गुडबाय, अमेरिका!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अमेरिकेतले आता काहीच (७) दिवस राहिलेत आणि इथे घालवलेल्या या ६.५ महिन्यांच्या वास्तव्यातील आठवणी मनात येत आहेत. भारतात परत गेल्यावर त्या आणखी जास्त येतील...सुरुवातीला थोडी धास्ती होती. लक्ष्मण देशपांडेंच्या 'वर्हाड निघालंय लंडनला' मधल्या "कस्स होईल? क्काय होईल?" सारखी मनस्थिती होती. पहिल्यांदाच बायकोला सोबत घेऊन इतक्या लांबचा प्रवास आणि वास्तव्य करणार होतो. इथे येऊन पोहोचलो आणि सगळं सुरळीत होत गेलं. माझ्या एका सहकार्याने (गगन) माझ्या नावावर आधीच अपार्टमेंट घेऊन ठेवलं होतं; त्यामुळे हॉटेलात न राहता आम्ही सरळ आमच्या अपार्ट्मेंटमध्ये रहायला आलो. अपार्टमेंटची आगाऊ रक्कम, विम्याची रक्कम असे सगळे सुरुवातीचे सगळे खर्च त्याच भल्या सहकार्याने केले. यथावकाश वीजेची आणि फोनची सोय देखील झाली. इथल्या एका सहकार्याने (उमेद) ब्लॅक वायरलेस नावाच्या एका किफायतशीर सेवेची माहिती दिली. फोन आमच्याकडे होतेच; ब्लॅक वायरलेसची दोन सिमकार्डे मागवून आमचे फोन्स सुरु झाले. प्रतिमहिना $३० मध्ये अमर्यादित अमेरिका कॉल्स आणि मॅसेजेस आणि १२० मिनिटे भारतात कॉल्स असा फोनचा प्लॅन होता. $१० अजून टाकून अमर्यादित भारत कॉल्स आणि मॅसेजेसची सुविधा आम्ही एका फोनवर घेतली. शिवाय ५०० एमबी डेटादेखील उपलब्ध होता. आम्ही वापरला नाही कारण आमचे फोन्स स्मार्ट नाहीत; आमच्यासारखेच आहेत. हे खूपच सोपं आणि किफायतशीर होतं असं वाटलं म्हणून मग शेवटपर्यंत तेच वापरत आहोत.
इथे आल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण कार्यालयात आणि बाजारात कसे जायचे! इतक्या कमी काळासाठी कार घेणे शक्य नव्हते. माझा अपार्टमेंट बुक करणारा सहकारी मदतीला धावून आला. मी त्याच्या कारमधून ऑफीसला जाणे-येणे करू लागलो. काही दिवसांनी एक खूप सुस्वभावी जोडपे आमच्या परिचयाचे झाले. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली. सगळ्यात मोठी मदत म्हणजे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी ते आम्हाला सोबत घेऊन जाऊ लागले. निखळ मैत्री म्हणावी असे संबंध या जोडप्याशी तयार झालेले आहेत. त्यांची नावे मयूर आणि सीमा.
