मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा :- मी जिंकलो, मी हरलो (२)

प्रमोद देर्देकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कथा :- मी जिंकलो, मी हरलो (१)
अनामिका
ताईने मला अचानक का बोलावून घेतले ते समजले नाही. नाही म्हणायला भावोजींनी तिच्या आजाराची कल्पना आम्हाला दिलीच होती. मी आई बाबांबरोबर वेळ मिळेल तशी वरचे वर येत होते. पण काल मला तिने फोनवरून तातडीने बोलावून घेतले. जरा काळजीत वाटली . मी आले तेव्हा भावोजी तनयाला आणायाला शाळेत गेले होते. शेजारच्या घोलेकाकूंनी दरवाजा उघडला. " ये गं वेळेवर आलीस " " काकू, कशा आहात तुम्ही? आणि ताई कशी आहे?" " माझं बरं आहे. आताच आमचा चहा झाला, आता तू आलीयेस तर मी निघते. जरा कुकर लावुन येते." मी आत मध्ये गेले. ताईच्या चेहऱ्यावर थोडा थकवा वाटायला लागला होता मागच्याच रविवारी आले होते त्यापेक्षा थोडी जास्त थकली होती ती. मला पाहताच हसून म्हणाली " आलीस , ये जरा माझ्या बाजूला बैस , पण त्या आधी बाहेरचा दरवाजा लावुन ये." "का गं?, काय झालं ?" " मला तुझ्याशी जरा बोलायचं होते." मी बाहेर येवून दरवाजा बंद केला आणि परत तिच्या खोलीत जावून तिच्या बाजूला बसले. तिने माझ्याकडे पहिलं आणि माझा हात हातात घेतला . माझ्यां हातावरून तिची शुष्क लांबसडक बोटे फिरायला लागली. मला कसंनुसं झालं. मला जाणवलं, लग्ना आधीची ताई आणि आत्ताची ताई यात किती तरी फरक होता. ती आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलो, खेळलो ते दिवस मला आठवले. ती ताई असूनही कधी तिने माझ्यावर ताईगिरी केली नाही. स्वतःच्या आवडी निवडी माझ्या वर लादण्याचा प्रयत्न केला नाही. शाळा , कॉलेज, मित्रमैत्रीणी अभ्यास यात कधी ढवळाढवळ केली नाही. ती माझी ताई असण्यापेक्षा आम्ही दोघी एकमेकांच्या मैत्रीणीच जास्त होतो. आई बाबांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. भरभरून दिलं. कधी "आम्हाला मुलगा नाही" याचं दु:खं केले नाही, कि कसली खंत नाही. दोन मुली असलेले ते एक सुखी चौकोनी कुटुंब होतं. आणि या सुखाची परिसीमा काय तर ताईचे पहिल्याच फटक्यात जमलेले लग्नं. जास्त दगदग करावीच नाही लागली बाबांना. अगदी तिला हवा तसा मनपसंद मुलगा मिळाला. आणि तनयाच्या आगमनाने सुखाची जादुई दुलई आम्ही पांघरली. सुख सुख म्हणजे काय असते हो?.

पण म्हणतात ना कुठल्याही गोष्टींचा अतिरेक वाईटच असतो. सुखाच्या या अत्युच्य शिखारापुढे दुःखाची एक अदृश्य खोल दरी आम्हाला मिळालेले सुख ओरबाडून घ्यायला अचानक निर्माण झाली.

मी ताईच्या डोळ्यांमध्ये पहिलं , मनानं अस्वस्थ वाटली, मनात काही तरी चलबिचल चालली होती , बहुदा तिला मला जे सांगायचे होते त्यासाठी ती शब्द गोळा करीत होती. पण सुरवात कुठून करावी हे कळत नव्हते. मी तिचा हात माझ्या हातात घेतला . "हं ताई काय झालं बोलनां?" तिने एक आवंढा गिळला अन म्हणाली "अनु, मी एक मागणं मागते ते देशींल?" "काय ताई? " "मला वाटत नाही कि मी आता फार जास्त दिवसांची सोबतीण आहे… " " ताs s ई" " होय अनु, मला जरा बोलू दे, मला एक वचन दे" " पण कसलं , म्हणजे कशाबद्दल? " नंतर सुमारे अर्धा तास ती बोलत होती थकवा आला कि मध्येच थांबत होती. प्रथम मला तिचं हे बोलणं रुचलं नाही. मी तिच्याकडे पहिले तेव्हा तिच्या डोळ्यात मला एक आर्जव दिसलं. मी तिच्यापासून सुटकेसाठी दोन दिवसांची मुदत मागून घेतली. दारावरची बेल वाजली . मी जावून दार उघडताच तनया ने अनुमावशी असे ओरडत माझ्या पायाला धावत येवून मिठी मारली. मी भावोजींकडे पाहिलं. त्यांच्या मनात मला संमिश्र भावना दिसल्या. ताईने माझ्याकडे हा विषय काढला असावा आणि त्यावर माझी काय प्रतिक्रिया असेल हे बहुदा ते अजमावत असावेत.काहीच न बोलता ते तिच्या खोलीत निघून गेले.

" अनुमवशी आज किनई आमच्या शाळेत एका मुलाचा वाढदिवस होता …" तनयाची बडबड ऐकत मी यांत्रिकपणे तिचं सगळं आटपत होते. आमची खूपच छान गट्टी होती. पण आज माझे कशातच लक्ष नव्हते.

दोन दिवस तर कसे भूरकन उडून गेले. तनयाची सगळी जबाबदारी आपसूकच माझ्याकडे आली होती. तिलाही मी तिचं केलेलं आवडत होतं. ताईने मला जे सांगितले त्यावर माझा निर्णय झाला होता. मी लग्नाला तयार झाले होते.

गेल्या तीन महिन्यात ताईच्या आजाराने बरेच चढउतार पाहिले. कधी ती खूप आनंदी असायची भरभरून बोलायची, तर कधी निराश खट्टू व्हायची. भावोजी तिचं सगळ खूप आस्थेने करत होते. ताईने भावोजींना एक दोन वेळा मला स्वीकारण्याबाबत बोलणी केली पण ते लग्नाला तयार नव्हते.

" अनामिका इकडे ये" ताईच्या खोलीतून हाक ऐकू आली तशी मी आत गेले. तेव्हा भावोजींचा हात ताईच्या हातात होता. ताईचा चेहरा शांत, समाधानी दिसत होता....
क्रमांश....

वाचने 3653 वाचनखूण प्रतिक्रिया 7

जेपी 19/12/2013 - 16:27
हेच म्हणतो

बॅटमॅन 19/12/2013 - 16:30
शैली उत्तम आहे. बाकी कथेचा शेवट काय असेल माहिती नै, पण अनामिका तिच्या भावोजीशी लग्न कर्णार असेल तर कै पटणार नै आपल्याला. असो.

In reply to by बॅटमॅन

प्रमोद देर्देकर 19/12/2013 - 16:43
आपले आधीचे सगळे म्हणजे (मी सदस्या व्हायाच्या आधीचे) जुन्या धाग्या वरिल सगळे प्रतिसाद, वाद-विवाद पाहुन साहेब आम्ही आपले पंखा झालो आहोत. कुठल्याही विषयावर आपली मते सोदाहरण पटवुन देणे ह्यात तुमचा त्या विषयावरील सखोल अभ्यास दिसुन येतो. व्य.नी केला आहे. उत्तराच्या अपेक्षेत आहे.

आंबट चिंच 23/12/2013 - 12:23

हा पण भाग आवडला. पुढिल भाग लवकर येवु दे.