेळ येणारच आहे गुडबाय म्हणायची . आता विचार करूनच कसतरी वाटतंय . :( असो .लेख खूप आवडले . लिहित रहा आम्ही वाचत आहोत . :)

पैसा 04/03/2014 - 17:23
सगळे अनुभव आणि भावना व्यवस्थित वाचकांपर्यंत पोचवल्यात! मस्तच!

आदिजोशी 04/03/2014 - 17:26
अमेरिका मनापासून अनुभवलीत ते खूप आवडलं.

स्मिता श्रीपाद 05/03/2014 - 15:34
अरे वा... आला पण का मार्च महिना.... लवकर परत या.... आम्ही आहोतच इथे... भेटुच... व्यनी पहाणे.

म्हैस 06/03/2014 - 13:18
समीरसूर , वाटाड्या... खरच धन्यवाद. जाण्याच्या आधीच international सीम कार्ड घेवून मी प वर नंबर टाकीन. मी alpharetta , georgia ला येणार आहे.