मूर्सव्हील हे एक अत्यंत छोटे आणि टूमदार गाव आहे. शॉर्लेटपासून साधारण २५-२८ माईल्स दूर असलेल्या या गावात लोकवस्ती तशी बर्यापैकी विरळ आहे. हळू-हळू आम्ही स्थिरस्थावर झालो. काम व्यवस्थित सुरु झाले. आम्हाला शक्य तेवढे फिरून घ्यायचे होते. इथे पोहोचल्यानंतर १५ दिवसातच आम्ही नायगारा, १००० आयलंड्स, वॉशिंग्टन डीसी, फिलाडेल्फिया, आणि न्यूयॉर्कच्या सहलीचे बुकींग केलं. फिनिक्समध्ये माझा सचिन नावाचा एक जवळचा मित्र राहतो. त्याने याबाबतीत खूप मदत केली. आल्या-आल्या पैसे असण्याचे काही कारण नव्हते म्हणून त्याने पैशांची मदत देखील केली. ऑक्टोबर ११, २०१३ या दिवशी आम्ही न्यूयॉर्कला पोहोचलो आणि दुसर्या दिवशी सकाळी टेकटूर्स नावाच्या कंपनीच्या पॅकेज टूर मध्ये नायगाराला जायला निघालो. नायगाराचे ते भव्य आणि उदात्त रूप पाहून डोळ्याचे पारणे फिटले. १००० आयलंड्सची क्रूज खूप छान होती. कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर अलेक्झांड्रिया बे नावाच्या गावाजवळ सेंट लॉरेन्स नदीमध्ये ही १८००+ बेटे आहेत. फिलाडेल्फियाची ईंडिपेंडन्स बेल आणि ईंडिपेंडन्स हॉल पाहिला. यापेक्षा मला हे गाव खूप आवडले. छान वाटले तिथे फिरून. अमेरिकेच्या सरकारचा संप असल्याने आम्हाला वॉशिंग्टन डीसी मध्ये बाहेरून व्हाईट आणि युएस कॅपिटॉल बघावे लागले. बाकी सगळी उद्याने, स्मारके, संग्रहालये बंद होती. तिसर्या दिवशी रात्री न्यूयॉर्कला पोहोचून आम्ही टाईम्स स्क्वेअरला गेलो. न्यूयॉर्कला संध्याकाळी आमची सहल संपली. टाईम्स स्क्वेअरला आम्ही दोघेच टॅक्सीने गेलो. न्यूयॉर्कची महती खूप ऐकून होतो आणि त्याचप्रमाणे न्यूयॉर्क भासले. प्रकाशमान, देदीप्यमान, वेगवान, आणि एक रहस्यमय ऊर्जेने भारलेले! दुसर्या दिवशी वॉल स्ट्रीट, युनो, एम्पायर स्टेट बिल्डींग, मादाम तुसॉ संग्रहालय, स्वातंत्र्यदेवता अशा ठळक जागा पाहिल्या. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा खरोखर खूप सुंदर आणि भव्य आहे. एक प्रकारचे गूढ वलय या पुतळ्याला आहे. हडसन नदीच्या तीरावर थोडा वेळ व्यतीत केला. संध्याकाळी आम्ही शॉर्लेटला यायला निघालो. ही सहल खूप छान झाली. आमची पहिलीच इतकी मोठी आणि इतक्या जगप्रसिद्ध ठिकाणांची सहल होती ही! आम्ही दोघे खुश झालो.
पुढे मयूर आणि सीमा या उत्साही मित्रांसोबत आम्ही स्मोकी माऊंटनची सहल केली. गॅटलिनबर्ग या टेनीसी राज्यातल्या एका सुंदर गावात आम्ही राहिलो. स्मोकी माऊंटन हा अपालाचिअन पर्वतरांगांचा एक भाग आहे. ही पर्वत रांग कॅनडाच्या अमेरिकेकडील टोकापासून तर अमेरिकेतल्या दक्षिण भागातल्या राज्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. फॉलचे अनेकविध रंग बघून छान वाटले. चेरोकी नावाच्या खूप सुंदर अशा गावात आम्ही थोडा वेळ थांबलो. हे तर अगदी चित्रातले गाव वाटते.
नोव्हेंबर २०१३ मध्ये आम्ही (म्हणजे आम्ही दोघे आणि मयूर आणि सीमा) अटलांटाच्या सहलीवर गेलो. अटलांटाचे डाऊनटाऊन, मार्गारेट मिशेल ('गॉन विथ द विंड'च्या लेखिका) यांचे निवासस्थान, झू अटलांटा, जॉर्जिया अॅक्वेरिअम, स्टोन माऊंटन, सीएनएन स्टुडिओ, कोकाकोला फॅक्टरी, इत्यादी सुरेख ठिकाणांना भेट दिली. अटलांटामध्येच भरवण्यात आलेल्या ऑलिंपिकच्या शंभराव्या क्रीडोत्सवाप्रीत्यर्थ अटलांटा डाऊनटाऊनमधील सीएनएन स्टुडिओजवळ एक सुरेख उद्यान उभारले आहे; त्या उद्यानामध्ये थोडा वेळ फिरलो.
