जत्रा-२
लेखनप्रकार
या आधी : जत्रा १
दुसर्या दिवशी सकाळी जरा लवकरच उठलो सगळे. मोनीने त्या थंडीतही पहाटे पहाटे बेकरीतून गरमागरम ताज्या पावांचे खास बायरीश प्रकार आणले होते.भरपूर कॉफीबरोबर त्याचा समाचार घेत एकीकडे "आवरा रे लवकर" चा धोशा एकमेकांना लावत होतो.ख्रिसने कालचे उरलेले ब.वडे पावाबरोबर खाणे पसंत केले.(ह्याला एकदा कुंजविहार मध्ये नाहीतर वडापावच्या गाडीवरच न्यायचं आहे मला, खा लेका किती खातोस ते...) गाडी जत्रेत नेण्यात अर्थ नव्हताच,एकतर पार्किंगचा प्रश्न होता आणि महत्त्वाचे म्हणजे गाडी चालवण्यासाठी स्वतःच्या बिअर पिण्यावर बंधन घालून घेण्याइतका कोणी उदार नव्हता! त्यामुळे सबवे ने जत्रेच्या ठिकाणी म्हणजे 'दि विसन' ला पोहोचलो.
'दि विसन' म्हणजे खरं तर 'थेरेसिअनविसं'!हे विस्तीर्ण पटांगण राजकन्या थेरेसाच्या नावाने ओळखले जाते, त्याचे लघुरुप 'दि विसन'असेच बायरीश मंडळीत आणि आता सर्वत्रच प्रचलित आहे. आपले सर्कसचे तंबू असतात ना,तसे भव्य १४ तंबू या विस्तीर्ण पटांगणावर उभारले जातात. एकेका तंबूत ४,५ हजार जणांची बसण्याची,खाण्यापिण्याची,नाचण्यागाण्याची सोय असते. ह्या तंबूंमध्ये फक्त म्युनशनच्याच ब्रुअरीज बिअर विकू शकतात. लॉवेन ब्राऊ,होफ ब्राऊहाऊस,ऑगस्टीनर ब्राऊ,पॉलानर ब्राऊ,हाकर शॉर आणि स्पानटेन यांच्या छावण्या असतात इथे! आणि यांच्या आजूबाजूलाही लहानमोठी पालं ठोकलेली असतात. तिथे वाईस वुर्ष्टच्या १ फूटी जंबो नळ्या,बुढ्ढीके बाल,बर्फाचे गोळे, पाकवलेले बदाम,लेबकुकन म्हणजे बायरीश खासियतीची लवंग,दालचिनीच्या स्वादाची मसाला बिस्किटे, भिरभिर्यांच्या गाड्या,जत्रेतले पाळणे,डोंबार्यांचे खेळ.. एक ना दोन अशा अनेक गोष्टींनी ही पालं फुललेली असतात आणि सानथोर सारेच जत्रेचा आनंद लुटत असतात.
साधारण साडेनऊच्या सुमाराला आम्ही दि विसनला पोहोचलो. सगळेच्या सगळे तंबू तुडुंब भरून ओसंडत होते. आम्हाला खरं तर लॉवेन ब्राऊ मध्ये जायचं होतं पण तिथे ऑलिवर कहान येणार अशी खात्रीची बातमी मिळाल्याने लोकांनी एकच गर्दी केली होती. कहान पेक्षा आम्हाला ही जत्रा अनुभवायची होती त्यामुळे आम्ही मोर्चा ऑगस्टीनरकडे वळवला तर तिथेही अशीच गर्दी ! तिथे म्हणे बेकर येणार होता. आम्ही मनातून वैतागलो. 'यांच्या' उत्सवमूर्तींच्या नादात आमची वारी फुकट जाते की काय? असे वाटायला लागले. एवढ्यात मोनी गायब झाली. आता ह्या गर्दीत हिला कुठे शोधायचे? आम्ही विचार करत असतानाच ख्रिसचा भटक्या ओरडला. आजूबाजूच्या कलकलाटात आणि गोंगाटातून ऐकत एकदाचा मोनीचा ठावठिकाणा समजला. वाट काढत काढत आम्ही पॉलानर पाशी पोहोचलो खरे पण ही बया कुठेच दिसेना! परत तिला भटक्यावर संपर्क करणार तोच सिक्युरीटीचे दोन जवान आमच्याच दिशेने येताना दिसले. हे आपल्याला हाकलून द्यायलाच आलेत या ठाम समजूतीने आम्ही दोघांनी आपल्याला एक अक्षरही समजत नाही असा आव आणला तर ख्रिस आणि सुझनने आम्ही बहिणीला कसे शोधत आहोत ते पटवायला सुरूवात केली. शेवटी ते दोघेच म्हणाले,"मोनिका ना? तिचाच निरोप घेऊन आलोय आम्ही. चला आमच्या बरोबर..." अवाक होत आम्ही त्यांच्यामागे जायला लागलो. मुख्य प्रवेशदाराकडे न जाता आम्ही एका बोळात शिरलो. पिऊन दंगे करणार्यांना बाहेर काढण्याचा मार्ग होता तो! असे मागच्या दाराने आम्ही एकदाचे आत तर शिरलो...
बाहेर पावसाची भुरभुर आणि थंडीचा कडाका होता तरी आत मात्र उबदार वातावरण होते. बायरीश पारंपरिक कपड्यांनी नटलेले स्त्रीपुरूष, बायरीश खासियतींचे वस्तूविक्ये आणि संगीताची आणि सोनेरी जामांची नशिली नजाकत! अहाहा... मोनिकाने आपला बायरीशपणा पणाला लावत,"आमचे मित्र भारतातून खास ऑक्टोबर फेस्ट पहायला आलेत, त्यांना काय तसेच परत पाठवणार तुम्ही?"असा सवाल करून सिक्युरिटीवाल्यांना कसे पटवले ते तिखटमीठ लावून सांगून आम्हाला मागच्या दाराने का यावं लागलं याचं स्पष्टीकरण दिलं. चंचूप्रवेश तर केला, आता बसायला बाकडी शोधत फिरत होतो. मध्यभागी जरा उंचावर सुबकसा स्वरमंच होता आणि चहुबाजूला चक्क रामभरोसेच्या टपरीतल्या सारखी लाकडी बाकडी आणि टेबले होती. सगळा तंबू निळ्या आणि पांढर्या रंगाने नटवला होता. फुगे,पताका,कनाती सारे काही निळे, पिवळे आणि पांढरे! शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कसा सगळा शिवाजीपार्क भगवाकेशरी होतो ना? त्याची आठवण झाली. ह्या तंबूं मध्ये ठिकठिकाणी छुपे कॅमेरे लावलेले असतात. गैरवर्तन करणारे, 'जास्त' झाल्याने दंगा करणारे किवा 'लुडकणारे'यांच्या वर लक्ष ठेवत कॅमेरे आपले काम चोख बजावत असतात. असे कोणी आढळलेच तर त्यांना त्वरित बाहेर काढले जाते. बसायला जागा नसेल तर 'खानपानसेवेचा' लाभ मिळत नाही. त्यामुळे आम्हाला कुठेतरी बाकडे पकडून बसणे आवश्यकच होते. इथे तर लोकं मोक्याच्या जागा आधीपासूनच पकडून वाइस वुर्ष्ट+ सेंफ ( पांढरी सॉसेजेस+ मस्टर्ड सॉस ) आणि पोमीज म्हणजे फ्रेंच फ्राईजचा फडशा पाडत होते. वाईस वुर्ष्ट ही खास बायरिश खासियत फक्त १२वाजेपर्यंतच मिळते,तेवढ्यात मोनीने माहिती दिली. आता आम्हाला ते खायला मिळणार की नाही? असा प्रश्न मनात घेऊन आशाळभूतासारखे रिकामी जागा कुठे दिसते का पाहत फिरत होतो.सगळी बाकडी तर आधीच भरली होती. पुन्हा एकदा आपला बायरिशपणा पणाला लावत त्यातल्याच एका बाकड्यावरच्या ५,६ जणांना "घ्या की राव जरा सरकून.." असा प्रेमळ दम भरत मोनीने एकदाची जागा मिळवली. खच्चून भरलेल्या गाडीच्या जनरल डब्यात कशी जागा मिळवतो? त्यातलाच प्रकार होता तो! हळूहळू (म्हणजे २ मास सगळ्यांच्या पोटात गेल्यावर) आम्हाला सगळ्यांना त्या बाकड्याने आणि बाकड्यावरच्या मंडळींनीही सामावून घेतले.ती मंडळी कार्ल्सरुह ची होती आणि दरवर्षीची वारकरी होती. आमचा नवखेपणा आणि परदेशीपण याचे त्यांना कुतुहल वाटत होते. त्यामुळेच मोनीताईंच्या दादागिरीला त्यांनी चालवून घेतले. आता आम्ही 'आतले' झालो होतो आणि 'बाहेरच्यांना' इथे कशी अजिबात जागा नाही ते पटवत होतो.
आम्हीही आता बायरीश खासियतीचा समाचार घ्यायला सुरूवात केली. ब्रेत्सेल म्हणजे मीठाचे स्फटीक लावलेला बदामाच्या आकाराचा खास बायरीश पाव आणि हेंडेल म्हणजे तर जर्मन चिकन तंदूरीची 'आर्डर' ताईंनी दिली. आणि एकदम मध्यभागीच्या स्वरमंचावर वाद्यवृंदाचे बायरीश संगीत सुरू झाले. लोकवृंदही त्या तालावर आपापले चषक उंचावून मित्रमंडळींना प्रोस्ट (चिअर्स) करू लागला. आमच्या कार्ल्सरुहच्या मंडळीनीही प्रोस्ट करत नवीन मैत्रीचा चषक उंचावला!
ही रसवंतीगृहे सकाळीच सुरू झाली होती ती पार मध्यरात्रीपर्यंत चालूच राहणार होती...संगीताची आणि सोनेरी जामांची जादू हळूहळू भुरळ घालायला लागली होती. जत्रा अनुभवायला आता खरी सुरुवात झाली होती...



वाचने
13455
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
प्रेक्षणीय
प्रोस्ट
वा क्या बात है..
In reply to वा क्या बात है.. by गुंडोपंत
ऑलिवर काह्न
सुंदर!
झकास!!!!!!!!
आवल्डी जत्रा
यात्रा, तीन कधी !
In reply to यात्रा, तीन कधी ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिकन
मस्तच...मला
हे छगलं
In reply to हे छगलं by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
ए... आशं नाय
In reply to ए... आशं नाय by बिपिन कार्यकर्ते
अछं कसं....
In reply to अछं कसं.... by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
हे कसं?
In reply to हे कसं? by सुनील
बाकी फक्त
In reply to बाकी फक्त by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
तेच ते ..
सुंदर....
जलतरंग
मस्तच ग !