जानेवारी २०१४ मध्ये आम्ही दोघेच फ्लोरिडाच्या भेटीला निघालो. ओरलँडो आणि मयामी ही दोन सुंदर शहरे पाहिली. मयामीचे जगप्रसिद्ध साऊथ बीच पाहिले. ओरलँडोच्या युनिव्हर्सल स्टुडिओजच्या अॅडवेंचर पार्कला जाऊन चित्तथरारक राईड्स केल्या. अशा राईड्स मी आयुष्यात कधीच केल्या नव्हत्या. घाबरत घाबरत का असेना पण माझ्या बायकोने सगळ्या सो-कॉल्ड भयानक राईड्स यशस्वीरीत्या केल्या. हा अनुभव अगदी नवा आणि आनंद देणारा होता. मयामी ला दीड तासाच्या क्रूजमध्ये आम्हाला फिशर आयलंड या अतिश्रीमंत भागाचे दर्शन घडले. अमेरिकेतल्या सिनेमासृष्टीतले आणि इतर क्षेत्रातले नामवंत आणि धनवंत इथे राहतात.
जसे जमले तसे थोडे फार शॉर्लेटमध्येही फिरलो. या सहलींनी खूप आनंद दिला; समाधान दिले. मूर्सव्हीलमधल्या वास्तव्यात वाचन बर्यापैकी केले. पाच-सहा चांगली पुस्तके वाचून झालीत. आणि चित्रपटांनी मात्र चिरकाल टिकून राहील असा अवीट आनंद दिला. गॉन विथ द विंड, गुडफेलाज, कॅसिनो, सायको, शिंडलर्स लिस्ट, वर्टीगो, द शायनिंग, इट हॅपन्ड वन नाईट, वन फ्लू ओवर द कक्कूज नेस्ट, मॅकेनाज गोल्ड, सेवन समुराई, द मॅग्निफिशन्ट सेवन, सेवन ब्राईड्स फॉर सेवन ब्रदर्स, अ स्ट्रीटकार नेम्ड डिजायर, सिटीझन केन, द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, ईटी, द गॉडफादर, द बायसिकल थिफ, फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर, रिबेका, सायलेंस ऑफ द लँब्ज, टॅक्सी ड्रायव्हर, द परफेक्ट स्टॉर्म, जॉज, बॅक टू द फ्युचर, स्कारफेस, द गुड द बॅड अंड द अग्ली असे बरेच उत्तमोत्तम चित्रपट (अर्थातच जालावर) पाहिले. अगदी झपाटल्यासारखे एकामागोमाग २-३ अशा वेगाने हे चित्रपट पाहिले. खूप समाधान वाटले. मी इंग्रजी चित्रपट तसे कमीच बघतो पण ही काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांची नावे लहानपणापासून ऐकत आलो होतो. उत्सुकता म्हणून सुरुवात केली आणि मग भरपूर चित्रपटांचा आनंद लुटला.
फेब्रुवारी २२, २०१४ या दिवशी श्री. धमाल मुलगा आम्हाला भेटायला म्हणून शॉर्लेटवरून आले. येतांना मस्त काजू कतली घेऊन आले. त्यांच्याशी २-२.५ तास भरपूर गप्पा झाल्या. त्यांचा मनमोकळा स्वभाव आणि गप्पांची हातोटी भावली. मिपाच्या गप्पा रंगल्या. बर्याच विषयांवर बोलणे झाले. असा हा मिनी मूर्सव्हील कट्टा छान रंगला. त्यांच्या येण्याने खूप बरे वाटले. फोटो काढले आहेत नंतर टाकीन.
सहा-सात महिन्यापूर्वी मी मिपावर 'मदत हवी आहे' म्हणून अमेरिकेला येण्याच्या आधी मार्गदर्शनासाठी म्हणून धागा टाकला होता. आज आमची अमेरिकेतले वास्तव्य संपत आलेले आहे. पुन्हा कधी येऊ का? आलोच तर कधी? किती दिवसांसाठी? या प्रश्नांची उत्तरे नाहीत. पुन्हा येण्याचे कदाचित शक्य नव्हते म्हणून आम्ही जेवढे जमले तेवढे फिरून घेतले. वस्तूंची खरेदी करण्यापेक्षा अनुभवांचा खजिना लुटला. स्वयंपाकाची भांडी, एक कंफर्टर, दोन ब्लँकेट्स, एक लॅपटॉप, दोन फोन्स, एक बेडशीट, कपडे, इथे विकत घेतलेला मिक्सर, आणि इस्त्री फक्त एवढ्या वस्तू घेऊन आम्ही राहिलो. फर्निचर, कार वगैरे विकत घेणे टाळले. त्यामुळे आम्हाला फिरण्यावर थोडे जास्त पैसे खर्च करता आले. मिपावर 'मदत हवी आहे' धाग्याला उत्तम प्रतिसाद लाभला. सगळ्यांनी आपापल्या परीने मार्गदर्शन केले. धमाल मुलगा, हेमांगीके, श्रीरंग जोशी, रेवती, लंबुटांग, सिद्धार्थ कुळकर्णी (सिद्धार्थ४), उपास, मराठे, राघव८२, जुइ, आणि इतर बर्याच जणांनी खूप मोलाची माहिती दिली आणि मदतीची तयारी देखील दर्शवली. काहींनी ताबडतोब ईमेल आयडीज आणि फोन नंबर्स देखील दिलेत. श्रीरंग जोशींचा त्या धाग्यावरचा माझ्या ख्याली खुशालीबद्दलचा प्रतिसाद मी आत्ता वाचला. क्षमस्व! अर्थात त्यानंतर आमचा संपर्क झाला. सगळ्यांशी व्यक्तीशः संपर्क साधणे शक्य झाले नाही त्याबद्दल देखील क्षमस्व!
आता परत जाण्याचे वेध लागले आहेत. तिथली कामे आ वासून उभी आहेत. अजून इथली तयारी राहिली आहे. हे राहिलेले ७-८ दिवस भुर्रकन उडून जातील. म्हणून आजच या सगळ्या चांगल्या आठवणींना उजाळा (धावता) दिला. भारतात पोहोचल्यावर हा लेख वाचतांना आणखी छान वाटेल.
या वास्तव्यात आणि वास्तव्यासाठी बर्याच जणांनी मोलाची मदत केली. आम्हाला जी मदत मिळाली ती आम्ही कधीही विसरणार नाही. सगळ्यांचे मनापासून आभार!
परत जाऊन मी काय मिस करणार? इथे मिळणारा मोकळा वेळ, शिस्तभद्ध आणि खूप कमी रहदारी, इंटरनेटचा स्पीड, स्वतंत्रपणे जगण्याची मुभा, बाहेरच्या कुठल्याही कामाला लागणारा कमी वेळ आणि ऊर्जा, झटपट होणारी कामे, कामातला सोपेपणा, इथली सुबत्ता, इथल्या लोकांचा मदत करण्याचा आणि इतरांच्या अडचणींची जाणीव ठेवणारा शिस्तबद्ध स्वभाव, आणि आमच्या इथल्या अपार्टमेंटच्या बाल्कनीमधून अनुभवायला मिळणारी नीरव शांतता! हे सगळं मी नक्कीच मिस करणार. पण पुणे तिथे काय उणे हे ही तितकचं खरं! त्यामुळे परत जातांना या सगळ्या गोष्टींना आता मुकणार याचे थोडे वाईट तर वाटतेय पण पुन्हा पुण्यात आणि आपल्या लोकांमध्ये जाणार याचा आनंद देखील होतोय. मनात अशा संमिश्र भावनांचं वादळ म्हणजेच जीवन असावे कदाचित...
गुडबाय, अमेरिका!
आता भेटू पुण्यात!
प्रतिक्रिया
अरे मित्रा...
धूसर
आवडला. आपण च एखादी चांगली
सुंदर लिहिलंय
गॅटलिनबर्ग या टेनीसी
सुंदर
छान
सुस्वभावी
छान लिहले आहे.
मनापासून व्यक्त केलेल्या
सामान
+१
है शाब्बास
लेखन आवडले.
छान लिहिले आहे...
स्वयंपाकाची भांडी, एक कंफर्टर
मस्त आढावा..
+१
थँक्स, उपास आणि लंबूटांग
आय सेकंड दॅट...
आवडले... तुमचा जगण्याचा
लेख आवडला पण...
हाहाहाहा...
छान अनुभव लिहिलात , इतकी वर्ष
अनुभवकथन आवडले
भारतात आलात की फोटो टाका थोडे
धन्यवाद!
मोजक्या शब्दात
भेटू
छान !
मस्त
नाही नाही
सुंदर. मी साधारण पुढच्या
कुठं येणार ते लिहा...
म्हैस...
"कस्स होईल? क्काय होईल?" >>>
मिपा
मस्त लिहीले आहे...विशेषतः......
खूपच छान!
मस्त
लवकर परत या...
समीरसूर , वाटाड्या... खरच